होळी येतेय.. सगळ्यांनी मस्त पैकी रंगात रंगून मजा करायचा हा दिवस.. "होळी रे होळी, पुरणाची पोळी.." म्हणत मस्तपैकी पुरणपोळ्या रिचवायचा दिवस.. होळीच्या दिवशी पत्ते खेळणे, लिटल-लिटल घेणे आणि भांग पिणे हेही चालतं. आमच्या लहानपणी आम्ही वार्निश वगैरे पण माखायचो एकमेकांना, आणि मग आई आमच्या अंगाला कपडे धुवायच्या साबणाने घासून, गरम पाण्याने अंघोळ करायला लावायची. (आमच्या "शिशू की कोमल त्वचा"चं कुणाला काय पडलीच नव्हती.. :-))
तर मोठे झाल्यावर आम्हाला भांग (?) पण प्यायला मिळायची होळीच्या वेळी.. त्याचाच हा अनुभव..
मी कॉलेजला फर्स्ट इयरला असतांना दादाचा ग्रुप आमच्या गावी होळी साजरी करायला आला होता. आणि खास त्यांच्यासाठी म्हणून दादाने नागपुरला कुठल्यातरी पानठेलावाल्याकडून "असली माल" टायपातली भांग जुगाडली. तिला पाट्यावर चांगली घोटून रात्रभर मुरण्यासाठी म्हणून ठेऊन दिल्या गेलं.
दुसर्या दिवशी दादाचा ग्रुप आला आणि मग त्यांना भांग सर्व्ह करण्यात आली. दादाचा एक मित्र मला आग्रह करुन "अरे, ले ना यार.. कुछ नहीं होता!" म्हणत चढवत होता. आता, त्याआधी २-३ वर्षं आमचा काका आम्हाला "अस्सल, कडक भांग आहे. जास्त पिऊ नको, चढेल.." म्हणून नुस्ती ठंडाई पाजायचा. दोन -तीन ग्लास पिऊनही काय होणार त्याने? म्हणून मग मी पण "अरे, घेतली आहे आपण.. आरामात पचवतो येवढी तर !" म्हणून ३-४ ग्लास भांग रीचवली.. मस्तपैकी भांग प्यायची, आणि होळी खेळत संदलच्या तालावर धांगडधिंगा करायचा हे सुरु होतं..
भरपुर नाचून झाल्यावर हळूहळू भांग भिणायला लागली.. घरात आलो, तर पप्पा आणि काकांचं "लिटल लिटल" सुरु होतं. मी आईला म्हणालो, "आई, काय हे? कितीवेळचे पिताहेत?" (मला तेव्हा "ड्रिकींग एटीकेट्स"ची काहीच माहिती नव्हती.) आईने माझ्याकडे "चढलीय मुडद्या तुला" ह्या नजरेने पाहीले. मी गप बसलो. पण पुन्हा पाचेक मिनिटांनी "श्या !! इअत्की नाही प्यायची.." म्हणून सरळ पप्पा आणि काकांच्या समोरची बाटली उचलून घेतली !! शप्पथ सांगतो, फक्त भांगेच्या नशेत एवढी हिम्मत झाली माझी.. नायतर, बापासमोर फाटायची आपली..
झालं. तिथून आंघोळीला गेलो, आणि आंघोळ करतांना पायांची जाणीवच हरवली.. पार पाय नाहीतच गुढघ्यातून असं वाटायला लागलं. माझी टरकली. मी भराभर आंघोळ आटपून, कपडे घालून गप खोलीत जाऊन पडलो..
थोड्या वेळानी उठून बघतो, तर सगळी दुनिया गरागरा फिरत होती.. ओसरीत पाहीलं, तर दादाचा अख्खा ग्रुप रंगून, कमी जास्त तारेत ओसरीत बसला होता. (ज्याने मला आग्रहाने पाजली त्याला तर गाडीत घालून नागपुरला न्यावं लागलं.) मी एका बेडवरुन उठून दुसर्या बेडवर पडायचो. पुन्हा उठलो, की ओसरीत पहायचं आणि पुन्हा दुसर्या बेडवर पडायचो. असा हा माझा ह्या बेडवरुन त्या बेडवरचा "पलंग छोड" कार्यक्रम, कितीवेळ सुरु होता कोण जाणे..
