प्रसंग १:
"मुझे भगवान के लिये छोड दो... मैं तुम्हारे हाथ जोडती हूँ... पाँव पडती हूँ !!" तश्या परिस्थितीतही ग्लॅमरस दिसणार्या हिरॉइनची आर्त विनवणी.
"जानेमन... तुम्हें अगर भगवान के लिये छोड देंगे तो हम क्या करेंगे?" गुटखा खाल्ल्यासारखे दिसणारे दात विचकत व्हिलनची विचारणा ! त्याच्या साथीदारांची "हा हा हा" अशी तद्दन फुटकळ साथ. व्हिलन हिरॉइनच्या जवळ येतो.... तोंडी (लोणचं) लावण्याइतपत तिच्याशी चाळा करतो आणि तिच्या पदराला (हल्ली हा प्रकारच गायब झालाय हिरॉइनच्या अंगावरून) हात घालणार इतक्यात.........
"धाsssssssssssड"..... दार, भिंत, छत, जमीन अगदीच नाही तर गेलाबाजार एखादी काच फोडून हीरोची एंट्री. "कुत्ते कमीने....अगर रोमाको छूनेकीभी कोशिश की तो मैं तेरा खून पी जाऊंगा" वगैरे नेहेमीची वाक्यं. मग देssssssssssमार हाणामारी...व्हिलनच्या पिस्तुलातल्या सहा गोळ्यांना हीरो त्याच्या पिस्तुलातून १३२ गोळ्यांचं उत्तर देणार... उगाच २०-२५ टाळकी फोडणार.... लाखो रुपयांचं फर्निचर तोडणार आणि एकदाचा रोमाला त्यांच्या तावडीतून सोडवणार. की हे दोघे बागेत बागडायला मोकळे ! (आजकाल डायरेक्ट बेडरूम गाठतात म्हणे).
प्रसंग २:
"मुझे भगवान के लिये छोड दो... मैं तुम्हारे हाथ जोडती हूँ... पाँव पडती हूँ !!" तश्या परिस्थितीतही ग्लॅमरस दिसणार्या हिरॉइनची आर्त विनवणी.
"जानेमन... तुम्हें अगर भगवान के लिये छोड देंगे तो हम क्या करेंगे?" गुटखा खाल्ल्यासारखे दिसणारे दात विचकत व्हिलनची विचारणा ! त्याच्या साथीदारांची "हा हा हा" अशी तद्दन फुटकळ साथ. व्हिलन हिरॉइनच्या जवळ येतो.... तोंडी (लोणचं) लावण्याइतपत तिच्याशी चाळा करतो आणि तिच्या पदराला (हल्ली हा प्रकारच गायब झालाय हिरॉइनच्या अंगावरून) हात घालणार इतक्यात.........
"टकटकटक"...दारावर कोणीतरी "नॉक" करतं ! व्हिलनचा चमचा दार उघडतो तर समोर सुटाबुटातला (हीरो असूनही) स्वच्छ दाढी केलेला, केस व्यवस्थित कापलेला (चक्क) सुशिक्षित दिसणारा इसम उभा असतो.
"आपमेंसे मि. शाकाल कौन है?" नम्र विचारणा.
"जब पडता है अकल का आकाल.. तब मौत बनके आता है शाकाल..." असंच काहीसं म्हणत शाकाल समोर येतो.
"मैं राज मेहरा" हीरो चं इंट्रोडक्शन - "सर आपने रोमाको किडनॅप क्यों किया है जान सकता हूँ?"
आणि मग बराच वेळ वाटाघाटी....वादविवाद. थोडं देणं थोडं घेणं - निगोसिएशन्समध्ये अगदीच परिस्थिति चिघळली तर क्वचित चढलेला हीरोचा आवाज... आणि मग हताश व्हिलनसमोरून रोमाच्या अंगाला न खरचटता तिला घेऊन जाणारा हीरो !
काय म्हणताय? कसा "मेथॉडिकल" वाटला ना अॅयप्रोच? सगळं कसं शिस्तीत. उगाच हाणामारी नाही.. .रक्तपात नाही फुटलेल्या काचा नाहीत की तुटलेली हाडं नाहीत .... उद्दिष्ट साधलं गेल्याशी मतलब ! दोन्ही प्रसंगात आणीबाणी तीच, साधलेलं उद्दिष्टही तेच! पण दोन्हींतली पद्धत मात्र जॅकी चॅन आणि आण्णा हजारेंइतकी वेगळी. पण शेवटी टाळ्या, शिट्ट्या कशाला पडतात? तिकिटं कोणाच्या नावावर खपतात? डोक्याला किक कोण देतो? "ब्रेनी" हीरोला आजकाल विचारतो कोण?
