जॉर्ज कॉल्डवेल - भाग २

पिवळा डांबिस's picture
पिवळा डांबिस in जनातलं, मनातलं
26 Jul 2008 - 7:13 am

जॉर्ज कॉल्डवेल - भाग १
जॉर्ज कॉल्डवेल - भाग २
जॉर्ज कॉल्डवेल - भाग ३

(पूर्वसूत्रः शेवटी ही लढाई मला एकट्यालाच लढावी लागणार हे निश्चित झालं! देवनारच्या खाटिकखान्यात पाऊल टाकणार्‍या बोकडाइतक्याच उत्साहाने मी दुसर्‍या दिवशी वर्गात प्रवेश केला....)

आज वर्गात जरा आधीच जाऊन पोहोचलो. बाकीच्या विद्यार्थ्यांच्या ओळखी करून घेतल्या. दोन गोर्‍या अमेरिकन मुली, दोन मुलगे, एक कोरीयन मुलगी, एक बार्बाडोसची मुलगी आणि एक चिनी मुलगा- एक मुलगी आणि मी! बस्स, संपली वर्गाची लोकसंख्या!! आम्ही एकमेकांची चौकशी करत होतो. कालच्या अनुभवावर हलक्या आवाजात बोलत होतो. आता आपल्यालाच एकमेकांना कसं सांभाळून घ्यावं लागणार आहे याबाबत एकमतास येत होतो.....

इतक्यात जॉर्ज वर्गात शिरला.....

आज त्याच्या हातात काहीही नव्हतं....

जॉर्ज सरळ स्टेजवर गेला आणि एकही शब्द न बोलता आपल्या खिश्यातून खडू काढून त्याने फळ्यावर लिहायला सुरुवात केली.....

फळ्यावर एका ऑरगॅनिक रेणूचे स्ट्रक्चर (आकॄतीबंध) तो काढीत होता. रेणू खूप कॉम्प्लेक्स होता. जसजसा तो आकृती काढत होता तसतशी त्या रेणूची मला हळूहळू ओळख पटत होती.....

त्याचे लिहून झाल्यावर त्याने वर्गाकडे तोंड केलं आणि त्याच्या घनगंभीर आवाजात प्रश्न विचारला,

"डू यू नो व्हॉट धिस इज?"

कुणीच काही बोललं नाही....

त्याची नजर सगळ्या वर्गावरून फिरत शेवटी माझ्यावर स्थिर झाली. मला बारकाईने निरखू लागली, माझं अंग कसल्यातरी अनामिक दडपणाने आकसून गेलं......

"सो मिस्टर समोसा! कॅन यू टेल मी व्हॉट आय हॅव ड्रॉन हियर?" भारतीय असलेल्या माझं नवीन नामकरण झालं होतं.....

"टॅक्सॉल! इट इज द स्ट्रक्चर फॉर टॅक्सॉल!!" मी कसंबसं उत्तर दिलं.

"करेक्ट! नाऊ मिस बहामा-ममा," त्या बार्बाडोसच्या मुलीकडे बघत तो म्हणाला, "डू यू नो व्हाय टॅक्सॉल इज इंपॉरटंट?"

तिने नकारार्थी मान हलवली. पुन्हा त्याचा मोर्चा माझ्याकडे वळला,

"समोसा, टेल हर....." मला जर टॅक्सॉलचं स्ट्रक्चर माहिती आहे तर त्याचं महत्वही माहिती असणार हे अचूक जाणून त्यानं मला आज्ञा केली.

"ते काही प्रकारच्या कॅन्सरवर औषध ठरू शकतं!", मी.

"करेक्ट!! तेंव्हा असं बघ बहामा-ममा," परत तिच्यावर जॉर्जचं शरसंधान चालू झालं, "तू जेंव्हा वयस्कर होशील ना आणि आयुष्यभर बार्बाडोसची रम अतीप्रमाणात प्याल्यामुळे तुला जेंव्हा विविध प्रकारचे कॅन्सर होतील ना, तेंव्हा त्यातले काही प्रकारचे कॅन्सर हे औषध वापरून कदाचित बरे होऊ शकतील!!!"

