परवा एका मित्राशी बोलताना त्याने कधी "इग्नोबल पुरस्कार वितरण सोहळ्यास गेला आहेस का?" असे विचारले आणि उत्सुकता चाळवली... इग्नोबल पुरस्कार हा काय प्रकार असतो?
आपल्याला सगळ्यांना नोबेल पुरस्कार माहीत आहे. सोप्या शब्दात, त्याच्या बरोब्बर विरुद्ध म्हणजे इग्नोबल पुरस्कार. १९९१ साली हार्वर्ड-एम आय टी या दोन्ही विद्यापिठांतर्गत असलेल्या संस्था/व्यक्ती यांनी इम्प्रॉबेबल रिसर्च अशी संस्था चालू करून "discoveries that cannot, or should not, be reproduced" साठी म्हणून हा मजेशीर पुरस्कार चालू केला. मजेशीर म्हणायचे कारण असे की त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणल्याप्रमाणे:
"Our goal is to make people laugh, then make them think. We also hope to spur people's curiosity, and to raise the question: How do you decide what's important and what's not, and what's real and what's not — in science and everywhere else?"
थोडक्यात जे ऐकल्यावाचल्यावर "याला संशोधन म्हणतात?" असे म्हणत हसायला येईल पण त्याच बरोबर विचार करण्यास पण भाग पडेल असे संशोधन यात दिसेल. अर्थात साहीत्य आणि शांततेच्या बाबतीत संशोधनापेक्षा इतर गोष्टींना महत्व आहे, जसे ते नोबेल मधे असते...
नोव्हेंबरच्या शेवटच्या शुक्रवारी हा पुरस्कारसोहळा हार्वर्ड विद्यापिठात होतो. ज्या ज्या विषयात नोबेल पुरस्कार दिला जातो, (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, साहित्यिक आणि शांतता), त्यामध्ये,तसेच सार्वजनीक आरोग्य, अभियांत्रिकी आणि विविधांगी संशोधनात हा पुरस्कार देण्यात येतो.
(The 2009 Ig Nobel Prize winners, joined by nine amused Nobel laureates, take a bow as the ceremony concludes. Photo: Richard Baguley. संदर्भ)
पुरस्कार देण्यासाठी नोबेल पुरस्कार विजेते असतात. मजेशीर भाषणात आणि संशोधनाचे वर्णन करत पुरस्कार दिला जातो. २०१० मधे गुगल आणि इकोलॅब ह्या दोन संस्था प्रामुख्याने प्रायोजक असल्याने त्यांना FIGS (Friends of the Ig) असे म्हणले गेले होते.
अर्थात हे सर्वांनाच आवडू शकेल अशातला भाग नाही. विकीवरील माहितीप्रमाणे, ब्रिटीश सरकारचा वैज्ञानिक सल्लागार रॉबर्ट मे यांनी या पुरस्कारावर आक्षेप घेत ब्रिटीश शास्त्रज्ञांना हा पुरस्कार दिला जाऊ नये असे म्हणले होते. त्यांचे म्हणणे होते की असल्या प्रकाराने केवळ प्रामाणिकपणे केलेल्या संशोधनाची थट्टाच होते. अर्थात त्याला अनेक शास्त्रज्ञ आणि "केमिस्ट्रि अँड इंडस्ट्री" सारख्या जर्नलने विरोध केला होता.
अशी कुठली संशोधने आहेत ज्यांना हा पुरस्कार मिळाला? काही उदाहरणादाखल पुरस्कार बघा:
वैद्यकीय शास्त्रातील पुरस्कार - जपानी शास्त्रज्ञांना, पायाच्या दुर्गंधीवरील रसायानिक संशोधन आणि त्यातील निष्कर्ष, " ज्यांना त्यांच्या पायाला वास येतो असे वाटते, त्यांच्या पायाला वास येत असतो आणि ज्यांना तसे वाटत नाही, त्यांच्या पायाला येत नसतो!"
