ढाकचा बहिरी - एक अनुभव (भाग २)

धमाल मुलगा's picture
धमाल मुलगा in जनातलं, मनातलं
23 May 2008 - 6:19 pm

...कारण ओढ लागली होती ती डोंगरमाथ्यावर जायची.
जरुरीपुरतं सामान (पाण्याच्या बाटल्या, केळी, ग्लुकोज बिस्किटं, बॅटर्‍या, सुरे-कुकर्‍या, कांदा, कम्मोने आणलेल्या दुधी-भोपळ्याच्या गोड पुर्‍या इ.इ.) काही सॅक्समध्ये घेऊन आम्ही चढाईला निघालो.....

जांबोलीच्या पारापासून निघालेला रस्ता सरळ जंगलाकडे जातो. त्याच रस्त्याने चालत पुढे निघालं की श्री कोंडेश्वर मंदीर लागते. ह्या मंदीरापासून पुढे खरा ट्रेक चालू होतो.


कोंडेश्वराचं दर्शन घेऊन आम्ही पुढच्या वाटचालीला सुरुवात केली. मंदीरापासून साधारणतः अर्धा एक कि.मी. चालल्यावर एक उजवीकडे जाणारे वळण येते. ह्या वळणापासून जंगल सुरु होतं. जसं हे वळण पार केलं तसा आमच्या उत्साहाचा धबधबा जोरात कोसळायला लागला. वरुन उन्हाचा तडाखा चालू होताच, पण फिकीर कोणाला होती? आम्ही पाच मस्तमौला आमच्याच मस्तीत चाललो होतो. कुठे फोटोच काढ, गाणीच म्हण असा दंगा घालत पुढे पुढे जात होतो. वाटेत एक कुंड लागलं, झालं...अचानक सगळ्यांना फारच उन असल्याची जाणिव व्हायला लागली. मग काय, पटापट कपडे काढून धडाधड उड्या मारल्या कुंडात. मस्त खेळलो पाण्यात अर्धा तास. तोपर्यंत कम्मो बसला आमचे कपडे सांभाळत काठावर.
पोहुन झाल्यावर वेळेचं भान आलं, मग इमाने इतबारे चढाई करायचं ठरलं. जसं जसं जंगल दाट व्हायला लागलं तसं उन्हाचा कडाका जाणवेनासा झाला. आम्ही सगळे मजेत चाललो होतो, आणि संत्या एकदम शिस्तीत झाडांच्या बुंध्यांवर, मोठ्या दगडांवर खडूनं खुणा करत येत होता. एक नंबरचं पर्फेक्शनीस्ट लेकाचं. आमच्या टाळक्यात आलं नसतं हे.

वाटेत थांबून केळी खा, सिगारेटी फुंक असा सुखनैव प्रवास चालू होता. चढाईच्या डाव्या हाताला दरी ठेऊन पायवाट नागमोडी वळणं घेत झाडा-झुड्पात लपलेली होती. भन्नाट रानवारा आम्हा खोंडांच्या कानात शिरुन आम्ही नुसते उधळलो होतो.
मजल दरमजल करत कसेबसे निम्मंशिम्मं जंगल पार केलं असेल नसेल, तेव्हढ्यात अचानक वरुणदेवाला काय हुक्की आली कोण जाणे. जो रपारप पाऊस कोसळायला लागला, आडोसा शोधता शोधता नाकी नऊ आले. अजुन तर ढाकची घळही नजरेच्या टप्प्यात आली नव्हती, बहिरीचा कडा लांबचीच गोष्ट.

