छत्रपती संभाजी राजांच्या आयुष्यातील अनेक पैलूंपैकी एक म्हणजे त्यांच्यात दडलेला 'साहित्यिक' ,
त्यांच्या परमप्रतापी कारकीर्दीमुळे असेल,त्यांच्या छत्रपती असण्यानी असेल किंवा इतिहासकार,नाटककारांनी त्यांच्यावर जी गरळ ओकली त्यामुळे असेल...
त्यांच्यातला साहित्यिक फारसा लोकांपुढे आला नाही.
८-१० लाखांच्या मोगली सैन्याशी लढा देणाऱ्या या छत्रपतीने 'बुधभूषण' हा संस्कृत तर सातसतक,नखसिख आणि नायिकाभेद हे ब्रज भाषेतील ग्रंथ लिहिले.
यापैकी बुधभूषण हा राजनीतीपर ग्रंथ आहे, यामध्ये राज्यव्यवस्था,शिवरायांची राजनीती,वंश,मंत्री,शासन यासंबंधीचे लेखन तर आहेच पण यातील श्लोक वाचताना पिता-पुत्र नात्यातील हळुवार भावना आणि छत्रपती वडिलांबद्दल असलेला आदरही ठिकठिकाणी प्रकट केलेला आहे.
कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं य: !
जगत: पतिरंशतोवतापो: (तीर्ण:) स शिवछत्रपतिजयत्यजेय: !!
अर्थ-"कलिकालरूपी भुजंग घालीतो विळखा
करितो धर्माचा र्हास
तारण्या वसुधा अवतरला जगत्पाल
त्या शिवप्रभुंची विजयदुंदूभी गर्जूदे खास ! "
तसेच त्यांचे निष्कलंक चारित्र्य उमजून घेण्यासाठी त्यांनी राजाचे वर्तन कसे असावे यावर लिहिलेला हा श्लोक आहे , पुढे त्यांनी सात दोषांच वर्णन केलंय (वादण्ड,पारूष्य,दुरयातंच,पान,स्त्री,मृगया आणि द्यूत)
व्यसनादि च सर्वाणि भूपति: परिवर्जयेत् |
सप्तदोषा सदा राज्ञा हातच्या व्यसनोदया: ||
शंभूमुद्रा
१३६ पदे असलेल्या नखसिख मध्ये लावण्यवतीचे केसांपासून ते नखापर्यंतचे वर्णन आहे,या काव्यमय ग्रंथामध्ये शृंगाररसाचा वापर मोठ्या खुबीने वर्णन करताना शंभूराजांनी केलाय.
नायिकाभेद मध्ये अनेक प्रकारच्या नायिकांचे वर्णन त्यांनी शृंगाररसातून केलंय,नायिकांचे ६ भेद यातून मांडण्यात आले आहेत.
नखसिख, नायिकाभेद या ग्रंथांचं लिखाण त्यांनी 'नृपशंभू' या नावाने केलं, ब्रज भाषा शिकण्यासाठी आणि या ग्रंथाच्या निर्मिती साठी त्यांना मातिराम आणि कवी भूषण या भावांनी मदत केल्याचे सांगण्यात येते,
प्रसिद्ध ब्रजकवी आणि विद्वान रत्नाकर त्रिपाठी (तीकावापूर) यांची चिंतामणी,मतीराम,भूषण आणि नीलकंठ (जटाशंकर) हि चार मुले.
कवी भूषण
त्यातल्या कवी भूषण यांनी शिवरायांवर लिहिलेले शिवराजभूषण आणि शिवबावनी हे ग्रंथ प्रसिद्ध आहेत.
शिवरायांच्या पराक्रमांचे ३८४ छंदांमधून शिवराजभूषण मध्ये काव्यमय वर्णन आहे,
तर शिवरायांच्या गुणांचे ५२ छंदांमधून शिवबावनी मध्ये काव्यमय वर्णन आहे.
८ भाषा अवगत असणाऱ्या संभाजीराजांनी जयपूर च्या महाराजा रामसिन्हाला लिहिलेली संकृत पत्रे सुद्धा मिळाली आहेत,तसेच त्यांनी स्वत: लिहीलेलं एक संस्कृत दानपत्र सुद्धा आहे.
बुधभूषण चे काही पाठ अजूनही बनारस विश्व हिंदू विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागात शिकवले जातात.
