परवाचाच अनुभव आहे. म्हणावे तर साधासाच. पण खूप काही शिकवून जाणारा. असे अनुभवच आपले जीवन खुलवत असतात, फुलवत असतात. आयुष्याचे निराळेच पैलू अवचित आपल्या समोर आणून आपले भावविश्व कुठेतरी समृद्ध करत असतात.
झालं असं की मी बस मधून एके ठिकाणी निघालो होतो. आत गेल्यावर बसायला जागा मिळाल्याने स्वारी थोडी खुष होती. एक दोन स्टॉप गेल्यावर अचानक एक मध्यम वयीन काकू आल्या आणि ओरडूनच म्हणाल्या की मला बसू द्या..स्त्रीयांचा काही मान ठेवत नाहीत.. नियम पाळत नाहीत वगैरे वगैरे.. मी खरेतर स्त्रीयांसाठी राखीव जागेवर बसलो नव्हतो. माझा चेहरा एकदम गोरामोरा झाला. अपमान गिळून मी कसाबसा चेहरा लपवत जागेवरून उठलो तरी त्या बाईंचे शिव्याशाप चालूच होते. लग्गेच बसमधून उतरावे असे मनात येत होते पण काय करणार.. इलाजच नव्हता.
पुढल्या एका बाकावर एक आज्जी बसल्या होत्या. त्या सर्व प्रकार पाहत होत्या. त्यांनी माझ्याकडे पाहून एक हलकेसे स्मितहास्य केले आणि म्हणाल्या 'जाऊदे ! मनाला नको लाऊन घेऊ.' त्यांच्या त्या दिलासा देणार्या हास्याने मला फार फार बरे वाटले. फार गोड आज्जी होत्या. पुढचा प्रवास माझा एकदम हलक्या मनाने झाला. स्मितहास्याची जादू होती. उतरताना मी त्या रागावणार्या काकूंकडे हसून बघितले. त्यांना माझे वागणे एकदम आश्चर्याचेच वाटले. त्या खजिल झाल्या. बाकावरल्या आज्जी हे पाहत होत्या. उतरताना नुसती आमची नजरानजर झाली. आणि त्यांच्या चेहर्यावरचे ते स्मित मी पुन्हा एकदा जपून ठेवले माझ्या मनाच्या कुपीत.
कुणीतरी हवं असतं
स्मितहास्य करणारं
हलकेच हसून आपले
आसू पुसणारं.
--लिखाळ
तेच ते तेच ते !!
प्रतिक्रिया
26 Oct 2010 - 5:16 pm | गणपा
:)
26 Oct 2010 - 6:56 pm | असुर
+ :-)
--असुर
26 Oct 2010 - 5:17 pm | llपुण्याचे पेशवेll
ऐला हे काय आहे?
26 Oct 2010 - 5:20 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
प्रोफेसर धनुष्कोडींच्या यावर काय मतं आहेत हे पराकुमार यांच्या सिद्धहस्त लेखणीतून वाचायला आवडतील. लिखाळा, तुझी शब्दांची वही सापडली काय रे?
26 Oct 2010 - 5:41 pm | परिकथेतील राजकुमार
काय 'श्रीसां'चा अनुग्रह वगैरे मिळाला का काय लिखाळभावजींना ?
आज मी प्रि.वैद्यांच्या घरी गेलो होतो.अलीकडे प्रो.देसायांना बरं नसतं म्हणून ते घरीच असतात.मी वैद्यांना म्हणालो आपण दोघे बोलत बोलत तळ्यावर फिरायला जाऊंया.माझी कल्पना त्यांना आवडली.
मी वैद्यांना म्हणालो,
"प्रिन्सिपल साहेब,बरेच वेळा मी पाहलंय की काही माणसं सहजपणे खास स्मितहास्य करतात.ही ह्या लोकांची वृत्ती कशी निर्माण होते.?"
