दूरदर्शन वाहिन्यांच्या कार्यक्रमांवरील निर्बंध

देवदत्त's picture
देवदत्त in जनातलं, मनातलं
18 Nov 2010 - 12:01 am

'बिग बॉस ४' आणि 'राखी का इंसाफ' ह्या कार्यक्रमांवर अखेर निर्बंध घालण्यात आलेत. ते कार्यक्रम रात्री ११ ते ५ ह्या वेळेत दाखविणे तसेच वृत्तवाहिन्यांना ह्या कार्यक्रमांची दृष्ये न दाखवण्याच्या अटी घालण्यात आल्या आहेत.

उशीरा केलेली पण चांगली गोष्ट. मी दोन्ही कार्यक्रम पूर्ण पाहिले नाहीत. 'राखी का इंसाफ' तर पहायला सुरूवात केल्यानंतर १५ मिनिटांत बंद केले होते. लोकांवर एवढी वाईट परिस्थिती आली आहे का? मान्य आहे की एखादा वाद मिटविण्याकरीता आपण कोणीतरी तटस्थ माणूस शोधतो. त्याकरीता मग एखादा अनोळखी माणूसही निवडू शकतो. किरण बेदी ठीक आहेत हो, त्या पोलीस अधिकारी होत्या. एखादा न्यायाधिश नाही तरी त्यांचे म्हणणे ऐकू शकतो. पण न्याय देण्याकरीता राखी सावंत? आणि राखीचे बोलणे पाहून तर ती वाद मिटविण्यापेक्षा आगीत तेल ओतत आहे असेच वाटते.

तसेच 'बिग बॉस'. हा कार्यक्रम ही सूरूवातीपासून वाद निर्माण करूनच मग चित्रीकरण केले जाते असे वाटते. गेल्या मोसमातील आणि ह्या मोसमातील त्या कार्यक्रमाचे काही भाग पाहून, पाश्चिमात्य देशांचे कार्यक्रम आणले म्हणजे ते त्या प्रकारेच दाखविले जावेत म्हणून मुद्दाम त्यात ह्या गोष्टी टाकल्या जातात असे वाटते.

आज 'स्टार माझा'वर ह्याबद्दल चर्चा चालू होती. कांचन अधिकारी ह्या निर्बंधाच्या पक्षात आहेत असे दिसले. त्यांनी दिलेले मुद्दे पटतात की आपण एका ठिकाणी संस्कृती वगैरे सांगत असतो मग असे प्रकार का? कार्यक्रम असा असावा की सर्वजण पाहू शकतील वगैरे वगैरे. दुसरा एक पाहुणा, कोणीतरी शाह म्हणून होता. नक्की शब्द आठवत नाही पण त्याचे म्हणणे असे की "संस्कृती वगैरे ठीक आहे. पण आजच्या पिढीतील लोकांना जसे पाहिजे तसे आम्ही दाखवतो. आमच्यावर निर्बंध कशाला?" काहीतरी यूट्युब चे ही उदाहरण दिले की तिथे आज सर्व शिव्या असलेले व्हिडीयो ही उपलब्ध आहेत, तिथे सर्व उघडपणे असते, काही निर्बंध नाही. मला त्याला सांगावेसे वाटेल की "तुम्हाला जर वाटते की आजच्या पिढीतील लोकांना हे पटते म्हणून तुम्ही दाखवता हे एकवेळ मान्य केले तरी सर्व लोक तसे मानत नाहीत. अजूनही त्याला वेळ आहे. तुम्हाला ते कार्यक्रम तसे दाखवायचे असतील तर दाखवा, पण त्यालाही कुठे दाखवतो त्या क्षेत्राप्रमाणे मर्यादा असतील. आणि मग त्याची जशी वेळ ठरविली गेली असेल तसे दाखवा. तसेच युट्युबवरही मर्यादा आहेत. तिथेही तक्रार केली की तसे व्हिडियो काढले जातात."

ह्या दोन कार्यक्रमांसोबतच आणखी एक कार्यक्रम आहे. बिन्दास वाहिनीवरील "ईमोशनल अत्याचार". ह्या कार्यक्रमावरही अशाच प्रकारचे निर्बंध घातले जावेत, म्हणजे रात्री ११ ते ५ ही वेळ ठेवणे आणि वृत्तवाहिन्यांना ह्यांची दृश्ये दाखविणे ह्यावर बंदी आणणे, असे वाटते.

