एव्हढ्यात पॅरी जोरात ओरडला..."ओय खोतियों...उथ्थे वेख्खो...सनसेट्ट! क्माल है यार...सिंपली अमेझिंग"...............
बोलुनचालून सरदारच तो, लागला वेड्यासारखं करायला.अगदीच सुर्यास्त काही नव्हता झालेला, पण भास्करराव दिवसभराचं काम संपवायच्या गडबडीत होते, अगदी निघण्याची तयारी करायला घेतलेली. हे ऐकून कॅल्क्युलेटेड संत्या एकदम करवदला. म्हणाला, "अरे ए सनसेट बघणार, येड्यांनो सनसेट होईपर्यंत आपण शक्य तितकं अंतर पार करुन घेऊ, एकदा का अंधार पडला की बोंब होईल परत जायची. हे जंगल म्हणजे काय आपल्या कॉलेजचा रस्ता नाय, कधीही कसाही पार करु शकू वाटायला."
पॅरी काही ऐकायला तयार नाही, तसा सुर्यास्त हा माझाही विक-पॉईन्ट असल्याने माझंही मन होत नव्हतं तिथून निघायला....
अचानक सुर्यनारायणासमोर एक काळपट ढग आला. काही क्षण सगळं अंधारुन आल्यासारखं झालं, संत्या आवराआवरी करता करता एकदम थबकला, म्हणाला, "के.ड्या.....आकाशात बघ यार" हे ऐकून सगळ्यांच्याच नजरा आकाशाकडं वळल्या आणि सगळेच एकदम नि:शब्दपणे पहात राहिलो.
भलामोठा काळपट ढग सुर्याला आपल्या मागं दडवण्याचा प्रयत्न करत होता. पण किरणं मात्र त्या ढगाच्या कडा सोनेरी करुन त्याची शोभा वाढवत होती. ह्या झटापटीत त्या ढगाच्या मध्येच एक मोठं भोक पडलं होतं आणि त्या बोगद्यातून येणारा सुर्यप्रकाश एकदम स्टेजावर उभ्या असलेल्या खास कलाकारावर टाकलेल्या स्पॉटलाईटप्रमाणे दरीतल्या भातखाचरांवर पडला होता. बाकीचं झाकोळून आलेलं आसमंत, एकाच ढगाच्या रुपेरी कडा, आणि हिरव्यागार दरीतल्या पोपटी भासणार्या भात-खाचरांचा ऊन्हाने न्हाऊन बदललेला सोनेरी अवतार. ऊन्हाच्या काही चुकार तिरिपी इकडे तिकडे सांडलेल्या, नुकत्याच स्वच्छ धुवुन काढलेल्या हिरव्या-पोपटी पानांवरती रेंगाळलेले टपोरे थेंब चमकवत ह्या सगळ्या निसर्ग-खेळाची शोभा वाढवत होत्या.
हळुहळु हा सोनेरी-रुपेरी रंग कधी तांबूस होत गेला आणि त्यात अंधाराचं काजळ कधी मिसळत गेलं हे कळलंच नाही.
त्या तेजोनिधीनं आपलं निरनिराळं कसब पणाला लाऊन आम्हाला जागीच बांधून घातलं होतं आणि गुपचुप पसार होऊन गेला होता.
अंधार पडताच भीड चेपलेले रातकिडे, डास जेव्हा आजुबाजुला फिरायला लागले तेव्हा कुठे आम्ही भानावर आलो. ह्या सृष्टीचेटूकात फोटो काढायचे आम्हा कोणाच्याच लक्षात आलं नाही ह्याची नंतर बरेच दिवस रुखरुख लागून राहिली. असो.
आता संधीप्रकाश कमी होत जाऊन अंधार मी म्हणायला लागला होता. पटापट सगळं आवरलं आणि परतीच्या प्रवासाला लागलो.
सगळ्यात पहिलं काम म्हणजे दोन्ही बॅटर्या चालू केल्या. बर्यापैकी प्रकाश दिसल्यावर जरा जीवात जीव आला. आता दरी उजव्या हाताला ठेऊन डाव्या हातानं कातळ चाचपत आम्ही एका रांगेत घळीकडे निघालो. आता परत जीभा तोंडात वळवळायला लागल्या होत्या. सुर्यास्ताची जोरदार तारिफ आणि पॅरी, संत्याने आम्हाला योग्य वेळी ते दाखवल्याबद्दल त्यांना शाबासकी देणे चालू झालं होतं. घळ पार करताना तसा फार त्रास नाही झाला. एकतर ती उतरताना वाट थोडीशी ओळखीची झाली होतीच. त्यात पुन्हा चढ असल्यामुळे फारसं घाबरायचं कारण नव्हतं. थोडा त्रास झाला पण घळ पटकन पार झाली. आता पुढे खरी परिक्षा होती. भिती दरीत पडायची नव्हती, आता काळजी होती ती आडवंतिडवं पसलेल्या जंगलातून बरोबर वाट शोधावी लागण्याची आणि बिबट्यांची / जंगली प्राण्यांची (त्यावेळी बिबट्यांनी मावळात फारच धूमाकुळ घातला होता.).
