इटानगर नावाचे एक आटपाट नगर होते!
लेखनप्रकार
इटानगर नावाचे एक आटपाट नगर होते! या नगराच्या बाहेरच्या वनात प.पू. तानियामावशी एक गुरुकुल चालवत असत. गुरुकुल शंभर-सव्वशे वर्षांपूर्वी स्थापले गेले होते व ते प.पू. तानियामावशींच्या आधी त्यांचे दिवंगत पति व त्या आधी त्यांच्या सासूबाई तसेच आजे-सासरे व त्याही आधी त्यांचे वडील चालवत असत. मध्यंतरी संपत्तीला कस्पटासमान मानणार्या एका देवासारख्या फकीराची या गुरुकुलावर कृपा झाली होती व त्या कृपेचा फायदा आजवर त्या गुरुकुलाला मिळत आहे असे ग्रामस्थ म्हणतात.
इटानगरची ग्रामपंचायत मात्र त्या चालवत नसत कारण त्यांना त्यांच्या एका गुरूने "ही ग्रामपंचायत चालवायच्या भानगडीत तू पडू नकोस" असे सारखे सांगून-सांगून भंडावून सोडले होते! म्हणून ती ग्रामपंचायत चालवायला त्यांनी आपल्याचा गुरुकुलातला एक हुशार, (स्वभावाने) गरीब आणि नेहमी त्यांच्या 'हो'त 'हो' मिळविणार्या आज्ञाधारक अशा एका शिष्योत्तमाची निवड केली होती. त्याचे नांव होते मुन्नाभाई! मुन्नाभाई प.पू. तानियामावशी सांगतील त्यानुसार(च) ग्रामपंचायत चालवीत असत. ग्रामपंचायत चालविण्यात त्यांच्या गुरुकुलातील शिष्यांबरोबर इतर मित्र-गुरुकुलातील पाहुणे शिष्यही नेमले होते. सर्वांवर प.पू. तानियामावशींचा शंभर टक्के वचक होता. त्या जे सांगतील तश्शीच ती ग्रामपंचायत त्यांचे स्वत:चे व पाहुणे शिष्य चालवीत!
अलीकडेच त्यांच्या छोट्याश्या गांवात अतीशय गंभीर आणि त्यांना बेचैन करणार्या अशा घटना एकामागोमाग एक अशा घडल्या होत्या. त्यांच्या स्वतःच्याच गुरुकुलातील एका शिष्याने-कल्लूस्वामीने-मोठा घोटाळा केला होता. दरवर्षी भरणार्या आंतर-गुरुकुल मैदानी खेळाच्या स्पर्धेच्या नियोजकाच्या भूमिकेत कल्लूस्वामीने प.पू. तानियामावशींच्याच इशार्यावर चालणार्या ग्रामपंचायतीने त्यांना या स्पर्धेसाठी देऊ केलेल्या वर्गणीच्या पैशांपेक्षा कितीतरी पटीने जास्त पैसे खर्च केले होते व त्याच्या हिशोबात प्रचंड प्रमाणावर अफरातफरही केली होती. शिवाय या सामन्यासाठी तयार केलेले पटांगणही चांगल्या रीतीने तयार केले गेले नव्हते. बाहेरील गुरुकुलातून येणार्या खेळाडूंची उतरायची, जेवणा-खाणाची व्यवस्थाही अगदीच अस्वच्छ आणि कमी प्रतीची होती. कित्येक पर्णकुट्या स्पर्धा सुरू व्हायच्या आधीच पडू लागल्या होत्या! या पाठोपाठ त्यांच्या एका मित्र-गुरुकुलातून त्यांच्या गुरुकुलात पाहुणा म्हणून आलेल्या आणखी एका शिष्याने-राजण्णाने-ग्रामपंचायतीच्या मालकीच्या साहित्याचा बेकायदा लिलाव करून ग्रामपंचायतीचे अतोनात नुकसान केले होते.
प.पू. तानियामावशी जाम भडकल्या होत्या! क्रीडास्पर्धा संपेपर्यंत त्यांनी कसाबसा धीर धरला होता पण त्यानंतर त्यांनी सर्वात प्रथम त्याच्याच गुरुकुलातील कल्लूस्वामीला वाळीत टाकले. कल्लूस्वामीला त्या कुठल्याही पूजेला, आरतीला बोलवेनाशा झाल्या. त्यांच्या पावलावर पाऊल टाकून (नेहमीप्रमाणे) त्यांच्या शिषोत्तमाने-मुन्नाभाईनेसुद्धा-कल्लूस्वामीला प्रत्येक समारंभाला बोलावणे बंद केले. वाळीत टाकण्याखेरीज कल्लूस्वामीला ग्रामपंचायतीचे तलाठीपदही प.पू. मावशीबाईंनी सोडायला लावले. राजण्णाला त्याने केलेल्या गैरव्यवहारासाठी जबाबदार धरून डोळे वटारून प.पू. तानियामावशींनी त्याला गुरुकुलातून बाहेर काढून त्याच्या मूळ गुरुकुलात धाडले. (आता त्या गुरुकुलातून कोण नवा शिष्य ईटानगरच्या गुरुकुलात येतो तिकडे सार्यांचे लक्ष लागले आहे.)