जर पाश्चिमात्य देशांत असे उघडपणे दाखवले जाते असे कोणी म्हणत असेल तर त्यांना सांगावेसे वाटेल की तिकडची गोष्ट इथे आणायची असेल तर पूर्ण प्रकारात आणा. कार्टून पासून मालिकांपासून चित्रपटांपर्यंत जे काही दूरदर्शन वाहिन्यांवर दाखवले जाते, तो कार्यक्रम कोणत्या प्रकारचा आहे, तसेच कोणत्या वयोगटाच्या प्रेक्षकांकरीता आहे हे त्या कार्यक्रमाच्या सुरूवातीलाच वरच्या कोपर्‍यात दाखविले जाते. मग पुढे तो कार्यक्रम पाहणार्‍याची इच्छा.

आपल्या इथेही तसेच काहीतरी करूया. मग म्हणू की आता प्रेक्षकाला निर्णय घेऊ दे. काय? बरोबर?

संस्कृतीसमाजप्रकटनमाध्यमवेध

प्रतिक्रिया

ऐक शुन्य शुन्य's picture

18 Nov 2010 - 12:48 am | ऐक शुन्य शुन्य

तुमच्याकडे रिमोट आहे. काय चागले अनि वाईट कळते, मग त्रास का ? चनेल बदला

विजुभाऊ's picture

23 Nov 2010 - 3:00 pm | विजुभाऊ

तुमच्याकडे रिमोट आहे. काय चागले अनि वाईट कळते, मग त्रास का ?
दारूच्या बाटलीला झाकण असते. ते उघडावे की नको हे कळणारे असतात.
दारू पिणारा स्वतः पीत असतो. लहान मुलना पाजत नसतो.
टीव्ही वर जे चालते ते मोठ्यांसमवेत लहान देखील तेच बघत असतात.
टीव्ही सुरू झाल्यावर मोठ्यांच्या डोक्यात लहान मुलाचाच मेंदू असतो.

निखिल देशपांडे's picture

18 Nov 2010 - 1:49 am | निखिल देशपांडे

याच संदर्भात लिहायचे मनात घेउन आलो तर देवदत्त ने म्हणणे व्यवस्थित मांडलेले आहे.
माझ्या तर मत असे सरसकट सेन्सॉरशिप नको असली तरी ट्राय चा धर्तीवर एक सेटलाईट टेलिव्हिजन रेग्युलेटरी अ‍ॅथोरिटी असणे गरजेचे आहे. म्हणजे या शोबद्दल समजा कुणाच्या तक्रारी असतील तर त्या करण्यास एखादा सरकारी फोरम असण्याची गरज आहे. वृत्तवाहिन्यांनी त्यांच्या NBA या संघटने द्वारे News Broadcasting Standards Authority (http://www.nbanewdelhi.com/) ची स्थापना केलेली आहे. या संघटनेच्या सदस्य वाहिन्यांनी दाखवलेल्या कोणत्याही न्यूज बद्दल तुम्ही तेथे तक्रार करु शकता. एका दृष्टिने विचार केला तर ही एक चांगली सुरुवात आहे. पण यात कुठे तरी सरकारचा हस्तक्षेप हवा. कारण वृत्त वाहिन्यांच्या निष्काळजी पणाचे परिणाम घातक असू शकतातच. याबद्दलचे आक्षेप आपण २६/११ च्या हल्ल्याच्या वेळेस पाहिलेले आहेतच.

ह्या दोन कार्यक्रमांसोबतच आणखी एक कार्यक्रम आहे. बिन्दास वाहिनीवरील "ईमोशनल अत्याचार". ह्या कार्यक्रमावरही अशाच प्रकारचे निर्बंध घातले जावेत, म्हणजे रात्री ११ ते ५ ही वेळ ठेवणे आणि वृत्तवाहिन्यांना ह्यांची दृश्ये दाखविणे ह्यावर बंदी आणणे, असे वाटते.

