गॅदरिंगमधे गिटार वाजवण्याची इच्छा आम्ही मॅडमकडे बोललो आणि लगोलग त्यांनी आम्हाला सिलेक्शनला बोलावलं. आम्हाला वाटलं की आमची गिटार ऐकून आम्हाला सिलेक्ट करायला हा प्रकार घडतो आहे. तिथे गेल्यावर लक्षात आलं की यच्चयावत गॅद्रिंगगायनेच्छू हौशे तिथे जमा झाले होते आणि बाईंची अपेक्षा अशी होती की आम्ही त्या सर्वांनाच गाण्यात साथ करावी.
आमच्यावर बाँब पडला. एक चारतीन मिनिटांचा तुणतुण परफॉर्मन्स द्यायचा आणि कटायचं अशा तयारीने गेलेले आम्ही पुरते अडकलो. "नाही" म्हणावं तर आमचं अडाणीपण उघड होणार. "हो" म्हणावं तर प्रत्येकामागे सूर धरताना आमची फाटणार. कॉर्ड पकडून सूर देत राहणं हे माझं काम त्यातल्यात्यात बरं होतं. परांजप्याची तर अजूनच वाईट अवस्था झाली. कारण मधल्या मधल्या नोट्स त्याला वाजवाव्या लागणार होत्या. त्यासाठी गिटारवर फारच पक्का हात असावा लागतो.
बरं, नुसत्या गिटारने सगळीच साथ होणार नव्हती. किमान कीबोर्ड, पेटी, तबला, कोंगा, जमल्यास ऑक्टोपॅड असं सगळं हवं होतं. केमिस्ट्रीचे बापटसर कीबोर्ड आणि पेटी वाजवायला होते. त्यामुळे किमान तेवढी जुळणी झालेली होती. पण सारा ऑर्केस्ट्रा बोलावण्याचं बजेट कॉलेजकडे नव्हतं. त्यामुळे बाईंचा असाच बेत होता की मला आणि परांजप्याला घ्यायचं आणि बाकी साथसंगतीचं आमच्या बोडक्यावर मारायचं. म्हणजे फुकट पडलं असतं.
हो म्हणण्याची किंवा नाही म्हणण्याची कशाचीच हिंमत होईना. शेवटी मनात विचार करुन गिटारसरांच्या भरवशावर हो म्हणून टाकलं.
त्या दिवशीची सिलेक्शन सुरु झाली. मराठे यात कशात नव्हतीच. नसायचीच. यच्चयावत "ट" दर्जाच्या पोरी गायला आल्या होत्या. पोरंही होती. गुटखागालफडी जाधव गेल्या वर्षीच्या "सू मिले दिल खिले" च्या अनुभवावरुन भाग घ्यायला आलाच नव्हता. पण नुसताच हॉलमधे मागे दूर बसून थंड डोळ्यांनी निरिक्षण करत होता.
गिटारची कॉर्ड धरुन चालू ओळीला योग्य सुराचा झंकार देणे एवढी माझी "साथ देणे" या प्रकाराची समजूत होती. पण माझी कौशल्यपातळी अशी पातळ होती की मला आधी कोण काय गाणार आहे त्याची नक्की माहिती असणं आवश्यक होतं आणि काही अवघड गाण्यांना मी सरळसरळ साथ देऊ शकणार नाही असं कबूल करणं भाग होतं.
मग साधी सोपी गाणी (गॅद्रिंग फेम) मीच काढून बाईंना दिली.
पोरांसाठी "पुकारता चला हूं मैं..", "ओ साथी रे, तेरे बिना भी क्या जीना.." आणि अशीच बरीच. "ओ साथी रे" हे गाणं डुकराने जरी गायलं तरी लोक वाह म्हणतात. गॅद्रिंगसाठी बनलेलंच गाणं आहे ते.
पोरींना "ओंकारस्वरूपा" वगैरे. कारण पोरींनी जास्त फिल्मी गाणं गायलं आणि त्यात इश्क, लव्ह वगैरे काही आलं की चेकाळलीच पोरं. आणि मग हुल्लडबाजीत सगळ्या शोची काशी.. त्यामुळे पोरींना सेफ गाणीच घ्यायला लागतात. गेल्या वर्षी तेरणीकर नावाच्या पोरीने "शारद सुंदर चंदेरी रात्री.." गायलं होतं तेव्हा असंच झालं. "थंड या हवेत घेऊन कवेत.." वगैरे ओळींना पोरं एवढी पेटली की शेवटी काठ्यांनी बडवून आवरायची वेळ आली होती.
