सरकारी धोरणात क्रिडा प्रकाराला जरी फारसे चांगले स्थान नसले तरी काही क्रिडा संघटनाची चांगली कामगिरी आणि खेळाडुंच्या अथक परीश्रमामुळे चांगले दिवस येउ लागले असे वाटत आहे.
आजच बातमी आली की भारताची महिला मुष्टियुद्ध खेळाडू एम.सी. मेरीकोम हिने सलग पाचव्यांदा विश्वविजेतेपद पटकावले आहे.
प्रथमतः तीचे अभीनंदन.
काही दिवसापुर्वी ऑलींपिकमधे कांस्य पदक मिळविणा-या सुशिलकुमार या मल्लाने जागतीक अजींक्यापद स्पर्धेत विजेतेपद मिळविले.
तत्पुर्वी तेजस्वीनी सावंतने इतीहास घडवला. नेमबाजीत जागतीक अजींक्यापद स्पर्धेत विजेतेपद मिळविले.
साईना नेहवाल जागतीक क्रमवारीत दुस-या क्रमांकावर पोहोचली आहे.
भारताच्या पुरूषांच्या व्हॉलिबॉल संघाने नुकतेच आशीयाई स्पर्धेत कास्यपदक पटकावले.
भारताच्या युवकांच्या व्हॉलिबॉल संघाने मागील वर्षी पुण्यात झालेल्या जागतीक अजींक्यपद स्पर्धेत चौथा क्रमांक मिळवीला होता.
(जाता- जागतीक व्हॉलिबॉल संघटनेला [FIVB] जागतीक फुट्बॉल संघटनेपेक्षा [FIFA] जास्त देश संलग्न आहेत. आणि या २२१ देशात क्रमवारीप्रमाणे भारत २५ व्या स्थानावर आहे. माझ्यामते ८-१० देशातील क्रिकेटचे स्थान, हॉकीची वाताहात बघता हे आशादायक चित्र आहे).
वरील सर्व खेळाडुंचे आणी संघटनांचे अभीनंदन.
भवीष्यात कॉमवेल्थ गेमसारखी चराउ कुरणे न भरवता क्रिडा क्षेत्राला सरकार भक्कम सहाय्य देइल अशी आशा करतो.
प्रतिक्रिया
19 Sep 2010 - 12:02 pm | चिगो
आणखी चांगले दिवस यावेत ह्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे..
19 Sep 2010 - 12:21 pm | राजेश घासकडवी
सर्वप्रथम, भारताच्या उत्कर्षाची चिह्नं दाखवून देणाऱ्या लेखनाबद्दल अभिनंदन. आपली पीछेहाट कशी होत आहे असं सांगणारं लेखन खूप दिसतं.
जगाच्या १६ टक्के लोकसंख्या व सुमारे ६ टक्के उत्पन्न असलेल्या देशाकडून २ ते ४ टक्के पदकं जिंकली जावीत. तसं होताना दिसत नाही - कदाचित गेल्या दीडशे वर्षांचा गरीबीचा इतिहास आहे म्हणून असेल. जर निम्म्या लोकांना पुरेसं खायला मिळत नसेल तर खेळात प्राविण्य मिळवून पदकं कमावण्याची अपेक्षा कशी धरणार. तरीही गेल्या काही दशकातल्या वाढत्या समृद्धीच्या खुणा दिसत आहेत (हळुहळू का होईना...) ही आशादायक बाब आहे.
मला वाटतं पुढच्या तीसचाळीस वर्षात जेव्हा भारतीय जीडीपी जागतिक सरासरीच्या बरोबरीने येईल, तेव्हा निश्चितच १० ते १५ टक्के पदकं भारताला मिळतील असं वाटतं. तोपर्यंत चढती कमानच राहील अशी आशा आहे.
19 Sep 2010 - 5:54 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
लेखातली माहिती आशादायक आहेच आणि गुर्जींचा प्रतिसादही आवडला.
19 Sep 2010 - 5:54 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
लेखातली माहिती आशादायक आहेच आणि गुर्जींचा प्रतिसादही आवडला.