येताना पाऊस लागल्याने हा टप्पा धावतपळत पार केला होता, त्यामुळे फारसं आठवत नव्हतं. वर अंधारानं चांगलेच हातपाय पसरलेले. जे काही थोडंफार चांदणं होतं त्यानं 'व्हिजिबिलिटी' वाढण्याऐवजी गोंधळच वाढवला होता. उगाच झाडांचे विचित्र आकार, पडालेल्या सावल्या ह्यामुळे रस्ता सापडणं मुश्किल होऊन गेलं. आजुबाजुला मोकाट वाढलेलं रानगवत, हत्त्तीगवतासारखं उंच झालेलं होतं. आसपास चिटपाखरुही नाही, सावल्या आणि उंच गवताने निर्माण केलेला दिशाभ्रम, न दिसणारी पायवाट शोधण्याच्या प्रयत्नातले आम्ही...हळुहळु काळजीची जागा भितीनं घ्यायला सुरुवात केली. अखंड चालू असलेली बडबड आपसुकच आटत आटत नि:शब्दतेपर्यंत आली होती. टरकले सगळेच होतो, पण बोलून कोणि दाखवायला तयार नव्हतं.
बरंच वेडंवाकडं दिशाहीन फिरल्यावर जरा वेळ थांबलो.थोडी चर्चा केली, प्रत्येकाचं मत वेगवेगळंच यायला लागल्यावर डोकं सुन्न व्हायची वेळ आली. इतक्यात संत्या आकाशाकडे निरखुन बघत म्हणाला, "आयला, तो बघ रे, नक्की ध्रुवतारा आहे. म्हणजे...हे बघ, इकडे उत्तर दिशा आहे..." सगळेजण एकदम आशेने संत्याच्या तोंडाकडे बघायला लागलो. हो, हे बेणं कशा-कशाची माहिती ठेवत असेल हे ब्रम्हदेवालाही छातीठोकपणे सांगता नाही यायचं...पण, दुसर्याच मिनिटाला त्यानं आमच्या आशेच्या फुग्याला टाचणी लावली. काही सेकंद विचार करुन त्यानं विचारलं, "ए कमळे, आपण कोणत्या दिशेनं चढाई केली रे?" झालं...संत्यासोडून बाकी सगळ्यांनी फटाफटा आपापल्या कपाळावर हात मारुन घेतले.
एकदम कम्मोचं सुपीक डोकं चाललं, तो म्हणाला, "अरे, आपण चढत होतो तेव्हा दरी आपल्या डाव्या हाताला होती ना? मग ती आता उजव्या बाजुला असायला हवी...तो रस्ता पकडून आपण बरोब्बर खाली पोहचू." "शाब्बास रे पठ्ठ्या ! " आमच्या खरंच लक्षातच नव्हतं की हे. मग उजवीकडं आम्ही निरखुन पहायला सुरुवात केली, पण माजलेल्या गवताखेरीज काहीच दिसेना.. सरदारनं दोन्ही बॅटर्या हातात एकत्र धरुन प्रकाश तीव्र करुन पलिकडं पहायचा प्रयत्न केला आणि...ठाप्प...एका बॅटरीनं 'राम' म्हटलं. "ए....तिच्यायची कटकट, कोणाची बॅटरी वारली रे?" इति अमल्या...सरदार चिरकला "के.डी."
सगळे रागानं माझ्याकडं बघायला लागलेले त्या काळ्यामिट्ट अंधारातही मला चांगलच जाणवलं. म्हणलं, "चला रे, आत्ता रस्ता महत्वाचा, मला काय कधीही धुवू शकता तुम्ही !"
आता दरी-शोधमोहिम चालू झाली. सगळ्यात पुढे सरदार हातात कुकरी घेऊन, त्याच्यामागं संत्या हातातल्या फांदीनं समोर आलेली झाडं-झुडपं बाजुला करत, त्याच्यामागे मी ३ सॅक्स पाठीवर लाऊन हातात माझा लाडका रामपुरी घेऊन, माझ्यामागे कम्मो बॅटरीनं सगळ्यांना पायाखालची वाट दिसेल आणि पॅरीला समोरचं दिसेल असा प्रकाशझोत पाडत, आणि अमल्या त्याच्या पाठीला पाठ लाऊन मागून एखादं जनावर हल्ला करत नाही ना, हे पहात उलटा चालताना अशी आमची पलटण एका रांगेत चालायला लागली. नेहमीप्रमाणेच माझं तोंड काही गप्प राहिना, मग उगाच ह्याची खेच, त्याला चिडव असं चालू झालं, मध्येच अमल्याला म्हणलं, "अमल्या, सगळ्यात मागं आहेस, आम्हाला दिसत नाहीय्येस, जरा तोंडानं आवाज काढत रहा, नाहीतर मगच्यामागं तुला बिबट्यानं ओढून नेलं तरी आम्हाला कळायचं नाही." ह्यावर तोही आता चालू झाला :). म्हणाला "गाणं म्हणू?" म्हणालो, "म्हण, पण शिरडीवाले... केलंस तर एक पैसुध्दा देणार नाही आम्ही." ठीक आहे म्हणून अमल्या गायला लागला "गुमनाम है कोई...बदनाम है कोई..." आधीच जंगल, त्यात अंधार, त्यात टरकलेली ! हे लेकाचं सरळपणानं कधी काही करतच नाही का? असं काहीसं म्हणेपर्यंत धप्प असा आवाज आला, वळून पाहतो तर कमल्या वाटेत खाली लोळतोय, त्याच्या छातीवर अमल्या बसलाय,आणि कम्मोची ती बॅटरी मातीत पडलेली. दोघांना उठवून परत चालायला लागलो. कम्मो अमोलला अखंड शिव्या घालत होता आणि १५-२० पावलांवर परत धप्प.... पाहिलं तर कम्मो परत मातीत लोळतोय आणी अमल्या भंजाळल्यासारखा त्याच्याकडे पाहतोय. आम्ही पाहिल्यापाहिल्या "ए...मी नाय काय केलं हां...हे कमळ्या आपोआपच सांडतंय सारखं" असं सांगून मोकळा झाला.