मी हळूच तिच्याकडे पाहिलं. अपमानामुळे आणि रागामुळे डोळ्यात उभं रहाणारं पाणी थोपवायचा ती बिचारी आटोकाट प्रयत्न करत होती.......

जॉर्जला त्याचं सोयरंसुतक नव्हतं. आता त्याने सर्व वर्गाला उद्देशून बोलायला सुरुवात केली....

"हा रेणू औषधीदृष्ट्या महत्त्वाचा तर आहेच पण गंमत अशी आहे की हा फक्त नैसर्गिक स्त्रोतांपासून वेगळा काढण्यातच आत्तापर्यंत मानवाला यश मिळालंय. प्रयोगशाळेत कॄत्रिमरित्या हा रेणू बनवायचे खूप प्रयत्न झाले. त्यातील काही थोड्याफार प्रमाणात यशस्वीही झाले पण ते सर्व सिंथेसिस इतके गुंतागुंतीचे आहेत की ते फक्त लॅबस्केलवरच करता येऊ शकतात, प्लांटस्केलवर नाही. त्यामुळे या रेणूचं मास प्रॉडक्शन सध्या अशक्य आहे. आज आपण या रेणूचा सिंथेसिस अभ्यासणार आहोत!"

त्यानंतर जॉर्ज अखंड शिकवत होता. बोलत होता, फळ्यावर लिहीत होता. समोर पुस्तक नाही, स्वतःच्या नोट्स नाहीत! त्याच्या डोक्यातून झरझर झरझर विचार येत होते......

त्याने प्रथम तो गुंतागुंतीचा रेणू मेकॅनोचे तुकडे वेगळे करावेत तसा तुकड्या-तुकड्यात विभागून दाखवला (रेट्रो-सिंथेसिस!). आता, रेणू आपल्या मनाप्रमाणे वाटेल तसा कुठेही तोडता येत नाही, त्याचे काही नियम आहेत. त्याच्या अंतर्गत ऊर्जेचं वितरण लक्षात घ्यावं लागतं नाहीतर रेणू अनस्टेबल बनतो. जॉर्ज तर फळ्यावर भराभर आणि अचूक लिहीत सुटला होता. हां, मात्र त्याच्या लिखाणात कुठेहि एक वाक्य तर काय पण एक इंग्रजी शब्दही नव्हता! सगळी एकामागून एक स्ट्रक्चर्स!!!

इथे एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे. सिंथेटिक ऑरगॅनिक केमिस्ट्रीमध्ये वाक्यांना फारसं महत्त्व नसतं, महत्वाची असतात ती स्ट्रक्चर्स (रेणूंचे आकृतीबंध), ते बनवण्याच्या क्रिया, आणि त्यासाठी लागणारे विविध रीएजन्टस!! तुमच्यापैकी जे सायन्सवाले असतील त्यांना कल्पना असेल. जे सायन्सवाले नसतील त्यांनी आपल्या आसपासच्या कुणातरी बारावी सायन्सला असलेल्या विद्यार्थ्याचं पुस्तक जरूर पहावं! मात्र एक लक्षात घ्या की तो ऑरगॅनिक केमिस्ट्रीचा पहिला (१०१) कोर्स!! नुसती तोंडओळख!!! त्या पुस्तकाला जर बारीक-बारीक होत जाणार्‍या नऊ चाळण्या लावून जर त्यातून सर्व इंग्रजी शब्द जर चाळून काढून फेकून दिले आणि सर्व स्ट्रक्चर्स मात्र जर अधिकाधिक गुंतागुंतीची करत नेली जर जे तयार होईल ते ९०१ लेव्हलचं ऑरगॅनिक केमिस्ट्रीचं पुस्तक! ती एक वेगळीच सांकेतिक भाषा आहे, चकल्या-कडबोळ्यांनी बनलेली!!