माझा प्रश्न ऐकून प्रि.वैद्य हंसत हंसत मला म्हणाले,
हंसणं- खिदळणं नुसतंच प्रेम जारी ठेवत नाही तर मैत्री आणि कुटूंब पण,आणि हा विपत्तीत सुद्धा मार्ग काढण्याचा नक्की आणि सोयीस्कर उपाय आहे.हसणं हे एक कामावरच्या सदाचाराचं निर्देशक आहे.कदाचीत ह्यामुळेच कामाचा बोजा सहजगत्या उतरता येत असावा.ज्या ठिकाणी हंसण्यात वाटेकरी होतात त्या ठिकाणी सख्य, ईमानदारी, प्रामाणिकपणा, आणि आत्म बोध-ह्या सर्व चांगल्या गोष्टी जीवन उभारायला उपयोगी पडतात.म्हणून मी माझ्या सुहॄदांन नेहमी म्हणतो,
"तुमच्या आणि इतरांच्या हंसण्या-खिदळण्यात भाग घ्या आणि ऐका.ज्यावर तुम्ही प्रेम करता-लोक,स्थान आणि तुमचा पेशा ह्या गोष्टींच्या जवळ तुम्हाला नेण्याच्या प्रयत्नात ही संवय उपयोगी होईल. "
हे ऐकून मी वैद्यांना म्हणालो,
"जरा विस्ताराने सांगितलंत तर बरं होईल."
मला म्हणाले,
"असं बघा,एका स्थरावर प्रत्येकाला मृत्यु येणार,कुणाचं प्रेमभंग होणार,कुणाला जीवनात अपयश येणार हे माहित असतं कळतही असतं.प्रेमाचा अनुभव प्रत्येकाला येत असणार,कुणी कधी चकित होऊन आनंदी होत असणार, अचानक जवळच्याची भेट होऊन कधी कुणी प्रसन्नही होत असणार. पण ह्या बाबी सामान्यपणे प्रस्थापित झालेल्या असतात."
असं म्हणत वैद्य पुढे म्हणाले,
ह्यातून एकमेकाची सहायता करण्याची वृत्ती आपण आणूं शकतो. या विविधतापूर्ण समाजातल्या उणीवां ज्या समानतेचा वाटेकरी होण्यास आणि भेदभावांना सामावून घेण्यात अडथळे आणतात त्या उणीवामधून निर्माण झालेली पोकळी भरायला आपण सुरवात करू शकतो..ह्यावरून एकमेकाशी संबंध प्रस्थापित कसे करायचे हे तुम्हाला माहित होऊ शकतं."
26 Oct 2010 - 5:50 pm | लिखाळ
जबरदस्त ! प्रिं वैद्य भारीच आहेत. त्यांना आणि आपल्याला दंडवत!!
अजून शोधा, फुलपाखरी, मुक्तपीठी लेखन भरपूर सापडेल. माझा आपला खारीचा वाटा :)
26 Oct 2010 - 9:52 pm | प्राजु
पर्या.. अशक्य आहेस!! ___/\___
27 Oct 2010 - 3:46 am | मिसळभोक्ता
जाहीरः एका वयोवृद्ध व्यक्तीच्या लेखनशैलीचे असे विडंबन वाचून, एक सर्वसामान्य मिपाकर म्हणून शरम वाटली.
खाजगी: जियो पर्या !!
26 Oct 2010 - 5:26 pm | प्रियाली
आजी आणि काकूंचे संगनमत असावे असा आमचा अंदाज आहे. काकू प्रवाशांना करवादून बोलणार, जागा पटकवणार, आजी स्मितहास्य करणार, वैतागलेला प्रवासी खूष होणार.
सगळेच हॅप्पी!!
तुम्हाला हॅप्पी बड्डे!
26 Oct 2010 - 5:37 pm | लिखाळ
ही ही .. पण त्यामुळे मला केवढा मोठा अनुभव मिळाला. :)
शुभेच्छां बद्दल आभारी आहे. (एक छोटेसे स्मितहास्य :) )
26 Oct 2010 - 5:53 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
लिखाळ, तुम्ही असेच छोटे छोटे अनुभव सातत्याने सगळ्यांसमोर मांडत रहा ही विनंती.
