लढाऊ विमाने यावर मराठीमध्ये फारशी माहिती दिसत नाही. ही माहितीची भर विकीवर घालत आहे. पण ती येथेही यावी म्हणून काही लेख देत आहे. आशा आहे ते आवडतील. या विमानाची चित्रे पाहण्यासाठी विकीवर जरूर भेट द्या!
मिग-२१
मिकोयान मिग-२१ हे एक सुपरसॉनिक प्रकारातील एका इंजिनाचे, रशियन बनावटीचे लढाऊ विमान आहे. या विमानाला बालालैका या टोपण नावानेही ओळखतात कारण हे त्या सदृष दिसणार्या रशियन वाद्या सारखे दिसते. या विमानाच्या आकारामुळे त्याला पेन्सिल म्हणूनही ओळखले जाते. जगातील सुमारे ५० देशांमध्ये चार खंडात हे विमान वापरात आहे. हे जगातले सर्वाधिक प्रमाणात निर्मिती झालेले विमान आहे. भारतात इ.स. १९६६ मध्ये नाशिक जवळ हिंदुस्थान एरॉनॉटिक्स कंपनीच्या कारखान्यात या विमानांच्या उत्पादनास सुरुवात झाली आणि ६५७ विमानांची निर्मिती करण्यात आली.
इतिहास
या विमानाच्या संशोधनाला इ.स. १९५० मध्येच सुरूवात झाली. इ.स. १९५४ मध्ये या विमानाच्या पहिल्या प्रतिकृतीची ये१ नावाने निर्मिती झाली पण त्याचे इंजिन कमी शक्तीचे आहे हे लक्षात आल्याने सुधारित ये२, ये३ व ये४ आवृत्त्या बनवण्यात आल्या. १६ जून इ.स. १९५५ मध्ये या विमानाच्या ये४ प्रतिकृतीने हवाई झेप घेतली. मिग-२१ हे रशियाचे पहिले लढाऊ आणि प्रतिभेदक क्षमता एकत्र असलेले विमान ठरले. या विमानाचा आराखडा नंतर अनेक विमानांसाठी वापरला गेला.
स्वरूप
या विमानात हवा समोरून आत ओढली जाते. त्यामुळे रडार ठेवण्याची जागा नाही. या कारणामुळे पाश्चात्य देशात हा आराखडा फारसा आवडला नाही. तसेच या विमानात इंधनाच्या टाकीतून एका प्रमाणाबाहेर इंधन वापरले गेले तर विमानाचा गुरुत्व मध्य मागच्या बाजूला घसरतो. त्यामुळे याची क्षमता ४५ मिनिटे उड्डाणाची ठरते. या विमानाचा पल्ला २५० किलोमिटर्सचा आहे. तसेच याच्या त्रिकोनी पंखाच्या आकारामुळे हे वेगात वर चढू शकत असले तरी वळवतांना वेग मोठ्या प्रमाणात कमी होतो. पण हे विमान अतिशय वेगात हवेत झेप घेते म्हणजे ४६२५० फुट प्रति मिनिट इतक्या वेगात. हा वेग अमेरिकेचे अत्याधुनिक एफ-१६ विमानाइतका ठरतो.
या विमानात सुधारणा करत मिग-२३ आणि मिग-२७ ची निर्मिती करण्यात आली. या विमानाचे सोपे असलेले नियंत्रण, जोरदार इंजिन यामुळे हे विमान उडवण्यासाठी सोपे ठरते. तसेच विमानाच्या मुख्य पंखामागे असलेल्या छोट्या पंखांमुळे विमानाला स्थिरता लाभते. यामुळे नवख्या किंवा किमान प्रशिक्षण असलेल्या वैमानिकालाही हे विमान सहजतेने हाताळता येते. हा मुद्दा महत्त्वाचा ठरून मिग-२१ सुमारे ५० देशात निर्यात झाले. या विमानात अत्याधुनिक तंत्रज्ञानाची उणीव असतांनाही या विमानाला पसंती दिली गेली कारण याचे निर्मितीमूल्य कमी होते. शिवाय पुढे जाऊन अनेक रशियन, इस्रायेली आणि रोमेनियन कंपन्यांनी याच्या आधुनिकीकरणाची उपकरणे विकसित केली.
