दर्द मिन्नतकश-ए-दवा न हुवा.............

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
15 Sep 2010 - 9:30 pm


मिर्झा ग़ालीब

वेदनांचे फायदे अनेक, त्यात ह्रदयाला हात घालणारे काव्य निर्माण होते. त्या काव्यामधल्या भावना तीव्र असतात. पण त्याचा त्रास अवर्णीयच असतो. या वेदनांतून सुटण्याची धडपड कोण नाही करत ? ग़ालीब म्हणतो

दर्द मिन्नतकश-ए-दवा न हुवा

मै ना अच्छा हुआ, बुरा न हुआ.

माझ्या वेदनांवर औषध देऊन माझ्यावर उपकार कर म्हणून मी कळवळून सांगतोय पण नाही मिळाले ! आता माझे मन अशा अवस्थेला पोहोचले आहे की ते आनंदीही नाही आणि दु:खीही नाही. ही अवस्था सगळ्यात वाईट. धड इकडे नाही आणि तिकडेही नाही. एखाद्या विशाल जलसागरात जर आपली नाव अचानक थांबली तर कशी अवस्था होईल ? तशी ! (मिन्न्ताकश-ए-दवा: औषध घ्यायलाच पाहिजे असा)

माणूस एकटा असताना जसे वागतो तसे तो दुसर्‍याच्या संगतीत कधीच वागू शकत नाही. दोन माणसे एकत्र आली की संवाद / विसंवाद चालू होणारच. तसेच दोन प्रेमिकांमधे होत असणार. पण तक्रार करणे वेगळे आणि अपमान करणे वेगळे.

ग़ालीब म्हणतो -

जमा करते हो क्यु रक़ीबोंको

इक तमाशा हुआ, गिला न हुआ.

एक तर तू मी असताना तुझ्या अनेक चाहत्यांना तुझ्या भोवती गोळा करतेस आणि त्यांच्या समोर माझ्या तक्रारी मांडतेस. ही काही तक्रार करण्याची पध्दत झाली का ? हा तर तमाशाच झाला. ( रक़ीब: प्रेमाचे प्रतिस्पर्धी, जे नुसते तिच्या सौंदर्यातच फक्त रस घेतात. )

प्रेमात काय नशीब आजमावयाचे असते का ? आपण त्यात पडतो.. पण मग तिच्याकडून आशा निराशेचे खेळ चालू होतात.

ग़ालीब म्हणतो-

हम कहां किस्मत आज़माने जाएं

तु ही जब ख़ंजर आज़मा न हुआ

आम्ही काय आमचे नशीब आजमावायला बाहेर कुठे जाणार ? पण आमच्या नशिबात जर असेल तर तुझ्या नजरेचे खंजीर आमच्यावर चालुदेत !

आपल्या प्रियतमेकडून कितीही कटू शब्द ऐकायला लागले तर आपण काय करतो ? खरंतर आपण प्रेमात पडल्यावर ते शब्द आपल्याला कडवट वाटतच नाहीत.

ग़ालीब म्हणतो -

कितने शीरीं है तेरे लब, के रक़ीब

गालिया खाके बेमज़ा ना हुआ

किती मधाळ आणि गोड आहेत तुझे हे ओठ, त्यातून येणार्‍या अपशब्दामुळे आम्हाला आजिबात राग येत नाही. आमचे जाउदेत ! आमचे तर तुझ्यावर प्रेम आहे. पाहिजे तर हे तू तुझ्या भोवती जमा झालेल्या आमच्या प्रतिस्पर्ध्यांनाही विचारू शकतेस ! त्यांचीही तीच गत आहे.

पण माणसाचे दुर्दैव त्याच्या प्रेमात पाठ सोडत नाही हेच खरे. एवढे प्रयत्न करून, धडपडून आपण तिच्या नजरेत रहायचे प्रयत्न करतो, तिच्या शिव्याशाप ऐकुनही तिच्यावर प्रेम करत रहातो, पण जेव्हा तिला भेटण्याची वेळ येते तेव्हा... आपले नशिबच आडवे येते. ती जेव्हा भेटते तेव्हा तोंडातून शब्द फुटत नाहीत, जरा शांत राहीले तर हे सगळे सुचेल ना ! पण आमच्यावर इकडे विज कोसळलेली असते आणि जमिनीचा आधार सुटलेला असतो.