बराच वेळ वाट पाहिली, पण वरुणदेवाला काही दया यायची लक्षणं दिसेनात. घड्याळात पाहिलं तर काटे दुपारचे तीन वाजले आहेत असं सांगत वाकुल्या दाखवत होते. म्हणलं, "लेको तसेही आपण पुरते भिजलेलोच आहोत. आणखी काय वेगळे भिजणार आहोत? त्यापेक्षा हाही अनुभव घेऊ, मस्त पावसात पुढे निघुया."
पॅरी चेकाळला.. "हां यार, चलो चलते है। होर किन्नी देर इथ्थेही बैठे रहेंगे? चलो, छेत्ती करियो"
हो नाही करता करता आम्ही पुढे निघालो. सकाळी घरातून निघताना जे काही खाल्लं होतं त्यानंतर पोटात चार-दोन केळ्यांखेरीज काहीच नव्हतं. वरुन पाऊस झोडपत होता, जोडीला रानवारा घूं..घूं.. करत चेकाळून उठला होता. अंगावर शहारे म्हणजे चांगले मोहरीएव्हढे उभे राहिले होते. आणि उपाशीपोटी आतून भुकेचा आगडोंब उसळला होता. बाहेरुन मरणाचा गारठा, आणि पोटातून आग! अस्सलं काहीतरी विचित्र समिकरण झालं होतं की बास!

शेवटी भुकेपुढे हार मानुन आम्ही एका कपारीचा आडोसा घेतला.एव्हढीश्शी कपार ती, आम्ही पाचजण...कसले मावतोय त्यात डोंबल? कसंबसं डोकं भिजणार नाही असं वेडेवाकडे बसलो तिथेच. सॅक्स उघडल्या.आमचा कम्मो लगेच मोजणीला लागला. तोवर आम्ही अर्धभिजल्या बिड्या ओढायला सुरुवात केली. तेव्हढंच जीवाला समाधान :)

कम्मोनं जाहीर केलं "भाईलोक्स, आपली मस्त लागलेली आहे. मी आणलेल्या पुर्‍या, ग्लुको बिस्किटांचा दिड पुडा ७-८ केळी आणि ४-५ कांदे एव्हढंच खाण्यालायक सामान आहे. आणलेला शिधा आपण खालीच गावात ठेऊन आलोय."
हातातल्या बिड्या कधी गळून पडल्या हेच कळालं नाही. पण काय करता, भूक तर वेड्यासारखी लागली होती. आलीया भोगासी असावे सादर म्हणून जे आहे ते पोटात ढकलायला सुरुवात केली.
म्हाराजा, कधी दुधीभोपळ्याच्या गोड पुर्‍या कच्च्या कांद्यासोबत खाल्यात का तुम्ही? आम्ही खाल्ल्या :( आणि केळ्यांबरोबर बिस्किटं...
कशीबशी भूक तर भागवली. तोपर्यंत पाऊसही बराच कमी झाला होता. एकदा भूक भागल्यावर लक्षात आलं की आपले कपडे ओलेचिंब झाले आहेत, अगदी जिन्स-जर्किन पासून ते अंर्तवस्त्रांपर्यंत एकजात सगळे !!! आणि तो ओलावा आणि गारवा वाहणार्‍या रानटी वार्‍यासोबत अंगाअंगात भयानकरित्या झिरपतोय. सगळे आपले कुडकुडत पुढे निघालो. जसं चालायला लागलो तशी जरा उब मिळायला लागली. करता करता ढाकच्या घळीशी येऊन पोचलो एकदाचे. दोन्ही बाजुंनी उंच कडा आणि मधून एकदम चिंचोळा रस्ता...भरीत भर म्हणून पाऊस पडून गेलेला..सगळं निसरडं झालेलं. ह्या घळीपर्यंत सगळा चढाचाच भाग, अन् घळीत मात्र एकदम उतार. पायातल्या बुटात अर्धा अर्धा लिटर साचलेलं पाणी, मणामणाची झालेली ओली जिन्स... पार फाफलली सगळी पोरं. जगदंबेचं नाव घेतलं आणि घळ उतरायला सुरुवात केली....
पडत- धडपडत, ठेचकाळत कसेबसे घळ उतरुन आलो.
ही पहा घळ :

घळ संपली आणि समोर पाहिलं, जेमतेम ४-५ फुट जागा असेल-नसेल सपाटीची, पुढे भस्सकन दरी ! जे डोळे पांढरे झाले, गोट्या पार कप्पाळात...कम्मो सगळ्यात शेवटी उतरत होता, तो उतारामुळे जवळजवळ धावतच खाली आला...आम्ही सगळे ओरडून त्याला सावरायला धावलो. त्याला पकडला आणि म्हणलं, "रांडेच्या, जरा पुढे बघ.." त्यानं ज...रा पुढे डोका सशाचं काळीज लागलं लुकलुकायला. ते बिचारं जे पाय थरथरवत मटकन खाली बसलं ते १० मिनिटं उठलंच नाही.
कमळ्यानं दिलेला हा पहिला झटका..पुढे फार त्रास झाला त्याच्या ह्या भित्रेपणाचा.

