एक सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा!

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in जनातलं, मनातलं
14 Feb 2011 - 1:14 pm


जून च्या शेवटच्या शनिवारच्या संध्याकाळी त्सेंटा आजीने ग्रीलचा बेत केला होता (होहो, म्हणजेच ते तुमचं बार्बेक्यू..) पण ती जरा सचिंत दिसत होती. कारण विचारले तर म्हणाली मागच्या आठवड्यात हॉल बुक केला पण हान्सीयुर्गान आता ट्रीपला जाणार आहे तो ३ आठवड्यांनी येणार, त्याच्यापुढे आमंत्रणपत्रं तयार करायची तर वेळ नाही.. म्हणून आम्ही ह्योक्स्ट मधल्या प्रिंटरांकडे जायचं म्हटलं तर ३०-३५ पत्रिका छापून द्यायला कोण तयार होणार? आकिमआजोबा म्हणाले, " मी टाइप करेन साध्या कागदावर आणि फोटोकॉपी काढू त्याच्या.पण ते हिला पटत नाही, तिला डेकोरेटिव्ह आमंत्रण पत्रिका हव्या आहेत. त्यावर विचार चालू आहे आमचा." ते दोघं काय बोलत आहेत , ते आधी समजेचना.. मग लक्षात आले की सप्टेंबरमध्ये तिचा ८०-वा वाढदिवस आहे आणि हे दोघंही त्या पार्टीच्या तयारी बद्दल बोलत आहेत. आजीच्या पंच्याहत्तरीला आमंत्रणपत्रं आणि टेबलकार्डांचे सगळे काम हान्सीयुर्गानने केले होते आणि आता तोच ३ आठवडे नाही तर कोण करणार? असा यक्षप्रश्न त्यांच्यापुढे होता. "अजून २ महिन्यांच्या वर वेळ आहे सप्टेंबराला, घाई काय आहे तुला? "असे विचारल्यावर "लोकांना पत्रं पाठवून त्यांचा होकार-नकार घ्यायचा तर मध्ये महिना दिडमहिना हवा की नको?" असा उलट प्रश्न तिने उत्तरादाखल केला. तिला जास्त त्रास न देता "हॅत तिच्या, एवढेच ना? मी करतो की ते तयार, तुम्ही मजकूराचे बघा फक्त.. " दिनेशने असे म्हटल्यावर ती जरा खुश झाली. दोन दिवसांनी दिनेशने काही डिझाइन्स सिलेक्ट केली आणि त्यांना दाखवली. दोघे ती बघून आता मात्र एकदम खूष झाली. पण हे कागदावर कसे दिसेल? हे अजून त्यांना अपिल झाले नव्हते.तरीही त्यांना त्यातील एक डिझाइन निवडायला लावले. दुसर्‍या दिवशी दिनेशने एका ए-४ साइझवर त्याचा नमुना छापून आणला आणि त्यांना दाखवला, आता मात्र संगणकाची जादू त्यांना पटली. आकिम आजोबा आता मजकूराच्या मागे लागले.

