दुसर्या दिवशी मी कराटेमास्तरकडे जाधवचा विषय काढला. मराठेसोबतच्या सरांच्या त्या पहाटेच्या खाजगी व्यायामाच्या आठवणीने मला त्यांच्याशी बोलताना कसंतरी होत होतं. अजूनही पहाटेच्या अंधारात, आम्ही सगळे क्लासला येण्यापूर्वी ते चालायचं. सर एकटेच मराठेला पत्र्याच्या शेडमधे घेऊन तिचे व्यायाम घ्यायचे. मला ते अजिबातच आवडायचं नाही. आता हल्ली तर एक वेटलिफ्टिंगचा प्रकार घ्यायचे त्यात मराठेच्या मागे अगदी चिकटून, तिच्या अंगाभोवती हात लपेटून वजनाचा बार उचलायला मदत करायचे. मी पहाटे लवकर येऊन पत्र्याच्या भोकातून नजर टाकायचोच. करु मात्र काही शकत नव्हतो. मराठेला या सर्वाची जाणीव नसावी याचं जास्त वाईट वाटायचं.
पण ते काही असलं तरी आता जाधवच्या बाबतीत मात्र कराटेसरांची मदत घ्यायलाच हवी होती. नाहीतर क्लास लावून फायदा नाही असंच झालं असतं.
सरांना डीटेल माहिती देताना मी मुद्दाम मराठेचंही नाव घेतलं. जाधव मराठेलापण त्रास देतो असं सांगितलं.
मी तसं म्हटल्याबरोबर एकदम सरांवर खूप इफेक्ट झाल्यासारखा वाटला. आधी जांभया देत ऐकणार्या सरांचा चेहरा मराठेविषयी हे ऐकून एकदम रागाने जांभळा झाला. मानेच्या शिरा तटतटलेल्या दिसल्या. नाकाने फुरफुरायचेच बाकी होते. मला एकदम विचित्र आणि बरंही वाटायला लागलं, कारण सरांचा फुल्ल सपोर्ट मिळणार हे नक्की दिसत होतं.
"दाखव तो पोरगा मला..", ते म्हणाले.. "नाहीतर मुतनाळला घेऊन जा सोबत आणि दाखव, मी बघतो पुढे काय करायचं ते."
मला एकदम धीर आला. मुतनाळ हा सरांचा चाटचेला होता. गेल्या वर्षी त्याने न थांबता दहा हजार जोर मारण्याचा कसलासा विक्रम केला होता. मुतनाळला माझ्या सोबत बघून जाधव उभ्याजागी मुतणार हे नक्की होतं.
मी लगेच त्यानंतरच्या दिवशी मुतनाळला डबलसीट घेऊन कॉलेजला गेलो. सायकल स्टँडवर पाप्या, जाधव आणि गँग बसलेलेच होते. जाधवला बघून मला कधी नव्हे तो आनंद झाला. नाहीतर तो दिसेपर्यंत या सांड मुतनाळला दिवसभर सोबत वागवावं लागलं असतं.
"तो बघ..तोच तो", मी अगदी सर्व जगाला दिसेल इतका ढळढळीत अंगुलिनिर्देश जाधवकडे करत मुतनाळला म्हणालो.
जाधव आणि गँग आमच्याकडे पाहून नक्कीच चमकली होती. जाधव तर दुरूनही अस्वस्थ कळत होता. रांडेच्या, धमक्या देतोस ना इतरांना. घे आता..
मुतनाळ नुसताच हूं म्हणून गुरगुरला. त्याला परत क्लासवर सोडून आलो.
मग मी काही घडलंच नसल्यासारखा प्रॅक्टिसला जायला लागलो. मधे एकदोनदा मराठेही भेटली. पण खास बोलणं असं काही निघालं नाही. ती पुन्हा एकदा माझ्याशी साधी मैत्रीण असावी तशीच वागतेय असं मला सारखं वाटायचं. मी तिला एकदा जे बोललो, की मला तुझ्यात इंटरेस्ट आहे, त्यानंतर ती नुसती हसली होती. पण जोपर्यंत ती वागण्यातून तिलापण तसाच इंटरेस्ट असल्याचं दाखवत नाही तोपर्यंत मला काहीच समजत नव्हतं.