टॅक्सॉलचा तो महाकाय रेणू जॉर्जने अनेक छोट्या-छोट्या रेणूंमध्ये सोडवून दाखवला. त्यानंतर विविध प्रकारचे रिएजंटस वापरुन ते छोटे तुकडे कसे बनवता येतील आणि एकमेकांशी कसे जुळवता येतील त्यावर विवेचन केलं. आम्ही भान हरपून बघत आणि ऐकत होतो! हो, अगदी बहामा-ममा सुद्धा सर्व अपमान विसरून गुंगून गेली होती.....

किरर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र!!!!!!

तास संपल्याच्या बेलने आम्हाला जाग आणली. पन्नास मिनिटं कशी गेली हे कळलंसुद्धा नव्हतं!!! जॉर्जने हातातला खडू परत खिशात टाकला आणि एकही शब्द न बोलता तो वर्गाबाहेर पडला.....

आम्ही सगळे तिथेच खिळून राहिलो. एक गोष्ट सर्वांना आता न सांगता स्पष्ट झाली होती.

हा विषय शिकवायची जॉर्जची हातोटी असामान्य होती. त्याचं विषयाचं ज्ञान बिनतोड आणि अतिशय उच्च दर्जाचं होतं. नाहीतर असा एक क्लिष्ट विषय शिकवतांना वर्गाचं भान हरपून दाखवणं ही सामान्य गोष्ट नव्हती. पुढ्यात बसलेले विद्यार्थीही काही गणेगंपे नव्हते. आम्ही सर्वांनी हा विषय यापूर्वी सलग पाच-सहा वर्षे अभ्यासलेला होता. काहींनी त्यावर स्वतंत्र लिखाणही प्रसिद्ध केलेलं होतं. असाच कुणी लेचापेचा प्रोफेसर असता तर आम्ही त्याला केंव्हाच फाडून खाल्ला असता!! केमिस्ट्री डिपार्ट्मेंटने हा अंतिम वर्ग जॉर्जला शिकवायला उगीचच दिलेला नव्हता, कदाचित त्याची सर्व दादागिरी सहन करूनसुद्धा!!!

आता त्याचा तास मी काही केल्या चुकवत नव्हतो. धावत-पळत, कधीकधी तर नोकरीवरून सुटल्यासुटल्या भुकेल्या पोटी जाउन वर्गात बसत होतो. जॉर्जच्या शिकवण्याच्या स्टाईलने तशी भूलच आम्हा सर्वांवर घातली होती. एकदा तर कमालच झाली. त्या दिवशी सबंध दिवसभर पावसाची रीघ लागली होती. दुपारी तर वादळी वार्‍याचं फोरकास्ट होतं. कामावरून सुटल्यावर युनिव्हर्सिटीची कॅम्पस बस पकडून वर्गात यायला मला जरा उशीरच झाला. अपराधीपणे "सॉरी, सॉरी" पुटपुटत मी वर्गात शिरलो आणि अंगावरचे पाण्याचे थेंब पुसत आता उशीरा आल्याबद्द्ल जॉर्ज मला कसा आणि किती सोलून काढतोय याची प्रतिक्षा करत राहिलो....

पण आज त्याचा मूड वेगळा होता....

"वेलकम मिस्टर इंडिया!" त्यानं माझं स्वागत केलं. आज मी समोसा नव्हतो. मग सगळ्या वर्गाकडे बघून तो म्हणाला,

"बघा, मी सांगितलं नव्हतं तुम्हाला, कितीही पाऊस पडला तरी हा येणारच म्हणून! अरे पावसाची भीती तुम्हाआम्हाला! तो तर लहानपणापासून मान्सूनचा वर्षाव सहन करत वाढलाय!!" म्हटलं तर विनोद, म्हटली तर चेष्टा. मी गप्प राहिलो.

"पण खरंच! जेंव्हा मान्सूनचा बेफाट पाऊस कोसळतो तेंव्हा तुम्ही लोकं काय करता?" त्या अमेरिकन चिमणीने खरंतर मला प्रश्न विचारला होता, पण उत्तर मात्र दिलं जॉर्जने....