घळ उतरल्यावर उजवीकडे वळून दरी पुन्हा डाव्या हाताला ठेऊन चिंचोळ्या वाटेनं आमची ही वरात पुढे निघाली. पावसामुळं उन्हाचा तडाखाच काय, पण मागमुसही उरला नव्हता. ओल्या वातावरणामुळं कपडेही वाळत नव्हते. पिसाळलेला वारा नुसता भन्नाट वाहत होता. ते झोंबरं वारं तोंडावर झेलत कसंबसं आम्ही बहिरोबाच्या कड्याखालच्या गुहांपर्यंत पोचलो. जीवात जीव आला. ह्या गुहा एकदम ऐसपैस होत्या. सगळ्यांनी बुट, कपडे सगळं उतरवलं. अंगावर लज्जारक्षणापुरत्या छाट्या तेवढ्या शिल्लक ठेवल्या. काय करता, ओल्या कपड्यांपेक्षा झोंबरं वारं उघड्या अंगावर घेतलेलं परवडत होतं.
गुहेत बसल्याबसल्या बिड्या पेटवून जरा आराम केला. इथं बरीच उब होती. १५-२० मिनिटात बरीच तरतरी आली.
म्हणलं, "चला मंडळी, ४:३० वाजलेत, अजुन महत्वाचा टप्पा पार करायचाय. सॅक्स, कपडे सगळं तिथेच गुहेत ठेऊन पुढे निघालो. नाहीतरी कोण येणार होतं तिथं चोरी करायला?

ह्या गुहेपासुन पुढचा बहिरोबाच्या गुहेपर्यंतचा पल्ला खरा महत्वाचा. एक कडा साधारणतः ७०-८० अंशातला, अधेमधे काही निसर्गनिर्मित तर काही वर जाणार्‍यांनी केलेल्या खाचा, आधारापुरता एक दोर, आणि सोबतीला खालची भीषण दरी :)
अरे.....ह्याचसाठी केला होता अट्टाहास!!!! अशी अवस्था झाली हे बघून.

हे पहा:

मी, अमल्या आणि सरदार समोरचं आव्हान बघून चेकाळलो, तर कमळ्या परत मटकन खाली बसला. संत्याही, "येड्यांनो, कुठं वर जायचं? पावसानं सगळं निसरडं झालं असणार. रिस्क घ्यायला हरकत नाही, पण ती कॅल्क्युलेटेड पाहिजे रे.." वगैरे बडबडायला लागला.

आम्ही दोघांचा नूर ओळखला, आणि वाद नको म्हणून म्हणालो, "संत्या, कम्मोला वर नेण्यात पॉईन्ट नाही. असं कर, तू त्याला सांभाळ, आम्ही येतोच जाऊन."

संत्यानं परत एकदा पिरपीर केली, तीच कॅसेट वाजवून पाहिली, पण रामा शिवा गोविंदा!
इतकं सोसल्यानंतर, शेवटच्या क्षणी तेही लक्ष्याच्या इतक्या जवळ पोचल्यावर माघार घ्यायची आमची मुळीच तयारी नव्हती.

हर हर महादेव...............अशी सुरुवात करुन सरदारच्या वाहेगुरुंनाही आवाहन करुन आम्ही शेवटच्या टप्प्याला सुरुवात केली. चढण मोठी कठीणच. भल्याभल्यांची दमछाक करेल अशी. आम्हीतर बिचारे नवशिके. पार तोंडातून फेस यायची वेळ आली. पण माघार घेतली तर मर्दानगी ती कसली? असं म्हणून पुढे जात राहिलो.

