इटानगर नावाचे एक आटपाट नगर होते! या नगराच्या बाहेरच्या वनात प.पू. तानियामावशी एक गुरुकुल चालवत असत. गुरुकुल शंभर-सव्वशे वर्षांपूर्वी स्थापले गेले होते व ते प.पू. तानियामावशींच्या आधी त्यांचे दिवंगत पति व त्या आधी त्यांच्या सासूबाई तसेच आजे-सासरे व त्याही आधी त्यांचे वडील चालवत असत. मध्यंतरी संपत्तीला कस्पटासमान मानणार्या एका देवासारख्या फकीराची या गुरुकुलावर कृपा झाली होती व त्या कृपेचा फायदा आजवर त्या गुरुकुलाला मिळत आहे असे ग्रामस्थ म्हणतात.
इटानगरची ग्रामपंचायत मात्र त्या चालवत नसत कारण त्यांना त्यांच्या एका गुरूने "ही ग्रामपंचायत चालवायच्या भानगडीत तू पडू नकोस" असे सारखे सांगून-सांगून भंडावून सोडले होते! म्हणून ती ग्रामपंचायत चालवायला त्यांनी आपल्याचा गुरुकुलातला एक हुशार, (स्वभावाने) गरीब आणि नेहमी त्यांच्या 'हो'त 'हो' मिळविणार्या आज्ञाधारक अशा एका शिष्योत्तमाची निवड केली होती. त्याचे नांव होते मुन्नाभाई! मुन्नाभाई प.पू. तानियामावशी सांगतील त्यानुसार(च) ग्रामपंचायत चालवीत असत. ग्रामपंचायत चालविण्यात त्यांच्या गुरुकुलातील शिष्यांबरोबर इतर मित्र-गुरुकुलातील पाहुणे शिष्यही नेमले होते. सर्वांवर प.पू. तानियामावशींचा शंभर टक्के वचक होता. त्या जे सांगतील तश्शीच ती ग्रामपंचायत त्यांचे स्वत:चे व पाहुणे शिष्य चालवीत!
अलीकडेच त्यांच्या छोट्याश्या गांवात अतीशय गंभीर आणि त्यांना बेचैन करणार्या अशा घटना एकामागोमाग एक अशा घडल्या होत्या. त्यांच्या स्वतःच्याच गुरुकुलातील एका शिष्याने-कल्लूस्वामीने-मोठा घोटाळा केला होता. दरवर्षी भरणार्या आंतर-गुरुकुल मैदानी खेळाच्या स्पर्धेच्या नियोजकाच्या भूमिकेत कल्लूस्वामीने प.पू. तानियामावशींच्याच इशार्यावर चालणार्या ग्रामपंचायतीने त्यांना या स्पर्धेसाठी देऊ केलेल्या वर्गणीच्या पैशांपेक्षा कितीतरी पटीने जास्त पैसे खर्च केले होते व त्याच्या हिशोबात प्रचंड प्रमाणावर अफरातफरही केली होती. शिवाय या सामन्यासाठी तयार केलेले पटांगणही चांगल्या रीतीने तयार केले गेले नव्हते. बाहेरील गुरुकुलातून येणार्या खेळाडूंची उतरायची, जेवणा-खाणाची व्यवस्थाही अगदीच अस्वच्छ आणि कमी प्रतीची होती. कित्येक पर्णकुट्या स्पर्धा सुरू व्हायच्या आधीच पडू लागल्या होत्या! या पाठोपाठ त्यांच्या एका मित्र-गुरुकुलातून त्यांच्या गुरुकुलात पाहुणा म्हणून आलेल्या आणखी एका शिष्याने-राजण्णाने-ग्रामपंचायतीच्या मालकीच्या साहित्याचा बेकायदा लिलाव करून ग्रामपंचायतीचे अतोनात नुकसान केले होते.
