जंगलवाटांवरचे कवडसे - २

रमताराम's picture
रमताराम in जनातलं, मनातलं
9 Apr 2012 - 10:12 am

मागील भागः
जंगलवाटांवरचे कवडसे - १

राशोमोन या अविस्मरणीय चित्रपटाबद्दल इतके लिहिले गेले आहे की आता आम्ही राशोमोनवर लिहिणार म्हटल्यावर ’आता तुम्ही नवीन काय सांगणार?’ असा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो. पण ’राजहंसाचे चालणे, जगी जालिया शहाणे, म्हणोनी कवणे काय चालोची नये?’ अशी माउलींच्या शब्दांची उसनवार करून उलट विचारणा करून आमचे घोडे दामटतो.

राशोमोन चित्रपटाची पटकथा ही घटनाक्रमाचा विचार करता अतिशय छोटा जीव असलेली कथा आहे. कथेचा गाभा ’इन द ग्रोव्ह’ ही रुनोसुको अकुतागावाची आकाराने लहान पण आवाक्याने मोठी गोष्ट. कथानक लहानसेच. जंगलातून एक सामुराई आपल्या पत्नीसह चालला असताना तेथील झाडाखाली एका कुप्रसिद्ध डाकूच्या मनात त्या स्त्रीबाबत लालसा निर्माण होऊन तो तिच्यावर अत्याचार करतो. यात त्या सामुराईचाही मृत्यू होतो. त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या ताजोमारूला अटक करून त्याच्यावर खटला भरला जातो. या घटनेबाबत न्यायालयात खटला चालू असताना वेगवेगळ्या व्यक्तींनी त्याबाबत दिलेल्या साक्षींचा तपशील ही कथा नोंदवते. यात जंगलातील एक लाकूडतोड्या, एक भिक्षू, त्या डाकूला पकडणारा पोलिस, त्या स्त्रीची वृद्ध आई, ती स्त्री आणि खुद्द डाकू ताजोमारू यांच्या साक्षी नोंदवल्या जातात. एवढेच नव्हे त्या मृत व्यक्तीच्या आत्म्यालाही "माध्यमा"च्या सहाय्याने आवाहन करून त्याची साक्षही नोंदवून घेतली जाते.

या सार्‍या साक्षी इतक्या एकमेकांशी काही प्रमाणास सहमत होतानाच परस्पर विसंगत असे काही दावे करतात जे एकाच वेळी खरे असू शकतात का याचा निर्णय घेणे अतिशय अवघड होऊन बसते. अखेर न्यायालयाचा निर्णय काय झाला हे अकुतागावाने सांगितलेले नाही, केवळ साक्षी नोंदवण्याचे काम कोर्टातील कारकूनाच्या भूमिकेतून तो करतो. किंबहुना न्यायालयाचा निर्णय सांगायला ती गुन्हेगार कथा नाहीच, तो लेखकाचा उद्देशही नाही. मानवी स्वभावाचे विविध पैलू त्या साक्षींच्या निमित्ताने समोर आणणे हाच त्या कथेचा मूळ हेतू आहे. न्यायालयाचे कथेतील अस्तित्वच मुळी यांच्या कथनाला पार्श्वभूमी देण्यापुरते आहे. या दुव्याचा आधार घेऊन ती कथा दृश्य माध्यमात नेताना कुरोसावा खुद्द प्रेक्षकांनाच न्यायासनावर बसवतो नि या सार्‍या साक्षी त्यांच्यासमोर सादर करतो. त्यामुळे चित्रपट समजावून घेताना आपणच न्यायाधीश असल्याच्या भूमिकेत शिरून आपण या साक्षींच्या तसेच पुराव्यांच्या आधारे आरोपीला - किंवा अन्य कोणाला - गुन्हेगार ठरवू शकतो काय याचा निवाडा आपल्याला करायचा आहे. ही जबाबदारी आपल्यावर आहे असे जर गृहित धरले तर मुळात त्या साक्षीपुराव्यांचे मूल्यमापन करताना सत्यान्वेषणाचे निकष नि शक्यता काय असाव्यात याचा उहापोह पहिल्या भागात केलेला आहे.

'राशोमोन' या नावाची अकुतागावाची आणखी एक लहानशी कथा आहे. लढाया, दुष्काळ, रोगराई, वादळे यात उध्वस्त झालेल्या नगरीच्या मोडकळीस आलेल्या वेशीवर घडणारी ही कथा. पावसापासून आश्रयाला आलेला, मालकाने हाकलून दिलेला एक पापभीरु नोकर. त्याचा किरकोळ वस्तूंसाठी एका जर्जर वृद्धेला लुटण्यापर्यंत झालेला मानसिक प्रवास हा या कथेत दर्शवलेला आहे. याला अध:पतित नागरी नीतीमूल्यांची पार्श्वभूमी आहे. (विजय पाडळकरांनी या दोन्हीही कथांचा मराठी अनुवाद त्यांच्या ’गर्द रानात भर दुपारी’ या पुस्तकात दिलेला आहे.) कुरोसावाने त्या कथेचे सुंदर वेष्टण 'इन द ग्रोव्ह' भोवती गुंडाळून तिचा जंगलाबाहेरील वास्तवाशी सांधा जोडून दिला आहे नि ’राशोमोन’ नावाचे एक गारुड आपल्यासमोर ठेवले आहे.