26 Oct 2010 - 10:16 pm | पिवळा डांबिस
सहमत!
काकू कर्कश बोलणार| लिखाळ घाबरून उठणार||
आज्जी खुद्कन हसणार| गंमत होणार निश्चित ||
:)
27 Oct 2010 - 3:47 am | मिसळभोक्ता
काकू प्रवाशांना करवादून बोलणार, जागा पटकवणार, आजी स्मितहास्य करणार, वैतागलेला प्रवासी खूष होणार.
हे जरा "युद्ध माझा राम करणार.." च्या चालीवर गाऊन बघितले. मस्त जमलेय !
जय बापू !
28 Oct 2010 - 8:27 am | केशवसुमार
लिखाळ भाओजी अनुभव लिहिणार | पिंडाकाका महावाक्य टाकणार|
मिभोकाका ते चालीत गाणार| विरजण लागणार निश्चित||
28 Oct 2010 - 11:18 pm | शिल्पा ब
पिंडाकाका नाही हो पिडांकाका...
26 Oct 2010 - 5:56 pm | निखिल देशपांडे
लिखाळ भावोजी..
छान अनुभव, असे छोटे छोटे अनुभव जीवन समृद्ध करतात हो..
असेच वेगवेगळे अनुभव मिपावर वाचायला मिळतात आणि त्यातुनच आम्ही पण अनुभव समृद्ध होत जातो.
एका स्मिताचे गणित तुम्ही फार चांगल्या पद्धतीन उकलुन सांगीतले आहे. पहायला गेलो तर फार साधी गोष्ट आहे पण जसे मास्टर कार्ड च्या जाहिरातीत काही गोष्टी प्राईसलेस असतात तसेच हे स्मित.
तुमचे असेच अनुभव येउद्या
26 Oct 2010 - 6:46 pm | राघव
खरंय! खूप छान.. स्मितहास्य! :)
26 Oct 2010 - 7:10 pm | विकास
छोटासा पण बरेच काही सांगणारा हा लेख एकदम आवडला! अजून सातत्याने लिहीत रहा ही विनंती!
26 Oct 2010 - 10:16 pm | बेसनलाडू
अजून सातत्याने लिहीत रहा ही विनंती!
हेच म्हणतो.
(सहमत)बेसनलाडू
26 Oct 2010 - 7:13 pm | पैसा
स्मित ही अशी एक वक्ररेषा आहे, की जी बर्याच गोष्टी सरळ करते!
26 Oct 2010 - 7:15 pm | विकास
स्मित ही अशी एक वक्ररेषा आहे, की जी बर्याच गोष्टी सरळ करते!
:-)
26 Oct 2010 - 11:59 pm | शिल्पा ब
+ १ आवडले
27 Oct 2010 - 3:49 am | मिसळभोक्ता
स्मित ही अशी एक वक्ररेषा आहे, की जी बर्याच गोष्टी सरळ करते!
मी चुकून "स्मिता" असे वाचले. आणि सगळ्या वक्ररेषा डोळ्यासमोर तरळल्या...
28 Oct 2010 - 8:32 am | केशवसुमार
पैसातै 'स्मित' लिहिणार | मिभोकाका 'स्मिता' वाचणार|
सगळ्या वक्ररेषा डोळ्यासमोर तरळणार| विरजण लागणार निश्चित||
26 Oct 2010 - 7:33 pm | इन्द्र्राज पवार
मन प्रसन्न करणारा अनुभव वाटला.
भाषेची अनेकविध आणि मुग्ध करणारी रूपे आहेत जी आपण सहजगत्या वापरू शकतो. श्री.लिखाळ याना त्या प्रवासी महिलेने सौम्य भाषेत "ती जागा महिला आरक्षित आहे..." इतके जरी म्हटले असते तर त्यांनी ती विनंती चटकन मानली तर असतीच शिवाय त्यांच्याही तोंडून 'सॉरी' गेले असते. विषयच संपला असता व उरलेला प्रवासही गारव्यात झाला असता. पण असे होणार नसते. भाषेची नको ती रूपे आदळण्याचा काही व्यक्तीना (स्त्री/पुरुष दोन्ही घटक) इतका सोस असतो की त्याच्या परिणामाची क्षीती न बाळगता ते तिचा बिनदक्कत वापर करीत असतात. त्यातून मने दुभंगण्याशिवाय हाती काही येत नाही.
