लेखन प्रेरणा- हर्षद (५० फक्त)
मिसळपाववर सदस्य होऊन १ वर्षापेक्षा जास्त काळ होऊन गेला पण प्रतिसादांच्या पूढे जाऊन आपल्याला काही लिहिता येणारच नाही अशी अकारण खात्री होती. पण हर्षदनी मला प्रोत्साहन देऊन नवरात्रावर लिहीच म्हणून उद्युक्त केलं आणि आज लिहुच म्हणून रामाचं नाव घेऊन सुरुवात करतेय..
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडव्याला रामाच्या नवरात्राला सुरुवात होते. देवीच्या नवरात्रासारखीच सरळ सोपी पूजा असते. पूजेच्याही आधी वातावरणात जो उत्साह भरलेला असतो त्याने सकाळीसच राममय व्हायला होतं. घरामागच्या राम मंदिरात सकाळीच सुरेख गाणी, भजनं सुरु होतात आणि ती गुणगुणतच नवरात्राच्या तयारीला सुरुवात होते.
सकाळी सडा रांगोळी (फ्लॅटच्या दारात जमेल तशी) , आंब्याची पाने धुवून पुसून त्याचं तोरण यासगळ्या लहानपणीपासून प्रत्येक सणाला धावून धावून केलेल्या गोष्टी त्याच उत्साहाने केल्या जातात. पुरण, तळण याची तयारी सहसा आद्ल्या रात्रीच करून ठेवलेली असते. घरातल्या बाकी तयारीत जरी नवरा कधी उत्साहाने तर कधी माझी कटकट नको म्हणून मदत करत असला तरी पुरणा-वरणाच्या स्वयंपाकात त्याची मदत न घेतलेलीच बरी असते :) . असो. मग आंघोळी आटपून मी गुढी उभारण्याच्या कामात लागते. गुढीला सजवणे ही माझी अतिशय आवडीची गोष्ट आहे. गाठी, हिरवी साडी, आंब्याची पानं, कडूलिंबाचा पाला, कलश यासगळ्यानी गुढीचा मेकप करून मग नवरात्रं स्थापना होते. संकल्प सोडून रामाला नऊ दिवसाची परर्फॉर्मन्स ग्यारंटी दिली जाते ;) . काही लोकांकडे घट बसवतात आमच्याकडे मात्र नऊ दिवस अखंड दिवा ठेवण्याची पद्धत असते पण ती काही बिनचुक पाळली जात नाही तेव्हा शक्य तितका वेळ दिव्याची ज्योत तेवती ठेवण्याचा प्रयत्न असतो. मग स्वयंपाक करून आणि नैवेद्य दाखवून जेवणं करायची आणि हे सगळं सकाळी साडेनऊच्या आत कारण ऑफिसची गडबड असतेच. गुढीपाडवा असो नाहीतर रामनवमी रोजची गडबड काही चुकत नाहीच.
पुढे नऊ दिवस सकाळ संध्याकाळ आरती, रामरक्षा, प्रसाद असतो आणि नवमीला रामजन्म. बा़की सगळ्या गोष्टी गुढीपाडव्या सारख्याच असतात फक्त गुढी उभारयची नसते त्या ऐवजी रामजन्माची भर असते. रामजन्माचा प्रसाद मात्र अगदी ठरावीक असतो. सुका मेवा, खडी साखर आणि सुंठवडा मस्ट. याशिवाय मग फळं, पेढे, मिठाया वगैरे आवडीनुसार.
नवमीच्या दुसर्या दिवशी रामजन्माचं पारणं असतं. यादिवशीच्या पारंपारिक प्रथेत मात्र मी माझ्यापुरता बदल केला आहे. प्रथेनुसार सवाष्णं जेऊ घालायची असते मात्र याहीदिवशी सुटी नसतेच. म्हणून मग मी सवाष्ण जेऊ घालण्याऐवजी एखाद्या गरजू व्यक्तीला पैसे देणे किंवा दहावीतल्या एखाद्या गरजू विद्यार्थ्याला पुस्तकं घेउन गेणे असं काहीतरी करते. दहावीच्या मुलांची एप्रिल ही साधारणपणे पुस्तकं खरेदीची वेळ असते. हे करून माझ्या रामाला सवाष्ण घातल्यापेक्षा जास्त आनंद होतो याची मला खात्री आहे.