बर्याच वेळाने मला भूक लागल्यावर दोन तीन पुरणपोळ्या चापल्या. (गोडाने भांग आणखी चढते, असं म्हणतात..) ह्यादरम्यान, दादाच्या ग्रुपने आणि काका मावशींना मी कधी निरोप दिला तेही बरोबर आठवत नाही (किंवा हलतं-हलतं आठवतं.) आणि जी झोप काढली ती पार दुसर्या दिवशी दुपारी उठलो..
होळीनंतर दोन दिवसांनी परीक्षा होती. नागपुर युनिव्हर्सिटीला सायन्सवाल्यांना पहील्या वर्षी दोन "लँग्वेज पेपर" असायचे. त्यातल्या सप्लिमेंटरी इंग्लिशचा पेपर होता.. भांगेच्या नशेत मी सिलॅबसपेक्षा दुप्पट अभ्यास करुन मी पेपरला गेलो. (सिलॅबसमध्ये पाच-सहाच धडे होते. मी पुर्ण पुस्तक वाचून गेलो होतो.) "फ्लॉरेन्स नाईटिंगेल" वरचा धडा ह्या नशेत वाचल्याचं पक्कं आठवतंय.. पेपर झाल्यावर पहीलं काम कुठलं केलं असेल तर ते म्हणजे मित्राकडून पुढच्या (इंग्लिशच्या)पेपरचा सिलॅबस माहीत करुन घेतला.. बिना-नशेचा एवढा अभ्यास करायची हिम्मत नव्हती आपली.. ;-)
प्रतिक्रिया
6 Mar 2012 - 6:03 pm | यकु
>>>> "श्या !! इअत्की नाही प्यायची.."
= )) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
= )) =)) =)) =)) =)) =))
= )) =)) =))
=)) =))
=))
____/\____ !!
मी भांगेच्या नाही, पण मद्याच्या नशेत आमच्या सिनीअरला आणि त्यांच्या बायकोला फ्लॅटमध्ये कोंडून बाहेर निघून गेलो होतो.
दरवर्षी आमच्या ऑफिस समोर साऊंडसिस्टीम वगैरे लाऊन, लोकांना रंगाने भिजवत गाण्यावर डान्स केला जायचा.
एका धुरवडीला आमचा कार्यक्रम संपल्यावरपण साऊंड चालू ठेवा म्हणून टारगट पोट्ट्यांनी ऑफिससमोर धिंगाणा केला..
हातात ते वाघनखासारखं घालून तस पोटात खुपसण्याच्या धमक्या देत होते.. सगळे पिलेले..
तेव्हापासून ते आमचे सर धुरवडच करीत नाहीत, आणि मला तर बिलकुल बोलावत नाहीत.
च्यायला संभाव्य दुर्घटना टळावी म्हणून मी त्यांना फ्लॅटमध्ये कोंडलं तर मीच गुन्हेगार ठरलो.
(नेहमी उगाचच गुन्हेगार ठरणारा ) यशवंत :(
7 Mar 2012 - 11:12 am | मी-सौरभ
चिगो, यकु...
दोघांचे किस्से सही आहेत..
(भांग प्यायची ईच्छा असलेला ;))
6 Mar 2012 - 5:55 pm | स्पा
=))
=))
=))
चिगो जबर्या लिहील आहेस
__/\__
6 Mar 2012 - 5:58 pm | गवि
अशा खूप गोष्टी ऐकून भांग या चीजवस्तूला हात लावण्याचं धाडस झालेलं नाही..
6 Mar 2012 - 7:58 pm | प्रास
हेच बोलतो.
बाकी चिगो, लई भारी राव! मस्त लिहिलंय.... :-)
6 Mar 2012 - 6:08 pm | प्रचेतस
मस्त किस्सा चिगो.
आता सोकाजीरावांकडून 'गाथा भांगेची' कधी येईल याची वाट बघतोय.
6 Mar 2012 - 6:27 pm | सोत्रि
गाथा भांगेची नाही पण एक 'भयाण अनुभव' आहे भांगेचा तो टाकतो "भांग अॅट फर्स्ट टाइम" ;)
चिगोचा किस्सा पानीकम वाटेल इतका भयाण अनुभव आहे तो....
- (भांगेपासून चार हात दूर असणारा) सोकाजी
6 Mar 2012 - 6:48 pm | मोदक
झकास किस्सा.. :-D
6 Mar 2012 - 7:08 pm | गणपा
भांग हे प्रकरण असं आहे त्याचा अण्भव स्वतः घेतल्या शिवाय मजा नाय.