ग़ालीब म्हणतो -

है ख़बर गर्म उनके आने की

आज ही घर में बोरिया न हुआ.

आम्हाला बातमी मिळाली आहे की तिचे पाय आमच्या घराला लागणार आहेत. ( ह्रदयात ) पण बघा आमचे नशिब किती दरिद्री आहे, आज तिला बसायला द्यायला आमच्या कडे साधे जाजमही नाही. (ह्रदयात वेगळीच खळबळ उडाली आहे)

नमरूद म्हणजे असा राजा की जो आपलच म्हणणं खरं करतो. म्हणजे आपल्यावर, आपल्या विचारांवर हा एक प्रकारचा जुलूमच असतो, नाही का ?

ग़ालीब म्हणतो-

क्या वो नमरूद की खुदाई थी

बंदगी मे मेरा भला ना हुआ.

काय हा त्या सर्वश्रेष्ठ अशा परमेश्वराचा चांगुलपणा म्हणायचा की त्याच्या पुजेतसुध्दा आमचे भले झाले नाही, होत नाही .

पण शेवटी हा जीव त्या परमेश्वराचीच देणगी आहे. ती त्याची त्यालाच परत करायला हवी. पण आमच्या हक्काचे काय ?

ग़ालीब म्हणतो-

जान दी, दी हुई उसी की थी

हक़ तो युं है के हक़ अदा ना हुआ

त्याने आम्हाला हाच हक्क दिला आहे की त्यानुसार, त्याच्या आज्ञेनुसार, आम्हाला आमचा हक्कही मिळत नाही.

या जगात ह्रदयांवर झालेल्या जखमा भळभळ वहात असतात. त्या प्रत्येकजण दाबून टाकायचा प्रयत्न करत असतो. पण त्याने होते काय ?

ग़ालीब म्हणतो -

ज़ख्म गर दब गया लहू ना थमा

काम गर रुक गया रवा ना हुआ.

या जख्मा आम्ही जेवढ्या दाबून टाकायचा प्रयत्न करतो तेवढ्याच जास्त त्या उघड्या होतात आणि वहायला लागतात. “उघड्या पुन्हा जहाल्या जखमा उरातल्या” सारखेच.

पण काय गंमत आहे बघा हे असले ह्रदय सुध्दा आमचे रहात नाही. त्यावरही ती हक्क सांगते. 

ग़ालीब म्हणतो-

रहज़नी है की दिलसितानी है

लेके दिल, दिलसितां रवाना हुआ.

काय म्हणावे त्यांना ज्यांनी आमचे हे ह्रदय चोरले आहे ? या प्रेमाच्या वाटेवरचे दरोडेखोर का हे ह्रदय चोरणारी....

हे एवढे होऊनसुध्दा आपण आपली कहाणी सांगायचे थांबत नाही. लोकांना त्या दर्दभर्‍या कहाण्यातच जास्त रस आहे. त्याच कहाण्या त्यांना ऐकायला आवडतात.

ग़ालीब म्हणतो-

कुछ तो पढ़िये के लोग कहते है

आज ग़ालिब ग़ज़ल सरा ना हुआ.

आज लोक मला आग्रह करतात की हे ग़ालीब अजून ऐकव आम्हाला तुझी ग़ज़ल, पण खरं सांगायचे तर आज मी गप्प आहे कारण माझी ग़ज़ल मला सोडून गेली आहे. तिला आता माझ्या ह्रदयात जागा राहिली नाही. तिने इथला मुक्काम हलवला आहे....

मुळ ग़ज़ल

दर्द मिन्नतकश-ए-दवा न हुवा

मै ना अच्छा हुआ, बुरा न हुआ.

जमा करते हो क्यु रक़ीबोंको

इक तमाशा हुआ, गिला न हुआ.

हम कहां किस्मत आज़माने जाएं

तु ही जब ख़ंजर आज़मा न हुआ

कितने शीरीं है तेरे लब, के रक़ीब

गालिया खाके बेमज़ा ना हुआ

है ख़बर गर्म उनके आने की

आज ही घर में बोरिया न हुआ.