19 Sep 2010 - 2:01 pm | बट्ट्याबोळ
चांगल लेखन!!!
19 Sep 2010 - 2:32 pm | चिरोटा
क्रीडा क्षेत्राला चांगले दिवस येत आहेत असे दिसते.मुख्य म्हणजे क्रिकेट पलिकडेही अनेक खेळ अस्तित्वात आहेत हे आता लोकांना कळू लागले आहे.
19 Sep 2010 - 10:02 pm | हरकाम्या
क्रीडाक्षेत्राला चांगले दिवस आहेत किंवा येतील याचा अंदाज नाही. पण श्री .सुरेश कलमाडी यांच्या क्रुपेने क्रीडाक्षेत्रांशी संबंधित उद्योगधंद्यांना चांगले दिवस येतील आणि चांगले दिवस येतात हे नक्की.
20 Sep 2010 - 9:14 am | चिंतामणी
तिरंदाजीत जयंत तालकुदार उपांत्य फेरीत
यंदाच्या हंगामात फॉर्मात असणाऱ्या भारताचा तिरंदाज जयंत तालुकदार याने रविवारी एडिनबर्ग येथे सुरू असलेल्या विश्वकरंडक तिरंदाजी स्पर्धेत उपांत्य फेरीत धडक मारली. रिकर्व्ह प्रकारात त्याने इटलीच्या मायकेल फ्रॅंगिली याच संघर्षपूर्ण लढतीत 6-4 असा पराभव केला.
या लढतीत फ्रॅंगलीकडेच संभाव्य विजेता म्हणून बघितले जात होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर दांडगा अनुभव असणाऱ्या फ्रॅंगली याने 15 वर्षाच्या कारकिर्दीत 29 पदके मिळविली आहेत. मात्र, या वेळी त्याला तालुकदारच्या आव्हानाचा प्रतिकार करता आला नाही. पहिल्या फेरीत दोघांनी 26 गुण मिळवून बरोबरी साधली. पहिल्या सेटमध्ये दोन वेळा, आठ वेळा अचूक लक्ष्यभेद करणाऱ्या तालुकदारने नंतर दुसऱ्या सेटमध्ये आणखी दोनदा अचूक लक्ष्य साधत 3-1 अशी आघाडी घेतली.
तिसऱ्या सेटमध्ये पावसाने हजेरी लावली. त्या वेळी फ्रॅंगली याने बाजी मारली. त्याने दोनेळा अचूक लक्ष्य साधून 3-3 अशी बरोबरी साधली. चौथ्या सेटमध्ये तालुकदारने पुन्हा एकदा बाजी मारली आणि तीनवेळा दहा गुणांचे लक्ष्य साधून 5-3 अशी आघाडी घेतली. पाचव्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी सर्वस्व पणाला लावले. बरोबरीवर राहिलेल्या या सेटमध्ये दोघांना एकेक गुण मिळाला आणि तालुकदारने बाजी मारली.
अजून एक बातमी
डेव्हिस करंडकात भारताची पिछाडीवरून बाजी
भारताने डेव्हिस करंडक पुरुष सांघिक टेनिस स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच 0-2 अशा पिछाडीवरून बाजी मारली. ब्राझीलविरुद्ध सलामीच्या एकेरीतील दोन्ही सामने गमावलेल्या सोमदेव देववर्मन आणि रोहन बोपण्णा यांनी परतीच्या एकेरीतील दोन्ही सामने देशाला जिंकून दिले. याबरोबरच भारताने प्रतिष्ठेच्या जागतिक गटातील स्थान अभिमानाने कायम राखले.
20 Sep 2010 - 9:50 am | खडूस
भारताच्या क्रिडा क्षेत्राला चांगले दिसव. नसून
भारताच्या क्रिडा क्षेत्राला चांगले दाखव/वा असे हवे
उगाच भात खाताना दातात खडा आल्यासारखे वाटते.