आपला आजचा खेळिया असाच "ब्रेनी" हीरो. खरंतर जन्मजन्मांतरीचा "साईड हीरो" ! आपल्या पहिल्याच कसोटीत ह्याला शतकासाठी आणि ते ही लॉर्डसवरच्या शतकासाठी फक्त ५ धावा कमी पडल्या. आणि तेव्हापासून आजतागायत त्याला दर वेळेस ५ धावा कमीच पडत आल्या आहेत. ह्यानी १४५ रन्स कुटल्या तेव्हा कोणीतरी १८३ मारल्या... ह्यानी १५३ मारल्या तेव्हा कोणी १८६ मारल्या... त्यानी १८० मारल्या तेव्हा अजून एकानी २८१ मारल्या ! दर वेळेस त्याच्या वाटेला आली ती साईड हीरोची भूमिका. पण त्यानी त्या भूमिकेतही कित्येक पिक्चर खाल्लेत. कित्येक वेळा हीरोंनी कच खाल्ल्यावर आपल्या "मेथॉडिकल अॅप्रोचनी" हिरॉइनला वाचवलंय. अनेकदा व्हिलनचे वार सहन करून, त्याला बोथट करून हीरोला फूटेज खायला मदत केली आहे. मुन्नाभाईसाठी "सर्किट" जसा त्याला हवा तेव्हा कुठूनही टपकतो तसा कधी ओपनर, कधी नं ३, कधी नं ५, कधी ६, कधी यष्टिरक्षक आणि कधी स्लिप्समधल्या भरवश्याच्या क्षेत्ररक्षकाच्या रूपात तो "टपकला" आहे. ह्या कृष्णानं कित्येक वेळा द्रौपदीचं वस्त्रहरण रोखलं आहे. एकापेक्षा एक अवलिया धुरंधर आक्रमक फलंदाजांच्या मांदियाळीत आपल्या अभिधानाला जागून बचावाची अभेद्य तटबंदी उभारणारा, अचाट hand eye co-ordination, अफलातून timing, डोळ्यांचं पारणं फेडणारी नजाकत ह्यासारखी कुठलीही नैसर्गिक देणगी नसताना केवळ आणि केवळ आपल्या कष्टांच्या जोरावर क्रिकेटच्या शिलालेखात आपलं नाव सुवर्णाक्षरांत कोरणारा आजचा आपला खेळिया राहुल शरद द्रविड !
राहुल द्रविडच्या कौतुकाचा "सीझन" असतो. आयपीएलचा धुडगूस चालू असताना. निळ्या कपड्यांतले आपले खेळाडू मैदानं मारताना (अथवा मार खातांना) ह्याची कोणाला आठवणही होत नाही. पण दिवाळीत जसा आंघोळीला उटण्याबरोबर "मोती" साबण लागतो तसा श्वेतवस्त्रांतल्या क्रिकेटमध्ये राहुल द्रविडला पर्याय नाही. ग्रेस, ब्रॅडमन, हटन पासून कदाचित गावसकर, स्टीव्ह वॉ, अॅम्ब्रोसपर्यंत मंडळी जे क्रिकेट खेळली त्याचा बहुधा उरलेला एकमेव पाईक. ह्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये रिव्हर्स स्वीप कर्तांना पाहणं हे पूर्ण कपड्यांतली मल्लिका शेरावत दिसण्याइतकं दुरापास्त. टेस्ट क्रिकेट म्हणजे पहिले दोन तास बोलरला देऊन, त्याची रग जिरेपर्यंत त्याला खेळून काढून खराब चेंडूची वाट बघणे - ह्यावर विश्वास ठेवणारा सध्याचा बहुधा एकमेव फलंदाज. ह्या "खेळून काढण्यामध्ये" मग छातीवर बाऊन्सर्स घेणे, शंभर वेळा "बीट" झाला तरी निराश न होणे, ऑफस्टंपच्या बाहेरच्या चेंडूला अस्पृश्यतेने वागवणे, स्कोअरबोर्डकडे ढुंकूनही न पाहता तासनतास खेळपट्टीवर ठाण मांडून बसणे हे सगळं आलं. ह्या माणसाकडे इतका संयम आहे की संयम हा जर बँकेत ठेवता आला असता तर हा राडिया, पवार, राजा, कलमाडी ह्यांच्या एकत्रित संपत्तीपेक्षा श्रीमंत असता ! गोलंदाजाला मान देऊन त्याच्याशी दोन हात करणं, आपल्या संधीसाठी संयमानी वाट बघणं, विकेटवर स्थिरावेपर्यंत कराव्या लागणार्या संघर्षातल्या "झपुर्झा" चा आनंद घेणं हे कोण्या येर्यागबाळ्याचे काम नोहे ! राहुल द्रविडबद्दल ...त्याच्यातल्या खेळियाबद्दल लिहायचं तर उगाच आकड्यांचे, विक्रमांचे संदर्भ देण्यात अर्थ नाही. कारण म्हणतात ना - stastics are like bikinis - what they reveal is interesting, but what they conceal is more vital. तसे द्रविडचे आकडे कुठल्याही मापदंडानी अचाटच आहेत. पण का कोण जाणे त्या आकड्यांच्या इतर मानकर्यांबरोबर त्याचं नाव त्याच दमात घेतलं जात नाही. "महान फलंदाज" म्हणून जितक्या पटकन सचिन, पाँटिंग, लारा, स्टीव्ह वॉ ही नावं घेतली जातात तितक्या चटकन राहुल द्रविड (आणि जाक्स कॅलिसदेखील) लोकांना आठवत नाही. ऑर्केस्ट्रामधल्या "सेकंड फिडल" सारखं राहुल द्रविडचं अस्तित्व त्याच्या नसण्यानीच जाणवतं.
शरद आणि पुष्पा द्रविड ह्या मध्यमवर्गीय मराठी दांपत्याच्या ह्या थोरल्या मुलाने वयाच्या १२ व्या वर्षी बंगलोर (आताचे बेंङळूरू) मध्ये क्रिकटचे धडे गिरवायला सुरुवात केली. १५, १७ आणि १९ वर्षांखालील संघांमध्ये कर्नाटकचं प्रतिनिधित्त्व केलं. त्रिशतकं मारली नाहीत की सहा-सहाशे च्या भागिदार्या केल्या नाहीत. षटकारांचे विक्रम केले नाहीत की विकेट्समागे अचाट काही केलं नाही. पण धावांचा रतीब मात्र घातला. भय्यानी अगदी नियमितपणे १ लिटर टाकून जावं इतका सरळ साधा सोपा हिशोब. आणि एके दिवशी कर्नाटकच्या रणजी संघात त्याची वर्णी लागली. पदार्पणातच महाराष्ट्राविरुद्ध ७ नंबरला खेळताना ८२ धावा काढल्या (१७, २९, ३७, ५१, ६३, ७७, ८२ असे आकडे त्याला तेव्हा प्रिय होतेच). १९९१-९२ च्या मोसमात ६३.३ च्या सरासरीनी ३८० धावा केल्या. आणि मग ३ वर्षं रणजी ट्रॉफीत सातत्यानी धावा केल्यानंतर सिंगापूर मधल्या सिंगर कप साठी विनोद कांबळीच्या जागी त्याची भारतीय संघात निवड झाली.
