दुपारच्या जेवणाची वेळ झाली आहे. सकाळचा नाश्ता करायला न मिळाल्यामुळे तुम्हाला कडकडून भूक लागली आहे. अशातच तुम्हाला गुप्त खबर मिळते कि तुमच्या हापिसातल्या खानावळवाल्याने (खानावळ हा योग्य शब्द आहे, कँटीन म्हणाव अस थोर पक्षी:चविष्ट काम काही त्या कँटीन वाल्याने केलेले नाहीये ) काही नवीन (?) पदार्थ विकायला सुरुवात केलेली आहे. हर्षाची लहर मनात उठून तुम्ही थेट त्या कँटीनच्या दिशेने चालायला सुरुवात करता. पोटातले कावळे ४ मिनिटांच अंतर १ मिनिटात पार करायला उद्युक्त करतात. खबर मिळाल्याप्रमाणे खरोखरच तुम्हाला तिथल्या फलकावर, जिथे आधी मोजून ४ नावे दिसायची, एकदम ३० नावे दिसल्यावर तुमच्या आनंदाला पारावर उरत नाही! हि आनंदाची बातमी देणार्याचे मनोमन आभार मानून तुम्ही एक एक पदार्थच नाव वाचायला सुरुवात करता. नावं ओळखीची जरी असली, तरी हापिसातल्या या खानावळीमध्ये पहिल्यांदाच चाखायला मिळणार म्हणून मग तुम्हाला अगदी काय घेऊ आणि काय नको असे झालेले असते. त्यातल्या त्यात उगीच फार "रिस्क" नको म्हणून तुम्ही "वेज हक्क नूडल्स" मागवता.
ऑर्डर यायला बराच वेळ आहे म्हणून मग आजूबाजूला रटाळ चेहरे करून बसलेले आणि तितक्याच रटाळ गप्पा मारणारे कर्मचारी बघत बघत हळूच त्यांच्या पुढ्यात ठेवलेल्या प्लेट्स कडे देखील पाहून घेता. नक्कीच या कँटीन वाल्याचा धंदा एकदम जोरात सुरु झाला आहे अशी तुमची खात्री पटते. कारण प्रत्येकाने त्याच्याकडचा एक तरी नवीन पदार्थ घेतलेला असतो. तुम्ही आपले मनात खुश! बर्याच दिवसांनी हापिसात काहीतरी नवीन आणि चांगल खायला मिळेल या आशेने!
"मॅडम, वेज हक्क नूडल्स रेडी!" कँटीनवाल्याचा चीरकलेला आवाज येतो. सकाळपासून लागलेली भूक शेवटी मिटणार या आनंदात चटकन ती प्लेट घेऊन तुम्ही येता. पहिल्यांदाच हक्का नूडल्स पिवळ्या रंगाचे पाहत असता, मनात शंकेची पाल चुकचुकते. पण 'असेल काहीतरी चविष्ट! बघूया तरी खाउन' अस म्हणत पहिला घास घेता. खाताना काय माहित का पण डोळे मिटले जातात. कदाचित पुढे येणाऱ्या प्रसंगाची खात्री करण्यासाठी ते पुन्हा उघडता यावेत, या साठी असेल! तोंडांत तो पहिला घास गेल्या गेल्या जाणवते "अरे! मी कांदे पोहे का खाते आहे! मी तर 'वेज हक्क नूडल्स' मागवले होते!". आपण नक्की नूडल्सच उचलून आणले आहेत न याची खात्री करण्यासाठी तुम्ही डोळे नीट उघडून पुन्हा पुन्हा पाहता. दुर्दैवाने ते नूडल्सच असतात! फक्त असे नूडल्स कि जे कुणी बारीक किलकिल्या डोळ्यांच्या त्या परदेशी लोकांनी पहिले असते, तर फीट येऊन तिथेच आडवे झाले असते. कांदेपोहे बनवण्याच्या कृतीत फार काही नाही, पण फक्त भिजवलेले पोह्यांऐवजी उकडलेली हक्का नूडल्स टाकले असावेत. बाकी अगदी राई, जिर्याच्या फोडणीपासून हळद, मिरची आणि भरपूर कांदा इथपर्यंत साहित्यात तसूभर देखील फरक नसतो, बर का! तुमच्या मनात येते, त्या नूडल्स तशाच उचलून कँटीन मॅनेजर च्या तेलकट केसांवर ओताव्यात! पण रागावर तथा हातांवर संयम ठेवून तुम्ही मुकाट डोळे मिटून त्याच कांदेपोहे कम नूडल्स चा एक एक घास तोंडात घेता! कारण पोटातले कावळे अजून शांत झालेले नसतात. आजूबाजूला सहज लक्ष जाते आणि डोक्यात लक्ख प्रकाश पडतो! मघाच्या 'त्या' रटाळ चेहर्यांमागच गूढ आता तुम्हाला एकदम उकलत.
मनातल्या मनात त्या मॅनेजर च्या कुळाचा उद्धार करत त्याचे पैसे चुकते करून तुम्ही चूपचाप कँटीनबाहेर पडता. आणि त्या क्षणाला हातात तलवार नसली तरी जिभेच्या धनुष्यावर शब्दांचे बाण चढवून जीव घेण्यासाठी तुम्हाला शोध असतो फक्त एकाच व्यक्तीचा .. ज्याच्याकडून तुम्हाला 'ती' गुप्त खबर मिळाली होती!
