सफर मै धुप तो होगी तुम चल सको तो चलो - भाग ३

अभिजीत राजवाडे's picture
अभिजीत राजवाडे in जनातलं, मनातलं
8 Dec 2011 - 7:58 am


जगजीतसिंग च्या धामधुमीच्या काळात गझलचा श्रोतावर्ग फार मर्यादित होता आणि एखादा फक्त गझलचा अल्बम चालेल कि नाही याचीही शाश्वती नव्हती. मग त्या काळात जगजीतसिंग यांनी कुठे रेडिओ साठी जिंगल्स तर कुठे चित्रपटांना संगित द्यायला सुरुवात केली. अशाच एका रेडिओ जिंगल्सच्या रेकॉर्डिंग स्टुडियोमधे जगजित आणि चित्राची भेट झाली. या आठवणीबद्द्ल चित्रासिंग सांगतात कि जेंव्हा मी जगजित ला पाहिले तेंव्हा मला वाटले हा एक साधासुधा माणुस असेल पण जेंव्हा मी त्याचे गाणे ऐकले मला कळले कि "बंदे में दम है" चित्रासिंग ला आधीच्या लग्नापासुन एक मुलगी होती. तिचे नाव होते मोनिका. ती जगजितची आठवण सांगताना हळवी होऊन म्हणते कि मी लहान असताना जगजीत आमच्या शेजारच्या घरात माई-नी-माई हे पंजाबी गाणे गात होता, जेंव्हा माझ्या कानावर त्याचा मृदु आवाज पडला मी तिथे थिजुन बसले वर बर्‍याच वेळ हमसुन हमसुन रडत होते. त्याच्या आवाजातील आर्तता आणि पवित्रता कोणालाही हळवे करु शकत होती.

१९७० साली जगजित आणि चित्रा ३० रुपयामधे विवाहबध्द झाले. कुठलाही मोठा डामडौल नाही, पाहुणे नाही कि रिसेप्शन नाही. १९६५ ते १९७३ हि वर्षे जगजितसिंग साठी थोडी कठिणच होती. लोक खोटी आश्वासने देऊन जगजितला पार्ट्यांमधे गाण्यासाठी बोलवायची. पण या अवघड वर्षांमधे त्याचे फक्त ५ अल्बम प्रकाशित झाल्यामुळॅ अर्थप्राप्ती चे प्रमुख साधन जाहिर कार्यक्रमच होते. त्यामुळॅ मिळेल त्या कार्यक्रमाचे आमंत्रण जगजितसिंग घेत होता. एकदा एका मोठ्या उद्योगपतीने जगजितसिंग ला बँकॉक ला त्याच्या मुलीच्या लग्नात गाण्यासाठी बोलावले, जगजित गेला, ४ दिवस रोज अर्धा तास गायला पण बिदागी काय मिळाली तर राहाण्यासाठी खोली आणि रोजचे जेवण.
एवढं असुनसुध्दा जगजितसिंग म्हणतो कि १९७१ साली मी सर्वात जास्त श्रीमंत झालो कारण त्या साली माझ्या मुलाचा विवेकचा (बाबु) जन्म झाला. आम्ही जेंव्हा बाबुला घरी आणले तेंव्हा आमच्या कडे एक खोली असलेली अपार्टमेंट होती, फारच कमी पैसा होता पण मी सर्वात खुश होतो. त्यावेळी पैशाचे गणित जमवण्यासाठी कित्येक गाण्यांच्या रेकॉर्डिंगच्या वेळेस चित्रा २० दिवसाच्या बाबुला छातिशी धरुन गाणी गायची.  

१९७५ साली एच एम व्ही ने जगजित ला त्यांच्या पहिला लाँग प्ले (LP) अल्बम काढण्याची ऑफर दिली. या संधीची जगजितसिंग कधीपासुन वाट पहात होता. अल्बमचे नाव होते अनफरगेटेबल्स (The Unforgettables). लॉकिकार्थाने हा अल्बम त्यावेळच्या इतर गझल् अल्बम पेक्षा सर्वस्वी वेगळा होता ज्यात आधुनिक वाद्ये पारंपारिक सारंगीच्या खांद्याला खांदे लावुन झंकारत होते.गझल गायकीमधे एक नवीन पर्व सुरु झाले होते. पण यामुळे समिक्षकांच्या भुवया उंचावल्या, पण त्यांनाही जेंव्हा जगजितसिंगची गझल ला पायातील पारंपारिक बेड्या तोडण्याची दुरदृष्टी समजली तेंव्हा त्यांनी हि जगजितसिंग ला कुर्निसात केले. याच अल्बमनंतर जगजितसिंगने आपला मुंबईतील पहिला वहिला फ्लॅट घेतला.