प.पू. तानियामावशी जाम भडकल्या होत्या! क्रीडास्पर्धा संपेपर्यंत त्यांनी कसाबसा धीर धरला होता पण त्यानंतर त्यांनी सर्वात प्रथम त्याच्याच गुरुकुलातील कल्लूस्वामीला वाळीत टाकले. कल्लूस्वामीला त्या कुठल्याही पूजेला, आरतीला बोलवेनाशा झाल्या. त्यांच्या पावलावर पाऊल टाकून (नेहमीप्रमाणे) त्यांच्या शिषोत्तमाने-मुन्नाभाईनेसुद्धा-कल्लूस्वामीला प्रत्येक समारंभाला बोलावणे बंद केले. वाळीत टाकण्याखेरीज कल्लूस्वामीला ग्रामपंचायतीचे तलाठीपदही प.पू. मावशीबाईंनी सोडायला लावले. राजण्णाला त्याने केलेल्या गैरव्यवहारासाठी जबाबदार धरून डोळे वटारून प.पू. तानियामावशींनी त्याला गुरुकुलातून बाहेर काढून त्याच्या मूळ गुरुकुलात धाडले. (आता त्या गुरुकुलातून कोण नवा शिष्य ईटानगरच्या गुरुकुलात येतो तिकडे सार्यांचे लक्ष लागले आहे.)
हे होत असतानाच ईटानगरातील लोकांचे रक्षण करताना मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांसाठी म्हणून बाजूला ठेवलेली जमीन ईटानगरच्या पोलीसपाटलाने व त्याच्यासारख्या इतर मातबरांनी हडप केली व तिथे आपापले चिरेबंदी वाडे बांधले. गावरक्षकांचे कुटुंबीय मात्र झोपडीतच दिवस काढत होते. एका 'आगाऊ नारदमुनी'ने ही चोरी शोधून काढली व तिचा खूप बोभाटा केला. त्यामुळे मावशीबाईंनी पोलीसपाटलाला नोकरीवरून काढून टाकले व तिथे मुन्नाभाईंच्या चावडीवरील एका कारकुनाला पोलीसपाटील म्हणून नेमले. शिवाय ते चिरेबंदी वाडे पाडून टाकायची भाषाही कानावर येऊ लागली. (हे वृत्त छापायला देईपर्यंत फक्त बोलाचीच काढी उतू जात होती!)
या सर्व अपमानास्पद घटनांमुळे प.पू. तानियामावशी संतापल्या. त्यांनी आपल्या लाडक्या शिष्योत्तमाला-मुन्नाभाईला-बरोबर घेऊन सर्व ग्रामस्थांना प्रवचनासाठी एकत्र बोलावले. त्यांचे प्रिय सुपुत्र प.पू. कुँवरभाईही तिथे हजर होते. सर्व पापी शिष्यांवर आग पाखडत त्या म्हणाल्या, "या घटना पाहून मी अतीशय दुःखी झाले असून ज्या पद्धतीने हे घोटाळे झाले आहेत ते पहाता "हेचि फल काय मम तपाला" असेच मला वाटू लागले आहे."
प.पू. तानियामावशींचे प्रवचन रंगात आले होते. त्या सर्व ग्रामस्थांना अतीशय कळकळीने म्हणाल्या, "आपल्या गांवाची नैतिक मूल्ये पार रसातळाला गेली असून आता आपण सर्वांनी मिळून त्यांचे पुनरुत्थान केले पाहिजे"!
ग्रामस्थ मंडळी कसे-बसे आपले हसू दाबत होती पण त्यांच्या शिष्यांनी मात्र टाळ्यांचा कडकडाट करून त्यांच्या प्रवचनाला डोक्यावर घेतले. त्याच्या प्रवचनात प.पू. कुँवरभाईनेही सुरात सूर मिसळला. मुन्नाभाईने तर सवयीने मान हलवली. मावशींना कृतकृत्य झाल्यासारखे वाटले.