कथांकडून चित्रपटाकडे जाताना कुरोसावाने काही बदलही केले आहेत. यात स्त्रीच्या वृद्ध आईचे पात्र अनावश्यक म्हणून गाळले गेले आहे तर मूळ राशोमोन कथाही थोडी बदलून घेतली आहे. यात इन द ग्रोव्ह मधील भिक्षूला नि लाकूडतोड्यालाच त्याने राशोमोन द्वारावर आणून बसवले आहे नि मूळ कथेतील सामुराईच्या नोकराला एक वेगळेच रूप देऊन जंगलातील कथेला उद्ध्वस्त नागर जीवनाचे अनुरूप असे अस्तर जोडून दिले आहे. खुद्द कुरोसावाने या चित्रपटकथेच्या यशाबद्दल साशंक असलेल्या आपल्या सहकार्‍यांशी त्याबद्दल बोलताना म्हटले आहे "माणसे स्वतःबद्दल स्वतःशी देखील प्रामाणिक असत नाहीत. स्वतःविषयी बोलताना भावना सजविल्याशिवाय ते बोलू शकत नाहीत. राशोमोनमधील माणसे अशी आहेत. आपण खरे जसे आहोत त्यापेक्षा अधिक चांगले आहोत या असत्याची साथ घेतल्याशिवाय ते जगू शकत नाहीत. ही गरज स्मशानातही माणसाचा पिच्छा सोडत नाही. मृतात्मादेखील असत्याची कास धरू पाहतो. अहंकाराचे पाप माणूस जन्मापासून करीत असतो. हा चित्रपट म्हणजे मानवी अहंभावाने निर्माण केलेले एक विलक्षण चित्र आहे." चित्रपटांचे ज्येष्ठ अभ्यासक विजय पाडळकर राशोमोनबद्दल लिहितात तेव्हा त्याचे सार सांगताना आंद्रे गीद चे वाक्य उद्धृत करतात. तो म्हणतो ’जे सत्याचा शोध घेत आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवा. पण सत्य सापडले आहे असा दावा करणार्‍यांवर - त्यांच्या दाव्यावर - संशय घ्या.

चित्रपटाची कथा घडते तीन ठिकाणी. पहिले म्हणजे ’राशोमोन’ द्वार. इथे प्रामुख्याने त्या घटनेबद्दलची चर्चा होते. दुसरी जागा आहे ते न्यायालय. इथे झाल्या गुन्ह्यांबद्दलच्या साक्षी होतात. गुन्ह्याशी संबंधित व्यक्ती आपापली निवेदने सादर करतात नि बाजू मांडतात. चित्रपटातून कुरोसावा जे मांडू पाहतो तो मुख्य भाग इथे येतो. तिसरी जागा म्हणजे गुन्ह्याचे घटनास्थळ, ते जंगल. पण इथे प्रत्यक्ष घटना दाखवली जात नाहीच कारण ते ज्ञात नसलेले असे सत्य आहे. ते काय आहे हे त्या घटनेचे साक्षीदार/सहभागी असलेल्या काही व्यक्ति निवेदन स्वरूपात - जी न्यायालयात सादर होत असतात - आपल्या पर्यंत पोहोचवत आहेत. चित्रपटमाध्यमात हे दृष्यरूपाने मांडले जात आहे तरीही हे त्या त्या व्यक्तीचे निवेदन, त्याला ’दिसले तसे’ किंवा ’दिसले असे त्याला वाट्ते’ किंवा खरेतर ते ’मला असे दिसले या त्याच्या दाव्या’चे केवळ दृष्यरूप आहे हे कधीही विसरता कामा नये. एकप्रकारे प्रेक्षकालाच त्या व्यक्तीच्या भूमिकेत नेऊन कुरोसावा त्याला ती घटना पहायला लावतो आहे. पडद्यावर तीच एक घटना तीनवेळा साकार होते पण तपशीलात वेगळेपण दिसते. घटित तेच असले तरी घटना भिन्न आहेत. जंगल हे त्या निवेदनाच्या सादरीकरणाची पार्श्वभूमी म्हणून वापरले जाते आहे. निव्वळ शाब्दिक निवेदनाऐवजी त्याला दृष्यरूप दिल्याने ती ती व्यक्ती त्या घटनेकडे कसे ’पाहते’ त्याचबरोबर आपल्या श्रोत्याने - न्यायाधीशाने - त्याकडे कसे ’पहावे’ असे त्याला/तिला वाटते याची अनुभूती प्रेक्षकांना मिळू शकते.

चित्रपटांच्या सुरुवातीच्या काळातील बर्‍याचशा चित्रपटांची मांडणी - ढोबळमानाने - समस्या, विकास नि अखेर निरास या तीन टप्प्यातून होत असे. इथे मुख्य समस्या आहे तो स्त्रीवरील अधिकार. स्त्री ही मालकीयोग्य वस्तूच समजल्या जाणार्‍या समाजाची पार्श्वभूमी या कथेला लाभली आहे. ती विवाहासारख्या (ज्यात त्या स्त्रीची संमती आवश्यक नसणे) संस्कारातून मिळवणे अथव शस्त्रबलाने जिंकून घेणे हे दोन मार्ग प्रचलित असतात.