बाकी लेखातली माहिती आशादायक आहेच
20 Sep 2010 - 11:40 pm | विश्वनाथ मेहेंदळे
त्यांना दिवस म्हणायचे आहे. तो टायपो आहे.
21 Sep 2010 - 10:09 am | खडूस
असे आहे का
बरं, बरं,
पण अजूनही टायपो का काय ते दुरुस्त केले नाहीच
त्यामुळे दातात खडा आहेच
21 Sep 2010 - 10:44 am | चिंतामणी
होय बरोबर आहे तुम्हचे म्हणणे V.M.
तो टायपो आहे.
दिवसच्या ऐवजी चुकीने दिसव झाले आहे.
20 Sep 2010 - 2:58 pm | अविनाशकुलकर्णी
क्रिडा क्षेत्रात अंतर राष्ट्रीय पातळीवर आरक्षण असावे का???
20 Sep 2010 - 11:42 pm | विश्वनाथ मेहेंदळे
काका, एक धागा झाला ना विक्रमी ? इथे पण काश्मीर करण्याचा प्रयत्न का ??
20 Sep 2010 - 3:18 pm | समंजस
चांगले दिवस आले आहेत.
या पुढेही आणखी चांगले दिवस येतील अशी आशा ठेवायला हरकत नाही :)
[ अवांतर: आपल्या प्रसिद्धी माध्यमांना सुद्धा क्रिकेट च्या पलीकडे क्रिडाविश्व आहे ही जाणीव होणार का ? ]
20 Sep 2010 - 3:32 pm | गणपा
हम्मं तळ एका दिवसात भरत नाही.
हळु हळु का होईना पण इतर क्रिडाप्रकारांतही खेळाडु नेत्रदिपक यश संपादित आहेत खरच चांगल लक्षण दिसतय.
हे खेळाडु स्वतःच्या जोरावर (सरकार कडुन तुटपुंजी मदत/सवलत मिळते.) हे यश मिळवतायत हे खरच कौतुकास्पद आहे.
धन्यवाद चिंतामणी हा विषय बोर्डावर आणल्या बद्दल. रोज रोज ते पाकिस्तान/दहशवाद/ मुस्लिम असल्या चर्चेत ह्या असल्या चांगल्या बातम्यांकडे दुर्लक्ष होत असत.
20 Sep 2010 - 3:45 pm | चिंतामणी
गणपाशेठ धन्यु.
श्रींची इच्छा तुमच्या मुखातुन प्रकटल्यावर हे होणे स्वाभावीकच होते.
असल्या विषयांमुळे पाकिस्तान/दहशवाद/ मुस्लिम असल्या चर्चेत ह्या असल्या चांगल्या बातम्यांकडे दुर्लक्ष होत असत हे नक्की.
भवीष्यात अश्या चांगल्या बातम्या अजून ऐकायला मिळोत हिच गणेशाच्या चरणी प्रार्थना.
20 Sep 2010 - 4:33 pm | इन्द्र्राज पवार
"हिच गणेशाच्या चरणी प्रार्थना....."
~~ धागाकर्ते श्री.चिंतामणी यांनी केलेली ही प्रार्थना बाप्पाच्या कानी नक्कीच पडेल कारण येथील प्रतिसादातील सदस्यांची क्रिडाविश्वाविषयीची भावना निर्मळ आहे हे वाचलेल्या प्रतिसादावरून दिसत आहेच. जागतिक पातळीवरील विविध खेळात देशातील मेट्रोमधीलच अॅथलेट्स नव्हेत तर छोट्याछोट्या शहरातील गुणवान खेळाडूंदेखील त्यांना वेळीच मिळत असलेल्या प्रोत्साहन आणि एक्स्पोजरमुळे पुढे येत आहेत हे चित्र नक्कीच आशादायक आहे. ऑलिम्पिक चळवळीपासून कायम फटकून राहिलेल्या चीनसारखा लोकसंख्येबाबत प्रथम क्रमांक असलेला महाकाय देशसुद्धा आज पदकाच्याबाबतीत "अंकल सॅम" ला मागे टाकून प्रथम क्रमांकाकडे झेप घेत आहे, ही बाब भारताला निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे. हे अशासाठी म्हणत आहे की, चीनमुळे निदान एक तरी स्पष्ट झाले की लोकसंख्येचा बाऊ करून खेळाडूना सोयीसवलती पुरेशा मिळत नाहीत असे नक्राश्रू ढाळण्याची गरज नाही. लोकसंख्येचा प्रश्न आणि मैदानावरील पराक्रम या सर्वस्वी वेगळ्या बाबी आहे.