पण मग एक मोठा भूकंप व्हावा तशी घडली. ग्रामपंचायतीचा महसूल वसूल करणार्यांनी पाहिले कीं प.पू. तानियामावशींबरोबर कौटुंबिक संबंध असलेल्या मावशींच्याच माहेरच्या एका व्यापार्याच्या-चतुरभाईच्या-खात्यावर नको तेवढी रक्कम नको त्या व्यवहारातून 'हळूच' जमा झालेली आहे. सार्यांना चतुरभाईबद्दल आधीपासूनच संशय होता पण "पुरावा नाहीं"चे पालुपद लावून ग्रामपंचायतीने त्यांच्यामागे लावलेले कायद्याचे पालक गंमत पहात बसले होते. पण महसूलखात्याने भांडे फोडल्यावर सार्या ग्रामस्थांना दिसले कीं सार्या गावाला नैतिक मूल्यांचा आणि पुनरुत्थानाचा सज्जड उपदेश देणार्या प.पू. तानियामावशींचे हातही त्याच घाणीने तितकेच बरबटलेले आहेत! पण प.पू. तानियामावशींचा वचक असा कीं एवढे होऊनही सारे कसे चिडीचूप!
अशा तर्हेने आपली कृष्णकृत्ये उघडकीस आल्यानंतर प.पू. तानियामावशी लाजेने लालीलाल होऊन कायमच्या माहेरी जातात कीं निर्लज्जपणे मुन्नाभाईला एक कठपुतळीप्रमाणे नाचवत त्याच्या नावावर गुरुकुलावर आणि ग्रामपंचायतीवर आपली पकड कायम ठेऊन असलीच "लोकां सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडा पाषाण" थाटाची प्रवचने झोडणे चालू ठेवतात इकडे सार्या ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. ग्रामस्थ कांहीं वेळाने सारे विसरून पुन्हा आपल्या घराण्यावर आधीसारखेच प्रेम करत रहातील व योग्य वेळी मुन्नाभाईला जायचा इशारा करून आपल्या सुपुत्राला प.पू. कुँवरभाईला ग्रामपंचायतीचा कारभार देता येईल काय या डावपेचात त्या सध्या गुंग असून दरम्यान "आपल्याला आपल्या आत्म्याशी सुसंवाद साधायचा आहे" हे कारण सांगून कांहीं वेळ पडद्याआड जाऊन योग्य वेळेची आणि संधीची वाट पहात आहेत!
पाहू पुढे काय होते ते! शिष्यांना ३-४ वर्षांनी आपला आवाज नोंदवण्याची संधी मिळणार आहे. ती संधी घेऊन ग्रामस्थ प.पू. तानियामावशींना माहेरी पाठवितील कीं नेहमीसारखे त्या सर्वांचे जूँ वहातील हे पहाणे मनोरंजक ठरेल!
योग्य वेळी नवे वार्तापत्र सदर वार्ताहार सादर करण्याचा प्रयत्न करेल!
(ही कथा काल्पनिक असून या कथेतील घटनांचे वा व्यक्तींचे कुठल्याही घटनेशी अथवा जिवंत वा मृत व्यक्तींशी साम्य आढळून आल्यास तो केवळ योगायोग आहे असे समजावे!)
प्रतिक्रिया
19 Jan 2011 - 4:53 pm | आत्मशून्य
असेच लीहीत रहा.
19 Jan 2011 - 5:00 pm | पिंगू
हाहाहा.. पप्पूमावशी आणि त्यांचे शिष्यगण सगळेच हरामी..
- पिंगू
19 Jan 2011 - 5:04 pm | परिकथेतील राजकुमार
येवढे वाक्य सोडुन बाकी सर्व लेखन एकदम 'लै भारी' :)
सुका आज एकदम नव्याच रुपात फलंदाजी करताना दिसले. आवडलं एकदम.