पहिल्या सामन्यात तर साहेब मुरलीसमोर मोजून ४ चेंडू टिकले. ४ सामन्यांत जेमतेम २० धावा केल्यामुळे त्याची संघातून उचलबांगडी झाली. नंतर ९६ च्या रणजी करंडकाच्या उपांत्य सामन्यात १५३ आणि अंतिम सामन्यात द्विशतक काढल्यानंतर त्याचा कसोटी संघात समावेश झाला. एजबॅस्टनची पहिली कसोटी (सचिनच्या शतकानंतरही) हरल्यानंतर जखमी मांजरेकरच्या जागी त्याचा समावेश झाला आणि लॉर्ड्स कसोटीत सौरव गांगुलीबरोबर राहुल द्रविडच्या खेळीनी भारताला २ "लंबे रेसके घोडे" मिळाल्याची ग्वाही दिली.
सौरवनी भारताच्या एकमेव डावात १३१ धावा काढल्या आणि द्रविडनी ७ नंबरला खेळताना २६७ चेंडूत ९५ धावा काढल्या. कारकीर्दीची सुरुवात तर झकास झाली होती. पण ३५ आणि ४० च्या स्ट्राईक रेटनी खेळणं ह्या जमान्यातल्या क्रिकेटप्रेमींना रुचण्यासारखं नव्हतं. वनडेमध्ये एकीकडे जयसूर्या, सचिन, लारासारख्या तोफा धडाडत असताना ६५ - ७० च्या स्ट्राईक रेटनी खेळणारा द्रविड लोढणं वाटायला लागला होता. पण त्याचं तंत्र परदेशात गोलंदाजांना मदत करणार्या परिस्थितीत खेळताना इतर कुठल्याही फलंदाजापेक्षा सरस होतं हे ही निर्विवाद! इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेविरुद्ध भारतात तो विशेष करू शकला नाही. पण भारतीय संघ आफ्रिकेत गेल्यावर पहिल्यांदा लोकांना त्याची किंमत कळाली. जोहान्सबर्गच्या हिरव्यागार विकेटवर डोनाल्ड, पोलॉक, क्लूसनर, ब्रायन मॅक्मिलन अश्या गरळ ओकणार्या गोलंदाजीसमोर त्यानी विकेटवर भक्कम मांड ठोकत तब्बल १४८ धावांची खेळी उभारली. लगेच दुसर्या डावात ८१ केलेल्या द्रविडनी आफ्रिकेला गुडघ्यावर आणलं होतं. द्रविड आफ्रिकेला खुपायला लागला होता ह्याचा पुरावा म्हणजे त्यानंतरच्या तिरंगी वनडे मालिकेच्या अंतिम सामन्यात डोनाल्डचा उडालेला भडका.
डोनाल्ड सांगतो - "I was really pumped by the time Tendulkar and Dravid came together, but they soon got after me. Tendulkar pulled me for a flat six over midwicket, a wonderful shot...but when Dravid smashed me for six and four, I got carried away in typical fast bowler's fashion. I walked right up to him, face to face, and snarled, 'This isn't such a f*cking easy game'-" द्रविडनीदेखील त्याला आव्हान दिलं - "Okay.. take me on - Let's see what you have !". आणि त्यापुढच्या एका स्लोअर बॉलवर डोनाल्डला त्यानी लाँगऑनवरून भिरकावल्यावर तर डोनाल्ड पिसाळलाच ! पण बोलरशी अशी चकमक उडण्याचा द्रविडच्या कारकीर्दीतला हा बहुधा पहिला आणि शेवटचा प्रसंग.
मग ९७ च्या मे मध्ये इंडिपेन्डन्स कप सामन्यात चेन्नईला सईद अन्वरने १९४ मारल्यानंतर द्रविडनी आपलं पहिलं एकदिवसीय शतक झळकावलं! आणि राहुल द्रविड हे नाव भारतीय फलंदाजीचा एक अविभाज्य भाग बनलं. ९९ साली हॅमिल्टनमध्ये बोचर्या थंडीत आणि चेंडू स्विंग होत असताना सचिनबरोबर त्याने २ बाद १७ अश्या अवस्थेतून त्यानी भारताला सावरलं ते ४९० मिनिटं आणि ३५४ चेंडूंतल्या १९० धावांनी. इतकंच नाही तर दुसर्या डावात ४१५ धावांचं लक्ष्य असताना २ बाद ५५ अश्या अवस्थेतून त्यानी १०३* धावा काढत ती कसोटी अनिर्णित राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. विजय हजारे आणि सुनील गावसकर नंतर कसोटीच्या दोन्ही डावांत शतक काढणारा तो केवळ तिसरा भारतीय फलंदाज ठरला (हा विक्रम त्याने परत २००४ मध्ये पाकिस्तानविरुद्ध कोलकत्त्यात केला). मग ९९ च्या विश्वचषकात तर त्याने सर्वाधिक धावा काढल्या. श्रीलंकेविरुद्ध त्याने आणि गांगुलीने ३१८ धावांच्या भागिदारीचा विश्वविक्रम नोंदवला. नंतर काहीच महिन्यांत न्यूझीलंडविरुद्ध त्यानी आणि सचिननी ३३१ धावांचा विक्रम केला. २००० च्या मोसमात त्यानी केंटसाठी ४९.४० च्या सरासरीने सर्वाधिक १०३९ धावा केल्या. नंतर झिंबाब्वे विरुद्ध घरच्या मालिकेत त्याची सरासरी ४३२ होती !!
