कूटचा वेढा भाग-२
वरचा फोटो (इंटरनेटवरून साभार) मी माझ्या एका लेखात टाकला होता, पण इथे तो परत टाकायाचा मोह आवरला नाही. मराठा सैनिकांची शेवटीशेवटी काय अवस्था झाली होती हे लक्षात येईल.
टाऊनशेंडच्या ६-डिव्हिजनने बगदादकडे नोव्हेंबरच्या मध्यास कूच केले. वाटेत टेसिफॉन नावाच्या गावात तुर्कांनी संरक्षण व्यवस्था मजबूत केली आहे याची त्यांना माहिती होती. टेसिफॉनच्या तुर्कांचा पराभव केल्याशिवाय त्यांना बगदादवर हल्ला चढवता येणार नव्हता. पण टेसिफॉनमधे तुर्कांचे किती सैन्य आहे याबद्दल खात्रीची माहिती त्यांच्याकडे नव्हती. शेवटची अरबांकडून माहिती हाती आली तेव्हा ११००० सैनिक आणि ३६ तोफा आहेत असा अहवाल आला होता. पण ब्रिटीश गुप्तहेरखात्याने याला दुजोरा द्यायचा नाकारले. अजून एक महत्वाची गोष्ट या काळात घडली ती म्हणजे ज. निक्सनला ३०००० तुर्की सैन्य बगदादकडे कूच करत आहे ही बातमी माहीत असूनही त्याने ही बातमी ज. टाउनशेंडला दिली नाही. ही माहिती मिळाली असती तर बगदादवर हल्ल्याची योजना ताबडतोब रद्द करता आली असती.
ब्रिटीश आणि भारतीय फौजांचे मनोधैर्य मिळालेल्या विजयांमुळे खूपच उंचावलेले होते. टेसिफोनवर चढाई करण्यासाठी त्यांना फारच वेगाने मार्गक्रमण करावे लागत होते. या वेगाचे मुख्य कारण होते अन्नाचा व इतर साहित्याचा तुटवडा. ते कमी पडू नये म्हणून टेसिफॉनला लवकर पोहोचणे क्रमप्राप्त होते. त्याशिवाय अशीही बातमी होती की तुर्कांनी त्यांच्या सेना टेसिफॉनला रवाना केल्या आहेत. त्या तेथे पोहोचायच्या अगोदर ते काबीज करणे हिताचे होते. तेथे टेसिफॊनच्या बाहेर पोहोचल्यावर लगेचच आक्रमणाची तयारी करण्यात आली. तुर्कांनीही टेसिफॉनच्या संरक्षणाची चांगलीच तयारी केली होती. यात त्यांना मदत होत होती २५ फूट उंच असलेल्या नदीच्या बंधार्याची. २२ नोव्हेंबरला ज. टाऊनशेंडच्या सैन्याने तुर्कांवर समोरून पण डाव्या आघाडीवर हल्ला चढवला. उरलेल्या सैन्याने शत्रूच्या सैन्याला डावीकडून जाऊन त्यांना वेढायचे अशी योजना आखण्यात आली. या योजनेनुसार तुर्कांना टायग्रिस नदीच्या दिशेने पळ काढावा लागला असता किंवा दियाला नदी पार करावी लागली असती असा होरा होता. ( नकाशा बघितल्यास आपल्याला मी काय म्हणतो आहे हे नीट लक्षात येईल.)