क्या वो नमरूद की खुदाई थी

बंदगी मे मेरा भला ना हुआ.

जान दी, दी हुई उसी की थी

हक़ तो युं है के हक़ अदा ना हुआ

जान दी, दी हुई उसी की थी

हक़ तो युं है के हक़ अदा ना हुआ

ज़ख्म गर दब गया लहू ना थमा

काम गर रुक गया रवा ना हुआ.

रहज़नी है की दिलसितानी है

लेके दिल, दिलसितां रवाना हुआ.

कुछ तो पढ़िये के लोग कहते है

आज ग़ालिब ग़ज़ल सरा ना हुआ.

भावार्थ : मला भावला तसा.

जयंत कुलकर्णी

स्वर्गवासी रफ़ी साहेबांनी गायलेली काही कडवी ऐका येथे –

 

आणि पूर्ण ग़ज़ल ऐका तेवढ्य़ाच समर्थ आवाजात येथे -

 

जयंत कुलकर्णी

संगीतगझलविचारआस्वाद

प्रतिक्रिया

मस्त डोळे मिटुन ऐकत होतो.. खुप छान वाटल.
धन्यवाद जयंतराव.

योगी९००'s picture

15 Sep 2010 - 9:40 pm | योगी९००

दर्द मिन्नतकश-ए-दवा न हुवा
म्हणजे काय बुवा?

बाकी गाणे खुप छान वाटले ऐकायला..धन्यवाद..

मीनल's picture

15 Sep 2010 - 9:42 pm | मीनल

जुने गाणे कधीच ऐकले नव्हते.
काही समजतच नव्हते तर काय ऐकणार ?
आता समजावून घेउन ऐकले.

विश्नापा's picture

15 Sep 2010 - 9:56 pm | विश्नापा

गा़लिब हा उर्दू शायरांचा "पितामह" आहे.खूपच छान अनुवाद आहे.

आदरणीय जयंतजी, पुढील शेर हा आपण दिलेल्या ग़झलमधीलच आहे काय?

"एतबारे-इश्क की खा़ना-खराबी देखना,
गै़र ने की आह्,लेकिन वो ख़फा मुझपर हुआ |

जयंत कुलकर्णी's picture

15 Sep 2010 - 10:06 pm | जयंत कुलकर्णी

अरे ! मला आदरणीय वैगेरे म्हणून आपण मला लाजवताय !
असो. तुम्ही म्हणताय त्याचा अर्थ इथेच मी एका लेखात दिला आहे त्याचा दुवा हा आहे.

दिले नादा तुझे हुआ क्या है
पहिल्याची कल्पना नाही. पण पाहिजेच असल्यास शोधता येईल.

जयंत कुलकर्णी.

मला आवडलेला अजून एक शेर आपणा सर्वांसाठी....
अंदेशा
हर क़दम पे रहा ये अंदेशा
पीछे क़ातील है या मेरा साया....
.........................जमील कलीमी.
प्रत्येक पावलाला होती मनात हीच भिती
मागे कोण आहे, मृत्यू का सावली.............
जयंत.

विश्नापा's picture

16 Sep 2010 - 9:07 pm | विश्नापा

काही वर्षांपूर्वी दूरदर्शनवर "मिर्झा़ गा़लिब" नावाची मालिका आली होती.
गुलजा़रचे दिग्दर्शन्,जगजितसिंगचा जादूभरा आवाज्,आणि नसिरुद्दीन शहाने जीव (आत्मा) ओतून उभा केलेला "गालि़ब" ...!!
पण गालिब,प्रेमचंद सारख्या महान व्यक्तिंच्या जीवनाकडे पाहिल्यावर वाटते की यांना कोणता शाप असावा की या प्रतिभावंतांना हालाखीचे जीवन कंठावे लागले?

कर्ज़ की पिते थे मै लेकिन समझते थे की हां,
रंग लायेगी हमारी फा़का-मस्ती एक दिन |

आणि हो तो दुसरा शेर आमची सिग्नेचर आहे.

>> है ख़बर गर्म उनके आने की
आज ही घर में बोरिया न हुआ. >>

सुंदर!! अप्रतिम!!!

