खाना खजाना

अरुण मनोहर's picture
अरुण मनोहर in जनातलं, मनातलं
10 Jun 2008 - 3:49 am

खाना खजाना
आजकाल टी व्ही वर कुठलीही चॅनेल लावली की हटकून कोणी एक बाबा किंवा बाबी झटपट स्वयंपाकाचे धडे धडाधड देतांना दिसतात. हे सारे पदार्थ सारखे सारखे पाहून काय होते, की आमच्या बीबीला बरेच इन्स्पीरेशन मिळते. तुम्ही म्हणाल, खुषनसीब आहात! वेगवेगळे पदार्थ खायला मिळत असतील!. तुमचा काही गैरसमज होण्याआधीच सांगून टाकतो. चमचमीत पदार्थ तर राहीले दूरच, पण नुसता डाळभात जरी मिळाला तरी खूप अशी स्थिती असते. (मिपावर चमचमीत पाककृतींचे फोटो असतात हे एक बरे आहे!)

टी व्ही वर इतक्या पाककृती दाखवतात, त्यातली नेमकी कोणती करायची ह्याचेच डीसीजन बीबीला घेता येत नाही. बीबीला सल्ला देण्यासाठी बाबा, बेबी सारेच पुढे सरसावतात. आणि मग काय विचारता राव! पार्लमेन्टरी गोंधळ बरा! हे करा, ते करा. ओरडाओरडी. शेवटी करायचे काहीच नाही. चूल आणि सर्वांची पोटे थंडच रहातात. आम्ही सगळे मात्र गरम होतो.

हे असे रोज चालते. एक दिवस विचार केला... नाहीतरी रोज बोलता बोलता आपण कल्पनेतच सारे पदार्थ खात असतो. तर मग बाकायदा बोलीभाषेतील पाककृतींचे धडेच का करू नये? मायबोली मराठी आणि हिन्दी पण एक समृद्ध भाषा आहे. म्हणींचा मोठा साठाच हिंदी मराठीत आहे. हा साठा वापरून मग मी एक खाना खजानाच तयार केला. माझा हा खजाना जर तुम्ही वापरलात, तर मूग गीळून गप्प बसण्याची पाळी तुमच्यावर कधीच येणार नाही. दाने दानेपे लिखा है खानेवाले का नाम ह्या न्यायाने तुमची सारी पोटपूजा यथासांग होईल. चला तर लुटू हा खाना खजाना.

काय आहे, की कुठलेही काम एकट्याने कधी करू नाही. खाना बनवण्याच्या कामात देखील एक चांगली, तरतरीत असीस्टंट हवीच. आता एक तरतरीत चवळीची शेंग अशी असीस्टंट निवडा. रेसीपी चांगली होण्यासाठी तिला आधी हरभर्‍याच्या झाडावर चढवा. जर जास्त उंचावर गेली, तर Too many cooks spoil the dinner म्हणून काहीतरी निमीत्य काढून तिला कटवा. सांगा, "जा, पी हळद आणि हो गोरी." आता ती परत येण्या आधी आपण काही रेसिपी पाहू या.

आधी मेन डीश. आपण बनवणार आहोत बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी. धुतल्या तांदळासारखे चरीत्र असलेले तांदूळ घ्या. पाणी सगळ्यात चांगले म्हणजे इश्वराची करणी आणि नारळात पाणी. एका नारळातील करणी.. ओह.. पाणी काढून तांदळात टाका व खदखदा शिजवा. फ्रीज मधील शिळ्या कढीला ऊत येईपर्यंत उकळा. भाताचे छोटे छोटे गोळे करून हा बोलाचाच भात आणि मोठ्या वाडग्यात बोलाचीच कढी वाढा.

