चार्वाक या दर्शनाला थोडंसं झुकतं माप देण्याचा एक ट्रेंड दिसतो. या दर्शनाला बंडखोर दर्शन मानले जाते. भाकडकथांवर विश्वास न ठेवणारे, परलोक न मानणारे, केवळ प्रत्यक्ष प्रमाण मानणारे, शब्दप्रामाण्यावर विश्वास न ठेवणारे असे हे दर्शन आधुनिक वैज्ञानिक विचारधारेशी मिळतेजुळते आहे असे अनेकांना प्रथमदर्शनी वाटते. (भोंदू) वैदिक विचारांवर आघात (!) करणारे दर्शन म्हणून ब्राह्मणेतर (ब्राह्मणविरोधी) मंडळींमध्ये या दर्शनाविषयी प्रेम दिसते. जातीपातींचा विचार सोडून दिल्यासही एकूणच सुशिक्षित वर्गामध्ये अंधश्रद्धेच्या ठाम विरोधात असलेल्या या दर्शनाविषयी सॉफ्ट कॉर्नर असतो. त्यामुळे सहसा रॅशनल वगैरे लेखन करणारी माणसे चार्वाकाला विरोध करताना दिसत नाहीत. रादर चार्वाकाला भारी म्हणणे फॅशन आहे.
खरे तर या लेखातला बराच भाग हा प्रतिसाद (श्री शरद यांच्या धाग्यावरचा) आहे. पण हा केवळ प्रतिसाद न राहता माझे वेगळे मत बनल्याचे लिहिताना मला जाणवले, त्यामुळे हा प्रतिसादवजा वेगळा धागा काढत आहे. श्री शरद यांचा मूळ लेख इथे आहे.
अगोदर प्रतिसाद लिहिला आहे. शेवटी माझे मत मांडले आहे.
(१) हे तर्कसंगत वाटत नाही...
वेदकालीन ऋषींना/विचारवंतांना दुसर्याचे विचार पटले नाहीत तर खंडन-मंडन पद्धतीने वाद घालावयाची पद्धत मान्य होती.म्हणून वेदकाळापासूनच वेदविरोधी विचार (उदा. उपनिषदे) मान्य केली गेली. त्यांच्याबद्दल योग्य तो आदरही दाखविण्यात आला. पण पुराणे-बौद्ध यांचा विरोध तसा नव्हता. त्यांना जनसामान्यांना, विचारवंतांना नव्हे, "लोकायत चूक" सांगावयाचे होते. जवळचे उदाहरण द्यावयाचे म्हणजे तो "भांडारकर संस्थे"वरचा हल्ला होता. ऋणं कृत्वा धृतं पिबेत् असा खोटा उल्लेख माधवाचार्यांनी केला तो ही याचेच द्योतक.
एका वेळी तुम्ही म्हणता प्राचीन भारतात ग्रंथ जाळण्याची परंपरा नव्हती. पुढे भांडारकर संस्थेवरच्या हल्ल्याचा दृष्टांत देता. म्हणजे अगोदर म्हटलेल्याच्या विरोधी विधान. माधवाचार्यांच्या खोट्या दृष्टांतावर देखील मी बोललेलो आहे. असा एखादा विकृतीकरण केलेला श्लोक सामान्यीकरण करता येणार नाही. असे बरेच विकृतीकरण अनेकांनी आपल्या विरोधकांचे केलेले आहे. लोकायतावरच असला “अन्याय” झालेला आहे, आणि लोकायत त्याला बळी पडले असा एक्स्लुझिव्ह निष्कर्ष त्यातून निघू शकत नाही. पुराणे, बौद्ध यांनी कडाडून विरोध केला लोकायताला, मान्य. भिक्कूंनी लोकायत वाचू नये म्हटले, मान्य. इतरांना लोकायत वाचायला मनाई नव्हती ना? ग्रंथ जाळले गेले नाहीत ना? मग लोकायताचा अभ्यास बंद कसा काय पडला, हा माझा