आपल्या प्रिय व्यक्तीचा पाहुणचार असा करू की तसा करू, तिच्यासाठी हे करू की ते करू असं होऊन जातं. जे करू ते अपूर्ण, कमी वाटतं. हे बहुधा युनिव्हर्सल ट्रुथ असावं. ही बेचैनी, हूरहूर, तगमग, कमतरतेची टोचणी किती सुंदर , साध्या शब्दात शब्दात मांडली आहे गालीब यांनी.
मला तरी यीटस ची पुढील कविता नमूद केल्याशिवाय रहावत नाही -
Had I the heavens' embroidered cloths, Enwrought with golden and silver light,
The blue and the dim and the dark cloths Of night and light and the half-light,
I would spread the cloths under your feet: But I, being poor, have only my dreams;
I have spread my dreams under your feet; Tread softly because you tread on my dreams.

मला या कवितेतील प्रकट केलेली गरीबीची भावना आणि गालीब यांनी व्यक्त केलेली कमतरतेची भावना अगदी सारख्या वाटतात.

कुलकर्णी यांचे इतक्या सुंदर रसग्रहणाबद्दल आभार.

चिंतामणराव's picture

16 Sep 2010 - 2:27 pm | चिंतामणराव

वा, खुप छान. गरीब प्रेमिकाची अगतिकता, असहाय्यता किती छान व्यक्त झाली आहे
धन्यवाद.

इन्द्र्राज पवार's picture

16 Sep 2010 - 12:11 am | इन्द्र्राज पवार

"ज़ख्म गर दब गया लहू ना थमा
काम गर रुक गया रवा ना हुआ."

~~ किती सधन आहे हा भाव....जखमा उघड्या होऊन वाहत्या झाल्या आहेत, पण जरी त्या तशा झाल्या असल्या तरी त्यातील दर्द इतके तीव्र आहे की, वाहून गेल्यानंतरही पाट कोरडा पडला नसून ती तीव्र वेदना अजूनही ठसठसतच आहे....एकेकाळी 'दो आरजू मे गये, दो इंतेजार मे...' असं कुणी म्हणत असे, आणि ज्यावेळी चमनमध्ये बुलबुल प्रवेशीता झाली....त्यावेळी अख्तरी फैजाबादी गुणगुणायची :::

"निहुरे निहुरे बहोरे अंगनवा
कंगना पगन गोरिया अंगना बुहारे
झुकि झुकि देखे नयनवां...."

या मनमोहिनेतूनच मग गालिबने म्हटले असेल....
"है ख़बर गर्म उनके आने की
आज ही घर में बोरिया न हुआ."

उगवत्या सूर्यासमवेत जगण्यासाठी उठणे आणि वार्‍याच्या मंद झुळकीसोबत जगणे यात मुलभूत फरक काय असेल तर सूर्य एका दिवसाचा आश्वासक आहे तर वारा तुम्हाली त्या झुळकीसमवेत गालिब देतो, बेगम देतो, रफी देतो....आणि त्याबरोबरच एक विलक्षण अशी कासावीस करणारी तहान....ती तहान शमन्यासाठी दुसरे अन्य कुठले औषध नाही....आहे ती गालिबची जादू.....आणि मग असा गालिब ज्यावेळी म्हणतो :