चित्रपटात एकुण सहा मुख्य पात्रे आहेत (सातवे आहे ते पोलिसाचे, पण त्याला केवळ एक दुवा यापलिकडे काही महत्त्व नाही). यातील तीन पात्रे प्रत्यक्ष गुन्ह्याच्या घटनेशी संबंधित, त्यात सहभागी आहेत तर उरलेले तिघे हे त्या घटनेबाबत चर्चा करणारे आहेत (त्यातील एक अप्रत्यक्षरित्या त्या घटनेशी संबंधित आहे हे नंतर उघड होते. ) मुख्य घटना आणि त्यानंतरची न्यायालयीन प्रक्रिया आटोपल्या नंतर राशोमोन द्वारावर त्याबाबत चर्चा करणारे तिघे आहेत. यात एक लाकूडतोड्या, एक भिक्षू नि एक सामान्य माणूस. या माणसाचे नाव, त्याचा व्यवसाय याबाबत चित्रपटात काहीही सांगितलेले नाही, त्याची आवश्यकताही नाही. ज्याला कुरोसावानेच चेहरा दिला नाही त्याला संबोधनाच्या सोयीसाठी एखादे नाव देण्याऐवजी आपण त्याला ’तो माणूस’ असेच म्हणू या. मुख्य चर्चा ही लाकूडतोड्या नि भिक्षू - जे त्या न्यायालयीन प्रक्रियेत सहभागी होते - यांच्यात होते आहे. तो माणूस त्या चर्चेला केवळ एक वास्तवाचे परिमाण देतो आहे. लाकूडतोड्या सर्वसामान्य पापभीरू माणसाचे प्रतीक आहे. असत्य सांगणार्‍या त्या तिघांच्या साक्षींनी तो अस्वस्थ होतो. ’मला काय त्याचे’ म्हणून तो सहजपणे त्यांना विसरू शकत नाही. तो सत्याचा असा आग्रही असला तरी स्वत: स्खलनशील आहे. मोठ्या गुन्ह्यांबाबत अस्वस्थ असतानाच स्वार्थप्रेरित पण इतरांचे नुकसान न करणार्‍या लहान लहान चुका तो - अपराधभावनेचा ताण सहन करत - करतो आहे. तो भिक्षू अक्रियाशील चांगुलपणाचे चालते बोलते उदाहरण आहे. तो वारंवार चांगुलपणाबद्दल, सत्याबद्दल, माणसातील चांगुलपणावर आपली श्रद्धा असण्याबद्दल बोलतो आहे. पण सार्‍या घटनाक्रमात याहून अधिक तो काही करीत नाही. चित्रपटाच्या अखेरीस चांगुलपणाच्या, अनावृत अशा निरागसतेच्या रक्षणाची जबाबदारी घेण्याची वेळ येते तेव्हाही तो त्याबाबत काही करू शकत नाही. मग 'माणसावरील विश्वास डळमळीत होणे' वगैरे त्याचे प्रवचन वांझोटेच ठरते. अखेर स्खलनशील पण पापभीरू असलेल्या लाकूडतोड्यालाच ती जबाबदारी स्वीकारावी लागते. तिसरा माणूस एकप्रकारे अराजकतावादी अथवा स्थितीवादी. गेटची लाकडे बिनदिक्कतपणे मोडून शेकोटी पेटवणारा नि म्हणूनच वास्तवाशी अधिक जुळवून घेणारा. एका बाजूने प्रतीकांपेक्षा व्यावहारिक आयुष्याला अधिक महत्त्व देणारा आहे. हा सामान्य माणूस आल्यापासून धर्मगुरूची हेटाळणी करतो आहे. तत्त्वचर्चेला तो धुड्कावून लावतो. तो एक स्केप्टिक अथवा संशयात्मा आहे. भिक्षू काहीही बोलू लागला की ’प्रवचन पुरे’ म्हणत त्याला गप्प बसवू पाहतो. भोवतालच्या निराशाजनक स्थितीमुळे त्याला असे आक्रमक, अश्रद्ध, स्वार्थी नि सारासारविवेकहीन बनवले आहे. त्याला चित्रपटात नाव नाही. कदाचित हे संयुक्तिकच असावे कारण कुरोसावा जसे प्रेक्षकांनाच न्यायाधीशाची भूमिका देतो तसे तो क्योटोतील सर्वसामान्य माणसाचा प्रतिनिधी म्हणून त्याला समोर आणत असावा असे गृहित धरण्यास वाव आहे.