प्रश्न आहे. सगळेच लोक पुराणे, बौद्धांना मानणारे खचितच नव्हते. लोकांना मान्य असणारे ते लोकायत. असे लोकायत कसे काय पडद्याआड गेले, हा माझा प्रश्न आहे. ग्रंथ जाळले नाहीत. अभ्यास बंद पडला. म्हणजे, लोकायत मानणारे कन्व्हर्ट झाले असे म्हणायचे का? ते तसे कन्व्हर्ट का झाले? काही पटल्याशिवाय झाले का? की त्यांना स्वत:ची बुद्धी वापरता येत नव्हती? कन्व्हर्ट झालेच कसे? परलोक न मानणारे इहवादी एकदम भाकडकथा कसे काय मानू लागले? फक्त प्रत्यक्ष प्रमाण वापरणारे अचानक इतर (उपमान, अनुमान, शब्द) प्रमाणे कसे काय मानू लागले? काही अल्पसंख्य नसतील झाले कन्व्हर्ट. पण त्यांचे ऐकणारे कुणीच राहिले नाही? आश्चर्य नाही वाटत? बरे, एवढे उल्लेख आहेत, तर असा कुठे उल्लेख आहे का, की लोकायत अभ्यासणारे लोक आजकाल राहिले नाहीत बुवा, गेले ते दिवस, आता पुस्तकं पण मिळेनात; अशा प्रकारचा? इतर दर्शने उतरतीला लागली त्याचे स्पष्ट संदर्भ आहेत. लोकायताचे नाहीत.
(२)कशावरून असा सन्मान दिला गेला होता. बृहस्पतीचा काळ कोणता ?
बृहस्पती हा सुरगुरू. फार पुरातनकाळचा. कौटलीय अर्थशास्त्र, पाणिनी याची उदहरणे दिली आहेतच. "सांख्य योगो लोकायतं चेत्यान्वीक्षिकी"
असे कौटिल्य म्हणतो; आन्विक्षिकी म्हणजे तर्कशास्त्र. सांख्य व योग ह्या दोन महत्वाच्या दर्शनांच्या पंक्तीत लोकायताला बसविले आहे. महाभारतातील आणखी एक उदाहरण घेऊ. गंगेने जन्माबरोबर भीष्माला स्वर्गात नेले होते व त्याच्या शिक्षणाची सोय तेथे केली होती.
ती भीष्माला शंतनूच्या हवाली करतांना सांगते त्यात "याला बृहस्पतीनीती माहीत आहे" असे आवर्जून सांगितले आहे. एकदा बृहस्पती इंद्रावर रागावून असूरांकडे जातो. त्यावेली ब्रह्मदेव देवांना संगतो की "बृहस्पतीनीती तुमच्याकडे नाही, असूरांकडे आहे; तेव्हा ते तुम्हाला वरचढ झाले आहेत". या सन्मानाच्या सर्व गोष्टी बुद्धपूर्व.
सुरगुरु (हे सुर कोण?), स्वर्ग(म्हणजे काय, कुठे?), गंगा (म्हणजे कुणी मानव स्त्री की नदी? बाकीची माणसे मेल्यावर स्वर्गात जायची, ही मंडळी जिवंतपणीच ये जा कशी काय करायची?), इंद्र हा काय प्रकार आहे? ही मंडळी, ही ठिकाणे, या घटना बुद्धपूर्व होत्या का? यात काही ऐतिहासिक तथ्य आहे का? असो. महाभारत (तुमच्या म्हणण्याप्रमाणे) इसपू २-३ शतके या काळातले. अगदी त्या काळात या कथा लिहिल्या गेल्या असे समजले, तरी हे उल्लेख बुद्धपूर्व होत नाहीत. दुसरे असे, की लोकायत या कथांना भाकडकथा मानतील. अॅतण्ड व्हाइस व्हर्सा. भाकडकथा मानणारे/ लिहिणारे, लोकायताचा उल्लेख सन्मानाने कशाला करतील?