आणि १४ मार्च २००१ रोजी "ती" ऐतिहासिक भागिदारी घडली. पहिल्या डावात २७४ धावांनी मागे पडल्यावर फॉलोऑन मिळालेला - त्यातही दुसर्या डावात ४ बाद २५४ अशी अवस्था. सामन्याच्या चौथ्या दिवशी मॅक्ग्रा, गिलेस्पी, कास्प्रोवित्झ आणि वॉर्न ह्यांनी आपल्या पूर्ण शक्तीनिशी भारतीय फलंदाजीवर हल्ला चढवणं अपेक्षितच होतं. आणि घडलंही तेच. पण त्या दिवशी विकेटच्या एका बाजूला होता हिमालय आणि दुसरीकडे आल्प्स ! राहुल शरद द्रविड आणि वांगीपुरुप्पु वेंकटसाई लक्ष्मण ह्यांनी विकेटवर तळच ठोकला. न स्विंगचा उपयोग झाला न स्लेजिंगचा. दोघांनी जणू खेळपट्टीवर किल्लाच उभारला होता. आणि तटबंदी अशी भक्कम की क्या कहने ! फिरकीचा बादशहा वॉर्नला तर मांजरानी लोकरीच्या गुंड्याशी खेळावं त्याप्रमाणे दोघे खेळवत होते. दिवसभरात स्टीव्ह वॉनी हेडन आणि गिलख्रिस्ट सोडून प्रत्येकाला गोलंदाजी देऊन बघितली. पण मार्चमधल्या कोलकत्याच्या त्या उकाड्यात दोघांच्या तटबंदीत एका इंचाची भेग काही तो पाडू शकला नाही. दिवसभरात ९० षटकांत त्यांनी ३३४ धावा केल्या! And the rest - as they say - is history.
द्रविडच्या ८० होऊन जास्त शतकी भागीदार्यांपैकी सर्वांत अविस्मरणीय भागीदारी भारताच्या क्रिकेट पंढरीत रचली गेली. मग इंग्लंड आणि विंडीजविरुद्ध सलग ४ कसोटी शतकं, २००३-०४ च्या मोसमात ऑस्ट्रेलियातल्या विजयात मोलाचं योगदान, पाकिस्तानला पाकिस्तानात धूळ चारणं अश्या पराक्रमांच्या राशी ओतल्या गेल्या. २००४ मध्ये चितगांव कसोटीत बांगलादेशविरुद्ध १६० धावा करून तो कसोटी खेळणार्या प्रत्येक देशात शतक काढणारा पहिला आणि आजवरचा एकमेव फलंदाज ठरला.
सोन्याला आगीतून काढल्यावर जशी झळाळी यावी तशी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतल्या त्याच्या एकापेक्षा एक सरस खेळींनी राहुल द्रविडचा खेळ बहरत होता. अॅडलेडची २३३ ची खेळी जितकी अविस्मरणीय तितकाच रावळपिंडीला लावलेला २७० धावांचा धडाकाही. हॅमिल्टनची शतकं तर नक्कीच अफलातून पण नॉटिंगहम, लीडस आणि ओव्हलवरची लाहोपाठ ठोकलेली शतकंही. पण ह्या सर्वांत अप्रतीम जर त्याची कुठली खेळी असेल तर सबीना पार्कवरची त्याची २ अर्धशतकं. आखाड्यासारख्या पिचवर सचिन, लक्ष्मण, लारा, सरवान, चंदरपॉलसारखे धुरंधरसुद्धा हतबल झाले होते. पण एकच "रॉक ऑफ जिब्राल्टर" पाय घट्ट रोवून बॅटीची (आणि कधी कधी छातीची सुद्धा) ढाल करून विंडीजच्या तोफखान्याला धीरोदात्तपणे तोंड देत होता भारताचा कर्णधार राहुल "द वॉल" द्रविड ! "द वॉल" हे अभिधान त्याला चिकटलं हे तेव्हापासून. द्रविडच्या नेतृत्त्वाखाली तब्बल ३५ वर्षांनंतर भारताने विंडीजमध्ये कसोटी मालिका जिंकली. २००० ते २००६ हा खर्याख अर्थानी द्रविडच्या कारकीर्दीतला सुवर्णकाळ होता.
पण मग २००७ च्या वर्ल्डकपमध्ये बांगलादेशकडून भारताला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. पुढे बांगलादेश आणि इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकून देखील वनडेमधल्या खराब कामगिरीमुळे द्रविडनी कर्णधारपद सोडायचा निर्णय घेतला. मग आधी कुंबळे आणि मग धोनीच्या नेतृत्त्वाखाली त्याची दुसरी इनिंग सुरू झाली. आणि आजतागायत तो भारतीय फलंदाजीचा कणा आहे. एक विशेष गोष्ट अशी की द्रविडच्या आताच्या इंग्लंड दौर्यातल्या पहिल्या कसोटीतल्या लॉर्डसवरच्या शतकापर्यंत त्यानी शतक काढलेल्या ३२ कसोटींमध्ये एकदाही भारत हरला नव्हता !
राहुल द्रविडच्या खेळात एक साधेपणा आणि सोपेपणा आहे. कुठलाही फटका मारताना त्यात अमानुष ताकद नसते. एखाद्या गोड गळ्यातून तयारीचं गाणं ऐकावं तसे ते फटके अत्यंत आकर्षक वाटतात. कव्हर ड्राईव्ह आणि स्क्वेअर कट तर अतिशय नजाकतदार पण मांडीवरचा चेंडू "फ्लिक" करण्याची पद्धतसुद्धा लाजवाब !
