".... कुत्रा घराची आणि शेताची राखण करतो.प्रसंगी स्वत:चा जीव धोक्यात घालून धन्याचे प्राण वाचवतो, असा हा इमानी प्राणी मला खूप आवडतो...." वगैरे वगैरे वगैरे.. हे असलं मी शाळेतल्या निबंधात अनेक वेळा लिहिलं आहे , यातला बराचसा भाग खरा असला तरी कुत्रा प्राण्याचं ते फ़ार एकांगी आणि फ़िल्मी वर्णन असतं... आता मी जे पुढं लिहिलंय त्या आहेत निबंधात न लिहिता येण्यासारख्या गोष्टी..
काही मंडळींना भटक्या कुत्र्यांबद्दल भन्नाट प्रेम असतं..पण त्यांना पहाटे सायकलवरून कामावर जायचं नसतं, किंवा रात्रपाळीवरून परत येताना मागे लागलेल्या कुत्र्यांमुळं खड्ड्यात पडावं लागलेलं नसतं..किंवा पोटावर इन्जेक्शनाची नक्शी काढून घ्यावी लागलेली नसते.... भटक्या कुत्र्यांचा त्रास शक्य ते उपाय वापरून बंद केला पाहिजे असं खुद्द अहिंसावादी गांधीजींनीही म्हटलं होतं म्हणे...हे तर भटक्या कुत्र्यांचं झालं ..पाळीव कुत्रे तरी काय सारे नियंत्रणात असतात काय??
हे सारं इथे आठवण्याचं कारण म्हणजे कालच मी एका ओळखीच्या गृहस्थांकडे गेलो असताना त्यांनी पाळलेल्या एका जर्मन शेफर्ड जातीच्या रॉकी नामक लाडक्या कुत्र्याने माझ्यावर हल्ला केला...हो, हो, मी हल्लाच म्हणणार.. कुत्रा पाळणार्यांनी म्हणावं की " रॉकी जरासा चिडला असेल इतकंच"... आता कोणी म्हणेल,", तुम्ही कशाला त्याची खोड काढायला गेलात? "... खरं सांगतो, " आपण काहीच केलं नाही..." आता त्या अक्षरश: वाघासारख्या प्राण्याची खोडी काढण्याइतके आम्ही निर्बुद्ध नाही हो.....
रॉकी अगदी अस्साच होता दिसायला...
त्या रॉकीला असा अंगणात मोकळा सोडलेला..घराला साडेपाच फ़ुटी उंच भिंत आणि लोखंडी गेट....मी गेटच्या बाहेरून बेल वाजवली आणि गेटपाशी उभा राहिलो, ते काही रॊकीला पसंत पडले नसावे... त्याने माझ्या दिशेने गुरकावून उडी मारायला सुरुवात केली, त्याचे पंजे चांगले माझ्या डोक्याच्याही वर जाणारे...त्याचा तो थयथयाट पाहूनही मी काही घाबरलो नाही, मध्ये भक्कम लोखंडी गेट होते ना...मी शांत उभा राहिलो...मग त्याने भुंकायला सुरुवत केली... मग घरातून काही लोक आले , त्याला घेऊन आत गेले, गेटच्या बाहेरूनच माझ्याशी बोलले ,
माझे काम झाले, मी जाणार तेवढ्यात घराच्या आतून सुसाट वेगाने रॊकी माझ्या दिशेने भुंकत आला, मी बाहेर जायला चालायला सुरुवात केली होती, पण त्याने भिंतीवर उडी मारली, आणि ज्या क्षणी माझ्या लक्षात आले की रॉकीच्या क्षमतेसाठी ही भिंत अपुरी आहे, आणि उडी मारून तो पलिकडे येणार, त्यावेळी मात्र माझे धाबे दणाणले, आसपास कोणी नाही... घरातल्यांच्या तोंडी सूचनेला रॊकी आवरत नाही हे दिसतच होते...रस्त्यातच हा रॊकी नावाचा वाघ आपल्याला फाडून खाणार असे मला दिसायला लागले..... पुढे काय झाले नीट आठवत नाही, मी भीतीने हंबरडा फोडला की तोंडातून आवाजच फ़ुटला नाही ते आठवतच नाही..धावण्याचा क्षीण प्रयत्न केला असावा,..कोणत्याही क्षणी आपल्या परमप्रिय शरीराचा लचका एक हिंस्त्र प्राणी तोडणार आहे, हे फीलिंग फार भयानक असतं खरं...मला शेजारच्या रो हाउसची भिंत वर चढून पार करावीशी वाटली... मी तिकडे धावून पलिकडे उडी मारली की काय केले आठवत नाही, आजूबाजूला आरडाओरडा झाला थोडासा..
रॉकीचे शेजारी त्यांच्या अंगणात खुर्ची घेऊन पेपर वाचत बसले होते , तेही ओरडू लागले...त्यांनी माझ्या दिशेने प्लास्टिकची खुर्ची फ़ेकली , आणि हातात धरून उभे रहा अशी सूचना केली...दोन चार सेकंदच गेली असतील मध्ये.. भानावर आलो तेव्हा मी दोन घरे पलिकडच्या भिंतीच्या आत खुर्ची धरून उभा होतो,.. तेव्हाही त्या खुर्चीचा फ़ार आधार वाटला हे खरं... तिथे कसा पोचलो ते काही आठवत नाही...( सिंहाच्या पिंजर्यात लाईट गेल्यानंतर दामू धोत्रे हे रिंगमास्टर असेच हातात स्टूल धरून उभे असतील या कल्पनेने मला आत्ता हसू येतेय.. आठवला तिसरीतला "प्रकाश प्रकाश " हा धडा")..मधल्या काळात रॉकीला आत नेले असावे मालकाने... चार क्षण दम खाल्ला, देवाचे आभार मानले... पायात जोरात कळ गेली...कुठेतरी उडी मारायच्या प्रयत्नात मी पडलो असणार , पायाला बरंच खरचटलं होतं, आणि मुका मार थोडासा...पाय ठणकत होता... हे अगदीच थोडक्यात भागलं.. पण भीतीनं मी थरथरत असणार.. .. माझी अवस्था पाहून शेजार्यांनी ग्लासभर पाणी आणून दिले, त्यांच्यासाठी हे प्रसंग नित्याचे असावेत...त्यांना माझी दया वगैरे आली असावी... मला बसा म्हणाले पाच मिनिटे... रॉकीच्या शेजारच्या घरात अजून थांबायची माझी इच्छा नव्हती, .. मी दुखर्या पायाने रॉकी मागे येत नाही ना हे पाहत पाहत , शक्य तितक्या वेगाने तिथून सटकलो... दुपारी रस्त्यावर गर्दी नव्हती, खरंतर कोणीच नव्हते...त्यामुळे आपल्या शेजारचा दातांचा डॉक्टर कुत्र्याला घाबरून खड्ड्यात पडला असा विनोदी प्रसंग लोकांनी मिस केला ...