मी तात्पुरतं या सगळ्याकडे दुर्लक्ष केलं. सगळ्याची भरपाई मी गॅद्रिंगच्या स्टेजवरुन करणार होतो.
असं करता करता गॅद्रिंग आलंच, आणि त्या दिवसापर्यंत तरी काही राडा झाला नाही.
स्टेजवर मी आणि परांजप्या चढलो आणि कोरड्या घशाने समोर पाहिलं. समोर पोरापोरींची अफाट गर्दी होती. मराठे त्यात दिसतही नव्हती आणि आलीय का तेही कळत नव्हतं. फळ्यांचे उंच स्टँड आणि जमिनीवर ताडपत्री घालून भारतीय बैठक केली होती. पोरं आणि पोरी यांच्यामधे जाड दोरखंड कंपाउंड वॉलसारखे बांधले होते.
तीन ड्रमचा सेट घेऊन ऑर्केस्ट्रातला बेडगीकर स्टेजवर येऊन बसला.
आम्ही मग गिटारी टेस्ट करायला सुरुवात केली. त्यामुळे आमचा भाव एकदम वाढतोय असं आम्हाला वाटलं. पण तेवढ्यात मला अशी भयावह जाणीव झाली की इलेक्ट्रिक गिटारचा सिग्नल मैदानात प्रेक्षकांमधे उभारलेल्या स्पीकर्सना पोचवला गेला होता पण स्टेजवर मात्र मला तो अजिबात ऐकू येत नव्हता. इलेक्ट्रिक गिटारला स्वतःचा आवाज नसतो. फक्त अॅम्प्लिफायरला जोडून स्पीकर्समधून आवाज काढावा लागतो. प्रॅक्टिसच्या वेळी एकदोन वेळा जेव्हा इलेक्ट्रिक गिटार आणली होती तेव्हा हे सर्वकाही जोडकाम एका खोलीतच असायचं आणि त्यामुळे दणक्यात आवाज यायचा.
"हगलो परांजप्या आपण..काहीच ऐकू येत नाहीये.", मी परांजप्याला बाजूला घेत बोललो. पण त्याची गिटार साधी अकॉस्टिक गिटार होती, त्यामुळे त्याला स्वतः वाजवलेलं बर्यापैकी ऐकू येत होतं.
यावर काही उपाय केल्याशिवाय प्रोग्रॅम सुरु व्हायला नको होता.. पण तेवढ्यात विंगेतूनच मंजूळ आवाजात एका पोरीने हातातल्या माईकवर अनाउन्समेंट केली आणि गाणारी पहिली जोडी स्टेजवर आलीच.
त्यांनी पुढेमागे न बघता गायलाच सुरुवात केली. आणि मला दुसरा भीतीदायक धक्का बसला. त्यांच्या माईकचा आउटपुट अॅम्प्लिफायरच्या वाटेने थेट प्रेक्षकांतल्या स्पीकर्सना गेला होता आणि ते स्पीकर्स इतके दूर होते की गायकांचा आवाजही मला कणभरही ऐकू येत नव्हता.
स्टेजवरची साउंड सिस्टीम नेहमी अशीच असते की कॉलेजच्या कोण्या अडाणी शिपायानेच सत्कार समारंभाला करावी तशी जोडणी केली होती कोण जाणे.
मला एकदम बराच घाम आला. गिटारसरांच्या भाषेत "क्येसं उबी र्हात्यात" अशी अवस्था झाली.
मग मी ऐकू न येणार्या गाण्याला, ऐकू न येणार्या गिटारीची साथ करायला लागलो.
गाणार्याच्या ओठांची हालचाल बघायची. थोडाफार मंद आवाज आला तर त्यावरुन कोणती ओळ चालू आहे त्याचा अंदाज घ्यायचा आणि कॉर्ड बदलायची असं चालू झालं.
त्या जोडीचं "चुरा लिया" गाणं चालू होतं.
"कहीं बदल न जाना सनम..", पोरीचं कडवं कसंबसं संपलं. मधला गिटारचा तुकडा परांजप्याला येत नव्हता. बापटसरांनीच तो पीस कीबोर्डच्या रडक्या टोनमधी वाजवायला घेतला. तो म्युझिकपीस संपला आणि तरी पोरगा त्याची ओळ सुरुच करेना. मग बापटसरांनी पूर्णच्या पूर्ण टँङ डँग म्युझिकतुकडा उगीचच पुन्हा एकदा वाजवला.
