४. पतंग आणि वावडी

डॉ.श्रीराम दिवटे's picture
डॉ.श्रीराम दिवटे in जनातलं, मनातलं
23 Nov 2010 - 3:13 pm

एकदा जानेवारी महिन्यात कोणा नातेवाईकांकडील कार्यक्रमानिमित्त पुण्याला जाण्याचा योग आला.
'ह्या म्हैनात काय बी मज्जा असनार न्हाय बग. मी नस्तो आल्लो तरीबी चाल्लं अस्तं.' एस् टी ने अर्धा रस्ता संपवल्यावर मला हा साक्षात्कार झालेला.
'अरे जानेवारीमधे पुण्याची मुलं पतंग उडवतात, काटाकाटी खेळतात.' आईने माहिती पुरवल्यावर मी चेकाळलो.
'हैच शबास. म्हंजी पतंगी उडवाया घावणार? काटाकाटी खेळायाबी? मंग तं मज्जाच मज्जा भो.'
'पण जास्त दंगा करायचा नाही पतंग खेळतांना. काय?' उत्तर द्यायच्या मनस्थितीत मी नव्हतोच. माझ्या डोळ्यांपुढे रंगीबेरंगी पतंगांची मारामारी चालली होती...
पुण्याला पोचेपर्यँत अंधार पडला असल्याने पतंग उडविण्याची कल्पना करीत मामेभावाकडील चक्री, त्यावर गुंडाळलेला कडक धारेचा मांजा, फर्र करीत उडणारा पतंग या गोष्टी पाहण्यातच रात्र गेली.
दुसरा दिवस रविवार असल्याने आमच्या पथ्यावरच पडला. मामा, मामी व आई पाहुण्यांकडे जाणार होते. आपोआपच बाहेर हुंदडायला मोकळं रान मिळालं. दिवस वर येईतो आम्ही आवरून चाळी पलिकडचं मैदान गाठलं. अनेक सवंगडी पतंग उडवित होते. मला मोठं आश्चर्य वाटलं.
'च्यायला, समदी पतंगी लांडीच? येकालाबी शेपूट न्हाई? आँ?' गावाकडच्या भन्नाट वाऱ्‍यात बिगरशेपटीचे पतंग अन् वावड्या गरगर फिरायच्या. कधी कधी तर मोठ्ठाल्या वावडीच्या लांब शेपटीच्या टोकाला दगडही बांधावा लागे. तेव्हा कुठे ती स्थिर राहून उडायची. गोते खाणाऱ्‍या पतंगांना शेपटासोबत काँग्रेसचं झुडूप लटकवल्या शिवाय ते चांगले उडत नसायचे. हा प्रकार इथे नव्हता. ही बिगर शेपटाची जादू पाहून मी हरखूनच गेलो.
'आमच्या हिकडं तं शेपटाबिगर पतंगी उडतच न्हाईत बब्बा. ह्ये कसं काय रं?' मामेभावाला मी विचारलं.
'मला माहीत नाही रे. पण इकडे कुणीच पतंगाला शेपूट बांधित नाहीत.' म्हणत त्यानं पतंगाला उडवलं, एकट्यानंच. हे देखील मला नवीनच होतं. पतंग आकाशात उंच गेला. आजुबाजूला बरीच मुलं पतंग उडवित होती. ढील देत, खेचत कापाकापी सुरु झाली. तो खेळही मला नवाच. मी मन लावून त्यांचे डाव प्रतिडाव पाहू लागलो. जणू काय आकाशातली लढाईच.
'काय रं, वावडी कशी उडवायची म्हाईतीय का तुला?'
'हीः हीः हीः वावडी उडवायची? हा कसला प्रकार म्हणायचा? वाक्प्रचार मला माहीत आहे.'
'आरं तुला वावडी न्हाई म्हाईत? अश्शी रोँय रोँय करीत उडती ना..' इतक्यात मामेभावानं कोणाचातरी पतंग वरच्यावर कापला.
'वाहा रं माज्या वाघा. हैच शाबास. त्यो शेजारचा बी उडीव. साला लैच वरखाली डोलतुया.' माझी प्रशंसा ऐकून त्यालाही जोश चढला. येईल तो पतंग काटण्याच्या फंदात आमच्या पतंगाला भली मोठी ढील गेली. आणखी दोन पतंगांना आस्मान दाखवल्यावर आमचा मांजाच संपला. आखडण्याशिवाय पर्याय नव्हता. शेवटी व्यायचं तेच झालं. आम्ही खेचत असतांनाच कोणीतरी वरून जोराची ढील सोडली अन् क्षणार्धात आमचा पतंग हेलकावे घेत दिसेनासा झाला. माझा चेहरा पडला. पलिकडच्या कोंडाळ्यातील पोरांनी आमची हुर्यो उडवली.
