मिसळपाववरील कवितांची रसग्रहणं १ - ती आणि ते

राजेश घासकडवी's picture
राजेश घासकडवी in जनातलं, मनातलं
31 Aug 2011 - 8:08 pm

या प्रतिसादात गणेशा यांनी एक सूचना केली होती. ती म्हणजे कवितांचं रसग्रहण करायचं असेल तर मिपावरच्याच एखाद्या नव्या कवीच्या चांगल्या कवितेचं रसग्रहण का करू नये? त्यायोगे कवीला व एकंदरीत सर्वच सदस्यांना आपलेपणा वाटेल. ही सूचना मला मनापासून आवडली. आपण कायम मराठी वाङमयात गाजलेल्या कवितांकडे लक्ष पुरवतो, त्यांचे गोडवे गातो. पण मिपावरदेखील अनेक कविता येतात. त्यातल्या काही आवडलेल्या कविता घेऊन रसग्रहण व चर्चा करायला काय हरकत आहे? याचा फायदा असा होईल की होणाऱ्या चर्चेत खुद्द कवीला भाग घेता येऊन आपल्याला कवितेमागचा दृष्टीकोन 'घोड्याच्या तोंडून' (from the horse's mouth) ऐकता येईल. या माध्यमाचा तो एक फायदा आहे.

म्हणून मी पहिली कविता निवडली आहे ती नगरीनिरंजन यांची ती आणि ते. ही कविता खूप आवडली. मुख्य म्हणजे या कवितेत वेगळं काहीतरी सांगण्याचा, वेगळ्या प्रकारचा प्रयत्न आहे. तिच्यात एक उत्तम कविता होण्याची सुप्त क्षमता आहे. ही कविता निश्चितच छान असली तरी मला उत्तम किंवा उत्कृष्ट वाटली नाही. पण माझी उत्कृष्ट कवितांचा मानदंड म्हणजे मर्ढेकरांची 'गणपत वाणी' वगैरे असल्यामुळे त्यात काही विशेष नाही.

कवितेच्या शीर्षकात म्हटल्याप्रमाणे ही कविता तिच्याविषयी आहे. व तिच्याशी असलेल्या त्यांच्या संबंधाविषयी आहे. ही ती कोण? असा प्रश्न उपस्थित होणं सहाजिकच आहे. कवीने फक्त ती हे सर्वनाम वापरून नक्की कोण याचा निर्णय वाचकावर सोडलेला आहे. त्यामुळे रूपकांना एक लवचिकता येते. हे या कवितेचं एक मोठं शक्तीस्थान आहे.

गावाच्या घराघरातून ती नांदते
आणि प्रत्येक माणसात उगम पावून
खळाळत्या नदीसारखी
गल्लीबोळातून वाहते

इथे गाव या शब्दाला व्यापक अर्थ आहे हे जाणवल्यावाचून रहात नाही. गाव म्हणजे काही घरं इतकं नसून एका विशिष्ट नात्याने परस्परांशी जोडलेला समाज हे उघड होतं. मग ते नातं भौगोलिक असेल किंवा सामाजिक. अशा गावातल्या प्रत्येक घरी ती नांदते. नुसती रहात नाही तर त्या घराची लक्ष्मी होऊन नांदते. त्याचबरोबर ती गावाच्या गल्लीबोळांतून वाहतेही. गावरूपी समाजाच्या घराघरांना जोडणाऱ्या, एकमेकांपर्यंत नेणाऱ्या रस्त्यांवर ती खळाळते. नदीसारखी. एकाच वेळी ती नांदते, उगम पावते व वाहते. या वर्णनातूनच तिचा पाण्यासारखा गुणधर्म लक्षात येतो. पण हे पाणी थोडं वेगळं आहे. माठांमध्ये साठवल्यासारखं त्याचं नांदणं नाही. घरामध्ये हवा दरवळावी व बाहेर वहावी तसं हिचं आहे. पाण्यापेक्षा एक खेळतं, प्रवाही वातावरण म्हणजे ती.