यानंतरचा पुढचा अल्बम होता "बिरहा दा सुलतान" (विरहाचा राजा). हा अल्बम शिवकुमार बटलवी यांच्या पंजाबी कवितांवर होता. बटलवींच्या या कवितेतले दु:ख आणि जगजितसिंगचा ते दु:ख काळजापर्यंत पोहचवणारा आवाज या दोघांचे गारुड आजही लोकांच्या मनावरील ताबा सोडत नाही. कित्येक वर्षे जगजितसिंगच्या जाहिर कार्यक्रमात शिक्रा या "बिरहा दा सुलतान" मधील गाण्याची फर्माईश होत होती. हे गाणेच तसे आहे. या गाण्यात कवी आपल्या प्रियजनाला घारीची उपमा देत म्हणतो तुला मी दिलेले अन्न आवडत नसेल तर मी माझे काळिज काढुन देतो. "बिरहा दा सुलतान" (विरहाचा राजा) च्या यशानंतर जगजित चित्राने त्यांचा पहिला दोघांचा अल्बम "कम अलाइव्ह" (Come Alive) काढला. संपुर्ण पश्चिम आशिया खंडात जगजित चित्रा च्या गाण्याचे भक्त वाढु लागले. १९७९ आणि १९८२ साली इंग्लंड ची टुर केल्यावर त्यांनी तिथे आणखी दोन अल्बम प्रकाशित केले "Live at Wembley" and "Live at Royal Albert Hall". एकदा असाच इंग्लंड मधे दोन दिवस लागोपाठ कार्यक्रम होता, दोन्ही दिवसाची ६००० क्षमता असलेल्या सभागृहाची तिकिटे ३ तासात संपली. जगजीतसिंग लोकप्रियता वाढतच होती. १९८० मधे जगजीत सिंग साथ साथ या चित्रपटासाठी जावेद अख्तर यांची कविता गायली. आणि बाकी सर्व इतिहास सर्वज्ञात आहे. या चित्रपटासाठी फार कमी पैशे मिळुनही जगजितसिंग मनापासुन हे काम केलेले ऐकुनच कळते. या चित्रपटाचा दिग्दर्शक रमन कुमार यांनी रेकॉर्डिंग साठी फार बजेट ठेवले नव्हते, जगजितसिंग पदरमोड करुन दर्जेदार रेकॉर्डिंग करुन घेतले. अर्थ चित्रपटाचे संगितही याच वर्षी आले. आजही अर्थ आणि साथ साथ एच एम व्ही च्या विक्रमी विक्री होत असलेले अल्बम आहेत.

१९८७ मधे जगजितसिंग ने "Beyond Time" हा पहिला संपुर्ण डिजीटल सी डी अल्बम प्रकाशित करुन भारतिय संगितामधे आणखी एक मैलाचा दगड प्रस्थापित केला. हा क्षण फक्त जगजितसिंग चित्राच नव्हे तर संपुर्ण गझलविश्वासाठी अभिमानास्पद क्षण होता. एका वर्षानंतरच जगजितसिंग ने गुलझार बरोबर मिर्झा गालिब या मालिकेसाठी करार केला. नासिरने रंगवलेला गालिब जगजित आवाजात लोकांपर्यंत पोहाचला. इथे दुसरा कोणता आवाज येऊ शकतो हि कल्पनाही कोणाच्या मनी येत नाही.

सर्वकाही स्वप्नवत चालले होते जगजितसिंग यशाची नवनवी शिखरे काबिज करत होता, आणि अघटित घडले. १९९० साली जगजित चित्राचा एकुलता एक मुलगा विवेक (वय - १८) एका कार अपघातात दिवंगत होतो. हा जगजितसिंग आणि चित्रा यांच्यावरिल सर्वात मोठा आघात होता ज्यातुन ते कधीच बाहेर पडु शकले नाही. यानंतर चित्राने कधीच स्टेज शो केले नाही कि ती स्टुडियो मधे आली नाही. जगजितसिंग निराशेच्या गर्तेत गेला, पण त्याच्या संगिताच्या प्रेमामुळेच तो या निराशेतुन बाहेर पडु शकला. त्याने ठरवले कि जे काही घडले त्याला मी माझी शक्ती बनवणार आणि तानपुरा जुळवुन विखुरलेले आयुष्य पुन्हा जोडायचा प्रयत्न करत जगजितसिंग चा रियाज पुन्हा सुरु झाला.