क्रिकेटच्या दोन्ही प्रकारांत मिळून तब्बल २३ हजारापेक्षा अधिक धावा आणि ४०० पेक्षा अधिक झेल हे कोणाचेही डोळे दिपावेत असेच आकडे आहेत. भारताच्या कसोटी विजयांमध्ये ६५.६९ आणि वनडे विजयांमध्ये ५० ची सरासरी राहुल द्रविडचं महत्त्व अधोरेखित करून जाते. स्लिप्समध्ये एक safe as a house कॅचर हा तर मिळालेला बोनस! पण वर म्हटल्याप्रमाणे ऑल टाईम ग्रेट्सच्या यादीत त्याचं नाव इतक्या सहजी घेतलं जात नाही. ह्याचं कारण म्हणजे क्रिकेटच्या मैदानातच नाही तर आयुष्यातसुद्धा त्यानी नेहेमीच केलला "अंडरप्ले". बोलिंगवर घणाघाती हल्ला चढवून तिच्या चिंधड्या उडवणं ही जशी त्याची प्रवृत्ती नाही तशीच वादग्रस्त विधानं करणं, रिअॅलिटी शोज मध्ये जाणं, भलत्याच जाहिराती करणं ही देखील नाही. "किंगफिशर" च्या एका जाहिरातीतही गेल, सेहवाग, डेव्हिड वॉर्नरसारख्या टग्यांबरोबर "उलाय् लाय ल ला ले ओ" करणारा द्रविड हा "ऑड मॅन आउटच" वाटतो. मैदानाबाहेर इतकाच तो मैदानावरही जंटलमन असतो. त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल, त्याच्या कुटुंबाबद्दल, त्याच्या अफाट वाचनाबद्दल, त्याच्या "वरण - भाताच्या" आवडीबद्दल कोणाला विशेष माहिती नसते ती ह्या "अंडरप्ले" मुळेच! आफ्रिकेत गेल्यावर पहिल्याप्रथम गांधीजींच्या आश्रमाला आणि पाकिस्तानात गेल्यावर ऐतिहासिक खैबरखिंडीला आणि तक्षशिला विद्यापीठाचे अवशेष पाहायला जाणार्या द्रविडचं व्यक्तिमत्त्व देखील त्याच्या फलंदाजी इतकंच शांत आणि खोल आहे.
जग नेहेमी आक्रमक खेळावर फिदा होतं. अवलियांवर जीव ओवाळून टाकतं, निसर्गदत्त सौंदर्याला भुलतं, नेत्रसुखद गोष्टींवर भाळतं. आपण सगळेच चमत्काराला नमस्कार करतो. पण राहुल द्रविड ह्या एका खेळियाने आपल्याला कष्टांमधलं सौंदर्य दाखवलं. खडतर साधनेतल्या सुखाशी आपली ओळख करून दिली. मेहनत करून मिळवता येत नाही असं जगात काहीच नाही हे आपल्या कर्तृत्त्वानी दाखवून दिलं. When the going gets tough the tough get going ह्या उक्तीला अनुसरून प्रतिकूल परिस्थितीशी डोकं थंड ठेऊन दोन हात कसे करावेत हे शिकवलं. नि:स्वार्थीपणानी संघासाठी - सहकार्यांसाठी कसं झटावं, कठिण परिस्थितीत खांद्यावर जबाबदारी घेऊन ती कशी निभवावी ह्याचा आदर्श घालून दिला. विजय मिळवण्यासाठी प्रतिस्पर्ध्याचे प्रहार झेलायची तयारी हवीच हे आमच्या मनावर बिंबवलं. आपला वार करण्यासाठी योग्य क्षणाची वाट कशी बघावी हे सांगितलं. तुमच्या मनात, कष्टांत आणि कामात "सच्चाई" असेल तर यशाचं शिखर गाठणंही अशक्य नाही हे दाखवून दिलं.
आजही भारताची पहिली विकेट लवकर पडते...... आमची चुळबुळ सुरु होते... .. "च्यायला नेहेमीचं आहे ह्यांचं... फेकलीच शेवटी विकेट"वगैरे कमेंटस मारल्या जातात. विकेटबद्दल, आमच्या फलंदाजांच्या क्षमतेबद्दल नाना शंका कुशंकांनी मन पोखरतं. इतक्यात आपली "शस्त्रं" परजत एक शिडशिडीत व्यक्ती आपल्या पूर्ण पेहेरावात - अंगभर पॅडिंग घालून मैदानात उतरते. कोपरात वाकलेल्या हातांनी "गार्ड" घेतला जातो....... मिळालेल्या विकेटचा उन्माद विसरून बोलर पुढे कराव्या लागणार्या कष्टांचा विचार करत परत आपल्या मार्ककडे जात असतो.... कॅमेरा झूम इन होतो आणि कपाळावर अंमळ खाली आलेल्या हेल्मेटमधून आम्हाला आतला चेहरा दिसतो....... अत्यंत तंत्रशुद्ध असा "स्टान्स" घेतला जातो..... त्या चेहर्यावरचे त्रासिक भाव बदलतात आणि तो आत्मविश्वासाचा आणि कणखरपणाचा चेहरा बनतो. आम्ही इथे निर्धास्त होतो...... आता काही काळजी नाही....कारण आम्हाला ठाऊक असतं की आता विकेटवर आपल्यासाठी एक फलंदाज नाही तर जगातली कितीही भयप्रद गोलंदाजी नामोहरम करणारी एक भिंत उभी आहे.... कारण त्या चेहर्याचं नाव असतं "राहुल - द वॉल - द्रविड" !
प्रतिक्रिया
11 Aug 2011 - 8:04 pm | Dhananjay Borgaonkar
बाबारे कुठे होतास एवढे दिवस??? लय झाक झालाय हा पण भाग्..आणि परफेक्ट टाईमवर :)
मस्त....
