उन्मन क्षण

बहुगुणी's picture
बहुगुणी in जनातलं, मनातलं
5 Apr 2011 - 10:11 am

मुलाचा तमीळ सहकारी रुपेश आणि इतर मित्रही घरी आले होता गप्पा मारायला, क्रिकेट वर्ल्ड कपचा जल्लोष संपला तरी चर्चा चालूच होत्या.

For a change, मी सीएनएन लावलं. Anderson Cooper चं AC 360 चालू होतं, जपान मधल्या हाहा:काराचं वर्णन संपून सुरु झालं ते मध्य-पूर्वेत आणि इतरत्र पसरतच चाललेल्या अशांततेचं सविस्तर कव्हरेज. ट्युनिशिया आणि इजिप्त पासून सुरु झालेली जन-क्रांतीची लाट पसरत चालली आहे.... सिरीया, बहारीन, जॉर्डन तसंच लिबिया आणि येमेन - वडवानलासारखा जनेच्छेचा रेटा प्रस्थापित व्यवस्थेला आव्हान देतोय, कुठे तरी एखादा ओळखीचा नेता, पण बराचसा निर्नायकीच संग्राम.

बराच वेळ टी व्ही कडे लक्ष देऊन ऐकत असलेला रुपेश एकदम म्हणाला, "अंकल, आप को क्या लगता है? With all the corruption scandals going on, will India be the next one for such things?"

माझ्या मनात बरेच दिवस सुप्तावस्थेत असलेला प्रश्न असा एकदम माझा गळा धरेल असं वाटलं नव्हतं.. मी एकदम चाचरलो, थोडं सावरून म्हणालो, "India does need a change, but I am not sure these countries with non-democratic traditions would be the model for a change in India. I think Indians are not this unhappy with our form of government. I hope they will bring about a change, but it will perhaps be gradual. Unlikely to be so drastic, or violent."

रूपेशने मान हलवली. क्षणभर थांबून म्हणाला, "I guess that's right. But do we have time to make a gradual change? I am twenty five, and I would like to see the change sooner rather than later." इतर मित्रांकडे वळून तो म्हणाला, "What do you guys think?"

पुढची चर्चा घरातल्या तरूणाईने हातात घेतली आणि बराच वेळ हिरीरीने अभ्यासपूर्ण वाद-विवाद रंगले, जेवणाची वेळ होईपर्यंत.

पण माझं मन केंव्हाच खूप वर्षं मागे गेलं होतं, सायमन-गारफंकेल या दुकलीच्या Sound of Silence या गाण्यात रंगलं होतं.

रात्री वेळ मिळाला तेंव्हा मी यू ट्यूब वरून ते व्हिडिओ शोधून काढले. सर्व झोपल्यानंतर झपाटल्यासारखं मनात आलेलं स्वैर रुपांतर टंकलिखित करून ठेवलं.

काल दिवसभराच्या कामात ती चर्चा, ते लिखाण, विसरून जायला झालं होतं, पण मग नाना पाटेकरचं महाराष्ट्र टाइम्स मधलं लिखाण वाचण्यात आलं आणि पुन्हा खपली निघाली.

भारतीय संघाचं विश्वचषक जिंकल्याबद्दल कौतुक करणाऱ्या लेखात अखेरीला नाना म्हणतो, ..."रस्त्यावर मैदानातल्या गवतासारखी माणसं उगवली होती. ब्रिटीशांनंतर मुंबई पहिल्यांदाच एवढी घनदाट वाटली. मुंबईच का; सारा भारतच. स्वातंत्र्याचा लढा पुन्हा सुरू झाल्यासारखं वाटलं. आपण विश्वचषक जिंकला. तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन.

एकच गोष्ट मनात आली की अत्याचार, भ्रष्टाचाराविरुद्ध आमची लोकं रस्त्यावर अशी कधी उतरतील?

ज्या दिवशी उतरतील, त्या दिवशी आम्ही सारंच जिंकलेलं असेल. ..."