या कार्यक्रमाचे जेवढे ही भाग पाहिलेत त्यात मुलगा मुलगी एकमेकांना भेटले की एक प्रश्न नेहमीच विचारतात "तुम्ही आयुष्यात कधी वन नाईट स्टॅण्ड केला आहे का???" आणि या प्रश्नाचे उत्तर नेहमी हो हेच असते. त्याच सोबत वन नाईट स्टॅण्ड ची संख्याही भरघोस कशी काय असते बुवा.(स्वगतः च्यायला आम्हीच काय घोडे मारले आहे ;)). त्याच सोबत या कार्यक्रमात काही मॉडेल्स या अंडरक्व्हर एजंट म्हणून काम करतात. त्यांचे नाव, वय, फोटो सगळे व्यवस्थित दाखवलेले असते. या मुली बिनधास्त काही मुलांसोबत प्रेमाचे नाटक करत फिरतात, चुम्माचाटी करत फिरताना दाखवतात. यांच्या घरच्यांना काहीच वाटत नाही का??? का आज काल हेच सर्व मान्य झालेले आहे? त्यामुळे यावर तर सगळ्यात आधी बंदी घालायला हवी होती.
असे कार्यक्रम सरसकट सगळ्यांनी बघण्यायोग्य वाटत नाही. त्यांचा साठी काही तरी नियमावली असावीच.

नितिन थत्ते's picture

18 Nov 2010 - 8:33 am | नितिन थत्ते

निखिल देशपांडेशी सहमत.

अशी रेग्युलेटरी ऑथॉरिटी असावी.

सेन्सॉरशिप असू नये हे मलाही मान्य आहे.

ज्या ज्या वेळी सेन्सॉरचा प्रश्न उभा राहतो तेव्हा महेश भट आदि लोक "Let the industry evolve a code of conduct|" अशी विधाने करतात. पण तेवढा धुरळा खाली बसल्यावर इंडस्ट्रीकडून अशी आचारसंहिता बनवण्याची कुठलीच हालचाल होत नाही हेही सत्य आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Nov 2010 - 8:56 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

'राखी का इंसाफ' कार्यक्रम मी च्यायनल बदलतांना चुकून पाहिला आणि त्यादिवशी तिथे कोणत्या तरी मालिकेच्या की चित्रपटाच्या दिग्दर्शकाने कोणत्या तरी मॉडेलला चित्रपट-मालिकेत काम देण्यासाठी फोन करुन किती त्रास दिला असे ती मॉडेल सांगत होती. चर्चा मुद्यावरुन गुद्यावर आली तिथेच स्टेजवर हानामारी. आणि न्यायमुर्ती राखीसावंत यांनी सुरक्षा-रक्षकाद्वारे त्या दिग्दर्शकाला कार्यक्रमातून बाहेर नेले.वाहिन्यांचे टीआरपी वाढविण्यासाठी असे उद्योग असावेत असेही वाटले, खरे काय खोटे काय आजकाल काही कळत नाही.

'बिग बॉस' ने तर कहर केला. लग्न काय ! लग्न केलेल्या दोघांना वेगळी रुम काय ! आणि त्याचे थेट प्रक्षेपण काय ! काल तर कहर झाला साला. बिग बॉस मधे 'पामेला' दर्शन घडवले. 'नमस्ते' म्हणून 'टच्चपण' दाखवत तिने कार्यक्रमात प्रवेश केला जसे काही तिला भारतीय संस्कृतीचा खूप आदर. च्यायला, एकच गोष्ट खरी आहे. आपल्या हातात रिमोट आहे, घरात काय पाहू द्यायचे आणि काय नाही यावर रिमोट हवा. वाहिन्यांच्या कार्यक्रमांवर निर्बंधाचा उपयोग नाही. कारण त्यांना टीआरपी वाढवायचा आहे आणि भरपूर व्यवसाय करायचा आहे.

-दिलीप बिरुटे

स्वानन्द's picture

18 Nov 2010 - 9:26 am | स्वानन्द

बिरुटे सरांशी अंशतः सहमत. रिमोट आपल्याकडे आहे. मी बिग बॉस असो, राखी सावांत चा शो असो किंवा तो अत्याचार वाला कार्यक्रम असो... अजिबात बघत नाही. चॅनेल सर्फ करताना कधीतरी एखादा सीन पाहिला की पामेला.. किंवा पाकिस्तानी कलाकार वगैरे करंट हॉट इश्युस बद्दल कळतं, तेवढंच.