दुसर्‍याच दिवशी आजोबांचा निरोप," येऊन जा, मी मजकूर तयार केला आहे. " मी तिकडे गेले तर आजीला आजोबांचे अक्षर मला वाचताना लागेल की नाही ? ही काळजी.. मी तिला मोठ्याने वाचून दाखवले तेव्हा शांत झाली. एक दोन फेरफार करुन आम्ही मजकूर नक्की केला. संध्याकाळी दिनेश घरी आल्यावर पुन्हा एकदा आम्हा चौघांची सभा भरली. फायनल झालेला मजकूर त्या कार्डाच्या चौकटीत बसवला आणि त्यांच्याकडून ओके करुन घेतला आणि त्याचा एक रफ प्रिंटआउट काढून त्यांना दिला. त्यात दुरुस्त्या करुन झाल्या आणि एक फायनल ड्राफ्ट पक्का केला. आता कोणता कागद वापरायचा? त्याच्याबरोबर जाणारे रंगीत लिफाफे निवडायचे इ. वर गाडी आली. लगीनघाई चाललेली होती नुसती दोघांची.. पोस्टाने पाठवायचे लिफाफे पांढर्‍या किवा खाकी रंगाशिवाय दुसर्‍या कोणत्याही रंगात चालणार नसल्याचा नवा नियम समजला. त्यामुळे आता लिफाफ्यांना नटवता येणार नव्हते किवा रंगीत लिफाफेही वापरता येणार नव्हते. एवढ्यात थॉमसला म्हणजे हेडीच्या जावयाला तातडीने फ्रांकफुर्टच्या हॉस्पीटलात आणायचे ठरले. थॉमस म्हणजे रिटाचा नवरा, हेडीआजीचा जावई! आतड्यांच्या विकाराने तो आजारी असून म्युनशनच्या हॉस्पिटलात होता. काहीही खाल्ले तरी त्याला पोटात खूप दुखत असे, इतके की तो गडाबडा लोळायचाच बाकी रहायचा.. फ्रांकफुर्टमध्ये त्या विकारावरचा तज्ज्ञ असल्याने त्याला फ्रांकफुर्टच्या हॉस्पिटलात हलवण्याचा निर्णय तेथल्या डॉक्टरांनी घेतला. झाले, आता आजीला दुहेरी टेन्शन आले. थॉमसच्या आजाराचे आणि वाढदिवसाच्या तयारीचे.. आमंत्रणपत्रांकरताचा कागद निवडायला जायला तिला काही मूड नव्हता आणि वेळही.. आम्हीच मग ती जबाबदारी आपणहून घेतली. दरम्यान रिटा आणि थॉमस आले. थॉमसला तर थेट हॉस्पिटलातच नेले होते. डॉक्टरांनी तपासण्या केल्या आणि ऑपरेशनचा निर्णय घेतला. आजीचा जीव थार्‍यावर नव्हता. हॉस्पीटलच्या वार्‍या आणि तयारी करताना ती शरीराने आणि मनानेही थकली.. आजोबा मात्र शांत होते, सगळे काही व्यवस्थित होईल असा त्यांना विश्वास वाटत होता. तसेच झाले, थोमसचे ऑपरेशन व्यवस्थित पार पडले, तरी अजून काही दिवस हॉस्पिटलात राहणे भाग होतेच. तरी आता टेन्शन नव्हते.

आजी आता जोमाने तयारीला लागली. सगळ्यांना आमंत्रणपत्रे गेली आणि १५ दिवसात कोण कोण नक्की येणार त्याची यादी तयार झाली. आता हवीत टिशकार्टे म्हणजे प्लेसकार्डस.. येथे जेव्हा पंगत सदृश्य पार्टी असते तेव्हा कोणी,कोठे बसायचे हे यजमान ठरवतात आणि त्या व्यक्तिचे नाव त्या जागेवर लावून ठेवतात, येणारे पाहुणे आपापल्या नावाच्या खुर्चीवर बसतात. नेहमीसारखे नुसते नाव कार्डावर न लिहिता एकेका दिव्यावर नाव लिहायची कल्पना दिनेशला सुचली. आजीआजोबांना तसा एक दिवा तयार करुन दाखवला, दोघे एकदम खूष झाली. आजी म्हणाली, लोकांना हे खूप आवडेल आणि आठवण म्हणून ते आपापल्या नावाचा दिवा घेऊन जातील.. मग आम्ही ते नावांचे दिवे तयार करण्याच्या उद्योगाला लागलो, आता बरीचशी तयारी झाली होती. चार दिवस आधी ८२ वर्षांची हेडीआजी तयारीला म्हणून आली. दुसर्‍याच दिवशी आम्ही सगळे जेथे पार्टी होणार आहे त्या हॉटेलात जाऊन सगळी तयारी ठीकठाक आहे ना? ते पाहून आणि भारतात हा सोहळा कसा साजरा करतात याचे वर्णन ऐकवत तेथे जेवून तेथल्या जेवणाची चव पाहून आलो.