काय ते आमच्या चांगलं लक्षात आलं. भितीमुळं कमल्याचे पाय कापत होते आणि तोल जात होता. तो बोलत काहीच नसला तरी रडाकुंडीला आलेला आहे हे लक्षात घेऊन आम्ही 'मार्चिंग पार्टीचं फॉर्मेशन' तेच ठेऊन क्रम बदलला. आता अमल्या सरदारच्या मागे, संत्याच्या पाठीवर सॅक्स आणि तो अमल्यामागे, त्याच्यामागे कम्मो आणि शेवट मी असे निघालो. मी आणि संत्यानं आणखी एक मोठी फांदी शोधून तीचं एक-एक टोक आमच्या हातात पकडलं. दोघांच्या मधे कम्मोला घेऊन फांदीचा मधला भाग त्याला धरुन चालण्यासाठी दिला. तरीही बिचारं मधून अधून हेलपाटत होतंच. फार दया आली त्याची, आणि रागही...भेकड साला. पण त्याच्या जबाबदार्या आम्हालाही ठाऊक होत्या, त्यामुळे काही बोललो नाही त्याला.
सरदार पुढे हातातल्या कुकरीनं सपासप गवत कापत पुढे चालत होता, आम्ही त्याच्यामागे मेंढरासारखे रांग लाऊन जात होतो...
एकदम सरदारचा घाबरलेला आवाज आला "आगे मत आना रे...." आणि अमल्याला सरदारनं आमच्या अंगावर ढकलला. काही कळेना, का विचारलं तर म्हणतो कसा, "आगे खाई है| मै आधा लटक रहा हूं..." बॅटरीचा फोकस मारला आणि आमची हवाच टाईट झाली. एका हातानं झाडाची फांदी धरलेली, दुसर्या हातातली कुकरी चिखलात रोऊन तिला पकडून हा माणूस दरीच्या तोंडाशी तरंगतोय. कसाबसा त्याला वर ओढून घेतला, तोपर्यंत कमल्यानं रडायला सुरुवात केली होती. तिथेच चिखलात फतकल मारुन तो लहान मुलासारखा रडत होता. त्याला कसंबसं शांत केलं. एकूणातच दरी शोधण्याच्या नादात आम्ही बरेच उजवीकडं आलो होतो. मग परत उलटीकडं निघालो. आत्तापावतो रात्रीचे ८:३०-९:०० वाजले असावेत. परत भूकही लागायला लागली होती. चालताचालता बॅटरीच्या प्रकाशात खाली काहीतरी चमकल्यासारखं वाटलं. थांबून पाहिलं तर अमल्याच्या 'गोल्ड-फ्लेक'चं पाकीट चमकत होतं. ओरडून सगळ्याना सांगितलं. ह्या पाकिटावरुन आम्ही योग्य रस्त्याशी आलो आहोत असा निष्कर्ष संत्यानं काढला आणि फर्मान सोडलं, "अब उजवीकडे वळो...हम बरोबर रस्तेपर आये है| " मार्चिंग पार्टी उजवीकडे वळली.थोड्याच वेळात पायांना उतार जाणवायला लागला. संत्या झाडांच्या खोडांवर बॅटरीचा झोत मारुन खडूच्या खुणा शोधत होता, पण दुपारच्या पावसानं सगळ्याचा बट्ट्याबोळ केला होता. तसेच साशंक मनानं पुढं जात राहिलो, एका खडकापाशी अजुन एक सिगारेटचं पाकिट चमकलं. तिथं जाऊन पाहिलं तर खाल्लेल्या केळ्यांच्या साली, बिस्किटांच्या पुड्याच्या कागदाचं कम्मोनं केलेलं घर, आम्ही सिगरेटच्या थोटकांची मातीत भाल्यासारखी रोऊन काढलेली रांगोळी...सगळ्या ओळखीच्या खुणा पटल्या....डोक्यावरुन मणामणाचं ओझं उतरवल्यासारखं वाटलं बॉ! आनंदाने बराच वेळ आम्ही आरोळ्या ठोकत बसलो. पोटातल्या भुकेनं लवकर मुक्कामी पोचण्याची जाणिव करुन दिल्यावर पुढे निघालो.
रस्ता सापडल्याने हरवलेला उत्साह परत द्विगुणित होऊन आला होता..पाय झपाझप पडत होते. करता करता, जंगल जवळपास पार झालं. मोकळ्या पठारावर पोचलो. आता इथुन पठार ओलांडून पुढे झुडपांमधून डावीकडे वळून एक ५० पावलं चाललं की कोंडेश्वर मंदीर नजरेच्या टप्प्यात येणार ह्या विचाराने आम्ही जवळपास धावतच निघालो. आम्हाला कुठे माहित होतं की दुर्दैव अजुन संपलेलं नाही....पठार ओलांडून गेल्यावर प्रत्येक झुडपात शिरायचा प्रयत्न केला पण थोडं पुढं गेलं की समोर निवडूंग दिसायचा....बाहेरची वाट सापडायलाच तयार नाही. चकरा मारुन मारुन पायाचे तुकडे पडायची वेळ आली. आता सगळ्यांचाच धीर खचत चालला होता..जीवाच्या भितीनं कम्मो सतत मांजराच्या पिलासारखा कोणाच्या ना कोणाच्या पायात पायात करत होता, मी सुन्नपणे एकाजागी बसुन राहिलो होतो, पॅरी आणि अमल्या अजुनही वाट शोधत होते आणि धीर सुटून संत्या आकाशाकडं तोंड करुन हातवारे करत शिव्या द्यायला लागला. सगळे पळतच त्याच्याकडे गेलो, त्याला शांत केला, पण भयानक चिडला होता तो. अमल्यानं नसत्या शंका घ्यायला सुरुवात केली, "साला चकवा लागला यार आपल्याला, संत्याला भुतानं धरलंय बहुतेक..इ.इ." कम्मो गळा काढून रडायला लागला. मी सरळ अंगावरचं जर्किन काढून उशाला घेऊन गवतात पडलो आणि म्हणालो, "साला होईल ते होईल. वाट सापडली तर मला सांगा, नाहीतर आजची रात्र मी इथंच झोपतो. आज नशिबात मरण असेल तर कुठेही असलो तरी ते येइलच..आणि नसलं तर काहीही होणर नाही."