ब्रिटीशांच्या फौजेचा पहिला धडाकाच असा होता की तुर्कांना त्यांच्या पहिल्या संरक्षणफळीतून माघार घ्यावी लागली. ती माघार बघून ज. टाऊनशेंडही आश्चर्यचकीत झाला. दुपारी ११ पर्यंत तुर्कांनी त्यांची दुसर्या फळीतील खंदक सोडून दिले. या नंतर मात्र ब्रिटीश सैन्यावर जोरदार हल्ला करण्यात आला आणि त्यात ब्रिटीशांचे जबरी नुकसान झाले. १२००० सैनिकांपैकी जवळजवळ ४२०० सैनिक मारले गेले. युध्द एवढे भीषण झाले की तुर्कांचेही ९६०० सैनिक मारले गेले आणि १००० तुर्की सैनिकांना युध्द्कैदी बनवण्यात आले. पण योग्य युध्दसामुग्री नसल्यामुळे या विजयाचा ब्रिटीशांना फायदा उठवता आला नाही. ज. टाऊनशेंडने जी दोन डिव्हिजनची मागणी केली होती ती जर मान्य झाली असती तर हे युद्ध तेथेच संपले असते. डिव्हिजन जाऊदेत, ताज्या दमाची एक ब्रिगेड जरी असती तरी या युद्धाचा निकाल तेव्हाच लागला असता. टाउनशेंडने अंदाज केला होता त्याप्रमाणे तुर्कांनी दियाला नदीच्या दिशेने माघार घेतली. ब्रिटिशांकडे दुर्दैवाने त्या तुर्कांचा पाठलाग करायला जादा सैन्य नव्हते नाहीतर त्या सैन्याचा पराभव करून त्यांनी बगदावर सहज आक्रमण केले असते. त्याच वेळी गुप्तचरांकडून त्याला असाही अहवाल मिळाला की दियाला येथे तुर्कीसैन्याला मोठी कुमक मिळाली आहे. पण हा अहवाल चुकीचा होता. २३ नोव्हेंबरला तुर्कांनी जोरदार सहा हल्ले चढवले आणि त्यात त्यांनी नदीच्या काठी जेथे जखमी सैन्य जमा केलेले होते तेथे तोफांचा जोरदार भडिमार केला. त्यातही असंख्य सैनिक ठार झाले. पण हे सहाही हल्ले परतवून लावण्यात आले. टाउनशेंडला आता पुरी कल्पना येऊन चुकली होती की हे सहा हल्ले जरी परतवण्यात त्यांना यश आले असले तरी ते केव्हाही वेढले जाऊ शकतात. त्याने लिहून ठेवले आहे “लष्करी डावपेचांच्या दृष्टीकोनातून किंवा कुठल्याही बाजूने विचार केला तरीही परिस्थिती फारच गंभीर होती. याच वेळी माघार घेतली नाही तर आम्ही वेढले जाणार याची मला पूर्ण खात्री होती. माझा युद्धशास्त्राचा इतका अभ्यास निश्चितच झाला होता की मला हे माहीत होते की अशा राजकीय हस्तक्षेपाने एखाद्या युद्धमोहिमेचा कसा बोजवारा उडतो. मी माघार घ्यायची ठरवली”
ज. टाऊनशेंड्ने २६ नोव्हेंबरला आपल्या सैन्याला लाजच्या दिशेने माघार घ्यायचे आदेश दिले. या आदेशाबरोबर त्याने आपल्या सैनिकांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी एक प्रगटनही जाहीर केले त्यात त्याने फक्त हेच म्हटले होते की अन्न व इतर साहित्याच्या पुरवठ्याअभावी त्यांना तात्पुरती माघार घ्यायला सांगण्यात येत आहे. त्यात त्याने फ्रान्समधून सैन्य आले