या सार्यात रॉकीची चूक नाहीच पण त्याच्या मालकांची काही चूक आहे की नाही, असलीच तर किती ? हे ही मला माहित नाही...
लहानपणापासून माझं कुत्र्याशी फ़ार जमलं नाहीच... दुसरीत कोल्हापुरात एक पामेरियन कुत्रा चावला तेव्हा एक टिटॆनसच्या इन्जेक्शनावर भागलं... आठवीत पुन्हा पामेरियनच चावलं तेव्हा महापालिकेच्या दवाखान्यात जाऊन पोटावर रेबीजची तीन इन्जेक्शनं घेतली होती.. आणि काही कारण नसताना कालचा जर्मन शेफर्ड....माझं नशीब थोर की तो चावला नाही...त्यामुळं मला कुत्र्यांविषयी कधीच प्रेम वगैरे वाटलं नाही.. हा प्राणी आपल्याला चावू नये इतपत माफ़क अपेक्षा मी करत असे..
आमच्या घरी एक पाळलेली मांजरी होती...आईला फ़ार आवडत असे..पण ही मांजरी कोणत्याही उचकवण्याशिवाय मी अगदी पाठमोरा उभा असताना सुद्धा मला येऊन बोचकारत असे.
( मात्र त्याच मांजराच्या पिलांशी तासंतास खेळायला मात्र मजा येत असे)..
आमचे शेजारी गावठी कुत्रे पाळत असत.,.. त्यांच्या कुत्र्याशी मी फ़ार शत्रुत्त्व नाही किंवा फ़ार प्रेम नाही अशा पद्धतीने अंतर राखूनच वागत असे...पण तो कुत्रा रस्त्याने जाणार्या येणार्यांवर धावून जात असे,सायकलवाल्यांना घाबरवत असे, पाडत असे, त्यावेळी फ़िदी फ़िदी हसत गंमत पाहणार्या आपल्या मुलांना ते थाबवत तर नसतच पण कौतुकमिश्रीत उत्साहाने ," ...अग्गोबाई, आमच्या पिंटूने / मोत्याने / काळूने आस्सं केलं हो "..अशी चर्चा करत असत. मात्र कुत्र्यांना बांधणे त्यांना पसंत नसे.... अंगावर उड्या मारमारून भुंकणार्या कुत्र्याला पाहून कोणी येणारा सज्जन घाबरला तर म्हणत असत," काही करत नाही हो आमचा कुत्रा, उगीच घाबरू नका ".. मला हे फ़ार खटकत असे " काही करत नाही काय? चावणारच तो आता,म्हटल्यावर लोकांना भीती वाटणारच...उगीच कोण घाबरेल ?..." असं त्यांना सांगावंसं वाटत असे..पण मी फ़ार लहान असल्याने त्या वेळी काही बोलू शकत नव्हतो......
शाळेत असताना हक्क आणि कर्तव्ये नावाचा नागरिकशास्त्रात एक धडा होता...त्याला स्मरून सर्व प्राण्यांच्या मालकांना एक सांगावेसे वाटते,
कुत्रा (, माकड , वाघ, सिंह, हत्ती, कासव, ससा, जिराफ़ ,तरस, लांडगा, सुसर) काय वाट्टेल ते पाळा हो, पण आपले प्राणी बांधून ठेवा , नियंत्रणात ठेवा..
प्रतिक्रिया
21 Jun 2008 - 1:35 am | प्रियाली
मी आणि माझी मैत्रिण एका गर्भश्रीमंत बाईंकडे काही कामानिमित्त गेलो होतो. त्यांच्याकडे उंदरासारखा दिसणारा चूव्हाव्हा हा पॉकेट डॉग होता. ही अशी बारकी जात महा तिखट असते. म्हणजे जीव ४ आण्याचा आणि आवाज भाड्याच्या लाऊडस्पीकर सारखा पॅक..पॅक..पॅक करून वैताग आणणार. माझ्या मैत्रिणीला जाम कुत्र्यांची भीती आणि तिने त्या बाईंना आधीच फोन करून सांगितलं होतं की कुत्र्याला वेगळ्या खोलीत ठेवा पण दरवाजा उघडल्याबरोब्बर कुत्रा आमच्या स्वागताला. आणि त्यालाही सावज कळते जसे, मला सोडून मैत्रिणीलाच त्याने गाठलं आणि मग दोघांनी त्या श्रीमंत बाईंच्या आलिशान मॅन्शनमध्ये मनसोक्त पकडापकडी खेळून घेतली. हा प्रकार सुरू असताना बाई "कम बॅक हनी, कम टू ममा!" असं गोड आवाजात आपल्या बाळाला बोलावत होत्या.
असो.
अवांतर: कुत्र्याची परवानगी घेतली का हो फोटो चिकटवण्यापूर्वी? त्याला पसंत नसेल तर यायचा तुमच्या मागावर. ;) ह. घ्या.
21 Jun 2008 - 1:56 am | भडकमकर मास्तर
तिने त्या बाईंना आधीच फोन करून सांगितलं होतं की कुत्र्याला वेगळ्या खोलीत ठेवा पण दरवाजा उघडल्याबरोब्बर कुत्रा आमच्या स्वागताला
आपल्या कुत्र्यात काय आहे बुवा घाबरण्यासारखे असे प्रत्येक मालकाला वाटत असते त्यामुळे ते असली सूचना फारशी मनावर घेत नसावेत...
कुत्र्याची परवानगी घेतली का हो फोटो चिकटवण्यापूर्वी?
बापरे.. ते राहिलंच... :)) :))
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
21 Jun 2008 - 2:46 am | प्रियाली
मालक कसले कप्पाळ! त्या कुत्र्याच्या आईने नंतर आम्हाला सांगितले की त्याला ना खोलीत बंद केलेले, पट्टयाला बांधलेले अजिबात आवडत नाही आणि त्याचा कसनुसा चेहरा मला पाहवत नाही, म्हणून तो पूर्वसूचना देऊनही मोकळाच होता. (चूव्हाव्हाचा चेहरा जन्मजात कसनुसाच असतो ही बाब वेगळी)
तेव्हा त्यांनी पाहुणे येणार म्हणून आपल्या पोराला कोंडून घातले नव्हते एवढेच.
