पाटणकर आजोबा..

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
13 Oct 2007 - 5:18 pm

अखेरीस पाटणकर आजोबा वारले! अगदी शांतपणे आणि आनंदाने! एखाद्या जिवलग मित्राला भेटावं इतक्या सहजतेने मृत्युला भेटले!

पाटणकर आजोबा मला प्रथम भेटले त्याला आता १५-२० वर्ष झाली असतील किंवा त्यांच्यामाझ्या दोस्तीला १५-२० वर्ष झाली असं आपण म्हणूया!

एकदा मालिनी राजूरकरांच्या गाण्याला गेलो होतो तेव्हा श्रोत्यांमध्ये पहिल्याच रांगेत बसून पाटणकर आजोबा मालिनीबाईंच्या गाण्याला मनमोकळी दाद देत होते. जुन्या ष्टाईलचा धोतर-कोट-टोपी हा पोशाख. उंचीने, शरीरयष्टीने मध्यम. पण म्हातार्‍याच्या चेहेर्‍यावर मात्र तरतरी होती, मिश्किल भाव होते. कोकणस्थी गोरा रंग असलेले पाटणकर आजोबा देखण्यातच जमा होत होते, हँडसम दिसत होते!

गाण्याचं मध्यंतर झालं. मंडळी जरा इकडेतिकडे करत होती, चहापान वगैरे करत होती. माझादेखील चहा घेऊन झाला होता व मी बांधून आणलेलं १२० पान सोडून खायच्या तयारीत होतो. समोरच पाटणकर आजोबा उभे होते व मिश्किलपणे माझ्याकडे पाहात होते. मीदेखील त्यांना एक तोंडदेखला स्माईल दिला तशी मला म्हणाले,

"आज नेमकी मी माझी पानसुपारीची चंची घरी विसरलो! गाण्याला खूपच गर्दी आहे आणि आता लवकरच पुन्हा मध्यंतरानंतरचं गाणं सुरू होईल. तू जरा माझी जागा पकडतोस का?, मी बाहेर जाऊन पटकन पान खाऊन येतो. नाहीतर मी पान खायला म्हणून बाहेर जायचो आणि नेमकी माझी जागा जायची!"

'तुम्ही कोण', 'तुमचं नांव काय', 'कुठे असता' इत्यादी नेहमीचे औपचारिक प्रश्न न विचारता अगदी वर्षानुवर्षाच्या ओळखीतल्या माणसाशी बोलावं तसं एकदम एकेरीवर येत पाटणकर आजोबा माझ्याशी बोलते झाले! पुलंच्या भाषेत सांगायचं तर 'इतक्या एकदम सलगीत आलेला हा म्हातारा कोण?' हे मला कळेचना! पण काही काही चेहेरेच असे असतात की 'याचं-आपलं जमणार!' याची खात्री पहिल्या भेटीतच होते. पाटणकर आजोबांच्या चेहेर्‍यावरही असेच 'दोस्ती करण्याकरता उत्सुक' असे भाव होते. मला तो माणूस कुणी परका आहे असं वाटलंच नाही! मग मीच त्यांना म्हटलं, "आजोबा तुम्ही बसा आणि माझीही जागा पकडा, मी तुमच्याकरता बाहेरून पान घेऊन येतो. तुमचं पान कोणतं ते सांगा!"

"उत्तम! बनारसी १२०, कच्ची सुपारी" आजोबा खुशीत येऊन म्हणाले.

चढत्या भाजणीने रंगत गेलेलं मालिनीबाईंचं गाणं संपलं. मंडळी, मालिनीबाईंचं मैफलीतलं गाणं ऐकायला भाग्य लागतं! पाटणकर आजोबा आणि मी मैफलीत पहिल्या रांगेत शेजारी शेजारीच बसलो होतो. समोरच अवघ्या दोन तीन फुटांच्या अंतरावर अत्यंत साध्या आणि घरगुती व्यक्तिमत्वाच्या मालिनीबाई बसल्या होत्या. त्यांच्या स्वरास्वरात, लयीच्या प्रत्येक वळणात 'संगीत!' 'संगीत!' म्हणतात ते हेच!' याची साक्ष मिळत होती. अत्यंत कसदार आणि खानदानी गाणं! स्वच्छ, मोकळा आणि अत्यंत सुरेल आवाज, सुरालयीवर, तानेवर, सरगमवर असामान्य प्रभुत्व. 'चाल पेहेचानी' हा टप्पा आणि त्यानंतर 'फुल गेंदवा अब ना मारो' या भैरवीने मालिनीबाईंनी अक्षरश: आभाळाला गवसणी घातली आणि मैफल खूप उंचावर नेऊन ठेवली! मैफल संपल्यानंतर एक सन्नाटा निर्माण झाला. लोकांना टाळ्या वाजवायचं भान नव्हतं! मंडळी, संगीतक्षेत्रात असं मानलं गेलं आहे की जी मैफल संपल्यानंतर टाळ्यांच्या ऐवजी नुसताच सन्नाटा निर्माण होतो ती खरी मैफल! मालिनीबाईंची मैफल म्हणजे नादब्रह्माचा साक्षात्कार! मला आजपावेतो मालिनीबाईंचं मैफलीतलं गाणं अगदी भरपूर ऐकायला मिळालं हे माझं भाग्य! असो, मालिनीबाईंचा गानविष्कार हा एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे.

गाणं संपलं. मालिनीबाईंच्या पाया पडून मी बाहेर पडलो.

"कुठे राहतोस?"

मागनं पाटणकर आजोबांचा आवाज ऐकू आला. त्यांचा हात माझ्या खांद्यावर होता. आयला!, म्हातारा मला सोडायलाच तयार नव्हता!

मग 'तुम्ही कोण, कुठले', 'आम्ही कोण, कुठले' या आमच्या गप्पा झाल्या, रीतसर ओळख झाली. पाटणकर आजोबा दादरलाच एका चाळीत राहणारे. नोकरीधंद्यातून निवृत्त होऊन फंड-पेन्शनीत निघालेले.

"चल, मस्तपैकी पावभाजी आणि नंतर भैय्याकडची कुल्फी खाऊ! घरी जायच्या गडबडीत नाहीयेस ना?"

मला जरा आश्चर्यच वाटलं. रात्रीचा जवळजवळ एक वाजला होता आणि या म्हातार्‍याला घरी जाऊन चांगलं झोपायचं सोडून खादाडीचे वेध लागले होते! :) पण मला त्यांचा आग्रह मोडवेना. मग आम्ही मस्तपैकी गाडीवर पावभाजी झाल्ली. तेव्हा बिसलेरी-फिसलेरीचं एवढं फ्याड निघालं नव्हतं त्यामुळे बाजूच्याच प्लाष्टीकच्या पिंपातलं पाणी प्यायलो आणि नंतर झकासपैकी मलई कुल्फी खाल्ली. मजा आली तिच्यायला! :)

"काय मग, कसं वाटलं मालिनीबाईंचं गाणं? चल जरा चौपाटीवर थोडी शतपावली घालू म्हणजे पावभाजी पचेल!"

