अति जेवल्या वर काय कराल?

खादाड अमिता's picture
खादाड अमिता in जनातलं, मनातलं
8 Apr 2011 - 4:01 pm

खादाडी कट्टा हा विषय चाललाच आहे तेव्हा....

'गरम गरम पुरणपोळी, त्यावर साजूक तूप- मग काय विचारताय? चांगल्या ३-४ हाणल्या. एवढ्या प्रेमानं केल्या होत्या मग त्याला दाद द्यायला नको?' असे संवाद तुमच्या कानावर पडले असतीलच. नाही? बरं मग - 'अरे काल आम्ही सगळे मित्र मंडळी जमलो होतो. काय धम्माल आली माहितीये, तंदुरी चिकन, पनीर मक्खन्वाला, गरमागरम बटर रोटी! डाएट वगेरे पार विसरलो रे!' 'अगं काल मी घरी एकटीच होते, मग टी. व्ही. बघता बघता एक डबाभर आईस्क्रीम फस्त केलं. कळलंच नाही कधी एवढं खाल्लं गेलं ते!' ह्या पैकी एक तरी उदाहरण तुम्ही ऐकलं किंवा बघितलं असणार. आपला आवडता पदार्थ आपल्या समोर आला, कि तो मोजून मापून खाणं हे खूपच अवघड जातं. त्यातून कोणाकडे जेवायला गेलो कि आग्रह करण्याची पद्धत. बायका तरी त्यामानानं आग्रहाला कमी बळी पडतात पण पुरुष मंडळींची काही त्यातून सुटका होत नाही. तर अश्यावेळी जेव्हा अति जेवण होतं तेव्हा (डाएट च्या दृष्टीने) काय कराल?

'सकाळी जास्त जेवण झालं कि मी रात्रीचं जेवतच नाही. वीकेंड ला खूप खातो आणि मग सोमवारचा उपास करतो. जास्त खाल्लं की मी सकाळ संध्याकाळ जीम ला जातो, कॅलोरीस बर्न करायला. आता मी ठरवलंय, पुढच्या महिन्या पासूनच परत डाएट सुरु करायचं. नाहीतरी एवढं खाणं झालंच आहे, मग एकदमच सगळं उतरवू! '. खरंच असं करून वजन कमी होतं का? किंवा कॅलोरीस जास्त वापरल्या जातात का?

अति जेवलात? काळजी करू नका. म्हणजे, एकदा जास्त जेवलात तर काळजी करण्या सारखं काही नाहीये (रोजचा नेम झालं तर मग... ). अधून मधून जास्त जेवण होणं हे साहजिक आहे. आज एकदा जास्त जेवलात म्हणजे तुमचं वजन लगेच एक किलो वाढेल असं नाही. साधारण ५००० कॅलोरीस खाल्ल्यावर एक किलो वजन वाढतं. वजन वाढणे हे एका रात्रीत होत नसून, रोज जेव्हा आपण गर्जे पेक्षा ५००- १००० कॅलोरीस जास्त खातो तेव्हा होतं. अश्या कधी काळी जास्त जेवणाला आहारशास्त्रात 'डाएट टाईम आउट' किंवा 'बींज करणे' म्हणतात. असं झालं तर निराश न होता, लगेच दुसऱ्या दिवशी पासून पुन्हा नेहमीच्या आहार आणि व्यायामाच्या रुटीनला लागा. वजन आपोआप संतुलित होईल.

आठवड्याचं डाएट: कुठलं हि वेट लॉस डाएट हे नेहमी पूर्ण आठवड्याचा विचार करून बनवलं गेलं पाहिजे. जर तुम्ही दर शनि-रवि हॉटेल मधे जेवत असाल, तर ते तुमच्या dietician ला जरूर सांगा. जर मध्ल्यावारी (सोम ते शुक्र) जास्त खाणं झालं तर त्या दिवसाला रविवार समजून पुढचे सात दिवस नियमित संतुलित खाणं ठेवा.

वजनाच्या काट्या पासून लांब रहा. आदल्यादिवशी अति जेवल्यावर दुसऱ्या दिवशी काट्यावर वजन वाढलेलं दिसणं अपेक्षित आहे. पण ते वाढलेलं वजन जास्तीच्या आहारातून शरीरात गेलेल्या सोडियम मुळे असते. सोडियम शरीरात पाणी साठवून ठेवतं आणि त्यामुळे वजन वाढलेलं वाटतं. डाएट ला विसरून भरपूर जेवल्या च्या गिल्ट मधे वाढलेले (फसवं) वजन पाहून भर पडते, निराशा येते. म्हणून लगेच वजन करू नये. पुढे ३ दिवस नियमित आहार आणि व्यायाम केल्यावर वजन करावे.

सेन्सिबल आहार आणि व्यायामाकडे परत वळा. खूपदा लोकं पार्टी केली कि पुढील दिवशी दमून पडे पर्यंत व्यायाम करतात. असं करण्याचे दोन तोटे असतात. एक म्हणजे, अति व्यायाम केल्यावर तुमच्या स्नायूंना इजा होण्याची शक्यता असते. दुसरं, आज एवढा अती व्यायाम करायचा आणि मग पुढे दोन दिवस अंग खूप दुखतंय म्हणून व्यायामाला दांडी मारायची. ह्यानी उलट वजन पुन्हा वाढतं. तसेच, उपास करणं, रात्री न जेवणं अश्या प्रकारांनी शरीर 'हंगर मोड' मधे जाऊन, जेव्हा खाल तेव्हा सगळं चरबीच्या रूपात साठवून ठेवतं. म्हणून, भूक लागेल तेव्हा लो कॅल, कमी तेल असलेला पदार्थ खा. किंवा कुठलं फळ, सलाड, लस्सी ई. खा, पण उपासमार करून घेऊ नका.