ज्या हाताने लेखणी चालवली नंतर त्याच हातांनी लीलया समशेर चालवणारा हा महायोद्धा कुठे आणि बखरकार,नाटककार,दंतकथा लेखकांनी रंगवलेला संभाजी कुठे.
सारेच अपसमज गळून पडतात.
माहिती संदर्भ/साभार - डॉ.प्रभाकर ताकवले,
नागरी प्रचारिणी सभा,बनारस
(संभाजी महाराजांच्या नायिकाभेद ग्रंथातील स्त्रियांचे ८ भेद आणि त्यांचे उपभेद आपल्यासमोर मांडण्याचा पुढील काही भागांमध्ये प्रयत्न करणार आहे,
काही सूचना असतील तर जरूर कळवा)
प्रतिक्रिया
10 Jan 2012 - 4:30 pm | इष्टुर फाकडा
लेखमालेची ओळख छान झाली आहे...पुढील लेखनासाठी शुभेच्छा
10 Jan 2012 - 7:49 pm | गणेशा
असेच म्हणतो ..
पुढील लेखनास शुभेच्छा !
एक सुचना नाही, विनंती :
नायिकाभेद बद्दल लिहा हो..
पण बुध भुषण मधील श्लोक मराठीमध्ये रुपांतरित केल्यास आनंद होयील .. आणि संस्क्रुत न आल्याने खोळंबा होणार नाही
10 Jan 2012 - 4:31 pm | मन१
लेख छान.
८-१० लाखांच्या मोगली सैन्याशी लढा देणाऱ्या
हे अतिरंजित वाटते. माझ्या माहितीप्रमाणे आलमगीर एक्-दीड लाखाचे मनुष्यबळ* घेउन दख्खनमध्ये उतरला.
त्याकाळातली हे जवळपास सर्वात मोठे,अजस्त्र सैनिक संघटन होते.
इथे आल्यावर त्यानी स्थानिक सैनय्ही थोडेफार रुजू केले असणारच. पण तरीही तेव्हाची लोकसंख्या, युद्धशास्त्र पाह्ता,८-१० लाख हा आकडा अतिच वाटतो.
अर्थात एक्-दीड लाख हाही अजस्त्र आकडाच आहे, ह्याच्याशी लढायचे म्हणजे निधडी छाती हवेच.
*मनुष्यबळात लढणारे शिपाई, पागा सांभाळणारे(पागे/पागनिस?),सैन्याचा खाना बनवणारे आचारी, धोबी,तंबूवाले,तोफ ओढणारे, इतर कष्टकरी व अनेक बाजारबुणगे ह्या सर्वाम्चा समावेश असतो.
आज्वर इतिहासात ज्ञात असलेल्या सर्वात अजस्त्र लढाई म्हणजे दुसर्या महायुद्धात जर्मानीचे तब्बल तीन लाख सैनिक मार्शल झुकॉव्ह ने अलगद घेरून टिपले होते ती. स्वतः झुकॉव्ह चे सैन्य याहून अधिक होते.(किंवा डंकर्क मध्ये खरोखर दोस्त सैन्य कापले गेले असते तरी तसाच आकडा गाठला गेला असता.) ह्याहून मोठा फौजफाटा घेउन कुणी निघाले असल्यास इतिहासाला ज्ञात नाही.
10 Jan 2012 - 5:12 pm | यकु
जुन्या काळचा गाढवावर बसून इतिहास संशोधनाला जाणारा इतिहासकार तो या जन्मीचा तुच काय रे? ;-)
कुठून जमवतोस एवढी माहिती?
10 Jan 2012 - 5:36 pm | मन१
सध्या तरी ह्याच जन्मात मी गाढव असल्याची माहिती आम्च्या मातोश्री, आमचा खडूस बॉस व मी लाइन मारत असलेल्या मुली पुरवत असतात.
@मोदक काका:-
हायजॅक करणे वगैरे मला म्हणत नाही आहात अशी आशा. म्हणतही असाल तरी मी हाय्जॅक करत नाही हे तुम्ही कधीतरी पटेल ही आशा.
10 Jan 2012 - 7:34 pm | मोदक
काय मग मनोबा..? सकाळपासून कोणी भेटले नाही का..? ;-)
नाही रे, तुझ्याकडे रोख नव्हता, पण सध्या जे काही राजकारण चालले आहे (काय चालले आहे ते खव मध्ये बोलूया) सगळीकडे (पक्षी - महाराष्ट्रात, मिपावर नव्हे) त्यावर माझा रोख आहे.