19 Jan 2011 - 5:11 pm | टारझन
ह्या रुपात सुकांची फलंदाजी सुसह्य वाटली .. . जियो !!
20 Jan 2011 - 8:29 am | स्पा
बापरे.. सुका....
टेस्ट म्याच वरून डायरेक्ट "ट्वेंटी २०"
तरीसुद्धा "राजकारण" सोडून अजून काही लिहिलेत तर जास्त मजा येईल.. वाट बघतोय.
19 Jan 2011 - 5:14 pm | नरेशकुमार
अहो परा भौ, काल्पनिक कथा आहे,
देवासारख्या फकीराची हे सुद्धा काल्पनिक म्हनुनच घ्या हवं तर.
19 Jan 2011 - 7:22 pm | सुधीर काळे
'परा'साहेब,
इथे एकदिवशीय सामना खेळलो! एकसारखे कसोटी सामने खेळून कंटाळा आला कीं अशा स्वरूपाचा एकादा सामना खेळायला मज्जा येते! आणि कसोटीपेक्षा एकदिवशीय सामन्याला प्रेक्षकही जास्त येतात!
19 Jan 2011 - 7:30 pm | मी_ओंकार
कॉलींग थत्ते ..
20 Jan 2011 - 11:05 am | llपुण्याचे पेशवेll
कॉलींग सुनील कॉलींग सुनील.
19 Jan 2011 - 9:42 pm | प्राजु
मस्तच!! जोरदार फटकेबाजी.
19 Jan 2011 - 9:49 pm | पैसा
पण आटपाटनगरच्या गोष्टीच्या शेवट नेहमी "आणि सारे सुखाने नांदू लागले" असं वाक्य असतं. इटानगरच्या नागरिकांच्या नशिबात सुखाचे दिवस आहेत का?
20 Jan 2011 - 7:50 am | सुधीर काळे
पण आटपाटनगरच्या गोष्टीच्या शेवट नेहमी "आणि सारे सुखाने नांदू लागले" असं वाक्य असतं.
खरंच कीं!
इटानगरचे लोक अल्पसंतुष्ट असल्यामुळे नेहमीच आनंदात असतात! "थोडेमें गुजारा होता है..." जिस देशमें गंगा बहती है" मधल्या गीतातील ही ओळ खरंच खरी आहे!
19 Jan 2011 - 9:59 pm | अविनाशकुलकर्णी
मस्त ...सुधिर राव मजा आ गया..
19 Jan 2011 - 11:09 pm | रेवती
फटकेबाजी आवडली.
प.पू. तानियामावशी लाजेने लालीलाल होऊन कायमच्या माहेरी जातात
छे! त्या कुठल्या जायला बसल्यात? कुंवरसाहेबाचा राज्याभिषेक व्हायचाय ना अजून....;)
20 Jan 2011 - 8:05 am | नितिन थत्ते
फटकेबाजी आवडली.
असो.
तानियामावशींचे दिवंगत पती तानियामावशींसह (त्या माहेरच्या सख्याची कृष्णकृत्ये उघडकीला आल्यामुळे) मावशींच्या माहेरी पळून जाणार असे आम्ही २२ वर्षांपूर्वीपासून ऐकत आहोत. पण त्या काही जात नाहीत. शिवाय इटानगरचे लोक सदर पुराणिकबुवांच्या कथेवर मुळीच विश्वास ठेवत नाहीत इतकेच काय हल्ली त्यांचे पुराणही ऐकून घेत नाहीत अशी माहिती कळली आहे.
आणखी एकदा असो.
काश्मीर, पाकिस्तान सोडून इतर विषयावर लेख पाडल्याबद्दल काळेकाकांचे अभिनंदन.