21 Jun 2008 - 9:50 am | सखाराम_गटणे™
>>त्या कुत्र्याच्या आईने नंतर आम्हाला सांगितले की त्याला ना खोलीत बंद केलेले, पट्टयाला बांधलेले अजिबात आवडत नाही
कुत्र्याची आई. :)
सखाराम गटणे
(धमु, छोटा डॉन, आंद्या, पिवळा डांबिस, विजुभाउ यांच्या वर्गातला :))
23 Jun 2008 - 3:25 pm | चावटमेला
आपल्या कुत्र्यात काय आहे बुवा घाबरण्यासारखे असे प्रत्येक मालकाला वाटत असते त्यामुळे ते असली सूचना फारशी मनावर घेत नसावेत...
१००% सहमत
बरोबर आहे, मालकांना कुत्रा कहीच करणार नाही हो, कारण ते त्याचे अन्नदाते असतात ना
(अनेक वेळा कुत्र्यांमुळे सायकलवरून पडलेला) चावटमेला
http://chilmibaba.blogspot.com
21 Jun 2008 - 1:38 am | भाग्यश्री
माझे सेम अनुभव आहेत हो!! बहुतेक कुत्र्यांना वासाने कळते, की कोण आपल्याला जास्त घाबरते.. कारण रस्त्यावरची यच्चयावत कुत्री माझ्या मागे लागून भुंकून जातातच.. कुत्रे, मांजर लांबून फार गोडू दिसतात, शांत असतील तर मी जवळ जाऊन लाड पण करते.. पण अती हायपर-ऍक्टीव्ह कुत्र्यांचं आणि माझं जमत नाही..!
तुमचा जसा रॉकीचा अनुभव आहे तसाच सेम माझा, माझ्या २ मैत्रिणीच्या कुत्र्यांचा आहे! दोन्ही कुत्र्यांनी मला घाबरवून पार आडवं पाडलं होतं.. एकीकडे तर मी स्कूटी काढत अस्ताना पाडलं.. मी गाडी फेकून पळाले होते.. तर दुसरा, मी स्कुटीवर बसले असताना उगीचच लांबून पळत आला, आणि उडी मारून माझ्या पाठीवर चढला!! मी पडले, माझी गाडि माझ्या पायांवर, आणि ते अतीप्रेमळ कुत्रं माझी मान चाटतंय! आईग्ग... स्वप्नात सुद्धा असा अनुभव परत येऊ नये !!
(दोन्ही कुत्री, गलेलठ्ठ लॅब्रेडोर होती!! :()
http://bhagyashreee.blogspot.com/
21 Jun 2008 - 1:55 am | चतुरंग
माझं आणि कुत्र्यांचं आतापर्यंत तरी छान जमले आहे. मला हा प्राणी मनापासून आवडतो. हां, काही बेनी जरा जास्तच भुंकून हैराण करतात हेही खरंच.
पण इन जनरल माझं त्यांच्याशी जमतं.
मी लहान, म्हणजे ८-९ वर्षांचा, असताना एक कुत्रं पाळलं होतं नंतर ते घरात फारच घाण करतं ह्या तक्रारीखाली लांब नेऊन सोडून देण्यात आले. मी त्यावेळी रडलेलो मला आठवतंय.
त्यानंतर एकदम मी कॉलेजात असताना पामेरियन घरात आलं ते पुढे ११-१२ वर्ष आमच्याकडे होतं. फार लळा. माझी आई बालवाडी चालवते त्यामुळे घरात लहान मुले भरपूर. हे मुलांमधे आरामात खेळायचं. कोणी त्याचे कान ओढ, कोणी शेपूट ओढ, मिशा ओढ असे केले तरी त्याने कोणत्याही मुलाला कधी दात लावला नाही.
फक्त एकाच व्यक्तीचे आणि त्याचे कधी जमले नाही ते म्हणजे पोष्टमन! तो आला की हा पठ्ठ्या भुंकून्-भुंकून सगळा वाडा डोक्यावर घेत असे.
असो. ह्यापुढेही श्वानाचे आणि माझे जमत राहूदे अशी सदिच्छा व्यक्त करतो.
वरच्या चित्रातला अल्सेशियन आहे बाकी रुबाबदार हो. आणि तुमचा मुद्दाही खरा आहे की आपला प्राणी कोणाला चावणार नाही काळजी त्याच्या घरातल्या लोकांनी घ्यायला हवी. उगीच लोकांची समजूत काढत बसण्यापेक्षा ते सोपे!
चतुरंग
21 Jun 2008 - 11:08 am | प्राजु
माझं आणि या पाळिव प्राण्याचं आजपर्यंत अगदी उत्तम जमलं आहे. लहान पणापासून कुत्रा आणि मांजर घरात असणं .. याची सवयच झालीये. मला २ दा कुत्रा चावूनही (माझ्याच चुकीमुळे)माझं त्याच्याबद्दलचं प्रेम कमी झालं नाही. आणि बाहेरची म्हणजे मैत्रिणी, नातेवाईक, स्नेही यांच्याकडच्या कुत्र्यांशीही माझं चांगलं जमलं आहे. त्यामुळे भिती अशी कधी नाही वाटली...पण मास्तर म्हणतात त्याप्रमाणे पाळीवप्राणी हे नियंत्रणात ठेवावेत हे उत्तम म्हणजे घाबरणारे आणि न घाबरणारे कोणालाही काही इजा होणार नाही.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
21 Jun 2008 - 2:06 am | एक
लहानपणी महाराणा प्रताप बागेत खेळताना एक पॉमेरियन मागे लागला. मी घाबरून पळायला लागलो तरी मागे येत होता.
शेवटी मी झाडावर पटकन चढलो म्हणून वाचलो.. #:S
गेले ते दिवस. आता कुत्र्याला पण घाबरत नाही :) (आणि झाडावर पटकन चढण्याइतका हलकापण राहिलो नाही :( )..
21 Jun 2008 - 3:04 am | शितल
मास्तर मस्त अनुभव आहे .