तेव्हा गाणी अशीच निवडली होती की जी गायलाही सेफ..आणि वाजवायलाही. च्यायला, तुम्हाला फुकट ऑर्केस्ट्रा हवा. गिटारची साथ हवी.. मग गा गप गुमान सांगतो ती गाणी..
त्यानंतर दोनेक दिवसांत प्रॅक्टिस नावाचा अत्याचार सुरु झाला.
कोणी सुरात गावं अशी अपेक्षा नव्हती. ठीक आहे. पण जो काही धरलाय त्या सुरात किमान सलग दोन ओळी किंवा तेवढं कडवं तरी पूर्ण करावं एवढी माफक मागणी माझी होती. पण बहुतेक सर्वच पोरं पोरी ओळीओळीला सूर बदलत होती.
दोन ड्युएट्स होती. तो माझ्यासाठी हॉरर शो असायचा. कारण त्या युगुलातली मुलगी स्वतंत्र बेसूर होती आणि मुलगाही स्वयंपूर्णरित्या बेसूर होता. मुलीचं कडवं संपून मुलगा त्याचं सुरु करायचा तेव्हा रेल्वेने रुळ बदलावेत तसा खडखडाट होत होता.
गिटारसरांचा ऑर्केस्ट्रा माझ्यामागे उभा राहिला. तीन ड्रमवाला सेट आणि एक कीबोर्ड घेऊन त्यांचे वादक फायनल शो ला येतील असं वचन मिळालं. ऑर्केस्ट्राचीच एक इलेक्ट्रिक गिटारही मिळाली. प्रॅक्टिसला मात्र फक्त माझी गिटार आणि बापटसरांची पेटी एवढ्यावर चाललं होतं.
मला सर्वात आवडणारी बारातारी गिटार सरांकडे होती. तीच घेऊन अजून इम्प्रेशन पडेल असं वाटल्यामुळे मी ती घ्यायला सरांकडे गेलो. ती हातात घेऊन बोलता बोलता परांजप्याने भडव्याने अमिताभच्या "सारा जमाना, हसीनों का दीवाना" मधल्या स्टेप्स दाखवायला सुरुवात केली आणि गर्रकन वळून दाखवताना दाणकन गिटारचा कणा भिंतीवर आपटून मोडला. सर वैतागले. परांजप्या ओशाळला. भरुन देतो म्हणाला. ते सर्व व्हायचं ते झालं. त्या गिटारचा झंकार अफलातून होता. ती शिल्लक न राहिल्याने माझा बराचसा उत्साह गळला.
या प्रॅक्टिसच्या भानगडीत रोज रात्रीचे दहा वाजायचे. पण त्यामुळे बिघडत काही नव्हतं. आम्हाला तसाही दुसरा काही उद्योग नव्हता. नसतोच. कारण दिवसा एकाही लेक्चरला आम्ही बसत नाही. रात्रीही आनंदरावकडे ऑम्लेट सँडविच खात गप्पा हादडण्यापलिकडे आम्ही काहीच करत नाही.
प्रॅक्टिसच्या तिसर्या दिवशीच रात्री अकरा वाजता मी आणि परांजप्या अँड्र्यूकडे ऑम्लेट खात आणि चहाने जीभ जाळत उभे होतो. तेवढ्यात बुलेटवरुन पाप्या आणि त्याच्यामागे बसलेला जाधव भक भक आवाज करत तिथे येऊन थांबले.
आयचा घो.. मी ताठ होऊन उभा राहिलो. इथे या वेळी ते आलेत म्हणजे नक्कीच काहीतरी राडा आहे एवढं मला कळत होतं.
पाप्या माझ्याजवळ आला. हसून नुसतीच पाठीवर थाप मारुन अँड्र्यूकडे गेला. जाधव मागून आला आणि दात विचकून हसला.
मी चांगलाच टेन्शनमधे होतो. पण चेहरा शक्य तितका कोरा ठेवला होता. मुद्दाम परांजप्याशी बोलणं चालू ठेवण्याचा प्रयत्न करत राहिलो. पण परांजप्याही फाटला होता असं त्याच्या चेहर्यावरुन दिसत होतं.