आणि खरोखरंच रात्री एक वाजता पाटणकर आजोबांबरोबर मी मुकाट्याने दादरच्या चौपाटीवर शतपावली घालू लागलो. 'च्यामारी कोण हा? का असा मला वेठीस धरतो आहे?' असा विचार माझ्या मनात आला. पण पाटणकर आजोबांचं व्यक्तिमत्वच एवढं प्रभावी आणि छाप पाडणारं होतं की मला त्यांना 'नाही' म्हणताच येईना! मग आम्ही जरा वेळ गाण्यावर गप्पा मारल्या. त्यांनी माझा पत्ता,फोन नंबर घेतला आणि आम्ही एकमेकांना बाय बाय करून निरोप घेतला. पण त्यांच्याशी बोलताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली की या माणसाने अभिजात संगीत अगदी भरपूर ऐकलं होतं. आमच्या गप्पांच्या ओघात त्यांनी अनेक लहानमोठ्या कलाकारांची नावं घेतली, त्यांची वैशिष्ठ्ये सांगितली. एकंदरीत हा माणूस गाण्यावर आणि आयुष्यावर भरभरून प्रेम करणारा वाटला, माणसांचा भुकेला वाटला! शिवाय 'भीमण्णांच्या गाण्यावर तुडुंब प्रेम' ही आमच्या दोघातली कॉमन गोष्ट निघाली. त्यामुळे मला तर माझ्या वारीतलाच एक वारकरी भेटल्याचा आनंद झाला! वारीत फक्त मागेपुढे चालत होतो त्यामुळे इतके दिवस भेट नव्हती! परंतु आमचा रस्ता एकच होता, वारी एकच होती. आम्हा दोघांचंही पंढरपूर म्हणजे पुण्यनगरीतल्या नव्या पेठेतील 'कलाश्री' बंगला आणि त्यातला 'कानडाऊ भीमसेनू' हाच आमचा विठोबा! असो...

त्यानंतर चारच दिवसांनी पाटणकर आजोबांचा फोन आला. "अरे अमुक अमुक ठिकाणी अण्णांचं गाणं आहे. येणारेस का? नक्की ये."

मंडळी, ही तर केवळ आमच्या गानमैत्रिची सुरवात होती. त्यानंतर पाटणकर आजोबांबरोबर मी गाण्याच्या अगदी भरपूर मैफली ऐकल्या. कधी मालिनीबाई तर कधी भीमण्णा, कधी उल्हास कशाळकर तर कधी आमच्या मधुभैय्या जोश्यांसारखा शापित गंधर्व! कधी कुमारजी, किशोरीताईंसारखे प्रतिभावंत तर कधी वीणा सहस्रबुद्धे. कधी शाहिदभाईंची गाणारी सतार, तर कधी आमच्या दातारबुवांचं लयदार व्हायलीन! कधी भाई गायतोंड्यांनी तबल्यात मांडलेला नादब्रह्माचा महायज्ञ तर कधी विश्वमोहन भट्टांची मोहनवीणेतली मोहिनी! कधी अजय चक्रवर्तीचं चमत्कृतीपूर्ण परंतु प्रतिभावन गाणं, तर कधी राशिदखानचं मस्त मिजास भरलेलं आमिरखानी गाणं! खूप खूप ऐकलं, अगदी मनसोक्त ऐकलं!

माझ्यासोबत काही वेळेला माझ्या काही समवयस्क मित्रमैत्रिणीही असायच्या. मग पाटणकर आजोबा आणि आम्ही सारी त्यांची नातवंड (!) एकत्र गाणं ऐकायचो आणि त्यानंतर कुठेतरी भरपूर खादाडीही करायचो, धमाल करायचो! वास्तविक पाटणकर अजोबांचं वय तेव्हाही पंचाहत्तरीच्या आसपास होतं. पण मनाने ते इतके तरूण होते की आम्हा कुणालाच कधी त्यांच्यात ऑडमॅन दिसला नाही. ते आम्हाला आमच्याच वयाचे, आमच्यातलेच कुणीतरी वाटत. त्यांचा उत्साह सर्वात अधिक!माझी सगळी मित्रमंडळी मला 'तात्या' म्हणत ते पाहून पाटणकर अजोबाही मला 'तात्या' म्हणू लागले. कधी मूड मध्ये असले की मला बाजूला घेऊन, "काय रे तात्या, ती अर्चना तुझ्यावर जाम खुश दिसते. जमवून टाक ना लेका! मी मध्यस्थ म्हणून बोलून पाहू का तिच्याशी?" असं हळूच डोळा मारून मला म्हणायचे! :)

पाटणकर आजोबांच्या घरीही मी अनेकदा गेलो आहे. मस्तपैकी चाळीतलं घर. आजोबा तिथे स्वतःपुरता स्वयंपाक करून एकटेच रहायचे. स्वयंपाक तर ते अतिशय उत्तम करायचे. त्यांच्या हाताला चव होती. "तात्या, वेळ आहे ना? बस निवांतपणे! पटकन पोहे टाकतो. मस्तपैकी पोहे खात खात हिराबाईंचा मुलतानी ऐकू!" असं म्हणून झकासपैकी कांदेपोहे करून आणायचे. खूप गप्पा मारायचे. भरभरून बोलायचे. त्यांच्या उत्तम तब्येतीचा तर मला नेहमीच हेवा वाटायचा. ७५-७६ व्या वर्षीही हा माणूस चांगली तब्येत राखून होता, स्वतःची सगळी कामं स्वतःच करायचा!

त्यांच्याकडे जुन्या पद्धतीचा फोनोग्राम होता. त्यावर त्यांच्याकडे असलेली, त्यानी चोरबाजारातून पाच पाच, दहा दहा रुपायाला विकत घेतलेली नारायणराव बालगंधर्वांची, हिराबाईंची आणि इतर अनेकांची ७८ आर पी एम च्या प्लेटांवरची ध्वनिमुद्रणे आम्ही एकायचो.

ध्वनिमुद्रणे ऐकता एकता पाटणकर आजोबा चंची उघडून स्वतःच्या हातानी माझ्याकरता पान जमवायचे. "तात्या, कात-चुना-सुपारी मी घालतो पण तंबाखू मात्र तुझा तू मळून घे हो!" असं गंमतीने म्हणायचे. वर पुन्हा "आपली व्यसनं आपण स्वत:च करावीत" हेही मिश्किलपणे सांगत. पाटणकर आजोबांच्या घरी खाल्लेल्या चमचमीत पोह्यांची, खमंग मुरबाडी आमटीभाताची, थालिपिठाची, आणि चुना-तुकडा कात- कच्ची रोठा सुपारी घालून जमवलेल्या पक्क्या कळीदार पानाची चव आजही माझ्या तोंडावर आहे! चुना-काळ्या तंबाखूच्या मळलेल्या चिमटीचा तो कडवट-मातकट स्वाद आजही मला पाटणकर आजोबांची आठवण करून देतो!

