मध्ये एकदा प्रवासात बर्याच दिवसांनी "वाट बघेन पण एसटीनेच जाइन" ही पाटी बघितली आणि तोंडभर हसू तरळले. त्यात अभिमान होता, 'एस टी ने प्रवास? हे काहितरी काय !' ही कुचेष्टा होती की नॉस्टेल्जिया होता हे माझे मलाच झेपले नाही. कदाचित सगळेच थोडे थोडे असेल. पण एस टी म्हटल्याबरोबर बर्याच आठवणी ग्रामोफोनवर झरझर फिरणार्या तबकडीसारख्या सुळकन डोळ्यासमोरुन तरळुन गेल्या.
लहानपणी एस टी म्हटल्यावर फक्त लाल डबा समोर उभा रहायचा. इतर कुठलीही बस म्हणजे एशियाड असायची. त्या काळात पुण्यासारख्या मोठ्या शहरात रहायचो नाही त्यामुळे पी एम टी नामक बागुलबुवा बद्दल माहिती नव्हती झालेली. त्याकाळी कुठुनही कुठेही जायचे सर्वात सुलभ साधन म्हणजे लाल डबा. रेल्वे होती पण आपल्या इच्छित स्थळी ती जाइलच याची काही शक्यता नसायची. किंबहुन बर्याच शहरात तर ती पोचायचीच नाही. शिवाय रेल्वेच्या वेळा हा एक संशोधनाचा विषय होता. रेल्वेच्या वेळा म्हणजे "निर्धारीत समय". आपल्याला जिथे जायचे असेल तिथली रेल्वे नेमकी पहाटे दीड दोन वाजता सुटणारी असायची. रात्री अपरात्री स्टेशन वर कोण जाणार? अर्थात ही गाडी कधीच निर्धारीत समय पर निघायची नाही ही गोष्ट वेगळी. पहाटे दीड वाजता आहे म्हटल्यावर महिन्यातले २० दिवस ती सकाळचा चहा घेउनदेखील पकडता यायची.
विमान म्हणजे केवळ चित्रपटात किंवा आकाशातुन जाताना अंगणात किंवा गच्चीत पळत पळत जाउन बघायची गोष्ट होती. आकाशात मोठा लांबसर पांढरा पट्टा दिसला की रॉकेट गेले असे चेहेर्यावर गंभीर भाव आणुन सांगायची पद्धत आम्हा मित्रमंडळींमध्ये होती. विमान आणि रॉकेट यात नक्की फरक मात्र कळायचा नाही. एकुणात विमानप्रवासाबद्दलचे ज्ञान अगाध होते. पहिल्या विमान प्रवासाच्यावेळेस मी ९-१० वर्षांचा असेन. बटन दाबल्यावर एक बाई येते (तिला एयर होस्टेल्स असे म्हणतात असे मी मोठ्या मुश्किलीने पाठ केले होते) आणि आपल्याला पाहिजे असेल ती गोष्ट आणुन देते असे मला सांगण्यात आले होते. त्याकाळी मला फुटाणे प्रचंड आवडायचे. विमानात बसल्यावर एयर होस्टेल्स ला फुटाणेच मागायचे हे मी ठरवुन सुद्धा टाकले होते. पण बसल्या बसल्या चहुबाजुने कानांबर इंग्रजीचा मारा झाला. एयर होस्टेल नामक बाई येउन "येस डीयर व्हॉट डु यु वॉण्ट?" असे विचारुन गेली तेव्हा "आय वॉण्ट फुटाणे" असे म्हणण्यासाठी माझी जीभ रेटली नाही. फुटाण्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात मला माहिती नव्हते. मी आपला ट्रे मध्ये असलेली मूठभर चोकलेटं घेउन शांत बसलो. त्या बाईने माझा हलकाच गालगुच्चा घेउन अजुन ४ - ५ चोकलेटं हातात कोंबली. (त्यानंतर हे असले काही अजुन नशिबात नाही आलेले. मोठेपणी विमानात बसल्यावर मी बरेच दिवस पाणी मागताना गाल हलकेच थोडासा पुढे सरकवायचो. पण काही उपयोग नाही झाला. आजकाल ती रिस्क घेत नाही चुकुन माझ्या मनातले विचार कळल्यास त्या बाया माझा पुढे आलेला गाल रंगवायच्या (लिपस्टिकने नाही) असा विचार माझ्या मनात तरळुन जातो). त्यावेळी फुटाणे मागायचे राहुन गेले ते अजुनही राहुनचे गेले आहेत. आजही फुटाण्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात ते मला माहिती नाही. आणि असेही मी जिथे कुठे रहायचो तिथे त्या काळी विमानतळ नव्हता. त्यामुळे बहुतेक वेळेस बसने प्रवास करावा लागायचा.