अशावेळी 'स्मितहास्याचे' कमालीचे महत्व पटते. वादाच्या प्रसंगी कुठल्याही पट्टीत माणसे काहीही बोलत असली, तरी त्याला प्रत्युत्तर द्यायचेच असेल तर एक स्मितहास्य विलक्षण पारदर्शी आणि परिणाकारक प्रभाव दाखविण्यास समर्थ असते.....जे त्या दुसर्या बाकावरील आजीच्या स्मिताने श्री.लिखाळ याना शिकविले.
इन्द्रा
27 Oct 2010 - 12:01 am | शिल्पा ब
बाकी ठीक आहे हो , पण लिखाळ आरक्षित सीटवर बसलेले नव्हते असं लिहिलंय त्यांनी...अंमळ घाईत प्रतिसाद दिला का? ;)
26 Oct 2010 - 8:44 pm | रेवती
लिखाळसाहेबांचे अभिनंदन!
बसमध्ये जागा मिळाल्याबद्दल हो!;)
थोडावेळ का होइना जागा मिळाली ना?;)
तुमच्या अनुभवावरून मलाही जागा पटकावण्याचा उपाय सापडला.
असे अनुभव लिहिल्याने तुमच्याबरोबर वाचकही अनुभवसमृद्ध होतात.
धन्यवाद!
26 Oct 2010 - 8:55 pm | ईन्टरफेल
कंपुत जागा सापडलि का?
ता...ई
...............
धन्यवाद!
26 Oct 2010 - 8:57 pm | रेवती
छे हो!
इतक्या सहजपणे येउ देतात होय ते कंपूवाले!;)
तुम्ही काळजी करू नका.
26 Oct 2010 - 8:48 pm | मुक्तसुनीत
लिखाणाच्या प्रकारामधेच त्यातली गोम दडवलेली आहे :
* बालकथा
* मौजमजा
* आस्वाद
(आस्वाद कसला डोंबलाचा माहिती नाही !)
अहाहा. इतक्या अलगदपणे , मोरपीसासारखे येऊन मिशी कापून नेणारे सटायर लिहायला माणूस पाताळयंत्री पाह्यजे राव ! विडंबन लिहिण्याकरता ते बटबटीत आणि ठसठशीत असले पाह्यजे या गैरसमजाला चारीमुंड्या चीत करणारे लिखाण. लय भारी.
एक नम्र विनंती : या उत्कृष्ट सटायरचे शीर्षक जरा अंमळ अजून मार्मिक हवे होते. प्रस्तुत शीर्षक "काईंडा गिव्ह्ज इट अवे." ;-)
26 Oct 2010 - 10:09 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
१० पैकी १०!
पण तरीही तळ्याकाठचे प्रि. वैद्यच जास्त आवडले ब्वॉ! प्रि. वैद्यांना माझा शिर साष्टांग नमस्कार.
अवांतरः पुढचा फुलपाखरी लेख कौटुंबिक साहित्यकलहावर का? ;-)
28 Oct 2010 - 6:04 am | विजुभाऊ
प्रि. वैद्यांना माझा पद्धत शीर साष्टांग नमस्कार.
असो. लेख आवडला बरका लिखाल दवणेजी. अर्र लिखाळ भावोजी.
हा लेख युयुत्सुजी नी लिहिला असता तर?