तर सन्मानाचे स्थान होते हे दाखवून देण्यासाठी केवळ (सन्माननीय) उल्लेखाचे संदर्भ देणे पुरेसे नाही. ते दर्शन स्वीकार्य होते, असे दिसले पाहिजे. की हे दर्शन केवळ बाउंसिंग बोर्ड म्हणून वापरले जात होते? बृहस्पतीनीति माहीत असणे आवश्यक, कारण ते खोडून काढणे आवश्यक, असे तर नव्हते? खोडून काढणे आवश्यक म्हणजे लगेच सन्माननीय होत नाही. यात सहिष्णुता दिसते, अभ्यासाची शिस्त दिसते, प्रत्येक मताचा आदर करण्याची वृत्ती दिसते. असे असे विचार अमुक अमुक विचारधारा मांडते, ते असे असे खोडून काढता येतात, हे दाखवण्यासाठी लोकायताचा उल्लेख अनिवार्य ठरतो. ते दर्शन फार श्रेष्ठ आहे, म्हणून नव्हे. लोकायताने कुठलेच दर्शन खोडलेले नाही. फक्त वेद मूर्खंची बडबड आहेत असे म्हटले आहे. यात कसला दार्शनिक विचार आहे? ग्रंथ लुप्त झाले म्हणे. लिहून ठेवलेले नसताना वेद ज्या देशात लुप्त झाले नाहीत, तिथे लोकायतांचे (नसलेले) ग्रंथ लुप्त झाले! (हे म्हणजे आमच्याकडे ते विमान बनवणारे, अणुभट्ट्यांची डिझाइन असणारे ग्रंथ होते, ते लुप्त झाले असे म्हणण्यासारखे आहे. रामायणात पुष्पक विमानाचा सन्माननीय उल्लेख येतो म्हणजे ते विमान असणारच ना, त्या विमानाचे मॅन्युअल उपलब्ध नसले म्हणून काय झाले, लुप्त झाले काळाच्या ओघात, असे म्हणल्यासारखे आहे.)
[बृहस्पतीनीतिविषयी एक वेगळी कथा वाचण्यात आली आहे – असुरांना अध्यात्मविद्येपासून वंचित ठेऊन खच्ची करायचे कारस्थान म्हणून बृहस्पती इंद्राशी भांडल्याचे खोटे नाटक करुन असुरांकडे गेला, आणि त्यांना लोकायत शिकवले, आणि हेच खरे दर्शन, मी देवांना शिकवण्याऐवजी तुम्हाला सांगतो, असे म्हणाला. असुरांना ते खरे वाटले, इत्यादि. ]
(३) वेद इहवादी नाहीत. असे बघा वेदातील परलोक, स्वर्ग हा मोक्ष नव्हे की जेथून परत यावयाचे नाही. तुम्ही स्वर्गात जाता, तेथील सुख भोगता व परत मृत्युलोकात येता. म्हणजे पृथ्वी-स्वर्ग यातला फरक काय ? तुम्ही धारावीतील झोपडपट्टीतून आदर्शमधील एकतिसाव्या मजल्यात रहावयाला जाता. क्रेडिट संपले की परत धारावीला. दोहोतील फरक म्हणजे फक्त सुखातला तरतम भाव. माहीत आहे ? धर्मार्थकाममोक्ष यांपैकी धर्मार्थकाम ही त्रयीच वेदकाळी होती.
लेखात इहवाद आणि भोगवादातला फरक स्पष्ट केलात. पण इथे तुम्ही तीच गल्लत करताय. वेद सुखाची कामना करतात, इथे आणि परलोकात, म्हणजे, (फारतर) भोगवादी होतील; इहवादी नाही. इहवाद म्हणजे, “नो परलोक, पिरियड”. मोक्ष कल्पना नाही वेदांत, म्हणजे इहवाद होत नाही. परलोक कल्पना आहे ना? भोगासाठी का होइना, मोक्षासाठी नसेना का, परलोक आहे. म्हणजे इहवाद नाही. इहवाद फक्त लोकायतामध्येच आहे. वेदकाळी त्रयी होती असे म्हणता ना, धर्म, अर्थ, काम, बरोबर? लोकायत धर्म कुठे मानते? फक्त अर्थ आणि काम मानते. धर्म मानत नाही, परलोक मानत नाही, मग ते वेदाच्या विचारसरणीबाहेरचे कसे काय होत नाही?