कमल्याचं रडणं आणि संत्याच्या शिव्या ऐकून लाबून दोन बॅटर्या चमकायला लागल्या...आम्ही सगळेच धडपडत उभे राहिलो. सगळ्यांच्यात वजनाने मी कमी आणि उंचीला अमल्या जास्त, म्हणून त्याच्या खांद्यावर चढून हातातल्या बॅटरीनं त्या दोन झोतांच्या दिशेनं इशारे करायला लागलो. कधी चालू-बंद करुन तर कधी वेडेवाकडे झोत टाकून 'एस. ओ. एस.' चा प्रयत्न करायला लागलो. शेवटी त्याला यश आलं. एकमेकांच्या बॅटर्यांच्या झोतांच्या आधाराने दोघंजण मंदीराच्या दिशेनं आमच्याकडे चालत आले. night trek वाले होते ते. ढाकचे रेग्युलर मेंबरं :) त्यांच्यासोबतच मंदीरापर्यंत गेलो. तिथुन जांबोलीत पोचणं काही अवघड नव्हतं..१५मिनिटांत पारापाशी पोचलो.
रात्रीचे जवळपास १२ वाजत आले होते. वाड्या-वस्त्यांवर असतं तसंच गप्गार वातावरण होतं. दार ठोठाऊन आमच्या बाकीच्या सॅक्स परत घेतल्या. पाराजवळच ३ दगडांची चूल मांडली. लाकडं गोळा करुन आणली खरी, पण पावसानं सगळीच ओली झालेली...मग काय नुसताच धूर, आगीच्या नावानं शंख! वाळलेली लाकडं शोधताना अचानक कॉलेजातलाच एक मित्र दिसला. तोही 'नाईट ट्रेकला' आला होता. त्याला म्हणलं, "यार काही रॉकेल वगैरे आहे का?" उत्तर मिळालं, "रम चालेल?" म्हणलं दे!
एक पेगभर मिलेट्री रम त्या चुलीत ओतल्यावर लाकडं रसरसुन पेटली. ह्यानंतर कांदा कापून द्यायचं महत्कार्य पार पाडल्यावर अस्मादिकांनी ताणून दिली. बाकीचे बसले खिचडी करत ;)
खिचडी खाऊन वर चहा पिऊन जी काही ताणून दिली, बस पुछो मत! अंगाखाली गादी नाहीय्ये, डोक्याखाली उशी नाहीय्ये, अंगातले एकूणएक कपडे अजुनही ओले आहेत, गारवा चांगलाच झोंबतोय.....कशाचा म्हणून अडथळा आला नाही! झोप म्हणजे झोप...त्यात हयगय नाही. सकाळी ६ वाजता बस सुटताना कंडक्टरनेच आम्हाला उठवलं. ५ मिनिटांत आवरुन बसमध्ये बसलो. तिथून परत तळेगाव...लोकल पकडून परत पुण्यात आलो.
घरी पोहोचलो तर ५ मिनिटं मला कोणी आत घ्यायलाच तयार नाही... पॅन्टवर शेवाळं लागलेलं, ओल्या कपड्यांच्या कुबट वास, हाता-तोंडाला अजुनही कुठेकुठे माती राहिलेली, चेहर्यावर प्रचंड थकवा.....
पण डोळ्यात समाधान होतं, काहीतरी आव्हान पेलून ते पुर्ण केल्याचं. थकलेल्या चेहर्यावर लढाई जिंकुन आलेल्या मावळ्यासारखा गर्व होता, आणि जिवंत परत आलो ह्या समाधानामुळे डोळ्यात पाणीही
-----------------------------------------------------------------------------------------------------
समाप्त.
प्रतिक्रिया
26 May 2008 - 3:55 pm | विजुभाऊ
दॅट्स लाईक धमु स्टाईल. रे........
अगदी आपण सोबत आहोत असे वाटले वाचताना.....
झकास व्यंकटेश माडगुळकरचे आणि माणसांचा दिवस सुरु झाला आठवले
26 May 2008 - 3:58 pm | आनंदयात्री
च्यामारी काय काय दिव्य केलित रे भो ! लै भारी !
संत्या लटकला तेव्हा खतरनाक भिती वाटली असेल नै.
आमचा एक ओळखीचा असाच आमच्या मराठवाड्यातल्या म्हैसमाळच्या डोंगरावरच्या दरीत कोसळुन गेला होता, पोरासोरांच्या हाती रडणे सोडुन काही लागलेच नव्हते, पोलिसांना पण बॉडी २ दिवसांनी मिळाली होती. :( . थँक गॉड फॉर संत्या.
26 May 2008 - 4:08 pm | अनिल हटेला
वाह राजे !!!!
26 May 2008 - 4:11 pm | राजे (not verified)
वा ! वा !
धमु... तु व तुझे मित्र तर सेम आहात रे :) पुढील वेळी आम्हाला ही बोलवा !
बाकी रिस्क मोठीच घेतली होती तुम्ही लोकांनी !
लेखन देखील मस्त झाले आहे !
राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
26 May 2008 - 4:16 pm | ऋचा
जब्राट रे!!!!
=D>
लै डेरींग केला भौ तुमी
पण अस वाटलं की मी पण आहे तिथे खुप छन लिहीलं आहेस.
एकदम झक्कास!!!
26 May 2008 - 4:21 pm | मनस्वी
ढाक्या.. काय मस्त दिसत असेल रे ते दृश्य!
ही हा हा.. अमल्याने सहीच टाकला!
वा वा
रात्री १२-१ वाजता खिचडी खायला अन् चहा प्यायला काय मज्जा आली असेल!
उतरतानाचा प्रवास लयीच थ्रिलींग.. ढाक्या मस्तच अनुभव.. खूपच आवडला आणि ३ भाग ते पण लवकर टाकण्यात यश आल्याबद्दल अभिनंदन!
मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
26 May 2008 - 4:31 pm | ऋचा
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
सही वाक्य!!!
26 May 2008 - 4:34 pm | मनस्वी
कौतुक माझे नाही तर महागुरुंचे करा!
:)
मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
26 May 2008 - 4:49 pm | चेतन
तुफान लिहलयं रावं!
"गुमनाम है कोई...बदनाम है कोई..." आधीच जंगल, त्यात अंधार, त्यात टरकलेली ! हे लेकाचं सरळपणानं कधी काही करतच नाही
सही रे (बरी गाणि सुचतात अशावेळी)
"ए...मी नाय काय केलं हां...हे कमळ्या आपोआपच सांडतंय सारखं"
मस्तचं भाउ मित्रांमधली खास पुणेरी प्रतिक्रीया
पण डोळ्यात समाधान होतं, काहीतरी आव्हान पेलून ते पुर्ण केल्याचं. थकलेल्या चेहर्यावर लढाई जिंकुन आलेल्या मावळ्यासारखा गर्व होता, आणि जिवंत परत आलो ह्या समाधानामुळे डोळ्यात पाणीही
भडकमकर क्लास लावलेस वाटतं =))
ट्रेक मात्र सही... होता आणि लिहलायसंपण मस्तं आवडला
(ट्रेकप्रेमी) शेर्पा चेतन (अगदी तात्यांच्य इश्टाईलमध्ये)
26 May 2008 - 4:56 pm | मनिष
बोले तो.....एकदम सिग्नेचर!!! :)
26 May 2008 - 4:58 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भलामोठा काळपट ढग सुर्याला आपल्या मागं दडवण्याचा प्रयत्न करत होता.
झाकोळून आलेलं आसमंत, एकाच ढगाच्या रुपेरी कडा, आणि हिरव्यागार दरीतल्या पोपटी भासणार्या भात-खाचरांचा ऊन्हाने न्हाऊन बदललेला सोनेरी अवतार. ऊन्हाच्या काही चुकार तिरिपी इकडे तिकडे सांडलेल्या, नुकत्याच स्वच्छ धुवुन काढलेल्या हिरव्या-पोपटी पानांवरती रेंगाळलेले टपोरे थेंब चमकवत ह्या सगळ्या निसर्ग-खेळाची शोभा वाढवत होत्या.
हळुहळु हा सोनेरी-रुपेरी रंग कधी तांबूस होत गेला आणि त्यात अंधाराचं काजळ कधी मिसळत गेलं हे कळलंच नाही.
अंधारानं चांगलेच हातपाय पसरलेले.
सावल्या आणि उंच गवताने निर्माण केलेला दिशाभ्रम
ढाक बहिरीतल्या वरील शब्दरचनांनी आम्हाला भुरळ घातली आणि आपला प्रवास आम्ही अनुभवत गेलो.
अमल्याचं "गुमनाम है कोई...बदनाम है कोई..." वातावरणातील गूढता वाढवते. संत्याचं लटकणे, परतीचा मार्ग सापडत नसल्यामुळे निर्माण झालेली अस्वस्थता.
आणि लढाई जिंकलेल्या मावळ्याचा चेहरा तरळून गेला.
अप्रतिम वर्णनाचे अनुभव लेखन आवडले.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
26 May 2008 - 4:59 pm | स्वाती दिनेश
हुश्श..आलात बाबा सुखरुप एकदाचे परत, अगदी थरारक प्रवास!
सृष्टीचेटूक शब्द आवडला.
स्वाती
26 May 2008 - 5:01 pm | ऍडीजोशी (not verified)
शाब्बास मेरे बब्बर शेर :)
आपला,
ऍडी जोशी
ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/
26 May 2008 - 5:21 pm | शैलेन्द्र
मस्तच रे.... हाच अनुभव एकदा आजोबाच्या डोंगरात घेतला होता...
26 May 2008 - 5:33 pm | शरुबाबा
साला चकवा लागला यार आपल्याला,
एकदा असाच अनुभव घेतलेला
शरुबाबा
27 May 2008 - 1:29 pm | सुमीत
शरुबाबा, तुमचा चकव्याचा अनुभव इथे लिहाल का?
26 May 2008 - 5:35 pm | निरंजन मालशे
अरे सही यार पुढल्यावेळी मला ही विचार या गोंधळाचा भाग व्हायला आवडेल.
26 May 2008 - 6:51 pm | प्रमोद देव
धमु मस्तच लिहिले आहेस. तिन्ही भाग वाचले. अतिशय सुंदर शब्दात केलेले वर्णन चित्रमय झालेय. डोळ्यासमोर जीवंत चित्र उभे करण्याचे सामर्थ्य तुझ्या शब्दात आहे.