तर सुहृदहो, हे आहेत मला पूर्वी कधी-काळी स्वातंत्र्याची आगळीच जाणीव करून देणार्‍या आणि तितक्याच भेदकपणे आजही उन्मन करणार्‍या २ व्हिडिओंचे दुवे:

एक आहे पॉल सायमन आणि आर्ट गारफंकेल यांचा खूप सुरुवातीचा, तर दुसरा त्यांचाच पण ते २५ वर्षांनी पुन्हा त्याच गाण्यासाठी एकत्र आले तेंव्हाचा.

आणि खाली आहेत ते माझे वेडे-वाकुडे शब्द, त्या गाण्याच्या रुपांतराचे...(मूळ गीत रचना इथे मिळेल)

अरे काळोखा रे, जुन्या जिवलगा रे
परतुनी आलो तुला भेटण्या रे
दृश्य एक हळू हळू थोडे ओसरले
माझ्या झोपल्या मनात त्याचे बीज पसरले
लपेटून शांततेच्या स्पंदनात न्हाले

निघालो एकला स्वप्नाच्या लाटेने
इवल्याश्या फरशीच्या निमुळत्या वाटेने
झोत मंदसा टाकीत दिवे रस्त्याचे
थंड हवेत शहारे तन माझे हे साचे
आणि अचानक डोळा खुपले ते भाले
रात्र चिरत प्रकाशाचे कवडसे आले
लपेटून शांततेच्या स्पंदनात न्हाले

त्या नग्न प्रकाशात दृश्य पाहिले एवढे
दहा हजार असावे, लोक अधिकही थोडे
नुसतेच उच्चारती, परि बोलती ना कुणी
कान उघडे परंतु ऐकती ना कुणी
नसे गात कुणी तरी गाणी लिहित राहिले
शांततेच्या स्पंदनांच्या कुणी वाटेला न गेले

'अरे, मुर्खांनो' म्हणालो, 'नाही ठाऊक एवढे?
अशी शांतता भयाण जसा कर्करोग वाढे
शब्द माझे घ्या मुखात, उठवा ती राने
हात माझे घ्या हातात, उभे रहा आधाराने'
पण शब्द माझे ते गळाले जसे थेंब ओघळावे
खोलवर विहिरीत पुन्हा शांतता डोकावे

लोक झुकले, वाकले, हात जोडीते ते झाले
चिरणाऱ्या प्रकाशाला त्यांनी देवत्व दिधले
आकाशातून जाहली मग प्रेषीतांची वाणी
शांततेच्या स्पंदनांनी केले तांडव तयांनी

................

रूपेशच्या प्रश्नाचं उत्तर अजून तरी माहीत नाही: .."do we have time to make a gradual change?"

माझ्या जाणीवेच्या कालावधीतच ते मिळेल अशी आशा आहे!

संगीतसमाजप्रकटनआस्वाद

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

5 Apr 2011 - 11:32 am | यशोधरा

मस्त. वाचनखूण साठवली.

विकाल's picture

5 Apr 2011 - 5:03 pm | विकाल

"do we have time to make a gradual change?".....

कितीक खपल्या रोज निघतात...कितीक ह्ल्ले रोज......

क्षणाक्षणाला वेडावून दाविते मूढ भविष्याचे भान....

विकल न विकट तरीही स्वप्न धीराचे मोज...

आभा पसरेल घेऊन कितीक काळाचे मोल...?

मुलूखावेगळी's picture

5 Apr 2011 - 7:54 pm | मुलूखावेगळी

छान लिहिलेत
विचार करायला लावनारे

माझ्या जाणीवेच्या कालावधीतच ते मिळेल अशी आशा आहे!

असेच होवो

पैसा's picture

5 Apr 2011 - 8:04 pm | पैसा

गीताचा भावानुवाद आणि त्या अनुषंगाने मांडलेले विचार खूपच भावले.

>>"do we have time to make a gradual change?"