पण मला वाटतं की 'रिमोट तुमच्या हातात आहे' हे म्हणणं अतिशय गोंडस उत्तर आहे. पण नीट पाहिलं तर लक्षात येतं... की विकार हे मनाचा ताबा सहज घेतात. त्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत. प्रयत्न करावे लागतात ते चांगले विचार मनात आणण्यासाठी. ( म्हणजे पाणी उताराक्डे सहज्पणे वाहतं चढावर नेण्यासाठी त्याला मोटर लावावी लागते तसं काहीसं ) मी नोकरीनिमित्त मुंबईत होतो तेव्हा अर्थात सगळे बाहेरगावातून येणारे राहतात त्याप्रमाणे कंपनीतल्याच इतर चार जणांसोबत म्हाडाच्या फ्लाट मध्ये राहत होतो. तेव्हा संध्याकाळी टीव्ही बघताना सगळे जण एकामागून एक असे हेच कार्यक्रम पाहत असत. ( तेव्हा राखीचा कार्यक्रम सुरू झाला नव्हता ). राजा शिवछत्रपती किंवा अनेक एतर कार्यक्रम असायचे पण त्यांना या कार्यक्रमातून मिलणारी मजा त्यात मिळत नसे!
बिल्डींग मध्ये कुणाचं भांडण झालं की ते सोडवायला जाणारे फार विरळा सापडतील. पण ते मजा म्हणून बघायचं आणि मागाहून चवीच्वीने चर्चा करायची ही प्रव्रूत्तीच जास्त दिसून येते. आणि अशाच वेळी लोकांचे घरगुती वाद चव्हाट्यावर आणून दाखवले तर किती जण 'रिमोट आपल्याकडे आहे' या गोष्टीचा विचार करतील असे वाटते? आणि हे आपण बोलतो आहोत ते मोठ्या माणसांविषयी. पण घरातील लहान मुलांना हे समोर दिसत राहिलं तर ते नक्की कशावर विश्वास ठेवतील? 'कुणाशी भांडण करू नको, शिव्या द्यायच्या नाहीत' या तुमच्या शिकवणूकीवर की समोर टीव्हीवर दिसणार्‍या लठ्ठालठ्ठीवर?

विश्वनाथ मेहेंदळे's picture

18 Nov 2010 - 10:19 am | विश्वनाथ मेहेंदळे

पण मला वाटतं की 'रिमोट तुमच्या हातात आहे' हे म्हणणं अतिशय गोंडस उत्तर आहे. पण नीट पाहिलं तर लक्षात येतं... की विकार हे मनाचा ताबा सहज घेतात. त्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत.
आपल्याला विकार आहेत आणि मग वाहिनीच्या निर्मात्यांना नाहीत का? आपण आपल्याला हवे ते पाहणार आणि दाखवणाऱ्यांनी मात्र स्वतःवर बंधने घालून घ्यायची हा कुठला न्याय? समाजाच्या नीतिमत्तेचा ठेका त्यांनी का म्हणून घ्यावा (आपण घेत नसताना) ?

स्वानन्द's picture

18 Nov 2010 - 10:55 am | स्वानन्द

>>आपल्याला विकार आहेत आणि मग वाहिनीच्या निर्मात्यांना नाहीत का?
आहेतच. ते हे कार्यक्रम दाखवतात व ते सतत अधिकाधीक मसालेदार ( भाडणे, उच्च स्वरात शिवीगाळ वगैरे दाखवून) कसे होईल यासाठीचा त्यांचा प्रयत्न हेच दाखवते.

>>समाजाच्या नीतिमत्तेचा ठेका त्यांनी का म्हणून घ्यावा (आपण घेत नसताना) ?
कारण जेव्हा ते एखादी गोष्ट प्रसार माध्यमातून दाखवली जाते तेव्हा तीचा प्रभाव हा तीच गोष्ट फक्त चार चौघांपुढे दाखवली गेल्यानंतर पडणार्या प्रभावाच्या कित्येक पट अधिक असते. जसे अणुशक्ती ची ताकत प्रचंड आहे व त्यामुळेच तिला हातालताना तितक्याच प्रचंड जबाबदारीने हाताळले पाहिजे तसेच प्रसार माध्यमाची ताकत प्रचंड आहे त्यामुळे ती ज्याच्या हातात आहे त्याने त्याची जबाबाअरीही तितकीच वाढते.