'जाऊं दे. च्यामारी आपुन वावडीच बनवू. अश्शी रोँय रोँय करीत उडवायची ना की पतंग काटला न्हाय फाटलाच पायजेल.'
'अरे व्वा!' त्याची कळी खुलली. पतंग गेल्याचं दुःखं तो विसरला. वावडी म्हणजे एक भयंकरच प्रकार असावा असे आश्चर्य त्याच्या डोळ्यांत मावेना. आम्हांसोबत आणखी दोन चाळकरी दोस्त होते. त्यांनाही वावडीची उत्सुकता लागून राहिली. ते पाहून मला चेव आला.
'आरं वावडीला तीन शिंगंबी असत्यात.'
'काय? शिँगं असतात? बापरे!' एकजण घाबरलाच.
'मंग. अश्शी ताणायची ना का वाकडी व्हवून शेजारची पतांगी फाडणारच बग्गा.' नसलेली मिशी पिळून मी मांडीवर शड्डू ठोकला. त्यांची उत्सुकता कमालीची ताणली गेली. आम्ही घरी परततांना आणखी दोघे तिघे आम्हांस मिळाले. काहीतरी आश्चर्यजनक घडणार यावर त्यांची चर्चा चालली होती.
घरी कोणीच नसल्याने मोकळं वाटत होतं. चाळीतली बरीच मुलं घरी जमली. अजब कृतीची गजब निशाणी आकारास येणार म्हणून सवंगड्यांची मामाच्या घरात गर्दी झाली. इतकी गर्दी असूनही थोडासुद्धा गोंधळ नाही की गडबड नाही. नाहीतर गावाकडं चारपोरं जमली तरी घर डोक्यावर घेतील. परंतु पुण्यातली पोरं फारच शांत वाटली. सगळे चिडीचूप होते अन् मी त्या गर्दीचा हिरो बनलो होतो.
वावडी नामक पतंगासाठी लागणाऱ्‍या साहित्याचं फर्मान माझ्या तोँडून बाहेर पडताच सेना हालली. कव्हरचा जाड कागद, कात्री, दोरा, डिँक, सुतळी या गोष्टी काही क्षणात जमा झाल्या.
'आरं पर कामठ्या कुठाय?' मी मुख्य वस्तूचा पुकारा केल्यावर पोरं एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागली.
'मी आणतो. मी आणतो.' म्हणत एकजण पळाला. मग मी निश्चिँत होऊन कामाला लागलो..
प्रथम माप घेऊन कागद आयताकृती कापून घेतला. चारही बाजूंनी दुमड दिली. मापात दोरे कापले. दुमडीत चिकटवले. उरलेल्या कागदात निशाण व दातऱ्‍या कापून घेतल्या.
'हंम् झाली बगा आपली वावडी तय्यार.' एक टोक धरून उंचावत मी ती कच्ची वावडी हवेत हेलकावली.
'हा लेचापेचा पतंग कसा काय रे उडायचा?' एकानं शंका बोलून दाखवली.
'आरं त्यो कामठ्यावाला पोरगा आला न्हाय आजून?' माझा प्रश्न पुरा होईतो दारात दोघेजण धापा टाकीत आले. मी त्यांना न्याहाळलं.
'आरं मर्दा कामठ्या कुटं हायेत?' मी त्याला विचारलं.
'हा काय हा गणेश कामठे.' विनाविलंब त्यानं उत्तर दिलं. मी डोक्याला हात लावला.
'आरं बाबांनु आपल्या बांबूच्या काड्या पायजेल. कामठ्या नसत्याल घावत तर चकाट्या आणा चकाट्या.' माझ्या या आदेशावर मामेभाऊ खो खो हसू लागला.
'वावडी उडवणं काय, चकाट्या पिटणं काय, ही वावडी बनवणं वाक्प्रचारांची मोठी गंमतच.'
'त्ये जाऊंदे बाबा, पैले चाकाट्या न्हायतर कामठ्या पैदा कर. त्येच्या बिगर वावडी तय्यार व्हनार न्हाई.' मी निक्षून सांगितल्यावर तोही चकाट्या शोधू लागला. आख्ख्या चाळीत कोणाकडे दुरडी किँवा तत्सम बांबूच्या वस्तू नव्हत्या. सर्वजण बांबू शोधत होते.
अखेर एकाने त्याच्या आजोबांची वेतकाठीच आणली. ती सोलून कामठ्या काढता येणार होत्या. परंतु त्यासाठी आजोबांची काठी मोडणं मला पटत नव्हतं.