जोपर्यंत बदल व्हावा असं लोकांना वाटतंय, तोपर्यंत मी तरी आशावादी आहे!!!! ज्या दिवशी लोक "बदल हवा", असं म्हणायचं थांबतील, त्या दिवशी सगळा काळोख होईल.

स्वाती दिनेश's picture

5 Apr 2011 - 8:04 pm | स्वाती दिनेश

विचार करायला लावणारा लेख.. जालापासून दूर असल्याने जरा उशिराच वाचला..
स्वाती

रेवती's picture

5 Apr 2011 - 8:44 pm | रेवती

एकच गोष्ट मनात आली की अत्याचार, भ्रष्टाचाराविरुद्ध आमची लोकं रस्त्यावर अशी कधी उतरतील?
त्यादिवशी हाच विचार मनात आला होता किंबहुना प्रत्येकाच्या मनात डोकावून गेलाच असणार. भ्रष्टाचारी लोकांच्या मनातही हा विचार येउन गेला असणार. लेखन नेहमीप्रमाणेच चांगले झाले आहे.

पिवळा डांबिस's picture

5 Apr 2011 - 10:30 pm | पिवळा डांबिस

खूप आवडला!!!
जियो!!!

एकच गोष्ट मनात आली की अत्याचार, भ्रष्टाचाराविरुद्ध आमची लोकं रस्त्यावर अशी कधी उतरतील?
कठीण आहे! याचं कारण दैन्य!!! आणि राजकीय, सामाजिक आणि वैचारीक औदासीन्य!!!
दैन्य अत्याचार निमूटपणे सहन करायला लावतं माणसाला....
:(

ज्या दिवशी उतरतील, त्या दिवशी आम्ही सारंच जिंकलेलं असेल. ..."
जरूर उतरतील...
अहो इंग्रजाने दीडशे वर्षं राज्य केलं. माणसं पिढ्यानपिढ्या अत्याचार सहन करत राहिली...
पण एके दिवशी एक अर्धनग्न म्हातारा उभा राहिला आणि म्हणाला आम्ही नाही सहन करणार!!!
पुढे काय घडलं ते सगळ्या जगाला माहितीच आहे!!!!
:)

विकास's picture

5 Apr 2011 - 11:38 pm | विकास

लेख खुप छान आहे! विचार भावले!

एकच गोष्ट मनात आली की अत्याचार, भ्रष्टाचाराविरुद्ध आमची लोकं रस्त्यावर अशी कधी उतरतील?

ज्या दिवशी क्रिकेटसह इतर आकर्षणे बंद होतील त्या दिवशी! माझे हे वाक्य कृपया क्रिकेटच्या विरोधात घेऊ नका कारण तसा उद्देश नाही. पण हे वास्तव आहे की आपल्याला समाज म्हणून कशात तरी गुंतवून ठेवण्यात आपले राजकारणी तरबेज आहेत. मग त्यात कधी क्रिडा असेल तर कधी धर्म, कधी जात, कधी इंडीयन आयडॉल, तर कधी अजून काही... फक्त भ्रष्टाचार सोडून.

"do we have time to make a gradual change?"

व्यक्तीगत आयुष्यात म्हणत असाल तर कदाचीत मला हे १०-१५ वर्षांपुर्वीच झालेले हवे. (Not even yesterday!). रुपेशला आत्ता हवे असेल. पण मला वाटते ते हळूहळू घडत आहे आणि तसेच घडत असलेले चांगले आहे. त्यात भ्रष्टाचार हा एक मुद्दा आहे. आपली नागरी जबाबदारी आणि उद्योगांची जबाबदारी देखील पाळली जात आहे का, ह्यावर देखील विचार होणे गरजेचे आहे.

नंदन's picture

6 Apr 2011 - 12:02 am | नंदन

अतिशय आवडला. शांततेचे स्पंदन हे रूपांतरही चोख! ह्या स्थितिस्थापकत्वाचे तोटे बरेच आहेत, पण थोडी जमेची बाजूही त्यात असावी असं वाटतं.