>>आपण आपल्याला हवे ते पाहणार आणि दाखवणाऱ्यांनी मात्र स्वतःवर बंधने घालून घ्यायची हा कुठला न्याय?
मी 'प्रेक्षकाची काहीच जबाबदारी नाही' असे वर कुठेच म्हटलेले नाही असे मला तरी वाटते. माझ्या पहिल्या प्रतीसादातील पहिला परीच्छेद वाचला असेल तर हे तुमच्या लक्षात यायला हरकत नाही. पण प्रत्येक प्रेक्षक हा तितकाच सूज्ञ असेलच किंवा असलाच तर तितका विचार करेलच याची खात्री देता येत नाही. आणि शिवाय आपण हे कार्यक्रम पाहत असताना लहान मुलेही ते पाहत नाहीत ना याकडे प्रत्येक जण लक्ष देतच असेल असे नाही. नीट सर्वसमावेशक विचार केलात तर हे लक्षात येईल. असो.

मृत्युन्जय's picture

18 Nov 2010 - 12:10 pm | मृत्युन्जय

आपल्याला विकार आहेत आणि मग वाहिनीच्या निर्मात्यांना नाहीत का? आपण आपल्याला हवे ते पाहणार आणि दाखवणाऱ्यांनी मात्र स्वतःवर बंधने घालून घ्यायची हा कुठला न्याय? समाजाच्या नीतिमत्तेचा ठेका त्यांनी का म्हणून घ्यावा (आपण घेत नसताना) ?

पॉर्नो फिल्म्स दाखवा की मग प्राइम टाइमला. चित्रपटांवरची सोन्सोरशिप उठवा. A, U, U/A असली रेटिंग्स काढुन टाका. राखी सावंत ला खुला रंगमंच उपलब्ध करुन द्या. त्या इमोशनल अत्याचार मध्ये मॉडेल्स अंडरकवर एजंट म्हणुन काम करताना जे काय धंदे करतात ते करताना स्क्रीन ब्लर करु नका.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

24 Nov 2010 - 9:01 pm | विश्वनाथ मेहेंदळे

आपला काहीतरी गैरसमज होतो आहे. मी सेन्सोरशिप च्या विरुद्ध नाही. वर निखील म्हणाले त्याप्रमाणे एक अ‍ॅथोरिटी असायला काहीच हरकत नाही, पण प्रेक्षकांनी पण थोडा संयम बाळगावा यावर काहीच दुमत असू नये. थोडी सेल्फ सेन्सोरशिप असायला हरकत नाही. कोकणात एक म्हण आहे, हगणाऱ्याला नसली तरी निदान बघणाऱ्याला लाज पाहिजे.

एक गोष्ट लक्षात घेतलीच पाहिजे कि प्रत्येक बाबतीत अमेरिकेची कॉपी कशाला करायला हवी? आणि जरी तिथे "काहीही " दाखवत असले तरी निर्बंध असलेले शब्द आहेतच ज्यावर डिंग वाजवली जाते...तसेच प्रत्येक प्रोग्राम कोणत्या वयोगटासाठी आहे ते लिहून येते...हा राखीचा प्रोग्राम मला काहीसा जेरी स्प्रिंगर किंवा मोरी सारखा वाटतो...केवळ मुंबई किंवा मोठ्ठाली शहरे म्हणजे भारत नाही...अशा गोष्टींसाठी आपले समाजमन तयार नाही...निर्बंध असलेच पाहिजेत...नाहीतर राखीच्या प्रोग्राममध्ये भाग घेतलेल्या लोकांना आत्महत्या हाच पर्याय राहील...आपल्याकडे लोक दुर्लक्ष करत नाहीत पण इतरांच्या आयुष्यात नको इतके बघत असतात..त्यामुळेच निर्बध हवेतच...आणि लोकांनी सुद्धा अशा ठिकाणी भाग घेताना विचार केला पाहिजे कि काय लायकीचा प्रोग्राम आहे ते..
रिमोट आहे म्हणजे लोक तो वापरतातच असे नाही.

