आमच्या बारावीच्या पुस्तकात एक प्रश्न होता, ''जुन्या खेळाऐवजी नवीन प्रकारचे खेळ आल्याने आपली मानसिक वाढ खुंटली आहे का?'' दर परीक्षेला हा प्रश्न हमखास असायचा आणि सगळेच काही ना काही पुस्तकी उत्तरे द्यायचे याप्रश्नातुन आणि आजच्या जमान्यात दिवाळीची वा उन्हाळी सुट्टी लागली की, काय करावे, करू नये वगैरे याच प्रश्नांची उत्तरे शोधणारे अनेक लेखातुन संगणकीय खेळ त्रासदायकच हेच सत्य शेवटी फिरून फिरून सांगितले जाते. आणि खरे आहे ते ..!
पण, निदान दिवाळीच्या सुट्टीत तरी हा प्रश्न मला कधी पडायचाच नाही, का म्हणता? अहो किल्ला ...... आमचा जीव की प्राण . त्यामुळे वेळ कसा घालवायचा असा विचार करायला तरी वेळ कुठे असायचा ? आधीच सहामाही परीक्षा दसर्याच्या वगैरे सुट्यांमुळे खूप लांबायची. त्यामुळे, परीक्षा संपायच्या आधीच किल्ल्यांची तयारी सुरू व्हायची. जागा, कोण कोण येणार, कोण कधी गावाला जाणार आहे याची चर्चा व्हायची. आणि मग शेवटचा पेपर देऊन झाला की, हुर्रे! मग फक्त आम्ही पोरं आणि दगड माती!
पेपर झाला ,की दप्तर टाकायचे आणि बाहेर पळायचे, सगळे वाट पाहत असायचेच. मग काय, मिशन दगड माती! मिळेल तिथून मिळेल तसले दगड आणायचे, मोठे, छोटे, गोल, चौकोनी, जड, हलके, सगळे. तो दगड कुठे वापरता येईल, याचा विचार पण करायचा नाही. दगड उचलत नसेल तर, ''ये, इकडे या रे बाकीचे ..'' म्हणून बाकीच्यांना हाक मारायची. मग मेरू पर्वत उचलल्यासारखे आम्ही चार पाच स्वघोषित हनुमान तो दगड कधी ढकलत, कधी उचलून आमच्या जागी आणायचो. अर्थात यात एक दोघांना खरचटायचं वगैरे. पण कोणाला कुठे लागलंय याच भानच नसायचं! उलट स्वातंत्र्यसैनिकासारख्या त्या खुणा आम्ही सार्या ग्रुपभर दाखवीत फिरायचो. पण याहून बोंब व्हायची ती जागा ठरविताना . चांगल्या जागेवर नजर असायचीच, पण आम्हा सगळ्या दोस्तांची एक आमसभा व्हायची. आणि त्यात दोन तीन जागांवर अणुकरारावर झाली तशी चर्चा व्हायची. ''अरे त्या जोशीकाकूंपाशी नको ते बाहेर पाणी फेकतात, आपली सगळी मेहनत वाया जाईल.'' ''अरे, ते पवारासमोर नको रे, ती भिंत घाण झाली तर कॉलनी डोक्यावर घेतील ते.'' शेवटी सगळयांनुमते जागा ठरायची आणि आम्ही तिथे हे मेरुपर्वत आणून ठेवायचो. जरा भरपूर दगड झाले वाटले की, थांबायचे.
मग आता पुढची पायरी माती आणणे, ती जवळ कुठे मिळायची नाही. मिळाली तरी इतकी घाण असायची की बाप रे बाप! मग चलो मैदान! सगळे मिळेल ते साहित्य घेऊन मैदानात जायचे. आणि पोतभर माती घेऊन यायची, ती आली की थांबणे नाही ,त्याच मातकट हाताने गँग कामाला लागायची ती दगड लावायला ..