उरलेली तीन पात्रे ही मुख्य घटनेतील सहभागी आहेत. यात त्या घटनेची बळी ठरलेली ती स्त्री, तिचा सामुराई असलेला पती आणि तिच्यावर अत्याचार करणारा डाकू ताजोमारू. चित्रपटाची खर्‍या अर्थाने विषयवस्तू आहे ती स्त्री. तिच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल सांगायचे तर एकाच प्रसंगाबद्दल लिहिले तरी पुरेसे व्हावे. चित्रपटात एका क्षणी दोघांपैकी एकाची निवड करण्याची मुभा ताजोमारून तिला देतो तेव्हा ती गोंधळते. कारण त्या वेळच्या सामाजिक परिस्थितीमधे आपला पुरूष निवडण्याचे स्वातंत्र्य मुळातच स्त्रीला नसल्याने कदाचित त्या निवडीचे निकष काय असावेत याचा विचारदेखील तिने कधी केला नसावा. त्यामुळे हा निर्णय घेणे तिला अशक्य होउन बसते. स्त्री ही पुरुषाची मत्ता, त्याने तिच्यावर अधिकार प्रस्थापित करावा वा इतर कोणाला तो द्यावा अशा स्वरूपाच्या सामाजिक परिस्थितीमधे मुकाट जगणार्‍या स्त्रियांचे हे एक प्रातिनिधिक रूप म्हणता येईल. त्यामुळे त्या तिघांच्या साक्षी तपशीलात वेगळ्या असल्या तरी त्या हेच सांगतात की तिच्यासाठी तिचा पती - तो सामुराई - नि ताजोमारू हे लढले ते तिच्याच इच्छेने अथवा सूचनेमुळे. (त्यांच्या संघर्षाचे ती कारण नसली प्रेरणा नक्कीच होती.) जो जिवंत राहील ती त्याच्याबरोबर जाईल या गृहित धरून.

सामुराई हा तिचा पती असल्याने त्याच्या नात्याला/हक्काला सामाजिक वैधता आहे. सामाजिक नीतीनियमांना अनुसरून त्याने तिच्यावर आपला हक्क प्रस्थापित केला आहे. तो जरी सामुराई असला तरी पण दुबळा आहे. किंवा निदान जंगलातील संघर्षात का होईना तो ताजोमारूसमोर टिकाव धरू शकत नाही असे नक्की म्हणता येईल. यात सदैव जंगलात वावरणार्‍या ताजोमारूला तो जास्तीचा फायदा (handicap) आहेच पण त्याच बरोबर कदाचित सामुराईमधे सुखवस्तू नागर जीवनामुळे आलेले शारीरिक शैथिल्य हा ही एक त्यांच्या संघर्षात एक निर्णायक घटक असू शकतो. स्वत:च्या दौर्बल्याची लज्जा त्याच्या मनात आहेच पण कदाचित त्याचा खुल्या मनाने स्वीकार करण्याइतका दिलदारपणा त्याच्या वृत्तीत नाही.

याउलट ताजोमारू हा मुळातच डाकू. त्यातच त्या जंगलातील त्याच्या वावराबाबत नि त्याने केलेल्या गुन्ह्यांबद्दल आसपासच्या तथाकथित सभ्य समाजात असलेल्या (कु-)प्रसिद्धीमुळे आपोआपच एक प्रकारचा अहंभाव नि बेडरपणा त्याच्या वृत्तीचा भाग बनून गेलेल्या आहेत. त्यातच त्याची वर्तणूक थोडीशी वेडसरपणाकडे झुकणारी. न्यायाधीशासमोर साक्ष देत असतानाचे त्याचे वर्तन त्याच्या एकुण मानसिक आरोग्याबाबत शंका निर्माण करणारे. त्याचबरोबर समाजाने धिक्कारल्याने प्रत्येक गोष्ट ही हिरावूनच घ्यावी लागते अशी मानसिकता असण्याचाही संभव आहे. याच कारणाने स्वत:ला सिद्ध करू पाहणार्‍यांमधे असतो तो अतिरिक्त असा अभिनिवेशदेखील त्याच्यात आहे. त्या स्त्रीसंबंधी त्याच्या भावनांबाबत बोलायचे झाले तर त्या भावनेला सामाजिक मान्यता नाही. हे ठाऊक असल्याने कदाचित थोडी अपराधभावनाही त्याच्या मनात असू शकते. ती दूर व्हावी यासाठी तो तिच्यावर बळजबरी करण्याऐवजी तो तिला वश करून घेण्याचा प्रयत्न करीत असावा. तिची प्राप्ती व्हावी यासाठी त्यासमोर असलेले मार्ग म्हणजे एकतर तिच्या पतीपेक्षा आपले श्रेष्ठत्व सिद्ध करणे (तो सामुराई असल्याने नि हा डाकू असल्याने त्यांचे ऑक्युपेशन -नेमक्या अर्थच्छटा असलेला मराठी शब्द सुचला नाही क्षमस्व- त्याला अनुकूल आहे) किंवा बळजोरीने अथवा फसवणुकीतून तिचा भोग घेणे. दुसरा पर्याय हा सामाजिक प्रतिष्ठा तर देत नाहीच पण त्या स्त्रीच्या मनातही त्याच्याबद्दल त्याला अपेक्षित असलेली आदरभावना, प्रेमभावना अथवा आपुलकीची भावना निर्माण करीत नाही. त्यामुळे पहिला मार्ग त्याला अधिक स्वीकारार्ह वाटत असावा असा तर्क करण्यास वाव आहे. कारण दरोडेखोरीतून त्याने अमाप धन जमा केले आहेच, त्या स्त्रीच्या प्राप्तीनंतर एक स्थिर नि समाजमान्य असे आयुष्य जगण्याची संधी आपल्याला आहे असे त्याला वाटते आहे नि त्या दृष्टीने तो त्या स्त्रीकडे पाहतो आहे.