हे होत असतानाच ईटानगरातील लोकांचे रक्षण करताना मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांसाठी म्हणून बाजूला ठेवलेली जमीन ईटानगरच्या पोलीसपाटलाने व त्याच्यासारख्या इतर मातबरांनी हडप केली व तिथे आपापले चिरेबंदी वाडे बांधले. गावरक्षकांचे कुटुंबीय मात्र झोपडीतच दिवस काढत होते. एका 'आगाऊ नारदमुनी'ने ही चोरी शोधून काढली व तिचा खूप बोभाटा केला. त्यामुळे मावशीबाईंनी पोलीसपाटलाला नोकरीवरून काढून टाकले व तिथे मुन्नाभाईंच्या चावडीवरील एका कारकुनाला पोलीसपाटील म्हणून नेमले. शिवाय ते चिरेबंदी वाडे पाडून टाकायची भाषाही कानावर येऊ लागली. (हे वृत्त छापायला देईपर्यंत फक्त बोलाचीच काढी उतू जात होती!)
या सर्व अपमानास्पद घटनांमुळे प.पू. तानियामावशी संतापल्या. त्यांनी आपल्या लाडक्या शिष्योत्तमाला-मुन्नाभाईला-बरोबर घेऊन सर्व ग्रामस्थांना प्रवचनासाठी एकत्र बोलावले. त्यांचे प्रिय सुपुत्र प.पू. कुँवरभाईही तिथे हजर होते. सर्व पापी शिष्यांवर आग पाखडत त्या म्हणाल्या, "या घटना पाहून मी अतीशय दुःखी झाले असून ज्या पद्धतीने हे घोटाळे झाले आहेत ते पहाता "हेचि फल काय मम तपाला" असेच मला वाटू लागले आहे."
प.पू. तानियामावशींचे प्रवचन रंगात आले होते. त्या सर्व ग्रामस्थांना अतीशय कळकळीने म्हणाल्या, "आपल्या गांवाची नैतिक मूल्ये पार रसातळाला गेली असून आता आपण सर्वांनी मिळून त्यांचे पुनरुत्थान केले पाहिजे"!
ग्रामस्थ मंडळी कसे-बसे आपले हसू दाबत होती पण त्यांच्या शिष्यांनी मात्र टाळ्यांचा कडकडाट करून त्यांच्या प्रवचनाला डोक्यावर घेतले. त्याच्या प्रवचनात प.पू. कुँवरभाईनेही सुरात सूर मिसळला. मुन्नाभाईने तर सवयीने मान हलवली. मावशींना कृतकृत्य झाल्यासारखे वाटले.
पण मग एक मोठा भूकंप व्हावा तशी घडली. ग्रामपंचायतीचा महसूल वसूल करणार्यांनी पाहिले कीं प.पू. तानियामावशींबरोबर कौटुंबिक संबंध असलेल्या मावशींच्याच माहेरच्या एका व्यापार्याच्या-चतुरभाईच्या-खात्यावर नको तेवढी रक्कम नको त्या व्यवहारातून 'हळूच' जमा झालेली आहे. सार्यांना चतुरभाईबद्दल आधीपासूनच संशय होता पण "पुरावा नाहीं"चे पालुपद लावून ग्रामपंचायतीने त्यांच्यामागे लावलेले कायद्याचे पालक गंमत पहात बसले होते. पण महसूलखात्याने भांडे फोडल्यावर सार्या ग्रामस्थांना दिसले कीं सार्या गावाला नैतिक मूल्यांचा आणि पुनरुत्थानाचा सज्जड उपदेश देणार्या प.पू. तानियामावशींचे हातही त्याच घाणीने तितकेच बरबटलेले आहेत! पण प.पू. तानियामावशींचा वचक असा कीं एवढे होऊनही सारे कसे चिडीचूप!
अशा तर्हेने आपली कृष्णकृत्ये उघडकीस आल्यानंतर प.पू. तानियामावशी लाजेने लालीलाल होऊन कायमच्या माहेरी जातात कीं निर्लज्जपणे मुन्नाभाईला एक कठपुतळीप्रमाणे नाचवत त्याच्या नावावर गुरुकुलावर आणि ग्रामपंचायतीवर आपली पकड कायम ठेऊन असलीच "लोकां सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडा पाषाण" थाटाची प्रवचने झोडणे चालू ठेवतात इकडे सार्या ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. ग्रामस्थ कांहीं वेळाने सारे विसरून पुन्हा आपल्या घराण्यावर आधीसारखेच प्रेम करत रहातील व योग्य वेळी मुन्नाभाईला जायचा इशारा करून आपल्या सुपुत्राला प.पू. कुँवरभाईला ग्रामपंचायतीचा कारभार देता येईल काय या डावपेचात त्या सध्या गुंग असून दरम्यान "आपल्याला आपल्या आत्म्याशी सुसंवाद साधायचा आहे" हे कारण सांगून कांहीं वेळ पडद्याआड जाऊन योग्य वेळेची आणि संधीची वाट पहात आहेत!