"अगं त्यात अवघड काही नाही! जेंव्हा असा खूप पाऊस पडतो तेंव्हा हे लोक त्यांच्या पाळीव हत्तीच्या पोटाखाली जाऊन दडून बसतात! मग वरून कितीही पाऊस पडला तरी चिंता नाही. काय खरं की नाही मिस्टर इंडिया?" चेहरा विलक्षण मिश्किल करून जॉर्ज वदला. हे ऐकुन मलाही हसू आवरलं नाही.

"अगदी खरं!" मी दुजोरा दिला....

"नाऊ बॅक टू बिझनेस" असं म्हणून त्याने शिकवायला सुरवात केली. कुठली तरी क्लिष्ट रासायनिक अभिक्रिया होती. शिकवता-शिकवता मध्येच थांबला....

"आता जर मी या अशा स्टेप्स घेतल्या तर याच्या पुढची स्टेप काय येईल?" त्यानं वर्गाला प्रश्न केला.

हा सिंथेसिस यापूर्वी जगात कोणीच फारसा केलेला नसल्याने त्याच्या प्रश्नाचं उत्तर देणं कठीण होतं. आम्ही कोणीच हात वर केला नाही. मी तर खिडकीबाहेर नजर लावली. आभाळ काळ्याशार ढगांनी खूप अंधारून आलं होतं. आता कधीही जोराचं वादळ होणार अशी लक्षणं दिसत होती.

"सो कॅन यू गिव्ह मी ऍन आन्सर?", जॉर्जने त्या दोनापैकी एका अमेरिकन विद्यार्थ्याला विचारलं. त्यानं नकारार्थी मान हलवली....

"नुसतं डोकं हलवू नकोस, उठून उभा रहा! जरा ताजं रक्त वाहू दे तुझ्या मेंदूपर्यंत!!" जॉर्ज.

तो मुलगा गुपचूप उभा राहिला....

"आता सांग!" तो मुलगा गप्प...

"नांव काय तुझं?" नेहमी आम्हाला टोपणनावांने हाक मारणार्‍या जॉर्जला आमची खरी नांवं माहीती असायची गरजच नव्हती.

"जॉन" तो मुलगा म्हणाला.

"गुड! जॉन, घाबरू नकोस! इकडे ये" जॉन स्टेजवर गेला. त्याच्या हातात आपला खडू देत जॉर्ज म्हणाला,

"डोन्ट वरी! टेक धिस चॉक ऑफ सुप्रीम विझडम फ्रॉम मी!! ऍन्ड नाऊ राईट डाऊन द नेक्स्ट स्टेप!!!"

आम्ही सगळे त्या "चॉक ऑफ सुप्रीम विझडम" वर हसू दाबत आता जॉन काय करतो ते पाहू लागलो.....

जॉन काय करणार, कपाळ? त्याला बिचार्‍याला पुढची स्टेप माहितीच नव्हती. जॉर्जने खूपच दबाव आणला म्हणून त्याने फळ्यावर काहीतरी खरडलं. ते अर्थातच साफ चूकीचं होतं......

आम्ही सगळे श्वास रोखुन जॉर्ज या बिचार्‍या पोराचं आता काय करतो ते बघू लागलो. इतक्यात.......

कडाडऽऽऽ काऽड काऽऽड!!!!

बाहेर लख्खकन वीज चमकली आणि पाठोपाठ कानठाळ्या बसवणारा कडकडाट झाला........

आम्ही सगळेच दचकलो......

जॉर्ज स्थिर नजरेने जॉनकडे पहात होता.....

"डॅम्न यू, जॉन!!" जॉर्ज खिडकीकडे हात करत पण नजर जॉनवरच रोखून ठेवत त्याच्या खोल आणि धीरगंभीर आवाजात उद्गारला, "फरगेट मी ,जॉन! बट इव्हन द गॉड हिमसेल्फ डज नॉट ऍप्रूव्ह युवर आन्सर!!!"

वर्गात हास्याचा कल्लोळ उडाला!!!

त्यामध्ये सहभागी होत जॉर्ज पुढं म्हणाला, "फ्रॉम टुडे, यू आर नॉट जॉन!! यू बीट्रेयड द गॉड!!! फ्रॉम टुडे युवर नेम इज 'जूडास'!!!!"