मालक एवढी लांब विश्रांती घेऊन कुठे गायब झालेलात?
12 Aug 2011 - 10:30 am | जे.पी.मॉर्गन
धन्यवाद धनंजय (आणि बाकी सगळ्यांनाच). कचेरीत बर्याच नवीन जबाबदार्या आल्यामुळे बराच व्यस्त होतो. पण आता थोडा सेटल होतोय म्हणून म्हटलं आधी काही दिवस जरा मिपा चा "फील" घ्यावा अन मग लिहावं ! तुम्हाला सगळ्यांना हा पण लेख आवडला ह्याचा आनंद आहे. :)
पुनःश्च एकदा धन्यवाद !
जे पी
11 Aug 2011 - 8:04 pm | विजुभाऊ
मॉर्गन यांचा आणखी एक झकास लेख.
मॉर्गन तुमचे क्रीडा लेख ही खरेच एक मेजवानी असते. अगदी तुमच्या *** सरांची पोरं" या लेखापासून सगळे लेख खूप आवडले आहेत
12 Aug 2011 - 11:09 am | शैलेन्द्र
***=जाधव
11 Aug 2011 - 8:05 pm | डॉ.श्रीराम दिवटे
वाचतांना धापच लागली!
सुरुवातीची फिल्लमबाजी व नंतरचा खेळ समजावून घ्यायला वेळ लागला. परंतु प्रत्येक क्रिकेटवेड्याला भावेल असे लिखाण झालेय.
11 Aug 2011 - 8:06 pm | गणेशा
मस्तच, संपुर्ण लेखच खुप सुंदर शब्दात लिहिला आहे.. आवडला..
त्यातही माझ्या आवडत्या कसोटी प्लेअर बद्दल लिहिलेले पाहुन तर आनखिनच छान वाटले.
11 Aug 2011 - 8:24 pm | ढब्बू पैसा
खूप दिवस वाट बघायला लावलीत. पण हा लेख म्हणजे आधीच्यांप्रमाणेच मेजवानी आहे. बिचार्या द्रविडला कायम उपेक्षित वागणूक मिळत आली आहे. पण त्याची किंमत परदेशात खेळताना कायम समजते. परवाच्या लॉर्डस कसोटीत तर ही गोष्ट अजुनच अधोरेखित झाली!
तुमची लिहिण्याची शैली अप्रतीम आहे. सुरवात तर एकदमच झक्कास होती!
हॅट्स ऑफ टू ब्रेनी हिरो :)
11 Aug 2011 - 8:31 pm | प्रभो
भारी रे जे पी!!!!
लई दिवसांनी मेजवानी मिळाली.. होतास कुठे?
11 Aug 2011 - 8:33 pm | गणपा
झकास रे मित्रा.
या लेखा निमित्त राहुलचा यथोचित गौरव केलायस.
11 Aug 2011 - 8:35 pm | पल्लवी
:)
11 Aug 2011 - 9:08 pm | बहुगुणी
ब्रेनी हीरोचं वर्णन अतिशय नेमकं केलंय.
या 'हिंदू'तल्या लेखाची आठवण झाली: त्यात म्हंटल्याप्रमाणे - Dravid is an academic who has accidentally turned out to be a successful cricketer. On the pitch, he operates like an Oxford professor of mathematics.
Dravid doesn't duck or weave as bombs are directed at him; he mocks at them with intelligence, each time committing to memory their destructive potential and squaring them with his own superior ability to defuse them.
Sport is mostly instinctive. But Dravid has turned batting into a game of chess. As he lets a scorcher past him or steps back to work the ball square of the wicket to the fence with balletic grace, he seems to tell the bowler: “Your move, please.”
द्रविडच्या शांतपणाचं, संयमाचं वर्णनही आवडलं. त्याची ही मुलाखत आठवली.
(जाता जाता: पंतप्रधानपदासाठी राहुल गांधींपेक्षा राहूल द्रविड म्हणे नुकताच तरूणांना आधिक भावला...)
३८ व्या वर्षीही त्याने खंबीरपणे उभं रहावं अशी अपेक्षा आपण अजूनही करू धजतो अशा एका गुणी खेळाडूचं यथार्थ, आणि खास जे पी मॉर्गन स्टाईलचं खुसखुशीत, वर्णन आवडलं!
12 Aug 2011 - 11:20 am | जे.पी.मॉर्गन
बहुगुणी,
मला हा लेख विशेष नाही आवडला. ओव्हर द टॉप वाटला. "फेअर वेदर ग्रेट्स ना शिव्या घालणं हा काही लोकांचा आवडता छंद आहे. द्रविडला "फेअर वेदर" मध्ये धावा काढायला कोणी बंदी घातली होती का? आणि ज्यांचा रोख तेंडुलकरकडे आहे त्यांनी हे लक्षात घ्यावं की १ बाद ३ हा crisis असतो तर २ बाद १७ हा त्याहूनही मोठा crisis असतो. पण सचिन तेंडुलकर आणि crisis हे आपल्यासाठी विरुद्धार्थी शब्द आहेत. म्हणून "मॅन ऑफ क्रायसिस" सचिनला कोणीच म्हणत नाही. गेल्या ३ वर्षांत भारतानी जिंकलेल्या कसोटींत द्रविडची सरासरी ४७ आहे, लक्ष्मणची ५६ आणि सच्याची ८६ ! काय तुलना करणार??
द्रविडला नेहेमीच आपण अनसंग हीरो म्हणतो. पण मला ते पटत नाही. त्याला भरपूर रेकग्निशन मिळालेलं आहे. जसं आपण म्हणतो की काजोल / राणी मुखर्जीसारख्या नायिका "दिसायला भारी नसल्या तरी काय भारी अॅक्टिंग करतात"! वस्तुतः ही त्यांना मिळालेली सिंपथी असते. त्याही इतर "ग्लॅमरस" अभिनेत्रींइतक्याच अभिनयाच्या बाबतीत मठ्ठ असतात. पण आपण द्रविडला उगाच अनसंग ठरवतो. आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे खुद्द द्रविडलाही आपल्या मर्यादा मान्य असाव्यात, पण त्याच्या पाठीराख्यांना त्या मान्य होत नाहीत.