हा भात कमी पडेल असे वाटले तर भरीला करा बिरबलाची खिचडी. बाजारात तुरी आल्या असतील तर भट भटीणीला मारायच्या आधीच त्या घेऊन या. पाव किलो ये मूंग और मसूर की दाल त्यात टाका. दालमे कुछ काला असेल तर फारच छान. बिरबलाची खिचडी रंगी बेरंगी दिसेल आणि रंगाचा बेरंग होणार नाही. खिचडीला फोडणी साठी तेल कमीच लागते. म्हणून प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे पैकी दोन चमचे तेलाची बिनबुडाचे भांडे घेऊन तांदूळ, डाळ वगैरे मिश्रणाला फोडणी करा. काल खालेल्या मिठाला जागून चवीनुसार तेही घाला. शिजत असतांना उथळ पाण्याला खळखळाट फार होतो. तेव्हा अधून मधून जमीनीवर लाथ मारेन तेथून पाणी काढून पाणी घालून वाढवावे. बिरबलाची खिचडी सुर्यचुलीवर आभाळ अभ्राच्छादित असतांना शिजवली तर अप्रतीम बनते. लोक सहसा आवडीने खातात. पण कोणी खळखळ केलीच तर त्याची डाळ शिजू देऊ नका.

आता भाजी करू. एक मधम आकाराचा भ्रमाचा भोपळा घ्या. विळ्या भोपळ्याचे सख्य असल्याने, तो कापण्याच्या भानगडीत न पडता, सरळ तो भ्रमाचा भोपळा फोडा. नंतर तो अर्ध्या हळकुंडाने पिवळा करा. बायकोचे रोजचे सासुच्या डोक्यावर मिरे वाटणे झाले असेल तर ती पेस्ट बाजूला काढून ठेवा. तळण्या करता टेढी उंगलीसे घी निकालकर कढाइत टाका. एक कडू कारले साखरेत घोळा, तुपात तळा, व काप करून ठेवा. मात्र तळतांना सांभाळून! चुकून चारो उंगलीयां घीमे और सर कढाइमे टाकू नका. उगाच कारल्याची चव जाऊन भेजा खायची पाळी येईल. दोन लवंगी मिरची कोल्हापूरची घ्या. त्या चिरतांना आपले नाक वर ठेवा. नाहीतर नाकाला मिरची झोंबेल.

दोन अकलेचे कांदे घ्या. मात्र ते कादे नाकाने सोलायचे बर का! हे काम बायकांनाच चांगले जमते म्हणे. तेव्हा चवळीची शेंग असीस्टंट असली तर उत्तम, नाहीतर तुम्हालाच करावे लागेल. कांद्याचे काप करून ठेवा. सध्या जालावर खसखशीचे पीक फार आले आहे. त्याचीच फोडणी करा. फोडणी साठी थोडे वड्याचे तेल वांग्यावर टाकून घ्या. चवदार लागते. ही भाजी रटारटा शिजल्यावर चवीनुसार नावडतीचे मीठ अळणी टाका. ही झाली भ्रमाच्या भोपळ्याची भाजी तय्यार.

आता बनवू आंधळी कोशींबीर. हा पदार्थ करण्याच्या आदल्या रात्री रात्रभर जागून टीव्ही सिरीयल पाहून झोपेचे खोबरे करा व एका वाटीत काढून ठेवा. दोन मोठी गाजरे घ्या. त्यांची गाजराची पुंगी करा. ती वाजवण्याच्या भानगडीत न पडता, नुसती हाताने मोडा. नंतर लॅरी कींग स्टाईलने त्यांचा पूर्ण कीस काढा. रात्रीचे झोपेचे खोबरे त्यात मिसळा. एक कच्चे लिंबू घेऊन त्याचा रस डोळे बंद करून ह्या मिश्रणात टाकला की झाली आंधळी कोशींबीर.