(४) "लोकायत हे वेदांच्या विचारसरणीच्या बाहेरचे कारण लोकायत इहवादी" हे पटत नाही.
वर लिहिले आहे.
माझे मत –
लोकायत हा जनसाधारणांचा दृष्टीकोन आहे. ज्याने कुठल्याच दर्शनाचा अभ्यास केलेला नाही, अशा साधारण विचारी व्यक्तीला काय वाटेल, असा तो दृष्टीकोन आहे. सकृद्दर्शनी कॉमन सेन्सला पटतील असे मुद्दे मांडलेले असल्याने हे दर्शन आकर्षक (मधुर वाणीचे – चार्वाक) वाटते. धर्म (पुरुषार्थ अशा अर्थाने) नावाची भानगड नाही. (बाय द वे, देव मोडीत काढणारे लोकायत एकमेव दर्शन नाही. धर्म आणि मोक्ष मानणारे बरेच आहेत, जे ईश्वर संकल्पना फेटाळतात, किंवा अनावश्यक समजतात, किंवा ईश्वराला वन अमंग मेनी असे सामान्य स्थान देतात.) डू’ज आणि डॊण्ट’स (वेगळ्या शब्दांत पुण्य-पाप) नाहीत. मेल्यावर काय होईल ही काळजी मोडीत निघते. जगणे एकदम सोपे होते. कुणी काही म्हणो, ते बंधनकारक नाही. कुणीच एवढा शहाणा नाही, की त्याने सांगितले आणि आपण डोळे झाकून ऐकले. काही कॉम्प्लिकेशन्सच नाहीत. डोळ्यांनी दिसते (ज्ञानेंद्रियांना जाणवते ते) तेवढेच स्वीकारायचे. पण अगदीच दुर्लक्ष करण्याइतके पण त्यातील मुद्दे टाकाऊ नाहीत. पण खोडून काढणेबल आहेत. म्हणून त्याचा उल्लेख. असा उल्लेख आहे, म्हणून ते एक बांधीव दर्शन आहे असा आभास होतो. लोकायत हे बांधीव दर्शन नाही. धर्म नसल्याने नीति नाही. नीतिला आधार हवा ना. चांगले का वागायचे याचे उत्तर नाही. बळी तो कान पिळी हे तत्त्व हानीकारक का, याचे उत्तर नाही. “जगणे म्हणजे काय”, हा प्रश्न कसा अनावश्यक आहे, याचे स्पष्टीकरण नाही. समाजाच्या बांधणीसाठी आवश्यक असा कोणताच विचार या दर्शनातून निघत नाही. दर्शन नाही, त्यावर आधारित संघटित धर्म (विशिष्ट डॉग्मा मानणारा गट अशा अर्थाने) नाही. त्यामुळेच, लोकायत दर्शन उपलब्ध नाही ते नाही, त्यावर आधारीत नीतिशास्त्रही उपलब्ध नाही. थियरी ऑफ एरर नाही. ज्ञानेंद्रिये चकवली गेली तर प्रत्यक्ष प्रमाणाचे काय करायचे याची क्लॅरिटी नाही. कार्यकारणभाव नाही. उपमान मानत नाहीत. अनुमान मानत नाहीत. काही प्रमाणात अनुमान मानतात, ते प्रमाण किती ते निश्चित नाही. इतर दर्शनांचा अभ्यास करता करता हे दर्शन आपोआप खोडले जाते. त्यासाठी वेगळे प्रयास घेण्याची गरज पडत नाही.
प्रतिक्रिया
17 Nov 2010 - 5:00 pm | वारकरि रशियात
खंडन-मंडनासाठी अर्धरथी / रथी / महारथी आहेतच.....
पण याचा समावेश षड्दर्शनांत होतो असे आहे ते कां?
पण (बव्हंशी) सर्व मुद्दे (व्यवस्थित) आले आहेत.
17 Nov 2010 - 5:27 pm | परिकथेतील राजकुमार
मी शिर्षक काहीतरी वेगळेच वाचले.
असो...
17 Nov 2010 - 5:37 pm | अवलिया
उत्तम आढावा. माझ्या मनातले बरेच मुद्दे आपण घेतले आहेत.