चुकुन खाली नजर गेली, की दरी पाहून गरगरायला व्हायचं, मग एकमेकांच्या जवळ जवळ राहून चढायला लागलो...डोळे फिरले की एकानं दुसर्‍याला आधार द्यायचा, आणि बॅलन्स करायला तिसर्‍यानं टेकू लावायचा. कधी खाचेतून हात निसटायचा, कधी पायाखालचा दगड सुटून दरीत गडगडत जायचा...मिनिटभर नुसत्या हातावर सगळा भार टाकून लोंबकळत रहावं लागायचं. लगेच घरच्या सगळ्यांचे चेहरे नजरेसमोर फिरायला लागायचे, मनोमन आईबापाची माफी मागून पुढच्या जन्मी भेटू असं मनातल्या मनात म्हणायचो.

हे पहा :

बहिरोबाच्या झेंड्याचं दर्शन घडलं तेव्हा कुठे जीवात जीव आला. 'आता फार उरलं नाही' ह्या भावनेनेच उत्साह परत सळसळायला लागला.
झपाझप वर चढून गेलो. एकदाचे बहिरोबाच्या गुहेत पोहोचलो, आणि डोळ्यातून घळाघळा पाणी वहायला लागलं. तिथेच थकून फतकल मारुन बसलो. जरा श्वास जागेवर आल्यावर बहिरोबाचं दर्शन घेतलं.

काय नजारा दिसतो देवा ह्या ठिकाणाहून....उभं मावळखोरं डोलतं नजरेपुढं. मंत्रमुग्ध होऊन वेड्यासारखे कितीवेळ पहात राहिलो कोण जाणे?


आता खाली उतरायला हवं हे लक्षात आल्यावर "आयचा घो रे! संत्याचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं" असं एक पन्नास वेळा तरी म्हणून झालं असेल.

कसंबसं जीव मुठीत धरुन् उतरायला सुरुवात केली. चढणं सोपं एकवेळ, पण उतरणं? सगळ्या पितरांना मदतीसाठी खाली बोलावलं. धीर करुन मुंगीच्या पावलांनी जसे चढलो तसेच एकमेकाला आवरत सावरत एकदाचे खाली उतरलो....जीव वाचला म्हणून काय हल्लकल्लोळ केला :) संत्याला आणि कम्मोला मिठ्या काय मारल्या.
जरा वेळ गुहेत बसलो, अर्धं अर्धं केळ खालं. आणि थोडा आराम केला.

एव्हढ्यात पॅरी जोरात ओरडला..."ओय खोतियों...उथ्थे वेख्खो...सनसेट्ट! क्माल है यार...सिंपली अमेझिंग"...............

---------------------------------------------------------------------------
क्रमशः
(फोटो आंतरजालावरुन साभार.)

प्रवासअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

धमाल मुलगा's picture

23 May 2008 - 6:22 pm | धमाल मुलगा

मंडळी,
पुढचा भाग- 'परतीचा प्रवास' वेळेअभावी आत्ता नाही देता येत. माफ करा.
शक्य तितक्या लवकर पुढचा भाग लिहिनच. जरा विलम्ब झाला तरी राग धरु नये ही विनंती!

आपला,
ध मा ल.

प्रभाकर पेठकर's picture

23 May 2008 - 11:17 pm | प्रभाकर पेठकर

वर्णन आणि फोटो अफाट आहेत. मस्त लिहीले आहे असेच चालू दे.

पुढचा भाग- 'परतीचा प्रवास' वेळेअभावी आत्ता नाही देता येत. माफ करा.

अरे! एवढे अपराधी वाटण्यासारखे काय आहे? व्यवस्थित भाग पाडलेले आहेत. वर्णन लांबत चालले तरी पाल्हाळीक अजिबात नाही. मनाची पकड घेणारे आहे. 'क्रमशः' चा बाऊ नको. लिहीत राहा.