शेवटचा भाग तर अगदी खासच आहे. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारे आणि रोम रोम फुलवणारे वर्णन ... खरे तर वर्णन कसले ते, तुझ्या बरोबर सहप्रवासी आहोत असे वाटण्याइतपत ... त्रिमिती चित्रपटासारखे, साक्षात अंगावर येणारा अनुभव.
जाऊ दे ! खरे तर नि:शब्द झालोय!
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
27 May 2008 - 1:02 pm | सुमीत
धमाल्या, अरे अक्षरक्षः जगलो तुझा अनुभव. लिहिले तर छान आहेसच पण तुमचा अनुभव्......जबराच यार.
27 May 2008 - 1:35 pm | प्रभाकर पेठकर
चित्तथरारक अनुभव कथन. अगदी आपणही त्या कंपूचेच एक (घाबरलेले) सदस्य आहोत ही भावना अगदी शेवट पर्यंत साथ करीत होती.
जबरदस्त. अभिनंदन.
27 May 2008 - 2:55 pm | धमाल मुलगा
धन्यवाद मंडळी...
माझं हे वेडंवाकडं काहीबाही लिहिलेलं गोड मानून घेतलंत, कौतुक केलंत, आवडलंही तुम्हाला...बस्स, आणखी काय हवं आपल्याला?
शरुबाबा, चकव्याचा किस्सा आम्हालापण सांग ना :)
बास...बास....बास......
साक्षात गुरुदेवांनी ही अशी पावती द्यावी ह्याहुन मोठं काय बक्षीस असावं आमच्यासाठी? ह्याचसाठी केला होता अट्टाहास...लेखाचा शेवट गोड व्हावा :)
गुरुदेव, आमचा हा अनुभव तुमच्या चरणि अर्पण !!!!
27 May 2008 - 4:34 pm | वळू
बहिरी काय आहे ते ऐकून व्हतोच.... आता तुज्या लेखातून तिथे जाऊन पन आलो !
लई भारी
27 May 2008 - 5:55 pm | शितल
मस्त रे धमाल्या, अरे वाचताना पुढे काय असा विचार सतत मनात येतो.
सही, एकदम जबरान अनुभव आहे तुझ्या पाठीशी.
आणि तु ते शब्दात ही छान मा॑डलेस, तुला शब्बाशी.
27 May 2008 - 6:39 pm | वरदा
एकदम सह्ही मी ह्या विकांताला छोट्याश्या ट्रेक ला जाउन आले तर रविवारचा अख्खा सोमवार दमलेय म्हणून बसले होते..कसं केलत रे एवढं तुम्ही मानलं बॉ तुम्हाला...
लिहिलयस खूप मस्त असं वाटलं आम्ही पण चालतोय एक बॅटरी घेऊन तुमच्या बरोबर.....
27 May 2008 - 9:00 pm | चतुरंग
इतक्या ओघवत्या भाषेत ट्रेक लिहिलयस की बस!
प्रकाशचित्रे चुकल्याची रुखरुख वाट्ली पण तुझ्या वर्णनाने काही अंशी तरी सूर्यास्त डोळ्यांसमोर उभा केला!
एकदम मस्त.
(स्वगत - ह्याच्या वर्णनातली काही वाक्यं खात्रीच देतात की अजूनही हा धमाल्या सु.शि. ची पारायणे करत असणार! ;) )
चतुरंग
27 May 2008 - 9:55 pm | सुधीर कांदळकर
तो चित्रपट पाहिल्यासारखे वाटले.
वाचतांनाच जी एफ झाली. तुझ्य निधड्या छातीला व रसाळ ओघवत्या वर्णनाला त्रिवार वंदन.
आम्ही आयुष्यात एवढे साहस केले नाही. तरी संत्या व कमळ्या तुमच्याबरोबर कसे हे कोडेच आहे.
पण पुढला ट्रेक जरा ऑर्गनाइज्ड असू देत. पोटोबाची आबाळ करू नका.
तरी एक प्रश्न राहिलाच. शिध्यातील ब्रँड कोणता होता?
सुधीर कांदळकर.
27 May 2008 - 10:08 pm | पक्या
धमाल्या , जियो मेरे यार. एकदम थरारक अनुभव. धाडसी ट्रेक केला तुम्ही राव.
आणि लेखाबद्द्ल तर काय लिहावे? अप्रतिम. डोळ्यासमोर प्रत्येक प्रसंग उभा राहतोय. प्रत्यक्षात जो अनुभव जगलास तो हुबेहुब लेखात उतरवलास. अनुभव जबरा असला तरी कथा रंगवून सांगायची हातोटी सगळ्यांकडेच असते असे नाही. तू तर ते काम ही झकास केलंस.
आणि ते ढग आणि सुर्याचे वर्णन ... वा वा क्या बात है ! खल्लास.
-- पक्या
27 May 2008 - 10:43 pm | ईश्वरी
फारच छान लिहीलंत. तुमचा पूर्ण प्रवास डोळयासमोर उभा राहिला. लेख आवडला.
ट्रेक चा अनुभव पण एकदम जबरदस्त. चढताना , उतरताना ..दोन्ही प्रवास थरारक.
ईश्वरी
28 May 2008 - 8:43 am | छोटा डॉन
धमाल्या जबरा अनुभव आहे बाबा तुझा. आमालाबी असं दर्याखोर्यातुन भटाकायला एके काळी लै आवडायचं पण "एक प्रकरण" लै महागत पडल्याने आम्ही कानाला खडा लावला ...
हे सर्व वाचायला मजा येते पण हे सर्व अनुभवताना किती लागते व किती नशा चढते ते फक्त करणारे जाणतात ...
असो. तुझ्या नजरेने माझी पण "ढाकचा बहिरी" ची सफर पुर्ण झाली ...
सुर्यास्ताचे वर्णन केवळ "झ...का...स !!!"