बाकीचे जाणकार जे काही खंडन मंडन करायचे असेल ते करतीलच.
थोडी माहिती माधवाच्या सर्वदर्शन संग्रहातील चार्वाक दर्शन या भागाविषयी -
माधवाने चार्वाकाचे मत म्हणुन जे श्लोक दिले आहेत ते बदलुन दिले आहेत यावर अनेक जण अनेक ठिकाणी बोलत असतात. माझ्याकडे जी प्रत आहे तिच्या नुसार त्यात दोन्ही श्लोक दिले आहेत. जाणकारांच्या म्हणण्यानुसार काही पाठभेद आढळतात. काही जुन्या हस्तलिखित प्रतींमधे फक्त नास्ति मृत्युर्गोचर असा उल्लेख आढळतो तर काहींमधे दोन्ही ठिकाणी ऋणं ...पिबेत असा उल्लेख आढळतो. माधवाच्या पुर्वीच्या काही वेगळ्या ग्रंथामधे सुद्धा ऋणं..पिबेत असा उल्लेख आढळतो. त्यामुळे "विशिष्ट हेतुसाठी श्लोक बदलला" असे उल्लेख करुन त्याचे कर्तृत्व माधवाकडे दिले.जे योग्य असावे असे मला वाटत नाही. यावर अजुन संशोधन व्हायला हवे.
@वारकरी रशियात
चार्वाक दर्शन षडदर्शंनांमधे धरले जात नाही असे मला वाटते.
18 Nov 2010 - 10:55 am | वारकरि रशियात
नानाजी,
अवांतर१) एकूण सोळा दर्शने आहेत असे वाचले होते.
अवांतर २) माझ्या अभ्यासात तसेच मला मान्य असलेल्या विचारधारेनुसार षड्दर्शने:
जैमिनीय पूर्वमीमांसा,
बादरायण व्यासांची उत्तरमीमांसा,
कणादांचे वैशेषिकशास्त्र,
गौतमांचे न्यायशास्त्र
कपिलमहामुनींचे सांख्यशास्त्र
व
पतंजलींचे योगशास्त्र. हीच आहेत.
अवांतर ३) पण एका अन्य विचारधारेप्रमाणे''षड्दर्शनसमुच्चया' त वरील सहांचे मिळून तीन व अन्य तीन (पैकी एक चार्वाक) अशी विभागणी केली आहे असे वाचले होते. त्यामुळे माझा उगाचच गोंधळ झाला होता! असो.
चार्वाकाच्या विचारसरणीबाबत आणखीही लिहिण्यासारखे कांही आहे, बघुया वेळ कसा होतो ते. तोवर जाणकार ज्ञानात भर घालत राहतीलच.
17 Nov 2010 - 5:45 pm | यशोधरा
वाचत आहे..
17 Nov 2010 - 6:00 pm | विसुनाना
-माझेही याच दिशेने सुरू होते. नव्हे! आपण भारतीय*/ पक्षी हिंदू विविध दर्शनांची तळी उचलतो, सर्वसामान्य असूनही काहीतरी उच्च , आध्यात्मिक, नीतीमान बडबड करतो. पण प्रत्यक्षात मात्र 'चारुवाक' लोकायत आचारपद्धती अवलंबतो असे माझे मत आहे. चारुवाक = Hypocrisy.
या दृष्टीने 'लोकायत' प्रवाह खूप पूर्वीपासून आजपर्यंत कोणत्याही ग्रंथांविना वाहतो आहे. कारण तो स्वयंभू आचारप्रवाह आहे - त्याला लिखित बंधंनांची गरज नाही.
*अपवादांचे स्वागत आणि अभिनंदन.
22 Nov 2010 - 7:34 am | आळश्यांचा राजा
सहमत आहे.
चारुवाक = Hypocrisy हे समीकरण पटत नाही.
22 Nov 2010 - 11:50 am | अवलिया
आपण भारतीय*/ पक्षी हिंदू विविध दर्शनांची तळी उचलतो, सर्वसामान्य असूनही काहीतरी उच्च , आध्यात्मिक, नीतीमान बडबड करतो.