"कुछ तो पढ़िये के लोग कहते है
आज ग़ालिब ग़ज़ल सरा ना हुआ."

~~~ "तिला आता माझ्या ह्रदयात जागा राहिली नाही. तिने इथला मुक्काम हलवला आहे...."
असेलही...पण शतकानंतरही गालिबच्या जादूचा मुक्काम आपल्या हृदयातून हलणार नाही, ही बाब आज श्री.जयंत कुलकर्णी यांच्या या अतिशय भावुक अशा लेखाने पुन्हा एकदा अधोरेखीत केली आहे.

धन्यवाद....वाचनाच्या एका सुंदर अनुभवासाठी.

[कधीतरी तलतवरदेखील लिहा....खूप आवडेल....कित्येकांना]

इन्द्रा

मुक्तसुनीत's picture

16 Sep 2010 - 9:18 am | मुक्तसुनीत

लताबाईंनी गायलेले : http://www.youtube.com/watch?v=1WmJH5DcxL0

क्या वो नमरूद की खुदाई थी
बंदगी मे मेरा भला ना हुआ.

हा मझा अत्यंत आवडता शेर आहे.

नमरूद राजाचा उल्लेख बायबल मध्ये आहे. नमरूदाने देवांच्या विरोधात बंड केलं होतं. नंतर त्याने स्वतःलाच देव घोषित केलं आणि त्याच्याच पूजेचं बंधन घातलं. अर्थातच त्याच्या पश्चात लोक त्याला विसरले. अशा या नमरूदचा दाखला देत गालिब म्हणतो,

काय त्या नमरूद्चं पण देवपण होतं ? इथे ईश्वराची भक्तिकरूनपण मझी ही अवस्था आहे.

बाकी लेख आवडला. लुत्फ उठवतोय. :)

गणेशा's picture

16 Sep 2010 - 1:23 pm | गणेशा

सुंदर भावार्थ

स्वानंद मारुलकर's picture

16 Sep 2010 - 1:39 pm | स्वानंद मारुलकर

मै ना अच्छा हुआ, बुरा न हुआ.

यावरून, साहीर चा शेर आठवला

ग़म और खुशी में फ़र्क न महसूस हो जहाँ
मैं दिल को उस मुक़ाम पे लाता चला गया

मुक्तसुनीत's picture

16 Sep 2010 - 9:30 pm | मुक्तसुनीत

दर्द मिन्नतकश-ए-दवा न हुवा

या ओळींचा अर्थ प्रस्तावलेखकाने मांडला आहे :
माझ्या वेदनांवर औषध देऊन माझ्यावर उपकार कर म्हणून मी कळवळून सांगतोय पण नाही मिळाले !

इथे थोडी गल्लत होते आहे असे वाटले.

"दर्द मिन्नतकश-ए-दवा न हुवा" चा अर्थ, "औषधरूपी विनवण्यांना दु:खाने बिलकुल दाद दिली नाही" असा अतिशय काव्यमय आहे. एखाद्या कठोर माणसाला दादापुता करावे तसे माझ्या दु:खाच्या मी विनवण्या करतो आहे. पण छे ! माझ्या दु:खाचे कमी होण्याचे काही चिन्ह नाही.

माझे चुकत असल्यास आधीच कान पकडतो. पण मला आठवणारा अर्थ असा आहे.

येथे अतिशय सुरेख विवरण आहे :
http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ghalib/026/26_01.html

विश्नापा's picture

16 Sep 2010 - 10:29 pm | विश्नापा

खूपच छान दुवा आहे.

धनंजय's picture

17 Sep 2010 - 3:07 am | धनंजय

दुव्यातले विवरण वाचून समजायला मदत झाली.

जयंत कुलकर्णी's picture

17 Sep 2010 - 10:35 am | जयंत कुलकर्णी

:-)

हा दुवा माहीत होता. हे लिहायच्या अगोदर हे कसे वाचायचे राहिले कोणास ठाऊक. त्यातील

Bekhud Dihlavi:

If I had become well, then the pain of my passion would have been forced to be under an obligation toward medicine, and I didn't want to be indebted to anybody. For this reason, it turned out well that I didn't get well [achchhaa hii hu))aa kih mai;N achchhaa nah hu))aa
हे मला जास्त पटले. कान धरायला हवेत मी !

काव्यवेडी's picture

17 Sep 2010 - 1:18 pm | काव्यवेडी

गालिब चे इतके शेर एकत्र वाचून खूप समाधान वाटले.