कुत्रा आणि मा॑जर ह्या दोघा॑शी ही अजिबात मा़झे तरी जमत नाही
लहाण पणी मा़झ्या बहिणीला पोटात दिलेली इ॑जेक्शन पाहिली आहेत त्यामुळे तर अजुनच भिती वाटते
पण कुत्रा जरा जवळ आला की मी जोर जोरात रडतेच,
आजु बाजुचे लोक कुत्रा पाळतात आणि त्यामुळे तर मला त्याच्या घरी ही जाणे आवडत नाही सारखे लक्ष कुत्रात्याकडे आणि मनात ही विचार तेच.
आमच्या घरा समोरच्याचा आणी शेजारी राहणार्या दोघा॑कडे कुत्रे आहेत ते दोन्ही कुत्रे, रात्री स्पर्धा लागल्यासारखे भु॑कत असतात
आणि आमच्या घरातल्या॑ची फुकटची झोप मोड.
21 Jun 2008 - 4:01 am | अरुण मनोहर
एकदा काही कामा निमीत्याने एका गृहस्थांच्या घरी गेलो होतो. या बसा वगैरे औपचारीक स्वागत झाल्यावर ते दोघे पती पत्नी बसले होते त्याच्या समोरच्या सोफ्यावर मी बसलो. थोडे जुजबी बोलणे झाले तोवर एक मोठा अल्सेशीयन आतून माझ्याजवळ येऊन गुरगुरू लागला. मला वाटले ओळख नसल्याने असेल. म्हणुन मी हात वगैरे लावून त्याच्याशी थोडी मैत्री करायचा प्रयत्न केला.पण तो काही खुष नव्ह्ता. मालकिणीने त्याला समजाऊन आत जायला सांगीतले. पण तो ऐकेना. सारखा सारखा माझ्याजवळ येऊन रागाने भुंकायला लागला. आता मला कळेना. काय झाले असेल? बहुदा ह्याला माझी शकल आवडली नसेल! मी काय कोणी चोर उचक्का वाटलो की काय ह्याला?
शेवटी ते भुंकणे थांबवायला त्या बाईंनी मला जे सांगीतले ते ऍकून मला माझ्या कानावर विश्वास बसेना. "अहो प्लीज तुम्ही ह्या खुर्चीवर बसा. टॉमी चिडला आहे, कारण तुम्ही बसला आहात ती त्याची नेहमीची बसायची जागा आहे." ती हे कुत्राच्या कौतुकानेच सांगत होती.
मी लगेच उठून कुत्र्याचे केस लागलेले आपले कपडे वगैरे झटकत त्यांना म्हणालो "त्याला त्याची खुर्ची इतकी महत्वाची आहे तर तुम्ही 'टॉमीसाठी आरक्षीत' अशी मोठी पाटी का लावत नाही ह्या सोफ्यावर ?
मी उठल्यावर टुणक्न उडी मरून त्या कुत्तरड्याने त्याची जागा पटकावली, आणि माझ्याकडे कशी जिरवली असा बघू लागला. जे घडले ते त्याने बिलकूलही ओशाळून न जाता, कुत्र्याची मालकीणही कुत्र्याचे कौतुक मलाच ऐकवू लागली. "हा खूप स्वच्छ आहे. त्याला आम्ही रोज आंघोळ घालतो, मी रोज त्याचे दात कसे घासून देते" वगैरे.
मला हसावे की रागवावे काही कळेना. आयला त्या कुत्तरड्याच्या.....
21 Jun 2008 - 11:04 am | गिरिजा
सो क्युट ;) मला आवडतात कुत्री-मान्जरी :)
--
गिरिजा..
लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग
-----------------------
21 Jun 2008 - 11:35 am | विजुभाऊ
टॉमी चिडला आहे, कारण तुम्ही बसला आहात ती त्याची नेहमीची बसायची जागा आहे.
तरी बरं त्यानी टॉमीला कपबशीत चहा प्यायची सवय लावली नव्हती (ह घ्या) :)
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
21 Jun 2008 - 8:11 am | मुक्तसुनीत
आयुष्यात अनेक गोष्टींचा योग असतो किंवा नसतो म्हणतात ते याबाबतीमधे खरे आहे. कुत्रे मांजरींबद्दल थोडे बालसुलभ कुतुहल होते; परंतु त्यांना पाळण्याइतकी आर्थिक स्थिती आमच्या कुटुंबाची नव्हती. त्यामुळे आयुष्याचे हे अंग खुंटले ते कायमचे.
शहराच्या गर्दीमधे , धकाधकीमधे , चिमूटभर जागांमधेसुद्धा काही लोक जेव्हा पाळीव प्राणी ठेवण्याची आपली "हाउस" पूर्ण करतात तेव्हा ते सामाजिक रोषास पात्र ठरतात. आणि हा रोष अगदी सकारण आहे. (भडकमकरांचे उदाहरण नमुना म्हणून वाचावे !)
लहानपणी वाचलेल्या गोष्टींमधे , पाहिलेल्या चित्रपटांमधे निराळे "डॉग हाऊस" असायचे त्याची संकल्पना आकर्षक होती - अजूनही वाटते. कुत्रा पाळावा ; परंतु त्याच्या केसांचा , वासाचा संसर्ग होऊ देऊ नये , त्याला त्याची वेगळी " स्पेस " मिळाअवी ; आणि आपल्या, माणासांच्या स्पेसमधे त्याने अतिक्रमण करू नये अशी खूणगाठ मी तेव्हा बांधली होती. प्रत्यक्षातली परिस्थिती अर्थातच वेगळी आहे : कुत्रे नि माणसे एकाच छताखाली असतात. आणि जिथे जागेची वानवा नाही त्या परदेशामधे सुद्धा मला असेच दिसते ! हा माझ्या दृष्टीने भ्रमनिरासच होता. मोठी घरे आणि आवारे असऊनही अमेरिकेत असे असण्याचे कारण मला जे दिसते ते असे की , इथले हवामान बर्यापैकी विषम आहे. प्रचंड थंडीत नि तीव्र उन्हाळ्यात आपले लाडके कुत्रे जगणार/आनंदात कसे रहायचे ? तेव्हा त्याला घरातच ठेवा ; असे कायसेसे असावे. (कुत्राधारकानी प्रकाश टाकावा.)