एशियाडचा थाटमाट नेहेमीच नशिबी असायचा असे नाही. कारण एशियाडही थोड्या दुर्मिळच होत्या. २*२ व्हिडीयोकोच गाड्या तर फारच कमी. पण या गाडीचा थाट मात्र सुखवुन जायचा. मस्त सीट मागे घ्यायची, गुबगुबीत खुर्चीवर रेलुन व्हिडीयोवर पिक्चर बघायचा हे सुख मोठे होते. त्याकाळी व्हिडीयोवर हमखास फरिश्ते, डिस्को डान्सर, दिवाना मुझसा नाही,. आशिक अफसाना, अंधा कानून, रखवाला असले पिक्चर लागायचे. मिथुन चा चित्रपट म्हणजे चंगळ. त्याकाळी अमिताभ ओळखु यायचा नाही पण मिथुन ओळखु यायचा. मोठा आणि रात्रीचा प्रवास असेल तर हमखास रात्री उशिरापर्यंत पिक्चर दाखवायचे. एरवी तशी माझी चुळबुळ बसमध्ये बसल्याबसल्या सुरु व्हायची. कंडक्टरला गाडी सुरु होण्याआधीच पिक्चर कधी सुरु होणार म्हणुन विचारले जायचे. गाडी संध्याकाळी ५-६ ची असेल तर सुरुवातीला हमखास एखादा राजेंद्रकुमार, मनोजकुमारचा पिक्चर लागायचा आणि मग ९ वाजता सुरु व्हायचा द ग्रेट मिथुनदाचा हाणामारीचा एखादा चित्रपट. तो रात्री १२२ पर्यंता डोळे फाड फाडुन बघायचा. कार्टं पिक्चर बघत शांत बसलय तर बघु देत पिक्चर, असाही फुकटच आहे. नंतर पिक्चर दाखव म्हणुन मागे लागणार नाही असा सुज्ञ विचार करुन आईदेखील उदारपणे पिक्चर बघु द्यायची. दुसर्या दिवशी उठल्यावर आदल्या दिवशीच्या चित्रपटाचा शीण जाणवायचा नाही.