बराचसा सहमत आहे. आणि म्हणुनच जे खरोखरच असे अध्यात्मिक होते, आहेत किंवा असतील त्यांचे अनेकांना सुप्त आकर्षण असावे. आणि असे अध्यात्मिक होते, आहेत, असतील म्हणुनच त्यांचे खोटे अनुकरण करुन तुंबड्या भरणारे ढोंगी पण समा़जात होते, आहेत, असतील.
म्हणुनच सर्वसाधारण मनुष्याचा दृष्टिकोन बहुधा दुर्योधनाच्या तोंडुनच वदवला गेला आहे
जानामि धर्मं न च मे प्रवृत्तिर्जानाम्यधर्मं न च मे निवृत्ति |
केनापि देवेन हृदि स्थितेन यथानियुक्तोऽस्मि तथा करोमि ||
17 Nov 2010 - 5:55 pm | धमाल मुलगा
बापरे! दोन्ही बाजूंचे मुद्दे पटतायत मला (ऑफकोर्स, ह्या विषयाच्या अज्ञानापोटीच.).
पण वाचतो आहे. आवडीनं वाचतो आहे. जमेल तसं, समजेल तितकं उमजुन घेतो आहे.
17 Nov 2010 - 6:08 pm | बिपिन कार्यकर्ते
श्री. रा. रा. आ. रा. जी,
आपला लेख वाचला. त्यातल्या पहिल्या परिच्छेदामुळे आपले पहिले अभिनंदन करतो. दुसर्या परिच्छेदामुळे दुसरे अभिनंदन. नुसतीच गंमत न बघता किंवा एखादा प्रतिसाद देऊन बाजूला न होता, आपण नीट असे लेखन करून धागा टाकलात. बरेच लोक इथे असे आहेत की त्यांनीही असेच वर्तन ठेवल्यास मिपावरील लेखनाच्या दर्ज्याची काळजी करायची गरज भासणार नाही. असो. ;)
बाकी, या विषयावर काही प्रतिक्रिया द्यायची माझी एक पैशाची देखिल लायकी नसल्याने नुसतेच वाचतो आहे. धन्यवाद.
17 Nov 2010 - 9:33 pm | श्रावण मोडक
बिकाशी सहमत. वाचतो आहे.
17 Nov 2010 - 9:39 pm | चांगभलं
बाकी, या विषयावर काही प्रतिक्रिया द्यायची माझी एक पैशाची देखिल लायकी नसल्याने नुसतेच वाचतो आहे. धन्यवाद.
नशिब माझ....मान्य केलत......
17 Nov 2010 - 6:47 pm | स्वानन्द
टाळ्या....
एकदम मुद्देसूद लिहीले आहे. धन्यवाद.
17 Nov 2010 - 7:49 pm | विकास
दोन्ही लेख आत्ताच वाचले. विषय श्री. शरद यांच्या मूळ माहितीलेखाप्रमाणेच चांगला हाताळला आहे. माझे या संदर्भात डिटेल वाचन नाही, पण या दोन्ही लेखांमुळे उत्सुकता चाळावली गेली आहे. काही प्रश्नः
लोकायत हा जनसाधारणांचा दृष्टीकोन आहे. ज्याने कुठल्याच दर्शनाचा अभ्यास केलेला नाही, अशा साधारण विचारी व्यक्तीला काय वाटेल, असा तो दृष्टीकोन आहे.
मला कल्पना आहे की हे आपले मत आहे. तरी देखील केवळ उत्सुकतेपोटी विचारत आहे (not questioning) गैरसमज नसावा, हे पण केवळ आपलेच मत आहे का कुठे वाचनात आले आहे?
आपण लिहीलेले मधूरवाणीचे - चार्वाक आणि विसुनानांनी लिहीलेले चारुवाक = Hypocrisy, यात काही फरक आहे का? Hypocrisy मधूर वाणीने होऊ शकते म्हणून हा प्रश्न!
धन्यवाद!