अविनाशकुलकर्णी's picture

18 Nov 2010 - 11:35 am | अविनाशकुलकर्णी

राखिका फैसला. व बिग बॉस या दोन हि सिरियल्स ला लोकांच्या विरोधामुळे व कुटुंबा समवेत बघण्यास योग्य नसल्याने प्रसारण रात्री ११ ते ५ या वेळात करावे व प्रौढासाठी असे निवेदन द्यावे असा मार्ग काढला..
पण मनात एक शंका येति कि सरकार ने या मार्गाने अनेक विदेशी "तसल्या" कार्यक्रमांना या मुळे चंचु प्रवेश करण्यास संधि मिळावी म्हणुन तर हा मार्ग अवलंबला नसेल? सरकार चे काहि सांगता येत नाहि
अश्या धर्तीवरचे अनेक कार्यक्रम रात्री रात्री ११ ते ५ या वेळात करावे व प्रौढांसाठी असे निवेदन देवुन प्रसारित करण्यात येतिल..
राखिका फैसला. व बिग बॉस याने तो पायंडा पडेल.. नव्हे पडला

गवि's picture

18 Nov 2010 - 1:14 pm | गवि

चांगले केलेत विषय काढलात ते. तुम्ही म्हणताय ते पटतं काही वेळ..पण..

"काय दाखवावे" यावर सेंट्रल लेव्हलला निर्बंध ठेवण्याऐवजी "काय बघावे" यावर लोकल लेव्हलला निर्बंध ठेवणे बरे असंही वाटतं.

बोलणे सोपे आहे..मला कळतंय.. पण किमान "काय दाखवावे" यावर खूप कमी निर्बंध आणि घरोघरी मुलांना आणि स्वतःला काय "बघावं"/ "काय योग्य आहे" हे ठरवणं जास्त बरं ना?

पंख्याखाली खूप जण बसले आहेत. सर्दी होईल म्हणून कोणीतरी शहाण्याने उठून वरून बटण बंद करण्यात काय अर्थ आहे?

मला तर वाटतं हा खूप मोठा विषय आहे..पण बघू देच मुलांना..निचरा तरी होईल.

त्यामुळे होणार्‍या वाईट केसेस जरूर पेपरमधे येत असतात. पण खरंच असा काही अभ्यास झालेला नाही की नेमके वाईट काहीतरी टीव्ही सिनेमात बघण्यात आल्याने किती गुन्हे झाले आणि त्यामुळे खरंच काही वाढ झाली का?

या गोष्टी हायलाईट झाल्याने डोळ्यात भरतात. टीव्ही /सिनेमा(हिंसा/बलात्कार) वाले या सगळ्या आधीही दु:शासन होतेच. इन्टरनेट्/यू ट्यूब या आधीही रामन राघव/ जक्कल सुतार होतेच.

स्वानन्द's picture

18 Nov 2010 - 1:32 pm | स्वानन्द

यावर अनेक अशा मिपाकरांचे ज्यांच्या घरी लहान मुले आहेत; अनुभव ऐकायला आवडेल. म्हणजे ते असे कार्यक्रम बघतात का?
बघत असतील तर तेव्हा मुले पण बघतात का?
बघत असतील तर त्याचा काही वेगळा परिणाम त्यांच्या वागण्यात जाणवतो / जाणवला का?
ग.वि. म्हणतात त्याप्रमाणे निचरा होतो / होईल का?
ज्यांची मुले अगदीच लहान आहेत त्यांनी याबाबतीत काही विचार केला आहे का?

देवदत्त's picture

23 Nov 2010 - 1:33 pm | देवदत्त

अरे वा, एवढे प्रतिसाद आलेत. आज पाहिले. धन्यवाद :)
रिमोट कंट्रोलबद्दल म्हणणे बरोबर आहे. पण म्हणून आपण नुसतेच दुर्लक्ष करत राहिलो तर कैच्याकै दाखवायला काही वेळ लागणार नाही.

हम्म! सध्या राखी कार्यक्रमाने बर्‍याच जणांची झोप उडवलेली दिसते आहे.
नुसतेच पेप्रांमध्ये वाचत होते म्हणून तूनळीवर जाऊन प्रकार काय आहे ते पाहिलं तर एक मुलगी मुलाला चप्पल फेकून मारत होती. दोन मिनिटात गरगरायला लागलं आणि प्रकार बंद केला.