कीर्रर्रर्रर्रर्र........

हास्याच्या कल्लोळात तास संपला......

असं शिकता शिकता चार महिने कसे उलटले ते आम्हाला समजलंही नाही....

आणि दुसरा कसला विचार करायला जॉर्जने आम्हाला अवसर तरी कुठे ठेवला होता!!

आणि मग एकदा ती वेळ आली.......

काळरात्रीची भयाण वेळ.........

(क्रमशः)

देशांतरविरंगुळा

प्रतिक्रिया

नंदन's picture

26 Jul 2008 - 7:24 am | नंदन

पहिल्या भागाला प्रतिक्रिया द्यायची राहून गेली होती, पण तेवढ्यात हा भाग आला. मस्त जमला आहे पहिल्या भागासारखाच. सुलेस सारखाच समोसाही रंगत चालला आहे :), पुढील भागांच्या प्रतीक्षेत.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

विसोबा खेचर's picture

26 Jul 2008 - 7:39 am | विसोबा खेचर

डांबिसा,

तुझ्यासोबत आम्हीही वर्गात बसून शिकतो आहे की काय असं वाटावं इतपत चित्रदर्शी लेखन...! सुंदर...!

आपण तर साला तुझ्या या जॉर्जच्या प्रेमातच पडत चाललोय...! :)

येऊ दे अजून, वाट पाहतो...

तात्या.

महेश हतोळकर's picture

26 Jul 2008 - 2:19 pm | महेश हतोळकर

एकदम सहमत

प्राजु's picture

28 Jul 2008 - 7:02 pm | प्राजु

सहमत आहे. मस्त झाला आहे हा ही भाग.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

यशोधरा's picture

26 Jul 2008 - 7:59 am | यशोधरा

पुढचा भाग कधी??
हा भागही मस्तच!!

विष्णुसूत's picture

26 Jul 2008 - 8:46 am | विष्णुसूत

सुन्दर ...
जॉर्ज च्या वर्गात बसायला आम्ही विकएंड ला हि येवु !!!

सहज's picture

26 Jul 2008 - 9:24 am | सहज

पहील्या भागा सारखच हा भाग देखील अत्यंत वाचनीय.

अवांतर - डॉ. ग्रेगरी हाऊस [सिझन ४] ची आठवण येतेय. जॉर्जनेच त्याला देखील शिकवले असावे : - )

विजुभाऊ's picture

26 Jul 2008 - 9:50 am | विजुभाऊ

काळरात्रीची भयाण वेळ.........
(क्रमशः)

हॅट स्साल्ला .......डॅम्बिसा तू मराठी सीरीयल मस्त लिहिशील रे.
स्वगतः त्या केसु ला सांगतो आता विडम्बने क्रमशः लिही आणि काही लोकांची ही खोड क्रमशः मोड म्हणुन

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

सुनील's picture

26 Jul 2008 - 10:56 am | सुनील

अजून येउदेत..

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

श्रीमंत दामोदर पंत's picture

26 Jul 2008 - 11:07 am | श्रीमंत दामोदर पंत

काळरात्रीची भयाण वेळ.........
(क्रमशः)
हॅट स्साल्ला .......डॅम्बिसा तू मराठी सीरीयल मस्त लिहिशील रे.

खरच आहे राव.....................
आता तर मी अगदी आतुरतेने वाट पहातोय पुढल्या भागाची............

प्लीज लौकर लिही............

झकासराव's picture

26 Jul 2008 - 11:13 am | झकासराव

आणि मग एकदा ती वेळ आली.......

काळरात्रीची भयाण वेळ.........

(क्रमशः)
>>>>>>>>>>>>.
~X(

आता काय कराव ह्या क्रमश:ला?????

................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

बिपिन कार्यकर्ते's picture

26 Jul 2008 - 11:25 am | बिपिन कार्यकर्ते

मजा येतेय... आय ऍम लविन' इट. लवकर लवकर येऊ दे...