मुलाबाळांची आवड म्हणून लोक कुत्रे पाळतात हे तर खरेच. पण कुत्र्या-मांजरांकडे "सोबत" म्हणून पहाण्याचा नि त्याना ठेवण्याचा प्रकार मला अमेरिकेत आल्यानंतरच पहिल्यांदा पाहायला मिळाला. आजी नि त्यांच्याबरोबरचे कुत्रे हे दृष्य अगदी पेटंट ! या पॅटर्नव्यतिरिक्त , माझ्या माहितीत एक असे जोडपे (भारतातले ) माहिती होते की ज्याना बरीच वर्षे मूल होत नव्हते म्हणून त्यानी कुत्रा पाळला होता. अमेरिकेतसुद्धा पार्कात अशी मध्यमवयीन जोडपी त्यांच्या कुत्र्यांच्या सोबत घेऊन फिरताना दिसतात. (त्या सगळ्याच जोडप्याना मुले नाहीत/ होणारच नाहीत असे म्हणण्याचा माझा हेतू नाही. )
जी ए कुलकर्णी या माझ्या आवडत्या लेखकाची , त्यांच्या अगदी सुरवातीच्या काळात लिहिलेली एक ५ ओळींची कथा आहे - एकटा राहाणारा एक तरुण माणूस. एक दिवस तो घरी येतो. दारात त्याचे कुत्रे त्याचे स्वागत करत उभा असते. तो त्याला उचलून त्याचे लाड करतो नि म्हणतो , "बरे का टिप्या , आज आपल्याला पाच रुपयांची पगारवाढ मिळाली आहे !" . बस्स. इतकीच कथा. या कथेवर आणखी काय भाष्य करणार ! असो.
माझ्या लहानपणी कुत्र्यांबद्दलचे जे अंग अविकसित राहिले होते तसे माझ्या मुलांचे होऊ नये असे मला वाटते खरे , पण कुत्र्याचे सर्व " बाळंतपण" करण्याच्या कल्पनेने माझा थरकाप होतो. नि मी हा बेत रहित करत राहतो ! :-)
21 Jun 2008 - 10:06 am | अरुण मनोहर
तुमचे निरीक्षण अगदी बरोबर आहे.
आणि जिथे जागेची वानवा नाही त्या परदेशामधे सुद्धा मला असेच दिसते
माझा वर "खुर्ची" मथळ्याखाली दिलेला अनुभव अमेरिकेतीलच आहे. मला वाटते इन जनरल, भारतामधे कुत्रा आवडीने पाळला तरी खुपशा कुटूंबात त्याला घरांत वावरण्यावर मर्यादा घालतात. मग सोफ्यावर झोपू देणे तर दूरच.
21 Jun 2008 - 2:21 pm | भाग्यश्री
नाही हो.. माझ्या सासरी कुत्री होती, तिला सर्व घरात मुक्तसंचार होता.. अगदी देवघरापर्यंत.. आणि झोपायला ती सासूसासर्यांच्या शेजारी जायची... सो, आपण त्यांच प्रेम नाही सांगू शकत.. माझा नवरा घरच्यांना मिस नाही करत इतका शायनीला करतो! व्यक्ती-व्यक्तीवर आहे ते..
http://bhagyashreee.blogspot.com/
21 Jun 2008 - 9:21 am | यशोधरा
अवांतर: कुत्र्याची परवानगी घेतली का हो फोटो चिकटवण्यापूर्वी? त्याला पसंत नसेल तर यायचा तुमच्या मागावर
=))
असे कसे कारणाशिवाय कुत्रे मागे लागतात हो तुमच्या?? नक्कीच कुत्र्यांच्या मालकांनी लिहिलेल्या नाटकांना तुमच्या परीक्षणांमधून तुम्ही नावं ठेवली असणार!!! हो की नाही??:) त्याचा सूड घेत असतील ते मालक लोक!! नक्कीच!!!
21 Jun 2008 - 9:59 am | सखाराम_गटणे™
>>असे कसे कारणाशिवाय कुत्रे मागे लागतात हो तुमच्या?? नक्कीच कुत्र्यांच्या मालकांनी लिहिलेल्या नाटकांना तुमच्या परीक्षणांमधून तुम्ही नावं ठेवली असणार
मला असे वाटते कि, आधीच्या जन्मात हे कुत्रे म्हण्जे नाट्ककार, कलावंत वैगरे असतील. त्यामुळे ते मास्तरांची मजा करत असतील.
:)
सखाराम गटणे
(धमु, छोटा डॉन, आंद्या, पिवळा डांबिस, विजुभाउ यांच्या वर्गातला :))
22 Jun 2008 - 9:02 am | भडकमकर मास्तर
असे कसे कारणाशिवाय कुत्रे मागे लागतात हो तुमच्या?? नक्कीच कुत्र्यांच्या मालकांनी लिहिलेल्या नाटकांना तुमच्या परीक्षणांमधून तुम्ही नावं ठेवली असणार
मला असे वाटते कि, आधीच्या जन्मात हे कुत्रे म्हण्जे नाट्ककार, कलावंत वैगरे असतील. त्यामुळे ते मास्तरांची मजा करत असतील.
=)) =)) =))
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
21 Jun 2008 - 9:53 am | II राजे II (not verified)
=))
ह्या बाबतीत मी लकी आहे.. मला ही पाळीव प्राण्याची घोडा सोडली तर कुठलीच जात आवडत नाही... व त्यांना मी आवडत नाही.. !!
पण महा खाष्ट कुत्रे देखील माझ्या नजरेनेच शांत होते... (हातात दगड... वीट... काठी.. असते ही गोष्ट वेगळी)
बाकी मास्तर. अश्या खतरनाक प्राण्यांना साखळीने बांधून ठेवण्याचा सल्ला कोणाला देऊ नका.... कुत्र्याला साखळीत बांधले तर कुत्र्यापेक्षा मालकीनींना जास्त त्रास होतो... असे निरीक्षण आहे ;)
राज जैन
माणसाने जगावे कसे .... स्कॉच सारखे .. एकदम आहिस्ता!!! ....एकदम देशी प्रमाणे चढून उतरण्यात काय मजा :?
21 Jun 2008 - 10:20 am | सहज
कुत्रा चावल्यावर व पोटात ३ इंजेक्शन घ्यायला लागल्यावर कुत्रांबद्दलच्या माझ्या भावना काय आहेत हे भडकमकर मास्तर चांगले समजतील.
इतर कुठल्याही जनावरावर "मालकी हक्क" म्हणजे आपला पाळिव प्राणी असणे मला तत्वतः मान्य नाही. मोठा जमीनजुमला असेल तर काही प्राणी असु शकतात हे मान्य. पण शहरात आयुष्य गेल्याने व मुख्य म्हणजे आईचा विरोध असल्याने कुठला प्राणी घरात येणे अशक्य होते.