एकदा असाच पाटणकर आजोबांचा फोन आला. "अरे तात्या, येत्या रविवारी मी ८० वर्षांचा होतोय रे. दुपारी तुम्ही सगळे माझ्या घरी जेवायला या. अगदी नक्की आणि आठवणीने! वाट पाहतो!"

पाटणकर अजोबा ८० वर्षांचे झाले? केव्हा? मनाने तर ते एकविशीचे होते. आणि आम्ही सगळे त्यांच्या घरी जेवायला? आम्हा ५-६ मित्रमंडळींचा स्वयंपाक हा म्हातारा एकटा करणार? असा विचार करतच आम्ही तिघेचौघे मित्रमैत्रिणी आजोबांच्या बिर्‍हाडी गेलो. बघतो तर काय? घरात अक्षरश: गोकूळ नांदत होतं! पाटणकर आजोबा स्वतःच्या कुटुंबियांबद्दल कधीच माझ्याशी बोलले नव्हते आणि 'एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यात उगाच कशाला नाक खुपसा?' असा विचार करून मीही कधी तो विषय काढला नव्हता!

पाटणकर आजोबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या घरी चक्क त्यांची दोन कर्ती-सवरती मुलं अशोक आणि विद्याधर, सुना प्राजक्ता आणि नेहा, मुलगी सीमा आणि जावई प्रसाद, एवढी मंडळी जमा झालेली होती. आजोबांच्या आजुबाजूला ५-६ नातवंडं खेळत बागडत होती. पाटणकर आजोबांनीच त्या सगळ्यांशी, "हा माझा गाण्यातला जिवलग दोस्त तात्या" अशी माझी आणि आमची सर्वांची ओळख करून दिली!

मंडळी, खरंच सांगतो, आजोबांच्या घरचं ते गोकूळ पाहून अगदी आपोआपच माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले! 'पाटणकर आजोबा अगदी एकटे आहेत' अशी निश्चितपणे माझ्या मनात कुठेतरी भावना असणार. तिला सुखद तडा गेला असणार आणि म्हणूनच माझ्या आनंदाश्रूंना वाट मिळाली असणार!

पुढे असाच एकदा आजोबांच्या घरी गेलो असताना गप्पांच्या ओघात आजोबा कधी नव्हे ते स्वतःबद्दल बोलले. तसे ते खूप गप्पीष्ट होते परंतु स्वतःबद्दल फारच कमी बोलत. मला म्हणाले, "अरे तात्या, आमची सौ आम्हाला मध्येच सोडून गेली रे! तिला जबरदस्त कावीळ झाली, ती पोटात फुटली आणि सगळा खेळ खलास..मी मध्यमवर्गीय माणूस. तसा मला ग्लॅक्सो कंपनीत पगारबिगार बरा होता. शिवाय गावाकडचाही थोडाबहुत पैसा मिळाला म्हणून संसार तरी पूर्ण करू शकलो. माझी तिनही मुलं मात्र गुणी हो! उत्तम शिकली आणि आपापल्या मार्गाला लागली. सीमाही सुस्थळी पडली. दोन्ही मुलांनी उपनगरात मोठाल्या जागा घेतल्या आणि तिथे रहायला गेली. अरे त्यांचे संसार आहेत, मुलंबाळं आहेत. या चाळीतल्या दोन खोल्यात ते कसं जमणार?

मला प्रेमाने त्यांच्याकडे रहायला बोलावतात. इथे एकटे राहू नका म्हणतात. पण मीच जात नाही रे! चाळ सोडवत नाही बघ! आणि अजून परमेश्वराच्या कृपेने तब्येत चांगली आहे. उत्तम दिसतंय, उत्तम ऐकू येतंय, स्वतःचं सगळं स्वत:ला करता येतंय, आणि मुख्य म्हणजे गाठीशी चार पैसे आहेत हे महत्वाचं! पैशाचं सोंग घेता येत नाही रे तात्या! तेव्हा असा विचार केला की उगाच कशाला त्यांच्यात जा? त्यांचं त्यांना आयुष्य जगू दे की सुखाने! तेव्हा जमेल तितके दिवस इथे चाळीतच रहायचं असं ठरवलं आहे. मस्तपैकी गाण्याच्या मैफली वगैरे ऐकायच्या, धमाल करायची. शिवाय तुमच्यासारखी तरूण मित्रमंडळीही अधनंमधनं भेटतात, बरं वाटतं!"

पाटणकर आजोबा प्रसन्नपणे बोलत होते. बोलण्यात कुठेही खंत नव्हती, कडवटपणा नव्हता! पाटणकर आजोबांच्या रुपात एक उमदा मित्र मला बघायला मिळत होता. त्यांच्या आयुष्यात कसलीच तक्रार नव्हती, दु:ख नव्हती असं मी तरी कसं म्हणणार? त्यांच्याही काही तक्रारी असतील, दु:ख असतील, पण पाटणकर आजोबांची एकंदरीतच वृत्ती अशी होती की तिथे दु:खांना हा माणूस फार वेळ थाराच देत नसे! हिंदित 'सुलझा हुआ' असं काहीसं म्हणतात ना, तशी होती त्यांची पर्सनॅलिटी! जे आहे, जसं आहे त्यात आनंद मानायचा, उमेदीने जगायचं आणि आयुष्याचा जास्तीत जास्त आस्वाद घ्यायचा हेच त्यांचं धोरण होतं.

पाटणकर आजोबांना मी कधी फारसं रागावतानाही बघितलं नाही. "आजोबा, तुम्ही नेहमीच आनंदी दिसता, कधीच भडकत नाही, रागावत नाही, हे कसं काय?" असं त्यांना विचारल्यावर ते हसून मला म्हणाले होते, "अरे समोरच्या माणसाने कसं वागावं हे मी ठरवू शकत नाही ना! त्याला जसं वागायचंय तसंच तो वागणार! असं असताना मी त्याच्यावर उगाच कशाला रागावू? त्याला जसं वागायचंय तसं तो वागेल आणि मला जसं वागायचंय तसं मी वागेन! झाली की नाही फिट्टंफाट! मग कशाला उगाच रागावून भडकाभडकी करा आणि स्वत:चंच बीपी वाढवून घ्या?! खरं की नाही? दे पाहू टाळी!" असं म्हणत मोठ्याने हसले होते! :)

तर अशी पाटणकर आजोबांची आणि आमची दोस्ती बर्करार होती. गाण्याच्या मैफली झडत होत्या, खादाडीचे कार्यक्रम सुरू होते. म्हातारा अगदी 'या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे' या चालीने आयुष्य जगत होता आणि अशातच एके दिवशी ध्यानीमनी नसताना आजोबांच्या मुलाचा, विद्याधरचा मला फोन आला.