तर ज्युरीतील सभ्य गृहस्थहो, गुन्ह्याची पार्श्वभूमी, त्याबद्दल साक्ष देणारे तसेच आपसात चर्चा करणारे अशा सहाही सहभागी व्यक्तींबद्दल तुम्हाला सांगून झाले आहे. तुम्ही मायबाप ज्युरी निर्णय घेण्यास सक्षम आहात असे गृहित धरून मी प्रत्यक्ष साक्षींचा तपशील आता तुमच्यासमोर मांडणार आहे. त्या निवाड्याला आवश्यक ती विश्लेषणाची चौकट मागील भागात मांडली आहेच. त्याच्या आधारे तुम्ही ताजोमारूवरीला आरोपाचा निवाडा करायचा आहे. तर मिलॉर्ड आता मी खुद्द कुरोसावालाच हा सारा खेळ तुमच्यासमोर मांडायला बोलावतो आहे. मी आहे केवळ वकील. साक्षीपुरावे अधिकाधिक तपशीलाने तुमच्यापर्यंत पोचावेत असा प्रयत्न करणार आहे. आवश्यक ते तपशील अधोरेखित करणार आहे, विस्ताराने सांगणार आहे, निवेदकाची मनोभूमिका, त्याचे व्यक्तिमत्त्व यांची सांगड घालून पुराव्यांची संगती लावण्याचा प्रयत्न करणार आहे. अखेर निवाडा तुम्ही करायचा आहे.

मि. कुरोसावा हाजिर होऽऽऽ.

(क्रमश:)

___________________________________________________________________________
संदर्भ:
१. गर्द रानात भर दुपारी - ले. विजय पाडळकर
२. डॉ. श्यामला वनारसे यांची अप्रकाशित विवेचनात्मक व्याख्याने.

चित्रपटप्रकटनआस्वादसमीक्षा

प्रतिक्रिया

अन्या दातार's picture

9 Apr 2012 - 10:43 am | अन्या दातार

दोनवेळा हा चित्रपट बघितला. प्रेक्षक न्यायासनावर आपोआपच बसवला जातो. कुणी बसवले, कधी बसवले हे खुद्द प्रेक्षकालाही कळत नाही. अगदी चित्रपट बघून झाल्यावरही याची उकल होत नाही.
पहिल्यांदा बघताना, आपण खरंच चित्रपटात दाखवलेल्या सर्व साक्षी-पुराव्यांवर विसंबून उकल शोधायचा प्रयत्न करतो अन कुरोसावाच्या जाळ्यात अडकत जातो ते कायमचेच! हे विसरुन जातो की न्यायदान हा चित्रपटाचा मुख्य हेतू नाहीच (हे माझे बनलेले मत. चुकीचेही असण्याची शक्यता आहे. याला कारण म्हणून लेखात दिलेलेच वाक्य उधृत करतो: "जे सत्याचा शोध घेत आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवा. पण सत्य सापडले आहे असा दावा करणार्‍यांवर - त्यांच्या दाव्यावर - संशय घ्या.")

ररा, शेवटी तुम्ही कुरोसावाचीच गचांडी पकडलीत! पुढचा भाग लवकर टाका.

sneharani's picture

9 Apr 2012 - 11:14 am | sneharani

वेळाने का असेना दुसरा भाग आला, वाचला.
अन् चित्रपट पहावा असं वाटतोय!
मुख्य म्हणजे एका वाचनात लेख समजला! ;)

विसुनाना's picture

9 Apr 2012 - 11:25 am | विसुनाना

...एक वेगळेच रूप देऊन जंगलातील कथेला उद्ध्वस्त नागर जीवनाचे अनुरूप असे अस्तर जोडून दिले आहे.

स्वत:च्या दौर्बल्याची लज्जा त्याच्या मनात आहेच पण कदाचित त्याचा खुल्या मनाने स्वीकार करण्याइतका दिलदारपणा त्याच्या वृत्तीत नाही.

तो भिक्षू अक्रियाशील चांगुलपणाचे चालते बोलते उदाहरण आहे.

भोवतालच्या निराशाजनक स्थितीमुळे त्याला असे आक्रमक, अश्रद्ध, स्वार्थी नि सारासारविवेकहीन बनवले आहे.

स्वत:ला सिद्ध करू पाहणार्‍यांमधे असतो तो अतिरिक्त असा अभिनिवेशदेखील त्याच्यात आहे.

-वा.वा. अगदी मार्मिक विवेचन.

सहज's picture

9 Apr 2012 - 12:06 pm | सहज

सुपर्ब.

आजवर लोकांना दासबोध, गीता, ज्ञानेश्वरी, ओशो, बुद्धाचे तत्वज्ञान वगैरे वगैरे वर जितके समसरून लिहताना पाहीले आहे, त्याच तीव्रतेने तुम्ही राशोमान व सत्य तुम्ही लोकांसमोर उलगडत आहात...

वाचत आहेच..

विसुनाना's picture

9 Apr 2012 - 12:15 pm | विसुनाना

राशोमानमध्ये मांडलेले विचार हे नव्या (चित्रपट) माध्यमातून उलगडणारे मूलगामी तत्त्वज्ञानच नव्हे काय?