आता एक नॉन व्हेज पदार्थ करून पाहूया. घरचीच सोने की अंडे देनेवाली मुर्गी घ्या. तिची सारी अंडी पिल्ली बाहेर पडण्याच्या आतच तिला सोडून द्या. कारण घरची मुर्गी दाल बराबर. म्हणून "जादा आवाज किया तर डाल दुंगा" म्हणणार्‍या भाईकडे जाऊन डाल घेऊन या. पण जपून. नाहीतर तो तुमचेच नॉन व्हेज बनवेल.

तसे तर आणखीन बरेच पदार्थ आहेत. पुणेकर करतात ती स्पेशालीटी, म्हणजे पचका वडा. झालेच तर मारक्या आयांच्या आवडीचे पाठीचे धिरडे. ते राहूच दे. ऊस गोड लागला म्हणून मुळापासून खाऊ नये.

जाता जाता एक सल्ला देतो. तापल्या तव्यावर पोळ्या भाजून घ्या. भाजतांना, बॉस साठी राखून ठेवलेले लोणी लावायचे. म्हणजे तुमची पोळी पिकेल.

डिझर्ट करायचे असेल तर, शिंक्यातली फळे खाली पाडा. मग पडत्या फळांची आज्ञा घेऊन त्यांचे छोटे तुकडे कापून एका बाऊल मधे ठेवा. थोडि कोल्ह्याची द्राक्षे आंबट त्यात टाका. ह्या सगळ्या अजब पाककृती पाहून मंडळी अवाक झाली असतीलच. तेव्हा खूप बडबड करून Ice break करा आणि फळांवर पसरा. फळे जरी नाही झाली थंड तरी मंडळी नक्कीच थंड होतील.

असे हे जेवण तर मस्तच झाले. आता हे सर्व ताटात पडले काय अन वाटीत पडले काय, काहीच फरक पडत नाही. एक लक्षात ठेवा. हे सारे खातांना pinch of salt बरोबर खायचे. हो, आणि दाखवायचे वेगळे दात न वापरता, खायचे वेगळे दात वापरा. नाही तर खाई त्याला खवखवे. जेवणा नंतर मुखशुद्धीसाठी भाई कडची सुपारी वापरू नका. उगाच दुधात मिठाचा खडा पडायचा.

खवय्यांनो, हा खाना खजाना खाऊन तुमचे पोट भरले नसेल दात कोरून पोट भरण्याची वेळ तुमच्यावर येणार नाही ह्याची खात्री आहे. मिसळपाव वर चमचमीत भंडार उघडले आहे. तिथे जा. भरपेट आस्वाद घ्या!

पुर्वप्रकाशीत, पण नंतर संपादीत.
**********************

म्हणीपाकक्रियावाक्प्रचारविनोदशब्दक्रीडाविरंगुळा

प्रतिक्रिया

धनंजय's picture

10 Jun 2008 - 8:44 pm | धनंजय

गमतीदार शब्दखेळ

ईश्वरी's picture

10 Jun 2008 - 10:12 pm | ईश्वरी

मस्त अरूणकाका. खाण्याविषयीच्या म्हणींचे 'भोजन' मस्त बनवले आहे. मजा आली वाचायला.

अवांतरः मराठीत म्हणींचा मोठा खजिना आहे. लेख वाचताना खाणे विषयावर अजून काही म्हणी व वाक्प्रचार आठवले.

साखरेचे खाणार त्याला देव देणार,
असतील शिते तर जमतील भूते,
खाणे थोडे मचमच फार,
गाढवाला गूळाची चव काय? ,
कोल्ह्याला द्राक्षे आंबट
दूधात साखर , भोजनभाऊ,
दूधाने तोंड पोळले की ताक फुंकून पिणे ,
आनंदावर विरजण पडणे ,
घरात नाही दाणा आणि पाटलीण म्हणा ,
चिऊ काऊचा घास ,
तोंडचा घास हिरावून नेणे,
खिरापत वाटणे .

ईश्वरी

ही पाककृती महागात लागणार..