शांततेचा पुरस्कार - पेप्सीकोला कंपनीने फिलीपिन्समधे कोट्याधिश करण्यासाठी जाहीर केलेल्या स्पर्धेत चुकीचा नंबर विजेता म्हणून जाहीर केल्याने, जवळपास ८ लाख आशावादी (की आशाळभूत?) स्पर्धक त्यांच्यातील मतभेद विसरून एक झाले!
गणितातील पुरस्कार - अलाबामा प्रांतातील सदर्न बॅपटीस्ट चर्चने केलेल्या नैतिकतेच्या विश्लेषणासाठी गणिताच्या वापराला. या संशोधनात त्यांनी, प्रत्येक तालुक्यातील किती नागरीक हे (धार्मिक) पश्चाताप न करण्यामुळे नरकात जाणार, ह्याचा अंदाज तालुका पातळीवर गणिताचा वापर करत काढला!
रसायनशास्त्र - एका फ्रेंच इम्युनॉलॉजिस्टने होमिओपथिक शोध लावून सांगितले की पाण्याला स्मरणशक्ती असतेच पण त्याबरोबर ती दूरध्वनी आणि आंतर्जालाचा वापर करत इतरत्र पाठवता येते.
मानसशास्त्र- हार्वर्ड विद्यापिठ आणि टेंपल विद्यापिठाच्या शास्त्रज्ञांना त्यांच्या people who believe they were kidnapped by aliens from outer space, probably were — and especially for their conclusion, "the focus of the abduction is the production of children या निष्कर्षाबद्दल!
वगैरे वगैरे...
बाकी १९०१ पासून हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच जरी नोबेल पारीतोषिके भारतीयांना मिळाली असली तरी १९९१ पासून चालू असलेल्या पुरस्कारात आपण चांगले नाव केले आहे:
अर्थशास्त्राचा पुरस्कारः भारतीय वंशाच्या रवी बात्रांना. त्यांच्या The Great Depression of 1990 आणि Surviving the Great Depression of 1990, ह्या दोन पुस्तकांच्या यशस्वी विक्रीसाठी ज्यात त्यांनी केवळ स्वतःच्या (बात्रांच्या) जोरावर जग हे आर्थिक मंदीतून कसे वाचू शकेल हे सांगितले होते.
शांतता पुरस्कारः भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि पाकीस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांना त्यांच्या अणूस्फोट करून शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांसाठी.
सार्वजनीक आरोग्य: National Institute of Mental Health and Neurosciences, Bangalore, India मधील संशोधकांना, "nose picking is a common activity among adolescents."
गणितः केरळ कृषीविद्यापिठातील संशोधकांना, "हत्तीच्या पाठीवरील क्षेत्रफळ" काढण्याच्या पद्धतीस.
शांतता पुरस्कारः उत्तर प्रदेशातील "लाल बिहारी" नामक एका शेतकर्यास. (वास्तवीक यात मला विनोद वाटण्यापेक्षा विचारच अधिक करावासा वाटला). या शेतकर्याला तो बँकेत कर्ज काढायला गेला तेंव्हा समजले की तो कायद्याने मृत आहे. त्याच्या चुलत्याने त्याला फसवले होते. १९७६ ते १९९४ त्याला विविध पद्धतीने भांडत बसावे लागले. त्याने स्वत:च्या नावामधे "मृतक" (मयत) असे घातले, आणि "मृतक संघ" देखील काढला. आपण जिवंत आहोत हे सिद्ध करण्यासाठी राजीव गांधींच्या विरुद्ध निवडणूकीत पण उभा राहीला. पण त्याचे कोणी ऐकायला तयार नव्हते. शेवटी १९९४ साली त्याला न्याय मिळाला.
----
अर्थात या पुरस्कारातील मूळ विचार, "make people laugh, then make them think" हे देखील सत्य होऊ शकते. नेदरलँडच्या विद्यापिठातील संशोधकांना असा पुरस्कार देण्यात आला कारण त्यांनी शोधले होते, "मलेरिया पसरवणार्या डासांना माणसांच्या पायाचा वास आणि लिंबर्गर प्रकाराचे चीज आकर्षीत करते". मात्र त्याच संशोधनाचा वापर नंतर अफ्रिकेत मलेरिया नियंत्रणासाठी केला गेला.