दर होळीला भांगेची आठवण येते. कधी योग जुळणार कोण जाणे?
तुर्तास लोकांच्या किश्यांवर वेळ मारुन नेतो.
6 Mar 2012 - 10:23 pm | अमितसांगली
भांगेचा अनुभव नाही ...होळीच्या खूप खूप शुभेच्छा......
6 Mar 2012 - 10:56 pm | रेशा
खुप काय काय किस्से ऐकलेत ह्या भंगेचे .. हेहेहेहेहे
खरच भारीच लिहीलय रे!!! मस्त म्स्त
आणि खरच " ही चिज-वस्तु अजब आहे बुवा" किस्से ऐकुनच किती अजब आहे ते जाणवते :)
लेख मस्त
रेशा
6 Mar 2012 - 11:53 pm | मराठे
केसाला पाडायच्या भांगाशिवाय अजून भांगेशी संबध आलेला नाही. पण लोकांचे अनेक किस्से ऐकले आहेत. कदाचीत त्यामुळेच सोबर राहून ते प्रसंग एंजॉय करायची इच्छा आहे.
(सोबर) मराठे
6 Mar 2012 - 11:54 pm | बटाटा चिवडा
केसांचा "भांग" पाडण्याव्यतिरिक्त तसा भांगेचा इतर काही अनुभव नाही..
डोक्यावरचे केस राहीपर्यंत आयुष्यात २ प्रकारचे "भांग" अनुभवायला मिळतील अशी अपेक्षा..!!
आणि सर्वांना होळीच्या आणि धुळवडीच्या मनापासून हार्दिक शुभेच्च्छा..!!
6 Mar 2012 - 11:59 pm | पैसा
रत्नागिरीला एका गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीला सुरुवात करताना लोकांना भांग प्यायला देतात आणि मग त्यांच्या हातात लेझिम देतात. मिरवणूक समुद्रावर पोहोचेपर्यंत मग यांचं आपलं न थांबता चालूच!
यश्वंताचा किस्सा पण आवडला.
7 Mar 2012 - 12:03 am | सुहास..
ही ही ही ..
मी घेतली होती आयुष्यात एकदाच त्यावेळी एका विहीरीत उडी मारली होती ( जी सकाळी केवळ अर्धाफुट व्यासाची होती ;) ) येव्ह्ढेच आठवते ;)
7 Mar 2012 - 7:34 am | ५० फक्त
लईच बेक्कार हा प्रकार, प्रत्यक्ष मी घेतलेली नाही कधी, पण भांग आणि गांजा या दोन्ही मादक पदार्थांच्या सेवनाचे साईड इफेक्ट अनुभवलेले आहेत, वाईट वाईट वाईट, अजुन दुसरे शब्दच नाहीत.
7 Mar 2012 - 9:16 am | प्यारे१
होळीची सुरुवात झाली....!
चिगोच्या नावानं ...........बॉबॉबॉबॉ ;)
7 Mar 2012 - 9:40 am | निनाद मुक्काम प...
आमच्या कॉलेजात उत्तर भारतीय राजकारणात सक्रीय असलेल्या आमदाराचा मुलगा आमचा वर्गमित्र होता. त्याने होळीचा आदल्या दिवशी आम्हाला मरीन लाईन्स जवळ मुंबादेवी चे देऊळ आहे तिच्या पाठी उत्तर भारतीयाची एक गल्ली आहे. तिचे वातावरण जुन्या डॉन मधील खैके पान बनारसवाला सदृश होते.( तेथे आमचे हे वर्ग मित्र दर सोमवारी अस्सल भांग आणी थंडाई प्यायला यायचे. वर जलेबी आणी पेढे..
आम्ही येथे काही पेले रिचवले व गोड धोड खाऊन व थोडी भांग विकत घेऊन तडक चेंबूर मधील सिंधी केंप गाठले.
हा केंप निर्वासितांसाठी बांधला गेला होता व माझे बहुसंख्य पंजाबी मित्र तीथे राहतात. येथे पंजाबी जेवणाची मोठी खाद्य यात्रा भरली असते. अनेकदा कपूर कुटुंबीय सुद्धा येथे दर्शन देतात. जामा येथील गोड बिर्याणी म्हणजे निव्वळ अप्रतिम व अलम मुंबईत माझ्या मते ताज च्या पाठच्या गल्लीत बडे मियाच्या शेजारी गोकुळ व ह्या केंपातील राज हे दोनच बार २४ तास उघडे असतात. तेही बारा महिने.