20 Jan 2011 - 9:00 am | सुधीर काळे
प्रकाटाआ
20 Jan 2011 - 8:48 am | सुधीर काळे
मावशीबाईंच्या सासूबाईंना वाईट दिवस आलेले असताना मावशीबाई, मावसोबा व मुले मावशींच्या माहेरी गेले होते असा उल्लेख "विकोबांच्या गाथे"त आहे! (खरे-खोटे माहीत नाहीं!)
19 Jan 2011 - 11:12 pm | विजुभाऊ
येवढे वाक्य सोडुन बाकी सर्व लेखन एकदम 'लै भारी'
त्या गोष्टीला इतकी वर्षे झाली तरी अजून जळजळ काही संपत नाही. असो. इनो घ्या इनो.
असो... कोणी काय घ्यावे हे ज्याने त्याने ठरवावे. अर्थात ज्याला जे घ्यायचे ते ते घेतीलच ....आमचे आपले एक म्हणणे.
अवांतर : सहा नही जाता और कहा नही जाता... बेदर्द मुझसे अब रहा नही जाता..... :
कायनात भी तरी ,कयामत भी तेरी.... मेरा कुछ नही इसमे ये अब सुना नही जाता- अंतीम नागपुरवी
20 Jan 2011 - 10:50 am | परिकथेतील राजकुमार
असेच असते इजुभौ. कोणाला अशा वाक्यांनी जळजळ होते तर कोणाला खाकी चड्डी, ब्राम्हण, धर्म, देव अशा शब्दांनी जळजळ होते.
अर्थात कोणी कशाने जळजळावे हे सांगण्याचा हक्क मला नाही. मी आपले एक निरिक्षण नोंदवले
21 Jan 2011 - 10:29 am | विजुभाऊ
कोणाला खाकी चड्डी, ब्राम्हण, धर्म, देव अशा शब्दांनी जळजळ होते.
मी चड्डीबद्दल काहीच बोललो नव्हतो. चड्डी काढायची काही गरज होती का? ;)
21 Jan 2011 - 10:37 am | टारझन
शीबै .. ह्या अंतरजालावरच्या हिरव्या ( आणि पिवळ्या) देठांना एकमेकांच्या चड्ड्या काढण्यातंच रस आहे सगळा ... ..
21 Jan 2011 - 11:17 am | अवलिया
सध्या तेवढंच करु शकत असतील..
20 Jan 2011 - 3:13 am | निनाद मुक्काम प...
@मध्यंतरी संपत्तीला कस्पटासमान मानणार्या
त्यापुढे प्रसिध्धीपरायण व धूर्त अशी उपमा असती तर कथेत अजून खुमारी आली असती .
बाकी शीर्षक पाहून सध्या चीनचा अरुणाचल प्रदेशवरील वादग्रस्त प्रदेश म्हणून जो काही कांगावा चालला आहे .त्यावर आपल्या सरकारच्या मुखदुर्बळ धोरणामुळे एकेकाळी अरुणाचलची राजधानी इटानगर हे आटपाट नगर पूर्वी भारतात होते .ह्या अर्थी एखादे विडबन युक्त लेख असावा असा सुतावरून स्वर्ग (म्हणजे पर्यायी शब्द भूतलावरील अमेरिका ) मि गाठला .
पण लेख हा एक सुखद धक्का निघाला .
सुका ह्यांच्या मार्मिक शैलीचे अभिनंदन
ह्या काल्पनिक नगराची कहाणी वृत्तपत्रात छापून आली तर ....
गिरगावातील बटाट्याच्या चाळी सारखे हे काल्पनिक नगर सुद्धा लोकांच्या दीर्ध काळ लक्षात राहीन .
20 Jan 2011 - 1:12 pm | सुधीर काळे
लई भारी!
सुखी माणसाकडे अमेरिकन कंपनीत नोकरी, जपानी बायको, , जर्मन कार
तर दु:खी माणसाकडे अमेरिकन बायको, भारतीय कंपनीत नोकरी, चिनी कार असते.
