लाभले आम्हास भाग्य..

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
2 Oct 2010 - 3:23 pm

'लाभले आम्हास भाग्य.. '

भटसाहेबांच्या सिद्ध लेखणीतून उतरलेलं, अभिमानानं उर भरून यावा असं मायमराठीचं यथार्थ गुणगान करणारं हे काव्य आणि कौशल इनामदारचं संगीत असलेलं हे समूहगीत.. कौशलच्या हातून घडलेलं एक खूप चांगलं काम, मोठं काम! उत्तम हार्मोनियम वादक आदित्य ओक हा आम्हा दोघांचा कॉमन मित्र.. काही वर्षांपूर्वी एकदा आदित्यच्या घरी कौशल आला होता तेव्हा मलाही जेवायचं आमंत्रण होतं.. मला आठवतंय, जेवणानंतर हार्मोनियम पुढ्यात घेऊन कौशलने अगदी हौशीहौशीने त्याच्या डोक्यात घोळत असलेल्या अनेक चाली मला ऐकवल्या होत्या. तेव्हाही मला त्या वेगळ्या वाटल्या होत्या, कल्पक वाटल्या होत्या..

काहीच दिसांपूर्वी कौशलने बांधलेलं हे समूहगीत कानी पडलं आणि श्रवणसुख लाभलं..कौशलने अनेक गायक-गायिकांकडून गाऊन घेऊन या काव्याची एकेक ओळ गुंफली आहे हे नक्कीच खूप कल्पक आहे.. प्रत्येक गायक-गायिकेची आवाजाची जात वेगळी, शब्दस्वरांचा अंदाज वेगळा, शब्द - आवाज टाकण्याची, गाण्याची पद्धत वेगळी.. परंतु असं असलं तरी गाण्याचा भाव एकच.. हा भाव अर्थातच मायमराठीच्या प्रेमाचा, अभिमानाचा, आणि गौरवाचा!.. आणि त्यामुळेच ही गुंफण विशेष सुरेख झाली आहे, कौतुकास्पद झाली आहे..

या समुहगीताचा अजून एक विशेष असा की या गुंफणीतले काही काही गायक मला व्यक्तिश: आवडत नाहीत, तरीही त्यामुळे गाण्याच्या सौंदर्यावर त्याचा खटकण्याजोगा असा काहीच परिणाम जाणवत नाही.. कारण एक तर प्रत्येकाला एकच ओळ गायची आहे आणि कौशलने लावलेली मूळ चाल खूप छान असल्यामुळे माझे काही नावडते गायकदेखील अगदी सहज खपून गेले आहेत.. :)

प्रत्येकाच्या आवाजाची जात ओळखून, त्याची गायकी ओळखून त्याप्रमाणे कौशलने प्रत्येकाकडून गाऊन घेतलं आहे, हेही विशेष..

या लेखाच्या निमित्तानं मला या गाण्यातलं काय काय आवडलं हे सांगण्याचा एक प्रयत्न..त्याचप्रमाणे यातील गायकांवर माझी काही मतंही नोंदवण्याची संधी मी या निमित्ताने साधणार आहे..

-----------------------------------------------------------------------------------------

लाभले आम्हास भाग्य.. (येथे ऐका)

'लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी' - रविंद्र साठे आणि अश्विनी भिडे -देशपांडे.

रविंद्र साठे. 'अत्यंत गुणी' या एकाच शब्दात ज्याचं वर्णन करता येईल असा गायक. साठेसाहेबांचा बेसचा आणि मुळातलाच गोडवा असलेला आवाज..स्पष्ट शब्दोच्चार - 'बोलतो मराठी..'तला गंधार छान लागला आहे साठेबुवांचा.
अश्विनी भिडे -देशपांडे. जयपूर गायकीची तालीम मिळालेली गुणी गयिका. आवाजाची जात हळवी.. एरवी या गायिकेकडून ख्यालगायकीतलं हिंदीच अधिक कानावर पडलं आहे त्या पार्श्वभूमीवर तिचे मराठीतले बोल ऐकायला खूप छान वाटतात.. 'बोलतो' तल्या 'तो' वरची लहानशी हरकतवजा तान छान..

'जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी..' - सुरेश वाडकर.

सुरेशबाप्पांबद्दल मी काय बोलणार? जादुई, सुरीला आवाज..! मोठा माणूस..!

'धर्म पंथ जात एक जाणतो मराठी' - पद्मजा फेणाणी जोगळेकर - नो कॉमेन्टस्! विशेष काही न गाता उगाचंच मोठी झालेली एक गायिका..!

'एवढ्या जगात माय मानतो मराठी..' - हरिहरन.

सुरवातीलाच _/\_ अशी खुण करतो.. गझलगायकीच्या दुनियेतला अत्यंत सुरीला, रसिला गवई. तलम, जादुई आवाज. खूप कष्टानं स्वत:चं गाणं सिद्ध केलेला.. 'जगात' आणि 'मानतो' शब्दांवरील जागा खासच. अगदी हरिहरन ष्टाईल!

'बोलतो मराठी, ऐकतो मराठी..' - आरती अंकलीकर टिकेकर.

'नो कॉमेन्टस्' असं म्हणणार नाही. मूळची खूप गुणी गायिका. ख्यालगायकीची उत्तम तालीम घेतलेली. पूर्वी गायचीही छान. परंतु नंतर नंतर हिचं गाणं बिघडलं.. गाण्यात रुक्षपणा येऊ लागला. काही वेळेला शब्दोच्चारांमध्ये विनाकारणच लाडिकपणा येऊ लागला. अर्थात, ही माझी व्यतिगत मतं..

'जाणतो मराठी, मानतो मराठी..' - सत्यशील देशपांडे. - नो कॉमेन्टस्. हे कुमारांचे शागीर्द आहेत असं ऐकून आहे. असतीलही! एक मात्र खरं की कुमारांचं गाणं जरी यांच्याकडे नसलं तरी त्यांचं पुष्कळसं ध्वनिमुद्रण मात्र त्यांच्या संग्रही आहे! :)

'आमुच्या मनामनात दंगते मराठी..' - श्रीधर फडके.

आम्ही काय बोलणार? आमच्या गुरुजींचे आणि ललीमावशीचे चिरंजिव! परंतु अत्यंत गुणी. यांनी बांधलेल्या काही काही चाली छानच आहेत..

'आमुच्या रगारगात रंगते मराठी..' - साधना सरगम.

एक गुणी गायिका. अनेक वर्ष गाते आहे, चांगलं गाते. परंतु अजून स्वत:ची अशी काही खास ओळख नाही.. गुणी असूनही अमूक आवाज म्हणजे साधनाचा आवाज, अमूक गाणं केवळ साधनानेच गावं, अशी दुर्दैवाने ओळख नाही..

वरील ओळीपाशी तबला सुरू होतो ते छान वाटतं..

'आमुच्या उराउरात स्पंदते मराठी..' - स्वप्निल बांदोडकर.

मुलगा गुणी आहे. पण अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. त्याला शुभेच्छा!

'आमुच्या नसानसात नाचते मराठी..' - बेला शेंडे.

पुन्हा एक गुणी आणि सुरीली गायिका.. आवाजाची जात खूप चांगली आहे. हिनं तिचं सोशल लाईफ थोडं कमी करून गाण्याकडे, रियाजाकडे अधिकाधिक लक्ष द्यायला हवं. चांगले चांगले संगीत दिग्दर्शक मिळाल्यास ही मुलगी त्यांच्या चालींचं सोनं करेल यात शंका नाही..

'नाचते मराठी'तला शुद्ध मध्यम केवळ सुरेख. शुद्ध मध्यम हा स्वरच अद्भूत आहे.. एकदा केव्हातरी सवडीनं या शुद्ध मध्यमावर आणि त्यातील गाण्यांवर एक लेखच लिहायचा मानस आहे. 'पायी घागर्‍या करीती रुणझुण..' ह्या शब्दांनंतर 'नाद स्वर्गी..' मधल्या 'नाद' शब्दावर दीदी जो शुद्ध मध्यम लावते तिथे नादब्रह्माचा साक्षात्कार होतो.. असो!