मजा आली.
धन्यवाद !!!

विश्नापा's picture

19 Sep 2010 - 12:00 am | विश्नापा

गा़लिबच्या काव्यामध्ये हिंदू तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब आढळते..

एक शेर-
"न था कुछ तो खु़दा था,कुछ न होता तो खु़दा होता,
डुबोया मुझको होनेने,न होता मैं तो क्या होता |"

वेदांमध्येही अशाच ओळी आहेत..मूळ संस्कृतमधील ओळी आता आठवत नाहीत..पण दूरदर्शनवर "भारत एक खोज" नावाची मालिका होती.तिच्यात सुरुवातीला त्या मूळ संस्कृतमधील ओळींचा हिंदी अनुवाद शीर्षक गीतामध्ये होता तो असा--
" सृष्टी से पहले कुछ नही था,सत् भी नही,असत् भी नही "...

गा़लिबलाही तेच सांगायचयं...की ही सृष्टी नव्हती तेव्हाही हा परमेश्वर होता,आणि जेव्हा ही दुनिया नसेल तेव्हाही तो असणारचं.....

डुबोया मुझको होनेने,न होता मैं तो क्या होता |"

म्हणजे मी या जन्म-मरणाच्या फेर्‍यात अडकलोय्,म्हणून! अरे परमेश्वरा, मी नसतो तरी काय फरक पडला असता?

जाता जाता-----
या ग़झल मधील शेर--

"हुई मुद्द्त के 'गा़लिब' मर गया ,पर याद आता है,
वो हर इक बातपे कहना कि यूं होता तो क्या होता?

असं म्हणतात की,या शेरवरुनच, जावेद अख्तरला "सिलसिला" या चित्रपटातील गाणे स्फुरले--" तुम होती तो ऐसा होता,तुम होती तो वैसा होता....

गा़लिब हा "endless" आहे...

जयंत कुलकर्णी's picture

19 Sep 2010 - 2:02 pm | जयंत कुलकर्णी

"न था कुछ तो खु़दा था,कुछ न होता तो खु़दा होता,
डुबोया मुझको होनेने,न होता मैं तो क्या होता |"

मला याचा अर्थ असा भावला.....

काहीही नव्हते तेंव्हा "तो" होताच.
काहीही झाले नसते तरीही तो असताच.
या जगातील "होण्याने " ( म्हणजे ज्या काही घडामोडी होतात त्या ) मला डुबवले, म्हणजे गुंतवले, अडकवले या जगात.
मी नसतोच तर "हे जगही नसते, या घडामोडीही नसत्या आणि "तो" ही नसता.

याच अर्थाचे मी ओमरच्या रुबायाचे भाषांतर केले आहे -

कागद,शाई, स्वर्ग आणि नरक •जानेवारी 15, 2010 • १ प्रतिक्रिया (संपादन)

हे विश्व केव्हा जन्माला आले ? माहीत आहे का तुम्हाला ? सध्याच्या शास्त्रीय विश्वामधे यावर खूपच काम चालू आहे. आपण नुकतेच ऐकले की विश्वजन्माचे रहस्य उलगडणारे प्रयोग जमिनीखाली १ कि.मी. खोलीवर करण्यात आले. त्याचा निर्णय काय व्हायचाय तो होईल. पण असेही म्हणता येईल की या विश्वाचा जन्म मी जन्मलो त्याच दिवशी झाला. याचे कारण सोपे आहे, मानवजात जन्माला आली नसती तर हा प्रश्नही जन्माला आला नसता.

जेव्हा माणूस समूहात रहायला लागला तेव्हापासून तो मृत्यूला घाबरत आलेला आहे. मेल्यावर स्वर्ग का नरक ? तो वरती तुमच्या पाप-पुण्याचा हिशेब लिहितो म्हणतात. ज्यावर तो लिहितो आणि ज्याने लिहितो ते काय आहे ? याचा शोध विश्वाच्या जन्माइतकाच महत्वाचा आहे. म्हणून खय्याम म्हणतो –

विश्वाच्या जन्मदिनी, अनंताच्या पलिकडे,
माझा आत्मा शोधतोय कागद आणि शाई, स्वर्ग आणि नरक,
त्यांना शेवटी साक्षात्कार झाला,
कागद आणि शाई, स्वर्ग आणि नरक माझ्यातच आहे.

जर मी जन्माला आलो तेव्हाच हे विश्व जन्माला येते तर तो कागद आणि ती शाई माझ्यातच आहे.

जयंत कुलकर्णी.

लता मंगेशकर यांच्या आवाजात ही गझल ऐकली आहे पण रफी ने गायलेली आजच ऐकली ..

एक एक शेर सुरेखच ...