पण ही सगळी चंगळ खाजगी गाडीवाल्यांकडे. एसटी मध्ये एशियाड हीच सुखाची परमावधी असायची. २*२ सीट्स आणि नो स्टँडिंग हेच त्यातले सुख. त्यामुळे रिझर्वेशनच्या सीटवर नक्की बसायला मिळणार ही खात्री. एरवी लाल डब्यामध्ये छत्री, रुमाल, टोवेल, टोपी, बॅग, प्लास्टिकची पिशवी, तंबाखुची पुडी असे काहीही टाकुन जागा पकडता यायची, बहुतेक वेळेस लोक खिडकीतुन आधी असली काहीतरी वस्तु आत टाकायचे आणि मग बशीत शिरायचे. नशिबाने मी जागेवर नजर आधी टाकली होती म्हणुन मीच आधी बसणार असा युक्तिवाद कधी कोणी केल्याचे बघायला लागले नाही. पण या जागापकडुंची आणि रिझर्वेशन बहाद्दरांची बर्याचदा जुंपायची. ५० पैशात काय सीट खरेदी केली काय हो तुम्ही हा पहिला रोकडा सवाल. त्याला "आम्ही किमान रिझर्वेशन तरी केलय. तुम्ही काय काही न करताच जागा विकत घेतलीय होय?" हे चिख प्रत्युत्तर. ही लढाई कंडक्टर येइपर्यंत चालु रहायची. मग कंडक्टर येउन रिझर्वेशन वाल्यांना बसवुन घायचा आणि रुमाल मालकाला बहुतेकवेळा उदारपणे स्वतःची सीट द्यायचा. अर्थात त्याच्याकडे एकच सीट असायची आणि हे रुमाल मालक बरेच असायचे त्यामुळे इतर लोक चरफडत उभे रहायचे. साधारण अर्ध्या तासाने माझ्या सीटवर पहिली गदा यायची. लहान मूल म्हटल्यावर एखाद्या काकू येउन साहजिकच थोडं सरकुन घे रे बाळा असे म्हणुन माझ्या सीटवर हक्क जमवायच्या. थोड्याच वेळात मी आईच्या मांडीवर असायचो आणि शेजारच्या काकुंच्या मांडीवर माझ्याच वयाचे अजुन एखादे बाळ असायचे. तासाभरात ही बाल हटाव मोह्हीम संपुर्ण एस्टीत विनासायास पार पडायची.
हाल एवढ्यावर थांबले तर नशीब खुप महान म्हणायचे पण तसे फार कधे व्हायचे नाही. कारण गाडीतली ४-५ माणसे तरी २ एक तासात ओकायला लागायची. बर्याचवेळेस तुमच्या आजुबाजुचा एकतरी माणूस या मांदियाळीत हटकुन असणारच. मग सामुहिक ओकाओकी स्पर्धा सुरु व्हायची. त्यातल्या त्यात सुज्ञ लोकांकडे प्लास्टिकच्या पिशव्या, ओव्हामि,, लवंगा, वेलदोडा इत्यादी तयार असायचे. दर अर्ध्या तासाने मागच्या माणसाला खिडकी लावुन घ्यायला सांगुन निर्माल्य रस्त्यावर फेकले जायचे. पण माणूसच शेवटी कधीतरी राहवले नाही की ............ मग अश्यावेळेस संपुर्ण गाडीत जी दुर्गंधी सुटायची त्याला तोड नाही. ही अशी माणसे न खाता प्रवास का करत नाहीत हे मला कधीही न उलगडलेले कोडे.
लाल डब्यातला अजुन एक प्रॉब्लेम म्हणजे गळके पत्रे. पावसाळ्यात या पत्र्यांमधुन मिनिसिपाल्टीच्या नळापेक्षा जास्त वेगाने पाणी आत यायचे. मग अश्या सीटवर रुमाल ठेवुन पाणी तिथे च अडवायला लागायचे. त्या सीटवर कोणी बसु शकायचे नाही हे वेगळे सांगायला नकोच. अजुन एक सीट अशीच नकोशी असायची ती म्हणजे चाकावरची सीट. तिथे इतके धक्के बसायचे की स्टेट हायवे किंवा खेडेगावातले रस्ते + एसटी चे सस्पेंशन्स + चाकावरची सीट या कोम्बिनेशन मुळे एखादी पोटुशी बाई गाडीतच प्रसवायची. अतिशयोक्ती आहे थोडीशी हे मान्य आहे. पण थोडीशीच अतिशयोक्ती आहे हेदेखील कोणीही मान्य करेल.
