परवाच कुठेतरी नभोवाणीवर कुणी गात असलेली बिलावलमधली 'कवन बटरिया गईलो..' ही बंदिश कानावर पडली आणि माझं मन एकदम काही वर्ष मागे गेलं. वर्ष आता आठवत नाही परंतु सवाई गंधर्व महोत्सवातील आठवण आहे ही..अण्णांनी खास करीमखासाहेबांची 'प्यारा नजर नही..' ही बंदिश आणि त्यालाच जोडून 'कवन बटरिया..' फार सुरेख गायली होती त्याची आठवण झाली.
पं अच्युतराव अभ्यंकर यांनी माझ्या कानावर केलेले किराणा गायकीचे संस्कार आणि वारंवार समजावून दिलेले करीमखासाहेब आणि पुढे जाऊन त्याच गायकीतील भक्कम वीण समाजावून देणारे आमचे दस्तुरबुवा आणि अण्णा. दस्तुरबुवांचं अत्यंत सुरेल किराण्याचं गाणं. कधी त्यांचा स्वराचा एकेक मोती उलगडून दाखवणारा यमन, तर कधी खासाहेबी गोपाला मेरी करुना, किंवा जादू भरेली कौन अलबेली..! तर कधी अण्णांनी अनेकदा उलगडून दाखवलेला शुद्ध कल्याण किंवा तोडी. झालंच तर पुरीया.!
सवाईं गंधर्वांची ही शिष्यजोडी मलाही अगदी भरपूर लाभली. तो दिसच माझ्या आयुष्यातला खूप भाग्याचा दिस होता. अण्णांच्या आणि दस्तुरबुवांच्या पायाशी बसण्याचे खूप दिवस मनात होते, अखेर ती इच्छा पूर्ण झाली. आमचे दस्तुरबुवा म्हणजे ख्वाजा मोईउद्दीन चिस्तीने पाठवलेला एक अवलिया स्वर-जादुगार; तर आमचे अण्णा म्हणजे माझ्याकरता साक्षात पंढरीचा विठोबाच..!
त्या दिवशी खरंतर अण्णा माझ्यावर जरा वैतागलेलेच होते. का? तर मी मस्त मांडी ठोकून खाली धुळीत बसलो म्हणून..! :)
"च्च.. अरे इथे धुळीत काय बसतोस? कपडे मळतील की! तुला आमच्यासोबत फोटोच काढायचा आहे ना? मग बाजूला खुर्चीत बस की..!"
"नको हो अण्णा, मी आपला धुळीतच बरा..!" :)
असो..
आता अश्या अनेक आठवणी निघतात आणि मन उदास होतं. आजही कधी ग्रँटरोडला जाणं होतं. दस्तुरबुवा राहायचे त्या बिल्डिंगपाशी दोन क्षण उभा राहतो. पटकन दोन जिने चढून जावं आणि दस्तुरबुवा भेटावेत, त्यांच्या पायांना मिठी मारावी असं वाटतं. तर कधी दादरच्या प्रकाशचा बटाटवडा बाबुजी-ललीमावशीची आठवण करून देतो..!
चार-आठ दिसांपूर्वीच पुण्याला गेलो होतो. पाय नकळत कलाश्री बंगल्याकडे वळले. क्षणभर वाटलं की बंगल्यात जावं आणि किमान अण्णांच्या तंबोर्यांना तरी नमस्कार करावा. पण धीर नाही झाला. वळलो तसाच माघारी..!
-- तात्या अभ्यंकर.
प्रतिक्रिया
7 Jun 2011 - 1:22 pm | गणेशा
धुळीमध्ये माखलेली .. ह्रद्यात कोरलेली आणि गगनात विसावलेली आठवण आवडली.
7 Jun 2011 - 1:26 pm | ऋषिकेश
हृद्य आठवण
7 Jun 2011 - 1:52 pm | अमोल केळकर
क्या बात है !! अप्रतिम
अमोल केळकर
7 Jun 2011 - 1:59 pm | सन्दीप
छान रे तात्या. या आटवणी नीमित्ये लीहीता झालास. ती रोशनी पुर्ना कर ना दादा.
सन्दीप
7 Jun 2011 - 7:25 pm | निवेदिता-ताई
अप्रतिम..
7 Jun 2011 - 7:45 pm | गोगोल
तात्या अॅज अ यंग बॉय .. नाक वगैरे फेंदारून .. तात्या तुम्ही चित्रपटात काम का नाही केलं?
8 Jun 2011 - 9:36 am | विसोबा खेचर
हम्म! सोनेरी दिवस होते ते. तेव्हा आम्ही तरूण होतो. व्यायामबियाम पण भरपूर करयचो. एकाच वेळेला ५-५ पोरींना वचनं गेली होती आम्ची. त्यांच्यासोबत आणाभाकाही घेतल्या होत्या..! ;)
असो.. गेले ते दिस.. :(
तात्या.
8 Jun 2011 - 10:13 pm | आंबोळी
एकाच वेळेला ५-५ पोरींना वचनं गेली होती आम्ची. त्यांच्यासोबत आणाभाकाही घेतल्या होत्या..!
" भव्य उत्कट तेची घ्यावे... मिळमिळीत अवघेची टाकावे"
(एकाही पोरी बरोबर आणाभाका घेउ न शकल्याने तात्यावर जळणारा) आंबोळी
8 Jun 2011 - 12:01 am | आत्मशून्य
.
8 Jun 2011 - 1:12 pm | आर्या अंबेकर
विसोबा खेचर हे नाव नाही आवडले, परंतु त्यांचे लेखन उत्तम आहे. ही आठवणही छानच!
8 Jun 2011 - 11:00 pm | शाहरुख
तात्या चिकणे दिसत होते की :)
10 Jun 2011 - 8:15 am | पाषाणभेद
तात्या छान आठवण जागवली आहे तुम्ही.
10 Jun 2011 - 10:17 am | पिवळा डांबिस
"च्च.. अरे इथे धुळीत काय बसतोस? कपडे मळतील की! तुला आमच्यासोबत फोटोच काढायचा आहे ना? मग बाजूला खुर्चीत बस की..!"
"नको हो अण्णा, मी आपला धुळीतच बरा..!"
क्या बात है!!
असंच असावं रे तात्या!!!
प्रभूजी, तुम चंदन, हम पानी!!!!
जियो!!!
_/\_
10 Jun 2011 - 10:34 am | विसोबा खेचर
सर्व प्रतिसादींचा मी ऋणी आहे..
तात्या.