मोदक.
10 Jan 2012 - 5:42 pm | मालोजीराव
दिलगीर आहे, सैन्य हा चुकीचा शब्द वापरला...मला ८-१० लाख मनुष्यबळ म्हणायचं होतं !
मला हे अतिरंजित वाटत नाही...कारण त्यातला २-२.५ लाख मनुष्यबळ एकट्या राजपुतांचा होतं.
युद्धशास्त्र आणि सैन्याची बांधणी पाहता ५-५.५ लाख मोगल सैन्य
पाल ठोकणारे,बेलदार,आचारी,हमाल,तुतारीवाले,जनानखाना सांभाळणारे,वैद्य-हकीम,नोकर-चाकर,सुतार
लोहार आणि इतर कामासाठी लागणारे १२ बलुत्याचे लोक.
तोफ्खान्यासाठी आणि लागणाऱ्या दारूसाठी पगारी आणलेले लोक (डच,फ्रेंच,इंग्रज,हबशी)...
त्याच प्रमाणे एका हत्तीसाठी ४ लोक आणि एका तोफेसाठी ५ लोक (त्यामुळेच शिवरायांनी तोफखाना आणि हत्ती वापरले नाहीत )
जनानखाना,बादशहा,वजीर आणि मोठे उमराव (जसे बुंदेले आणि राजपूत राजे) यांची अंगरक्षकांची दले (ज्यांची मोजदाद मूळ सैन्यात करत नाहीत)
या सगळ्यांची गोळाबेरीज केली तर ८-१० लाख नक्कीच भरते...
मोहिमेबरोबर निघणारे व्यापारी,उंट,घोडे इतर जनावरे,इतिहासकार यांचा आकडा वरील मोजणीत नाही
वतनाच्या लोभाने फितूर झालेल्या मराठ्यांचा आणि त्यांच्या सैन्याचा आकडा वरील मोजणीत नाही
(मासीर-ए-अलामगिरी,रुका-ए-अलामगिरी,मुल्ताखाब उल लुबाब हे तत्कालीन मोगल इतिहासकार खाफीखान,साकीमुस्तैद खान यांच्या कागदपत्रांवरून
आणि तोफखाना प्रमुख निकोलाय मनुची ने मिर्झाराजा जयसिंहाच्या राजपूत सैन्याचा वर्णन (इ.स.१६६५) केल्यावरून वरील आकडा योग्य वाटत आहे )
10 Jan 2012 - 5:45 pm | मन१
तथ्य असू शकेल मग. कारण तो किती ही नाही म्हटलं तरी third party observer होता.
11 Jan 2012 - 6:48 pm | मालोजीराव
मनोबा,
मनुची आणि शंभूराजे दोनदा भेटलेसुद्धा आहेत.
१६८२ पासून मनुची गोव्यामध्ये होता,त्याने बरंच भारतभ्रमण केलं...आणि बर्याच जणांच्या पदरी चाकरीही केली ...१६८३ साली महाराजांनी गोव्यावर हल्ला केला तेव्हा तहाची बोलणी करायला आणि सुलाह करायला
पोर्तुगीज वोईस्रोय नि मनुची ला महाराजांची भेट घेण्यास पाठवले होते !
11 Jan 2012 - 1:17 pm | हंस
<(त्यामुळेच शिवरायांनी तोफखाना आणि हत्ती वापरले नाहीत )>
काय म्हणता! इब्राहिम खान गारदी हा शिवरायांच्या तोफखान्याचा प्रमुख होता. जर तुम्हाला असे म्हणायचे असेल की "त्यानीं 'चल-तोफा' नाही वापरल्या" तर असेल, शिवरायांनी जास्त करुन अचल-तोफा वापरल्या.
11 Jan 2012 - 1:30 pm | प्रचेतस
कैच्याकै.
इब्राहीमखान गारदी हा पेशव्यांच्या तोफखान्याचा प्रमुख होता. हा पण भाउसाहेब पेशव्यांच्या बरोबर पानिपतात शहीद झाला.