असे हे नऊ दिवस नऊ रात्र आम्हाला दैनंदिन जीवनात काहीतरी वेगळेपण, थोडासा भक्तीभाव आणि सासूबाईंनी प्रेमाने सुरु केलेल्या प्रथा त्यांच्या नंतरही पुढे नेल्याचं समाधान देउन जातात.
प्रतिक्रिया
15 Apr 2011 - 1:27 pm | नरेशकुमार
खरे आहे,
सणा सुदिच्या दिवशी घरात सौ. पुजा-अर्चा करत असताना घराला एक सात्विकपणा येतो.
मन आनंदाने प्रफुल्लीत होउन जाते.
15 Apr 2011 - 1:59 pm | ५० फक्त
स्वागत आहे लेखकांच्या यादित.
छोटासाच पण छान लेख लिहिलास, धन्यवाद.
''संकल्प सोडून रामाला नऊ दिवसाची परर्फॉर्मन्स ग्यारंटी दिली जाते '' हे मात्र कळालं नाही. समजवाल का जरा ?
आणि रामाची मुर्ती आहे काय तुमच्याकडे पुजेसाठी, कारण मी फारशी कुणाच्या देवघरात पाहिलेली नाही.
अवांतर -प्रतिसाद देताना गम्मत वाटते ना आता कळेल प्रतिसादांना तोंड देताना कसं होतं ते.
15 Apr 2011 - 2:12 pm | मी ऋचा
नाही मुर्ती नाहीए फोटोलाच हार, फुलं करतो आम्ही.
अन ते परफॉर्मन्स ग्यारण्टी म्हणजे कुठलीही पूजा करताना आधी हातात पाणी घेउन संकल्प सोडतात की आम्ही हे कार्य पूर्ण करू, आपण प्रोजेक्ट्स मधे क्लायण्टला नाही का देत सुरुवातीला बॅन्क गॅरेण्टी की आम्ही हे काम पूरं करू म्हणून तसंच.
15 Apr 2011 - 4:58 pm | प्रास
आमच्याकडे देव्हार्यात आहेत राम, सीता, लक्ष्मण, त्यांची छोट्या साईजमधली एकत्र एका चौरंगावरची तिघांची धातूची छान मूर्ती :-), बरोबर अगदी छोटेसे हनुमानजीही होते पण मधल्या रंगकाम, सफाई प्रकरणात अंतर्धान पावलेत आणि आता त्या साईज मध्ये मिळत नाहीत :-(
बाकी ऋचाजी मिपा-लेखक परीवारात स्वागत आहे!
रामाच्या नवरात्रींबद्दल चांगली माहिती दिलीत.
पुलेशु :-)
कोदण्डधारी रामाचा दास -
15 Apr 2011 - 2:48 pm | प्रचेतस
पहिलाच लेख तो पण सुरेख.
हनुमानजयंतीचा -चैत्री पौर्णिमेचा उल्लेख यायला हवा होता असे वाटते.
शेवटी हनुमानाशिवाय राम अपुराच. नाही का?
15 Apr 2011 - 3:44 pm | मी ऋचा
धन्यु! तुझं म्हणणं खरय पण हे वर्णन मी माझ्या घरच्या पद्धतीचं केलय आणि त्यात हनुमान जयंतीला आम्ही विशेष काही करत नाही त्यामुळे उल्लेख राहून गेला!
एनीवेज आता म्हणूया बोला जय हनुमान!
