"आय विल ऑल्वेज लव यू, व्हिटनी ह्यूस्टन"

प्रास's picture
प्रास in जनातलं, मनातलं
13 Feb 2012 - 4:53 pm

१९९२ सालच्या एप्रिल महिन्यात मी एका मोठ्या संकटातून पार झालो. अनेक दिवसांचा माझ्यावरचा 'पालकीय' पहारा त्यावेळी उठला. मी त्यावेळेपूर्वी हवा तेवढा झोपू शकत नव्हतो, खेळू शकत नव्हतो, इतकंच काय तर अगदी हवं ते पुस्तकही वाचू शकत नव्हतो. माझ्या या सगळ्या आवडत्या गोष्टींवर बंधनं टाकण्यात आली होती. माझ्यावर तोपर्यंत शेजार्‍यापाजार्‍यांपासून सतत कुणी ना कुणी लक्ष ठेऊन आहे असंच वाटायचं. बारावीची परीक्षा देत होतो ना मी त्या वर्षी! एप्रिल महिन्यात ती संपली आणि मी एका स्थानबद्धतेतून मला हवं तसं वागण्यासाठी मुक्त झालो. (बरं झालं माझ्यावेळी आत्तासारख्या प्रवेश परीक्षा नव्हत्या.) आता मित्रांबरोबर उंडारण्यासाठी नवनवे प्लान्स बनवणं सुरू झालं. ९२ साली परीक्षा संपल्यावर करण्यासारखी पहिली गोष्ट असायची ती म्हणजे हुकलेले पिक्चर्स बघणे. आता वर्षभर बंधनात असल्याने खूप पिक्चर्स हुकलेले होतेच पण तेव्हा त्यांच्यासाठी थिएटरांचीच वाट चालावी लागत असल्यामुळे तिथे जे दाखवत असतील तोच बघणे क्रमप्राप्त होते. शोधाशोध सुरू झाली. मित्रं, प्लाझात कोणता आहे, कोहीनूरात काय दाखवतायत, चित्राला कोणता लागलाय असं काहीसं लोकसत्तेत शोधत असताना मी सरळ जाऊन त्यावेळचं माझं चित्रपटविषयक गाईड म्हणजे 'मिड डे' घेऊन आलो. कोणता चित्रपट कुठे आहे याची 'मिड डे' इतकी उत्तम खबरबात निदान तेव्हा तरी कुणीच ठेवायचं नाही हा माझा अनुभव होता. चित्रपट जाहिरातींचं पान उघडल्या उघडल्या माझं लक्ष एका जाहिरातीने वेधलं. एका दणकट माणसाने आपल्या हातामध्ये लहान बाळाला धरावं तसं एका तरुण मुलीला धरलेलं असतानाचं चित्र त्यात होतं आणि खाली लिहिलेलं 'The Bodyguard'. Starring Kevin Costner. ते पाहिलं आणि माझा बेत जाहिर केला. तसं आम्हाला कुणालाच चांगलं इंग्लिश यायचं नाही आणि बोललेलं तर फार जुजबी कळायचं पण तरी मी हाच पिक्चर बघायला जाणार होतो. दुसर्‍यांचं बोललेलं इंग्लिश ऐकूनही ते सुधारतं असं नुकतंच कुणीतरी मला सांगितलेलं आणि तसाही 'केविन कॉस्नर' आपल्याला वर्षभरापूर्वीच्या 'रॉबिन हूड - प्रिन्स ऑफ थीव्ज' पासून आवडीचाच झालेला होता. नटी कोण हा तेव्हा प्रश्न डोक्यातच आला नाही.

दुपारच्या 'शो'साठी चर्चगेटला इरॉसमध्ये जायचं होतं म्हणून मग पटापट आवरून नावापुरतं दोन मित्रांना बरोबर घेऊन फास्ट ट्रेनने चर्चगेट गाठलं. स्टेशनमधून बाहेर पडल्या पडल्या इरॉससमोरच्या गर्दीने आमचं स्वागत केलं. वाटलं, आयला, मिळतंय की नाही तिकिट? पण करंट बुकींग चालू होतं. तसाच रांगेत घुसलो आणि तिकिटं काढली. हुश्श! हाताशी फार वेळ नव्हता मग उगाच इथे तिथे बघत वेळ घालवला आणि एकच्या ठोक्याला इरॉसमध्ये प्रवेश केला. पिक्चर सुरू झाला आणि आपला आवडता केविन कॉस्नर अ‍ॅक्टिंग मध्ये मस्त भाव खाऊन जात होता. पिक्चरच्या हिरॉइनची एन्ट्री झाली. नायिका होती व्हिटनी ह्यूस्टन नावाची कोणी गायिका. फारशी माहित नव्हती, कुरळे अस्ताव्यस्त प्रकारचे केस, अपरं नाक, वागण्यात एक अ‍ॅटिट्युड आणि कृष्णवर्णीय. इंग्लिश चित्रपटात आधी नायिका गौरवर्णीय असणार हे जणू गृहित धरलेलं आणि कृष्णवर्णीय नट्यांचं जसं व्हूपी गोल्डबर्ग वगैरे विनोदी किंवा चरित्र नायिकेचं कामंच तोपर्यंत पाहिलेलं. प्रकरण जरा वेगळं वाटलं. पिक्चर पकड घेत होता. रेचेल मरॉन (व्हिटनी ह्यूस्टन) या प्रसिद्ध गायिकेच्या मागे लागलेला खुनी आणि त्याच्यापासून तिचं रक्षण करणारा फ्रँक फार्मर (केविन कॉस्नर) हा तिचा अंगरक्षक अर्थात 'द बॉडीगार्ड' अशी थीम. चित्रपट बघतच होतो की एका वेळी पडद्यावर नायिका व्हिटनी ह्यूस्टन गाऊ लागली, आवाज तिचाच होता आणि गाणं होतं, 'I Will Always Love You'. हे गाणं ऐकता ऐकता चमत्कार झाला.