एसटीचा कंडक्टर हा तर महान माणूस असायचा. तो ड्रायवरशी भांडायचा, प्रवाशांशी भांडायचा, गाडीचा कुठे एक्सिडेंट झालाच तर समोरच्या गाडीच्या ड्रायव्हर कंडक्टरशीही भांडायचा. ओके, थुंके, फुंके आणि फुकटे यांच्याशी त्याचे वाकडे असणे समजु शकायचे (यातल्या थुंक्यांशी तो फारसा भांडायचा नाही कारण बर्याचदा तो स्वत:च तेच करत असायचा). पण सुट्टे पैसे मागणार्यांशीही तो भांडायचा. सुट्टे पैसे नसतील तर उतरा खाली असे खेकसुन सांगण्याची पद्धत तेव्हा पुण्याच्या कंडक्टरांमध्येही नव्हती म्हणे. त्यामुळे सुट्टे पैसे नंतर देण्याचा वायदा व्हायचा. बहुतेकवेळेस तो पुर्ण देखील व्हायचा. कंडक्टर तसे खुपच प्रामाणिक असायचे. पण चुकुन एखाद्याने कंडक्टरने आपण्हुन पैसे देण्याच्या आधी मागणी केलीच तर मात्र कंडक्टरला तो वैयक्तिक अपमान वाटायचा आणि मग नंतर २-५ मिनिटे सर्व प्रवाशांची छान करमणूक व्हायची.
कधीकधी एसटीचे लोक धमालही उडवुन द्यायचे. एकदा कोल्हापुर सटाणा गाडीची वाट बघतो स्टेशनात उभा होतो. पावसाची वेळ होती त्यामुळे बॅगाबिगा सांभाळत हातात छत्री नाचवत फलाटावर थांबलो होतो. बराच वेळ एस्टीची वाट बघितली पण गाडी काही आली नाही त्यामुळे चौकशी कक्षावर जाउन चौकशी करायला गेल्यावर पंधरा मिनिटांतर एसटीचा कर्मचारीही उगवला. सटाणा गाडी कुठे आहे असे विचारल्यावर मात्र त्याने खुपच चमत्कारिक रीत्या पाहिले. सटाणा गाडी पाउण तासाभरापुर्वीच ** नंबरच्या फलाटावरुन सुटल्यटची गोड बातमी त्याने दिली. त्यावर आम्हे शक्य तेवढा शांत आवाज ठेवत "अहो पण ती गाडी तर *** नंबरच्या फलाटावरनं निघणार होती ना?. तो तर पार दुसर्या बाजुला आहे. वरती तशी पाटी पण लावली आहे". त्यावर "काय राव सुशिक्षित लोकं तुम्ही कालपासुनच फलट चेंज झालाय काल तशी अनौंन्समेट पण केली होती." असे आम्हाला सांगण्यात आले. आता अनौंन्समेट जर काल झाली तर आम्हाला आज कशी ऐकु येणार याचे उत्तर मागण्याची मात्र आमची हिंमत झाली नाही.
असाच एक जबरदस्त किस्सा महडच्या एसटी स्टॅंडवर घडला. आम्ही दिवे आगरवरुन ६ सीटर वडापमध्ये १३ जण बसुन पहाटे पहाटे ८.५९ ला महडपर्यंत पोचलो होतो. ९ ची महड रायगड एसटी पकडण्यासाठी आम्ही बरीच तणतण केली. अखेर केवळ एक मिनिट आधी पोचलो. आजुबाजुच्या लोकांकडे चौकशी करता अजुन गाडी आलेली नाही हे ही कळले. गाडी वेळेआधी येणे हे तसे अपेक्षितही नव्हते. पण अर्धा तासा वाट बघुनही बस धक्क्याला लागेना तेव्हा आम्ही चौकशी कक्षावर विचारणा केली. तेव्हा त्या माणसाच्या चेहेर्यावर प्रचंड बावळट भाव दिसले. दोने मिनिटे विचार करुन अखेर तो उत्तरल " महड - रायगड? अरेच्चा विसरलो वाटते." विसरलो? गाडी आहे हेच विसरलो ? बरं बाबा तु विसरलास. द्रायव्हर कंडक्टर कुठे झोपलेत? शेवटी खिडकीवरच्या बाबाने ४-२ मिनिटे बाजूच्या माणसाशी खलबते केली आणि तो निवांतपणे उत्तरला. "आत्तातरी गाडी उपलब्ध नाही. आपण असे करुयात १०.३० ला एक गाडी येइल ती देउ की तुम्हाला." माझा चेहेरा तोवरच्या आयुष्यात एवढा ब्लँक कधीच झाला नव्हता. एकतर गाडी विसरतेच कशी? बरं विसरली तर विसरली गाडी उपलब्ध नाही म्हणजे काय? आणि उपलब्ध नाही तर नाही १०.३० ची गाडी येइल ती आम्हाला देउ म्हणजे काय? म्हणजे १०.३० च्या गाडीची वाट बघणारे लोक अजुन कुठल्यातरी बशीची वाट बघत बसणार असेच ना?