पाहू पुढे काय होते ते! शिष्यांना ३-४ वर्षांनी आपला आवाज नोंदवण्याची संधी मिळणार आहे. ती संधी घेऊन ग्रामस्थ प.पू. तानियामावशींना माहेरी पाठवितील कीं नेहमीसारखे त्या सर्वांचे जूँ वहातील हे पहाणे मनोरंजक ठरेल!
योग्य वेळी नवे वार्तापत्र सदर वार्ताहार सादर करण्याचा प्रयत्न करेल!
(ही कथा काल्पनिक असून या कथेतील घटनांचे वा व्यक्तींचे कुठल्याही घटनेशी अथवा जिवंत वा मृत व्यक्तींशी साम्य आढळून आल्यास तो केवळ योगायोग आहे असे समजावे!)
वाचने
13861
वाचनखूण
प्रतिक्रिया
47
कथा छानच. आपली कल्पना शक्ती देखील फारच वास्तववादी वाटली.
हाहाहा.. पप्पूमावशी आणि
मध्यंतरी संपत्तीला कस्पटासमान
In reply to मध्यंतरी संपत्तीला कस्पटासमान by परिकथेतील राजकुमार
+१
In reply to +१ by टारझन
+२
In reply to मध्यंतरी संपत्तीला कस्पटासमान by परिकथेतील राजकुमार
अहो परा भौ, काल्पनिक कथा
In reply to मध्यंतरी संपत्तीला कस्पटासमान by परिकथेतील राजकुमार
इथे एकदिवशीय सामना खेळलो!
कॉलींग थत्ते ..
In reply to कॉलींग थत्ते .. by मी_ओंकार
+ १
मस्तच!! जोरदार फटकेबाजी.
वा वा!
In reply to वा वा! by पैसा
"थोडेमें गुजारा होता है"..."
मस्त ...सुधिर राव मजा आ गया..
फटकेबाजी आवडली. प.पू.
In reply to फटकेबाजी आवडली. प.पू. by रेवती
+१
In reply to +१ by नितिन थत्ते
उल्लेख "विकोबांच्या गाथे"त आहे
In reply to +१ by नितिन थत्ते
दोनदा पोस्ट झाल्याने प्रकाटाआ
येवढे वाक्य सोडुन बाकी सर्व
In reply to येवढे वाक्य सोडुन बाकी सर्व by विजुभाऊ
त्या गोष्टीला इतकी वर्षे झाली
In reply to त्या गोष्टीला इतकी वर्षे झाली by परिकथेतील राजकुमार
कोणाला खाकी चड्डी, ब्राम्हण,
In reply to कोणाला खाकी चड्डी, ब्राम्हण, by विजुभाऊ
शीबै .. ह्या अंतरजालावरच्या
In reply to शीबै .. ह्या अंतरजालावरच्या by टारझन
सध्या तेवढंच करु शकत असतील..
@मध्यंतरी संपत्तीला
In reply to @मध्यंतरी संपत्तीला by निनाद मुक्काम …
Signature लई भारी!
In reply to @मध्यंतरी संपत्तीला by निनाद मुक्काम …
बरोबर.
'घटना' हा शब्द राहून गेला आहे! घालायला हवा!!
मस्त लेख !!!
:-)
In reply to :-) by सहज
यही तो लफडा है!
मस्त
कथा आवडली... परंतु काका या
In reply to कथा आवडली... परंतु काका या by मदनबाण
असेच म्हणते
In reply to कथा आवडली... परंतु काका या by मदनबाण
शेवटच्या वाक्यात बोधामृत पाजले आहे!
@ llपुण्याचे पेशवेll कॉलींग
In reply to @ llपुण्याचे पेशवेll कॉलींग by सुनील
बाकी लेख खुशखुशीत!
लेखकाने कल्पनेच्या इतक्या उंच
एकदम मस्त टिकवल्यात
खुशखुशीत...
छान
हाहाहा! मस्त लेख आहे.
हा हा.. काळेसाहेब,
काळेसाहेब, लेख लै
सर्व प्रतिसादकर्त्यांचे मन:पूर्वक आभार!
:)
योग्य वेळी नवे वार्तापत्र सदर
हा हा मस्तच...सध्या
मा़झ्या २०११मधील लेखाचे पुनरुज्जीवन कसे झाले?