(चु. भु. द्या. घ्या. :))
प्रतिक्रिया
4 Feb 2011 - 3:53 pm | ५० फक्त
आमचा खानावळवाला दर आठवड्याला असे काहीतरी प्रयोग करत असतो, त्याने एकदा डोस्यांबरोबर दाळ पालक दिलं होतं खायला, वय वर्षे ७ साली बाबांचा पानात टाक्ण्यावरुन खाल्लेला मार या एकाच गोष्टीमुळे तो डोसा व दाळ पालक खाउ शकलो, नाहीतर हे खानावळवाले अशक्य असतात.
आमच्याकडे डायेट मेन्यु मध्ये पण भात असतो कसलातरी कर्नाटकी पद्धतीने केलेला.
हर्षद.
4 Feb 2011 - 6:55 pm | कानडाऊ योगेशु
मी ही ह्या अश्या नाहक तत्वापाई न आवडणार्या पण ताटात अचानक समोर आलेल्या कित्येक गोष्टी गिळलेल्या आहेत.
नंतर नंतर ह्यातील फोलपणा लक्षात आला.ताटात टाकु नये ह्याचा अर्थ जितकी भूक असेल तितकेच वाढायला सांगावे व तेवढेच खावे.
आता पोट सांभाळुनच ताटावर हात मारतो.
बाकी हर्षदने म्हटल्याप्रमाणे नूडल्स सारखाच अनुभव चहाच्या बाबतीतही येतो.कित्येक ठिकाणी चहाच्या नावाखाली जवळजवळ उकळलेले पाणीच नरड्यात मारले जाते.
हर्षदने वर्णन केल्याप्रमाणेच "उगाच मागायला गेलो एक.." असे अनुभव मलाही आले आहेत.
-एकदा पेपर मसाला डोसा मागितला होता आणि जेव्हा वेटर तो घेऊन आला तेव्हा कुठुन हा मागितला असे झाले.
चांगला दोन-तीन हात लांब एका टेबलवरही न मावणारा असा डोसा तो घेऊन आला होता.
-एका महागड्या हॉटेलात (कंपनी कलिगच्या पार्टीत) केवळ रेट बघुन मसाला पापड मागितला होता.(महेंगा है तो बडा ही होगा.) आणी अक्षरशः हत्ती मागवावा आणि उंदीर यावा अशी गत झाली.
- पदार्थांची इग्लिश नावे जेव्हा माहीती नव्हती तेव्हा मेनु कार्डमध्ये पाहुन "scrumbled egg" ही डिश मागितली आणि काहीतरी चटकदार खायला मिळेल ह्या हेतुने.आणि जेव्हा डिश पाहीली तेव्हा जाम हसलो.भुर्जीचे ते इंग्लिश नाव आहे हे तोपर्यंत माहीती नव्हते.
(अट्टल चहाबाज) योगेश.
4 Feb 2011 - 5:49 pm | यकु
पहिल्याच लेखनाचं स्वागत!
छान लिहीलंय.
लिहीत राहा..
4 Feb 2011 - 6:14 pm | पिंगू
च्यायला हे हापिसातले खानावळवाले असाच अत्याचार करत असतात.. मॅनेजरला बोलूनपण काही उपयोग होत नाही.. :(
- (हापिसातल्या खानावळीला कंटाळलेला) पिंगू
5 Feb 2011 - 10:07 am | नरेशकुमार
आपली तर बाबा मज्जा आहे :
रोज सकाळी घरुनच टीफीन घेउन जातो.
कधी टीफीन न्यायला जमले नाही तर दुपारी जेवायला घरीच येतो. (घर ऑफिसच्या जवळच आहे.)
अरे हा........ राहीलंच.
लेख ठिक आहे.
4 Feb 2011 - 6:56 pm | प्राजु
एकदा मी.. कोल्हापूरात (बरीच वर्षे झाली या गोष्टीला) पिझ्झा ऑर्डर केला होता. राजारामपुरीतले ते हॉटेल तेव्हा कॉलेज मंडळींमध्ये चांगले फेमस होते. तिथे पाव्-भाजी, डोश्यांचे प्रकार, चाट प्रकार, शिवाय बर्गर आणि पिझा असे प्रकार असायचे.
तेव्हा पिझा हट.. अजून इतके फेमस झाले नव्हते. त्या हॉटेलात आम्ही पिझ्झा ऑर्डर केला आणि जो प्रकार आला.. तो म्हणजे.. खट्टकन आवाज करून मोडणार्या ब्रेडच्या प्रकारावर ढीगभर चीज घालून दिलेला.. प्रकार होता. तो खाताना एखादं जाड मारी चं चीज घातलेलं बिस्कीट खातो आहोत का असंच वाटत होतं.
संपवला कसाबसा.!! :)
4 Feb 2011 - 9:13 pm | स्वप्नांची राणी
ए़का इडालि दोस। होटेल मधे चक्क सिझ्लर्स मागितले आणि बेसनात बुडवुन तळलेले २ टोमाटो , २ वांगि आणी २ ढ्ब्बु मिर्चि समोर आले. (ईत्के टटाईप कराय्ला १/२ तास लागला...!!!)
4 Feb 2011 - 11:17 pm | सेरेपी
मी एकदा पंजाबी हॉटेलमधुन फ्राईड राईस मागवला होता. तो एथासांग अख्ख्या सुक्या लाल मिर्चिच्या तडक्यासहीत आला होता!