"कोण तात्याच ना? अरे मी विद्याधर पाटणकर बोलतोय! आज सकाळी बाबा वारले. त्यांच्या डायरीत तुझा नंबर सापडला म्हणून तुलाही कळवतोय."

झालं! आमच्या सांगितिक वारीतला एक वारकरी स्वतःच वैकुंठवासी झाला होता. मंडळी, हे सांगितिक ऋणानुबंध फार त्रास देतात. रक्ताच्या नात्यापेक्षा संगीतातली नाती अधिक घट्ट असतात! मी चुपचाप उठलो आणि आजोबांच्या घरी पोहोचलो. मुलं, सुना, लेक, जावई, नातवंडं सगळी जमली होती.

आमचा म्हातारा शांतपणे घोंगडीवर विसावला होता. झोपेत असतानाच मृत्यु आला होता. चेहेरा अगदी शांत दिसत होता, त्यावर कुठल्याही वेदना दिसत नव्हत्या. तक्रार करण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता त्यामुळे साक्षात मृत्यु भेटायला आल्यावरसुद्धा त्यांनी कुठलीच तक्रार केली नसणार!

आजोबांना पोचवून आम्ही पुन्हा त्यांच्या घरी गेलो. सुनबाईंनी पिठावर पणती वगैरे लावली होती. तिला नमस्कार केला. तिथून निघायला तर हवं होतं पण निरोप तरी कुणाचा घेणार? आता तिथे माझं कुणीच नव्हतं! शेवटी मी अशोक आणि विद्याधरशी औपचारिक पद्धतीने हात मिळवला व त्यांचा निरोप घेतला.

चपला घालून घराबाहेर पडणार तेवढ्यात मागनं आवाज आला,

"तात्या, वेळ आहे ना? बस निवांतपणे! पटकन पोहे टाकतो. मस्तपैकी पोहे खात खात हिराबाईंचा मुलतानी ऐकू!"

--तात्या अभ्यंकर.

संगीतवाङ्मयप्रतिभा

प्रतिक्रिया

धनंजय's picture

13 Oct 2007 - 5:26 pm | धनंजय

तुमच्या हृदयात, आणि तुमच्या जिव्हाळ्याच्या लेखाकरवी आमच्या आठवणीत ते उरले. अमृतत्व ते हेच.

प्रमोद देव's picture

13 Oct 2007 - 5:47 pm | प्रमोद देव

तात्या! अगदी पुलंची आठवण आली बघ. व्यक्तिचित्र इतके सुरेख उतरलंय की इतका वेळ(लेख वाचत असताना) मी तुम्हा दोघांची ध्वनिचित्रफीत पाहात आहे असे वाटत होते. जियो.तात्या जियो.ह्यापुढे शब्द अपुरे आहेत.

लिखाळ's picture

13 Oct 2007 - 7:40 pm | लिखाळ

तात्या,
व्यक्तिचित्र रंगवायची तुमची हातोटी काय वर्णावी. फार जिवंत चित्र उभे केलेत. वर अत्त्यानंद म्हणतात तसेच ध्वनिचित्रफित पागत आहे असेच वाटले.
तुम्हाला अश्या लोकांचा सहवास मिळाला हे भाग्यच.
(लेख वाचताना एकिकडे भैरवी ऐकली. )
--लिखाळ.
तो क वी डा ल डा वि क तो
(. ळखालि राणाहपा यसो चीलांमु ढ तन्यामाज च्याण्याचवा टेलउ)

सहज's picture

13 Oct 2007 - 10:27 pm | सहज

व्यक्तीचित्रे म्हणजे तात्यांचा हातखंडा प्रयोग बघा. नेहमीप्रमाणे यशस्वी. एखाद पान फक्कड जमावं व नेहमी त्याच एका पानवाल्याला ते खावसं वाटाव तस तात्याच व्यक्तीचित्र लिखाणात होत आहे. मस्तच रे तात्या!

या लेखणीची कमाल पण अशी की नेहमी अवतीभवती सामान्य असलेली माणस पण एका लेखातून एकदम यादगार व्यक्तीरेखा / वल्ली बनून जातात नाही?

>>वारले! अगदी शांतपणे आणि आनंदाने! एखाद्या जिवलग मित्राला भेटावं इतक्या सहजतेने मृत्युला भेटले!
>>आहे त्यात आनंद मानायचा, उमेदीने जगायचं आणि आयुष्याचा जास्तीत जास्त आस्वाद घ्यायचा हेच त्यांचं धोरण होतं.

बाकी परमेश्वरा मला तरी तू असेच जीवन व असेच मरण दे रे, दोन्ही शांतपणे आणि आनंदाने!

कोलबेर's picture

13 Oct 2007 - 11:47 pm | कोलबेर

तात्या व्यक्तिचित्रण मस्तच झाले आहे. आणि सलग एका दमात वाचयला मिळाल्याने फारच आवडले.
बाय द वे सालस म्हणजेच अर्चना का हो?..तो भागही पूर्ण करा आता लवकरच.. आम्ही वाट पहात आहोत.

केशवसुमार's picture

19 Oct 2007 - 3:45 pm | केशवसुमार

तात्या व्यक्तिचित्रण मस्तच झाले आहे. आणि सलग एका दमात वाचयला मिळाल्याने फारच आवडले.
कोलबेरशेठशी एकदम सहमत..
केशवसुमार

पाटणकर आजोबांचे व्यक्तिचित्र आवडले. प्रमोदकाका म्हणतात तशी पुलंची आठवण झाली. त्यांच्याच एका पत्रातली -- "पण तुम्हांला कळविणेस आनंद होतो की , 'हल्लीची पिढी बिघडली आहे' किंवा 'आमच्या वेळचं ते आता राहिलं नाही' यासारखी केवळ कवळीतूनच फुटायला योग्य अशी भाष्यं माझ्या तोंडून चुकूनही निघत नाहीत. हल्लीच्या मोगर्‍यालाही आपले नाक चोंदले नसल्यास कुठल्याही काळातल्या फुललेल्या मोगर्‍याइतकाच चांगला वास येतो." ही वाक्यं आणि पावभाजी खाणार्‍या-उत्तम संगीत ऐकणार्‍या आनंदयात्री आजोबांचं तत्त्वज्ञान यात फार काही फरक नसावा.

नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)

बेसनलाडू's picture

15 Oct 2007 - 7:34 am | बेसनलाडू

आहे.

स्वाती दिनेश's picture

14 Oct 2007 - 12:05 pm | स्वाती दिनेश

अतिशय सुंदर! आणि एकाच बैठकीत वाचायला मिळाले याचाही आनंद जास्तच आहे :)

व्यक्तिचित्र इतके सुरेख उतरलंय की इतका वेळ(लेख वाचत असताना) मी तुम्हा दोघांची ध्वनिचित्रफीत पाहात आहे असे वाटत होते. अत्त्यानंद म्हणतात त्याप्रमाणेच!