पार्टीच्या दिवशी सकाळी ९ च्या सुमाराला त्सेंटा आणि हेडी ब्यूटीपार्लरमध्ये जाणार होत्या. तिला सरप्राइझ द्यायचे म्हणून मी ब्लॅक फॉरेस्ट केक केला होता, त्या दोघी पार्लरमध्ये गेल्याचे पाहून आम्ही तो केक आकिम आजोबांना दाखवला. आजोबाही चकित आणि खूष झाले. केक फ्रिजमध्ये ठेवून टेबलवर छानसे डेकोरेशन केले आणि आजी पार्लरमधून आली की हाक मारायला सांगून आम्हीही पार्टीसाठी तयारी करायला घेतली. तासाभराने दोघी आज्या पार्लरमधून सुंदर होऊन आल्यावर केक बघितल्यावर त्याही खूप खूष झाल्या. दुपारी छोटीशी काफे कुकनची पार्टी करुन मग आम्ही सगळे माइन्झच्या गोंझनहाइमरहोफवर पोहोचलो. हॉलवर तयारी छान झालेली दिसत होती, आता आमचे रुखवत लावायचे बाकी होते. नावांचे दिवे ठरवलेल्या जागांवर ठेवून झाले. मंद संगीत सुरु केले. एव्हाना पाच वाजले होते. झेक्टच्या बाटल्या थंडगार आहेत ना ते पाहत होते तोच उटं आणि कार्लहाइन्स आलेच, मग पुढच्या १०-१५ मिनिटातच बोलावलेली सर्व मंडळी हजर होती.

आजोबांनी मग बोलावलेल्या सर्वांचे स्वागत केले, झेक्टच्या पेल्यांचा किणकिणाट झाला आणि आजीला सर्वांनी अभिष्टचिंतन केले.पत्रिकेत 'अहेर आणू नये.. ' असे लिहिले असले तरी आजीच्या आवडीची प्रालिनन्स आणि आपापल्या बागेतल्या फुलांचे सुंदर बुके बर्‍याच जणांनी आणले होतेच. सर्वाचे स्वागत झेक्टने झाल्यावर आपापले नाव पाहून सारे आसनस्थ झाले. तीन कोर्सचे जेवण होते. पिण्यासाठी कोणाला काय हवे त्याची विचारणा झाली आणि पहिला कोर्स सूप व सलाड आले. ते येईपर्यंत हासआजीने त्सेंटाआजीवर केलेली कविता वाचून दाखवली. सूप सलाडचा समाचार घेतल्यावर ख्रिस्टिन उठली आणि तिने आजीवर केलेली कविता म्हटली. तिची सुंदर कविता ऐकत असतानाच मेन कोर्स म्हणजे चिकन + न्यूडल्स आले. आग्रह करकरुन होफमधील लोकं वाढत होते. एकीकडे गप्पा चालू होत्याच. आम्ही दोघं इव्हेंट फोटोग्राफर असल्याने शूटिंग आणि फोटो चालू होते. जेवण झाल्यावर मार्लिसकाकूने आजीला काहीतरी कारण काढून हॉलबाहेर नेले. इकडे बिर्गिटने सगळ्यांना एकेक मेणबत्ती आणि दोघादोघांच्या जोडीला एक नंबर दिला. एका कागदावर तिने ८० डेकोरेट करुन काढले होते. एकेक नंबरासाठी तिने काही काव्यपंक्ती रचल्या होत्या. असे १५ नंबर तिने रचले होते, आम्ही ३० जणं होतो. तिने नंबर बोलावला की दोघांनी आपली मेणबत्ती लावून ८० वाल्या कागदावर ठेवायची असा तिचा प्लान होता. हॉलमधले दिवे डिम केले आणि मार्लिसकाकूला सिग्नल मिळाला. ती आजीला घेऊन आत आली. बिर्गिट एकेक नंबर घेत गेली आणि आम्ही दिवे घेऊन लावत गेलो. आजी प्रत्येकाची गळाभेट घेत होतीए. जेव्हा सगळे दिवे तेवू लागले, तेव्हा समाधानाने तृप्त आजी आणि तिच्याकडे कौतुकाने पाहणारे आकिम आजोबा आणि हेडीआजी बघताना सगळेच हळवे झाले. आता प्लमबॉल्स विथ वॅनिलाआइसक्रिम आले. त्याचा आस्वाद घेत सगळे आहारले. आजीने आपल्या मनोगतात सर्वांचे आभार मानत सहस्त्रचंद्रदर्शनाचा उल्लेख करुन सर्वांना चकित केले.