असो तर अगदी परवाची गोष्ट. लिफ्ट येण्याची वाट पहात होतो. एक अतिशय निरागस दिसणारे पिल्लु माझ्याकडे बघत होते, मी दुसरीकडे बघायला लागलो. तर ते जागा बदलुन माझ्या अजुन जवळ आले. मी जरा चार पावले अजुन दुर गेलो तर डायपर लावलेले व नुकतेच चालायला लागलेले लहान मुल जसे दुडदूडते तसे ते अजुन माझ्याजवळ येउ लागले. त्याच्या अतिशय लहान आकारामुळे व माझ्यावर रोखलेले निरागस डोळे यामुळे खरे तर त्याच्यावर हाड हाड करायची इच्छा होत नव्हती. इतक्यात त्याची मालकीण आजी कुठून तरी आली त्या पिल्लाला माझ्याजवळ पाहुन ओळख, दिलगीरी अश्या टाईप हासली. मी देखील त्या हास्याची परतफेड केली, "ट्विंकल यु लाईक अंकल?" ह्या तिच्या पृच्छेला ट्विकंल ने देखील माझ्या पायावर बसुन सहमती दर्शवली. जेव्हा तो स्पर्श झाला तेव्हा कदाचित मुक्तसुनित म्हणाले तसा लहानपणच्या अविकसीत / दबलेल्या भावना अनावर होऊन मग मात्र मी त्या मालकिणी कडे बघुन हातानेच उचलुन घेउ का अशी विचारणा केली व तिचा होकार यायच्या आत ट्विंकल माझ्या कडेवर होती. माझा माझ्यावरच विश्वास नव्हता की चक्क एका कुत्र्याला कडेवर घेतले आहे. माझे हात व गाल चाटुन मस्त गुदगुल्या करत होती. लिफ्ट आल्यावर आम्ही तिघे आत शिरलो मग मी आज्जीबाईंना म्हणालो जर हरकत नसेल तर काही मिनीटे माझ्या मजल्यावर बरीच लहान मुले आहेत त्यांच्यासोबत ट्विंकल ला खेळु दे का? आज्जीबाई अतिशय खुश.
पुढची १० मिनटे आम्ही सगळे वेगळ्याच विश्वात होतो. ११ व्या मिनटाला एका लहान मुलाने बरोबर शेपुट पकडली मग मात्र ट्विंकल चे ते निरागस डोळे बदलले. :-) मी पटकन तिला उचलले की कुठल्या मुलाला चावु नये. आज्जीबाई सांगत होत्या की शेपटीला हात लावलेले सहन होत नाही, मनात म्हणालो "आधी सांगायचे की हो" नेमका मी आधीच शेपटीला हात लावला असता तर आमची श्वानकहाणी तळमजल्यावर संपली असती ना. पिल्लुची अजुन काय माहीती विचारता कळले की हे पिल्लु १२ वर्षाचे म्हणजे कुत्र्याच्या वयानुसार आजीबाईच होते. :-) जात "चिव्हावा" होती.
ट्विंकलची परवानगी मिळाली तर फोटो टाकीन.
[आगामी आकर्षण - मास्तरांचे लवकरच कुत्र्यांपासुन बचाव हे क्लासेस सुरु होतीलच :-) ]
21 Jun 2008 - 11:41 am | विजुभाऊ
[आगामी आकर्षण - मास्तरांचे लवकरच कुत्र्यांपासुन बचाव हे क्लासेस सुरु होतीलच ]
त्या पेक्षा ते "कुत्रा पाळणारे आणि त्यांचे कौतुक करणारांपासुन बचाव" हे क्लासेस सुरु करतील
जय भडकमकर क्लासेस.....( पुण्यात एक दहाडणारे सर आहेत त्यांची विद्यावर्धीनी ही मास्तरांचे प्रेरणास्थान आहे असा एक प्राथमीक अंदाज आहे)
»
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
21 Jun 2008 - 11:24 am | सुचेल तसं
तुम्हां सगळ्यांचे अनुभव अगदी पटले. माझ्याकडे मी लहान असताना कुत्रं होतं. दिवसभर बांधुन ठेवुन रात्री त्याला फिरायला घेऊन जायचो. त्याला आम्ही बाल्कनीत बांधत असल्यामुळे पाहुणे बिनदिक्कत यायचे घरी. पण कुत्र्याला रोजच्या वेळेला खायला घालणं, फिरायला घेऊन जाणं, नियमितपणे डॉक्टरांकडे नेऊन आणणं हे सगळं काटेकोरपणे पाळावं लागतं. तरीदेखील मला तेव्हा (आणि आतापण) इतर कुत्र्यांची भिती वाटायची. मला एक मस्त आयडिया सांगितली होती एकानं. कुत्रं समोर दिसल तरी त्याच्याकडे पाहायचं नाही. (कदाचित त्याला आपण खुन्नस देतोय की काय असं वाटत असावं.) मग ते तुमच्या अंगावर येत नाही. मी ही आयडिया वापरायला सुरुवात केली आणि बहुतेक वेळा मी कुत्र्यांच्या तावडीतुन निसटलो आहे. अपवाद अर्थातच पिसाळलेल्या कुत्र्यांचा.
पु.लं चा एक खुप विनोदी लेख आहे. मला आठवतय त्यानुसार "पाळीव प्राणी" नावाचा.
-ह्रषिकेश
http://sucheltas.blogspot.com
21 Jun 2008 - 4:15 pm | भडकमकर मास्तर
कुत्रं समोर दिसल तरी त्याच्याकडे पाहायचं नाही. (कदाचित त्याला आपण खुन्नस देतोय की काय असं वाटत असावं.) मग ते तुमच्या अंगावर येत नाही. मी ही आयडिया वापरायला सुरुवात केली आणि बहुतेक वेळा मी कुत्र्यांच्या तावडीतुन निसटलो आहे.
ही आयडिआ मी सुद्धा वापरतो .. पण छोटुल्या कुत्र्यांवर चालून जाते ही आय्डिआ...