बेसनलाडू's picture

24 May 2008 - 9:16 am | बेसनलाडू

(सहमत)बेसनलाडू

स्वाती दिनेश's picture

23 May 2008 - 6:25 pm | स्वाती दिनेश

सुरेख वर्णन! दोन्ही भाग आत्ताच वाचले,पुढे तुम्ही लोकं कसे उतरलात? सूर्यास्त कसा वाटला? याची उत्सुकता आहे.
स्वाती

मदनबाण's picture

23 May 2008 - 6:30 pm | मदनबाण

दोन्ही भाग वाचले,,,मस्त लिहले आहे.....
पुढच्या भागाची वाट पाहतो आहे.....

मदनदा.....

ऋचा's picture

23 May 2008 - 6:33 pm | ऋचा

मस्त लिहील आहेस रे धम्या!!!

विजुभाऊ's picture

23 May 2008 - 6:40 pm | विजुभाऊ

मस्त लिहितोस की रे धमु.......एकदम बैठकीत फड रंगवुन सांगितलेस
बेष्ट.........

विदुषक's picture

23 May 2008 - 6:40 pm | विदुषक

वा !! क्या बात है ..........
झकास
मजेदार विदुषक

शरुबाबा's picture

23 May 2008 - 6:46 pm | शरुबाबा

दोन्ही भाग वाचले,,,मस्त लिहले आहे.....
पुढच्या भागाची वाट पाहतो आहे.....

आनंदयात्री's picture

23 May 2008 - 6:55 pm | आनंदयात्री

सिंपली अमेझिंग यार !
धम्या प्रचंड सुंदर लिहलं आहेस !!
पहिल्या भागापेक्षा सरस. च्चायला फोटो नसतांना पण सगळे चित्र डोळ्यासमोर उभे राहिले एकदम व्हिडीओच म्हण ना.
पहिल्यांदा सुरु झालेला प्रवास, उन, तुमची मस्ती, नंतर भिजलेले अंग चोरुन खोपच्यात बसलेले अन अर्धभिजल्या सिगारेटी फुंकणारे, कम्मो धावत आली तेव्हा टरकलेले, ध्येय गाठल्यावर गहिवरुन आलेला धम्या, उतरतांना अक्षरशः वाटणारी भिती .. सगळे सगळे आंखोके सामने ..
बॉस्स. लै लै मस्त लिहलस.

:) एक पार्टी तुला आपल्याकडुन :)

>>..."ओय खोतियों...उथ्थे वेख्खो...सनसेट्ट! क्माल है यार...सिंपली अमेझिंग

उत्कंठा फुटुन जिव जाणार आता सोम्मार पर्यंत.

- धमालयात्री :)

वरदा's picture

23 May 2008 - 7:06 pm | वरदा

कसला सॉलिड चढ आहे.....मस्तच वर्णन केलयस.....बिचारा नंतर १५ दिवस केळ्याचं नाव सुद्धा नको वाटत असेल ना तुला...

ध्रुव's picture

23 May 2008 - 7:15 pm | ध्रुव

ढाकचा ट्रेक म्हणजे भारीच अनुभव असतो...
मस्त जमलेत दोन्ही भाग.

--
ध्रुव

प्राजु's picture

23 May 2008 - 7:24 pm | प्राजु

वर्णन रोमहर्षक...
सह्ह्ह्ह्ह्ही..

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मन's picture

23 May 2008 - 7:25 pm | मन

आम्ही पण फिरलोय.
धमाल केलिये. अगदी म्हणजे, शद्बानही फरक नाही.(फक्त पात्रांची नावं वेगळी, तपशील तोच.)
(पण असं ,डोळ्यासमोर चित्र उभं राहील असं आम्हाला नाही लिहिता आलं.)
एकदम त्याच काळात गेलं मन.

....की दरी पाहून गरगरायला व्हायचं, मग एकमेकांच्या जवळ जवळ राहून चढायला लागलो...डोळे फिरले की एकानं दुसर्‍याला आधार द्यायचा, आणि बॅलन्स करायला तिसर्‍यानं टेकू लावायचा. कधी खाचेतून हात निसटायचा, कधी पायाखालचा दगड सुटून दरीत गडगडत जायचा...मिनिटभर नुसत्या हातावर सगळा भार टाकून लोंबकळत रहावं लागायचं. लगेच घरच्या सगळ्यांचे चेहरे नजरेसमोर फिरायला लागायचे, मनोमन आईबापाची माफी मागून पुढच्या जन्मी भेटू असं मनातल्या मनात म्हणायचो.