15 Apr 2011 - 2:52 pm | गवि
घरातल्या बाकी तयारीत जरी नवरा कधी उत्साहाने तर कधी माझी कटकट नको म्हणून मदत करत असला तरी पुरणा-वरणाच्या स्वयंपाकात त्याची मदत न घेतलेलीच बरी असते
अशा वेळी मदत न करणे हीच नवर्याची मदत असते हे लक्षात घ्या.. त्यामुळे किती वाढीव काम वाचतं तुमचं.. :)
15 Apr 2011 - 3:36 pm | मी ऋचा
हो हे मात्र नक्कि खरं!
15 Apr 2011 - 2:57 pm | पुष्करिणी
चांगला लेख, फोटू कुठायत?
15 Apr 2011 - 3:35 pm | मी ऋचा
अगं फोटो नाही काढले यावेळी घाई गड्बडीत पण गेल्या वर्षीचे शोधते आणि मिळाले तर टाकते.
15 Apr 2011 - 6:30 pm | रेवती
अजून डिट्टेलवार वाचायला आवडले असते तरीही लेखन आवडले.
15 Apr 2011 - 7:09 pm | पक्का इडियट
छान लेखन. अजुन विस्तृत लिहायला हरकत नाही.
15 Apr 2011 - 7:24 pm | पैसा
पहिलाच लेख असल्याने टाईप करायचा कंटाळा आला असेल! पण वर्णन छान! पुढच्या वेळेला फोटो नक्की दे.
15 Apr 2011 - 8:08 pm | तिमा
श्रीरामाचा जन्म दुपारी बारा वाजता आणि कृष्णाचा जन्म रात्री बारा वाजता यात नियतिचा हात किती आणि पुराण लिहिणार्यांचा किती या प्रश्नाचे उत्तर मिळेल काय ?
15 Apr 2011 - 9:19 pm | रामदास
जेवू घालणे ह्यातही एक मजा असते. गरजूंना मदत करणे हे पण चांगलेच आहे .पण दोन्ही केले तर दुधात साखर.वेळेची कमतरता हे मी समजू शकतो.
चार पाच वर्षापूर्वी पर्यंत मी रामरक्षेच्या पन्नास छोट्या पुस्तीकांचे वाटप करीत असे .परंतू आता ती स्विकार करणार्यांची संख्या कमी झाल्यामुळे ("आमच्याकडे कुणी वाचत नाही हो आता हे सगळं" )उपक्रम बंद करावा लागला.
लेख चांगला आहे.
16 Apr 2011 - 11:13 am | मी ऋचा
काका बरोबर आहे जेवु घालण्यातली मजा मला माहिती आहे. पण एक नेम केला की तो दर्वर्षी पाळावा लागतो अन ते जमेलच असं नाही. पण यावर्षी मात्र याचा मित्र रविवारी सहज म्हणून जेवायला आला आणि मनात आलं की पारण्याला नाही तरी नवरात्रातल्या रविवारी आपण कुणाला तरी जेवायला बोलावु शकतो. आता दरवर्षी असं करण्याची इच्छा आहे बघुया कुठपत जमतय ते! कर्ता करविता राम काय काय करवून घेतो ते बघु!
15 Apr 2011 - 10:19 pm | सखी
सवाष्ण जेऊ घालण्याऐवजी एखाद्या गरजू व्यक्तीला पैसे देणे किंवा दहावीतल्या एखाद्या गरजू विद्यार्थ्याला पुस्तकं घेउन गेणे असं काहीतरी करते.