26 Oct 2010 - 11:31 pm | लिखाळ
धन्यवाद मुसु :)
योग्य शब्दांत आपण माझ्या लेखनाचे मर्म वाचकांसमोर आणलेत. चाणाक्ष वाचकांनी ते आता (तरी) ओळखले असेलच :)
अदिती म्हणते त्या प्रमाणे कौटुंबिक नातेसंबंधांबाबत मुक्तपीठी लेख लवकरच पाडतो ;)
27 Oct 2010 - 12:11 am | विकास
चाणाक्ष वाचकांनी ते आता (तरी) ओळखले असेलच
अहो तसे जास्त होऊ नये म्हणूनच आपली (बस)गाडी रूळावर ठेवायचा प्रयत्न केला ;)
27 Oct 2010 - 5:36 pm | लिखाळ
जूने जाणते लोक गाडी 'योग्य' रुळावर ठेवणार याची खात्री होतीच. :)
26 Oct 2010 - 10:17 pm | सुहास..
मि.लिखाळ, स्माईल प्लिज, क्लिक !!
26 Oct 2010 - 10:33 pm | धनंजय
हा हा
(क्षमस्व... हाहा असे नादहास्य नाही, तर स्मितहास्य)
(आम्हाला फसवलेत बरे. हाहा हास्याच्या आधी "हाहंतहंत लिखाळं श्रीसा उज्जहार" असे क्षणभर वाटले होते.)
26 Oct 2010 - 10:52 pm | राजेश घासकडवी
मला तर बै हे लेखन वाचून आमच्या दुसरीतल्या कवितेची आठवण झाली
फुलपाखरू, छान किती दिसते, फुलपाखरू.
या वेलींवर फुलांबरोबर नननन उडते, फुलपाखरू
नननन म्हणजे आठवत नाहीये, गुणगुणतोय. पण त्या गुणगुणण्यात, शब्द न गवसण्यात बालपणाचं हरवणंच प्रतीत होतं नै?रम्य ते बालपण.
ते दुसरीतलं बालपण संपून थोडं मोठं बालपण सुरू झालं तेव्हा सुद्धा अशा अनेक जादू करणाऱ्या स्मितांना मी हृदयाच्या कुपीत जपून ठेवलेलं आहे.
कितीतरी स्मिता कितीतरी अस्मिता
कितीतरी पल्लव्या कितीतरी अपर्णा
कुपीत दाटीवाटी झाली....
26 Oct 2010 - 10:59 pm | मुक्तसुनीत
अरे ! कांय चांल्लाय काय !
बाकी फुलपाखरी कवितेपेक्षा त्याचे विडंबनच आठवतेय.. "पंतचि मु... निळेजांभळे" असो असो.
28 Oct 2010 - 8:41 am | केशवसुमार
लिखाळभाओजी अनुभव लिहिणार|गुर्जीना भलतीच 'फुलपाखरं' आठवणार|
भो चा बै होणार| मुसुंना धक्का बसणार निश्चित||
28 Oct 2010 - 10:55 am | बेसनलाडू
आज तुझा नुसताच बापू नाही तर महाबापू (महागुरु सारखा) झालाय रे अनिरुद्धा!
(भक्त)बेसनलाडू
26 Oct 2010 - 11:27 pm | लिखाळ
हा हा हा ....
>>कुपीत दाटीवाटी झाली..<<
आणि संप्रेरकांना उधाण आले .. ही ही
27 Oct 2010 - 12:05 am | शिल्पा ब
आमचे पण एक स्मितहास्य...
लेख वाचताना आधी मला असं वाटलं कि त्या आजींनी तुम्हाला त्यांची सीट दिली कि काय.. ;)
म्हणून मग कित्ती कित्ती छान ( आजी ) ! असं शीर्षक ;)
27 Oct 2010 - 12:24 am | इन्द्र्राज पवार
कानाला खडा लावला. आजपासून इथले सर्वच लिखाण भावुक होऊन वाचायचे नाही.
मी श्री.लिखाळ यांच्या अनुभवातील 'आज्जी' शब्दामुळे असे समजलो की त्यांचा हा अनुभव सत्य आहे. पण एखादी व्यक्ती आजीसारख्या प्रेमळ नातेसंबंधाचा 'सटायर' म्हणून वापर करून इतरांच्या भावनांशी खेळ करेल हे स्वप्नीही आले नाही. आणि मी तिथे माझ्या आज्जीला कल्पून ते लिखाण वाचले, कारण तीदेखील न चिडता कार्य कसे करावे याचेच धडे आम्हास देत असे...... म्हणून तो प्रतिसाद दिला.