उपासमारीत कायम दिवस काढत असलेल्या इथिओपियासारखा आफ्रिकन देश लांब पल्ल्याच्या शर्यतीत कायम सुवर्णपदकांची लूट कशी करतो याचा अभ्यास करण्यासाठी श्री.मिल्खासिंग सारख्या देशाच्या क्रिडा इतिहासातील एक नामांकित व्यक्तीने नेताजी सुभाष नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ स्पोर्टस, पतियाळामार्फत आठदहा अॅथलिट्सांचा समावेश असलेले एक पथक त्या देशात महिनाभरासाठी पाठवून त्या सुवर्णपदक विजेत्यांचे मार्गदर्शन घेण्यात यावे याबद्दल सरकारकडे दाताच्या कण्या केल्या होते. पण ते खाते किती ढिम्म आहे हे नव्याने इथे सांगण्याची गरज नाही. [शाहरुख खानच्या एकमेव चांगल्या चित्रपटात 'चक दे इंडिया' त हाच मुद्दा अत्यंत प्रभावीपणे दिग्दर्शाकाने मांडला आहे..."कशाला या पोरींचा हॉकीचा संघ पाठवायचा..? काय मैदान या मारणार?" आदी उपहासात्मक शेरे देणारी ती अधिकारी मंडळी - त्यातही एक स्त्रीअधिकारी दाखविली आहे ते फार सत्य आहे - आजही, या क्षणी, दिल्लीच्या क्रिडा मंत्रायलात आहेत....आणि सीडब्ल्यूजी तोंडावर आले असतानादेखील तयारीकडे ते कोणत्या नजरेने पाहात आहेत, यावर इथे काथ्याकूट नको.]
क्रिकेटचा या ठिकाणी तुलनेसाठी अजिबात उल्लेखही नको. चला सरळसरळ कबूल करू या की आहे तो इथला सर्वाधिक लोकप्रिय खेळ आज, आणि होता कालदेखील तितकाच ग्लॅमरस... पण त्याची कारणमीमांसा वेगळी आहे, त्या त्या काळात त्याला राजाश्रय, लोकाश्रय, माध्यमाश्रय मिळत गेला. त्यामुळे त्याच्या यशाच्या झालरीत अन्य खेळ येत नाहीत म्हणून उदास व्हायचे कारण नाही. जगातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ "फूटबॉल" अमेरिकेत एकेकाळी खेळतही नव्हते आणि लोकप्रियतेत तेथील पहिल्या क्रमांकाचा खेळ 'बेसबॉल' अजून इथे आपल्याकडे माहितही नसेल. पण म्हणून अमेरिकेने फूटबॉलकडे दुर्लक्ष केले नाही. हळूहळू तिथेही त्या खेळाचे लोण पसरले आणि थोड्याच वर्षात ऑलिम्पिक आणि जागतिक फूटबॉल स्पर्धेत उतरण्यासाठी पात्रता मिळविली. हाच न्याय भारतातही क्रिकेटची लोकप्रियता आहे तशीच ठेवून व त्याचा बाऊ न करता अन्य खेळांच्या उन्नतीकडे केंद्रपातळीवर प्रयत्न झाले तर त्याचे सुपरिणाम दिसून येतीलच.