आता जरा अधिक मागणी: जरा ते जुने अर्धे "प्रकल्प" पूर्ण कर की ! शिंत्रे गुरुजी,सालस ची आम्ही वाट पाहतो आहोत,:)
स्वाती

देवदत्त's picture

14 Oct 2007 - 1:05 pm | देवदत्त

हे व्यक्तिचित्र इतके छान आहे की सर्व समोर घडत आहे आणि ते आपल्यातीलच एक आहे असे वाटते.

मैफल संपल्यानंतर एक सन्नाटा निर्माण झाला. लोकांना टाळ्या वाजवायचं भान नव्हतं!
हे वाक्यच त्या मैफिलीची रंगत सांगून जाते.

'पाटणकर आजोबा अगदी एकटे आहेत' अशी निश्चितपणे माझ्या मनात कुठेतरी भावना असणार. तिला सुखद तडा गेला असणार आणि म्हणूनच माझ्या आनंदाश्रूंना वाट मिळाली असणार!
एखाद्या व्यक्तीबद्दलची आपुलकी आणि त्यांचे मनातील स्थानच ह्यातून प्रकट होते.

पण मनाने ते इतके तरूण होते की आम्हा कुणालाच कधी त्यांच्यात ऑडमॅन दिसला नाही. ते आम्हाला आमच्याच वयाचे, आमच्यातलेच कुणीतरी वाटत.
खरे आहे... अशा व्यक्ती फारच कमी.

एकंदरीत एका मस्त माणसाला मुकलो हेच जाणवतेय.

धोंडोपंत's picture

14 Oct 2007 - 2:04 pm | धोंडोपंत

वा तात्या,

अप्रतिम व्यक्तिचित्रण लिहीले आहेस. हे पाटणकर आजोबा तुला भेटले हे तुझे भाग्य आणि त्यांच्याबद्दल तू येथे एवढे अप्रतिम लिहीलेस हे आमचे भाग्य.

अशी माणसे आयुष्यात क्वचित भेटतात आणि भेटली तरी आपल्याला सोडून पुढील प्रवासास जातात.

कुठे कुणाच्या घडल्या भेटी | गीत एक मोहरले ओठी ||

पाटणकर आजोबांच्या स्मृतीला आमचे अभिवादन.

आपला,
(नतमस्तक) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

चित्रा's picture

15 Oct 2007 - 11:18 pm | चित्रा

असेच वाटले.

प्रियाली's picture

14 Oct 2007 - 4:40 pm | प्रियाली

खूप दिवसांनी तुमच्या हातचं (किंवा मनातलं) घरगुती, सात्विक व्यक्तिचित्र वाचलं. अर्थातच, आवडलं हे सांगायला नको. शिंत्रे गुरुजी आणि रोशनीही पूर्ण करून टाका.

प्रमोद देव's picture

14 Oct 2007 - 9:48 pm | प्रमोद देव

दोन्हीही मस्तच आहे. आत्ता फुरसतीत ऐकले. मजा आली.मालिनी बाईंचे गाणे म्हणजे एकदम मनाची पकड घेणारे आणि श्रोत्यांना जागच्या जागी खिळवून ठेवणारे आहे ह्याचा पुन:र्प्रत्यय घेता आला.
धन्यवाद तात्या.

टग्या's picture

15 Oct 2007 - 7:55 am | टग्या (not verified)

व्यक्तिचित्र आवडलं. नेहमीप्रमाणेच छान जमलंय!

जुना अभिजित's picture

15 Oct 2007 - 11:20 am | जुना अभिजित

काही काही चेहेरेच असे असतात की 'याचं-आपलं जमणार!' याची खात्री पहिल्या भेटीतच होते.

हे अगदी खरं आहे. दोन चार वाक्यातच एकमेकांची तार जुळते. पण विरह दु:ख तरी कुणाला चुकले आहे काय?

अभिजित

प्रकाश घाटपांडे's picture

15 Oct 2007 - 6:33 pm | प्रकाश घाटपांडे

<<चपला घालून घराबाहेर पडणार तेवढ्यात मागनं आवाज आला,

"तात्या, वेळ आहे ना? बस निवांतपणे! पटकन पोहे टाकतो. मस्तपैकी पोहे खात खात हिराबाईंचा मुलतानी ऐकू!">>

तात्या डोळ्यातून पाणी आलं रे!

आपल्या पाटणकर आजोबांप्रमाणे कै. माधव रिसबूड आमचे मित्र. त्यांच्या सहवासातले दिवस आठवले. त्यांच्यावर मनोगत दिवाळी अंकात कदाचित लिखाण येईल. व्यक्तिचित्रातून फलज्योतिष चिकित्सा असा तो विषय आहे, अंनिस वार्तापत्र या ( दिवाळी? ) वार्षिक विशेषंकासाठी हा लेख दोने तिन वर्षांपुर्वी नाकारण्यात आला. कारण काय तर व्यक्तिमहात्म्याकडे झुकणारा आहे.
प्रकाश घाटपांडे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Oct 2007 - 6:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तात्या,
व्यक्तिचित्र आवडले.
चपला घालून घराबाहेर पडणार तेवढ्यात मागनं आवाज आला,
"तात्या, वेळ आहे ना? बस निवांतपणे! पटकन पोहे टाकतो. मस्तपैकी पोहे खात खात हिराबाईंचा मुलतानी ऐकू!"

हे वाचतांना आमच्याही डोळ्यात पाणी तरळलं !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्राजु's picture

16 Oct 2007 - 12:28 am | प्राजु

अप्रतिम व्यक्तीचित्र... पु.लं.च्या नंतर बहुतेक तुम्हीच...! वाचताना मलाही गहिवरून आलं.
- प्राजक्ता.

आर्य चाणक्य's picture

21 Oct 2007 - 6:16 am | आर्य चाणक्य

अप्रतिम व्यक्तिचित्र ह्याबाबात काही वाद नाही पण पु.लं.च्या नंतर एकदम तात्याच असे म्हणून असे म्हणून आपण पु.लं.चा काहिसा पाणउतारा करत आहात.
जमल्यास पु.लं.चे समग्र साहित्य वाचा आणि मगच आपल्याला आमच्या विधानातील अर्थ कळेल. तात्या व्यक्तिचित्रं उत्तम लिहितात ह्यात काही वादच नाही पण पु.लं.शी तुलना करण्यासाठी त्यांना अजुन बरेच अंतर जावे लागेल असे आम्हाला तरी वाटते. तात्या प्रामाणिक मत आहे समजून घ्यालचं!