हे आणि

आता खाली उतरायला हवं हे लक्षात आल्यावर "आयचा घो रे! संत्याचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं" असं एक पन्नास वेळा तरी म्हणून झालं असेल.

कसंबसं जीव मुठीत धरुन् उतरायला सुरुवात केली. चढणं सोपं एकवेळ, पण उतरणं? सगळ्या पितरांना मदतीसाठी खाली बोलावलं. धीर करुन मुंगीच्या पावलांनी जसे चढलो तसेच एकमेकाला आवरत सावरत एकदाचे खाली उतरलो....जीव वाचला म्हणून काय हल्लकल्लोळ केला संत्याला आणि कम्मोला मिठ्या काय मारल्या.

अगदी अगदी नेमकं हेच अनुभवलय.

आपलाच,
मनोबा

झकासराव's picture

23 May 2008 - 7:27 pm | झकासराव

लिहिलस रे.
दोन्ही भाग वाचले.
भिकार्‍यासारखे ७-७.५ रु :))
ह्या भागात देखील फर्मास लिहिल आहेस.
फोटो बघुन हा ट्रेक मी कधी आयुष्यात करेन अस वाटत नाय रे बाबा. :)
अवांतर :
तो कम्मोचा पळत येण्याच्या सीन वरुन एक आठवल.
भीमाशंकरला गेलो होतो. जंगलात घुसलो. (मारुती मंदीराच्या बाजुने) कुठुन कुठे पोचलो काय कळाल नाही पण कडे आणि दर्‍या बघुन मन समाधान झाल.
परतीची वाट लक्षात येइना. मग पाण्याने केलेल्या वाटेने येत होतो. (आम्ही हिवाळ्यात गेलो होतो.)
तुमच्या कम्मोसारखाच आमचाहि एक दोस्त. अन्या.
मी सगळ्यात पुढे, एक ढिगारा असलेला दोस्त माझ्या मागे, त्या मागे आमची कम्मो, आणि त्याच्या मागे अजुन दोन जण असे चाललो होतो. पायाखाली पाहिल तर पडलेली पानं, काटक्या, खडकांची झीज होउन झालेले गुळगुळीत छोटे मोठे गोटे हे सगळे आणि उताराचा रस्ता म्हणून संभाळुन चालत होतो.
इतक्यात मागुन धडाधड आवाज आला म्हणून माग बघतोय तोच माझ्या मागचा ढिगारा असलेला दोस्त माझ्या पायात जमिनीशी जमेल तसा शुन्य अंशाचा कोन करुन पसरलेला.
काय घडल हे कळायला काही सेकंद लागले. मग कळाल (मागच्या दोघानी सांगितल) ह्या अन्याने अचानक पळत जावुन ह्या ढीगाला धक्का दिला??
झाल आम्ही अन्याकडे पाहिल तर त्याने बावळट ध्यान करुन सांगितल की त्याला पाठीला कायतरी चावल म्हणुन घाबरुन तो पळत सुटला आणि तोल आवरत नव्हता म्हणून त्याने ढिगाला धरुन थांबण्याचा प्रयत्न केला होता. :))
एक बर झाल त्या धिगाला जास्त लागल नाही नायतर त्या रत्याने आम्हा चौघांवर त्या ढिगाला उचलुन घेवुन जायची कामगिरी पडली असती तर मग झालच. :)
आम्ही त्या अन्याची पार खेचली परतीच्या अख्ख्या वाटेवर. बाकी आम्ही सगळे शहरात राहणारे तो एकटाच गावी राहिलेला असुन देखील एवढा घाबरला म्हणून तर जरा जास्तच. :)

................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

मिसळ's picture

23 May 2008 - 7:45 pm | मिसळ

वर्णन केले आहेस. अगदी डोळ्यासमोर सगळा प्रसंग उभा राहिला. लगे रहो. पु. भा.प्र.