पण एवढे करुन माणसे एसटीने जायची कारण तो दळणवळणाचा सर्वात भरवश्याचा पर्याय होता. एसटी रस्त्यातच बंद पडली (जे बर्याचदा व्हायचे) तर लगेच पुढच्या एसटीत सोय व्हायची. एसटीच्या वेळा सोयीच्या होत्या. तिकिटांचे दर सर्व सामान्यांनाच काय गोरगरिबांनादेखील परवडणारे होते. आताशा एस्टीने काही मार्गांबरचे दर प्रचंडच वाढवले आहेत. पुणे - मुंबई शिवनेरीला तर ३२० रुपये पडतात. खाजगी ट्रॅव्हल कंपन्याचे तिकिट दर त्यापेक्षा कमी आहेत. तरीदेखील शिवनेरी बरी पडते. कारण मुळात ती वेळेत सुटते. सीटा भरल्याशिवाय जागेवरुन न हलणार्या खाजगी बसेस पेक्षा ती बरी पडते. शिवाय इतर खाजगी गाड्यांसारखी ती मुंबईदर्शन घडवत नाही. दादर वरुन नाकासमोरचा रस्ता धरुन चालत राहते. हॉटेल वाल्याचा धंदा व्हावा म्हणुन ४० मिनिटाचा स्टॉप घेत नाही. एकुणात आजही "वाट पाहीन पण एसटीने जाइन" हे काही चुकीचे नाही.
प्रतिक्रिया
19 Jul 2011 - 12:46 pm | गवि
रत्नागिरीतच बालपण गेल्याने आणि त्याकाळी केवळ आणि केवळ एस्टीच असल्याने हमेषा त्यानेच प्रवास घडला.
खूप आठवणी जाग्या केल्यास. पाने भरभरुन प्रतिसाद द्यावासा वाटतोय. आत्ता ते शक्य नाही.
पण खूप आवडले हे मात्र आवर्जून सांगतो.
विमान आणि रॉकेटची ती गंमत फार फार आठवली. खरंच रे. हवेत फराटा दिसला की रॉकेट..
"सिरस" टाईपच्या सर्वोच्च पातळीच्या ढगांच्या मधून विमान गेलं तर ती बर्फाळ कणांची पट्टी बनत जाते. हे नंतर शिकलो तेव्हा खट्टू झालो. लहानपणी ते आपलं स्पेशल "रॉकेट" असायचं ते तसं नसायचं ते नेहमीचंच विमान असायचं हे कळून. :)
19 Jul 2011 - 12:50 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
मस्त लेखन. काही वर्षांपूर्वी कामानिमित्त २-३ महीने एश्टी हाच पर्याय असलेल्या ठिकाणी प्रवास करावा लागला होता.
तु लिहीलयस तसेच काहीसे अनुभव आले होते.
तुझ लिखाण पण मस्त ओघवत झाले आहे.
19 Jul 2011 - 12:53 pm | रणजित चितळे
छान लिहीले आहे.