पार्टी आता संपत आली होती. एकेकजण आता निरोप घेऊ लागला होता. आजीचा होरा खरा निघाला. जाताना प्रत्येकजण आपल्या टिशकार्टाला आठवण म्हणून घेऊन गेला. सगळे गेल्यावर फुलं आणि चॉकलेटं, प्रालिननचे खोके पिशव्यात भरुन, आवराआवरी करुन गाडी हॉटेलातच ठेवून आम्ही टॅक्सी बोलावली. घरी आल्यावर उझोच्या साक्षीने परत एकदा सेलेब्रेशनची उजळणी झाली. तृप्त आणि समाधानी आजीआजोबांना गुडनाइट करुन आम्हीही निरोप घेतला.

समाजराहणीलेखअनुभव

प्रतिक्रिया

दिपाली पाटिल's picture

14 Feb 2011 - 1:23 pm | दिपाली पाटिल

बापरे!!! माझा विश्वासच बसत नाहीये की त्सेंटा आजी ८० वर्षाच्या आहेत. आधीतर मला त्या पहील्या फोटोतले त्सेंटा आजी आणि अकिम आजोबा तर मेणाचे पुतळेच वाटले आणि म्हटलं नवं प्रवासवर्णन आहे की काय !!!

दिपालीशी सहमत.
या चिरतरुण जोडप्याला व्हेलेंटाईन डे च्या खास शुभेच्छा.
त्सेंटा आजीला थोड्या उशिराने का होईना पण आमच्या शुभेच्छा नक्की कळव :)

अतिशय हृद्य सोहळा आणि त्याचे सुरेख फोटो ..

तुमचा ब्लॅक फॉरेस्ट केक मस्त दिसतो आहे .

( तुमच्या सारखे शेजारी सर्वांना लाभोत :) )

नंदन's picture

15 Feb 2011 - 12:05 am | नंदन

अतिशय हृद्य सोहळा आणि त्याचे सुरेख फोटो ..
तुमचा ब्लॅक फॉरेस्ट केक मस्त दिसतो आहे .
( तुमच्या सारखे शेजारी सर्वांना लाभोत )

अगदी असेच म्हणतो. ह्या हृद्य सोहळ्याचं वर्णन फार आवडलं. आजींना वाढदिवसाच्या विलंबित शुभेच्छा!

चित्रा's picture

15 Feb 2011 - 7:17 pm | चित्रा

वाढदिवसाच्या शुभेच्छा! छान वर्णन.

त्सेंटा आजी आणि आकिम आजोबांना व्हॅलेंटाईनच्या शुभेच्छा.. बाकी स्वातीताय वार्तांकन अतिशय छान..

- पिंगू

सहज's picture

14 Feb 2011 - 3:06 pm | सहज

सोहळावर्णन उत्तम!

स्वाती२'s picture

14 Feb 2011 - 5:00 pm | स्वाती२

छान सोहळा! आजी-आजोबांना शुभेच्छा!

सोहळ्याचं वर्णन छान केलं आहे.
या वयातही आजीआजोबा उत्साही आहेत.
'आहेर आणू नये' असं लिहिल्यावरही आपल्याकडे काही ना काही आणतात तसंच यांच्याकडेही दिसतय.
फोटू आवडले.

परिकथेतील राजकुमार's picture

14 Feb 2011 - 6:11 pm | परिकथेतील राजकुमार

मस्त सोहळा.

सन्जोप राव's picture

14 Feb 2011 - 6:33 pm | सन्जोप राव

रसिक, रंगील्या सोहळ्याचे वर्णन आवडले. 'जीवन त्यांना कळले हो!' असे वाटले.

यशोधरा's picture

14 Feb 2011 - 9:15 pm | यशोधरा

आई गं, किती हृद्य गं स्वातीताई...
तुम्ही उभयतांनी ह्या सोहळ्यात घेतलेल्या सक्रीय सहभागाबद्दल वाचायलाही खूप छान वाटले.

प्राजु's picture

15 Feb 2011 - 12:24 am | प्राजु

मस्त सोहळा!!
वर्णनही छान.
आमच्या तर्फेही आजींना सहस्त्रचंद्र दर्शनाच्या हार्दीक शुभेच्छा!!

कुंदन's picture

15 Feb 2011 - 12:30 am | कुंदन

झकास सोहळा...
अन सुरेख वर्णन शैली !!!

मस्त कलंदर's picture

15 Feb 2011 - 11:10 am | मस्त कलंदर

वर्णन खूप आवडलं आणि केकही..
त्सेंटा आजीला वाढदिवसाच्या विलंबित शुभेच्छा...