(स्वगतः अरे त्या 'क्रमशः' ला कुणीतरी नेऊन घाला रे तिकडे, बारा गडगड्याच्या विहिरीत...)

बिपिन.

llपुण्याचे पेशवेll's picture

26 Jul 2008 - 11:39 am | llपुण्याचे पेशवेll

पिडांकाका मानले बघा तुम्हाला.
स्वगतः जर तो "चॉक ऑफ सुप्रीम विझडम" मला मिळाला तर मी पण अशीच व्यक्तिचित्रे सुंदरपणे रंगवू शकेन काय?

पुण्याचे पेशवे

स्वाती दिनेश's picture

26 Jul 2008 - 12:15 pm | स्वाती दिनेश

हा भागही मस्त.. आणि फार वाट पहायला न लावता योग्य अंतराने टंकल्याबद्दल थ्यांकू!
मि.इंडिया,तिसरा भागही असाच फार वाट पहायला न लावता लवकर लिहा,ही विनंती,:)
स्वाती

भडकमकर मास्तर's picture

26 Jul 2008 - 1:52 pm | भडकमकर मास्तर

चॉक ऑफ सुप्रीम विझडम_

बट इव्हन द गॉड हिमसेल्फ डज नॉट ऍप्रूव्ह युवर आन्सर

:):)
हे मस्तच..
फार छान चाल्लंय.....

( ऑर्गॅनिक केमिस्ट्रीला घाबरणारा ) भडकमकर

_____________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

धनंजय's picture

27 Jul 2008 - 5:25 pm | धनंजय

असेच.

असेच.

असेच.

++१

प्रियाली's picture

26 Jul 2008 - 4:53 pm | प्रियाली

दोन्ही भाग मस्त. लेखन चुरचुरीत आहे.

२६ जुलैच्या सकाळी मान्सूनच्या पावसाबद्दल वाचणे म्हणजे भारीच. ;)

अभिज्ञ's picture

26 Jul 2008 - 8:42 pm | अभिज्ञ

पिडाकाका,
अफलातून लेखन.अगदी जॉर्ज कॉल्डवेल चा तास अटेंड केलाय असेच वाटले.
पुढचा भाग लवकर येउ द्यात.
अभिनंदन.

ड्यांबिस काका ! तुमचं लिखाण पण जॉर्ज द गुरू ऑफ सुप्रिम विस्डम सारखं आहे. खिळून राहिलो वाचताना !

"सो मिस्टर समोसा! कॅन यू टेल मी व्हॉट आय हॅव ड्रॉन हियर?"
आय वुड हॅव रिप्लाईड "मि. हॉट डॉग , यु हॅव ड्रॉन अ स्पाईडर नेट ", मला तर सगळे स्ट्रक्चर तसेच वाटतात. स्ट्रक्चर जेवढं काँप्लेक्स तेवढा .. आमचा स्पाईडर मोठा ...
सही हो ड्यांबिस काका !! तुम्ही क्रमशः नंतर एक कमर्शिय ब्रेक ठिवा बॉ !!! जाम छापाल !!!

(मटण समोसा) कुबड्या खवीस
(आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. )
नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.


तू भारी ...तर जा घरी...

मेघना भुस्कुटे's picture

26 Jul 2008 - 11:14 pm | मेघना भुस्कुटे

अप्रतिम.. लिहा लवकर..

शितल's picture

27 Jul 2008 - 7:09 pm | शितल

पिडा काका
काय हो, अशा उंचीवर लेख नेऊन ठेवता आणि आम्ही खाली पडायची वाट पहाता. :)
आम्ही मस्तच रंगलो आहोत तुम्ही ऑरगॉनिक केमेस्ट्री मध्ये.
(पण मला का माहित ह्या लेक्चरला जास्त झोप यायची एकदा तर मी लेक्चर चुकुन पळताना मला सरांनी या वर्गात बसलात तर जरे बरे होईल असे हे शेरे एकवले आहेत.)
पण मार्क मिळुन देणारा विषय आहे आणि त्याहुन जास्त तो फक्त स्ट्रक्चर ने समजतो शब्दाहुन जास्त हे मात्र नक्की. :)

रत्नागिरीकर's picture

27 Jul 2008 - 7:42 pm | रत्नागिरीकर

पहील्या भागासारखाच हा भाग देखील अत्यंत वाचनीय.