चतुरंग's picture

23 May 2008 - 8:08 pm | चतुरंग

परत एकदा ढाकचा बहिरी सफर मनातल्या मनात झाली.
त्या वरच्या गुहेतून अख्खा मावळ एका नजरेत निरखता येतो.
वारा तर असा भणाण असतो की दोरी बांधून सोडला तर अख्खा माणूसच पतंगासारखा उडेल! ;)
कडा चढताना 'पोटात गोळा येणे', 'आईचे दूध आठवणे' असे वाक्प्र्चार प्रत्यक्ष अनुभवता येतात आणि वरुन खाली उतरताना तर 'तोंडाला कोरड पडणे', 'जिवाचा थरकाप होणे' अशांची दोस्ती होते! ;)

(धमाला, असले लिखाण एका दमात संपावे असे वाटते, इथे क्रमशः म्हणजे एकदम कडेलोट होतो रे! ~X(

चतुरंग

पुष्कर's picture

23 May 2008 - 8:56 pm | पुष्कर

तुझे फोटो पाहून ढाकच्या आठवणी जाग्या झाल्या. ढाकच्या कड्यावर मध्यभागी आल्यावर फाटते (चढताना पेक्षा उतरताना जास्त), तेव्हा त्या बहीरीचा पुजारी एका हातात पाण्याचा कॅन आणि दुसर्‍या हातानी खांद्यावर बळीचा बोकड धरून ठेवलेला अश्या अवस्थेत झपाझप कुठल्या-कुठल्या कपारीत पायांची बोटं रोवत बघता बघता निघून जातो. त्याचा हा रोजचाच कार्यक्रम. कार्तिक स्वामींच्या देवळांप्रमाणे बहीरीच्या गुहेतही मुलींना प्रवेश नाही, त्यामुळे मुलींना कडा चढताना पाहिलं तर तो ओरडतो(तो म्हणजे पुजारी. बहीरी किंवा कार्तिकस्वामी नव्हे). असो.

लोकांना नको तिथे आपलं नाव लिहून ठेवण्याची घाणेरडी सवय आहे. एक कडा चढला म्हणजे काय अगदी पराक्रम केला असं वाटतं! ज्यांनी आपल्या आयुष्यात शेकड्यांनी किल्ले लढवले, त्यांनी सुद्धा अश्या कुठल्या ठिकाणी आपलं नाव कोरलेलं नाही...

संदीप चित्रे's picture

23 May 2008 - 11:19 pm | संदीप चित्रे

धमु ... मस्त लिहिलंयस रे ...
च्यायला असले ट्रेक 'माझ्या चहाचा कप' नाही !!!
-----
अवांतरः तू सुहास शिरवळकरांचा फॅन आहेस का ?
-----

शितल's picture

23 May 2008 - 11:38 pm | शितल

मस्त छान वर्णन केल॑स, बाप रे फोटो पाहुनच कळते की काय हिम॑त केलीत तुम्ही,
मानल॑ बॉ तुम्हाला.

भडकमकर मास्तर's picture

24 May 2008 - 12:11 am | भडकमकर मास्तर

च्यायला फार छान...
एकदम जमलंय वर्णन...
... :H
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

24 May 2008 - 5:58 am | विसोबा खेचर

धमाल्या लेख अन् चित्रं दोन्हीही सहीच!

एकदम चित्तथरारक ट्रेक झालेला दिसतोय परंतु तेवढाच तो एन्जॉयही केलेला दिसतोय तुम्ही लोकांनी! :)

सगळ्या पितरांना मदतीसाठी खाली बोलावलं. धीर करुन मुंगीच्या पावलांनी जसे चढलो तसेच एकमेकाला आवरत सावरत एकदाचे खाली उतरलो....जीव वाचला म्हणून काय हल्लकल्लोळ केला संत्याला आणि कम्मोला मिठ्या काय मारल्या.