दोन पामेरियन चावूनसुद्धा मी त्यांना सध्या घाबरत नाही...पण काल अंगावर चालून आलेल्या महाकाय अल्सेशियनवर ही कल्पना राबवणे शक्य नव्हते... :)
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
21 Jun 2008 - 12:49 pm | मयुरयेलपले
आम्हि लहान आसताना सुट्टित आईच्या गावाला जायचो..गावाच नाव माडगुळे (हो तेच ग.दि.माडगुळकरांच गांव) पण गावाला गेल्यावर एक वेगळच टेंशन यायच्..तिथे प्रातःविधिसाठि बाहेरचा रस्ता धरावा लागे...आता आम्हि जरा मोठ्या गावात राहणारे पोरं.. लाज वाटायचि ... एक युक्ति सुचलि आणि सकाळि (पहाटे) लवकर... जायचं ठरल... लवकर उठलो आणि ट्म्रेल घेऊन निघालि स्वारि.. हलकं व्हायला.. गावाच्या नाक्यावर जाताच कोणि तरि मागुण येतय आस वाटल माग पाहिल्..तर दोन कुत्रे (कुत्तरडे) चालत येत होते. त्यांचा नेम काय ते आमच्या लक्शात नाय आल.. कपाळावर उगाच घाम आल्यासारख वाटलं ..तसा एक त्यातला गुर्र .. करायला लागला.. दुसरा त्याहुन जोरात.. टम्रेलातल पाणि हालायला लागल आनि पोटतल पण.. काय करावं काहिच सुचना..विचार करा..सगळ जग साखर झोपेत मि रस्त्यात मधोमध थरथरत उभा.. आणि दोन हिंस्त्र प्राणि मला आसे पाहत उभे होते ... कि बस..सगळा जिव एकवटुन जो बोंबलत पळत सुटलो.. ते टम्रेल पण परत भेटल नाहि... परत आजोबांना सांगितला.. आम्हि काय आता गावाला येनार नाय्..
आपला मयुर
21 Jun 2008 - 1:09 pm | मदनबाण
यत्र तत्र सर्वेत्र कुत्रच कुत्र ,,,, च्या मारी ,,हे मोकाट कुत्रे फारच त्रासदायक असतात्,,,त्यांचा रात्री बॉर्डेर-बॉर्डेर-खेळ चालतो.....
आपली हद्द सोडुन एखादा दुसर्याच्या हद्दीत गेला की मग यांची भुंकण्या मधे जुगलबंदी चालु होते..
मी तर बर्याच वेळा अनुभव घेतलाय या भटक्या कुत्र्यांचा..कारच्या मागे अशा जोरदार पद्धतीने धावतात की विचारु नका..
आमच्या जवळच्या एका इमारतीत विदेशी कुत्रे पाळणारे एक कुटुंब आहे ते त्यांच्या कुत्र्यांचे असे लाड करतात की विचारु नका..
त्यातील एक कुत्रा जवळ जवळ ८० किलो वजनाचा असावा,,,(दुसरा वाघ दिसतो) त्याच्यासाठी वेगळी ए.सी रुम आहे..
त्याचा आहार सुद्धा जबरा आहे..
मदनबाण.....
21 Jun 2008 - 4:43 pm | मुक्तसुनीत
पाळीव प्राण्यांच्या संदर्भात "ऍलर्जीज्" हा प्रकारही महत्त्वाचा ठरतो. तीशी ओलांडताना , आयुष्यात पहिल्यांदा कुठल्या ऍलर्जीचा साक्षात्कार मला झाला असेल तर तो "कॅट्-ऍलर्जीचा" ! याचा अर्थ, सर्व अमेरिकास्थित मार्जारकुलाशी माझे नाते तुटल्यात जमा आहे. मांजर पाळलेल्या घरात शिरल्यावर काही मिनिटांतच माझे नाक आणि डोळे विलक्षण चुरचुरू लागतात. खोलीत बसणे अशक्य होते. आयुष्यात कधी मांजर काय, इतर कुठला प्राणी पाळायचा अवसर मिळेल की नाही देव जाणे , पण एखाद्या प्राण्याची कायमची ऍलर्जी निर्माण होणे याची मला मोठीच खंत वाटते.
सहज, भाग्यश्री (त्यांचे पती , खरे तर !) आदि लोकांचे अनुभव प्रातिनिधिक आहेत असे मला वाटते. मुक्या प्राण्यांशी नाते - मग ते १० मिनिटांपुरते चिव्हाव्हाशी खेळण्याचे असो , किंवा आयुष्यभराचे एखाद्या "शायनी"शी असो - ही एक शब्दातीत गोष्ट आहे असे मला वाटते. अशा नात्याकडे मालकीहक्काच्या किंवा पालकत्वाच्या दृष्टीकोनातून किंवा उपयुक्ततेच्या मुद्द्यापेक्षा जास्त मैत्रीच्या , सवंगड्याच्या नात्याने पाहीले तर त्या नात्यामधला निरागसपणा विशेष जाणवतो.
कुत्र्यांचे उपयोग शोधकार्याकरता होतात , आंधळ्या माणसांना तर त्यांचा फार मोठा उपयोग असतो , हे आपाल्याला माहितच आहे. पणा या मुक्या प्राण्याशी असणार्या नात्याबद्दल सर्वात हृद्य गोष्ट मी एका बातमी मधे अलिकडे वाचली . मानसरोगतज्ञ-डॉक्टरांच्या पाहण्यात असे आले आहे की, ऑटीस्टीक मुलांना जेव्हा प्रशिक्षणा दिलेल्या कुत्र्यांच्या सान्निध्यात वेळ घालवू दिला असता , त्यांच्या स्थितीमधे नाट्यमय प्रगती साधली गेली. ऑटिझम म्हणजे असा मानसिक विकार , ज्यात छोटी छोटी मुले आपल्या जगातल्या इतर कुणाशी संवाद साधू शकत नाहीत. पर्यायाने , त्या मुलांची संभाषणाची , बाह्य जगाशी संपर्क राखण्याची क्षमता खूप कमी असते. पण अशा कुत्र्यांच्या सान्निध्यात या मुलांना असा साथीदार मिळतो की ज्याच्याशी प्रेमाची देवाणघेवाण करायला शब्दांची गरज नाही. स्पर्श , कुरवाळणे , अर्थहीन आवाज (नॉन्-व्हर्बल कम्मुनिकेशन) या द्वारे त्यांच्याशी भावनिक बंध निर्माण होतात. माणसांप्रमाणे या सवंगड्याची एकाही शब्दाची अपेक्षा नसते - आणि हो , हा सवंगडी माणसांप्रमाणे "किंमत करत बसणारा" (जजमेंटल ) नसतो. त्यामुळे असे दिसले की, ही मुले या कुत्र्यांच्या सान्निध्यात फार मोठी भावनिक सुरक्षितता शोधतात. पर्यायाने त्यांना आतून मिळणार्या या आधारामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो, शब्दांच्या दुनियेत येण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना फार मोठी मदत होते.