- चाणक्य

विसोबा खेचर's picture

21 Oct 2007 - 7:55 am | विसोबा खेचर

तात्या व्यक्तिचित्रं उत्तम लिहितात ह्यात काही वादच नाही पण पु.लं.शी तुलना करण्यासाठी त्यांना अजुन बरेच अंतर जावे लागेल असे आम्हाला तरी वाटते. तात्या प्रामाणिक मत आहे समजून घ्यालचं!

अहो त्यात समजून काय घ्यायचं? आपलं म्हणणं अगदी खरं आहे! पुलं, भीमसेन, कुसुमाग्रज, ही मंडळी फक्त एकदाच होतात!

आमचे भीमण्णा नेहमी म्हणतात की गुरू नेहमी इतका मोठा असा असावा की त्याच्यापर्यंत आपण कधीही पोहोचूच शकणार नाही! किंबहुना, अश्याच माणसाला आपण आपला गुरू करावा, गुरू मानावा, तरच आपली थोडीफार प्रगती होऊ शकते!

प्राजुच्या मनात पटकन जे आलं तेच तिने लिहिलं आणि त्याचा मी आदरच करतो परंतु भाईकाका माझे गुरू आहेत एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो!

तात्या.

विसोबा खेचर's picture

16 Oct 2007 - 7:57 am | विसोबा खेचर

प्रतिसाद देणार्‍या सर्वांचे मनापासून आभार..

आपल्या सर्वांचे प्रतिसाद मला मोलाचे आहेत..

'पाटणकर आजोबा' हे व्यक्तिचित्र भाईकाकांच्या चरणी सादर समर्पित!

काही मंडळींना हे व्यक्तिचित्र वाचताना भाईकाकांची आठवण झाली, या परिस मोठा सन्मान तो कुठला? माझ्यावर त्यांचा असाच वरदहस्त रहावा एवढीच इच्छा आहे!

'व्यक्तिचित्र' हा माझा सर्वात आवडता साहित्यप्रकार. भाईकाकांनी या प्रकाराला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं आहे. मी ष्टुलाबिलावर चढून तिथपर्यंत हात पोहोचतो आहे का ते पाहतो आहे, जेणेकरून तो लाडवांचा डबा माझ्या हाती लागेल! :) परंतु अजून मी फारच तळाशी उभा आहे याची नम्र जाणीव आहे! आजपर्यंत त्यांचंच बोट धरून चालण्याचा प्रयत्न करतो आहे आणि यापुढेही करत राहीन!

आत्ता फक्त 'सा' लावायला शिकतो आहे, अजून भीमसेन खूप दूर आहेत!

तात्या.

आर्य चाणक्य's picture

21 Oct 2007 - 6:20 am | आर्य चाणक्य

परंतु अजून मी फारच तळाशी उभा आहे याची नम्र जाणीव आहे!

तात्या आज पर्यंतचा तुमचा आत्मस्तुतीचा हट्ट पाहाता आपण लिहिलेला हा प्रतिसाद फारच आवडला. आपला लेखनाचा दर्जा आता वाढत जाणार ह्यात आम्हाला काहीही शंका नाही.

तात्या, मला ह्या लेखाने आचार्य अत्र्यांची आठवण करून दिली.
ते मृत्यूलेखांचे अनभिषिक्त बादशाह होते.
ज्या नेहरूंची "संयुक्त महाराष्ट्र" चळवळीदरम्यान त्यांनी यथेच्छ टिंगल केली त्यांच्यावरचा मृत्यूलेख (सूर्यास्त?) अविस्मरणीय ठरला.

मला माहित नसलेल्या व्यक्तीरेखेस केवळ मृत्यूलेखानेच परिचित करवून माझ्यासाठी ती आदरणीय ठरवण्याचे तुमचे कसब वाखाणण्यासारखेच आहे.

ऐंशीव्या वर्षीही स्वतःचे स्वतः जगणे कौतुकास्पद आहे. हल्ली आपल्याला स्वतःच्या सर्व गोष्टी स्वतः करायच्या म्हटल्या तर केवळ शिक्षा वाटावी एवढे आपले जीवन श्रमविभाजनाच्या आधारे सुरू आहे. आपल्यालाही ऐंशी वयोमान कालवशात प्राप्त व्हावे आणि संपूर्णपणे स्वस्वाधिन, स्वावलंबी आयुष्य जगता यावे हा बोध मला ह्यातून घेण्यासारखा वाटतो. शिवाय त्यांची इतरांबाबत निरपेक्षता आणि कलासक्तताही आपल्याला घेता आली तर सोनिया सुगंधू येईल. तात्या तथास्तू म्हणा!

अविस्मरणीय व्यक्तिरेखा साकारणार्‍या ह्या लेखाखातर हार्दिक अभिनंदन !

साती's picture

17 Oct 2007 - 2:18 am | साती

तात्या, सुरेख लिहिला आहे लेख. असेच उत्तमोत्तम लेख तुमच्याकडून येथे वाचायला मिळावेत ही अपेक्षा.
साती

विश्वजीत's picture

17 Oct 2007 - 6:55 pm | विश्वजीत

आवडले. आणखीही वाचायला आवडतील.

विश्वजीत

विसोबा खेचर's picture

18 Oct 2007 - 7:08 am | विसोबा खेचर

गोळेसाहेब, साती, विश्वजीत,
आपल्या तिघांचेही आभार...

गोळेसाहेब, आम्ही 'तथास्तु' म्हणतो! :)

साते, अगो तुझा पत्ता काय? आहेस कुठे? बरी आहेस ना? जावई काय म्हणतात आमचे? :)

तात्या.

चित्तरंजन भट's picture

18 Oct 2007 - 4:27 pm | चित्तरंजन भट

तात्या वरील सर्वांशी सहमत आहे. अतिशय उत्तम लेख झाला आहे.

आजानुकर्ण's picture

18 Oct 2007 - 6:18 pm | आजानुकर्ण

तात्या,

लेख आवडला. अजून येऊ द्या.

- (चातक) आजानुकर्ण

ध्रुव's picture

18 Oct 2007 - 6:21 pm | ध्रुव

वा तात्या,
छान जमलं व्यक्तिचित्र!! अगदी जसच्या तसं डोळ्यासमोर आले आजोबा.
आज वेळ झाला आणि एका दमात वाचला लेख. खरोखरच डोळ्यात पाणी आले. असेच लिहीत राहा, आम्ही वाचत राहू.

ध्रुव
http://www.flickr.com/photos/dhruva

ईत्यादि's picture

19 Oct 2007 - 6:44 am | ईत्यादि

वेगळाच अनुभव झाला हे व्यक्तिचित्र वाचुन, सहज आणि सुखद असा.

ईत्यादि

विसोबा खेचर's picture

19 Oct 2007 - 8:45 am | विसोबा खेचर

चित्तोबा, कर्ण, धृव, इत्यादी,

तुम्हा मंडळींचे मनापासून आभार...

तात्या.