प्राजु's picture

6 Apr 2011 - 12:20 am | प्राजु

सुरेख!!
खरंच.. रोज प्रश्न पडतो हा. do we have time to make a gradula change??.. नाहिये उत्तर याचं!!

प्रत्येक क्रांतीचे एक रुप असते. सध्या उत्तरआफ्रिका आणि मध्य आशियात सुरु असलेली क्रांती ही एकाधिकारशाही, हुकूमशाही विरोधात असल्याने त्याची तीव्रताही तेवढी आहे. लोकशाहीच्या अनेक फायद्यांबरोबर एक फार मोठा तोटा असा असतो की हक्क आणि कर्तव्ये ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत ह्याचा लोकांना विसर पडतो. आपले हक्क मागताना लोकशाहीतली कोणती कर्तव्ये जबाबदारीने पार पाडली पाहिजेत हे एकदा नजरेतून निसटले की त्याचा फायदा टपून बसलेले इतर सगळेच घेतात, राजकारणीच नव्हे तर, उद्योगधंदेवाले, चॅनेलवाले, अतिरेकी सगळे सगळे. तात्कालिक फायदे, प्रश्नातून झटपट सुटका, कायदा शक्यतोवर वाकवायला/तोडायला बघणे अशा रुपाने समाज भ्रष्टाचाराला खतपाणी घालत असतो. विकासने वरती मांडलेला क्रिकेटचा मुद्दा अगदी बरोबर आहे. लोकांच्या खद्खदीला, अस्वस्थपणाला वाट मिळते ती अशा सामन्याच्या रुपाने होणार्‍या जल्लोषाने. ती वाफ जिरते, दम निघून जातो आणि पुन्हा एकदा सगळे आलबेल भासू लागते. लोकांचा असंतोष भलत्या मार्गाने वळवण्यात आणि फुलवण्यात राजकारणी वाकबगार असतात आणि त्याला बळी पडण्याएवढे लोक मूर्ख! आपल्याला हवा असलेला बदल हा आपल्याखेरीज कोणीही करु शकणार नाही ह्याची ज्यादिवशी बहुसंख्यांना खात्री पटेल त्यादिवशी क्रांती होईल!

-रंगा

नितिन थत्ते's picture

6 Apr 2011 - 5:22 am | नितिन थत्ते

>>do we have time to make a gradual change?

या ऐवजी मला हा do we have urge to make a change? असा विचारावासा वाटतो.

की आपण कोणततरी दुसर्‍यावर सगळ्या दोषांचं खापर फोडून (स्वतः धुतल्या तांदुळासारखे असल्याचे भासवून) स्वतःलाच फसवतोय?

आनंदयात्री's picture

6 Apr 2011 - 6:11 am | आनंदयात्री

थत्तेकाकांशी सहमत.
(इतकी स्वच्छ वस्तुनिष्ठ जाणीव आणि तुमच्या लोकांवर आपली माणसे म्हणुन प्रेम असेल तर अजून काय हवे. त्यामुळे अशक्य.)

बहुगुणी तुमचा लेख खुप छान आहे, धन्यवाद.

गांधीवादी's picture

6 Apr 2011 - 7:02 am | गांधीवादी

थत्ते काकांशी या मुद्द्यावर सहमत होन्यावाचुन दुसरा पर्याय नाही.

सूड's picture

6 Apr 2011 - 9:40 am | सूड

लेख अतिशय आवडला !!
लोक कधी ना कधी तरी अत्याचार, भ्रष्टाचाराविरुद्ध रस्त्यावर नक्की उतरतील. पण या लोकांमध्ये मला माझा चेहरा कधी दिसेल हा प्रश्न मध्येच उभा राहतो. कारण ज्या लोकांना बदल हवा आहे, त्यांपैकी मी ही एक आहेच की !!

एग्झॅक्टली !!! हेच म्हणायचे होते...
do we have time to make a gradual change?/do we have urge to make a change?
'we'' च्या ऐवजी 'i' येइल का या शंकेने ग्रस्त.