"काय रे आमिर खान..कशी काय चाल्लीय गिटार प्र्याक्टीस?.. अँ" , जाधव बोलला.
"आहे..चालू आहे.. का रे?", मी म्हटलं. घशात गोळा येत होता.
"नाय्..सहज विचारलं. आम्हाला काय फरक पडतो बाबा..वाजवा...", जाधव उत्तरला.
मग थोडं थांबून तोच म्हणाला. न म्हणून सांगतो कोणाला बेण्या.
"काय.. लाईन व्यवस्तशीर चालू आहे ना? .. अँ..?"
मी नुसताच हसलो.
"गिटार बिटार ट्यांव ट्यांव करतोयस आत्ता.. ईज्जी नाहीये हां तुला वाटतंय तेवढं.. पण मानलं.. हिम्मत आहे तुझ्यात..", जाधवची धमकी आलीच.
"काय ते सरळ बोल ना..", मी धीर एकवटून बोललो. आता बोलायलाच हवं होतं.
"नाय.. काय करायचं ते आम्ही न सांगताच करत असतो. बोललो एवढं लक्षात ठेवून वाजवा गिटार बिटार..अँ.. समजलास ना?", जाधव मुद्द्याचं बोलला.
चला..म्हणजे मला शंका होती तसा राडा अपरिहार्य होता. मला सरळपणे एका पोरीवर इम्प्रेशन मारणंही शक्य नव्हतं.
मला भयानक राग आला. याला हिते गाडावा इतका आतून पेटलो.
"तुला काय करायचं ते कर..", मी थरथरत म्हणालो..
"नाय्..ते आम्ही करुच.. तू सांगायला पाहिजे असं नाय..", जाधव पुन्हा तेच बोलला.
"चल परांजप्या..यांच्या नादी लागून फायदा नाही..", मी परांजप्याला बाजूला ओढून म्हटलं.
"चल चल..", परांजप्या घाईलाच आला होता. त्याची पार पिवळी झाली होती.
ल्यूनाला ढकलस्टार्ट करुन तिथून निघालो. अँड्र्यूला हातानेच "उद्या पैसे देतो" म्हणून खूण केली.
मागे बघत बघत ल्यूना चालवत होतो. कारण बुलेटवर ते दोघे सहज आम्हाला गाठू शकत होते आणि आत्ता रात्री आम्ही दोघे एकटे होतो.
(टू बी कंटिन्यूड..)
प्रतिक्रिया
24 Mar 2011 - 6:12 pm | रेवती
गोष्ट चांगली सुरात चालू आहे.
'ट दर्जाच्या पोरी' वाचताना फिस्सकन हसू आले.
गाण्यात 'लव्ह, इश्क' या शब्दांनी वेगळीच जादू घडलेली वाचली तर 'स्वयंपूर्ण बेसूर' असण्याने अतोनात हसू आलं.
अवांतर: तुम्ही माझ्या पाकृच्या धाग्याला प्रतिसाद दिलायत का?;)
25 Mar 2011 - 12:36 pm | वपाडाव
झायरातीचा यकबी चानस सोडंना बाबा....
पु.भा.ल.टा.
24 Mar 2011 - 6:15 pm | ५० फक्त
गिटाराडिया - येउ दे येउ दे,
उगा काही आठवणी परत पेटताहेत पण असुदे अंमळ बरं वाटतंय वाचुन.
24 Mar 2011 - 6:20 pm | मृत्युन्जय
आणि आत्ता रात्री आम्ही दोघे एकटे होतो.
त्या युगुलातली मुलगी स्वतंत्र बेसूर होती आणि मुलगाही स्वयंपूर्णरित्या बेसूर होता
"थंड या हवेत घेऊन कवेत.." वगैरे ओळींना पोरं एवढी पेटली की शेवटी काठ्यांनी बडवून आवरायची वेळ आली होती.
पंचेस लय भारी आहेत. वाचता वाचता बेक्कार हसत होतो. लवकर टाका तिसरा आणि शेवटचा भाग आता.
24 Mar 2011 - 6:27 pm | ढब्बू पैसा
लिखाण आवडलं.