बैलाचा बळी देऊन मांस खाणारा
कंटाळून सोवळ्यात जातो
तेव्हा ती थोडी बदलते
कमरेला झाडू लावणारा
चिडून पुस्तक हाती धरतो
तेव्हा ती थोडी वळते

उमटत असतात लाटा तिच्यात
तिच्यावर विहार करणार्‍यांच्या क्रीडेने
घुसळली जाते तिच्या तळाशी
गुदमरून बुडणार्‍यांच्या आकांताने

हिचा प्रवाहीपणाच या दोन कडव्यांतून सांगितलेला आहे. मात्र त्या दोन्हींचा फोकस वेगळावेगळा आहे. पहिल्या कडव्यात हिची दिशा, हिचा प्रवाह, हिचं अस्तित्वच त्या गावातल्या व्यक्तींच्या कृतींनी ठरतं हे सांगितलं आहे. दुसऱ्या कडव्यात, विशेषतः शेवटच्या दोन ओळीत सामान्य माणसावर हिचा कधीकधी घातक परिणाम होतो असं सांगितलं आहे. जात भेद, वर्णाधिष्ठित व्यवसाय हे व यांसारख्या गोष्टी या प्रवाहाचा भाग असतात. प्रवाहातूनच येतात. आणि त्या दाबाखाली काहींना गाडून टाकतात. तर पहिल्या कडव्यात या गोष्टीतील बदल या प्रवाहामध्ये परावर्तित होतात हे सांगितलं आहे. दोन्ही कडव्यांत दोन दोन विरुद्ध उदाहरणं आहेत. एकच गोष्ट सांगणारी. हे छान वाटतं.

या दोन कडव्यांवरून अर्थातच आपल्याला संस्कृतीसदृश काहीतरी डोळ्यांसमोर यायला लागतं. समाजात सर्वमान्य असलेल्या प्रथा, परंपरा, आचार विचार, या सर्वांनी तयार होणारी सर्वांमधून खेळणारी संस्कृती. जिचा अंश सर्वांमध्ये असतो व सर्व जिचे अंश असतात. मात्र आधी म्हटल्याप्रमाणे संस्कृती हा शब्द न वापरल्यामुळे ही काल्पनिक नदी अनेक रूपं घेऊ शकते.

त्याचबरोबर या रचनेतल्या काही गोष्टी खटकायला लागतात. दुसऱ्या कडव्यात तीन ओळींचे दोन गट आहेत. तिसऱ्या कडव्यात दोन ओळींचे दोन गट आहेत. हे तीन ओळींचे असते तर अधिक रुचले असते. तिसऱ्या कडव्यामध्ये मध्ये दुसऱ्या कडव्याची सिमेट्री आलेली नाही. 'ती थोडी बदलते - ती थोडी वळते' मधला एक सोपेपणा, सहजपणा 'तिच्यात लाटा उमटतात - ती घुसळली जाते'. कदाचित मला नक्की बोट ठेवता येत नसेल. कवीचे विचार जाणून घ्यायला आवडेल.

जिवंत असतो गाव रसरशीतपणे
तिच्यातल्या लाटा-भोवर्‍यांमुळे
नि:स्तब्ध गावतटावर फक्त ते
तिच्या रक्षणासाठी बसलेल्यांचे सांगाडे....

जोपर्यंत ही नदी प्रवाही असते, तिच्यात लाटा असतात, भोवरे असतात तोपर्यंतच खरी चेतना असते. वहातं पाणी स्वच्छ असतं. त्यातल्या घाणीचा निचरा होतो. जर प्रगती खुंटली, प्रवाह संपला तर तिचं डबकं होतं. चिखल गाळ साचतो, व रोगराईला आमंत्रण मिळतं. असं असूनही 'ते' उभेच असतात तिचा प्रवाह रोखायला. तिला तट घालून अडवायला. तेही रक्षणाच्या नावाखाली. गाव जिवंत असतो मात्र ते कुठल्यातरी भूतकाळात वावरत असतात, वैचारिक अर्थाने त्यांना शरीर वा आत्मे नसतात तर पुराणमतवादाचे केवळ प्रतिगामी सांगाडे शिल्लक असतात.

इथे या रूपकाचं उघड वर्णन न करण्याचा फायदा जाणवतो. (मात्र म्हणूनच शेवटच्या ओळीतला रक्षण हा शब्द फक्त संस्कृतीला जोडून येत असल्यामुळे ही लवचिकता कमी होते असं मला वाटलं) कारण संस्कृतीप्रमाणे भाषेलाही हे लागू होतं. परंपरांना लागू होतं. धर्माला लागू होतं. साहित्याला लागू होतं. जिथे प्रवाह, प्रगतीशीलता, बदलांचं स्वागत करण्याची वृ्त्ती असते तिथेच रसरशीत चैतन्य असतं. जिथे हे सांगाडे यशस्वी होतात तिथे केवळ मृत्यू असतो.