विवेक च्या मृत्युनंतरचा जगजितचा पहिला अल्बम पंजाबी गुरुबाणी "मन जिते जगजित" प्रकाशित झाला. जगजितच्या रसिकांना जगजित चा आवाज पुन्हा मिळाला पण चित्राचा कधीच नाही. पुत्रवियोगानंतर जगजितसिंग आणखी अल्बम आले "Someone Somewhere", "Hope", "Kahkashan", "Visions", "Face to Face", "Silsilay", "Marasim", "Forget me Not" आणि येतच राहिले. १९९१ साली जगजितसिंग चा गानकोकिला लता मंगेशकर बरोबर सजदा हा अल्बम प्रकाशित झाला. आणि गैरफिल्मी अल्बम विक्रि मधे नवा उच्चांक प्रस्थापित झाला. एवढ्या मोठ्या धक्क्यातुन जगजितसिंग सावरला किंवा आता त्याला सर्व दु:ख खुजे वाटु लागली. जगजितसिंग गातच राहिले. इतके कि २००१ साली त्यांची आई गेल्यावर अंत्यसंस्कारानंतर ते कलकत्त्याच्या पुर्वनियोजित कार्यक्रमासाठी निघुन गेले.

विवेकच्या जाण्यानंतर जगजितची अध्यात्मिक बाजु हळुहळु पुढे येऊ लागली. निरनिराळ्या संताची भजने जगजितच्या आवाजाचा परिसस्पर्श लाभुन लोकांपर्यत भावासहित पोहचु लागली. ख्यातनाम शायर निदा फाजली जगजितच्या वाढत्या तरुण चाहत्यांना पाहुन येथे मनोगत व्यक्त करतात कि "आता असे वाटते आहे कि जगजितला आता हजारो मुलं आहेत जी त्याच्यावर खुप प्रेम करतात."

जगजितसिंगने नवीन उद्योन्मुख गायकांना नेहमीच प्रोत्साहन दिले. येथे जगजितसिंग म्हणतो ,"मी जेंव्हा मुंबईत आलो, तेंव्हा मला कोणीच मदत केली नव्हती, आणि कोणाला मदत केल्याने तुमचे स्थान कधीच धोक्यात येऊ शकत नाही. आणि हे सर्व माझ्याअवरिल संस्कार आहेत, जे आम्ही आमच्या आई वडिलांना करताना पाहिले तेच आम्ही आता करत आहोत." जगजितसिंग कोणाला मदत नाही केली, त्याच्या मित्रांना, सहकार्‍यांना, तंत्रज्ञ इतकेच काय तर अनोळखी लोकांनाही त्याने मदत केली. कुलदिप देसाई जगजितसिंग चे पि.ए. म्हणतात, "ते तुम्हाला तुम्ही मागण्याआधिच सर्वकाही देऊन टाकतात." १९९० साली जगजितसिंगने काही अल्बम केले ज्याची रॉयल्टी Child Relief and You, the Aurobindo Ashram आणि the National Association of the Blind या संस्थाना जाते.

जगजितसिंगच्या आगमनाने गझल ला नवसंजिवनी मिळाली हे वादातित आहेच पण याचमुळे एक नवीत बाजारपेठ उभी राहिली ज्यात अनेक तंत्रज्ञ, स्टुडियो, ध्वनी अभियंते, कवी, शायर यांना काम मिळाले. उर्दु शायरांच्या ह्र्द्यात तर त्याच्यासाठी एक खास जागा असेल कारण जगजितसिग मुळेच शायरांना गायकाच्या नफ्यातील काही भाग देण्याची पध्दत रुढ झाली. जगजितसिंग चे सध्याचे ध्येय हिंदी भाषेला भारताची प्रमुख भाषा म्हणुन लोकप्रिय करण्याचे होते. त्यातले पहिले पाऊल म्हणुन त्यांनी भारताचे तात्कालिन पंतप्रधान श्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितांवर आधारित अल्बम काढला. उर्दु भाषेत एवढे अल्बम काढल्यानंतर हिंदी भाषेत अल्बम काढण्याचे पाऊल नक्कीच धाडसी होते. पण जगजितसिंग ने आणखी हिंदीतील अल्बम काढले. ज्यामुळे हिंदी लेखकांचा हि फायदा झाला.

भारत सरकारने जगजितसिंग यांना पद्मभुषण देऊन सन्मानित केले.

आज जगजितसिंग आपल्यात नाहीत पण त्यांचे शब्द नेहमी आपल्यात राहतील.
"प्रत्येक दिवस हा एक नविन सुरुवात आहे, प्रत्येक अल्बम एक नविन अल्बम आहे, प्रत्येक जाहिर कार्यक्रम एक परीक्षा आहे. भुतकाळात रमुन रहाणे सर्वात धोकादायक गोष्ट आहे. तुम्ही जे काही केले आहे, त्यापेक्षा नक्किच चांगले करु शकता, त्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे.