पण As he lets a scorcher past him or steps back to work the ball square of the wicket to the fence with balletic grace, he seems to tell the bowler: “Your move, please.” हे मात्र शंभर टक्के खरं. शेवटी तो "आपला राहुल्या" आहे हो :)
जे पी
12 Aug 2011 - 7:20 pm | प्रभो
खरंय...
बाकी आमच्या एका मित्राचे चेपु स्टेट्स
When someday Rahul Dravid retires, maybe they'll name a road after him in Bangalore. Then we'll have our own "THE WALL STREET"
11 Aug 2011 - 9:28 pm | मन१
प्रत्येक लेख आवड्लाय....
11 Aug 2011 - 10:18 pm | बिपिन कार्यकर्ते
_/\_
11 Aug 2011 - 10:27 pm | प्रास
सुंदर! एक नंबर!! लाजवाब!!!
हे वर्णन जितकं द्रविडच्या खेळण्याला लावता येतं तितकंच तुमच्या या लेखालाही समर्पक ठरतं.
आता तुमचे आधीचे सर्व लेख पुन्हा वाचून काढतो.
क्रिकेटप्रेमी,
11 Aug 2011 - 10:42 pm | मृत्युन्जय
सहीच झाला आहे लेख. नेहेमीप्रमाणेच .... :)
12 Aug 2011 - 10:52 am | मुलूखावेगळी
+१
11 Aug 2011 - 11:18 pm | प्राजु
जोरदार पुनरागमन!!!! :)
चौकार, षट्कार... एकाचवेळेस!
11 Aug 2011 - 11:49 pm | रेवती
वा!!
मस्त लिहिलय.
12 Aug 2011 - 12:18 am | निमिष ध.
एकदम सुंदर लेख आहे. तुमच्या लेखाची वाटच पाहत असतो आम्ही.
अत्यंत चपखल वर्णन द्रविड चे. आणि सुरूवातीच प्रसंग तर कळस !!
12 Aug 2011 - 2:25 am | चतूराक्ष
जे. पी. मॉर्गन साहेब,
अतिशय उत्तम लेखन.
पु. ले. शु.
धन्यवाद.
12 Aug 2011 - 5:49 am | सहज
पुनरागमन जोरदार!
पण अंमळ टायमिंग गडबडल्या आहे. पुन्हा कधीतरी वाचून लुफ्त लुटू!
ज्यांनी वर्ल्ड कपला भारत जिंकू दे मग भले पुढच्या इतर मॅचेस हारु दे असा नवस बोलला होता त्यांनी हात वर करा पाहू!
(गिल्टी अॅज चार्ज्ड) सहज
12 Aug 2011 - 7:50 am | नंदन
--- अगदी, अगदी. भारतीय संघाचा 'नारायण' म्हणावा असा :)
12 Aug 2011 - 9:18 am | चतुरंग
जग नेहेमी आक्रमक खेळावर फिदा होतं. अवलियांवर जीव ओवाळून टाकतं, निसर्गदत्त सौंदर्याला भुलतं, नेत्रसुखद गोष्टींवर भाळतं. आपण सगळेच चमत्काराला नमस्कार करतो. पण राहुल द्रविड ह्या एका खेळियाने आपल्याला कष्टांमधलं सौंदर्य दाखवलं. खडतर साधनेतल्या सुखाशी आपली ओळख करून दिली. मेहनत करून मिळवता येत नाही असं जगात काहीच नाही हे आपल्या कर्तृत्त्वानी दाखवून दिलं. When the going gets tough the tough get going ह्या उक्तीला अनुसरून प्रतिकूल परिस्थितीशी डोकं थंड ठेऊन दोन हात कसे करावेत हे शिकवलं. नि:स्वार्थीपणानी संघासाठी - सहकार्यांसाठी कसं झटावं, कठिण परिस्थितीत खांद्यावर जबाबदारी घेऊन ती कशी निभवावी ह्याचा आदर्श घालून दिला. विजय मिळवण्यासाठी प्रतिस्पर्ध्याचे प्रहार झेलायची तयारी हवीच हे आमच्या मनावर बिंबवलं. आपला वार करण्यासाठी योग्य क्षणाची वाट कशी बघावी हे सांगितलं. तुमच्या मनात, कष्टांत आणि कामात "सच्चाई" असेल तर यशाचं शिखर गाठणंही अशक्य नाही हे दाखवून दिलं.
राहुलच्या संपूर्ण कारकीर्दीचं सार म्हणावा असा परिच्छेद! शीर्षकही अत्यंत चपखल.
जेपी, लेख केवळ अशक्य झालेला आहे. हॅट्स ऑफ!! __/\__
-रंगा
12 Aug 2011 - 10:58 am | अमोल केळकर
पण दिवाळीत जसा आंघोळीला उटण्याबरोबर "मोती" साबण लागतो तसा श्वेतवस्त्रांतल्या क्रिकेटमध्ये राहुल द्रविडला पर्याय नाही. - क्या बात है !!!
अमोल केळकर
12 Aug 2011 - 11:02 am | नि३सोलपुरकर
सायबानु..
अतिशय उत्तम लेखन, शीर्षकाप्रमाणे वन ब्रिक अॅट अ टाईम ! ग्रेट.