एक से एक फटके बाजी!
तिसरा भाग यावा आता पटकन!
24 Mar 2011 - 6:34 pm | गणेशा
मस्तच ...
ओ साथी रे" हे गाणं डुकराने जरी गायलं तरी लोक वाह म्हणतात. गॅद्रिंगसाठी बनलेलंच गाणं आहे ते.
जबराट
24 Mar 2011 - 6:42 pm | प्रसन्न केसकर
चांगला प्रोफेशनल ठेवायचा अन गिटारचा व्हॉल्युम बंद करुन न्यायचं रेटुन सगळं. आम्ही असंच करायचो.
आम्ही कॉलेजमधे असताना एकजण होता हौशी कलाकार. सगळ्यात चांगली गिटार होती त्याच्याकडं पण वाजवायला एकदम ठ्या. आणि दुसर्या कुणाला द्यायचा पण नाही तो गिटार. मीच वाजवणार म्हणुन नडायचा. अन तो गिटार वाजवायला लागला की सगळं गाणं बोंबलायचं. आख्खी चार वर्ष त्याला फर्स्ट लीड वर ठेवायचो आम्ही अन आयत्या वेळी त्याचा गिटारची स्पीकर केबल काढुन टाकायचो. बस बोंबलत. सगळ्या गाण्यातले गिटार पीस सेकंड लीड आणि कीबोर्ड वर खेचायचे मग. आणि वर गॅदरिंग संपल्यावर त्या हीरोच्या परफॉर्मन्सचे तोंड फाटेपर्यंत कौतुक करुन पार्टी पण उकळायचो. लास्ट इयरच्या गॅदरिंगनंतर त्याला कळलं आम्ही काय करायचो ते. अजुन आम्ही दिसलो की आंबट तोंड करतो.
24 Mar 2011 - 6:45 pm | रेवती
अग्ग्ग्ग्ग! अश्या रितीने एक उदयोन्मुख कलाकार हिरमुसला आणि संगीतजगतानं एक तारा गमावला.;)
24 Mar 2011 - 10:15 pm | गोगोल
> बस बोंबलत. सगळ्या गाण्यातले गिटार पीस सेकंड लीड आणि कीबोर्ड वर खेचायचे मग.
पण मग त्याला घ्यायचेच कशाला?
25 Mar 2011 - 5:11 am | निनाद
पार्टी कुणाकडून उकळायची मग? ;)
24 Mar 2011 - 11:09 pm | पिंगू
च्यायला यावरुन एक किस्सा आठवला. कॉलेजात असताना एका महाभागाने ज्याला गिटार कशाशी खातात आय मीन कशी वाजवतात हेही माहित नसताना गॅदरिंगमध्ये गिटार वाजवली होती. ती कशी दाखवायला गिटार पकडली होती आणि मागे कॅसेट चालू होती.. ;)
- (स्वप्नातील गिटारिस्ट राडेबाज) पिंगू
24 Mar 2011 - 11:27 pm | आनंदयात्री
लै भारी, गविशेट.
24 Mar 2011 - 11:56 pm | प्रास
हा दुसरा भागही छान जमून आलाय. मजा आली.
पुढला भागही लौकर टाका गवि.......
25 Mar 2011 - 2:32 am | प्राजु
काय लिहिताय राव!! लय भारी...
वाचतेय.. येऊद्यात लवकर.
25 Mar 2011 - 2:44 am | भडकमकर मास्तर
मस्तच...
"ओ साथी रे" हे गाणं डुकराने जरी गायलं तरी लोक वाह म्हणतात. गॅद्रिंगसाठी बनलेलंच गाणं आहे ते.
ठ्या खिखिखि
25 Mar 2011 - 5:15 am | निनाद
गवि काय मस्त जमलेय हे सगळे, खल्लास लेखन!
फार वाट पाहायला न लावता वेळेत हा भाग टाकल्या बद्दल धन्यवाद!
ट दर्जाच्या पोरी, ओ साथी रे" हे गाणं डुकराने जरी गायलं तरी लोक वाह म्हणतात. वगैरे जबरीच! या भागातला शेवटही मस्तच.
याची दूरचित्रवाणीवर सिरियल करण्यासाठी प्रपोजल द्या ना...