झकासराव's picture

19 Oct 2007 - 2:16 pm | झकासराव

व्यक्तीचरीत्र खुपच मस्त लिहिता हो तुम्ही.
एकदम फर्मास जमलय.

तो's picture

19 Oct 2007 - 4:14 pm | तो

व्यक्तिचित्रण व व्यक्तिमत्व दोन्ही आवडले.

सर्किट's picture

20 Oct 2007 - 1:15 am | सर्किट (not verified)

तात्या,

जरा उशीराच वाचतोय, त्यामुळे प्रतिसाद द्यायलाही उशीर झाला.

फार सुंदर उतरलाय लेख !

इतका, की आपल्यावरही कुणीतरी असा लेख लिहावा, (नंतर, आत्ता नाही :-) असे वाटले.

- सर्किट

राजीव अनंत भिडे's picture

21 Oct 2007 - 2:53 pm | राजीव अनंत भिडे

"तात्या, वेळ आहे ना? बस निवांतपणे! पटकन पोहे टाकतो. मस्तपैकी पोहे खात खात हिराबाईंचा मुलतानी ऐकू!"

तात्या,

अतिशय चित्रदर्शी व्यक्तिचित्रण केले आहेस. व्यक्तिचित्रणात आता तुझी चांगलीच पकड जमत चालली आहे यात काहीच वाद नाही. केवळ आंतरजालावरच नव्हे, तर मराठी साहित्यातही अलिकडे अशी तुमच्या-आमच्यातली साधीसुधी व्यक्तिचित्रं अभावानेच वाचायला मिळतात. पाटणकर आजोबांचे व्यक्तिचित्र नक्कीच मनात कुठेतरी घर करून गेले. पुलंची आठवण झाली!

अवांतर - आईलाही अतिशय आवडले. आईने मुद्दाम संगणकाजवळ बसून, नीट दिसत नसतानाही हळूहळू वाचले!

राजीव अनंत भिडे,
हिंदु कॉलनी, मुंबई.

शेणगोळा's picture

30 Oct 2008 - 5:52 pm | शेणगोळा

पाटणकर आजोबा खूप भावले मनाला.

सर्वांचाच लाडका,
शेणगोळा.

यशोधरा's picture

30 Oct 2008 - 6:15 pm | यशोधरा

काय सुरेख लिहिले आहेत तात्या!

तात्या,
व्यक्तीचित्रण एकदम खास झाले आहे.
पाटणकर आजोबा मनात घर करून गेले . :)

चतुरंग's picture

30 Oct 2008 - 6:44 pm | चतुरंग

लेका काय रंगवले आहेस रे पाटणकर आजोबा!
व्यक्तिचित्राच्या शेवटाला रडायचं नाही असं ठरवून शेवटाकडे जायला लागलो आणि शेवटचं वाक्य संपताना डोळे कधी डबडबून आले समजलं नाही रे.
फारच छान! हॅट्स ऑफ!!

(खुद के साथ बातां : रंग्या, तू मिपाकर होण्यापूर्वीचे लेखन एकदा सवड काढून वाचावेच लागेल, नाहीतर मोठ्या आनंदाच्या ठेव्याला मुकशील!)

चतुरंग

सुनील's picture

30 Oct 2008 - 8:43 pm | सुनील

सुंदर आणि जिवंत चित्रण!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

वैशाली हसमनीस's picture

31 Oct 2008 - 5:54 am | वैशाली हसमनीस

तात्या ,फारच चांगली भट्टी जमली आहे हो. शेवटच्या वाक्यांनी तर डोळे पाणावले.

श्रीकृष्ण सामंत's picture

31 Oct 2008 - 6:31 am | श्रीकृष्ण सामंत

तात्याराव,
किती सुंदर लिहिता.पाटणकर आजोबा हुबेहुब पाहील्या सारखे वाटतात.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

अनिल हटेला's picture

31 Oct 2008 - 7:40 am | अनिल हटेला

सुंदर आणि जिवंत चित्रण!!!!
आजोबा मनात घर करून गेले !!!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

मदनबाण's picture

31 Oct 2008 - 7:54 am | मदनबाण

तात्या फारच सुरेख लिहले आहे तुम्ही.. :)

मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

चिगो's picture

5 Nov 2010 - 12:14 am | चिगो

आजोबांना आणि तुम्हाला पण..

शहराजाद's picture

5 Nov 2010 - 8:30 am | शहराजाद

वा, तात्या! उत्तम व्यक्तिचित्र. मोजक्या शब्दांत तुमच्या स्नेहबंधातला जिव्हाळा पुरेपूर उतरला आहे.

शिल्पा ब's picture

5 Nov 2010 - 10:51 am | शिल्पा ब

उत्तम लेख...

डावखुरा's picture

5 Nov 2010 - 2:16 pm | डावखुरा

हृदयस्पर्षी........

तात्या. फारच छान.

तुम्हाला (आणि इतर सर्व रसिकांनासुध्दा) दिवाळीची भेट.

पंडीत भिमसेन जोशी यांची पु.लं.नी घेतलेली मुलाखत.
http://www.esnips.com/doc/fd8ac0de-e87d-4dd3-a194-313ee369a92c/Bhimsen-J...

आकाशवाणीवर प्रक्षेपीत झाली होती...

हा लेख वरती आणणा-या शिल्पा बचे आभार.

श्रावण मोडक's picture

21 Mar 2012 - 12:56 pm | श्रावण मोडक

एकेकाळी इथं हा'ही' माणूस 'असं'ही लेखन करत होता, याची नोंद करण्यासाठी हा प्रतिसाद. यानिमित्ताने धागा वर येईल आणि कदाचित चार जण वाचतीलही. :)

बिपिन कार्यकर्ते's picture

21 Mar 2012 - 2:33 pm | बिपिन कार्यकर्ते

मोडकांचे सगळे गुन्हे माफ करावेत असं वाटतंय! :)

>>>मोडकांचे सगळे गुन्हे ????
गल्ली चुकली का बिका ?;-)
असो , तथास्तु म्हणतो आणि पळतो......

चाणक्य's picture

22 Mar 2012 - 11:24 pm | चाणक्य

एकेकाळी इथं हा'ही' माणूस 'असं'ही लेखन करत होता

म्हणजे काय? कळलं नाही

इरसाल's picture

21 Mar 2012 - 2:29 pm | इरसाल

या निमीत्ताने उरलेले लेखही पुर्ण करायची मनधरणी केली जावी.

स्पा's picture

21 Mar 2012 - 2:41 pm | स्पा

__/\__

अप्रतिम
धागा वर आणल्याबद्दल आभार

चौकटराजा's picture

21 Mar 2012 - 6:46 pm | चौकटराजा

हा धागा आपण वर आणला नसता तर मी माझ्या आयुष्यातील एका मोठ्या आनंदला मुकलो असतो. पीयेल असते तर म्हणाले असते
" तात्या तू नाशिकच्या तात्याच्या तोडीचं लिहिलयस की ! " आम्ही म्हणतो " तात्या आपण प्यीयेल च्या तोडीचं लिहिलं आहे.