धमाल मुलगा's picture

28 Jul 2008 - 1:55 pm | धमाल मुलगा

तुमच्यापैकी जे सायन्सवाले असतील त्यांना कल्पना असेल. जे सायन्सवाले नसतील त्यांनी आपल्या आसपासच्या कुणातरी बारावी सायन्सला असलेल्या विद्यार्थ्याचं पुस्तक जरूर पहावं!

ह्यॅ:..... आम्ही १२ सायन्सचा केमिस्ट्रीचा पहिला धडा 'ऑरगॅनिक केमिस्ट्री' ६ वेळा शिकून शेवटी मास्तरानं नाद सोडून दिल्यामुळे गपगुमान कॉमर्सकडे वळलो.

डांबिसकाका आपण धन्य आहात..महान आहात...
केमिस्ट्रीच्या इतक्या लांबच्या पल्ल्यावर मजल मारलीत, मला तर नुसतं वाचूनच फेफरं आलं.

तास संपल्याच्या बेलने आम्हाला जाग आणली. पन्नास मिनिटं कशी गेली हे कळलंसुद्धा नव्हतं!!! जॉर्जने हातातला खडू परत खिशात टाकला आणि एकही शब्द न बोलता तो वर्गाबाहेर पडला.....

आमच्या घारे सरांची आठवण झाली राव.
डोळ्याचा चष्मा कमरेच्या पट्ट्यात खोचून, दोन्ही हात खिशात घालून हा माणूस वर्गात यायचा.

मी त्याचं फेव्हरिट गिर्‍हाईक...
आल्या-आल्या मला विचारायचा, "बारक्या....काल कुठेपर्यंत आलो होतो आपण?" (आता हा माणूस घरच्या संबंधांमुळे मला वाट्टेल त्या नावाने हाक मारायचा, आणि त्याचं लेक्चर चुकवणं म्हणजे हा संध्याकाळी घरी येऊन मला धूणार हे ठाऊक असल्याने मी रोज वर्गात नित्यनेमाने हजेरी लाऊन असायचो. त्यामुळे हा प्रश्न मलाच.)
मी उत्तर दिलं की घारे सर पुढे सुरु व्हायचे...पुस्तक नाही, नोट्स नाहीत, काही नाही..धडाधड सुरु...
आम्ही म्हणायचो, 'घारे सर रोज सकाळी चहात पुस्तकाची पानं बुडवून खातात त्यामुळे त्यांना पुस्तकाची वेगळी गरज पडत नाही' ;)

"डोन्ट वरी! टेक धिस चॉक ऑफ सुप्रीम विझडम फ्रॉम मी!! ऍन्ड नाऊ राईट डाऊन द नेक्स्ट स्टेप!!!"

:)

"फ्रॉम टुडे, यू आर नॉट जॉन!! यू बीट्रेयड द गॉड!!! फ्रॉम टुडे युवर नेम इज 'जूडास'!!!!"

अरे वा...म्हणजे इनोदही करायचे तर हे गुर्जी....
मागच्या भागात वाटले तेव्हढे दुष्ट नाही दिसत की :)

काळरात्रीची भयाण वेळ.........

(क्रमशः)

~X( ~X( ~X( ~X( ~X( ~X( ~X( ~X( ~X(

लै भारी काका,
येऊदे लवकर पुढचा भाग :)

पु.भा.प्र.

सर्किट's picture

29 Jul 2008 - 12:29 am | सर्किट (not verified)

वा ! पहिल्या भागाने ज्या अपेक्षा वाढवल्या होत्या, त्याच ह्या भागातही कायम आहेत !

- सर्किट

चौथा कोनाडा's picture

20 Oct 2021 - 9:18 pm | चौथा कोनाडा

जबरी +१०१ वातावरण रंगवलंय क्लास मधलं !
पिडां साहेब भारी लिहितात !