मस्त वातते रे दिवसभर पायपीट केल्यावर एखाद्या खोपच्यात पार आडवे पडून सुर्यास्त बघण्यात. फोटॉ नाही टाकलास, पण त्यात तुझी चुक नाही, ती वेळच अशी असते की कशाकशाचे भान रहात नाही मग फोटो काढणे तर दुरच ....
जेवढे आपल्या चिमुकल्या डोळ्याने बघता येते तेवढे नजरेत साठवुन घ्यायचे, फोटो वगैरे सर्व फॉर्मालिटी झाल्या ...
बाकी तुमची टीम झकास होती . बहुतेक सर्व "गँग" मध्ये तु वर्णन केलेल्या व्यक्ती सापडतातच ....
त्याशिवाय मज्जा पण येत नाही म्हणा ...
"कॅम्प फायर" केल्याशिवाय ह्या व्रताची सांगता होत नाही, मस्त "शेकोटी" पेटवायची मग त्या उबेत व प्रकाशात गाणी म्हणा, गप्पा ठोका किंवा इतर काही "असात्विक कार्यक्रम" केल्याशिवाय "ट्रेकिंग" पुर्ण होते असे मी मानत नाही ...
ट्रेक ऑर्गनाईज असणे वगैरे मी मानत नाही, त्यात मजा नाहीच !!!
मस्त .... अजुन असतील तर टाक [ आम्ही आपलं सगळ्यात शेवटी प्रतिक्रीया देतोच ...]
अवांतर : सवडीने आम्ही पण "आमच्या माथेरान डोंगराच्या चढणीची कथा" टाकूच ...
अतिअवांतर : च्यायला अपली एक अशी मस्त गँग काढून कुठेतरी जायला पाहिजे. लै धमाल येईल ...
विजूभाऊम्च्या डोक्यात आहेत थोडे प्लॅन, बघू काय होतेय ते !!!
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
3 Jun 2008 - 12:52 pm | धमाल मुलगा
धन्यवाद चतुरंगराव, सुधीरकाका, ईश्वरी, शितल, वरदा, वळु, पक्या, डानराव !!!
चतुरंगराव,
खर्रं की काय? कुठली वाक्य हो? सांगा ना, सांगा ना! आमच्या सु.शि. ची छाप आहे म्हणता ह्यातल्या वाक्यांवर? लै भारी!
कित्ती वर्षं झाली बरं सु.शि. वाचायलाच नाही मिळाला :( परत एकदा पुस्तकांचं कपाट उचकायला हवं बॉ!
सुधीरकाका,
आमचा एक नियम आहे. कोणत्याही गड-किल्ल्यावर जाताना / खुद्द तिथे दारु नेणे / पिणे नाही. ह्यामागे २ कारणे आहेत. एक म्हणजे भावनिक...महाराजांच्या गडा-किल्ल्यांवर सह्याद्रीच्या कुशीत कित्येक मावळ्यांनी जीवाची कुरवंडी केली राखणीपायी..तिथे जाऊन दारु प्यायची? थुत् तिच्यामायला त्या पिण्यार्यांच्या!
दुसरं कारण म्हणजे दारु पिऊन झिंगल्यावर तोल सांभाळणे अवघड होऊन बसल्यावर नसते जीवाचे खेळ होऊन बसतात्..ते टाळण्यासाठी! :)
संत्या आणि कमळ्या खरंच आमच्या कंपूत मिसाळलेच कसे हे कोडं अजुनही सुटलेलं नाही. पण बरं होतं ते होते ते...आमच्या आचरटपणाला थोडासा शहाणपणाचा लगाम घालायचे बिचारे :)
डान्या...
लेका नुसतेच संदर्भ काय देतोस? लिही की मेल्या...'ते प्रकरण' वर काहीतरी!
- (ढाक्या) ध मा ल.
3 Jun 2008 - 8:31 pm | झकासराव
हा भाग वाचायचा राहुनच गेला होता बघ.
जबरदस्त लिहिल आहेस रे.
सुर्यास्ताच वर्णन खल्लास.
कित्येक वाक्य वाचुन गडबडा लोळेपर्यंत हसलो रे. :)
तुझी लिखाणाची शैली छान आहे रे.
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
4 Jun 2008 - 12:02 am | विसोबा खेचर
हा भाग वाचायचा राहुनच गेला होता बघ.
जबरदस्त लिहिल आहेस रे.
हेच म्हणतो...!
धमाल्या अजूनही असेच जोरदार अनुभवकथण येऊ दे रे..
तात्या.
7 Jun 2008 - 11:17 pm | अभिज्ञ
प्रतिक्रिया देण्य़ास उशीर झाल्या बद्दल दिलगिर आहोत.
धमाल राव आपला लेख वाचून धमाल आली.जबरदस्त लिहिले आहेस.
सुंदर लेखन.अभिनंदन.
बाकी आपल्या फ़ोटोग्राफ़सवरून जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
विशेषत: कोंडेश्वराचे मंदिर पाहून.........
आपल्यासारखाच ढाक बहिरी ट्रेक करायला आम्ही काही पोरे पोरे ९५च्या उन्हाळ्य़ात गेलो होतो.
नुसताच ढाक नको म्हणून राजमाची-ढाक असे करायचे ठरले.
पहिल्या रात्री लोणावळ्यातून सुरुवात करुन पहाटे राजमाचीला पोहोचलो.
तिथे एक दिवस मुक्काम करून दुस-या दिवशी दुपारी ढाक कडे प्रयाण केले.त्यातच आमच्यात २-३ नवखे होते
त्यांना हे काही झेपेल असे वाटले नाही.त्यांनी राजमाचीवरुनच परतीची वाट पकडलि.