शिवरायांनी युद्धात चल तोफा वापरल्याचे उल्लेख मिळत नाहीत. प्रामुख्याने किल्ल्यांत बुरुजांवर ठेवलेल्या तोफाच वापरल्या जात असत.
11 Jan 2012 - 1:37 pm | मन१
+१
11 Jan 2012 - 1:44 pm | किसन शिंदे
:O :O :O
हे वाचून खुर्चीत बसल्या जागी तीन-ताड उडालो आहे.
11 Jan 2012 - 2:58 pm | मालोजीराव
:O :O
...अरे देवा...त्या इब्राहीम खान गार्दी ला बोलवा कोणीतरी...त्याला सांगायचे आहे कि रे बाबा तू पानिपतात नव्हे तर पावनखिंडीत धारातीर्थी पडला असशील !
अवांतर: उच्च दर्जाच्या दारूचे (तोफेच्या) प्रकार,तोफेची सांधणी निगा आणि वैशिष्ठ्ये,बंदुका याबद्दल इब्राहीम खानाला बराच ज्ञान होतं...त्याने फ्रेंच आणि डच यांच्याकडून याबाबतीतले प्रशिक्षण घेतल्याचे ऐकिवात आहे.
11 Jan 2012 - 3:45 pm | हंस
माफ करा, चुकून मिष्टेक झाली! बरोबर महिती दिल्याबद्द्ल धन्यवाद! पण http://mr.upakram.org/node/2631 येथे " शिवाजीच्या सैन्यातील मुसलमान" ह्या शिर्षकाखाली ही माहीती देण्यात आली आहे
"इब्राहिम खान गारदी - तोफखान्याचा प्रमुख स्वराज्यातील तोफखान्याचा प्रमुख. डोंगरी किल्ल्याच्या लढाईमध्ये तोफखान्याची जबाबदारी चोखपणे पार पाडली. विजापूर आणि गोवळकोंड्यावरुन स्वराज्यात आलेले ७०० पठाण पायदळ आणि घोडदळ १६५८ पासून स्वराज्याची निष्ठापूर्वक सेवा केली. अखेरपर्यंत बेईमानी केली नाही. घोडदळातील चार मोगली पथके घोडदळातील सरदार आणि सैनिक मोगलांना सोडून २६ ऑक्टोबर १६७२ मध्ये आलेल्या या वीरांनी स्वराज्याची निष्ठेने सेवा केली."
11 Jan 2012 - 4:10 pm | मालोजीराव
असुद्याहो...पण मूळ कागदपत्रे किंवा संदर्भ ना तपासता विधान करणे धोकादायक आहे इतिहासाच्या दृष्टीने
...आता हेच पहा ना तत्कालीन मोगल इतिहासकार खाफीखान याने शंभूराजांना "सत्तेच्या नशेत बुडालेला राजा " अशी उपमा दिलेली...
त्यात 'ध' चा ' मा' करत जेम्स ग्रांट डफ ने "दारूच्या नशेत बुडालेला राजा " असे लिहिले...
आणि त्याचीच री नंतर अनेक मराठी नाटककार आणि कादंबरीकारांनी ओढली !!!
असो राजांचं दुर्भाग्य...
11 Jan 2012 - 5:16 pm | हंस
हो तुमचं बरोबर आहे! यापुढे काळजी घेईन.
10 Jan 2012 - 4:33 pm | किसन शिंदे
सुंदर माहिती.!
10 Jan 2012 - 4:33 pm | गणपा
मनोबाशी सहमत.
या छाव्याबद्दल अधिक वाचायला उत्सुक आहे.
10 Jan 2012 - 4:48 pm | मोदक
मालोजीराव एक सूचना,
जरी लिखीत पुरावा असेल तरी तो आणखी एक -दोन ठिकाणी पडताळून मगच लिही.. चांगल्या लिखाणाचा धागा कोणत्याही कारणाने हायजॅक होवू नये म्हणून थोडी काळजी घे.
छान लिहितो आहेस.
मोदक.
10 Jan 2012 - 5:07 pm | मालोजीराव
हो ना ते पण आहेच,
पण मोदक...मूळ आवृत्ती फक्त नागरी प्रचारिणी सभा,काशी यांच्याकडेच उपलब्ध आहेत...
फोटोकॉपी मिळवण्याचा प्रयत्न चालू आहे...
पण अतिशय महत्वाचे दस्त असल्याने आणि हाताळणी मुळे आधीच बरीच पाने तुटून नष्ट झाली आहेत...