मला वाटलं ते मी लिहिलं. वाचकांनी आपल्याला वेगळा अर्थ जाणवला असला तर सांगावं. काही सौंदर्यस्थळं निसटून गेली असतील तर त्यांचा उल्लेख करावा. कवितेत किंवा रसग्रहणात काही त्रुटी असतील तर त्यावर टिप्पणी करावी. कवीने आपली भूमिका मांडावी. आपण सगळेच यातून काही शिकू.

कवितावाङ्मयआस्वाद

प्रतिक्रिया

नवीन कवीच्या चांगल्या कवितेची ओळख करून दिली. रसग्रहण आवडले.

ही कविता मी आधी वाचली नव्हती. कल्पना तर अव्वल दर्जाची आहे. घासून-पुसून कवीने स्वसंपादन केले तर उत्कृष्ट कविता होण्याची बीज तिच्याच आहे. सहमत.

मला पहीले कडवे खूप आवडले -

गावाच्या घराघरातून ती नांदते
आणि प्रत्येक माणसात उगम पावून
खळाळत्या नदीसारखी
गल्लीबोळातून वाहते
एक प्रकारची आत्मीयता, "हे विश्वचि माझे घर" अशा प्रकारची भावना मला त्यातून प्रतीत झाली. "प्रत्येक माणसात" या शब्दाने जे सर्वांना एका वैश्विक छत्राखाली सामावून घेतले गेले आहे ते खूप आवडले.
मग वाचतच गेले. आणि कविता आवडली.
पण अजूनही पहीले कडवे मनात भरलेले तसेच आहे.
वाचकाचे हृदय उचंबळून टाकणारे अतिशय प्रवाही वर्णन आहे या कडव्यात. नदीची उपमा तर खूपच आवडली.
वाटेतील मालीन्य शुद्ध करणे हा तर खळाळत्या नदीचा गुणधर्म.
_________
घासकडवी यांनी रसग्रहण उत्तम केले आहेच नेहमीप्रमाणे. अजून कवितांचे रसग्रहण येऊ द्यात.

कविता खूपच आवडली.
रसग्रहणही आवडले.

बैलाचा बळी देऊन मांस खाणारा
कंटाळून सोवळ्यात जातो
तेव्हा ती थोडी बदलते
कमरेला झाडू लावणारा
चिडून पुस्तक हाती धरतो
तेव्हा ती थोडी वळते

हे पटकन समजले नव्हते ते दोनदा वाचून समजले.
कवीने असायला हवे तसे गणेशा हे अगदी संवेदनशील नेहमीच वाटत आले आहेत.

राजेश घासकडवी's picture

31 Aug 2011 - 9:43 pm | राजेश घासकडवी

कवीने असायला हवे तसे गणेशा हे अगदी संवेदनशील नेहमीच वाटत आले आहेत.

तुम्हाला नगरीनिरंजन म्हणायचं आहे का? ही कविता त्यांची आहे.

माफ करा!
मला ननि म्हणायचे होते.
आणि गणेशा यांचे सूचवणीबद्दल आभार मानायचे होते.
चुकून लिहिले गेले.
चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद!

रामदास's picture

31 Aug 2011 - 10:02 pm | रामदास

तुमच्यासारखा गाईड मिळाला तर कवितांची लेणी अधिकाधिक उजेडात बघायला मिळतील.

ह्या सुंदर कवितेला आणि किंबहुना अशा अनेक कवितांना वेळीच दाद दिली नाही याची चुटपुट लागली आहे हे या निमीत्ताने नमूद करावेसे वाटते.

ऋषिकेश's picture

6 Sep 2011 - 9:19 am | ऋषिकेश

+१

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

31 Aug 2011 - 10:29 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

कविता मला समजत नाहीत हे राजेशच्या रसग्रहणामुळे पुन्हा एकदा समजलं. अर्थातच रसग्रहण समजलं आणि राजेशने लावलेला कवितेचा अर्थही आवडला, पटला.
कवितेचा अर्थ कशा प्रकारे लावणं अपेक्षित असतं हे अशा प्रकारे कविता 'शिकवली' तर कवितांचीही गोडी लागू शकते. गुर्जी, लगे रहो!

कविता आणि रसग्रहण दोन्ही आवडले.