अवांतर -
दासबोध,गीता............इत्यादि आणि वगैरे यांपेक्षा राशोमानमधील तत्त्वज्ञान हलक्या दर्जाचे आहे ( विचारप्रसाराचे माध्यम जितके जुने तितके श्रेष्ठ) असा काहीसा वास वरच्या प्रतिसादाला (मला) आला. म्हणून हा उपप्रतिसाद.

सहज's picture

9 Apr 2012 - 12:34 pm | सहज

तसा तुमचा समज झाला तर तो माझाच लेखन दोष.

उलट मी राशोमानच्या माध्यमातून सत्यशोधन/ सत्य विषयक भाष्य (धर्म ह्या विषयाला टाळून) हे मला अगदी वर उल्लेख केलेल्या व मोठ्या प्रमाणावर लिहल्या गेलेल्या नेहमीच्या यशस्वी शीर्षकांच्या तोडीस तोड आहे असेच गौरवार्थ म्हणायचे होते.

जयंत कुलकर्णी's picture

9 Apr 2012 - 10:07 pm | जयंत कुलकर्णी

फार मस्त आणि अभ्यासपूर्ण लेख आणि तो ही माझ्या आवडत्या माणसाच्या चित्रपटावर.... म्हणून डबल धन्यवाद ! देरसू बघितला का ? अर्थात असेलच. :-)

फार पूर्वी मी या नाटकाचे स्वैर भाषांतर करायला घेतले होते कारण हा माझा एक अत्यंत आवडता दिग्दर्शक आहे.... मी अर्थात बरेच बदल केले होते... पण गाभा तोच होता.... आपल्या परवानगीने येथेच टाकत आहे. कदाचित आपल्याला पूर्ण करावेसे वाटेल...अर्थात नको असल्यास कळवावे...काढून टाकेन...

कृपया याला खाली प्रतिसाद देऊ नये. धागाकर्त्याला हे येथे आवडले नाही तर मी हे काढून टाकणार आहे.

तळजाई:
पात्र परिचय:
१ झोपडपट्टीतील गरीब माणूस. हातगाडी ओढणारा. कपडे फाटलेले. फाटक्या कपड्यांवर एक ठिगळ लावलेले जाकीट. पायात रबरी सोल मारलेल्या जाड चपला. दाधी वाढलेली. गळ्यात वारकरी माळ. स्वभावाने व दिसायलासुद्धा गरीब. नाव – राम मोरे.
२ धुर्त रिक्षावाला. खाकी वेश. खिशाला बिल्ला. पायात बूट. जगाची व माणसांची चांगली ओळख असलेला. हातात ट्रांझिस्टर. थोडक्यात बारा गावचे पाणि प्यालेला. नाव – बांदल
३ सुशिक्षित माणूस..जॉगिंगचा पोषाख. नाव – बाबासाहेब जगताप.
४ जोडप्यातील माणूस स्वत:बद्दल शिक्षणाने नसता फाजील आत्मविश्वास. नाव – जयसिंगराव भोसले
५ वरील माणसाची बायको. दिसायला सुंदर. पंजाबी ड्रेस, हातात भारी पर्स. पायात भारी चपला. नाव – पार्वती भोसले.
६ झोपडितील गुंड. कॉर्पोरेटर. राजकारणी. हातात सोन्याचे कडे. गळ्यात जाडजूड सोन्याची चेन. नाव नारायण लोखंडे.
७ अंगात येणारा व मृतात्म्यांशी बोलणारा अधुनिक देवऋषी-प्रो. संकपाळ.

स्थळ परिचय :
तळजाई हे एक टेकडीवर असलेले देवीचे देऊळ आहे. त्याच्यामागे वनखात्याचे मोठे जंगल. हे जंगल पायथ्याशी असणार्‍या झोपडपट्टी व बंगल्यातील लोकांची आवडती फिरायची जागा असणे स्वाभाविकच आहे. यात फिरायची वेळ स. ५.३० ते १० आणि सं ५ ते ७ अशी. या जंगलात बेकायदा जंगलतोड तसेच इतर अवैध धंदे जंगलखात्याला न जुमानता चालूच असतात. सकाळ आणि संध्याकाळ सोडल्यास जागा तशी निर्मनुष्यच असते. या देवळाच्या पायरीवर, अशाच एका पावसाली दुपारी...........