त्यामुळे फोटोकॉपी तरी मिळतील कि नाई नायिकाभेद च्या काय माहित
10 Jan 2012 - 5:47 pm | मी-सौरभ
जर तुला कॉपी नाही मिळाली तरी ही लेखमाला लिहीशील ना?
सुरवात फार छान आहे आणि शंभूंच्यावरचं चांगलं लिखाण वाचायची उत्सुकता आहेच :)
पु.ले.शु.
10 Jan 2012 - 6:14 pm | मालोजीराव
लिहिणार तर आहेच सौरभ,
कारण हे प्रकरण तसं लयच भारीये...मुलींचे किती प्रकार असतात काय माहित...
पण नायिकाभेद मध्ये मुख्यभेद आणि उपभेद मिळून जवळपास २७-२८ प्रकारच्या मुली असतात ;) असं लिहिलंय ,
तेवढंच मिपाकरांच हे ज्ञान पण वाढेल ;)
...पण हे साहित्य खुद्द शंभूराजांनी लिहिलंय त्यामुळे प्रतिक्रिया देताना सबुरीने घ्या !
10 Jan 2012 - 7:19 pm | मी-सौरभ
समजुन घेतल्या गेले आहे...
धागा हायजॅक होऊ नये यासाठी पूर्ण प्रयत्न केला जाईल
10 Jan 2012 - 7:35 pm | मोदक
(मालोजीराजेंच्या वतीने ) धन्स...
10 Jan 2012 - 6:08 pm | चैतन्य दीक्षित
खूप मनापासून धन्यवाद.
अजून वाचायला आवडेल.
10 Jan 2012 - 6:25 pm | सुहास झेले
उत्कृष्ट लेखमाला..... वाचतोय !!
10 Jan 2012 - 7:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लेखमालिकेसाठी शुभेच्छा. लेखाची व्यवस्थित मांडणी,योग्य संदर्भ, विश्लेषणासह, साहित्यिक छत्रपती संभाजी समजून घ्यायला आणि वाचायला आवडेल.
-दिलीप बिरुटे
10 Jan 2012 - 7:13 pm | सुहास..
वाचलेरा हय !!
आपला एक दोस्त श्रीमंत पेशवे (http://www.misalpav.com/user/385/guestbook) यांचा या विषयावर दांडगा अभ्यास आहे , त्यामुळे शेवटच्या वाक्याशी सहमती दर्शवत त्यांच्याशी संपर्क करावा ही नम्र विनंती
10 Jan 2012 - 7:42 pm | पैसा
आणखी अभ्यासपूर्ण लेख पुढे वाचायला मिळतील ही अपेक्षा ठेवते!
10 Jan 2012 - 8:06 pm | ५० फक्त
नाणेघाटाहुन येताना बोलला होतास याबद्दल, तेंव्हापासुन वाट पाह्तोय कधी लिहितोस त्याची, बरं झालं सुरुवात केलीस ते, खुप बरं वाटेल याबद्दल वाचुन.
10 Jan 2012 - 9:07 pm | सुनील
चांगली माहिती पण लेख त्रोटक वाटला. अजून थोडी माहिती असायला हवी होती.
संभाजीला अवगत असणार्या ८ भाषा कुठल्या? मराठी, संस्कृत, हिंदुस्तानी (हिंदी-उर्दू) आणि ब्रज. ह्या तर आहेतच. कदाचित, फारसी, कन्नड, तमिळ आणि गुजराती ह्यादेखिल असाव्यात काय?
11 Jan 2012 - 11:20 am | मालोजीराव
वा.सी.बेंद्रे,काही परकीय इतिहासकार,पोर्तुगीस वोईसरॉय चा कारभारी आणि मराठा वकील गंभीरराव यांचा दाखला घेता
शंभू राजांना मराठी,संस्कृत,फारसी,हिंदी याबरोबरच पोर्तुगीस,इटालियन,फ्रेंच आणि थोड्या प्रमाणात कन्नड या भाष्या सुद्धा येत असाव्यात...!
10 Jan 2012 - 10:01 pm | प्रचेतस
उत्तम सुरुवात.
पुढील भागांची वाट पाहात आहेच.