इथं सगळं दंगा व्हायचा, ''अरे, मोठा दगड मागे लाव रे'' ''ही वीट त्या फटीत टाक'', ''अरे माझा तो मोठा बाजीप्रभू ठेवायला जागा कर रे.'' हजार सूचना, कोणाच्या पायावर फरशी पडते, एखादी वीटबीट फुटते आणि साधारणता; एक तास, दोन तासाने दगड लावून व्हायचे. मग त्याच्यावर गोणपाट टाकायचा. एखादं दुसर्याने एखाद्या वाण्याकडून तो आणलेला असतोच. हा, आता सगळे एका मजेशीर कामात बुडलेले असतात. चिखल करणे, एक बादली पाणी मिळाली की, साधारणता: दहा मिनिटात सगळ्यांचे हात आपसूक काळे झालेले असतात, ''अभ्यास करा'' सारखे हात घाण करा असे इथे सांगायला लागत नाही. मग वेगवेगळ्या जागी शर्ट आणि पँटलाही चिखल लिंपला जातो. किल्ला सपाट बिपाट केले जाते. बिळे बुजविली जातात. उरलेल्या चिखलात गुहा, जंगल, शेत केले जातं. मग काय, मोहरी शिंपडली की, किल्ला रेडी! एकदम फिट!
पण हे किल्ला पुराण इथेच थांबत नाही. यानंतर गँग बाहेर पडते ते मावळे आणायला. मावळे लावायचे, पणत्या लावायच्या मग कोणत्या तरी XYZ स्पर्धेत भाग घेतलेला असतो त्यांची वाट पाहायची. बहुतेकदा ते येत नाहीतच. पण पाळीपाळीने सगळ्या किल्ल्यापाशी थांबलेले असतात,आत्ता येतील ,मग येतीत म्हणून.. या सगळ्यात दिवाळी कशी संपली कळतंच नाही.
या किल्ला पुराणात अनेक घटना घडायच्या, घडतात. जेवणखाणं तर आपण विसरलेलो असतोच. मग, घरातून आईचा ओरडा ''अरे, काही खाणार आहेस की नाही, का रात्रीच घरी येणार आहेस?'' मग चिखलाचे हातपाय घेऊन घरी आल्यावर बाबाचा ओरडा ठरलेला. पोरापोरामध्ये भांडणे ठरलेली. कोणतरी रुसत, त्याला शांत करायचे. आणि जय शिवाजी जय भवानी म्हणत दिवाळी घालवायची. शेवटच्या दिवशी चार सुतळी बाँब गुहेत लावले तर ढूम्म! स्वतः:च किल्ल्याची लक्तरे वेशीवर टांगायची.
पण तुम्ही म्हणाल यात नवीन ते काय? आम्ही पण असंच करायचो.आता सगळ आठवतय ते आम्हाला , बरोबर आहे, कारण तीच आपली परंपरा आहे. पण आजकाल परिस्थिती बदलत आहे. सगळी पोरं ''काउंटर स्ट्राईक, हरक्युलेस'' खेळत आहेत आणि यांच्यापुढे किल्ले मागे पडत चालले आहेत. आणि काही पालक देखाल मुलांना वेगवेगळ्या परीक्षेत ,शिबिरात अडकवून ठेवत आहे आणि हा आनंद हिरावत आहेत .. त्यामुळेच सगळे तज्ञ ,लेखक ओरडून सांगत आहेत, असं करु नका म्हणुन .. नेहमी सांगतात, पण तसा फारसा फरक पडत नाही.च महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे असं सांगावं का लागतं? आपणच आपल्या मुलांना यापासून का परावृत्त करतो? काही पालकांना एवढी काळजी, की मातीने तुला त्रास होईल म्हणून माती ते आणून देणार, प्लॅस्टिकचे मावळे देणार, मग म्हणणार किल्ला कर. हे काय नविनच?
आजकाल मुलांचा आयक्यू चेक करतात. तो कमी आल्यावर चिडतात. मला एक सांगा, कसा वाढेल आयक्यू? किल्ल्यासारख्या उपक्रमामुळे जी मुलांची वाढ होते ती इतरवेळी होतच नाही. नकळतपणे मुले रचना करायला शिकतात. एकत्र काम करायला शिकतात. अचानक आलेल्या संकटांना तोंड द्यायला शिकतात हे शिक्षण इतर कुठे मिळते बरे? निदान मी तरी शिकलेलो .. आपण त्यांना मदत केली , बंधन घातले तर तेच या शिक्षणाला मुकतात, त्यामुळे, त्यांना पूर्ण स्वातंत्र्य देऊन किल्ला करू देणं हेच चांगलं!