// पण दिवाळीत जसा आंघोळीला उटण्याबरोबर "मोती" साबण लागतो तसा श्वेतवस्त्रांतल्या क्रिकेटमध्ये राहुल द्रविडला पर्याय नाही//
//ह्या माणसाकडे इतका संयम आहे की संयम हा जर बँकेत ठेवता आला असता तर हा राडिया, पवार, राजा, कलमाडी ह्यांच्या एकत्रित संपत्तीपेक्षा श्रीमंत असता //
हे बाकी १००% खरे
(बाकी जमल्यास एकदा "आल्प्स " वर ले़ख होउद्या ... ही आपली विनती)
पु. ले. शु.
धन्यवाद.
12 Aug 2011 - 11:16 am | स्पा
अप्रतिम लेख
माझा आवडता खेळाडू ...
याच्या कष्टाचं खरच कौतुक वाटत .
कुठलीही दैवी देणगी नसताना केवळ अथक कष्टाने मिळवलेले हे स्थान खरच कौतुक करण्याजोगे आहे
जॅमी बॉय ची एक आगळी अदा :)
12 Aug 2011 - 11:24 am | जे.पी.मॉर्गन
आयला ह्या फोटूत पण डोळे बारीक करून कावल्यासारखा बघतोय बघा ! फक्त स्टुडियोत असल्यामुळे घामेजलेला नाहिये ! ;)
जे पी
12 Aug 2011 - 11:26 am | स्पा
जॅम खाऊन दात पण किडलेत :D
12 Aug 2011 - 11:22 am | किसन शिंदे
जबरदस्त लेखन!!!
प्रत्येक वेळेस जिम्मीला साईड हिरोचाच रोल करावा लागला हे बाकि १००% खरेच.
12 Aug 2011 - 11:36 am | ब्रिजेश दे.
१ दम खतरनाक..... लेख ही आणि राहुल द्रविड ही
दोघांना सलाम....
12 Aug 2011 - 11:51 am | मिहिर
मस्तच लेख एकदम! तुमच्या मागील एका लेखात द्रविडबद्दल एवढेसे वाचून मुळीच समाधान झाले नव्हते. आता समाधान वाटले.
12 Aug 2011 - 3:26 pm | इरसाल
मिळालेल्या विकेटचा उन्माद विसरून बोलर पुढे कराव्या लागणार्या कष्टांचा विचार करत परत आपल्या मार्ककडे जात असतो.... कॅमेरा झूम इन होतो आणि कपाळावर अंमळ खाली आलेल्या हेल्मेटमधून आम्हाला आतला चेहरा दिसतो....... अत्यंत तंत्रशुद्ध असा "स्टान्स" घेतला जातो..... त्या चेहर्यावरचे त्रासिक भाव बदलतात आणि तो आत्मविश्वासाचा आणि कणखरपणाचा चेहरा बनतो. आम्ही इथे निर्धास्त होतो...... आता काही काळजी नाही....कारण आम्हाला ठाऊक असतं की आता विकेटवर आपल्यासाठी एक फलंदाज नाही तर जगातली कितीही भयप्रद गोलंदाजी नामोहरम करणारी एक भिंत उभी आहे.... कारण त्या चेहर्याचं नाव असतं "राहुल - द वॉल - द्रविड"
******************************************************************************************************************************
हेच ते हेच ते..
छान ...........
12 Aug 2011 - 4:37 pm | विकाल
ज ब र द स्त..............!!!!
दिव्यत्त्वाची जेथ प्रचिती....... तेथ कर माझे जुळती....!
12 Aug 2011 - 4:54 pm | परिकथेतील राजकुमार
मोर्गन इज बॅक विथ द बँग :)
अतिशय सुंदर ओळख करुन दिली आहेत मालक. द्रविडच्या कारकिर्दी विषयी आणि अंडरप्ले विषयी बोलले खूप जाते पण लिखाण मुश्किलीने होते. ते आज केल्याबद्दल तुमचे आभार.
कसा विसरणार हो तो रंगपंचमीचा दिवस ? कळायला लागल्यापासून पहिल्यांदा संध्याकाळी ५.३८ नंतर (दिवसाचा खेळ संपल्यानंतर) आम्ही रंगपंचमी खेळायला गेलो होतो.
अवांतर :- चॅपल ह्यांच्या कारकिर्दीत अथवा त्यांच्या संगतीत त्यानी केलेल्या काही चूका (उदा :- तो, गांगुली व सचीन २०/२० खेळणार नसल्याचे स्वतः डिक्लिअर करणे, अगरकरला डिच्चू, इरफानच्या कारकिर्दीशी खेळ इ.) मात्र मनाला वेदना देऊन गेल्या. अर्थात त्याच्या सारख्या शांत आणि उलटून न बोलणार्या माणसाला चॅपलने फशी पाडले असल्यास नवल ते काय!
12 Aug 2011 - 5:12 pm | स्वाती दिनेश
राहुल द्रविड - अतिशय सुसंस्कृत व्यक्तिमत्व! त्याच्यावरचा हा लेख फार आवडला.
स्वाती
12 Aug 2011 - 5:34 pm | ५० फक्त
जबरदस्त पुनरागमन, अतिशय आवडला लेख.
सगळ्यात जास्त आवडले ते राहुलच्याच स्टाईलमध्ये हळुवारपणे माननियांना, हो सध्या मान खाली घालायला लावत असले तरी पण माननीय म्हणावे लागते हे काय दुर्दॅवच, तर त्या माननियांना मारलेले फटके. तुमच्या सारख्या लोकांनी हे शालजोडीतेले मारलेत पण आमच्यासारख्या सामान्यांनी तोंडावर फटके मारणे सुरु करण्याअगोदर माननियांनी सुधारावे ही नम्र अपेक्षा अजुन काय. या बद्दल मध्यंतरी फेसबुकवर एक मस्त अपडेट होती, रात्री भाषांतर करुन टाकतो इथे.
12 Aug 2011 - 5:59 pm | baba
क ड क!!