प्रवेश १
देवळाच्या पायर्‍यांवर राम आणि बाबासाहेब बसलेले आहेत. बाबासाहेबांच्या चेहर्‍यावर गोंधळलेला भाव स्पष्ट दिसतोय तर रामच्या चेहर्‍यावर चिडचिड. समोरचा रस्ता निर्मनुष्य़. देवळामागे बसायला बाके टाकलेली आहेत. पाऊस जोरात कोसळायला लागतो. पावसाच्या आवाजाने मोठ्याने बोलायला लागते.
राम: कठीन हाय बाबा ! खरच, समजायला लईच कठिन हाय. आजकाल खर्‍यातच काय बी खरं नाय सायब. या माळची शपत. काय खरं अन काय खोटं बाबाऽऽऽऽऽमाझ तर डोस्कच चालत नाय बगा मगापास्न. काय काय पगाया मिळनार हाय त्या देवाला म्हायत. कलियुग का काय म्हनत्यात ते ह्येच का वो सायब ?
साहेब: अरे बाबा मी पण गोंधळून गेलो आहे. विचार करून डोकं फुटायची वेळ आली आहे. मी तरी काय सांगू तुला ? खर्‍या खोट्याचा त्रास शेवटी आपल्यालाच. कुठून त्या भानगडीत पडलो असं झाले आहे मला. घरी बायको ओरडली ते ओरडलीच. आख्खी सोसायटी बघत होती पोलीस बोलवायला आले तेव्हा. रात्रभर झोप नाही ते वेगळच.
राम: तरी बायकूला सांगत होतो, नग आपल्याला ती लाकडं पण सुनबाई हट्टालाच पेटली. या हल्लीच्या मुली....पण त्यांचबी काय चुक हाय म्हना... शिजवायला त्यांनाच लागतय....हा पाऊस केंव्हा थांबणार आहे कोणा ठाव !
(पावसाचा जोर वाढतच चाललाय. विजाही चमकायला लागल्यात. वातावरण जरा भीतीदायकच झाले होते. दोघेही एकामेकांकडे बघतात त्यानेही त्यांना धीर येतो. तेवढ्यात रिक्षाचा आवाज येतो. साहेब उठतात, आता रिक्षाने घरी जायला मिळणार म्हणून चेहर्‍यावर सुटकेचा भाव. रिक्षेवाला आत येतो.)
बांदल: नमस्कार हो ! ते काय ते श्री हरी... या इथे असेच म्हणतातना ? चायला काय पाऊस हाय का काय हाय ! आभाळ फाटलय नुसत. प्लगवर पानी आल असणार. आता ते वाळेपर्यंत आहे इथेच मुक्काम.
(खिशातील बाटली काढतो तॊंडाला लावतो. साहेब नाराजीने त्याच्याकडे बघतो. ते बोलणार तेवढ्यात बांदल त्यांना बोलून देत नाही.)
बांदल: हो हो माहिती आहे तुम्ही काय म्हणणार ते. चायला मंग प्यायची कुठे ? तुमचे हे (देवाकडे बोट दाखवत) सगळीकडे असतात.
(साहेब दुसरीकडे तोंड वळवतात)
हे सालं यांचं बरं असत. दुसरीकडे बघितले की उत्तर नाही दिले तरी चालत. म्हणजे यांच्यापुरता प्रश्न मिटला. (मान ऊडवतो.)
राम: कठीन हाय.... आपल्या तर सगळ डोस्क्यावरून चाललय....
बांदल: ए यड्या, काय स्वत:शीच पुटपुटतोय? काही सांगशील का नाही...
राम: अरच्या, मला वाटल तुम्ही काही सांगताय नव्ह... ऐका काय झाल ते..
(प्रकाश आता रामवर थोडा पुढे येतो. बांदल आणि प्रेक्षकांना विश्वासात घेऊन सांगायला लागतो)
साहेब: तो काय सांगणार बिचार.....
बांदल: सांग रे. अरे व्वा साहेबपण आहेत का.. नमस्कार म्हटल ओळख दाखवताय का नाही ... खालच्या देवळात परवाच किर्तन ऐकलना आपण. लय झकास. अरे बाबा यांच्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरे आहेत. बोल बाबा तू बोल.
साहेब: शंकाच आहे. तुकाराम महाराज जरी वरून बघत असतील तर त्यांचेही डोके गरगरले असते...हे ऐकून...
बांदल: म्हनजे तुम्हीपण या भानगडीत आहात का ? भले....
साहेब: खोट कशाला बोलू ? हा आणि मी दोघेही होतोना तेथे बघितले आणि ऐकले. फारच भयंकर..
बांदल: अहो पण कुठे. काही सांगाल का नाही ?
साहेब: शिवदर्शन पोलीस चौकीत..
बांदल: पोलीस चौकीत ?
साहेब: हंऽऽऽऽ एका माणसाचा खून झाला होता...
बांदल: फक्त एकाच ? हात्तीच्याऽऽऽऽ एवढच ना, पुण्यात रोज शेकडो माणसे मरतात. त्यातील वीस टक्के तरी माणसांचे मुडदे पडलेत. ससुनमधे तर मुडदे ठेवायलाच जागा नाही म्हणे. आता बोला...
साहेब: खरंय. माझ्या आयुष्यात मी तीन युद्धे, २,३ भुकंप बघितले. त्यात आणि अपघातात माणसे मरणारच. परत चोर, दरोडेखोर आहेतच. पण असा मृत्यू वैर्‍यालाही येऊ नये. माझ्या आयुष्यात मी तरी असली चमत्कारीक घटना आणि मृत्यू बघितले नाहीत.