राजची बिर्याणी सुद्धा लोकप्रिय.
ती चापून मग दुसर्या दिवशी आम्ही भांग थंडाई मध्ये टाकून वर शैक्षणिक जीवनातील शिकलेल्या विद्येचा वापर करत भांगेचे धमाल मोकटेल बनवायला सुरवात केली. ( अर्थात त्याची रेसिपी ही आम्ही ज्या धुंदीत बनवली ते पाहता आता काही केल्या आठवत नाही, मात्र मी रु अब्जा ची बाटली हातात घेऊन काहीतर केल्याचे आठवते.
भांग प्यायल्यावर खरच
दिड्कीची भांग घेतली ,तर ढीग भर कल्पना सुचतात. ह्या नाट्य व्यवसायातील पुरातन कोटीचा दिव्यानुभव आला.
ती काही वर्ष होळी आणी भांग असे समीकरण मस्त जमून आले होते.
मात्र आजही दामिनी सिनेमातील होळीचे ते दृश्य अंगावर काटा आणते.
7 Mar 2012 - 11:52 am | रानी १३
सोत्रि ने लिहिल्याप्रमाने
कथा भांगेची - एक 'भयाण अनुभव' ("भांग अॅट फर्स्ट टाइम" Wink) माझ्याकडे पण आहे
चिगोचा किस्सा पानीकम वाटेल इतका भयाण अनुभव आहे तो सुद्धा .....
.........टायपाची भीती ...आणी वेळ... आणी स्पीड... :( :( ; असो...........
7 Mar 2012 - 12:00 pm | यकु
भांगेबद्दल वर अनेक सदस्यांनी अनाठायी भीती बाळगली आहे.
पहिल्यांदाच जास्त प्रमाणात घेतली असेल तर मात्र बेजारी संभवते.
आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भांगेमुळे ''वेळ'' अत्यंत सूक्ष्म होतो आणि आपण एकच गोष्ट खूप वेळ करतोय असा भास होतो. पण वास्तविक नॉर्मल जेवढा वेळ गेला असेल तेवढाच वेळ उलटलेला असतो.
त्यामुळे खूप वेळ झाला तेच करीत होतो वगैरे केवळ भांग घेतलेल्या व्यक्तीला झालेले भास आहेत.
भांगेमुळे सारासार विचारशक्तीवर काहीही परिणाम होत नाही.
''कालाय तस्मै नम:'' हा माझा लेख भांग घेतल्याच्या स्थितीत लिहीला आहे.
ध्यानाच्या स्थितीत आणि भांगेच्या स्थितीत काय फरक आहे हे पहाण्यासाठी मी भांग वापरुन पाहिली.
आपण सर्वसामान्यपणे जसे असतो ते असणे अत्यंत वेगवान, चपळ आणि कुठेही गॅप नसलेले 'असणे' आहे.
भांग घेतल्यानंतर हे वेगवान, चंचल आणि कुठल्याही गॅपशिवाय असणे अत्यंत संथ तरीही चंचल होते.
पण भांग घेऊन ध्यान करता असे आढळले की जे अनुभव अनेक वर्षांच्या ध्यानानंतर संभव होऊ शकतात, तेच अनुभव भांग तुम्हाला काही तासांत देऊ शकते - ध्यान जनित आणि भांग जनित अनुभवांत कसलाही मूल फरक नाही - they are all the way same by their very nature! (U.G. was right afterall to say this.)
त्यामुळं सर्वसामान्यपणे ध्यानात आलेला कुठलाही दिव्य अनुभव हा काडीच्याही किमतीचा नाही हे मी शिकलो. एकंदरीत मादक पदार्थाचा वापर करुन असो की सर्वसामान्यपणे, जोपर्यंत एक्सपिअरन्सींग स्ट्रक्चर (शरीर, विचार, मन) जाणवते, तोपर्यंत कुठलाही 'रिअल' अनुभव संभवत नाही (हे अवघड वाटते, पण हे असेच आहे). त्यामुळे ध्यानात तथाकथित दिव्य अनुभव आल्याची बतावणी करणारे लोक सरळ सरळ आधी स्वत:ला मूर्ख बनवून, तोच अनुभव पुन:पुन्हा घेत बकवास करीत आहेत (ती मादक स्थिती एक्स्प्लॉइट करीत आहेत) असे मानावे.