त्यांचे काय झालंय, असतंय तोपर्यंत त्याची किंमत कळत नाही. या म्हणीप्रमाणे आपण आपल्या मराठी परंपरांना विसरलोय. पारंपरिक गोष्टी सोडायच्या ..आणि नव्या गोष्टींनी आयक्यू वाढत नाही म्हणून ओरडायचं! लेख लिहायचे! मग असे प्रश्न आमच्या इंग्लिशच्या पुस्तकात येत आहेत. वाईट वाटत ते आपल्या करंटेपणाचं! सगळं असताना मॉडर्न व्हायच्या नादात आपण हे घालवतोय. आणि, संस्कृती मरतेय म्हणून गप्पा मारतोय, असो, सगळेच तसे आहेत असे मुळीच नाही ,पण आपण त्यात जाऊ नये एवढी काळजी घेउया ना ?काय म्हणता ? आणि ते सगळं राहु दे , आपली संस्कृती जपण्यासाठी म्हणून नव्हे, तर या स्पर्धेच्या जगात तुम्हाला तुमच्या पोराचा आयक्यू, इक्यू वाढवायचा आहे, म्हणून तरी, त्याला किल्ला करू दे, तुम्ही खूश आणि तो ही! बस्स, या दिवाळीला एवढंच सांगणं!
सर्व मिपाकराना दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा व ही भेट !!!! गेल्या डिसेंबर महिन्यात लिहिलेला हा अप्रकाशित लेख परवा सहज सापडला , तो समयोचित वाटल्याने इथे देत आहे .
प्रतिक्रिया
4 Nov 2010 - 7:53 pm | यशोधरा
छान लिहिलं आहेस. लहानपणी किल्ला करत असू त्याची आठवण झाली. :)
4 Nov 2010 - 8:31 pm | स्पा
मझा आ गया............. ;)
आम्ही यावर्षी पण किल्ला केला आहे......... टिंग टिंग.... :)
4 Nov 2010 - 8:35 pm | विनायक पाचलग
बेश्ट
7 Nov 2010 - 7:53 pm | आत्मशून्य
एक मस्त फोटो चिकटवा की राव
4 Nov 2010 - 9:33 pm | कवटी
मानसिक , शारिरीक आणि बौद्धीक अशी तिनही वये एकच आल्याने रेझोनन्स वाढुन लेख खुपच सुंदर झालेला आहे.
विन्या.... मर्दा जिंकलस...
4 Nov 2010 - 11:20 pm | आत्मशून्य
कोण गाढव आपल्या मूलाला किला नको counter strike khel खेळ असे म्हण्तो ? counter strike ही मूलान्चि नीवड आहे, आणी तूमची निवड मूलावर लादू नका. तूमच्याच काय तूमच्या वाडीलान्च्या काळात counter strike आसते तर ते सूध्दा counter strike खेळले असते. आस्ल्या गोश्टीनि विकास खून्टत नसतो.
4 Nov 2010 - 11:35 pm | विनायक पाचलग
कोण गाढव आपल्या मूलाला किला नको counter strike khel खेळ असे म्हण्तो ?
असे कोणीही म्हणत नाही .. पण किल्ला कर असे तरी म्हणतात का ?
जाता जाता . काऊंटर स्ट्राईक ने काय विकास होतो ते समजले तर बरे होईल ...
जाता जाता - मी पण एक मुलगाच आहे .. गृहस्थाश्रमी किंवा केस पिकलेला नाही .. सो मी काही लादतोय असे वाटत नाही
4 Nov 2010 - 11:57 pm | आत्मशून्य
हा धाग्याचा विषय आहे का ? असो .... काऊंटर स्ट्राईक हा ACTION STRATEGY TEAM GAME आहे आणी ही त्याची चान्ग्ली बाजू आहे. हा आता त्यात VIOLENCE आहे, आणि म्हणून तो नको असे कोण म्हणत असेल तर तो महात्माच सम्बोधावा....