या विमानाच्या समोरील बाजूस असलेल्या शंकूने याच्या वेगाचे नियंत्रण केले जाते. त्यासाठी त्या शंकूचा आकार कमी जास्त केला जाऊ शकतो. वैमानिक कक्षात हवेचा दाब नियंत्रित केले असून हे वातानुकूलित आहे.
वैमानिक कक्ष
या विमानाचे सीट इजेक्ट होऊ शकते. हे होतांना ते वरील कॅनोपी (काचेच्या आवरणा)सहीत होते.
कॅनोपी
यामुळे पायलटला वेगवान हवेचा सामना करावा लागत नाही. नंतर ही काच वेगळी होते आणि वैमानिक हवाई छत्रीच्या आधारे खाली येतो. मात्र कमी उंचीवरून उडतांना ही काच त्वरीत वेगळी न झाल्याने काही वेळा अपघातही घडले आहेत. विमानाचा वेग कमी करण्यासाठी या विमानाला तीन प्रतिरोधक बसवलेले आहेत.
वेग रोधक हे पोटाला बसवलेले असतात. उतरण्यासाठी या विमानास तीन चाके आहेत.
भारताची खरेदी
भारतीय हवाई दलाने हे विमान इ.स. १९६१ साली खरेदी करण्याचे ठरवले. कारण तेव्हा रशियाने जुळणीसाठी लागणार्या तंत्रज्ञानाचे पूर्ण हस्तांतरण करण्याचे मान्य केले. या विमानाच्या रुपाने भारतीय हवाई दलात पहिल्या सुपरसॉनिक विमानाचे पदार्पण झाले. परंतु १९६५च्या भारत-पाक युद्धात प्रशिक्षित वैमानिकांच्या कमतरतेमुळे याचा परिपूर्ण वापर झाला नाही. मात्र हे विमान काय करू शकते हे लक्षात आल्यामुळे भारतीय हवाई दल सतर्क झाले आणि या विमानाची मोठी मागणी रशियाकडे केली गेली. या शिवाय या विमानांच्या दुरुस्तीसाठी वेगळी यंत्रणा उभारली गेली. तसेच वैमानिक प्रशिक्षणावर अजून भर दिला गेला. इ.स. १९६९ मध्ये भारताकडे १२० मिग-२१ विमाने होती.
भारत-पाक युद्ध
इ.स. १९७१ साली भारत-पाक युद्ध छेडले गेले. या युद्धात याच मिग-२१ विमानांनी मोठी मर्दुमकी गाजवली. भारतीय उपखंडात भारताची हवाई प्रहार शक्ती सर्वोच्च असल्याचा प्रत्यय दिला. पाकिस्तानच्या एफ-१०४ विमानांवर बसवलेल्या तोफांमुळे त्यांचा मोठा बोलबाला झाला होता. पण भारतीय वैमानिकांचे उत्तम प्रशिक्षण आणि मिग-२१ विमानांच्या प्रतिभेद शक्तीचा नेमका वापर करून पाकिस्तानची चार एफ-१०४ विमाने पाडली गेली. तसेच दोन एफ ६ विमाने, अमेरिकेने पुरवलेले एक एफ-८६ साब्रे विमान आणि एक लॉकहीड सी-१३० हर्क्युलस विमान यांचा धुव्वा उडवला. पाकिस्तानची दाणादाण यात झालीच पण अमेरिकन विमानांचीही नाचक्की झाली.
या हवाई युद्धाने जगाचे लक्ष भारताच्या हवाईदलाकडे आणि मिग-२१ या विमानांकडे वेधले गेले. अनेक देशांनी भारताच्या वैमानिक प्रशिक्षणात रस घेतला. भारतानेही अनेक देशांच्या वैमानिकांना प्रशिक्षण दिले. १९७०च्या दशकात सुमारे १२० इराकी वैमानिक भारतातून प्रशिक्षित होऊन गेले. भारत पाक युद्धातील पाकिस्तानी हवाईदलाची वाट लावणार्या शूर वैमानिकांची यादी विकीवर येथे पाहा.
भारत-पाक कारगील युद्ध
इ.स. १९९९ साली पाकिस्तान ने घुसखोरी केल्याने भारत-पाक युद्ध छेडले गेले. या युद्धातही मिग-२१ विमानांचा वापर भारताने केला. मात्र या युद्धात एक विमान पाकिस्तानी रॉकेट लाँचरद्वारे पाडले गेले. मात्र त्याचवेळी भारतीय हवाईदलाच्या याच विमानांनी हवेतल्या हवेत मारा करणार्या क्षेपणास्त्राचा प्रयोग करून पाकिस्तानी नौदलाचे ब्रिगेट अट्लांटिक विमान पाडले.