-----
(संदर्भः विकीमिडीया. A live frog levitates inside the Ø32mm vertical bore of a Bitter solenoid in a magnetic field of about 16 tesla at the Nijmegen High Field Magnet Laboratory)
असा आत्तापर्यंत एकच शास्त्रज्ञ झाला आहे ज्याला दोन्ही, म्हणजे इग्नोबल आणि नोबेल पुरस्कार मिळाला आहे. रशियात जन्माला आलेला, नेदरलँडचा नागरीक आणि ब्रिटनचा रहीवासी असलेला आंद्रे जीम याला ग्राफीन नामक द्विमितीतील कार्बनचा शोध लावल्याबद्दल भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार २०१० साली मिळाला. मात्र याच आंद्रे ला एक बेडकास चुंबकीय शक्तीच्या वापराने तरंगायला लावण्याच्या प्रयोगाबद्दल इग्नोबल पुरस्कार मिळाला होता!
-------------
प्रतिक्रिया
9 Feb 2011 - 8:38 pm | यशोधरा
मस्त माहिती!! धन्यवाद.
9 Feb 2011 - 8:44 pm | गणेशा
माझ्या साठी तरी ही माहिती नविन आहे.
वाचुन छान वाटले काही ठिकाणी
9 Feb 2011 - 9:03 pm | मुक्तसुनीत
रोचक माहिती. ऑस्कर पुरस्कारांच्या आदल्या दिवशी जाहीर होणार्या रास्पबेरीज् पुरस्कारांची आठवण येते. :)
10 Feb 2011 - 7:44 am | सहज
हेच म्हणतो. राझ्झी अॅवॉर्ड्स आठवले.
:-)
10 Feb 2011 - 10:41 am | असहकार
हे आणखी काय?
9 Feb 2011 - 9:12 pm | शानबा५१२
छान मनोरंजक माहीतीबद्द्ल धन्यवाद.
असे पुरस्कार देण्यात येतात ही गोष्टच निंदास्पद आहे.
9 Feb 2011 - 9:44 pm | नितिन थत्ते
या पुरस्कारांविषयी बर्याच पूर्वी वाचले होते. (बहुधा हसरं विज्ञान नावाच्या पुस्तकात)
एकदा कोकाकोलाच्या दासनी या मिनरल वॉटर ब्रॅण्डला पण इग्नोबेल पुरस्कार दिला होता. नळाच्या पाण्याला पिण्यास अयोग्य पाण्यात रूपांतरित करण्याबद्दल दिला गेला होता.
9 Feb 2011 - 10:02 pm | गौरव व्यवहारे
भारी माहिती आहे.. मजा आली, आणि त्या लालबिहारीचा किस्सा एक नंबर आहे..
9 Feb 2011 - 10:06 pm | धमाल मुलगा
हे काय आक्रितच! :)
9 Feb 2011 - 10:45 pm | संदीप चित्रे
संशोधनाचे बरेच नवीन विषय समजले :)
9 Feb 2011 - 10:48 pm | भडकमकर मास्तर
जबरी माहिती .. मजा आली
9 Feb 2011 - 11:20 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
इग्नोबेलने बरीच वर्ष हसवलं आहे. लाँग लिव्ह इग्नोबेल टू!
9 Feb 2011 - 11:39 pm | Nile
हेच म्हणतो. (नोबेल नाही तर इग्नोबल मिळेल असे काही मित्रांना चिडवायचो त्याची आठवण झाली.;-) )
10 Feb 2011 - 3:16 pm | बिपिन कार्यकर्ते
असेच म्हणतो.
9 Feb 2011 - 11:39 pm | रेवती
मजेशीर प्रकरण आहे.
माहिती आवडली.