बाकि आप्ल्या मूलान्च्याच का ? त्यान्च्या पनजोबान्च्या कालात काऊंटर स्ट्राईक आसता तर ते सूध्दा हेच खेलत बस्ले अस्ते........
खरे तर विकासाचा मूद्दाच इथे यीत नाहि. मूलनि वेळ कसा घाल्वावा ह त्यान्चा प्रश्न आहे. ज्याना वाट्ते कि त्यान्चा विकास खून्ट्ला आहे त्यानि खूशाल किल्ले बनवावे. ते काय फक्त लहान पोरानि बनवावेत असा नियाम थोडच आहे ?
थोडे छोट्या गावात जाउन पाहा आजहि मूले मातिचा किल्ला करतात , बाकी मूठभर मूर्ख आपल्या मूलाना तसे करू देत नसतील तर त्या बद्दल एव्हडी काव काव खरच नको...कारण किला बनवणे हा एक शूध्द आनददायी अनूभव असावा, ती कोणावर सक्ति असू नये...
5 Nov 2010 - 12:04 am | विनायक पाचलग
मी सक्तीचा विषयच काढलेला नाही , कोणी पण बनवावा ना ...
हा एक भाग आमच्या शहरी भागातुन हरवतोय असे मला वाटले म्हणुन मी लिहिले एवढे साधे आहे हे ....
गावात काय चालते ते मला माहित नाही आणि मी त्याबद्दल काही बोललेलो नाही ......
5 Nov 2010 - 12:17 am | आत्मशून्य
:) मूळात मि शहरी आणी गावकरी फरक करत नाहि, मूलाना सहजतेने काय उपलब्द आहे त्याचा ते वापर वीकास आथ्वा मनोरनजनासाठी करणार. गावातील मूलात COUNTER STRIKE ची आवड नाहि म्हण्ने तितकेच चूक आहे जितके शहरातील मूलाना कील्ले करायला आवड्त नाहि आसे समजणे.
हा एक भाग आमच्या शहरी भागातुन हरवतोय असे मला वाटले म्हणुन मी लिहिले एवढे साधे आहे हे
हे साधे आसते तर लिहायची गरज काय होती ? मूखप्रूष्ठावरील पुस्तकविश्व दिवाळी अंक चित्र पहावे
तूम्हाला किल्ला दीवाळी हे कूठे हवे ? CEMENT च्या जगलात कि आशा गावात ? आता या गावातून शहर हरवत चालले असा लेख कोणी लिहावा काय ?
टीप : माझे घर व आजोळ हे शहरामधेच होते/आहे .
5 Nov 2010 - 8:03 am | विनायक पाचलग
तुमच्याशी बोलताना मला राहुन राहुन माझ्यासमोर झालेल्या कुंडलकर - गवस वादाची आठवण येत आहे.
आपले भवताल आणि अनुभव वेगळे आहेत , प्रत्येक जण आपापल्या अनुभवावर लिहितो ,ते वेगवेगळे असु शकतात .. पण त्यासाठी एकाने दुसर्यावर कुरघोडी करायचा प्रयत्न मात्र करु नये ,किंवा मी म्हणतो तेच खरे असेही करु नये एवढेच ...
बाकी , तुम्हाला दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा !!! :)
विनायक
6 Nov 2010 - 1:30 am | आत्मशून्य
तूमच्या शेवटच्या प्रतिक्रियेशी मी सहमत आहे. पण आज काल बरेच लोक बर्याच विषयानवर आनवश्यक च्रर्चा करतात .... ते सूध्दा जगबुडी झाल्याच्या आविर्भावात. लेखातील तात्वीक चर्चा सोडली तर एकूनच लेख NOSTALGIC बनवतो. आपण खूप समजूतदार आहात, चूकभूल देणे घेणे.
6 Nov 2010 - 8:35 am | विनायक पाचलग
खुप धन्यवाद ...