19 Jul 2011 - 12:57 pm | स्पा
सुरेख लिहिलं आहेस रे...
विमानाचा किस्सा बेष्ट...
(पण आपल्याला काय ब्वा लाल डबा झेपत नाही..., लहानपणापासून लोकल ची लटकंती नशिबात असल्याने असेल कदाचित )
19 Jul 2011 - 1:06 pm | प्रचेतस
मस्तच लिहिले आहेस रे.
सह्याद्रीच्या दर्याखोर्यातील दुर्गम भागांमध्ये जिथे बाकी कुठलीच गाडी जाउ शकत नाही तिथे एसटीच्या लाल डब्याने भटकल्याच्या आठवणी जाग्या केल्यास.
19 Jul 2011 - 1:16 pm | किसन शिंदे
मस्त लेखन!
अजुनही पुण्यातल्या गावी जाण्यासाठी ठाण्यातल्या यस्टी स्टँड वर सकाळी सकाळी ६:१५? च्या लाल डब्याची वाट पाहत असतो.
19 Jul 2011 - 1:21 pm | गवि
अरे मृत्युंजया..हीच लालडबा बस घेऊन "प्रासंगिक करार" चा बोर्ड लावून शाळेच्या सहा सहा दिवसांच्या ट्रिप्स्..रत्नागिरी ते अगदी अजिंठा वेरुळ.. कोल्हापूर, ज्योतिबा.. पुणे महाबळेश्वर.. अशा निघायच्या. सर्वात आनंददायक आठवणींमधे या ट्रिप्स आहेत.
सुदैवाने माझी शाळा अशा लांबलांबच्या ट्रिप्स अरेंज करणार्यांपैकी होती. अन्यथा कुठे रिस्क घ्यायची आणि इतके (अभ्यासाचे?!) दिवस कशाला वाया घालवायचे असा विचार करणार्या शाळा जास्त असतात.
19 Jul 2011 - 9:53 pm | संदीप चित्रे
ह्या प्रतिसादाशी पूर्णपणे सहमत :)
19 Jul 2011 - 1:22 pm | स्वाती दिनेश
लाल डब्याच्या खूप आठवणींना जागं करुन खूप मागे नेलेस...
स्वाती
19 Jul 2011 - 1:37 pm | प्यारे१
मस्त लिहिलंयस रे.....!!!
19 Jul 2011 - 1:37 pm | मेघवेडा
मस्त ओघवतं लिखाण.. मजा आली!
19 Jul 2011 - 1:41 pm | अमोल केळकर
"वाट बघेन पण एसटीनेच जाइन" -- हे अजुनही पटते विशेषतः पुण्याहून रविवारी संध्याकाळी मुंबईली येताना त्या निता , मेट्रो मधून पुणे दर्शन होण्यापेक्षा एस्टी केंवाही चांगली
अमोल केळकर
19 Jul 2011 - 1:42 pm | पाषाणभेद
छान आठवण आहे. कर्नाटक, मध्यप्रदेश, गुजरात अशा राज्यातही सीमेवरच्या शहरांत आपली लापपिवळी एस्टी दिसली की हायसे वाटते अन त्यातच आपण बसतो.
19 Jul 2011 - 1:50 pm | बिपिन कार्यकर्ते
वा!
19 Jul 2011 - 1:55 pm | विशाखा राऊत
लाल डब्ब्याच्या खुपच आठवणी आहेत :)
19 Jul 2011 - 2:21 pm | गणेशा
अतिशय मस्त लेखन आवडले..
पुण्या-मुंबईचा दर आठवड्यालाच प्रवास असतो, लाल डब्ब्यात आता कधीच चढत नाही, ५ तास तरी लावतात ते.
पण निमाआराम (एसीयाड) बस माझ्या आवडीची. पाउस/थंडीत बाहेरील वातावरण सुखावुन जाते.