नगरीनिरंजन यांच्या कविता मी नेहमीच वाचते. ही कवितादेखील वाचली होती, पण संस्कृती हे मला पहिल्या कडव्यावरून कळण्यास थोडेसे अवघड गेले होते, म्हणून विचार करत होते. (प्रतिसाद याआधीच द्यायला हवा होता अशी वर रामदास म्हणतात तशी चुटपूट लागली आहे). मला आधी हे गंगेचे रूपक वाटले होते. (माणसात उगम पावणे). जीवनप्रवाह अशा अर्थाने. पण संस्कृती देखील पटते.

श्रावण मोडक's picture

31 Aug 2011 - 11:04 pm | श्रावण मोडक

हा आमचा प्रांत नाही. या प्रांतात शिरण्यासाठी मात्र ही लेखमाला उपयुक्त हे नक्की.
या निमित्तानं गुर्जीगिरी चांगल्या अर्थानं पुन्हा दिसून आली. उडालेल्या धाग्यावरून होणाऱ्या टीकेला हे एक उत्तरच. काही वेळा उत्तरेच बोलतात. :)

ढब्बू पैसा's picture

31 Aug 2011 - 11:21 pm | ढब्बू पैसा

खरंच वाटलं कविता आधीच वाचायला हवी होती.
कविता उत्तमच आहे आणि रसग्रहणामुळे ती आणखी उमगत गेली!
>>बैलाचा बळी देऊन मांस खाणारा
कंटाळून सोवळ्यात जातो
तेव्हा ती थोडी बदलते
कमरेला झाडू लावणारा
चिडून पुस्तक हाती धरतो
तेव्हा ती थोडी वळते>>

अप्रतीम!

कविता आवडली होतीच, रसग्रहणही आवडले..

अभिजीत राजवाडे's picture

1 Sep 2011 - 3:06 am | अभिजीत राजवाडे

कविता तर सुंदर आहेच पण रसग्रहण पण प्रभावी आहे. अशी दाद चांगल्या कवितेला मिळते हे पाहुन खुप आनंद झाला.

आणखी येऊ द्यात.

क्रेमर's picture

1 Sep 2011 - 3:51 am | क्रेमर

आधी कविता वाचली मग रसग्रहण वाचले. कमी-अधिक प्रमाणात प्रवाह व प्रवाहात वाहणारे/न वाहणारे सर्वच कविता वाचतांना जाणवले. रसग्रहणही त्याच अंगाने गेले आहे.

(मात्र म्हणूनच शेवटच्या ओळीतला रक्षण हा शब्द फक्त संस्कृतीला जोडून येत असल्यामुळे ही लवचिकता कमी होते असं मला वाटलं)

अगदी असेच वाटले.

सहज's picture

1 Sep 2011 - 6:09 am | सहज

>कमी-अधिक प्रमाणात प्रवाह व प्रवाहात वाहणारे/न वाहणारे सर्वच कविता वाचतांना जाणवले.

सहमत आहे. क्रेमर यांना पुनरागमनाच्या शुभेच्छा!

अर्धवट's picture

1 Sep 2011 - 8:50 am | अर्धवट

मला वाटलं की इथे भाषा, क्रांती, प्रेम इत्यादी रुपकेही बसू शकतील

क्रेमर's picture

1 Sep 2011 - 11:29 pm | क्रेमर

भाषा असो की क्रांती सर्वच प्रवाही गोष्टींमध्ये काही घटक प्रवाहाला बांध घालण्याचा प्रयत्न करतात. पुढे धावल्याने निर्माल्य कमी होईल म्हणून की काय काही प्युरिस्ट्स असतातच असतात. पण काही वेळा 'रक्षण करणे' किंवा 'प्रवाह थांबवणे' हा उद्देश नसलेले घटकही प्रवाहाला रोखू पाहतात. 'रक्षण' हा शब्द वापरल्याने असे निर्हेतुक साचलेपण समोर येत नाही. फक्त तेवढेच नाही तर पुढे सांगाडे वगैरे आल्याने मर्यादीत अर्थ अधिकच अधोरेखित झाला आहे. कवीला कदाचित इतकी लवचिकता अपेक्षित नसू शकेल पण वाचकाला ती असावीच असे जाणवण्याइतपत आधीची कविता लवचिक आहे.