आजचे चित्र वर श्री.चिंतामणी यांनी दिलेल्या बातम्यानुसार फार आकर्षक दिसत आहे. टेनिसमध्ये कृष्णन पितापुत्रानंतर पेस, भूपती, बोपण्णा यानी पुरुषात तर सानिया मिर्झाने महिलात जे यश मिळविले त्या पावलावर पाऊल टाकणार्यांची वाढती संख्या पाहिली तर त्या खेळाचे ग्लॅमर किती झपाट्याने आपल्याकडे येत आहे, अन् मग त्याचाच परिपाक म्हणून यशही येत राहील. फॉर्म्युला कार रेसमध्ये "नारायण कार्तिकेयन" आणि गोल्फमध्ये 'जीव मिल्खा सिंग, अर्जुन अटवाल, ज्योती रंधवा' हे खेळाडू जागतिक पातळीवर चमकत आहेत ही बाब नव्याना अतिशय स्फूर्तीदायी ठरत आहे.
बॅडमिंटनमुळे भारतातील प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये एक "सायना नेहवाल" नाव वार्यासारखे पसरले ते आज सचिन तेंडुलकरच्या लोकप्रियतेच्या धाटणीचे नाव आहे. तीच गोष्ट आपल्या राज्याच्या तेजस्विनी सावंत आणि स्वीमिंगचा गोल्डन बॉय वीरधवल खाडे यांची....या दोघांनी ग्रामीण भागातील युवकयुवतीनी जे "फीड" दिले आहे त्याची फळे येत्या काही वर्षात नक्कीच देशाला मिळतील..... फक्त खुर्च्याला गोंद लावून (आधुनिक काळात 'फेविकोल') बसलेल्या क्रिडाखात्यातील त्या रेम्या डोक्यांच्या अधिकारी वर्गाला वठणीवर आणणारे आठदहा 'क्रिडाप्रेमी' खासदार दिल्लीत सातत्याने जागरूक पाहिजेत... (आता इथे 'जागरूक खासदार' म्हणून अर्थातच थोर सुरेशराव अपेक्षित नाहीत).
एक चांगला धागा.
इन्द्रा
20 Sep 2010 - 11:19 pm | पैसा
इतर सगळ्या गोंधळात असं काही चांगलं ऐकलं की बरं वाटतं!
21 Sep 2010 - 12:35 pm | अनिल २७
श्री. चिंतामणी सर्वप्रथम अभिनंदन.. मागील काही दिवसांत मिपावरचे धागे वाचले कि डोक्यात फटाके फुटायला सुरूवात व्हायची. आपल्या देशात काहीच चांगले घडत नाही व घडूही शकत नाही असं काहीसं वाटू लागल्यामूळे मिपावर येणं जवळपास बंद केलं होतं. पण हा लेख म्हणजे रणरणत्या उन्हात वार्याची झुळुक वाटला. ह्या देशात काहीतरी चांगले घडतेय अन मुख्य म्हणजे लोक याची दखलही घेत आहेत हे नक्किच आनंददायी आहे.
अंतरराष्ट्रीय स्तरावर नेत्रदिपक यश संपादलेल्या सर्व भारतीयांचे कौतुक करावे तेवढे कमीच. त्यातही क्रिकेट सोडुन ईतर खेळांत आवश्यक त्या पायाभूत सुविधा नसताना मिळवलेले यश त्या त्या खेळाडुंची मेहनत दाखवून देते. क्रिकेटची व ईतर खेळांची तुलना करायची नाही, पण आपल्या देशाला क्रिकेटमध्ये यश मिळाल्यानंतरच त्या खेळाची लोकप्रियता वाढली. आता असेच यश आपण ईतर खेळांतही सातत्याने मिळवत राहू तर ईतर खेळही लोकप्रिय होतीलच. विश्वनाथ आनंद, सानिया मिर्झा (सध्या कशीही खेळत असली तरी भारतीय टेनिसला ग्लॅमर हिच्यामूळेच आले), साईना नेहवाल, अर्जून अटवाल, जयंत तालुकदार, वीरधवल खाडे, तेजस्विनी सावंत, कोनेरु हंपी, सुनिल छेत्री................... ही क्रिकेटेतर खेळांतील यशस्वी खेळाडूंची यादी अशीच वाढत जावो व माझ्या (सध्यातरी गांजलेल्या, पिचलेल्या) भारतमातेला जल्लोषाचे खूप खूप क्षण लाभोत हिच सदिच्छा....