10 Feb 2011 - 12:51 am | इन्द्र्राज पवार
एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच अशा 'पॅरोडी' स्टाईल अॅवॉर्डसची भलावण करावी असे मला वाटते. कारण नाकापेक्षा मोती जड होणे हे केव्हाही घातकच. "नोबेल" पारितोषिकांबद्दल कितीही प्रतिकूल मते असली तरी त्यांच्या दर्जामध्ये आजही तसूभरही फरक पडलेला नाही. तिच गोष्ट 'ऑस्कर अॅवॉर्डस"ची. ऑस्करला फटकारा म्हणून 'गोल्डन रास्पबेरीज" अॅवॉर्डस दिली जातात...तिथेही प्रेक्षक जातात, त्या कार्यक्रमाला जितकी अपेक्षित असते तितकी प्रसिद्धी मिळते...आणि दुसर्याच दिवशी लोक विसरून आपापल्या कामाला जुंपून घेतात. इग्नोबल प्राईझबद्दल ही थोड्याफार फरकाने असेच म्हणावे लागेल. समाजाला आपल्याभोवती सातत्याने काही गंभीरच घडावे असे वाटत नसल्याने त्याच्या जोडीने हलकेफुलके, हास्यविनोदाशी जोडलेल्या काही घटना घडाव्यात अशा मानसिक भूमिकेतूनच कुणाच्या तरी कल्पक डोक्यातून अशी कल्पना बाहेर येते आणि ती पुढे चालत राहते.
इग्नोबलचा इतिहास तपासला असता एकदा 'शांततेचा पुरस्कार' ओहिओमधील एका लॅबोरेटरीला दिल्याचे दिसते. का? तर या लॅबोरेटरीने 'गे बॉम्ब' शोधून काढला म्हणून !! आता हा गे बॉम्ब काय करणार? तर शत्रूच्या सैनिकावर हा बॉम्ब टाकल्यास त्या सैनिकाच्या मनात दुसरीकडील सैनिकाबद्दल 'ती' प्रिती निर्माण करणार....आणि हा सैनिक युद्ध करण्याचा विचार त्यागणार...!
अशी अनेक उदाहरणे असणार हे तर ओघाने आलेच...पण म्हणून मग अशा प्राईझेसना किती वजन द्यावे याचेही एक मीटर निश्चित असणारच.
एका मजेशीर विषयावरील धागा इतक्याच नजरेने या प्रकाराकडे पाहावे असे वाटते.
इन्द्रा
10 Feb 2011 - 1:01 am | गोगोल
> दर्जामध्ये आजही तसूभरही फरक पडलेला नाही.
असहमत .. २००९ चा शांतता पुरस्कार विसरलात काय?
10 Feb 2011 - 2:20 pm | इन्द्र्राज पवार
"...२००९ चा शांतता पुरस्कार विसरलात काय?..."
~ वेल गोगोल. चांगल्या गृहिणीच्या हातून काहीवेळा डाळीत चुकून ज्यादाचे आमसूल पडले जाते आणि त्या आमटीची चव बदलून जाते, असे होते, पण म्हणून उद्याही तसेच होईल असे कुणी मानत नाही. येतो असा एखादा दुसरा अपवाद सिलेक्शनमध्ये.
आणि तुम्ही तर हे जाणताच की हे सर्वत्रच होत असते. 'भारतरत्न' पुरस्कार 'सत्यजीत रे' यांच्याअगोदर 'एम.जी.आर.' याना मिळतो...पण म्हणून सर्वच सोपान चुकत जातात असे नाही.... उद्या 'नोबेल पीस प्राईझ' तुम्हामला चांगल्या वाटणार्या व्यक्तीला वा संस्थेला मिळाले तर पूर्वीसारखाच आनंद होईल. इतकेच.
इन्द्रा
10 Feb 2011 - 2:54 am | विकास
इन्द्राभाउंशी सहमत आणि असहमत देखील.
मला वाटते हा अमेरिकन ह्युमर आणि इतरांकडील ह्युमरमधील फरक आहे. म्हणूनच ब्रिटीश अधिकार्याने देखील याला आक्षेप घेतला आहे. आता थोडाफार बदल झाला आहे, तरी देखील, आपल्या संस्कृती/शिष्ठाचारात असे करणे हे नक्कीच अयोग्य समजले जाते.