(रामकडे बघत हताश स्वरात) भयंकर नाही? माणसाने जगायचे कशासाठी देवावर विश्वास तरी कसा ठेवायचा?
बांदल: वाटलं होतं पाऊस संपेतोपर्यंत चांगला वेळ जाईल. पण तुम्हीतर किर्तनच चालू केले की राव. च्यायला पावसात भिजलेलं बर राव !
(बांदल इकडे तिकडे बघतो, सिगरेट काढतो. पेटवतो. एक खोलवर झुरका मारतो. भिजलेला शर्ट काढू पिळून वाळत टाकायला जाग आहे का ते बघतो. वारा सुटतो. विजांचा कडकडाट झाल्यावर शहारतो. खिशातील बाटली काढतो, साहेबाकडे बघत परत खिशात ठेवतो. दुसर्‍या पायरीवर जाऊन बसतो. साहेब आणि राम अजूनही तंद्रीतच. चेहर्‍यावर निराशा. राम एकदम तरा तरा उठतो आणि बांदलच्या येथे जातो)
राम: ओऽऽऽऽऽऽऽऽऽऽथांबा जरा वाईच ! माजंबी ऐका अन मग सांगा तुम्हाला काय समजतय ते... कशाला आरडताय..मला ते तिघे काय सांगत्यात त्याचा अर्थच कळत नाय बगा...
बांदल: कोण तिघं.....
राम: ऐका तर...
बांदल: जरा दम घ्या अन्‍ जरा कळल असं सांग...
राम: (दीर्घ श्वास घेऊन.......) हंऽऽऽऽऽऽऽऽऽपरवाचीच गोष्ट..( त्याच्याकडे आणि प्रेक्षकांकडे बघत आपली कहाणी सांगतो.
सकाळी दहा वाजता यो जंगल बंद असतया. त्या नंतर आम्ही समदी हिकडे लाकडं तोडायला येतो. सकाली फिरायला येनारं लई कटकट करतात ना म्हनूनशान ! मी पन असाच निघालो. त्या वाचमनला दहा रुप्ये टिकवलं आन्‍ घुसलॊ जंगलात. आता बगा, घुसलो हिकडून म्हनजी वाघजईच्या बाजुनं रस्त्यावर चिटपाखरूबी नाय. कामगारबी अजून यायचे व्हते. तुम्ही हिंडलाव का कधी इथं? लाकडं तोडन लई सोप्प बगा. जाताना फांद्या तोडायच्या आन येतान गोळ करायच्या... फांद्या तोड्त म्या पार टेकडीच्या दुसर्‍या टोकाला गेलो बगा. हं बरुबर. कालेज नाय का तिकडं, तिथं. झाडाचं एक पानबी हालं ना उकडून पार घाम घाम झाला.. ढग असं जमल्याल, आता म्हटल पड्तोय पाऊस आन जाव लागतय घरा.. आता अस वाटतय, पन पडला असता तर लई बेस झाल असत बगा.सुटलो अस्तो नव्ह.. मधी बगा त्या रस्त्यावर योकदम दाट झादी हाय ना, नाय का तिथ एक जांभळाच झाडबी हाय बघा, एकदम झाडीचा बोगदाच की... त्यातून डाविकडे वरती गेल्यावर यक लई मोठ वडाच झाड हाय बगा, तिकडच जायच व्हत मला. रस्ता सोडून डाविकडच्या रानात शिरलो अन मला लय मस्त वास आला व्ह ! एकदम बेस वाटाया लागल. तसाच पुढं गेलो आणि रस्त्यात काहीतरी पडल्याल दिसल.. बघतुय तर काय बाईची ओढनी.. हातात घेतली, त्याचाच लय छान वास येत होता बगा. हातात घिऊन तसाच निघालो तर कडला चपल्या पडलेल्या दिसल्या..लाललाल... जरा घाबरलोच. लई लफडी व्हत्यात न या रानात... कसलातरी आवाज जाला आन मी दचकलोचना ..राव. पन काय नाय..एक पाखरुच बोंबलत व्हत. हिकडे तिकडे बगितल अन म्हटल जरा बसुया. म्हनून बसलो आणि जरा लुडकलो अन्‍ आईच्यान सांगतोऽऽऽऽ माझी बोंबलताबी यईना.... मला लय जोरात बोंबलायच व्हत पण छ्या... वरती एक दोरी अन त्याला एक लटकलेला मुडदा...डोळ आणि जिब अशी बाहेर आल्याली, आजून पाय कापाचं थांबनात बगा.....
बांदल: मग काय केल तू?
(राम काही बोलत नाही. त्याची नजर शुन्यात जाते. बांदल त्याला हलवतो. राम एकदम दचकतो आणि एका दमात सांगतो)
राम: काय करनार ? हातातलं समद टाकलं आन पळत सुटलो तो योकदम ह्यो साहेब दिसले तवाच थांबलो अन काय. यांना समद सांगितल तवाशी माझी धडढ्ड थांबली यांनी थोड पाणी दिलं मग मन जरा थार्‍यावर आलं.
बांदल: मग ?...................................................

पुढे काय असेल हे तुम्हाला सांगायची गरज नाही. (म्हनजे ते तुम्हाला सहजच कळलं असेल) पण मला वाटले यातील सगळेच प्रसंग स्टेजवर मस्त दाखवता येतील.....

पैसा's picture

9 Apr 2012 - 8:09 pm | पैसा

मास्टरपीसची तेवढीच उत्तम ओळख. कवडसे हलतात तशी चित्रं बदलतात आणि वाटा वेगळ्याच दिसायला लागतात. पुढचा भाग लवकर द्या हा आग्रह आहेच पण असंच तब्ब्येतीत लिहा!

गणपा's picture

18 Apr 2012 - 12:50 pm | गणपा

सहमत.