तेवढ्या गॅपमुळे तो येडझवा पोरगा भानावर आला आणि एकदम संपूर्ण वेगळ्या पट्टीत उफाळला. "सजाऊंगा लुटकर भी तेरे बदन की डाली को.."
पोरगा एस.वाय.मधे पॉप्युलर होता. त्यामुळे त्याचा आवाज ऐकताक्षणीच समोरचं पब्लिक पेटलं. रुमाल हवेत उडवणं, किंचाळणं, शिट्ट्या हे सगळं सुरु झालं. त्यामुळे आधीच मला मंद ऐकू येणारा गाण्याचा आवाज पूर्ण बंद झाला.
मग मी ठरवलं की आपल्याला वाटेल त्या सुरात कॉर्ड धरत जायची. बाहेर गदारोळात जे ऐकू जाईल ते जाईल. मी परांजप्याकडे नजर टाकली. तो पठ्ठ्या तर गिटार वाजवणं बंद करुन बसला होता. नुसती बोटं फिरवत होता पण आवाज शून्य.
मराठे कुठे दिसतच नव्हती. गांडू नशीब तेच्यायला.
तो पोरगा कुत्र्याने कुल्ला दातात धरल्यासारखा भरधाव स्पीडने गात होता. त्याची ओळ खूप आधीच संपत होती. मग बेडगीकर डमडमडमडम असा अनेकवार डम्कार मारुन तेवढी जागा भरुन टाकायचा आणि गायकाची पुढच्या ओळीपर्यंतची सोय करायचा. बेडगीकरच्या ड्रमचा आधार होता. कारण तेवढा एकच आवाज मला स्टेजवर ऐकू येत होता. प्रेक्षकांना काय ऐकू येतंय याची कल्पनाही करवत नव्हती.
कधी एकदा हे संपतंय असं वाटायला लागलं. आणि खरंच कसंतरी गाणं संपलंही. पण पब्लिकने आता "वन्स मोअर" म्हणून ओरडायला सुरुवात केली. माझ्या छातीत धाडकन धडकी भरली.
(टू बी कंटिन्यूड..)
प्रतिक्रिया
29 Mar 2011 - 6:21 pm | विंजिनेर
भावड्या लय भारी लिहितो तू.
फुडं?
29 Mar 2011 - 6:27 pm | रेवती
बापरे! खूप हसले.
पुढचे लेखन येण्याची वाट बघत बसावं लागणार का?
31 Mar 2011 - 4:47 pm | पियुशा
हेच म्हनते
+१११
29 Mar 2011 - 6:28 pm | ५० फक्त
आमच्या गॅदरिंगात आम्ही एक गाणं किबोर्ड वर सारेगामा करुन बसवायला घेतलं होतं त्याची लई आठवण झाली, आणि आता हसुन हसुन खुर्चीतुन पडायला झालं होतं.
लई लई लई भारी बगा. मेलो हसुन हसुन.
29 Mar 2011 - 6:42 pm | प्रास
वाह् भई वाह्!
आपने जीवनमें आनंद ही आनंद किया हैं.....!
येऊ द्या पुढले भाग.....
:-)
29 Mar 2011 - 6:42 pm | गवि
नवीन, पहिल्यांदा वाचणार्यांना पात्रपरिचय नसेल तर या आधीची दास्तान वाचावी अशी विनंती करतो. ती वाचली तर पात्रांचे आणि काही घटनांचे बरेच संदर्भ लागतील.
लिंका खाली देतोयः
भाग एकः
http://www.misalpav.com/node/15320
भाग दोनः
http://www.misalpav.com/node/15326
भाग तीन:
http://www.misalpav.com/node/15332
भाग चार :
http://www.misalpav.com/node/15344
शिवाय "और गिटार" चे पहिले दोन भागही.
http://www.misalpav.com/node/17351
आणि
http://www.misalpav.com/node/17394
29 Mar 2011 - 8:42 pm | गणेशा
और गिटारचे सर्व भाग छान च आहे .. खुप आवडले
पण तुम्ही 'दास्तान-ए-आवारगी' ची लिंक त्याच्या पहिल्या भागात का दिली नव्हती .. मला माहितच नव्हते हे भाग ..