22 Nov 2010 - 8:34 am | आळश्यांचा राजा
एकूणच असा निष्कर्ष काढणे फार अवघड नाही. आणि असे वाचनातही आलेले आहे. वाचनात दोन्ही बाजू आल्यात, दर्शन असावे, आणि दर्शन नव्हते, अशा दोन्ही. दर्शन नव्हते हे मत विचारांती पटण्यासारखे वाटते.
विसुनानांनी लिहीलेले चारुवाक = Hypocrisy मला पटत नाही. चार्वाकांची मते प्रामाणिक आहेत असे वाटते. खोडता येतात. म्हणजे ढोंगी होत नाहीत. त्यांना म्हणायचे असावे, तोंडाने भज गोविंदम म्हणायचे, पण त्यात अपेक्षित असलेली साधना करायची नाही, ही हिपोक्रसी. चार्वाकांना ढोंगी म्हणायची गरज नाही.
18 Nov 2010 - 5:01 am | धनंजय
लोकायत, चार्वाक ... अशिक्षित विचारसरणी, प्रतिष्ठित विचारसरणी
असेही मत वाचले आहे, की दोन्ही प्रकार होते. प्रतिष्ठित विचारसरणी लुप्त झाल्यानंतर त्यातील काही तत्त्वे अशिक्षित विचारसरणीशी समांतर असल्यामुळे त्या दोहोंची गल्लत झाली...
स्रोत परामर्श प्रकाशनाच्या निबंधसंग्रहापैकी एक निबंध. नेमके शीर्षक, प्रकाशनवर्श बगैरे पुस्तक तपासून मग देईन. (एक-दोन आठवड्यांच्या विलंबानंतर. क्षमस्व.)
22 Nov 2010 - 8:38 am | आळश्यांचा राजा
थँक्स! तुम्ही मनावर घेतले तर या विषयावर बराच प्रकाश पडू शकेल. ज्याप्रमाणे अणुवादाचे खंडन लिहिलेत तसेच याही विषयावर लिहावे ही विनंती!
18 Nov 2010 - 12:51 pm | अवलिया
चार्वाकमताने वेदऋचा ह्या अर्थहीन असल्याचे प्रतिपादन केले जाते त्यात अनेकदा उल्लेख केलेला जर्फरीतुर्फरी ऋचा
ऋग्वेदातील दशम मंडलातील १०६ व्या सुक्तातील ६ वी ऋचा (१०.१०६.६)
(उदात्तअनुदात्त स्वर दिलेले नाहीत)
सृण्येव जर्भरी तुर्फरीतू नैतोशेव तुर्फरी पर्फरिका |
उदन्यजेव जेमना मदेरु ता मे जरय्वजरं मरायु ||
( हे अश्विनीकुमारांनो) तुम्ही अंकुश (सृणि) लावावयास योग्य अशा मत्त हत्तींप्रमाणे शरिर झुकवणारे (जर्भरी) मारणारे (तुर्फरी) संतोष देणार्या मनुष्याच्या पुत्रांसारखे (नैतोशेव) विनाश करणारे (तुर्फरी) धनाची भर करणारे (पर्फरिका) जलातुन उत्पन्न होणार्या वस्तुंप्रमाणे निर्मल (उदन्यजेव) विजय प्राप्त करणारे (जेमना) मदाने युक्त (मदेरु) आहात, तेव्हा तुम्ही माझ्या जरेने युक्त (जरायु) आणि मरणशील (मरायु) अशा शरीराला जरारहीत करावे.
***
माधवाने सर्वदर्शसंग्रहात एकुण १६ दर्शनांची माहिती दिली असुन एकेका दर्शनाची एकेका अध्यायात अशी माहिती दिली आहे. दर्शनांचा क्रम माधवाच्या मताने विचार करण्यास योग्य अशा क्रमाने दिला असुन चार्वाक दर्शन पहिले आणि अद्वैत दर्शन शेवटी दिले आहे. यानुसार माधवाचा अद्वैताकडे असलेला ओढा स्पष्ट दिसत असला तरी प्रत्येक दर्शनाची माहिती त्याने जणू काही त्या दर्शनाचा प्रणेताच देत आहे अशा व्यवस्थित पणे दिलेली आहे.