राहीलो आम्ही ४ जणच. रमतगमत वाटचाल करत,वाट शोधत,चुकामुक वगैरे सर्व होऊन कोंडेश्वराच्या मंदिरात पोहोचयला बराच उशीर म्हणजे साधारण संध्याकाळचे सात वाजले
असावेत. ब-यापैकी अंधार पडला होता.मंदिरात पोहोचता पोहोचता वाटेत संघाच्या मुलांचा एक ग्रुप भेटला.
त्यातल्या दोघा तिघांनी इथे एक वाघ फ़िरतोय,कालच रात्री इथे एक गाय मारलीय ,तुम्ही चोघेच आहात,तेंव्हा काळजी घ्या वगैरे सांगून
आमची पार तंतरून टाकली.आता वाघ वगैरे फ़िरतोय म्हंटल्यावर आम्ही सर्वचजण जाम हादरलो होतो.
बरोबर कांदा कापायची सुरी सोडली तर एकहि हत्यार नव्हते.हि संघाची पोरे तर मस्त पैकी छ-याची बंदूक घेउन फ़िरत होते.
आता काय करायचे अशाच विवंचनेत सर्व मंडळि होती.
कोंडेश्वराच्या मंदिरातच स्वयंपाक उरकून जेवणॆ करून घेतली.मंदिराला तेंव्हा दार वगैरे नव्हते.त्यामूळॆ गाभा-यात झोपायचे ठरले.
आत जाउन बघितले तर गाभा-यालाही दरवाजा नाही.एक मोठा पत्रा लावून गाभारा बंद करायचि सोय.
तोच पत्रा कसाबसा आतून उभा केला.त्याला आधाराला आमच्या सैक लावल्या.
दिवसभर भटकल्यामुळे सगळॆच जण दमले होते.तरी पण प्रसंगाचे गांभीर्य ओळखून आळीपाळीने जागायचे ठरवले.
प्रत्येकी ३ तास जागायचे ठरले.एकाला आधीच ताप चढला होता,त्याने हे जागणॆ वगैरे आपल्याला जमणार नाही म्हणून हात वरती केले.
त्यामुळे राहीलो आम्हि ३ जणच.माझी जागायची वेळ रात्री १२ ते ३ अशी ठरली.मी ३ वाजता दुस-याला उठवायचे आणी बाकी त्याने सांभाळायचे ठरले.
त्याप्रमाणे आमची निजानीज झाली.
आमचा पहीला जागणारा चाप्टर निघाला.त्याने १०.३० वाजताच मला उठवून बारा वाजले आता तुझी पाळि म्हणुन स्वत: झोपी गेला.
मी पण आपला उठून पहारा देत बसलो.बर गाभा-यात तर गुडूप अंधार.एक वातीचा दिवा जळत ठेवला होता.
खुद्द गाभा-यातच झोपलो होतो त्यामूळॆ सिगारेट वगैरे प्यायची काहि हिंमत झाली नाही.बाहेरून चित्रविचित्र आवाज येत होते.
उगाच नसते भास होत होते.माझी तर पार तंतरून गेली होती. कशीबशी ३ वाजायची वाट पहात बसलो.आता वाजतील,मग वाजतील
करत अंदाजे ३ एक तासाने पुढच्याला उठवायला गेलो.त्याने हातातले घड्याळ पाहून मला सांगितले कि आताशी १ वाजतोय.मी ३ वाजल्याशिवाय उठणार नाही.
मी पहिल्यावर चडफ़डत परत ३ वाजायची वाट पहात बसलो.३ वाजता त्याला उठवायला गेलो तर भाई मुडद्यासारखा झोपला होता.अजिबात दाद देइना.
आताशा मलाही झोप अनावर होत होती,बसल्या बसल्या तशीच झोप लागली.पहाटे ६ च्या आसपास गावक-यांच्या आवाजाने जाग आली.
बाहेर ब-यापैकी उजाडले होते.बाहेर येउन पहिले गावक-यांकडे चौकशी केली.तेंव्हा तिथे वाघ वगैरे असला काही प्रकार नाही कळाले.
आपला जाम पोपट झाला हे पाहून फ़ार चिडचिड झाली.लगिच आत येउन ह्या बाकीच्यांना लाथा घालुन उठवले.
रात्रभर झोप नाही.आधिच २ दिवसाचे कष्ट.पाहून ढाकची भैरी रद्द करायचा निर्णय घेतला.काय सांगा ढाक करून परत येता येता संध्याकाळ व्हायची
आणि परत इथे मुक्काम करायला लागायचा.
तसेच तिकडुन जांबोरीला जाउन ST ने तळॆगांव व तिथून लोकलने घर गाठले.
त्यांनंतर ढाक भैरी करायचा योग परत काही आला नाही.या आधी २ वेळा तिथे गेलो होतो.परंतु चतुरंग हयांनी म्हंटल्या प्रमाणॆ
कडा चढताना 'पोटात गोळा येणे', 'आईचे दूध आठवणे' असे वाक्प्र्चार प्रत्यक्ष अनुभवता येतात आणि वरुन खाली उतरताना तर 'तोंडाला कोरड पडणे', 'जिवाचा थरकाप होणे' अशांची दोस्ती होते! ह्याच्याशी १००% सहमत.
आम्ही पायथ्यापर्यंत पोहोचलो खरे पण थोडेसे स्थूल असल्यामुळॆ गुहेत प्रवेश करताना जाम लागली होती.तो प्रकार काही जमला नाही.
त्या गुहेत नक्की काय आहे हे आज आपले फ़ोटो पाहून कळाले.
अभिज्ञ .