शिवनेरीने अगदी कालच प्रवास केला फुकट दोघांचे ६०० रुपये घालवले. याच्या अगदी निम्या पैस्यात निमाअराम आहे.
आणि खरेच एसटी इतर वाहनांपेक्षा अजुनही योग्यच आहे.
म्हणुन मी ही वाट पाहिन पण एस.टी. नेच जाइन ( बर्याचदा) हेच सुत्र वापरतो.
गावाकडे गेल्यावर.. बारामतीच्या जवळच्या गावात मात्र माझी बाईक नसल्याने लाल डब्बाच घ्यावा लागतो..
त्यातही अजुन तीच गावाकडील पण कॉलेजला तालुक्यात आलेली नव युवकांची. आणि त्यांची जागा घेणार्या त्यांच्याच कॉलेजातल्या मुलींची गर्दी दिसते.. छान वाटते.. आणि मनोरंजन पन होतेच म्हणा.
एखादे छोटेसे गाठोडे घेवुन त्यालाच कुरवाळणार्या म्हतार्या दिसतात.. अआणि बरेच ...
19 Jul 2011 - 2:49 pm | स्मिता.
मस्त लिहिलंय, पण माझ्या एसटी च्या आठवणी फार काही चांगल्या नाहित. माझी गणना ओकेंच्या मांदियाळीत होत असल्याने मी शक्यतो एसटीचा प्रवास टाळायचे. लहानपणी खाजगी गाडी असे प्रकार नसल्याने मी प्रवासच करायचे नाही.
एखादे वेळी नाईलाजे करावच लागला तर न जेवता व उलटी न होण्याची गोळी घेऊन, हाताशी २-३ पिशव्या, लवंग-आवळकंठी, इ. जय्यत तयारीनिशी जावे लागे.
19 Jul 2011 - 2:58 pm | परिकथेतील राजकुमार
सुंदर लिखाण, आवडले एकदम.
अगदी समोर बसुन गप्पा मारत आहेस, आठवणी खुलवून सांगत आहेस असा रंगून गेलो होतो.
ह्या आठवणींच्या निमित्ताने मिपाचे पठ्ठे बापुराव श्री. पाषाणभेद ह्यांचे एसटी पुराण आठवले.
19 Jul 2011 - 3:53 pm | मृत्युन्जय
जरा घाबरत घाबरतच लिंक उघडली. लेख जसाच्या तसा उचलला आहे असे ऐकावे लागते का ही भिती पण होतीच. पण हुश्श झालो. विषय तोच असला तरी आशय वेगळा आहे :)
19 Jul 2011 - 4:21 pm | नन्दादीप
लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या....
>>तिथे इतके धक्के बसायचे की स्टेट हायवे किंवा खेडेगावातले रस्ते + एसटी चे सस्पेंशन्स + चाकावरची सीट या कोम्बिनेशन मुळे एखादी पोटुशी बाई गाडीतच प्रसवायची>>... हे लय भारी...!!!
19 Jul 2011 - 4:21 pm | ५० फक्त
मस्त लिखाण रे एकदम. सोलापुर - ऑरंगाबाद हा दरसालचा उन्हाळी सुट्टीचा प्रवास आठवला.
19 Jul 2011 - 4:41 pm | प्रमोद्_पुणे
मस्त लिहिलय रे.. महड गाडीचा किस्सा आठवला तरी हसू येते. :) :) रायगडवरून येताना सुद्धा कुठे मिळाला होता लाल डब्बा? मग परत वडापने आलो होतो आपण.. त्या वडापमधे तर तू किती चिडला होतास :):):)
19 Jul 2011 - 4:53 pm | जाई.
छान लेखन
शाळेच्या सहलीची आठवण झाली
लांबच्या सहलीच्या वेळेला शाळेकडून एसटीचीच बस वापरली जायची
19 Jul 2011 - 6:38 pm | रेवती
लेखन आवडले.