21 Jan 2011 - 8:35 am | चिंतामणी
सरकारच्या मुखदुर्बळ धोरणामुळे एकेकाळी अरुणाचलची राजधानी इटानगर हे आटपाट नगर पूर्वी भारतात होते .ह्या अर्थी एखादे विडबन युक्त लेख असावा असा सुतावरून स्वर्ग (म्हणजे पर्यायी शब्द भूतलावरील अमेरिका ) मि गाठला .
शिर्षक वाचल्यावर मलासुध्दा प्रथम तसेच वाटले होते. पण सु.का.नी बदललेला ट्रॅक लेख वाचायला घेतल्यावर लक्षात आला.
मस्त लेख.
20 Jan 2011 - 7:53 am | सुधीर काळे
पण मग एक मोठा भूकंप व्हावा तशी घडली. या वाक्यातला 'घटना' हा शब्द राहून गेला आहे! घालायला हवा!!
पण मग एक मोठा भूकंप व्हावा तशी घटना घडली.
20 Jan 2011 - 8:22 am | अवलिया
मस्त लेख !!!
20 Jan 2011 - 9:52 am | सहज
खुसखुशीत लेख आवडला.
अर्थात तात्पुरता विरंगुळा सोडला तर इटानगरवासीयांना फारसा फरक नाही. अन्य गुरुकूलात फार वेगळी कहाणी नसणार.
20 Jan 2011 - 1:13 pm | सुधीर काळे
अन्य गुरुकूलात फार वेगळी कहाणी नसणार.
यही तो लफडा है!
20 Jan 2011 - 10:12 am | sneharani
मस्त झालाय लेख!
20 Jan 2011 - 11:03 am | मदनबाण
कथा आवडली... :)
परंतु काका या कथेतुन काही बोध घेतला जाईल का ? असे तुम्हाला वाटते का ?
20 Jan 2011 - 12:35 pm | स्मिता.
गावात त्रास सगळ्यांनाच होतो, कुणामुळे तेही सगळ्यांना कळतं आणि त्यावर फक्त तावातावाने चर्चाच होतात. पण गावावर जेव्हा गुरूकुल निवडायची वेळ येते तेव्हा गाव वारंवार प.पू. मावशींच्याच गुरूकुलाचीच निवड करते. काय करणार?
20 Jan 2011 - 1:09 pm | सुधीर काळे
शेवटच्या वाक्यात बोधामृत पाजले आहे!
पाहू पुढे काय होते ते! शिष्यांना ३-४ वर्षांनी आपला आवाज नोंदवण्याची संधी मिळणार आहे. ती संधी घेऊन ग्रामस्थ प.पू. तानियामावशींना माहेरी पाठवितील कीं नेहमीसारखे त्या सर्वांचे जूँ वहातील हे पहाणे मनोरंजक ठरेल!
20 Jan 2011 - 4:26 pm | सुनील
@ llपुण्याचे पेशवेll
कॉलींग सुनील कॉलींग सुनील.
डोळे पाणावले!
@ नितिन थत्ते
माहेरी पळून जाणार असे आम्ही २२ वर्षांपूर्वीपासून ऐकत आहोत
पुढील २२ वर्षे ऐकण्याची तयारी ठेवा!
@ सहज
अन्य गुरुकूलात फार वेगळी कहाणी नसणार
हळू बोला! (शेजारच्याच एका गुरुकुलाती एका ज्येष्ठ आचार्यांनी आपण अद्यापनाऐवजी भलतेच उद्योग करीत होतो, अशी कबुली दिली, असे ऐकून आहे!)
बाकी लेख खुशखुशीत!
21 Jan 2011 - 8:38 am | चिंतामणी
चांगल्या लेखाची एका वाक्यात बोळवण केल्याने पु.पे.सह मिपाकरांची निराशा झाली आहे हे नम्रपणे निदर्शनास आ़णु इच्छीतो.