तोपर्यंत खिजगणतीतही न आलेल्या व्हिटनीने संपूर्ण पडदा व्यापला. तिच्या आवाजात प्रचंड ताकद होती. तो लिलया साडेतीन सप्तकात फिरत होता. गाण्यातल्या शब्दाशब्दातली भावना लोकांपर्यंत पोहोचवत होता. जसं जसं गाणं पुढे सरकू लागलं तसतसा मला व्हिटनीचा चेहराही वेगळा दिसू लागला. ती मला भलतीच आकर्षक दिसायला लागली. इतकी की त्यानंतर केविन कॉस्नरही बाजूला पडला. पिक्चर लक्षात राहिला व्हिटनी ह्यूस्टनसाठी आणि तिच्या 'I Will Always Love You' या गाण्यासाठी.

मग झपाटल्यासारखं व्हिटनीची गाणी मिळवून ऐकणं क्रमप्राप्त होतं. त्याच दिवशी 'रिदम हाऊस' मधून 'द बॉडीगार्ड'ची कॅसेट आणली आणि पारायणं सुरू झाली. हळू हळू तिची आधीची गाणीही मिळवून ऐकली. प्रचंड आवडली.

'द बॉडीगार्ड' मधलंच तिचं 'I Am Every Woman'

'Saving All My Love For You' हे व्हिटनीचं पहिलं युएस नि युके चार्ट्स मधलं पहिल्या क्रमांकाचं गाणं

तिचं तिसरंच सिंगल 'How Will I Know' हे देखिल चार्ट्समध्ये १ल्या क्रमांकावर पोहोचलं.

त्यानंतरचं 'Greatest Love Of All' हेसुद्धा पहिल्या क्रमांकावर आलं.

अशाप्रकारची ओळीने सात गाणी पहिल्या क्रमांकावर आलेली अशी व्हिटनी ही पहिली गायिका होती आणि यामुळे ती एकदम 'द बीटल्स' आणि 'एल्टन जॉन' प्रभृतींच्या पंक्तीमध्ये जाऊन बसली.

१९८८ सालच्या ऑलिंपिक स्पर्धेचं गाणं तिने गायलं. अप्रतिम!

'All The Man That I Need' सारखं सुंदर गाणंही तिने गायलंय.

प्रामुख्याने गॉस्पेल आणि बॅले प्रकारात गाणार्‍या व्हिटनीची गाणी जगप्रसिद्ध होत होती आणि दरम्यान प्रदर्शित झालेल्या 'द बॉडीगार्ड'ने तिला प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन ठेवलं. त्याचवेळी तिने बॉबी ब्राऊन नावाच्या आर् अ‍ॅण्ड बी गायकाशी तीन वर्षांच्या कोर्टशीपनंतर लग्न केलं. ९३ साली तिला मुलगी झाली. पण बॉबी ब्राऊनबरोबरचं तिचं लग्न फार सुखावह नव्हतं. बॉबीला अमली पदार्थांचं व्यसन होतं. त्याने व्हिटनीलाही ते व्यसन लावलं. त्यांची भांडणं होऊ लागली. बॉबी व्यसनाधिनतेतून व्हिटनीला मारहाणही करू लागला. अखेर ते २००६ मध्ये विभक्त झाले पण व्हिटनी अमली पदार्थांच्या व्यसनात अडकली ती अडकलीच.

दरम्यान तिने डेन्झाईल वॉशिंग्टन बरोबर 'द प्रीचर्स वाईफ' हा चित्रपट केला. त्यातलं 'Step By Step' हे गाणं मस्तच जमलंय.

व्हिटनीच्या नावावर सर्वाधिक पुरस्कार (अवॉर्ड्स) मिळाल्याचा गिनिज रेकॉर्ड आहे. एकूण तिने २ एमी, ६ ग्रॅमी, ३० बिलबोर्ड म्युझिक आणि २२ अमेरिकन म्युझिक अवॉर्ड्स मिळून जवळपास ४१५ अवॉर्ड्स मिळवलेली आहेत.