की शेवटची लढाई लढण्यात येईल असेही सांगितले होते. टेसिफॉनमधून ६-डिव्हिजनने माघार घ्यायचा अवकाश, तुर्की सैन्याने टेसिफॉनमधील सगळे खंदक परत काबीज केले आणि त्यांनी टाऊनशेंडच्या सैन्याचा पाठलाग चालू केला. तशातच अशीही बातमी आली की तुर्कांची सहावी सेना टेसिफॉनला पोहोचली आहे आणि तीही लाजच्या दिशेने कूच करण्याच्या बेतात आहे. लाजला जानेवारी महिन्यात नदीला मोठा पूर येतो हे माहीत असल्यामुळे ज. टाऊनशेंडने कूट येथे माघार घ्यायची ठरवली. घेतलेल्या निर्णयानुसार योजनाबध्द माघार घेण्यात आली त्यामुळे तुर्कांना ब्रिटीशांचे विशेष नुकसान करता आले नाही. दिवसा चालणे आणि रात्री विश्रांती अशाप्रकारे त्यांनी ते अंतर कापले. १ डिसेंबरला तर त्यांनी अन्नावाचून ३६ मैल अंतर कापले. ज. टाऊनशेंड यांनी आठवणीत लिहिले आहे “ ही माघार ९० मैलांची होती आणि माझ्या मागे तुर्कांचे सैन्य लागले होते. एकही जखमी सैनिक मागे सोडण्यात आला नाही. अर्थात या माघारीच्या दरम्यान उडालेल्या चकमकीत ५०० सैनिक ठार झाले. एकही तोफ शत्रूच्या ताब्यात गेली नाही. आमच्या बरोबर १५०० युद्धकैदीही चालत होते. ब्रिटीश सेनेच्या इतिहासात दोन दिवसात एवढी मोठी चाल केलेली मला तरी आठवत नाही”
हा प्रवास करून ३ डिसेंबरला सहावी डिव्हिजन कूटला पोहोचली. चालून आणि चकमकींमुळे दमछाक झालेले सैनिक विश्रांतीही घेऊ शकले नाहीत कारण त्यांना अल-कूटच्या संरक्षणाची तयारी करायची होती. ज. टाऊनशेंडने कूट लढवायचे ठरवले. वेढा तर पडणारच होता पण ज. टाऊनशेंडच्या वरिष्ठांनी तसे झाले तर एक दोन आठवड्य़ात त्यांची सुटका करण्यात येईल असे आश्वासन दिले. त्याने हिशेब केला. दोन महिने पुरेल इतके अन्न आणि दारुगोळा त्याच्याकडे होता. त्याच्या दृष्टिकोनातून टेसिफॉनचा विजय हा व्यूहात्मक होता. त्याचा त्याच्या शिपायांवर विश्वास होता. त्यांच्यावर विसंबून हा वेढा दोन महिन्यांपर्यंत सहज लढवता येईल याची त्याला खात्री होती. त्याने लिहिले आहे “मी कूट लढवायचे ठरवले. एकतर माझ्या फौजा थकलेल्या होत्या आणि त्यांना १०० फूट देखील चालणे मुष्कील होते. कूट सोडायचे असल्यास थोड्या वेळात सर्व तोफा आणि सामग्री तेथून हलवणे अशक्य होते. कूट जर हातातून जाऊ दिले तर शत्रूला हाई नदीतून नासिरियेहला सैन्य पाठवता आले असते आणि बसरा शहर सहजपणे त्यांच्या ताब्यात आले असते आणि ते परवडणारे नव्हते. त्यामुळे कूटला रणनीतीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्व होतेच..” शेवटी प्रश्न एक दोन आठवड्य़ाचाच होता. हा विचार केल्यावर ज. टाऊनशेंडला कूट लढवण्याची परवानगी देण्यात आली.