या विमानाचा व्हियेतनाम मध्येही परिणामकारक वापर झाला. तेथे तर व्हियेतनामी वैमानिकांनी पाच-पाच विमाने या विमानाचा वापर करून पाडली असे कळते.
थोडक्यात
विमानाचे नाव मिकोयान मिग-२१
प्रकार लढाऊ विमान
उत्पादक देश रशिया
उत्पादक रशिया, चेकोस्लोव्हाकीया, भारत
रचनाकार अर्तेम मिकोयान
पहिले उड्डाण १४ फेब्रुवारी १९५५
समावेश रशिया हवाई दल, पोलंड हवाई दल, रोमेनियन हवाई दल
निवृत्ती १९९० रशिया
उपभोक्ते रशिया, भारत व इतर अनेक.
उत्पादन काळ १९५९ (मिग २१एफ) ते १९८५ (मिग २१ बीआयएस)
उत्पादित संख्या ११४९६
वरील माहिती मध्ये काही चुका असल्यास नक्की कळवा. शिवाय तुमच्याकडे काही माहिती असेल तर तीही येथे द्या.
प्रतिक्रिया
19 May 2011 - 10:55 pm | नरेशकुमार
छान माहीती.
अजुन येउद्यात !
सुखोई बद्दल काही आहे का ?
20 May 2011 - 2:24 am | चिंतामणी
छान माहीती.
अजुन येउद्यात !
21 May 2011 - 8:22 pm | अलख निरंजन
सहमत
19 May 2011 - 11:13 pm | पाषाणभेद
छानच माहिती आहे. विकीपीडीयावर माहिती देवून एक चांगले काम आपण करत आहात. शुभेच्छा.
असले माहितीपुर्ण लेख येवूद्यात.
ओझर येथील HAL च्या कारखान्यात आयटी डिपा. मध्ये मी काही काळ होतो. त्यावेळी हा संपुर्ण प्लांट बघण्यात आला. त्यावेळी तेथे राकेश शर्मा टेस्ट पायलट म्हणून काम करत असत. अर्थात त्यांची काही भेट झाली नव्हती. प्लाईट हँगर ह्या शॉप मध्ये असल्या विमानांच्या इंजीनांची चाचणी घेत असत. तेथील उघड्या इंजीनांचा खुप मोठा आवाज होत असे.
दसर्याला येथील विमानांची, हत्यारांची पुजा होत असे. त्यावेळी एखाददोन विमानांच्या शेपटावर देवीचे चित्र काढल्याचे आठवते. तेथील पेंट शॉप मध्ये तर तेथील चित्रकारांनी वेगवेगळ्या विषयांवर मोठमोठी चित्र (पोस्टर्स) काढलेली होती.
20 May 2011 - 1:50 am | निनाद
मग मिग २१ ची फर्स्ट ह्यांड माहिती द्या ना अजून. प्रामुख्याने जुळणी कशी करतात. इंजिनाची चाचणी, उड्डाण चाचणी कशी होते वगैरे बद्दल लेखन केले तर वाचायला आवडेल. तंत्रज्ञानाचे हस्तांतरण नेमके कसे या विषयी कुतूहल आहे.
कारण ५० वर्षे झाली तरी आपण अजूनही या तंत्रज्ञानाच्या जवळपास पोहोचण्याचा फक्त प्रयत्नच करत आहोत. अजूनही आपले जेट इंजिन काही डेव्हलप होत नाही.
काही फोटो?
20 May 2011 - 12:12 am | पांथस्थ
छान माहिती आहे.
पण रचनाकारांच्या नावातुन 'मिखाईल गुरेविक' यांना का वगळले बुवा?
20 May 2011 - 1:46 am | निनाद
खरे आहे, मिखाईल गुरेविक यांचे नाव यायला हवे. विकीच्या मिग-२१ पानावरही तसा बदल केला पाहिजे. अर्थात हा बदल तुम्हीही करू शकता :) तसे करण्यास तुमचे स्वागत आहे!
20 May 2011 - 1:03 am | डीलर
F-16 चा क्लाइंब रेट ५२००० फूट प्रती मिनीट आहे असे वाटते.