25 Mar 2011 - 6:23 am | नगरीनिरंजन
असेच म्हणतो. (दूरचित्रवाणीचं सजेशन सोडून. एवढ्या चांगल्या लिखाणाची सिरियल बनवून वाट लावू नका.)
25 Mar 2011 - 7:25 am | स्पंदना
लय भारी!!
सगळच डोल्यासमोर येत, काय गॅदरींग असायच, अन काय त्या प्रॅक्टीस!! धम्म्माल्नाय,
वर वाचता वाच्ता कितीदा खॅक ख्यॅक झाल सांगु ! मस्त!
25 Mar 2011 - 8:06 am | पप्पुपेजर
तुमचे लेखन नेहमी जुन्या आठवणी जागवतात :)
25 Mar 2011 - 9:51 am | शिल्पा ब
धमाल..पुढचा भाग टाका बिगीबिगी..
25 Mar 2011 - 10:24 am | पियुशा
हा भाग हि मस्त जमलाय
येउ दे पट्पट :)
25 Mar 2011 - 11:16 am | sneharani
मस्त!! पुढचा भाग येऊ दे पटकन!!
:)
25 Mar 2011 - 1:53 pm | हरिप्रिया_
:)
मस्त...
25 Mar 2011 - 2:06 pm | मुलूखावेगळी
मस्त फुल्टु फन :)
लिहा लवकर पुढचा भाग.
25 Mar 2011 - 4:40 pm | इरसाल
अतिशय छान.........
25 Mar 2011 - 7:49 pm | निनाद मुक्काम प...
माझ्या मते मी वाचलेले मीपा वरील सर्वात जास्त विनोदी लिखाण ( त्यात राडा शब्द आल्याने कदाचित मला .......)
''शारद सुंदर चंदेरी रात्री.." गायलं होतं तेव्हा असंच झालं. "थंड या हवेत घेऊन कवेत.." वगैरे ओळींना पोरं एवढी पेटली की शेवटी काठ्यांनी बडवून आवरायची वेळ आली होती.
यच्चयावत "ट" दर्जाच्या पोरी गायला आल्या होत्या ( क दर्जाच्या म्हणजे काकू बाई, हे ट प्रकरण काय आहे ? ट म्हणजे मुलांच्या बाबतीत टारगट माहीत आहे .)
त्या युगुलातली मुलगी स्वतंत्र बेसूर होती आणि मुलगाही स्वयंपूर्णरित्या बेसूर होता. मुलीचं कडवं संपून मुलगा त्याचं सुरु करायचा तेव्हा रेल्वेने रुळ बदलावेत तसा खडखडाट होत होता.
चला..म्हणजे मला शंका होती तसा राडा अपरिहार्य होता. मला सरळपणे एका पोरीवर इम्प्रेशन मारणंही शक्य नव्हतं.( जुनी आठवण ताजी झाली .डोंबिवलीत इच्च्या भणा पोरांनी शाळेत असेच बाजूला घेतले होते )
मागे बघत बघत ल्यूना चालवत होतो. कारण बुलेटवर ते दोघे सहज आम्हाला गाठू शकत होते आणि आत्ता रात्री आम्ही दोघे एकटे होतो( लय भारी )
28 Mar 2011 - 4:15 pm | वपाडाव
"ट" दर्जाच्या पोरी
टपर्या = भंगार
27 Mar 2011 - 5:42 am | अभिज्ञ
मस्त लिहिताय.
अभिज्ञ.
27 Mar 2011 - 9:33 am | ज्ञानेश...
गिटार, चहा, जीन्स, कट्टा, बाईक्स, पोरी...
स्साला कॉलेज लाईफला तोड नाही.
कथा फार फार मस्त चाललीये. पुढचे कथानक वाचायला आतुर झालो आहे.
27 Mar 2011 - 11:02 am | पैसा
लै आवाडलं!
28 Mar 2011 - 6:49 am | प्रीत-मोहर
गवि एकसे एक पंचेस ...सग्ळे आवल्डे ////.अस्त एक्दम
आत पुढचा भाग लौकर टाका!!!
8 Apr 2011 - 6:57 pm | चिगो
वाक्या-वाक्याला फुटलो..पंचेस चेपु करायचे झाल्यास सगळा लेख चेपु करावा लागेल...
जियो मालक...