सहाव्या डिव्हिजनने कूट लढवण्यासाठी चांगलीच तयारी केली. खंदकांची संख्या वाढवण्यात आली. तुर्की सेनेला कूटला पोहोचण्यासाठी अजून चार दिवस लागणार होते त्यामुळे तयारीला आणि विश्रांतीला बर्यापैकी वेळ होता. त्याच काळात जखमींना बसरा येथे पोहोचवण्यात आले. तुर्कांच्या तोफखान्याचा भडिमार ९ डिसेंबरला चालू झाला. त्याच दिवशी ब्रिटीशांनी टायग्रिस नदीवरचा पूल उध्वस्त केला. १० डिसेंबरला तुर्कांचे चार हल्ले परतवण्यात आले. त्याच्याच दुसर्या दिवशी अजून एक मोठा हल्ला चढवण्यात आला, तो ही परतवण्यात आला. त्यानंतर मात्र दोन आठवडे सगळीकडे चमत्कारिक शांतता पसरली. २४ डिसेंबरला तुर्कांनी अजून एक कडवा हल्ला चढवला पण त्यात २००० तुर्क मारले गेले. ज. टाऊनशेंडने जे भाकीत केले होते ते खरे ठरले. तुर्कांच्या सैन्याला त्याचे सैन्य सहज तोंड देत पाय रोवून उभे होते. दरम्यान त्याच्या शिपायांनी ३० मैल लांबीचे खंदक खणले होते आणि कूटच्या छावणीचे संरक्षण केले. जसजसा काळ उलटू लागला तसतसा हा वेढा आवळण्यात आला. अन्नाचे दुर्भिक्ष हा तुर्कांपेक्षा जहरी शत्रू ठरला आणि त्याचे गंभीर परिणाम दिसायला लागले. जर्मन फिल्ड मार्शल फॉन गोल्ट्झ याच्या नेत्रृत्वाखाली तुर्कांनी योग्य रणनीती राबवून ते शांतपणे टाऊनशेंडच्या सैन्याच्या उपासमारीची वाट बघत बसले. त्यांनी अत्यंत धूर्तपणे आक्रमणाऐवजी वेढ्यातून कोणी सुटून जाणार नाही यावर लक्ष केंद्रीत केले.
ही परिस्थिती बिकट होत चालल्यावर ज. निक्सन यांनी ज. टाऊनशेंडच्या मदतीसाठी अजून एक सेना उभारली. त्याचे नाव होते “टायग्रिस कोअर”. याचे नेत्रृत्व देण्यात आले ज. फेंटॉन एलमर यांच्याकडे. या सेनेमधे दोन ब्रिटीश डिव्हिजन होत्या. जवळजवळ २०००० सैनिक. अर्थात तुर्कांकडे यापेक्षाही जास्त सैन्य होते आणि त्यांनी रणनीती ठरवल्यामुळे त्याचा व्यूहात्मक फायदा त्यांना होत होता. तुर्कांचा वेढा उठवण्यासाठी खरेतर त्यांच्या दुसर्या एखाद्या महत्वाच्या ठाण्यांवर हल्ले करायला पाहिजे होते पण तसे न करता या सेनेने कूटला सोडवण्याचे प्रयत्न करण्यास सुरवात केली. या प्रयत्नांदरम्यान या सेनेने तुर्कांवर तीनदा जबरी हल्ले चढवले पण त्यांना तीनही वेळा पराभव पत्करावा लागला. एवढेच नाही तर त्यात त्यांची जबरदस्त मनुष्यहानी झाली. दुसर्या प्रयत्नांनंतर अल्मेर यांना हटवून ज. गोरिंग यांना नेमण्यात आले. कूटच्या १०,००० माणसांना सोडवण्यासाठी या सेनेच्या जवळजवळ २२००० सैनिकांनी मरण स्विकारले. ( ज. टाऊनशेंडला जर वेळेलाच एक डिव्हिजन सैन्य दिले असते तर ही सगळी हानी टळली असती). या प्रत्येक पराभूत प्रयत्नांनतर कूट मधे सैनिकांच्या आणि कूट मधल्या नागरिकांच्या शिधेत कपात होत होती. यावेळी कूटमधे अंदाजे ७००० सामान्य नागरिक रहात होते. त्याबद्दल त्याने लिहिले आहे “ मला अरब पुरूष वाळवंटात जगले काय आणि मेले काय याची फिकीर नव्हती. ते विश्वासघातकीच होते. पण त्यांच्या बायकामुलांना त्या वाळवंटात सोडणे हे माणुसकीला धरून झाले नसते.”