ह्या पदार्थाचा मोठा घास लहान तोंडी देवू नये...

चविष्ट लेख. सकाळच्या वेळी चहा बरोबर वाचण्यास योग्य.

बेसनलाडू's picture

11 Jun 2008 - 1:42 am | बेसनलाडू

शब्दखेळ
(खादाड)बेसनलाडू

विसोबा खेचर's picture

11 Jun 2008 - 6:05 am | विसोबा खेचर

वा अरूणराव!

म्हणींची पाकृ आवडली! :)

तात्या.

यशोधरा's picture

11 Jun 2008 - 8:38 am | यशोधरा

हेहेहेहेहे!! मजेशीर!! :D

स्वाती दिनेश's picture

11 Jun 2008 - 12:09 pm | स्वाती दिनेश

शब्दखेळ मस्तच आहे,
स्वाती

महेश हतोळकर's picture

11 Jun 2008 - 12:23 pm | महेश हतोळकर

लेखाची आठवण झाली. त्यात आश्या बर्‍याच पाककृती होत्या. उदा. घरादाराचे खोबरे, पाठीचे धीरडे, हाडांची कणीक इ. लेख पूर्ण आठवत नाही.
सुंदर लेख. वाचून मजा आली.
महेश हतोळकर

मन's picture

11 Jun 2008 - 3:58 pm | मन

"वाचन्खुण" म्हणुन साठवलाय लेख.
अगदि खुसखुशीत झालाय!

आपलाच,
मनोबा

स्वाती राजेश's picture

11 Jun 2008 - 4:05 pm | स्वाती राजेश

मस्त आणि चवदार लेख आहे...:)
छान वाटले खूप दिवसांनी वाक्प्रचार आणि म्हणी वाचायला मिळाल्या...आणि ते सुद्धा एका मस्त लेखात, एकत्र...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Jun 2008 - 4:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चवदार म्हणींची पाककृती आवडली !!!

प्रगती's picture

12 Jun 2008 - 2:51 pm | प्रगती

छान! आपल्या पाककलेतील खाद्यपदार्थाने आमचे पोट भरले. म्हणी वापरुन इतके छान पदार्थ बनतात माहीत नव्ह्ते. 8>

अरुण मनोहर's picture

13 Jun 2008 - 8:47 am | अरुण मनोहर

सगळ्यांना पाककृती आवडल्या हे वाचून आनंद झाला.
ईश्वरी आणि एक ह्यांनी सुचवलेले पदार्थ वापरून नवीन रेसिपी करायचा प्रयत्न करेन.

पाषाणभेद's picture

7 Dec 2008 - 9:58 pm | पाषाणभेद

या जेवणात गरीबाघरची मीठ भाकर आणि कांदा, मुळा भाजी असती तर फार बरे झाले असते, असे आमची विठाई बोलत होती. सध्या बाहेरचे खाऊन खाऊन (शेण नव्हे हो !) तोंडाची चव गेली होती.
एकंदरीत हे जेवण खुपच छान झाले.

-( सणकी )पाषाणभेद

सोनम's picture

8 Dec 2008 - 6:24 pm | सोनम

शब्दाच्या खेळाबरोबर पदार्थही छान बनवता की. ऐवढ्या म्हणीचा वापर चा॑गल्या प्रकारे केलेला आहे. रेसीपीच्या बाबतीत पहिला न॑बर येईल मिपावर. >:D< >:D< >:D< >:D< >:D< >:D< >:D< >:D< >:D< >:D< >:D<

(पुण्याची सोनम) राम राम मिपा

सुनील's picture

8 Dec 2008 - 8:10 pm | सुनील

चांगला शब्दखेळ!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

मीनल's picture

8 Dec 2008 - 8:53 pm | मीनल

मस्त आहे .
वाचताना एवढी मजा आली.
करताना आणि खाताना किती येईल?

तुफान आहे !!!!!!!!!!!!

मीनल.