परवाच ११ फ्रेब्रुवारी २०१२ ला व्हिटनी ह्यूस्टन बेव्हर्ली हिल्सवरच्या बेव्हर्ली हिल्टन हॉटेलातल्या आपल्या रूममधल्या बाथ-टबमध्ये मृतावस्थेत सापडली. तिचं अमली पदार्थांचं व्यसन प्रमाणाबाहेर वाढलेलं. तरी ती रिहॅबिलिटेशनचा प्रयत्न करत होती. पुन्हा सांगीतिक दुनियेत परतण्याचा प्रयत्न करत होती. दुसर्‍याच दिवशीच्या ग्रॅमी अवॉर्ड्सच्या समारंभात गाणारही होती. पण पुन्हा या लढाईत अमली पदार्थच जिंकले. आधी मायकल जॅक्सन, मग एमी वाईनहाऊस आणि आता व्हिटनी ह्यूस्टन, ही व्यसनं, हे अमली पदार्थ आणखी कुणा कुणा गंधर्वांचा बळी घेणार आहेत कोण जाणे.

एक मात्र खरं, व्हिटनी ह्यूस्टन, "I will always love you, your songs and your performances, always!"

श्रद्धांजली!

छायाचित्रं आंतरजालावरून
सकाळी व्हिटनीची बातमी कळताच त्यासंदर्भातल्या काही आठवणी दाटल्या नि मनात आलेलं सगळं इथे उतरवलंय. काहीसा विस्कळीतपणा नक्की असेल. व्हिटनी आवडती गायिका होती. तिच्या धक्कादायक मृत्युचा परिणाम लिखाणावर झालाच असणार. मिपाकर मित्र समजून घेतील अशी आशा आहे.

संगीतअनुभवप्रतिक्रियाआस्वाद

प्रतिक्रिया

व्हिटनीला यथोचीत श्रद्धांजली.
तुझ्याकडून हा लेख येईल अशी आशा होतीच.

समयोचित लेख. वाटच पहात होतो तुझ्या व्हिटनीवरच्या लेखाची.

अजूनही "आय एम युअर बेबी टुनाईट" चे अडनिड्या वयात ऐकून मनात घुसून बसलेले स्वर घुमताहेत.. आत्ताच ऐकल्यासारखे..

आणि "आय विल ऑल्वेज लव्ह यू" सुद्धा..अगदी त्याच्या व्हिडीओसकट.

ग्रॅमी तोंडावर आलेली असताना तिचा मृत्यू झाला..

अर्थात ग्रॅमी अवॉर्ड्सची अनभिषिक्त सम्राज्ञी असूनही व्यसनामुळे ग्रॅमीपासून अनेक वर्षं ती दूर गेली होती..

तिची लीगसी नेहमीच राहील..

माझीही शॅम्पेन's picture

13 Feb 2012 - 5:21 pm | माझीही शॅम्पेन

व्हिटनी ह्यूस्टन ला ____/|\_____

दुसर काय बोल्नार फार वाइट वाटल :(

सानिकास्वप्निल's picture

13 Feb 2012 - 5:30 pm | सानिकास्वप्निल

तिने गायलेले हे गाणं खुप आवडीचे आहे .....
श्रद्धांजली....

स्वाती२'s picture

13 Feb 2012 - 5:43 pm | स्वाती२

समयोजित लेख!

परिकथेतील राजकुमार's picture

13 Feb 2012 - 5:52 pm | परिकथेतील राजकुमार

ओळख आणि कारकिर्दीचा घेतलेला धावता आढावा आवडला.

जयंत कुलकर्णी's picture

13 Feb 2012 - 6:13 pm | जयंत कुलकर्णी

एक मिनिट स्तब्ध उभे राहूयात !

यशोधरा's picture

13 Feb 2012 - 6:49 pm | यशोधरा

ही पण जमल्यास वर add कराल का प्लीज?

1. run to you
2. if you say my eyes are beautiful - जेरेमी जॅक्सनबरोबर बहुतेक
3. If you believe - मराया केरीबरोबर.
४. could I have this kiss - एनरिक् इग्लियास
५. I beleive in you and me

व्हिटनी :(

गाणी ऐकली नाहीत पण आज आवर्जून ऐकेन घरी गेल्यानंतर. लेखन प्रभावी झाले आहे. भापो.

jaypal's picture

13 Feb 2012 - 10:11 pm | jaypal

अप्रतिम आढावा.
का कोणास ठाऊक पण व्हिटनी ह्यूस्टन नाव ऐकल की मला लगेच " फ्रॉम अ डिस्टन्स गॉड इज वॉचिंग अस" हेच गाण आठवत :-)

पिवळा डांबिस's picture

14 Feb 2012 - 12:45 am | पिवळा डांबिस

व्हिटनी, मे हर सोल फायनली रेस्ट इन पीस...
वुई विल ऑल्वेज लव्ह हर....

प्रभो's picture

14 Feb 2012 - 12:09 pm | प्रभो

पिडां काकांसारखंच म्हणतो.

खरंच धक्कादायक होता मृत्यू तिचा.
लेख आवडला.