आशु जोग's picture

21 Mar 2012 - 11:51 pm | आशु जोग

शंका

"कधी कुमारजी, किशोरीताईंसारखे प्रतिभावंत तर कधी वीणा सहस्रबुद्धे."

म्हणजे नेमके काय ?

चौकटराजा's picture

22 Mar 2012 - 7:14 am | चौकटराजा

च्यायला मिपा म्हणजे कमालच आहे. इथे एक एक शब्द जपूनच टंकावा लागतो. आपण चौकटराजा हे मतिमंद नाव घेतलं बरे झाले. मी वेगळा
बावळा म्हटले की सुटलो.

निशदे's picture

22 Mar 2012 - 12:11 am | निशदे

फारच सुंदर......... खास शैलीतील सुंदर लेख.........

अन्तु बर्वा's picture

5 Jul 2012 - 8:38 pm | अन्तु बर्वा

आज जर आमचे पुलदैवत असते तर त्यानी व्यक्ति आणी वल्लि मधे नक्की ' पाटणकर आजोबान्ना' पान धरावयास लावले असते!
कुठलेही व्यक्तीचित्र सजवायला तीन गोश्टीन्ची गरज असते.
१) उत्कृष्ठ निरीक्षण शक्ती.
२) केलेले निरीक्षण शब्दात उतरवयची ताकत
३) नशीब!
आता नशीब ह्या साठी की ज्यांचे व्यक्तिमत्व शब्दात उतरवावे अशा लोकांचा सहवास प्रत्येकाला मिळत नाही. परमेश्वर कृपेने ह्या तींनी गोष्टी तुम्हाला मिळालेल्या आहेत. अगदी पुलं सारख्या.
मी अगदी अलीकडे मिपाचा सदस्य झालो. मागची पाने उलटता उलटता तुमचा एक लेख हाती (की माउसला!) लागला आणी एका पाठोपाठ तुमचे लेख वाचत गेलो. खरं सांगायचं तर तुमचा हेवा वाटतोय! अहो भिमण्णा, पुलं या सारख्या देव माणसान्चा सहवास तुम्हाला लाभला! आम्ही करन्टे की कालचक्राच्या चुकीमुळे ह्या पिढीत जन्माला आलो.

बाकी तुमच्या लेखनाला __/\__!

अवांतर: तेवढं एकदा 'भाग्यदा लक्ष्मी बारम्मा' वर लिहा. दैवी गाणं आहे हो ते!

अर्धवटराव's picture

6 Jul 2012 - 12:07 am | अर्धवटराव

>>आम्ही करन्टे की कालचक्राच्या चुकीमुळे ह्या पिढीत जन्माला आलो.
-- अरे असं म्हणु नको. आपल्या पुलदैवताला रुचणार नाहि ते. पु.ल. संप्रदायात "मनुष्यत्व" हि एकच गोष्ट शाश्वत मानली गेली आहे. आणि हे मनुष्यत्व प्रचंड उमदेपणाने सदैव - सर्वत्र नटलेले आहे. त्याचा उपघोग घे.

अर्धवटराव

अनिवासि's picture

9 Jul 2012 - 4:07 pm | अनिवासि

हा धागा चुकला होता पण परत वर आल्याने वाचावयास मिळाला. धागा वर आणणार्यास धन्यवाद !
आयुष्य जगावे तर पाटणकर आजोबासारखे आणि मित्र असावेत ते aapreciate करणार्या तात्यासारखे.
तात्या अशा मित्राची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद.

तिमा's picture

9 Jul 2012 - 5:37 pm | तिमा

'शब्दजुलाबी' धागे गाडून टाकण्यासाठी असे दर्जेदार धागे वर आणणे ही चांगली आयडिया आहे.

चित्रगुप्त's picture

10 Sep 2013 - 2:39 am | चित्रगुप्त

व्वा तात्या व्वा.
आज केवळ योगायोगानं हा लेख वाचायला मिळाला. अत्यंत सुंदर.
अशी माणसे आयुष्यात येणं, ही खरी श्रीमंती.
तसंच आत्ताच तुमचं 'शाहीन' हेही व्यक्तिचित्रं वाचलं. त्याचा पुढला भाग लिहिलात का? असल्यास दुवा द्यावा, नसल्यास लौकर लिहा.
शुभेच्छा.

दत्ता काळे's picture

10 Sep 2013 - 12:01 pm | दत्ता काळे

हा धागा ज्यांनी वर काढला त्यांचे मी आभार मानतो.
तात्या..अतिशय उत्तम आणि भावस्पर्शी व्यक्तिचित्रण लिहिलंत.

तक्रार करण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता त्यामुळे साक्षात मृत्यु भेटायला आल्यावरसुद्धा त्यांनी कुठलीच तक्रार केली नसणार! वा. वा..

सामान्य वाचक's picture

10 Sep 2013 - 12:09 pm | सामान्य वाचक

खुप सुन्दर.
आणखी असेच धागे वरती काढा लोक्स

उगा काहितरीच's picture

10 Sep 2013 - 12:11 pm | उगा काहितरीच

___/\__

भ ट क्या खे ड वा ला's picture

10 Sep 2013 - 1:48 pm | भ ट क्या खे ड वा ला

आजोबांना आणि तुम्हाला पण..
"जिंदादिल" असलेले दुसरे पाटणकर भेटले
पहिले वा. वा.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

10 Sep 2013 - 4:29 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

लेखन चटका लावून गेलो. काही ऋणानुबंध अनाकलनीय असतात.
अवांतरः मालिनीताईंच्या गाण्याबद्दल लिहीलेल्या शब्दाशब्दाशी बाडीस. मी तो अनुभव घेतला आहे, फक्त तुमच्यासारखा शब्दात उतरवता येणार नाही कधी मला. मालिनीताईंना __/\__!!
प्रथम त्यांचे गाणे ऐकले तेव्हा कां कुणास ठाऊक त्यांच्या पायावर डोके ठेवावेसे वाटले. म्हणून मैफल संपल्यावर त्यांच्याकडे गेलो. पायावर डोके ठेवले तसे त्यांनी मला दंडाला धरुन उठवले, अन म्हणाल्या, गाणं आवडल कां? च्यायला डोळ्यात टचकन पाणी आले.. परत पाया पडलो त्यांच्या!!

अनिरुद्ध प's picture

11 Sep 2013 - 12:38 pm | अनिरुद्ध प

खरच शब्द सुचत नाहीत अशीच पु ल ची लेखनशैली आठवली.

अद्द्या's picture

12 Sep 2013 - 1:13 am | अद्द्या

:)

Rahul D's picture

20 Mar 2016 - 1:18 am | Rahul D

व्वा तात्या व्वा.