त्याने जे कूटचे मूळ रहिवासी नव्हते अशा ७०० अरबांना बाहेर काढले आणि उरलेल्यांना शिस्तीने वागायची तंबी दिली. यासाठी त्याने त्या गावातील २० अरब पुढार्यांना ओलीस ठेवले. गावात बंदोबस्तासाठी त्याने एक पोलीसदलही तयार केले आणि नागरिकांना कामे वाटून दिली. जानेवारीपर्यंत त्याने कुठल्याही अरबांच्या घरावर अन्नासाठी छापे घातले नव्हते पण नंतर परिस्थिती अधिक बिकट झाल्यावर मात्र त्याने धाडी घातल्या आणि ५० दिवस पुरेल एवढे धान्य जप्त केले. पण जेव्हा अन्नाचा शिधा कमी झाला तसा सैनिकांच्या प्रकृतीवर त्याचा विपरीत परिणाम होऊ लागला.
जानेवारीच्या शेवटास सैनिकांचे अन्न निम्म्याहून कमी झाले आणि खेचरे आणि घोडे यांची अन्नासाठी कत्तल होऊ लागली. दररोज २० जनावरे मारण्यात येऊ लागली. त्यांच्या मांसाचा उपयोग सगळ्या जेवणात करण्यात आला. ब्रिटीश सैनिकांना याचे काहीच वाटले नाही आणि त्यांनी ते मांस सहजपणे ग्रहण करण्यास सुरवात केली पण हिदुस्थानी सैनिकांची पंचाईत झाली. कारण घोड्याचे मांस खाणे हे त्यांच्या धर्मात व परंपरेत बसत नव्हते. ज्या सैनिकांनी हे खाल्ले नाही त्यांना मुडदूस होऊ लागला. एप्रिलच्या मध्यापर्यंत ५८० हिंदुस्थानी सैनिकांना याची बाधा झाल्याची नोंद आहे. असे हाल चालू असताना, ज. टाऊनशेंडला तुर्कांशी कसलाही तह करू नये असा आदेश आला. त्याचा परिणाम शिधेत अजून कपात होण्यात झाला. शेवटी भूकबळी पडू लागले. विमानातूनही अन्न टाकण्याचे प्रयत्न झाले पण एवढ्या सैनिकांना अन्न पुरवू शकतील एवढी विमाने नव्हती. तरीपण अंदाजे ७ टन अन्न कूटवर टाकण्यात आले. ब्रिटीशांनी जहाजातून अन्नसामग्री पाठवण्याचा एक निकराचा प्रयत्न केला. जुलनार नावाची एक बोट भरून २४ एप्रिलला टायग्रिस नदीत तुर्कांचा तोफखाना चुकवून कूटच्या दिशेने निसटली पण पुढे नदीत बांधलेल्या तारांना अडकून ती शत्रूच्या तावडीत सापडली. यात झालेल्या चकमकीत बोटीचा कमांडर व त्याचा सहाय्यक हे दोघेही मारले गेले. त्यांनी केलेल्या निकराच्या प्रयत्नाबद्दल त्यांना व्हिक्टोरिया क्रॉस देण्यात आला. सगळे उपाय थकल्यावर ज. टाऊनशेंडला अखेरीस तुर्कांशी वाटाघाटी करण्यास परवानगी देण्यात आली...........
क्रमशः
जयंत कुलकर्णी
प्रतिक्रिया
16 May 2011 - 10:17 am | मृत्युन्जय
वाचतोय. छान माहिती
16 May 2011 - 10:46 am | सामान्य वाचक
आतातुर्क केमाल पाशा हा तु़र्काच्या विजयाचा शिल्पकार होता. तुर्काचा पराभव ग्रुहीत असताना पाशा मुळे चित्र बदलले.
16 May 2011 - 11:02 am | तिमा
ज. टाऊनसेंडविषयी खूपच सहनुभूति वाटली. लेखमाला खूपच वाचनीय व उत्कंठावर्धक होत आहे.