नगरीनिरंजन's picture

1 Sep 2011 - 9:39 am | नगरीनिरंजन

या उपक्रमामुळे कविता करणार्‍यांना प्रोत्साहन तर मिळेलच शिवाय चांगल्या कविता करण्याची एक जबाबदारीही वाटेल.
"ती आणि ते" या कवितेत ताल, मात्रा वगैरेंचा तोल अचूकपणे न पाळला गेल्याने ती थोडी उणावली आहे याचे कारण पुरेसे संस्करण न करणे हेच आहे. अशा उपक्रमांमुळे आपल्या कवितेचे गंभीरपणे मूल्यमापन होईल या जाणीवेने भविष्यात जास्त काळजी घेतली जाईल असे वाटते. या उपक्रमाबद्दल राजेश यांचे मनःपूर्वक आभार!
आता कवितेविषयी.
ही कविता सुचली तेव्हा मी संस्कृती या शब्दाबद्दलच विचार करत होतो आणि मला असं वाटलं की आपण अमुक एका गोष्टीवर बोट ठेवून "हं ही संस्कृती" असं म्हणू शकत नाही. प्रत्येक माणसाची काही विचारसरणी, इच्छा-आकांक्षा आणि वागण्याची पद्धत असते. ती त्याच्यातून उगम पावणारी संस्कृती. अशा अनेक माणसांच्या बनलेल्या समाजाची एक सामयिक संस्कृती तयार होते आणि ही रुढी, समाजनियम, भाषा, सण, खाद्यपदार्थ इत्यादी अनेक गोष्टींनी युक्त अशी संस्कृती समाजातल्या लोकांचे आचार-विचार ठरवत असली तरी प्रत्येक माणसाच्या स्वत:च्या विचारसरणीने ती सतत बदलतच असते असं मला वाटलं. हे बदलते रूप ज्यांना कळत नाही ते मग तिच्या दर्शनी रुपाचे बाहेरच्या हल्ल्यांपासून म्हणजे त्या समाजगटाबहेरच्या प्रभावापासून रक्षण करायचा प्रयत्न करतात.
पहिल्या तीन कडव्यांबद्दल राजेश घासकडवींनी जे लिहिलं आहे ते यथार्थ आहे, परंतु शेवटच्या कडव्यात मला जी भावना दाखवायची होती ती दाखवण्यात मी कमी पडलो असे मला वाटते.
प्रवाह थोपवणे हे रुपकाला धरून झाले असते हे खरं असलं तरी तिचे रक्षण करण्याचा दावा करणार्‍यांना तिचे प्रवाही रुप माहितच नसते किंवा समजून घ्यायचे नसते. एखादं साचलेलं तळं राखावं तशी तिची राखण करायला ते गावतटावर बसतात आणि बाहेरून हल्ला होईल या भीतीने अनंतकाळ तिथेच बसून त्यांचे कालबाह्य सांगाडे होतात पण ती म्हणजे एक प्रवाह आहे आणि स्वतःच्याच चलनवलनाने ती बदलते आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही असं मला सूचित करायचं होतं म्हणूनच मी थोपवणे किंवा बांध घालणे असा शब्दप्रयोग वापरला नाही.

>>एखादं साचलेलं तळं राखावं तशी तिची राखण करायला ते गावतटावर बसतात आणि बाहेरून हल्ला होईल या भीतीने अनंतकाळ तिथेच बसून त्यांचे कालबाह्य सांगाडे होतात पण ती म्हणजे एक प्रवाह आहे आणि स्वतःच्याच चलनवलनाने ती बदलते आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही असं मला सूचित करायचं होतं

बाब्बौ..
ये पानी कुछ अलग है..
खुपच ताकदीचं रूपक वापरलंय तुम्ही असं वाटतंय आता..
आपण जाम खूष तुमच्यावर,

राजेश घासकडवी's picture

1 Sep 2011 - 11:04 pm | राजेश घासकडवी

सर्वप्रथम आपला दृष्टीकोन मांडल्याबद्दल धन्यवाद. अनेक कवींची भूमिका अशी असते की मी कविता लिहिली, आता तिच्या अर्थावर माझी मालकी राहिली नाही. तुम्हाला जशी समजली तशी समजली. नाही समजली तर ती तुमच्यासाठी कविता नाही. व्यक्तिशः मी या भूमिकेचा आदर करत असलो तरी कवीने जर आपला विचार मांडला तर काव्यानुभव अधिक समृद्ध होतो असं मला वाटतं. विंदांनी त्यांच्या एका कवितेचा अर्थ उकलून दाखवला होता ते आठवतं. (कवितेचं नाव आठवत नाहीये)

ही कविता सुचली तेव्हा मी संस्कृती या शब्दाबद्दलच विचार करत होतो

कवितेतून तशाच जातकुळीच्या कल्पनेचं वर्णन आहे हे लक्षात येतं. मात्र तुम्ही तो शब्द वापरला नाहीत त्यामुळे संस्कृतीचीच उपांगं असलेल्या रुढी, समाजनियम, भाषा, सण, खाद्यपदार्थ, धर्म इत्यादींना तो लागू पडतो.