20 May 2011 - 1:11 am | टारझन
इंग्रजीचे भाषांतर केलंय का ? मागे टाईमपास म्हणुन युद्धनौका , रणगाडे आणि लढाऊ विमाणे ह्यांची ह्याच फॉर्मॅट मधे माहिती वाचल्याचे स्मरते .
तसे असले तरी काही प्रॉब्लेम नाही , पण खाली मुळ प्रत कुठे आहे ते लिहीलेले दिसले नाही.
तसे नसेल तर प्रतिसाद बाद समजावा :)
20 May 2011 - 1:42 am | निनाद
अर्थातच! लेखाच्या सुरुवातीला विकीचा दुवा दिला आहे. विकीच्या मराठी पानावर गेलात तर त्याच विषयाचा इंग्रजी दुवा दिसेलच. हवा असल्यास त्याची मूळ (?) माहिती म्हणजे रशियन भाषेतील लेखाचा दुवा ही तेथेच आहे.
20 May 2011 - 2:30 am | टारझन
इंडियन आर्मी किंवा कोणत्या तरी गव्हर्नमेंट च्या साईट वर तुम्हाला अधिक माहिती मिळु शकेल .
अर्थात ह्या रोचक विषयाचे मराठीत रुपांतर करुन सुसह्य बनवल्याबद्दल तुमचे अभिनंदन .
रणगाड्यांवर आणि युद्धनौकांवरही माहिती येऊ द्यात.
- जु. ना. रणगाडे
20 May 2011 - 11:48 pm | सूर्याजीपंत
निनाद, तुम्ही जर का लढाऊ विमाने आणि सैन्य साहित्य या विषयावर काही लिहित असाल तर मलासुद्धा सहभागी व्हायला आवडेल.
21 May 2011 - 3:57 am | निनाद
आपले मनापासून स्वागत आहे!
22 May 2011 - 9:47 am | सूर्याजीपंत
काही ठरलेली योजना आहे का ? भाषांतरासाठी/ इतर लिखाणासाठी ? कळवा काही ठरवत असाल तर...
21 May 2011 - 1:58 am | पिवळा डांबिस
गेल्या काही वर्षांत बरीच मिग (लढाईत भाग न घेतानाच) कोसळली आनि वैमानिकांचे मृत्यू झाले असे वाचनात आले...
आपल्या विमानदलाने वैमानिकाची चूक असे त्यांचे निदान केले.
याबद्दल काही अधिक माहिती पुरवू शकाल काय?
21 May 2011 - 2:05 am | टारझन
मिग-२१ ही गेम खेळताना माझं विमान बर्याच दा कोसळलं होतं .. मुख्य म्हणजे मी मिशन पुर्ण केल्यावरही ते विमान कोसळे. बाकी काही आवडत नसलं तरी मिग विमान पडताना गेम मध्ये भारी ग्राफिक्स होतं ..
- टारेश पायलट
21 May 2011 - 2:31 am | पिवळा डांबिस
याचा अर्थ इतकाच की तुम्हाला 'किशोरकुंजा'तून बाहेर पडायला अजून वेळ आहे!!!
:)
21 May 2011 - 2:41 am | टारझन
:) संत तुकारामांनाही ह्याचा मोह होता ,आम्ही तर पामर किटाणु :)
- चि. टारझन
किशोरकुंज देगा देवा टार्या मिग गेमचा वेडा
पिडां काका रत्न थोर .. त्यांसी मिग च्या चिंता
21 May 2011 - 2:43 am | पिवळा डांबिस
:)
21 May 2011 - 3:54 am | निनाद
पण मी त्यावर कोणतेही भाष्य करणे धाडसाचे ठरेल.
पण त्यामागे अनेक गोष्टी होत्या/असाव्यात असे वाटते. या विमानांचे आयुष्य जवळपास संपले आहे. गेली ४० ते ५० वर्षे ते हवाईदलात आहेत. पण तरीही त्यांचे आधुनिकीकरण करत करत त्यांना चालवत आणले. पण एका कालावधी नंतर रशियाने या विमानांचे मेंटनंस करणे सोडले असावे. एच ए एल ने त्यांचे आधुनिकीकरण केले होते. त्यात काही क्वालिटी इश्युज असावेत - मला माहिती नाही. शिवाय वैमानिकांचे प्रशिक्षण पुर्वी रशियात होत असे ते भारतात होऊ लागले त्यात काही प्रश्न होते की नाही याची मला कल्पना नाही.