21 Sep 2010 - 1:04 pm | चिंतामणी
आज अजून एक चांगली बातमी आली.
विश्वकरंडक नेमबाजीत रोंजन सोधीचा सुवर्णवेध
अव्वल नेमबाज रोंजन सोधीने "विश्वकरंडक फायनल्स' नेमबाजी स्पर्धेतील डबल ट्रॅपमध्ये सुवर्णपदकाचा वेध घेतला. या वर्षातील विश्वकरंडक स्पर्धेत पदक जिंकलेल्या नेमबाजांत होत असलेल्या या स्पर्धेत प्राथमिक फेरीनंतर रोंजन एका गुणाने पिछाडीवर पडला होता, पण त्याने अंतिम फेरीत कामगिरी उंचावत सुवर्णपदक जिंकले.
लोनाडा विश्वकरंडक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेल्या रोंजनने प्राथमिक फेरीत 48, 46 आणि 49 अशी कामगिरी करीत 143 गुण मिळविले होते. त्या वेळी चीनच्या पॅन क्विआँग याने 144 गुणांसह अग्रस्थान मिळविले होते, पण अंतिम फेरीत दडपण असतानाही कामगिरी उंचावताना रोंजनने 49 गुणांची कमाई केली. त्या वेळी क्विआँग 43 गुणच मिळवू शकला.
रोंजन सोधीचे हार्दिक अभीनंदन
21 Sep 2010 - 1:45 pm | गणपा
आत्ताच पेपरमध्ये वाचली ही बातमी.
रोंजन सोधीचे हार्दिक अभीनंदन
21 Sep 2010 - 1:10 pm | चिंतामणी
अजुन एक बातमीच येथे उल्लेख करायला हवा.
विश्वकरंडक तिरंदाजी स्पर्धेत तालुकदारला ब्रॉंझ
भारताच्या जयंत तालुकदार याला विश्वकरंडक तिरंदाजी अंतिम स्पर्धेत अखेरीस ब्रॉंझपदकावर समाधान मानावे लागले. डोला बॅनर्जी आणि दीपिका कुमारी यांचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आल्यावर तालुकदारने भारताचे आव्हान कायम राखले होते.
उपांत्य फेरीत अव्वल मानांकित ब्रडी एलिसनचे आव्हान पेलवता आले नाही. अर्थात, जयंतने त्याला कडवा प्रतिकार केला. मात्र, त्याला एलिसनकडून 5-6 असा पराभव पत्करावा लागला. ब्रॉंझपदकासाठी झालेल्या लढतीत तालुकदारने आपली कामगिरी उंचावली आणि इटलीच्या गालियाझ्झो याचे आव्हान 6-2 असे अगदी सहज मोडून काढले. तालुकदारने पहिले दोन सेट अगदी सहजपणे जिंकताना 4-0 अशी आघाडी घेतली. त्याने पाच वेळा "परफेक्ट टेन'ची कामगिरी केली. तिसऱ्या सेटमध्ये गालियाझ्झो याने बाजी मारली, पण तो तालुकदारला ब्रॉंझपदक मिळविण्यापासून रोखू शकला नाही.
विश्वकरंडक स्पर्धेत तीसरे स्थान मिळवीणे हीसुध्दा मोठी कामगिरी आहे.
जयंत तालुकदार याचे सुध्दा हार्दिक अभीनंदन.
21 Sep 2010 - 9:57 pm | चिंतामणी
नुकतीच कोलकाता येथे 3rd Asian Central Zone Senior Men Volleyball Championship झाली. १७ ते २० सप्टेंबर दरम्यान ही स्पर्धा झाली.
यात भारताला उपविजेतेपद मिळाले. अंतीम सामन्यात इराणच्या संघाने भारताचा पराभव केला.
अंतीम फेरीत प्रवेश करण्याआधी भारताच्या संघाने पाकीस्तान आणि कझागीस्तानचा पराभव केला होता.