पण आता वाईट वाटत आहे.
इन्द्रा
27 Oct 2010 - 12:31 am | विकास
पण आता वाईट वाटत आहे.
'जाऊदे ! मनाला नको लाऊन घेऊ.' :-)
;)
27 Oct 2010 - 5:28 pm | लिखाळ
इतके मनाला नका लाऊन घेऊ हो.. अनेक लोक अश्या तर्हेचे लिखाण करुन सारखे काहितरी 'मेसेज' देत-घेत असतात आणि आपापली जीवने समृद्ध करुन घेत असतात.. मला यातल्या अनेक गोष्टी बालकथेप्रमाणे वाटतात.. म्हणून मी असा लेख लिहिला. त्यात 'कुठेतरी', लेग्गेच, जीवन फुलणे, उलगडणे असले अशब्द जे नेमके या तर्हेच्या लेखनात चपखल बसतात ते बसवले. असो.
तुमच्या पहिल्या प्रतिसादात तुम्ही लेख आवडला लिहिले तीच पावती. इतर अनेकांनाही लेख आवडला हे कळाले. दृष्टीकोन वेगळे असले तरी मजा आली ना? लेख मौजमजा, आस्वाद याच सदरांत होता .. हेतू सफळ :)
27 Oct 2010 - 8:40 pm | इन्द्र्राज पवार
मान गये | थॅन्क्स !! स्काय इज क्लीअर
इन्द्रा
27 Oct 2010 - 3:25 am | चित्रा
लिखाळ गुरुजी परत लिहू लागले, आता सामंत काकाही येऊ देत.
27 Oct 2010 - 8:01 am | सहज
इतक छान छान लिहायला कसं सुचतं हो तुम्हाला!
प्रो. पराई यांचा प्रतिसाद तर अमूल्य आहे अमूल्य!
(स्वगतः हा इसम पण च्यायला लेडीज स्पेशल बस मधे चढलाच कशाला? )
27 Oct 2010 - 8:10 am | नंदन
_/\_
परा आणि गुर्जींचे प्रतिसादही खतरनाक!
बाकी लिखाळराव यांनी लौकरच 'आवर रे!' नावाने अशा लेखांचा संग्रह काढावा ही नम्र विनंती.
27 Oct 2010 - 5:31 pm | लिखाळ
हा हा .. आवरा रे! या सदरांत बसेल असे बरेच काही लिहून आलेले दिसते (उगवूनच्या चालीवर ;) ) 'वाचवेल इतपत तरी लिहारे!' असे नवे सदर चालू करावे का :)
27 Oct 2010 - 3:28 pm | रश्मि दाते
मस्त अनुभव्,कुठेतरी वाचले होते काकुना नीट बोलता आले अस्ते पण..........
most of problems of life are due to tone of our voice, it is not so important what you say,but it matters alot how you say that.
27 Oct 2010 - 5:35 pm | बिपिन कार्यकर्ते
अय्या!!! हे वाचाच्चं राहूनच गेलं होतं... बरं झालं आत्ता सापडलं. छान आहे हो... कसली ती जळ्ळी बाई... जाऊ द्या हो लिखाळ भावजी... काही काही बायकी कीनई पाशवीच असतात. तुम्ही मनावर घेऊ नका. पण आज्जींना नमस्कार वगैरे केलात की नै? करावा बरं का. थोरामोठ्यांचे आशिर्वाद असावेत पाठीशी.
27 Oct 2010 - 10:35 pm | लिखाळ
हा हा हा ...
आवर्जून प्रतिसाद दिल्याने डोळे पाणावले :)
आज्जींचे हसू डोळ्यांनी टिपून मनात साठवले आहे. मनोमन नमस्कार करुन आशीर्वाद घेईनच. आपुलकीने दिलेल्या सल्ल्याने गहिवरुन आले.