८/१० लाखांच्या मोगल सैन्याविषयी संशय आहेच. पण संभाजीराजांनी एकाच वेळी अनेक शाह्या अंगावर घेतल्या होत्या. मोगल, इंग्रज, पोर्तुगीज, सिद्दी, स्वकियांतलेच फितूर अशा अनेकांशी एकाच वेळी अथक धावपळ करून सतत लढत होते. इतकेच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी असलेल्या राज्याच्या सीमा वाढवण्यातही यश मिळवले.
संभाजी राजांना इतक्या भाषा शिकण्यासाठी वेळ केव्हा व कसा मिळाला असेल? पुरंदराच्या तहाच्या वेळी मिर्झाराजांबरोबर ओलीस असताना, तसेच आग्र्याहून सुटकेनंतर महाराजांनी संभाजीराजेंना मथुरेत कुणाकडेतरी(?) सांभाळायला ठेवले होते तितक्या अवधीत शिकून घेतल्या असाव्यात का? कविराज भूषण राज्याभिषेकाच्या वेळी रायगडावर आले तेव्हाही काही शिकून घेता असेलच. कदाचित त्यांनी केलेल्या ग्रंथनिर्मितीचा काळही तेव्हाचाच असावा. पण महाराजांच्या मृत्युनंतर या अलौकिक योद्ध्याचे आयुष्य अखेरपर्यंत केवळ लढण्यातच गेलं.
11 Jan 2012 - 10:33 am | रम्या
>>तसेच आग्र्याहून सुटकेनंतर महाराजांनी संभाजीराजेंना मथुरेत कुणाकडेतरी(?) सांभाळायला ठेवले होत>>
याकाळात संभाजी राजे कवी भूषण यांच्या कुटुंबात राहत होते असं वाचल्याचं आठवत आहे.
असो,
छान माहितीपुर्ण लेख.
मालोजी रावांना पुढील लेखनासाठी शुभेच्छा!
11 Jan 2012 - 11:03 am | मन१
माझ्या माहितीत आहे ते म्हणजे शिवरायांच्या अष्टप्रधानांपैकी मोरोपंत का कुणाचे तरी सासरे मथुरेत भिक्षुकी वगैरे करणारे भटजी होते, त्यांच्याकडे शंभूराजास ठेवले होते. लोककथा असेही सांगते की मुघल सैनिक त्यांना हुडकायला तिथे आल्यावर त्या ब्राह्मणाने "हा माझाच भाचा" असे सांगितले व एकाच ताटात भोजन प्रारंभ* केला, संशय निवळला व मुघल सैनिक निघून गेले.
खरे खोटे माहित नाही, पण अशी वदंता आहे.
*त्या काळी काही ब्राह्मण हे इतर कुणाशीही रोटी-बेटी संबंध ठेवत नसत. घरी आलेला नवीन मुलगा हा "आपल्यातलाच" आहे असे भासवण्यास्साठी त्यांने असे केले.
11 Jan 2012 - 11:29 am | मालोजीराव
होय वल्लीशेठ,स्वराज्याचा भाग न गमावता...उलट त्यांनी जिंजी आणि आजूबाजूचा सधन,सुपीक प्रदेश मिळवला ,दक्षिणसीमा (पणजीपर्यंत गोवा ) वाढवली. आरमार बळकट केले इत्यादी
वय वर्षे १४-१७ हा काळ त्यांच्या ब्रज साहित्यानिर्मितीचा मनाला जातो !
त्यांच्या आयुष्याच्या महत्वाच्या टप्प्यांवर त्यांना गागाभट्ट,कवी भूषण,कवी मतीराम आणि कलश यांसारख्या विद्वानांचा सहवास लाभला !
11 Jan 2012 - 10:55 am | प्रशांत
संभाजीराजांबद्दल विश्लेषणासह अभ्यासपूर्ण माहिती वाचायला आवडेल.
पु ले शु
11 Jan 2012 - 3:49 pm | स्मिता.
छत्रपती संभाजीराजांबद्दल ऐकिवात नसलेली बरीच नवीन आणि अभ्यासपूर्ण माहिती आणखी वाचायला आवडेल. पु.ले.शु.
11 Jan 2012 - 3:52 pm | स्वाती दिनेश
लेखमालेची कल्पना आवडली.
काही माहित नसलेल्या गोष्टीही समजल्या.शंभूराजांबद्दल अजून वाचायला नक्कीच आवडेल.
स्वाती