20 Jan 2011 - 4:42 pm | नरेशकुमार
लेखकाने कल्पनेच्या इतक्या उंच भरार्या मारुन सोफ्याला खीळवुन ठेवले.
कल्पना शक्तीची दाद द्यावि तितकि कमिच. इतकि ओर्रिजनल कल्पना करोडोत एकालाच सुचते.
तसेच 'कल्पेनेला काही सीमा नसतात' हेच या लेखाने पटवुन दिलेले आहे.
एकदम दमदार ष्टोरी.
एक सुचना : या ष्टोरीचे copyrights वगेरे घ्या,
अशी ष्टोरी भारतियांना खुप नविन आहे.
या ष्टोरी वर एखादा ऑस्कर विजेता सिनेमा होउ शकतो हा !
20 Jan 2011 - 5:42 pm | डावखुरा
एकदम मस्त टिकवल्यात एकेकाकाला..
आणि आतातरी तुमक्च्या बोधामृताचा काहितरी उपयोग व्हावा..
एका व्यापार्याच्या-चतुरभाईच्या-खात्यावर -हा कोण ?
20 Jan 2011 - 6:51 pm | चिगो
छान, खुशखुशीत लेख...
चांगल्याच टेर्या उडवल्या आहेत एकेकाच्या..
शिष्यांना ३-४ वर्षांनी आपला आवाज नोंदवण्याची संधी मिळणार आहे. ती संधी घेऊन ग्रामस्थ प.पू. तानियामावशींना माहेरी पाठवितील कीं नेहमीसारखे त्या सर्वांचे जूँ वहातील हे पहाणे मनोरंजक ठरेल!
आम्हीही त्याचीच वाट बघतोय..
21 Jan 2011 - 1:45 am | उल्हास
( ही कथा काल्पनिक असून या कथेतील घटनांचे वा व्यक्तींचे कुठल्याही घटनेशी अथवा जिवंत वा मृत व्यक्तींशी साम्य आढळून आल्यास तो केवळ योगायोग आहे असे समजावे!)
योगायोग समजलो
21 Jan 2011 - 6:59 am | Pain
हाहाहा! मस्त लेख आहे. आवडला.
पाहू पुढे काय होते ते! शिष्यांना ३-४ वर्षांनी आपला आवाज नोंदवण्याची संधी मिळणार आहे.
हे मात्र धादांत खोटे. ती संधी त्यांना कधीही नव्हती, आत्ता नाहीये, आणि कधीही नसेल.
21 Jan 2011 - 7:21 am | बबलु
हा हा.. काळेसाहेब, षटकारांवर षटकार !!
मस्त चिमटे.
अजून येउद्यात.
बादवे, तानियामावशींचे सुपुत्र कुँवरभाईंची आजकाल जी प्रचंड टिवटिव चाललेय त्यावर एखादा फर्मास लेख येउद्या.
कुँवरभाईं अगदीच वेगळा निपजला असे आमचे मत.
21 Jan 2011 - 2:21 pm | विसोबा खेचर
काळेसाहेब,
लेख लै भारी..!
तात्या.
21 Jan 2011 - 3:18 pm | सुधीर काळे
सर्व प्रतिसादकर्त्यांचे मन:पूर्वक आभार!
2 Aug 2016 - 1:15 am | ईश्वरसर्वसाक्षी
:)
2 Aug 2016 - 1:57 am | ईश्वरसर्वसाक्षी
योग्य वेळी नवे वार्तापत्र सदर वार्ताहार सादर करण्याचा प्रयत्न करेल! !?
2 Aug 2016 - 2:06 am | अमितदादा
हा हा मस्तच...सध्या गुरुकुलाला वाईट दिवस आलेत आता शिष्यच फकीर झाले आहेत ...
2 Aug 2016 - 8:05 am | सुधीर काळे
मा़झ्या २०११मधील लेखाचे पुनरुज्जीवन कसे झाले?