लेख आवडला - वरची पद्धत जास्त आवडली. खूप वर्षांपूर्वी पेपरात एका बाईंनी लिहलं होतं की खरतरं सवाष्ण बोलवुन आपण शक्यतो जी बाई सधन आहे, जिला कमीतकमी नव-याचा आधार आहे, तिलाच खाऊ-पिऊ घालतो - थोडक्यात पोट भरलेल्याच अजुन आग्रह करतो. त्या बाई अशा वेळेस मुद्दामहुन विधवा बायकांना शोधुन जेवायला बोलवायच्या - अर्थात हे स्वातंत्र्य किती बायकांना मिळेल हे प्रत्येक कुटुंबावर अवलंबुन आहे. दुसरे उदाहरण - माझ्या मैत्रिणीची मैत्रीणीचं, ती अशा पुजेच्या वेळेस घरी कामाला येणा-या बायकांना आधीच सांगुन ठेवते जेवायला येण्याचं आणि त्यांना नीट साग्रसंगीत, आग्रह करुन जेवायला वाढते. तुमचं विद्यार्थ्याला मदत करणे खरेच स्तुत्य आहे.
15 Apr 2011 - 11:04 pm | रेवती
वर्षातून एकदा तरी (श्रावणातल्या शुक्रवारी) सवाष्ण व जमल्यास तिचा नवरा असे बोलावतेच. कोणत्याही जातीतील/ कोणतेही भाषिक लग्न झालेली बाई व तिचा नवरा (मी जातीभेद मानत नाही). अर्थातच ते माझे मित्र मैत्रिण असतात. एकदा तर पाकिस्तानी बाई व तिचा नवरा आले होते. शुक्रवार हा हापिसाचा दिवस असल्याने आमची सवाष्ण संध्याकाळी येते.
हैद्राबादला असताना सवाष्णीबरोबर तिच्या विधवा सासूबाईही आल्या होत्या. खरंतर मागच्या पिढीतील आजीबाई बर्याच सुधारक होत्या. मला ते आवडले.
16 Apr 2011 - 11:22 am | मी ऋचा
प्रतिक्रियांबद्दल सगळ्यांचे आभार! अजून विस्तृत खरं तर लिहायचे होते पण पैसा म्हणतेय ते बरोबर आहे टंकायचा जरासा कंटाळा आला आणि प्रकाशित करायची घाई पण झाली. पुढील लेखात अजून चांगला प्रयत्न करीन.
तिरशिंगरावः- हा सगळा विचार मी केला नाही आणि तशी गरजही वाटत नाही.
16 Apr 2011 - 12:21 pm | ५० फक्त
''जेवु घालण्यातली मजा मला माहिती आहे.'' -''आता दरवर्षी असं करण्याची इच्छा आहे बघुया कुठपत जमतय ते! ''
मग आम्हाला बोलवा की गाडीखर्चासह आमंत्रण दिलं तर येउ नक्की.
16 Apr 2011 - 12:38 pm | मी ऋचा
नक्की या सगळे मिपाकर. सगळ्यांचं गाडीभाडं कठीण आहे पण सगळ्यांना जेवू घालेन नक्की!! ;)
16 Apr 2011 - 1:05 pm | परिकथेतील राजकुमार
वा वा अगदी उत्तम लेखन.
आजोळी सांगलीला आमचे स्वत:चे मोठे देऊळ आहे श्रीरामाचे 'रामाश्रम' म्हणुन :) रामाश्रमाबाहेर छोटेसे देऊळ हनुमंताचे. लहानपणीच्या तिथल्या रामनवमीचा आठवणी ताज्या झाल्या. पाळणा वगैरे बांधुन, आसपासच्या सगळ्या बायका वगैरे गोळा होऊन दणक्यात रामनवमी साजरी व्हायची. तिच तर्हा हनुमान जयंतीची.
16 Apr 2011 - 1:59 pm | मी ऋचा
धन्यु परा!
16 Apr 2011 - 4:24 pm | दीविरा
आवडला लेख :)
मला अगदी हल्लीच ही चैत्रातील नवरात्र कळली.
आमच्या इकडे बायका ९ दिवस उपास करतात व सूंदरकांड वाचतात.
ह्याला ते लोक छोटी नवरात्री म्हणतात.
16 Apr 2011 - 4:37 pm | sneharani
मस्त लिहलाय लेख!
लिहीत रहा!