धोक्याची सूचना: ध्यान वगैरे करणार्या साधकाने भांगेचा वापर करुन ध्यान करण्याचा प्रयत्न करु नये. मेंदुतील प्रत्येक संवेदक केंद्र अत्यंत उद्दिप्त होते आणि ज्ञानतंतूंवर प्रचंड ताण येतो. ते फटकन तुटूही शकतात. (ब्रेन हॅमरेज)
7 Mar 2012 - 12:14 pm | गवि
बाकी विवेचन उत्तम
खालील दोन प्वाईंटांशी असहमत..
काहीसा असहमत. भांग न घेता बाजूला उभे राहून पाहणार्यांचा काळ तर सूक्ष्म झालेला नसतो ना?
हेही फारसे बरोबर नाही.. मेंदूतील संवेदक केंद्रे, संवेदना, वेदना, विचार, अविचार, ध्यान किंवा अन्य कोणत्या गोष्टीने "ज्ञानतंतू" "तुटत" नाहीत आणि त्याला ब्रेन हॅमरेजही म्हणत नाहीत..
भांगेने जर ब्लडप्रेशर शूट होत असेल (होत नसावे) तर किंवा रक्ताभिसरणात प्रचंड अनियमितता येत असली तरच हॅमरेज वगैरे संभवते. त्या केसमधे ध्यान लावणे वगैरेने काही फरक पडणार नाही..
7 Mar 2012 - 12:20 pm | यकु
>>>काहीसा असहमत. भांग न घेता बाजूला उभे राहून पाहणार्यांचा काळ तर सूक्ष्म झालेला नसतो ना?
---- अमुक एक व्यक्ती भांग घेतल्याने खूप वेळ अमूक गोष्ट करीत होती हे फक्त ऐकीव आहे. भांग घेऊन खरंच कुणी विचीत्र वागल्याचे 'पाहिलेल्या' व्यक्ती मला माहित नाहीत.
मी पण विचित्र (म्हणजे नेहमी जेवढा असतो त्यापेक्षा जास्त) वागलेलो आढळलेलं नाही.
>>>>> हेही फारसे बरोबर नाही.. मेंदूतील संवेदक केंद्रे, संवेदना, वेदना, विचार, अविचार, ध्यान किंवा अन्य कोणत्या गोष्टीने "ज्ञानतंतू" "तुटत" नाहीत आणि त्याला ब्रेन हॅमरेजही म्हणत नाहीत..
---- || ध्यान वगैरे करणार्या साधकाने || हे मुद्दाम लिहिलं आहे. ध्यानामुळे खरोखर मेंदुत बदल होतात, असे बदल जाणवणार्या साधकाने असे म्हणायचे आहे.
7 Mar 2012 - 4:27 pm | वपाडाव
हे प्रतिसाद तु उज्जयनीच्या महाकाली मंदिरातील अस्सल भांग व तो प्रसाद खाउन तर लिहित नाहीस ना अशी शंका डोकावुन गेली...
7 Mar 2012 - 4:31 pm | यकु
अजून उज्जैनला गेलेलो नाही.
तुम्ही या सगळे मग जाऊ.
7 Mar 2012 - 11:39 pm | कवितानागेश
ध्यानामुळे खरोखर मेंदुत बदल होतात, असे बदल जाणवणार्या साधकाने असे म्हणायचे आहे.>>
ओक्के.
उद्यापासून भांग बंद! ;)
7 Mar 2012 - 7:51 pm | हंस
हा एकिव किस्सा आहे, असाच एकाला भांगेच्या नशेमध्ये वाचनाची हुक्की आली आणि त्याने घरातील ज्ञानेश्वरी पासून, रद्दीपासून अगदी कागदाच्या चिटोर्यापर्यंत सगळे समोर घेऊन नशा उतरेपर्यंत वाचत होता.
7 Mar 2012 - 8:28 pm | चिगो
सगळ्यांचे धन्यवाद आणि सगळ्यांना होळीच्या रंगभर्या शुभेच्छा..
सोत्रि आणि रानी१३, किस्से येऊ द्यात की जरा. निस्तंच टांगून ठेवताय.. ;-)