लाल डबा म्हणताच आता ओकाओकी आठवते पण लहान असताना आठवायच्या त्या आडनावाच्या पाट्या, उदा. अमूक पाटील- स्वस्तीक- तमूक देशमुख वगैरे.;)
एसटी दोन दिवस भाड्याने घेऊन लग्नाचे वर्हाड जायचे. त्या बसला सजवलेले असायचे.
नेहमीच्या स्टँडावर न थांबता चहापाण्यासाठी कुठेतरी थांबल्यावर सगळे नटलेले बायका पुरुष त्यातून उतरत असताना आजूबाजूचे लोक पहात रहायचे ते आठवले. अगदी आडगावात अधेमधेही बस थांबवून लोक आत घेतले जायचे.
19 Jul 2011 - 7:07 pm | मराठे
लहानपणी एश्टीने खूप प्रवास केला आहे. जागा पकडण्यासाठी दरवाजे खिडकीतूनच काय तर मागच्या संकटकाळातूनही आत शिरणारे लोक मला आत्ता या क्षणीही आठवताहेत.
19 Jul 2011 - 8:57 pm | विलासराव
>>>>>>लहानपणी एश्टीने खूप प्रवास केला आहे. जागा पकडण्यासाठी दरवाजे खिडकीतूनच काय तर मागच्या संकटकाळातूनही आत शिरणारे लोक मला आत्ता या क्षणीही आठवताहेत.
ते पेटंट माझ्याकडे आहे.
अजुनही लाल डब्यातुनच प्रवास करतो.
19 Jul 2011 - 7:34 pm | प्रभो
भारी!!! लेख आवडला..
माझे बाबा एस टी मधे कामाला असल्याने वर्षात २ महिने पास मिळायचा. त्यामुळे सुट्यांमधे एस टीनेच प्रवास असायचा... आपल्याला अजूनही लाल डब्यातून प्रवास करायला आवडतो बॉ... :)
*साध्या एस टी ला 'लाल डबा' म्हटलं की माझे बाबा रागवायचे. म्हणायचे, लाल डबा म्हणू नको बे, माय आहे ती माझी. लाल डब्यावरच घर चालतंय आपलं. :)
19 Jul 2011 - 8:09 pm | पैसा
रत्नागिरीकर असल्यामुळे मी लहान असताना या एस्टीने इतका प्रवास केलाय की आता एस्टी पाहताच पळून जावंसं वाटतं. त्याचं कारण म्हणजे या एस्ट्याना काहीतरी स्पीड कंट्रोल वगैरे असावा बहुतेक. शिवाय त्या वरून दाणकन पडणार्या खिडक्यातून आजपर्यंत कोणाला कधी वारा लागला असेलसं वाटत नाही. अगदी आजही रत्नागिरी ते लांजा हे ३५ किमी अंतर जायला एस्टीला किमान दीड तास लागतो.
घाटातून वळणं घेत एस्टी चालायला लागली की ती वळणं काही लोकांना तरी लागत असत. आजकाल पूर्वीइतक्या प्रमाणात ओकाबोक पहायला लागत नाही. पण तेव्हा प्लॅस्टिक पिशव्या कंडक्टरकडे उपलब्ध असल्याची एक अफवा काही गाड्यांमधे लिहिलेली असायची.
रत्नागिरी-मुंबई एस्टीमधे लोकांच्या घरचे आंबे-फणस, हिरकुटांच्या केरसुण्या, पंखे कशालाही जागा असायची. आणि नवीन लग्न होऊन पहिल्यांदाच मुंबैला निघालेल्या एखाद्या नव्या नवरीला सोडायला घरचे १५ एक जण बसस्टॉपवर यायचे हे हटकून दिसणारं एक दृश्य अनेकदा पाहिलंय.
पण गाव तिथे एस्टी या घोषणेमुळे गावागावातून जाणार्या एस्टीने लोकाना जवळ आणले हे खरंच!