ही विमाने का वापरात राहीली?
मधल्या काळात नवीन विमाने घेण्यसाठी भारताकडे पैसा नव्हता. तेजस विमान अजून पुर्णत्वाला गेले नव्ह्ते. म्हणजे एखादे युद्ध पेटते तर भारताची परिस्थिती हवाई क्षेत्रात गंभीर होती. मग ही विमाने ऊडवण्या शिवाय पर्याय नसावा म्हणून रिस्क घेऊन ती विमाने हवाई दलात राखली गेली.
शिवाय भारताचे त्यात मोठी गुंतवणूक असल्याने ती लगेच डिकमिशन करणे परवडणारे नव्हते. या विमानासाठी लागणारे तंत्रज्ञान देशांतर्गत उपलब्ध आहे. त्याचे इश्युज आणि अॅडव्हांटेजेस यांचे उत्तम ज्ञान हवाईदलाच्या तंत्रज्ञांकडे आहे. तसे हे विमान अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरत नसल्याने मेंटेननंसला कंपॅरिटीव्हली सोपे आहे असे मानले जाते.
आज सुमारे साडे सहाशे विमाने दलात आहेत. सगळी काढली तर अचानक इतकी नवीन विमाने कुठून आणायची? नुसते नवीन विमान येते नाही तर त्याच्या मेंटेनन्स चा ग्राउंड क्रू, सुटे भाग हे सर्व पाहावे लागते. अन्यथा सुट्या भागांसाठी इतर कॅनिबलायझेशन होते. हे मिग २१ साठी हे सगळे जागेवर होते.
नवीन विमानावर प्रशिक्षित मनुष्यबळाचे काय करायचे वगैरे प्रश्न असू शकतो. दुसरे विमान चालवण्याचा अनुभव आणावा लागतो. हवाई दलात फक्त विमान उडवण्याचा अनुभव नाही तर काँबॅट ट्रेनिंग महत्त्वाचे ठरते. प्रत्येक विमानाची आपली खुबी असते. या विमानात वेग आणि स्थिरता उत्तम होती, स्फोटके उत्तम रित्या वाहून नेता येत होती. हवेतून जमिनीवर आणि हवेतल्या हवेत मारा करण्याची क्षमता उत्तम आहे. या विमानांची रेंज पाहून त्यानुसार भेदक हल्ल्यांसाठी सीमेजवळ हवाईपट्ट्या आणि दुरूस्तीची यंत्रणा उभारलेली आहे. त्याचा भारतीय हवाईदलाचा अनुभव उत्तम आहे. गेल्या सर्व युद्धात ही विजयी विमाने आहेत.
हे सगळे पाहता ही हळूहळू डिकमिशन करत आणली गेली. अजूनही ती हवाई दलात आहेत. पण त्यांची जागा बहुदा तेजस विमान घेईल अशी अटकळ आहे. पण खात्री नाही. कारण तेजसला अजून बरेच इश्युज आहेत असे दिसते.
खुपच गाजावाजा झाल्यावर ही फ्लीट काही काळा साठी ग्राउंड केली गेली.
अशा आहे तुम्हाला काहीसे (विस्कळीत असे) उत्तर मिळाले असेल. :)
22 May 2011 - 1:49 am | सूर्याजीपंत
मिग २१ हे काही एकच विमान नाही, तर त्यात मिग २१ BISON 77 / 76 असे अनेक versions आहेत. मला नक्की आठवत नाही पण या अनेक version पैकी कुठल्यातरी एका Version मध्ये तांत्रिक अडचणी आहेत. पण त्या version ची उड्डाणे कमी केलेली आहेत. तसेच भारतीय वायुदलात सर्वात जास्त sorties या मिग २१ च्या होतात, त्यामुळे इतर विमानांच्या तुलनेत अपघात पण त्यांनाच जास्त होतात. मिग २१ मध्ये सुद्धा कालपरत्वे बराच upgradation झालेला आहे आणि अजून चालूच आहे. तसेच निनाद यांनी सांगितल्याप्रमाणे तेजस विमाने कधी येतील हे सुद्धा माहित नाही. पण मिग २१ च्या जागी भारताने नवीन Medium Multi Role Combat Aircraft साठी आंतरराष्ट्रीय बाजारात जाहिराती दिलेल्या आहेत. अशी शक्यता आहे कि लवकरच Eurofighter चे Typhoon किंवा Dassault चे Rafle आपल्या वायुदलात येईल.