पण अमेरिकेतील विनोद आणि ते देखील कुणावरही ज्या पद्धतीने होतात आणि ते घेतले जातात हे पाहील्यास त्यांच्यातले खरे स्वातंत्र्य दिसते. तसे करणे योग्य का अयोग्य हा मुद्दा वेगळा आणि काही वेळेस त्यात उर्मटपणा देखील दिसतो. तरी देखील तो उर्मटपणा हा बहुतांशी सर्वांसाठी समान असतो. याचा अर्थ मी त्याचे समर्थन करत आहे असे समजू नका! याचे थोडे वेगळे उदाहरण म्हणजे ज्या पद्धतीने राजकारण्यांशी बोलले जाते अथवा त्यांच्यावर विनोद केले जातात ते. सॅटरडे नाईट लाईव्ह, जे लेनो, डेव्हीड लेटरमन वगैरे बघितले तर ते समजते. यावर काही उदाहरणे देता येतील... पण तरी देखील त्यांच्या पद्धतीने आदरपण दाखवला जातो आणि चिमटे देखील काढले जातात...
परत इग्नोबल बद्दलः ह्या मधे विशिष्ठ संशोधन आणि त्यातील अनुमाने यांची जरी थट्टा केली असली तरी संशोधन करण्याची थट्टा आहे असे अजिबात समजू नये. म्हणूनच हसण्यानंतर विचार करायला लावणारे असे म्हणले आहे. पण एकूणच फंडींग मिळवण्यासाठी म्हणून कधीतरी आणि चौकटीबाहेर विचार करण्याच्या अतिहौसेपोटी वाट्टेल ते संशोधन चालते हे वास्तव आहे.
इग्नोबलचा इतिहास तपासला असता एकदा 'शांततेचा पुरस्कार' ओहिओमधील एका लॅबोरेटरीला दिल्याचे दिसते. का? तर या लॅबोरेटरीने 'गे बॉम्ब' शोधून काढला म्हणून !!
अहो ते खरेच आहे! हा एक प्रकल्प होता. त्याला "गे बाँब" म्हणा अथवा "लव्ह बाँब" म्हणा. पण "जगाला प्रेम अर्पावे" हे अक्षरश: वास्तवात आणता येईल असे त्यांना वाटले होते. अशी एक थिअरी आहे, ज्या प्रमाणे फेरोमोन्स नावाचे मानवी घामातील द्रव्य हे आकर्षित करू शकते. त्याचा वापर करून असे अहींसक शस्त्र बनवायचा प्लॅन होता. १९९४ सालच्या अंदाजाप्रमाणे सहा वर्षात $७.५ मिलीयन्सचा! आणि असले विचार करण्यात देखील नवल नाही. परत चौकटी बाहेरचे विचार करणार्यांना महत्व आहे. म्हणूनच ९/११ नंतर रणनिती ठरवताना अमेरिकन सरकारने हॉलीवूडशी देखील चर्चा केली होती. त्यातून नक्की काही घेतले का ते माहीत नाही, पण घेतले असले तरी आश्चर्य वाटायला नको. त्याच वर्षी (२००१) प्रकाशीत होणार असलेल्या "कोलॅटरल डॅमेज" या आर्नॉल्ड श्वार्ज्नेगर च्या चित्रपटात तसाच प्रकार (विमानाने बिल्डींग का ब्रिज पाडणे) होता. नंतर त्यांनी तो थोडाफार तत्कालीन वातावरणाचा आदर करत बदलला.
10 Feb 2011 - 1:26 am | सुनील
मजेशीर धागा!
10 Feb 2011 - 6:40 am | वडिल
http://en.wikipedia.org/wiki/Annals_of_Improbable_Research
http://en.wikipedia.org/wiki/Journal_of_Irreproducible_Results
http://www.jir.com/
वरील लिंक्स ह्या जगाच्या अत्यंत महत्वाच्या जर्नल्स च्या आहेत. ( काहि हि खोडकर पणा नाहि)
सायन्स पॅरडि मागझिन्स म्हणुन जरी ह्या जर्नल्स ना संबोधले असले तरी...