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Feb 2011 - 6:13 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

दोन्ही आज्या आणि अकिम आजोबांना भेटल्यानंतर एवढंच म्हणावंसं वाटत ... I missed it.

गुंडोपंत's picture

16 Feb 2011 - 6:40 am | गुंडोपंत

काय छान लिहिता हो तुम्ही!
तुमचा आणि या तरुण दांपत्याचा उत्साह ही वाखाणण्यासारखा आहे!
दिनेशराव कल्पक आहेत.

इतकी छान माणसं जोडता त्यामागे त्यांच्यासाठी मनापासून काही तरी करणे आहे. ते छोट्या - छोट्या गोष्टीतून दिसत राहते. हे करणे म्हणजे काम नाहीच - त्यातला आनंद आहे.

वर्णन खूप आवडलं आणि केकही..
त्सेंटा आजीला आमच्या कडूनही वाढदिवसाच्या विलंबित शुभेच्छा...

(सहमत)बेसनलाडू

अकिम आजोबांना पाहून तर 'हिमगौरी नि सात बुटके' पुस्तकाच्या मुखपृष्ठावरील चित्रातल्या सात बुटक्यांमधील एकाचा चेहरा डोळ्यांसमोर आला.
(बुटकबैंगण)बेसनलाडू

छोटा डॉन's picture

16 Feb 2011 - 8:56 am | छोटा डॉन

गुंडोपंतांच्या शब्दाशब्दाशी सहमत ...
खुपच छान लेख आणि प्रसंग :)

>>तुमचा आणि या तरुण दांपत्याचा उत्साह ही वाखाणण्यासारखा आहे!
अगदी अगदी, मी पर्सनली ह्याची खात्री देउ इच्छितो :)
दिनेशदादाच्या उत्साहाला तर सीमाच नाही.

माझ्याकडुन त्सेंटाआज्जीला किंचित उशीरानेच वाढदिवसाच्या शुभेच्छा :)
अकिमआजोबा आणि त्सेंटाआज्जींचा पहिला फोटो फारच सुरेख आहे.

- छोटा डॉन

मदनबाण's picture

16 Feb 2011 - 6:52 am | मदनबाण

अत्यंत भावुक क्षण असणारा सुंदर वॄतांत !!! :)

विकास's picture

16 Feb 2011 - 10:00 pm | विकास

वर्णन आणि सोहळा वाचताना अनुभवला! :-)

एकदम मस्तच!

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

17 Feb 2011 - 9:53 pm | निनाद मुक्काम प...

ताई
ओमा आणि ओपाला अभिनंदन सांग .
बाकी कसदार लेख झाला आहे .

अवलिया's picture

18 Feb 2011 - 12:40 pm | अवलिया

वा !!

स्वाती दिनेश's picture

18 Feb 2011 - 5:21 pm | स्वाती दिनेश

सर्वांना मनापासून धन्यवाद,
खरं तर हा सोहळा झाला सप्टेंबर मध्ये .. पण माझ्या आळशीपणामुळे त्याचा वृत्तांत लिहिण्यास विलंब झाला, आत्ता मध्यंतरी आजीच्या घरी सगळे फोटो परत एकदा पाहत असताना हे लिहिण्याची उर्मी आली .. सर्वांच्या शुभेच्छा आजीपर्यंत पोहोचवल्या आहेत आणि तिच्याही तर्फे सर्वांना डांकं श्योन अर्थात धन्यवाद.
स्वाती

रोचीन's picture

19 Apr 2011 - 5:51 pm | रोचीन

लेख आहे!! आजी -आजोबांचा पहिला फोटो मस्त आला आहे!!
हा लेख सुटला होता वाचायचा!! खरोखर तुमच्या उत्साहाला सीमा नाही!!
शेवट्च्या फोटोतल्या दोघीजणी कोण आहेत??

स्वाती दिनेश's picture

19 Apr 2011 - 6:02 pm | स्वाती दिनेश

शेवटच्या फोटोत खुर्चीवर बसलेली हेडी, अगदी डावीकडे रीटा (हेडीची मुलगी) तिच्याशेजारी मी आहे.
रोचीन, धन्यवाद.
स्वाती

छान एकदम ...पार्टी आवडली

फोटो मात्र दिसले नसल्याने रुखरुख वाटली ...