प्रवाह थोपवणे हे रुपकाला धरून झाले असते हे खरं असलं तरी तिचे रक्षण करण्याचा दावा करणार्‍यांना तिचे प्रवाही रुप माहितच नसते किंवा समजून घ्यायचे नसते. एखादं साचलेलं तळं राखावं तशी तिची राखण करायला ते गावतटावर बसतात आणि बाहेरून हल्ला होईल या भीतीने अनंतकाळ तिथेच बसून त्यांचे कालबाह्य सांगाडे होतात

हा बारीक फरक माझ्या लक्षात आलेला नव्हता. नुसता प्रवाह थोपवून धरणारे तुम्हाला अपेक्षित नाहीत. तुम्ही तळं शब्द वापरला त्यातून तळं राखील तो पाणी चाखील असं मला सुचतं. कदाचित या न्यायाने, पाणी चाखण्याचा स्वार्थ ज्यांना साधायचा असतो ते तळं तयार करण्याचा प्रयत्न करतात असाही दूरान्वयाने अर्थ काढता येईल. गावतटाचा संदर्भही मी नीट समजून घेतला नव्हता. तटावर बसणे म्हणजे बाहेरच्या आक्रमणापासून पाणी 'शुद्ध' ठेवण्याचा प्रयत्न करणे. सांगाड्यातून मला मृत्यू दिसला तर तुम्ही तो कालबाह्यता म्हणून वापरला आहे.

साधारण भावार्थ कळलेला असला तरी असे कंगोरे लक्षात आल्यामुळे बरं वाटलं.

पुन्हा एकदा धन्यवाद. अशाच छान छान कविता लिहीत रहा.

चिंतातुर जंतू's picture

2 Sep 2011 - 5:19 pm | चिंतातुर जंतू

विंदांनी त्यांच्या एका कवितेचा अर्थ उकलून दाखवला होता ते आठवतं. (कवितेचं नाव आठवत नाहीये)

विंदांनी आपल्या 'वक्रतुंड महाकाय' या विरुपिकेवर जे भाष्य केलेलं होतं ते तुम्हाला अभिप्रेत आहे का? विंदांच्या मृत्यूनंतर मी 'विंदांकडून काय घ्यावे?' या धाग्यात ते उद्धृत केलं होतं.

नगरी जे लिहितात ते सहज सोप्प अस कधिच नसत, पण अर्थ गर्भित लिखाणाची मजाच न्यारी. वर दिलेला तुमचा रसग्रहणाचा लेख आणखि थोडा पुराव्या सह, उदाहरणे देउन रसरशित झाल असता.

नगरी तुमच विवेचन ही सुरेखच, मी माझी मला शाब्बासकि दिली.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Sep 2011 - 10:37 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गुरुजी, छान रसग्रहण. संस्कृतीबद्दलचा ''जोपर्यंत नदी प्रवाही असते पासून ते पुराणमतवादाचे केवळ प्रतिगामी सांगाडे शिल्लक असतात' पर्यंतचा कवितेचा सारांश मला पटला.

और भी आने दो.......!

-दिलीप बिरुटे

राजेश जी मनापासुन धन्यवाद ..

आणि पहिली कविता योग्य आणि छान निवडली आहे..
पुढील भागाच्या प्रतिक्षेत ...

अवांतर : सुट्टीमुळे शेवटी रिप्लाय आला माझा, पुढच्यावेळेस पहिलाच असेल...
------------------

नगरीनिरंजन यांनी पण समजावुन सांगितल्याने छान वाटले..

सुनील's picture

6 Sep 2011 - 11:28 am | सुनील

मूळ कविता आणि रसग्रहण दोन्ही आवडले.

बघता बघता तीन रसग्रहणे येऊन गेली. (शरदिनीतैंच्या कवितांच्या रसग्रहणाचे शिवधनुष्य कोण पेलेल काय?)

भडकमकर मास्तर's picture

22 Sep 2011 - 1:21 pm | भडकमकर मास्तर

मूळ कविता आधी वाचली नव्हती... कविता आणि रसग्रहण दोन्ही आवडले...
अशा कविता वाचणे, त्या समजून घ्यायचा प्रयत्न करणे हा आनंद आहे...
दोघांना धन्यवाद...