जीवनमानविचारलेखमाहिती

प्रतिक्रिया

पियुशा's picture

8 Apr 2011 - 4:08 pm | पियुशा

छान माहिति ग अमिता ताइ
:)

उपास करणं, रात्री न जेवणं अश्या प्रकारांनी शरीर 'हंगर मोड' मधे जाऊन, जेव्हा खाल तेव्हा सगळं चरबीच्या रूपात साठवून ठेवतं. म्हणून, भूक लागेल तेव्हा लो कॅल, कमी तेल असलेला पदार्थ खा. किंवा कुठलं फळ, सलाड, लस्सी ई. खा, पण उपासमार करून घेऊ नका.

+१००% सहमत.
(अनुभवी) गणा.

यशोधरा's picture

8 Apr 2011 - 4:12 pm | यशोधरा

माहितीबद्दल धन्यवाद.

सखी's picture

9 Apr 2011 - 12:22 am | सखी

माहितीबद्दल धन्यवाद.

५० फक्त's picture

8 Apr 2011 - 4:12 pm | ५० फक्त

''ह्या पैकी एक उदाहरण एका दिवसात '' छे सगळी एका दिवसात पाहिली आहेत.

असो, माहिती छान, फक्त शरदकाकांना केली होती तीच विनंती सोदाहरण स्पष्टीकरण करावे.

बाकी लेखमाला छानच, फक्त माझ्यावर किती प्रभाव कधी पडेल माहित नाही. पडलाच तर तुला एक ड्बाभर आईस्क्रिमची पार्टी देईन. म्हणजे एक ड्बा तुला आणि एक ड्बा मला.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

8 Apr 2011 - 4:50 pm | विश्वनाथ मेहेंदळे

धन्यवाद !!! उत्कृष्ट आणि समयोचित माहिती. यातील काही मुद्द्यांवरून मित्रामित्रात थोडी चर्चा झाली होती. पण सगळेच हत्ती आणि आंधळ्याच्या गोष्टीसारखे. कुणालाच १००% खरी माहिती नाही.

अमिताबाईंचे लेख आधाशासारखे वाचले गेले तर काय होइल?;)
एकंदरीत खाण्यावर सध्यातरी नियंत्रण आहे.;) पण कधीतरी चार घास जास्त खाल्ले जातात आणि अपराधीपणा येतो.;)

प्रास's picture

8 Apr 2011 - 5:27 pm | प्रास

>>>>अति जेवल्या वर काय कराल?<<<<

एकदा अति जेवल्यावर काही करायचे आमच्या हातात कुठे उरते?

काय करायचेय ते आमची पचनसंस्थाच करेल ना..... ;-)

बाकी

>>>उपासमार करून घेऊ नका<<<

हे पटेश..... :-)

अम्मळ सुपर-डुपर हेव्हीवेट -

निवेदिता-ताई's picture

8 Apr 2011 - 10:41 pm | निवेदिता-ताई

छान माहिती ग ....आवडली...अंमलात आणली पाहिजे..

मराठमोळा's picture

9 Apr 2011 - 12:51 am | मराठमोळा

पुन्हा एकदा चांगली माहिती.. :)

बाकी आम्ही अतिजेवण झाले की रांगत रांगत जाऊन सरळ ताणून देतो.. :)
मग ना कॅलरीजचा विचार ना वजनाचा.. :)

कुंदन's picture

9 Apr 2011 - 1:07 am | कुंदन

आज दुपारी जरा अति जेवण केले तर मग सांजच्याला फलाहारावर भागवले.

सुधीर१३७'s picture

9 Apr 2011 - 11:24 am | सुधीर१३७

अति जेवल्या वर काय कराल? >>>>>>>>>>>>>>>

.................. पोट दुखू नये यासाठी इनो घेऊ, कारण ते मिपावर नियमित उपलब्ध ........... :wink:

.............लेख उत्तम.............. :)

विनायक बेलापुरे's picture

9 Apr 2011 - 12:01 pm | विनायक बेलापुरे

मस्त माहिती पूर्ण लेख लिहिलाय .......

गरम गरम पुरणपोळी, त्यावर साजूक तूप- मग काय विचारताय? चांगल्या ३-४ हाणल्या.

हे वाक्य मात्र खटकले..... अवघ्या ३-४ पुरणपोळ्याना तुम्ही "चांगल्या हाणल्या" असे म्हणालात हे शोभले नाही ... फारच अन्यायकारक वाक्य आहे खवय्ये संस्कृतीसाठी ....... ;)

खादाड अमिता's picture

10 Apr 2011 - 4:14 pm | खादाड अमिता

माझ्या आजोळी - धुळ्याला, कुठलं हि पक्वान्न उ. दा. पुरणपोळी, मांडे, श्रीखंड,आमरस, बासुंदी, खीर , तुडुंब जेवलं कि 'काय हाणलय माहितीये?' असं म्हणतात. आणि, माझ्या पहिल्या लेखातच मी डीक्लेर केलं होतं की मी माहेर सासर दोन्ही कडून 'खवैया खानदान' ची आहे. :)