'एवढुशा काटक्यांसाठी ह्ये दांडकं कशापायी कापायचं?'
‘तुला पाहिजे तेवढीच काठी कापून घे. मोठ्या मुश्किलीने सापडलाय हा बांबू.’ त्याने विनवणी केली.
‘हो हो, यातूनच हवा तेवढा बांबू काप.’ सर्वांनी मला प्रवृत्त केलं. तेव्हा माझाही नाईलाज झाला.
‘छ्या. ह्यो चाकू चालणार न्हाय. मोठ्ठा लागल.’ मी माझा अंदाज मांडला. पुन्हा मोठ्या चाकूच्या शोधार्थ धावाधाव सुरु झाली. पोरांचा उत्साह दांडगा होता.काहीतरी नवं पहायला शिकायला मिळतंय म्हटल्यावर त्यांची पळापळ साहजिकच होती. कोणीतरी शर्टात लपवून मोठा चाकू आणलाच. त्यानं बांबू साळणं कठीण काम होतं. शेवटी दगडाचे गावठी ठोके चाकूवर मारून मी ती काठी छीलली. मला पहिजे तितक्या कामठ्या मिळाल्या, परंतु चाकू दोन ठिकाणी वाकडा झाला. तो सरळ करण्यासाठी त्यावर आणखी ठोके टाकल्याने त्याची उरली सुरली धारही निघून गेली. तरीही त्या चाकू आणणारयाला काही एक वाटत नव्हतं...
सगळे सवंगडी माझं काम तन्मयतेनं पाहत होते. कामठ्या चिकटवून, बांधून मी वावडी तयार केली. वरच्या कामठीला ताण देऊन दोरा बांधला. तयार झालेल्या कमानीला दातऱ्यांची रांग व्यवस्थित चिकटवली. ती कच्ची वावडी हातात धरून फिरवली तेव्हा ‘बुंग...बुंग...’ असा आवाज झाला आणि पोरांनी टाळ्या वाजवल्या. वावडी पूर्ण सुकेपर्यंत दम धरवतोय कोणाला? वावडी घेऊन आम्ही मैदान गाठलं. तिथे तोबा गर्दी उसळली. असला शेपटीवाला पतंग त्यांनी पाहिलाच नव्हता.
मी काटेकोर कळसूत्र बांधलं. वावडीला शेपटी जोडली. एकाला लांब नेऊन सोडायला सांगितली. त्यानेही योग्यपद्धतीने वर सोडली अन् मी जोरात ओढली.. ती क्षणात उंच उडाली. पोरं नाचत होती, टाळ्या पिटत होती. माझ्याही आनंदाला पारावर उरला नव्हता. इतर पतंग उडविणारे मुलंही आपले पतंग गुंडाळून आमच्याभोवती जमली. मग मी सर्वांना वावडीचा बुंग बुंग आवाज खालपर्यंत आणणारा मांजा त्यांच्या कानाजवळ नेऊन ऐकवला. ती मुलं भलतीच खुश झाली. वावडी खाली घेऊन शेपटीला झुडूप लटकावून पुन्हा उडवली. तिने सहजगत्या ते रोप आकाशात नेले. नंतर दगड बांधण्याचाही प्रयोग झाला. दगड सुद्धा वावडीने वरती खेचल्यावर तर पोरं जल्लोष करू लागली.
अशा प्रकारे मी त्यांना शेपटी असणाऱ्या, बुंग बुंग आवाज करणाऱ्या, दगडही उचलू शकणाऱ्या वावडी नामक नव्या आयताकृती पतंगाची ओळख करून दिली होती. सर्वजण मोठ्या खुशीत होते. प्रत्येकाला माझं कौतुक वाटत होतं.
एकजण माझ्या खांद्यावर हात ठेऊन म्हणाला, ‘काय रे गावकऱ्या, तू इथेच का राहत नाहीस आमच्या जवळ?’ माझ्याकडे त्यावेळी उत्तर तयार नव्हतं आणि कदाचित त्याकाळी आर्थिकदृष्टया ते आमच्या घरच्यांना सोईस्कर वाटलं नसावं.... ( पुणेरी आजोळ मधून..)

जीवनमानमौजमजाअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

खुप छान अनुभव लिहिला आहे ..
आवडला ..

लहानपणी बारामतीला मामाकडे पाहिलेल्या वावड्या आणि गेल्या वर्षी सिन्नर ला मित्राकडे पतंग उडवतानाचे दिवस आठवले .. मज्जा आली

स्वाती२'s picture

23 Nov 2010 - 5:17 pm | स्वाती२

मस्त!