21 Jun 2008 - 6:58 pm | झकासराव
चांगल आहे अनुभव कथन.
मला आजवर वाटलीच तर फक्त कुत्रा आणि साप ह्या दोनच प्राण्यांची भिती वाटते. त्यांच्या मनात काय आहे तेच कळत नाही. (तस कोणत्याच प्राण्याच्या मनातल कळत नाही म्हणा पण जास्त संबंध वरच्या दोन प्राण्याशी येवु शकतो तेही अचानकच आणि चावले तर वेदना आणि भरमसाट लसी ती एक भिती)
त्यातल्या त्यात एक बर आहे की साप कोणी पाळत नाही. पण कुत्रा पाळतात.
तुम्ही दिलेल्या फोटोतला कुत्रा रुबाबदार आहे खरा पण तेवढाच भितिदायक आहे. ज्यावेळी अशा कुत्र्याना फिरायला नेतात तेव्हा कोण कोणास फिरवत हेच कळत नाही. :)
हा लेख विनोदि प्रकारे लिहिलाय खरा पण एखाद्याच आयुष्य पणाला लागु शकत.
आठवत का सिन्हगड रोडवर एका राजकारण्याच्या दोन ग्रेट डेन कुत्र्यानी एका महिलेवर हल्ला केला होता. सकाळ मध्ये बातमी होती.
वाचुन नुसती चिडचिड झाली होती. त्यानंतर त्या महिलेला त्या राजकारण्याने दिलेली वागणुक तर अत्यंत वाइट.
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
22 Jun 2008 - 9:10 am | सखाराम_गटणे™
त्यातल्या त्यात एक बर आहे की साप कोणी पाळत नाही. पण कुत्रा पाळतात.
फक्त कल्पना करा, लोकांनी साप पाळायला सुरवात केली तर काय होइल?
लोक कोणत्या कोणत्या तक्रारी करतील?
:(
सखाराम गटणे
(धमु, छोटा डॉन, आंद्या, पिवळा डांबिस, विजुभाउ इ. यांच्या वर्गातला :))
22 Jun 2008 - 9:16 am | भाग्यश्री
हो, तो लेख आठव्तोय मला.. असं होणं खरच वाईट आहे..१
http://bhagyashreee.blogspot.com/
22 Jun 2008 - 8:50 am | विसोबा खेचर
काय वाट्टेल ते पाळा हो, पण आपले प्राणी बांधून ठेवा , नियंत्रणात ठेवा..
हे मात्र सर्वात खरं!
बाकी, कुत्रा हा आमचा अत्यंत आवडता प्राणी! खूप जीव लावतो...!
आपला,
(श्वानप्रेमी) तात्या.
22 Jun 2008 - 9:10 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कुत्रा हा आमचा अत्यंत आवडता प्राणी! खूप जीव लावतो...!
(इतर कुत्र्यांची भीती वाटतेच )
22 Jun 2008 - 9:16 am | सखाराम_गटणे™
आम्ही पण असेच.
लहान पणी मुंबईत असताना काही कुत्रे पाळले होते. लोकांकडुन वर्गणी गोळा करुन त्यांना दुध पा़जणे इ. उदयोग आम्ही केले आहेत.
अजुन सुदधा पगारातील काही रक्कम आम्ही प्राण्यासांठी राखीव ठेवतो.
सखाराम गटणे
(धमु, छोटा डॉन, आंद्या, पिवळा डांबिस, विजुभाउ इ. यांच्या वर्गातला :))
23 Jun 2008 - 2:42 pm | धमाल मुलगा
अहो काय हे?
इतका झक्कास कुत्रा लाडानं तुमच्या जवळ आला आणि तुमची इतकी तंतरली?
आपल्याला तर कुत्रे, मांजरं, खारी, मुंगसं, चिमण्या, कावळे, घोडे सगळं लै लै आवडतं.
माझी अगदी अनोळखी कुत्र्याशीही छान गट्टी जमते!
एकदा बोपदेव घाटापुढच्या कानिफनाथ मंदीरात गेलो होतो, तिथे प्रदक्षिणेच्या मार्गावर एक कुत्रा दुसर्या कुत्र्यावर जोरजोरात भुंकत होता. मी सहजच त्याला रागावलो, "ए..गप ! का भुंकतोयस?'" चक्क तो गप्प झाला...मी म्हणालो, "इकडं ये.." आला, छान खेळला माझ्याबरोबर. माझा आत्तेभाऊ मला म्हणाला, "तू काय रोज येतो का रे इथं?" मी म्हणालो, "कुठे रोज? आजच तर आलोय." तरीही त्या भयानक दिसणार्या कुत्र्याशी मस्त दंगा केला केला. आता बोला.
हे बाकी खरं ! आमचा ब्राऊनी नुसता घराच्या गेटाशी बसलेला असायचा, पण त्याला बांधल्याखेरीज कोणी आत पाऊलही टाकायचे नाहीत.
मास्तर.....च्यायला, माझ्या ब्राऊनीची आठवण झाली हो तुमच्या ह्या लेखानं...काळजात कुठेतरी घरं पडली :(
23 Jun 2008 - 6:05 pm | भडकमकर मास्तर
साडेपाच फुटी भिंतीवरून......लाडानं
!!!!!!!_??????_
____________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
23 Jun 2008 - 6:12 pm | धमाल मुलगा
=))
असतं हो...आता त्याच्या मापानुसारच लाडात येणार ना तो ;)
तुम्ही एकतर त्याला फार आवडले असाल किंवा तुमची किर्ती ऐकुन आपली त्रास देणारी अक्कलदाढ तुम्हाला दाखवावी ह्या उद्देशानं आला असेल तो. ;)
आता त्याला बिचार्याला कसं कळावं की हे माणसांचे डॉक्टर आहेत...आपले आणि माणसांचे डॉक्टर वेगवेगळे असतात.
23 Jun 2008 - 3:01 pm | ऋचा
माझ्याकडे सुध्दा १ कुत्रा आणि २ मांजर आहेत.
कोणताही प्राणी काही करत नाही असा माझा अनुभव आहे.
माझी कुत्रा,मांजर ह्या प्राण्यांशी लगेच मैत्री होते.
अगदी मस्त मस्ती करण्याइतकी :) :)
मला कधीच कोणता कुत्रा चावला नाही. (माझ नशीब :))
माझे २ कुत्रे बांधुन ठेवते मी दिवसभर नाहीतर कोणी आला की झालच त्याच कल्याण :SS
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"