जर्नल ऑफ इप्रॉबेबल रीसर्च व जर्नल ऑफ इर्रीप्रॉडुसेबल रीझल्टस हि जगातिल सर्वात महाग सबस्क्रिपशन असलेली जर्नल्स आहेत. ह्यात फक्त आजि व माजि नोबल लॉरियट्स लिखाण करतात !
१९९५ च्या आसपास भारतात फक्त TIFR ( bombay) हि महाग जर्नल्स सबस्क्राइब करत होतं. आत्ता ची स्थिती माहित नाहि. अमेरीकेत सुध्दा काहिच मोठ्या विद्दापिठांच्या लायब्ररीज मधे हि जर्नल्स उपलब्ध आहेत.
मूलभुत संशोधन करणार्या विद्वानांची कॉमीक्स् असे जरी वाटत असले तरी ह्या जर्नल्स मधे पेपर पब्लिश करणं हे अतिशय अवघड व प्रतिष्ठे च असतं व सर्व नोबेल विजेते ते करु शकत नाहित !
10 Feb 2011 - 12:53 pm | बद्दु
""जर्नल ऑफ इप्रॉबेबल रीसर्च व जर्नल ऑफ इर्रीप्रॉडुसेबल रीझल्टस हि जगातिल सर्वात महाग सबस्क्रिपशन असलेली जर्नल्स आहेत. ह्यात फक्त आजि व माजि नोबल लॉरियट्स लिखाण करतात !""
मी त्यांच्या दुव्यावरुन महिती गोळा केली..परंतु तुम्ही म्हणता तसे काही दिसले नाही. तुमच्या माहितीकरिता
जर्नल ऑफ इर्रीप्रॉडुसेबल रीझल्टस आणि नेचर या जर्नल्सचे ( या जर्नलमध्ये सुद्धा आजि व माजि नोबल लॉरियट्स लिखाण करतात) सबस्क्रिपशन रेट खालीलप्रमाणे आहेत..( तुम्हीच काय ते ठरवा)
जर्नल ऑफ इर्रीप्रॉडुसेबल रीझल्टस :
Personal One year Two Years Three years
US US$ 26.95 US$ 49.95 US$ 72.95
Canada and Mexico US$ 38.95 US$ 73.95 US$ 108.95
Overseas US $ 49.95 US$ 95.95 US$ 141.95
For Institutions
US US$ 39.00 US$ 75.00 US$ 111.00
Canada and Mexico US$ 51.00 US $ 99.00 US$ 147.00
Overseas US$ 63.00 US$ 123.00 US$ 183.00
Personal Subscription - नेचर जर्नल
US$199 one year
(print and online)
+ tax where applicable
US$338 two years
(print and online)
+ tax where applicable
असो.. विषय चांगला आहे. Cold fusion हा विषय सुद्धा आधी टवाळकीचा ( सायंटिफीक जगतातला) विषय झाला होता..अजुनही त्यावरचे संशयाचे धुके पुरते फिटले नाही..
11 Feb 2011 - 6:34 am | वडिल
JIR चे एका वर्षात फक्त ६ अंक असतात म्हणुन महाग. नेचर , सायन्स २४ + अंक वार्षिक .
अजुन अनेक कारणे आहेत : कुठल्या रीसर्च ग्रुप च्या नावावर खर्च दाखवायचा हा मुद्दा हि असतो.
10 Feb 2011 - 8:29 am | ५० फक्त
वडिल, आपल्या दुव्यांबद्दल अतिशय धन्यवाद.
बाकी धागा मजेशीर म्हणुनच बरा, पण आउट ऑफ बॉक्स थिंकिंग चे काही चांगली उदाहरणे आहेत काय? कारण मी नेहमी तेच करतो आणि माझ्या बॉस व इतर टिममेंबरांकडुन लई शिव्या खातो.
10 Feb 2011 - 10:46 am | मुलूखावेगळी
छान माहिती कळाली त्याबद्दल धन्यवाद
10 Feb 2011 - 1:01 pm | परिकथेतील राजकुमार
हा हा हा !
जबर्याच. हि माहिती एकदम नवीन आहे.
धन्यवाद.
11 Feb 2011 - 6:50 am | मदनबाण
मजेशीर माहिती... :)