22 May 2011 - 2:20 am | Nile
वेगवेगळ्या मिग विमानांचे अनेक अपघात झाले आहेत. मिगचे ओव्हरहॉलिंग बहुतेक नाशिक(ओझर) मध्ये होते/व्हायचे. काही पार्टस चाईनिज बाजारातून घेतल्यामुळे असेल असे एक मत वाचनात आले होते.
अनेक कारणांपैकी एक कारण म्हणजे इंजिनात पक्षी इ. जाउन इंजिन बंद पडून विमान दगडासारखे कोसळते. सहसा टेकऑफवेळी कबूतरांमुळे असे झाल्याचे ऐकले आहे. मिगला एकच इंजिन, विमानाच्या पुढे, असल्याने ते इंजिन बंद पडल्यास अपघात शक्यता खूपच अधिक. अनेक विमांनात एक इंजिन बंद पडले तरी दुसर्या इंजिनावर सुरक्षित लँडिग होण्याची शक्यता असते.
23 May 2011 - 6:31 am | पाषाणभेद
मी ओझर येथे HAL मध्ये होतो एक दिड वर्ष. आता कळते आहे का अपघात होत होते ते. जावूद्या आपलीच काय मारून घ्यायची.
24 May 2011 - 12:04 am | पिवळा डांबिस
प्रत्येक वेळा ऑपरेटर एरर म्हणून वाचलं की मलाही शंका वाटते क प्रत्येक वेळी हे असं कसं असेल? विमानाच्या कंडिशनचा काहीच संबंध नाही का?
पण या विषयांतील अधिक ज्ञान नसल्याने मतप्रदर्शन करण्याआधी प्रश्न विचारून महिती मिळवावीशी वाटली...
निनाद, श्री. सूर्याजीपंत आणि नाईल, अधिक माहितीबद्द्ल धन्यवाद.
24 May 2011 - 12:17 am | पाषाणभेद
साक्षात राकेश शर्मांनादेखील एकदा याच विमानाची टेस्टींग करतांना काही गडबड झाल्याने पॅराशूटमधून उडी मारावी लागली होती तर इतर वेळाच्या उड्डाणांची काय कथा!
25 May 2011 - 9:54 am | गोगोल
प्रयोजन कळले नाही.
म्हणजे विमानात "राकेश शर्मां" बसले आहेत हे विमानाला कळल्यावर त्याने गपगुमान ठीक चालावे अशी अपेक्षा आहे का?
24 May 2011 - 12:38 pm | अमोल केळकर
माहितीपुर्ण धागा
संबंधीताना धन्यवाद
अमोल केळकर
25 May 2011 - 9:40 am | सूर्याजीपंत
भारतीय वायुसेना नवीन खरेदी करत असलेल्या Medium Multi Role Combat Aircraft बद्दल लिहिलंय, २ दिवसात टाकतो. फक्त थोडे मराठी प्रतिशब्द सुचत नाहीयेत. Medium Multi Role Combat Aircraft चा मराठी भाषांतर कसं होऊ शकेल ? विमानाचा performance यासाठी मराठी शब्द हवाय. इंग्लिश ते मराठी भाषांतराला मदत करणारी एखादी website आहे का ?
25 May 2011 - 10:56 am | नरेशकुमार
try
http://www.shabdkosh.com/mr/
http://www.alphadictionary.com/directory/Languages/Indo,045Iranian/Marathi/
http://marathi.changathi.com/Dictionary.aspx
http://www.websters-online-dictionary.org/browse_index/NonEnglish/Marath...
http://dsal.uchicago.edu/dictionaries/molesworth/
25 May 2011 - 11:09 am | आंसमा शख्स
पारिभाषिक शब्द शोधायचे असल्यास
मनोगत येथे एक कोष बनवलेला आढळला आहे.
http://www.manogat.com/pari/search
येथे फार चांगले शब्द संग्रहित आहेत.
25 May 2011 - 11:21 am | आंसमा शख्स
उपक्रम नावाची एक साईट आहे तेथे टायफून व राफेल विमानावर वाचायला मिळाले.
http://mr.upakram.org/node/3288
याचे मदत होते का पाहा