आता वाचतो आहे ..
पहिला वाचल .एकदम झकास आहे ..
पुढचे वाचत आहे
29 Mar 2011 - 10:02 pm | निनाद मुक्काम प...
लेख वाचून वन्स मोर लिहिणार होतो .पण प्रतिसादात लेख मालकाने पात्र परिचय म्हणून वाचनाची धमाल लिंक दिली आहे .
हे म्हणजे '' आंधळा मागतो एक डोळा ,देव देतो दोन ''
29 Mar 2011 - 11:09 pm | गणेशा
पुन्हा पुन्हा वाचावी अशी लेखमाला ..
और गिटार मुळे वाचायला मिळाली .. खुप छान वाटले सगळे ..
ऑफिस चे काम झाले तरी १ तास एक्सट्रा थआंबुन मी काय करतोय हेच कदाचीत सगळॅ बघत होते ...
स्कायम १० लाच जाणारा मी आज ११ ला कसे काय येथे .. पण सगळॅ निटशे वाचुन मन भरे पर्यंत वाचले ..
खुप छान ...
संपुर्ण झपाटल्यासारखे वाचत होतो ..
प्रिंटच मारतो आता.
कंपणीत ब्लॉग ओपन होत नाही याचासर्वात राग आज आला.
चला आता जातो good night , अजुन जेवन राहिले आहे... माझ्या शाळेतल्या मराठे आता त्यांच्या नवर्याला वाढत असतील .. अरे रे .. जावुदे निघतो
असेच लिहित रहा.. आवडीने वाचत आहे ..
- गणेशा
30 Mar 2011 - 9:42 am | मृत्युन्जय
आयला ते कराटे मास्तर आणि मराठेची लिंक आधीच्या भागात नव्हती असे राहुन राहुन वाटत होते ते बरोबर होते म्हणजे. दास्तान वाचली होती पण बहुधा तुझ्या ब्लॉगवर.
बाकी लेख छानच.
29 Mar 2011 - 6:50 pm | llपुण्याचे पेशवेll
खल्लास ... काय वर्णनं लिहीली आहेत. :) झक्कास.
29 Mar 2011 - 7:11 pm | अनामिक
मस्तं जमलंय, पुढचा भाग टाका लवकर.
29 Mar 2011 - 7:21 pm | प्रसन्न केसकर
वाचताना मी भाग घेतलेले पहिले (आणि शेवटचे) अभिरुप न्यायालय आठवले. खेड्यातुन शहरात आल्यानंतर पहिल्यांदाच स्टेजवर जात होतो मी अन भरीस भर म्हणजे रिंगटोन चिरकी असण्याचं ते वय. पहिलंच वाक्य उच्चारलं अन आख्ख्या ऑडीटोरियमनं टर उडवायला सुरुवात केली. आख्खं न्यायालय संपेपर्यंत थरथरत होतो मी. पण नंतर ग्यादरिंग आलं अन ऑर्केस्ट्रावाल्या पोरापोरींचा मस्त ग्रुप जमला. अन त्यानंतरच्या इलेक्शन्स तर आम्हा राडेबाजांसाठी पर्वणीच. पहिलं वर्ष संपलं अन मग आम्हीच रॅगिंग करायला लागलो.
29 Mar 2011 - 7:46 pm | आदिजोशी
लय भारी. पटापट टाका पुढचे भाग
29 Mar 2011 - 7:58 pm | स्पा
खप्लोय साफ.............
हा हा हा हा हा
तो पोरगा कुत्र्याने कुल्ला दातात धरल्यासारखा भरधाव स्पीडने गात होता.
बाब्बो आवरा
29 Mar 2011 - 8:27 pm | गणेशा
अप्रतिम
लिहित रहा .. वाचत आहे
29 Mar 2011 - 8:28 pm | प्रचेतस
खरंच लै भारी लिवतोय रं भावड्या तू.
मी प्रेक्षकात बसलोय अन् समोर ग्यादरींग चालू आहे अगदी असंच वाटतंय.