4 Nov 2010 - 11:57 pm | रेवती
आम्ही बरिच वर्षं किल्ला करायचो.
तो मोडायला नंतर जिवावर यायचं. एकेवर्षी बरेच दिवस राहिला व नंतर मोडताना साप सळसळत निघून गेला.
जाताना भलीमोठी कातही टाकली होती. आश्चर्यानं थक्क झालो होतो आम्ही मुले!
5 Nov 2010 - 2:49 am | पक्या
छान लेख.फ्लॅट सिस्टीम मधे किल्ले करणं कमी होत चाललयं हे खरं आहे.
आमच्या बिल्डींग मध्ये गेल्या कित्येक वर्षात मुलांनी किल्ला केलाच नाही आणी कोणी मोठ्यांनीही कधी पोत्साहन दिलेले पाहिले नाही. (त्यात मीही आलोच पण बाहेर रहात असल्याने तशी संधिही मिळाली नाही.)
5 Nov 2010 - 9:29 am | कोकणप्रेमी
मी माझ्या मुलान्ना मनोसोक्त किल्ला करु देतो. मुलान्वर थोडा आरडाओरडा पण करतो म्हणजे बायको पण शान्त रहाते. कारण नन्तर सगळी आवराआवर तीला करायला लागते. तेवधा समतोल साधला कि बर्याच गोश्ति साध्य होतात. मुले खुश व बायकोहि खुश म्हणजे आपण हि खुश .
5 Nov 2010 - 12:00 pm | राजेश घासकडवी
पहिला अर्धा भाग आवडला. पोरापोरांनी परीक्षा संपल्यावर धुम ठोकून आपले गमतीचे उद्योग करणे अशा आठवणींशी बहुतेकांना एकरूप होता येतं.
पण नंतरचं तत्वचिंतन ओढून ताणून आणल्यासारखं वाटलं. आपण आपल्या संस्कृतीतून काहीतरी हरवतोय असं म्हणणं ठीक आहे, पण त्याची जागा घ्यायला दुसरं काहीच नाही असं म्हणणं बरोबर वाटत नाही. ते खरं असतं तर एव्हाना बाल्य वगैरे गोष्टी संपून गेल्या असत्या कारण प्रत्येक पिढीतले वृद्ध हेच म्हणत आलेले आहेत.
कदाचित काहीशे वर्षांपूर्वी पोरांनी किल्ले करायला सुरूवात केली असेल तेव्हासुद्धा त्यांच्या वयोवृद्धांनी 'आमच्या काळी कोळशाने भिंतीवर चित्रं काढायचे, ते आता आपण हरवत चाललो आहोत' अशी बोंब मारली असेल.
5 Nov 2010 - 1:50 pm | स्पंदना
छान रे विनायका!
अगदी सह्ही आठवण करुन दिलास बघ . अजुन करतो का रे किल्ले? अन मोहरीची हिरवळ..
काय छान वाटायच ना तेन्व्हा?
5 Nov 2010 - 6:29 pm | विनायक पाचलग
हो
करतो अजुनही
यावर्षी जरा वेळ कमी मिळाला ...
5 Nov 2010 - 6:46 pm | वेताळ
मस्त लेख.ह्यावर्षीपण केला आहे
8 Nov 2010 - 4:11 am | हंस
विनायकराव छान आहे लेख. आम्ही मोहरी एवजी हळीव टाकायचो.
10 Nov 2010 - 9:38 pm | प्रमोद सावंत१
प्रिय विनायक,
सुंदर ले़ख लिहील्याबद्दल आभार. आपल्याकडे लेखाद्वारे प्रसंग जशास तसा उभा करण्याचे कसब आहे. लेखातील जे आपण मुद्दे मांडले आहेत, ते खरंच विचार करण्यास प्रवृत्त करतात. भविष्यात दे़खील असेच लेख आपणाकडून वाचावयास मिळतील ही अपेक्षा.
धन्यवाद!
11 Nov 2010 - 7:05 am | बेसनलाडू
घासकडवी साहेबांच्या विड्या फुंकल्यावर वाचून काढले. आवडले.
(स्मरणरंजक)बेसनलाडू