मस्त लेखनशैली! :)

लेका धमाल्या, तुझा लेख वाचून आमच्याही कॉलेज जीवनातल्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या! साला आता आपण एक लई सुदृढ बालक आहोत परंतु कधी काळी कॉलेजलाईफ मध्ये असताना १९८४ ते ८८ च्या काळात काही गडकिल्ले आम्हीही अगदी मनमुराद हिंडलो आहोत बरं का! :)

असो, अजूनही लेखन येऊ द्या!

आपला,
(हरिश्चंद्रगड प्रेमी) तात्या.

राजे's picture

24 May 2008 - 12:21 pm | राजे (not verified)

मस्त रे !
धमु धमाल केली आहे ;)

राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

पद्मश्री चित्रे's picture

24 May 2008 - 12:45 pm | पद्मश्री चित्रे

वाचुन नि गडाचे फोटो पाहुन च भीती वाटते...
सुरेख लिहिल आहे.. अगदी डोळ्यासमोर चित्र उभ केलं आहेस.
असेच छान ट्रेक करा..(पण जपुन)..
आणि आम्हाला पण सफर घडवुन आणा.....

चित्रा's picture

24 May 2008 - 9:44 pm | चित्रा

मस्त मजा केलेली दिसते आहे. चित्रदर्शी वर्णन.

शिंगाड्या's picture

25 May 2008 - 2:06 pm | शिंगाड्या

मस्त रे कांबळे!! :-)
एकदम सही..
आमच्या लोहगड ,कोराइगडाच्या मोहिमेची आठवण झाली..
(आता थोडासाच उरलेला मावळा )शिंगाड्या

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 May 2008 - 6:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धमाल,
वर्णन आणि फोटो लै भारी !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धमाल मुलगा's picture

27 May 2008 - 2:49 pm | धमाल मुलगा

हा ही भाग आपण आवडीनं वाचलात.
आनंद वाटला. :) असाच लोभ ठेवा मंडळी!

पेठकरकाका, धीर दिल्याबद्द्ल आभारी आहे. :)

आंद्या, पार्टीचा बेत कधीये मग? ;)

चतुरंगराव,

वारा तर असा भणाण असतो की दोरी बांधून सोडला तर अख्खा माणूसच पतंगासारखा उडेल

अगदी खरं बुवा !

पुष्कर,

लोकांना नको तिथे आपलं नाव लिहून ठेवण्याची घाणेरडी सवय आहे. एक कडा चढला म्हणजे काय अगदी पराक्रम केला असं वाटतं! ज्यांनी आपल्या आयुष्यात शेकड्यांनी किल्ले लढवले, त्यांनी सुद्धा अश्या कुठल्या ठिकाणी आपलं नाव कोरलेलं नाही...

लाज वाटते साल्यांची.... खुद्द छत्रपतींचं कुठं नाव नसतं आणि हे आशिक साले नावं काय, बदाम काय, गाड्यांचे नंबर काय...च्छ्या: !

बाकी, मध्यभागी आल्यावर मात्र आपल्याच फोटोभोवती चंदनाचा हार दिसायला लागतो हे मात्र १०००००% खरं यार.

संदीपभौ,

च्यायला असले ट्रेक 'माझ्या चहाचा कप' नाही !!!

एकदा चलाच मग! जर कम्मो येऊ शकतो तर कोणिही येऊ शकतो :)

अवांतरः तू सुहास शिरवळकरांचा फॅन आहेस का ?

आयला, कसं ओळखलंत हो? फ्यान म्हणजे डायरेक्ट 'पीएसपीओ' हाय आपण :) एक 'हाय ओल्ड फ्रेंड्स' सोडलं तर बाकी सगळी वाचून झालीएत...कित्येकदा :)

झकासराव,

लय भारी मजा की!
लिहा ना तुमचा भिमाशंकरचा अनुभव :) आवडेल वाचायला.

तात्याबा,
मग तुमची हरिश्चंद्रगडाची गोष्ट कधी सांगणार आम्हाला?

शिंगाड्या,
येऊद्या ना तुमचेही अनुभव :)

(आता थोडासाच उरलेला मावळा )शिंगाड्या

=))