'आमुच्या पिलपिलात जन्मते मराठी..' - देवकी पंडीत.

मुळची गुणी गायिका परंतु हिचं ख्याल गायन मला फारसं आवडलं नाही.. आवाजाची जात खूप छान. परंतु हिला बर्‍याचश्या मालिकांची शीर्षकगीतंच गात बसावं लागलं, हे दुर्दैव..

हुश्श.. दमलो बुवा.. अजून गेलाबाजार बरेच म्हणजे बरेच गायक शिल्लक आहेत. त्यापैकी शंकर महादेवन या गुणवंताची आवर्जून नोंद घेतो आणि हा लेख संपवतो..

एकंदरीत मात्र कौशलचं खूप कौतुक वाटतं.. भटसाहेबांचं हे आभाळाइतकं मोठं काव्य, मध्येच यमनाची आठवण करून देणारी कौशलची अनोखी चाल, गायक-गायकांनी केलेली गुंफण, सारंच सुरेख. गाणं अगदी लयदार झालं आहे. व्हायलीन आदींचं वाद्यसंयोजन, सुंदर कोरस, वापरलेले ठेके.. बहुत अच्छा काम किया है कौशलने..अगदी भारदस्त काम केलं आहे..! जियो...

बाबारे कौशल,

मी अश्याच चांगल्या चांगल्या गाण्यांचा भुकेला आहे.. माझ्या झोळीत असंच काही चांगलं वाढ.. आजपर्यंत बाबूजी, हृदयनाथ मंगेशकर, खळेसाहेब, वसंत प्रभू, राम कदम, आनंद मोडक, भास्कर चंदावरकर अश्या अनेक दिग्गजांनी माझ्या झोळीत दान टाकलं आहे. मध्येच कधी 'शब्द शब्द जपून ठेव..' ह्या जबरदस्त गाण्याचं दान देऊन विश्वनाथ मोरे यांनी, तर कधी 'केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर..' या हळव्या गाण्याचं दान देऊन अशोक पत्कींनी माझी झोळी भरून टाकली आहे..

यापुढेही असंच काही मोठं काम कर, सुरीलं काम कर, इतकंच सांगणं..

या गाण्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन आणि पुढील सांगितिक वाटचालीकरता शुभेच्छा..

तुझा,
तात्या.

संगीतमतआस्वादप्रतिभा

प्रतिक्रिया

परिकथेतील राजकुमार's picture

2 Oct 2010 - 3:32 pm | परिकथेतील राजकुमार

तात्या नेहमीप्रमाणेच कसदार लेखन :)

कौशल ह्यांच्या वाढदिवशीच तुमचा हा लेख यावा ह्याचा अधिक आनंद झाला.

विसोबा खेचर's picture

2 Oct 2010 - 3:47 pm | विसोबा खेचर

अरे वा.. आज त्याचा जन्मदिस आहे हे मला ठाउक नव्हतं..

त्याला मनापासून शुभेच्छा..

तात्या.

अमोल केळकर's picture

2 Oct 2010 - 3:54 pm | अमोल केळकर

नेहमी प्रमाणे मस्त लेख

अमोल

दत्ता काळे's picture

2 Oct 2010 - 3:58 pm | दत्ता काळे

लेख आवडला.

स्वाती२'s picture

2 Oct 2010 - 4:30 pm | स्वाती२

लेख आवडला.

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

2 Oct 2010 - 4:58 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

छान वाटला लेख!

इंटरनेटस्नेही's picture

2 Oct 2010 - 5:39 pm | इंटरनेटस्नेही

अतिशय सुंदर आणि महितीपुर्ण लेख.

(मराठी) इंट्या.