(समाप्त)

-अभी

संगीतगझलसद्भावनाअनुभव

प्रतिक्रिया

जाई.'s picture

8 Dec 2011 - 9:23 am | जाई.

लेख आवडला

प्रभाकर पेठकर's picture

8 Dec 2011 - 11:39 am | प्रभाकर पेठकर

श्री जगजीतसींग ह्या मनस्वी कलाकाराचे आयुष्य अत्यंत प्रेरणादायी आहे.
अशा ह्या महान कलाकाराचा आयुष्यपट डोळ्यासमोर उभा केल्याबद्दल धन्यवाद.

विलासराव's picture

8 Dec 2011 - 1:53 pm | विलासराव

खुप आवडला.

क्रान्ति's picture

8 Dec 2011 - 4:02 pm | क्रान्ति

आवडत्या गायकाबद्दलचा लेख.

प्राजु's picture

9 Dec 2011 - 2:48 am | प्राजु

खूप सुंदर लेख.
खूपच सुंदर!

स्वाती२'s picture

9 Dec 2011 - 6:39 pm | स्वाती२

लेख खूप आवडला.

पैसा's picture

9 Dec 2011 - 9:58 pm | पैसा

इतक्या कठीण प्रसंगातून जाऊनही जगजीतसिंग खचून गेले नाहीत. गात राहिले. त्यांचे शब्दही खूप प्रेरणादायी आहेत. लेखमालिका छान जमलीय.

...फक्त एक comment:

तुम्ही म्हंटलं आहे त्याप्रमाणे विवेकच्या मृत्यूनंतर 'चित्राने कधीच स्टेज शो केले नाही कि ती स्टुडियो मधे आली नाही' हे खरं असलं तरी १९९० मध्येच जगजित आणि चित्रा या दोघांनी एक अल्बम विवेकच्या स्मृतीप्रीत्यर्थ या नंतर एकत्र सादर केला होता, त्याचं नाव होतं 'Someone Somewhere..' याचं रेकॉर्डिंग आधी झालं होतं तरी तो सादर केला गेला विवेकच्या मृत्यूनंतर, त्यावेळी प्रस्तावनेत त्यांनी असं लिहिलं होतं:

We dedicate this ablum to the ever loving memories of our only son Vivek, who left us forever, at the age of 18, on the 28th of July 1990.

When Vivek was born, he filled our lives with joy and music. Baboo, as we fondly called him, gave us all the success that we have had ever since he came into our lives. Baboo, right from his infancy, had a tremendous talent for music. His passion was for rhythm and he used to play the drums beautifully.

Baboo has always influenced our music with his astute and invaluable suggestions and constructive criticism. We were half way through recording these songs for a double album, when Baboo left us so suddenly. These are a few of the songs we had managed to complete earlier. We don't know if these would have met with his approval.

-Jagjit Singh Chitra Singh

एक गझल होती 'मेरे दुख़ की कोई दवा ना करो':

मेरे दुख़ की कोई दवा ना करो
मुझ को मुझ से अभी जुदा ना करो

नाखुदा को खुदा कहा है तो फिर
डूब जाओ खुदा-खुदा ना करो

ये सिखाया है दोस्ती ने हमें
दोस्त बनकर कभी वफा ना करो

इष्क है इष्क ये मजाक नही
चंद लमहों में फैसला ना करो

आशिकी हो के बंदगी 'काफिर'
बेदिली से तो ये फिदा ना करो

" alt="" />

याच अल्बममधली 'दिन गुज़र गया इंतजा़रमें' ही गझल इथे ऐकायला मिळेलः

" alt="" />

सोत्रि's picture

10 Dec 2011 - 9:23 am | सोत्रि

दमदार आवाजाच्या आणि आवडत्या गायकाबद्दलचा लेख आवडला.

- (जगजीत पंखा) सोकाजी

सुहास झेले's picture

10 Dec 2011 - 12:54 pm | सुहास झेले

मस्त... अगदी सुंदर झालाय लेख....

जगजीत ऑल टाईम फेव्हरिट :) :)

खुप खुप आभार. तुम्हा सर्वांच्या कौतुकाने मला खरच खुप बरे वाटले. जगजितसिंग आणि चित्रा सिंगच्या गझल माझे भावविश्व आहे. त्यांच्या जाण्याने माझ्या आयुष्याने बरिच मोठी पोकळी निर्माण झाली आहे. हि लेख माला लिहुन त्यांना श्रध्दांजली वाहुन माझ्या मनाला बरे वाटाचे या साठी केलेला हा एक स्वार्थी अट्टाहास.

@बहुगुणी - माहिती बद्दल आभार. लवकरच दुरुस्ती केली जाईल.