29 Mar 2011 - 8:39 pm | प्रीत-मोहर
लै भारी =))
29 Mar 2011 - 9:32 pm | आनंदयात्री
मस्त रे गवि !!
हगला तिचायला हा डायलॉक लै आवड्ला बॉ !!
29 Mar 2011 - 9:42 pm | पिंगू
लै भारी गॅदरिंग चाललयं.. लवकर गॅदरिंगचा पुढचा शो येऊ द्या..
- पिंगू
29 Mar 2011 - 10:38 pm | पैसा
पण क्रमशः मुळे गॅदरिंग सुरू असताना लाईट गेल्यासारखं वाटतं एकदम! ;)
30 Mar 2011 - 7:44 am | पप्पुपेजर
खुपच मस्त काय लिहीता राव........
30 Mar 2011 - 10:02 am | शिल्पा ब
सगळेच लेख मस्त आहेत.
30 Mar 2011 - 10:15 am | इरसाल
अतिशय छान...............................मस्त.
30 Mar 2011 - 10:17 am | पिलीयन रायडर
आम्ही दास्तान चा उल्लेख पाहुन आधिच एका बैठकित ते वाचुन काढला होता... त्यामुळे भलतिच जास्त मज्जा येतेय....
30 Mar 2011 - 10:44 am | sneharani
हा पण भाग मस्त झालाय!
येऊ दे पटापट पुढचे भाग!
30 Mar 2011 - 10:47 am | विजुभाऊ
मस्त लिहीली आहेस रे.
मला मी एका स्पर्धेत भाग घेतला होता त्याची दु:खद आठवण ताजी झाली
ओ साथी रे.... गाणे म्हणायला घेतले. पहिल्या लालालाला ला प्रेक्षकानी एकदम जोरदार टाळ्यांचा कडकडाट केला.....
माझी पार तंतरली तीन चार वाघ मागे लागल्यासारखे गाने फाश्ट म्हणत गेलो तबलजीची आणि माझी एकदम स्पर्धा लागली होती.....
आणि भारत एका महान गायकाला कायमचा मुकला
31 Mar 2011 - 11:20 am | स्पंदना
हा ! हा! हा! तब्बलजींची अन तुमची रेस? वा! व! खपले मी!
31 Mar 2011 - 11:27 am | स्पंदना
गवी किती हसवताय?
आमच्या गॅदरींग नध्ये आमच्या वर्गात एक महमद रफी होता त्यान 'पतझड सावन बसंत बहार' हे गाण (ड्युएट) गायला घेतल होत. पण त्याला साथ देणारी जी कन्यका होती तीला गाण्या पेक्षा त्या गाण्याच्या वेळच्या साजशृंगारात जास्त रस होता. त्यामुळे स्टेजवर अगदी बाम्गड्यांपर्यंत डिट्टो जयाप्रदा अशी ती अन चाम्गला गाणारा साधा हा, असे दोघे अवतीर्ण झाले.
याच गाउन झाल्यावर तिने जे तार पट्टीत किंचाळुन गाय्ला सुरवात केली की हातात्ला माइक विसरुन आमचे महमद रफी' त्येच्या भन नट्लीयास एव्हढी तर गाढ्वागत का ओरडते ग? अस खणखणीत आवाजात बोलुन गेले. लोळुन लोळुन पुरे झाल आम्हाला . सार्या गाणभर तो तीला पुट्पुटुन शिव्या देत होता अन ती जास्तीत्जास्त तारसुर लावत होती.
5 Apr 2011 - 9:17 am | भडकमकर मास्तर
वा गवि..
"ऐक्कू न येणार्या गाण्याला ऐकू न येणार्या गिटारीची साथ..."..
या भन्नाट परिस्थितीतून गेलोय... ..
झबरदस्त... मजा आली...
8 Apr 2011 - 7:04 pm | चिगो
तो पोरगा कुत्र्याने कुल्ला दातात धरल्यासारखा भरधाव स्पीडने गात होता.
ब्येक्कार फुटलो की...
आईच्यान... भौ, नको करु रे असं. इथं आसामात मी मराठीतली मजा कशी सांगु ऑफिसातल्या लोकांना.. पाह्यत्यात ना लोकं..