चिगो's picture

2 Oct 2010 - 5:53 pm | चिगो

सुंदर गाणं आणि त्याला दिलेली सुमधुर चाल... गाण्यात मधेच लहान मुलीच्या आवाजात ओळ आहे, ती पण मस्त जागा..
आणि अशा सुंदर गीताचे तात्यांनी केलेले सुरेख रसग्रहण.. क्या बात है !! :-)

मीनल's picture

2 Oct 2010 - 5:55 pm | मीनल

लेख आवडला.
तूमची मत स्पष्टपणे मांडली आहेत. त्यात जाण आणि अनुभव आहे.

सहज's picture

2 Oct 2010 - 7:08 pm | सहज

चांगले गाणे. धन्यु.

पैसा's picture

2 Oct 2010 - 11:36 pm | पैसा

कौशल इनामदार यांच्या चाली नेहमीच छान असतात.

सद्दाम हुसैन's picture

3 Oct 2010 - 12:58 am | सद्दाम हुसैन

वाह खेचर उस्ताद वाह् !

तात्या,
जेवढ लिहिलय ले खुपच छान आहे..
पण मधेच टंकायचा कंटाळा आल्यासारखे पुढचे बरेच सोडून दिलय अस वाटतय...
जशी सवड मिळेल तसे बाकिच्या गायकांविषयीपण लिहा हिच विनंती....

आपला
(कंदिलधारी)आंबोळी

ऋयाम's picture

3 Oct 2010 - 8:47 am | ऋयाम

>पण मधेच टंकायचा कंटाळा आल्यासारखे पुढचे बरेच सोडून दिलय अस वाटतय...
>जशी सवड मिळेल तसे बाकिच्या गायकांविषयीपण लिहा हिच विनंती....
बरोबर! असंच वाटतं आहे!

बाकी छान. :)

विसोबा खेचर's picture

3 Oct 2010 - 12:36 pm | विसोबा खेचर

प्रतिसाद देणार्‍या सर्व रसिकावरांचे आणि वाचनमात्रांचे आभार..

तात्या.

--
आमच्या संगीताच्या सार्‍या व्याख्या अन् अपेक्षा इथे पूर्ण होतात!

वा!! मस्त लेखन. गाण्यातलं काही कळत नाही हो तात्या पण तुमचं लेखन आवडतं.
मलाही आरती अंकलीकरांचा आवाज रूक्ष वाटायचा पण असं बोलण्याची माझी काय बिशाद!
तसच वैशाली सामंतचा आवाज टोकदार वाटतो. त्यात स्नेह वाटत नाही. पण हे असं काही बोललं कि "तुम्हाला (मणजे मला)काय कळतय का गाण्यातलं?" असं म्हणतात.;)

सूड's picture

3 Oct 2010 - 8:44 pm | सूड

मस्त लेखन !!

विसोबा खेचर's picture

4 Oct 2010 - 10:51 am | विसोबा खेचर

रेवतीवैनी आणि सुधांशुरावांचे आभार..

रेवतीवैनी,

मलाही आरती अंकलीकरांचा आवाज रूक्ष वाटायचा पण असं बोलण्याची माझी काय बिशाद!

का बरं? एक श्रोता या नात्याने तुमचा अभिप्राय द्यायला काहीच हरकत नाही..

तसच वैशाली सामंतचा आवाज टोकदार वाटतो. त्यात स्नेह वाटत नाही.

सहमत आहे.. :)

हे असं काही बोललं कि "तुम्हाला (मणजे मला)काय कळतय का गाण्यातलं?" असं म्हणतात.

गाणं कळणं आणि गाणं आवडणं यात फरक आहे.. गाणं आवडण्याकरता वा नावडण्याकरता ते कळायलाच पाहिजे असा नियम नाही..

बिनधास्त लिहा.. :)

तात्या.

--
आमच्या संगीताच्या सार्‍या व्याख्या अन् अपेक्षा इथे पूर्ण होतात!

नंदन's picture

4 Oct 2010 - 12:29 pm | नंदन

लेख आवडला, मूळ गाण्याची आणि गायकांची उलगडून सांगितलेली वैशिष्ट्यंही मस्तच.