अद्वैत दर्शनाकडे (शंकरमत) त्याचा असलेला ओढा हा त्या ग्रंथात अद्वैत दर्शनाच्या (शंकरमत) अध्यायाच्या शेवटी सकलदर्शनशिरोSलंकार रत्नं या शब्दांनी सुचित होतो. तर चार्वाक दर्शनाच्या शेवटी असलेली त्याची टीप अशी "तस्माद्बहुनां प्राणिनामनुग्रहार्थ चार्वाकमतमाश्रणीयमिती रमणीयम्". इतर कोणत्याही दर्शनाच्या अंतभागी त्याने कोणतेही मत दिलेले नाही.
22 Nov 2010 - 9:01 am | आळश्यांचा राजा
तुमच्याशी सहमत आहे. (काय म्हणता आहात ते गृहीत धरुन!)
मॅक्समुल्लरनेही वेद म्हणजे अर्थहीन बडबड असल्याचे म्हटल्याचे वाचले आहे. त्याला वेदांविषयी वेगळ्या प्रकारचा आदर होता. अतिप्राचीन साहित्य म्हणून. ऐतिहासिक ठेवा म्हणून. त्या अर्थाने त्याला चार्वाकच म्हटले पाहिजे. असो. वेदांमध्ये सगळेच ज्ञान आहे, आणि वेद अर्थहीन आहेत अशी दोन्ही विधाने करण्यालाच मुळात काही अर्थ नाही. अर्थहीन म्हणावे, तर या वेदांच्या पायावरच तर महत्त्वाची दर्शने उभी आहेत. मग ती दर्शने पण अर्थहीन म्हणावी का? वेदांगे पण अर्थहीन म्हणावी का? धनुर्वेद, आयुर्वेद इ. उपवेद पण अर्थहीन का? संगीत, नृत्य, नाट्य आदि कला ज्या दर्शनांच्या पायावर उन्नत झाल्या त्या सगळ्याच अर्थहीन का? अगदी अलीकडचे उदाहरण वैदिक गणिताचे आहे. त्याच्या निर्मात्याने, भारती कृष्णतीर्थांनी, या अजब गणिती पद्धतीचे दिलेले स्पष्टीकरण (रॅशनल!) बुद्धीला न पटणारे आहे. (वेदांतील – अथर्ववेदातील – काही सूत्रांचे ‘गूढ’ अर्थ त्यांच्या अंत:प्रज्ञेला दिसले, समजले.) तरीही ते गणित समोर आहे, उपलब्ध आहे, नाकारता येत नाही. म्हणजे वेदांमध्ये वरवर जर्फरी तुर्फरी अशी अर्थहीनता दिसली तरी त्याने गंडून जायचे कारण नाही.
तसेच, वेदांमध्ये सगळेच ज्ञान आहे असा पोकळ अहंकारयुक्त दावा करणेही हास्यास्पद आहे. सगळेच ज्ञान आहे, तर वापरा ना. कशाला नवीन शोध लावत बसताय, आणि पश्चिमेने नवीन तंत्र देण्याची वाट बघत बसताय?
22 Nov 2010 - 11:49 am | अवलिया
>>>मॅक्समुल्लरनेही वेद म्हणजे अर्थहीन बडबड असल्याचे म्हटल्याचे वाचले आहे.
हे बहुधा त्याने ब्राह्मण भागांविषयी व्यक्त केलेले मत आहे.
मंत्रांबद्दल सुद्धा अनेक जणांचे विविध मते सापडतात.
>>>त्याला वेदांविषयी वेगळ्या प्रकारचा आदर होता. अतिप्राचीन साहित्य म्हणून. ऐतिहासिक ठेवा म्हणून
+१
>>वेदांमध्ये सगळेच ज्ञान आहे असा पोकळ अहंकारयुक्त दावा करणेही हास्यास्पद आहे.
सहमत आहे.
म्हणुनच सुज्ञ माणसाने कुणाच्याही व्यक्त केलेल्या मतावर संपूर्णपणे विसंबुन न रहाता स्वतः काय आहे हे जाणुनच मग त्याप्रमाणे योग्य अयोग्य असे प्रतिपादन करणे जास्त योग्य आहे असे मला वाटते.