"गणपती बाप्पा मोरया" चा गजर ऐकला की मन एकदम २५ वर्षे मागे जाते. दोन वेण्या आणि फुलाफुलांचा फ्रॉक घातलेलं गणपती समोर हात जोडलेलं माझे रूप माझ्या डोळ्यासमोर येते. आणि मनात रुंजी घालू लागतात तेव्हाच्या गणपती गौरीच्या आठवणी. गणपती गौरी हा माझा सगळ्यात आवडता सण.
माझे माहेर पुण्याचे. माझ्या माहेरी १० दिवसांचा गणपती आणि उभ्याच्या गौरी असतात. एक ज्येष्ठा आणि एक कनिष्ठा. आमचे कुटुंब खूप मोठे होते. घरात माझे वडील थोरले. त्यांच्या पाठोपाठ ४ काका आणि एक आत्या. सर्वजण पुण्यात असूनही प्रत्येकाचे रहाते घर वेगळे होते. पण घरातले गणपती गौरी, दिवाळी सारखे सण मात्र एकत्रितपणे साजरे केले जायचे. गणपती गौरी करता सगळे काका काकू, माहेरवाशीण आत्या आणि आम्ही चुलत आणि आत्ते भावंडे मिळून १२ भावंडे आमच्या घरी एकत्र जमत असू. आमच्या घरात मी सगळ्यात थोरली. त्यामुळे मी सगळ्या भावंडांची ताई होते. मी आणि माझ्या दोन बहिणी मिळून या सर्व चुलत आत्ते भावंडांची काळजी घ्यायचो.
शाळेची पहिली चाचणी परीक्षा संपली की गणपतीचे वेध लागायचे. घरात गणपतीचे वातावरण सुरु व्हायचे. गणपती यायच्या आधी ४-५ दिवसापासून रोज थोडे असे करत धाकटा काका-काकू आणि आम्ही बहिणी मिळून गणपतीचे मखर बनवत असू. त्या काळी तयार मखर मिळत नसे. काकाला दर वर्षी नवीन मखर करायचा उत्साह असायचा. तो थर्माकोल, घोटीव कागद, झिरमिळ्या आणून मखर आणि सजावट करायचा. आम्ही आपले लिंबू टिंबू मदतीला. आणि काकू अधून मधून वातावरण चेष्टा मस्करीचे ठेवायला. दुसर्या दिवशी शाळा असली तरी रात्री जागून आम्ही मखर बनवायचो.
गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी गणपतीची मूर्ती घ्यायला आम्ही सगळेच्या सगळे २२-२५ जण पायी शनिवार वाड्याच्या पटांगणात उभारलेल्या मंडपात जायचो. माझ्या आजोबांनी आमच्या घराण्याची गणपतीची मूर्ती कशी असावी याचा तपशील लिहून ठेवलेला होता. म्हणजे चार हात दिसले पाहिजेत, सिंहासनावर बसलेला हवा, डाव्या सोंडेचा हवा, ठराविक उंचीचाच हवा, वगैरे वगैरे अश्या अनेक नियमांशी मिळता जुळता गणपती शोधण्यात २-३ तास आरामात जायचे. आम्ही मुले दर १५ मिनिटानी सरबताची तहान किंवा भेळेची भूक एकेका काकाला गूळ लावून भागवून घ्यायचो. घरातला प्रत्येक जण मूर्ती खरेदी करताना स्वतःचे मत द्यायचा. प्रत्येकाला आवडेल अशीच मूर्ती घ्यायची असा माझ्या बाबांचा आग्रह असे. आमच्या घरच्या रिवाजाप्रमाणे एकदा का गणपती घेतला कि मग कोणीही काहीही न बोलता सगळे जण घरी परत यायचो. परतीच्या वाटेवर आम्ही छोटी भावंडे कोणी एकमेकांशी बोलत नाही याकडे लक्ष ठेवत शुक शुक अश्या खुणा करत चालायचो.
दुसऱ्या दिवशी सकाळी घरी गुरुजी येवून गणपतीची प्रतिष्ठापना करायचे. एकदा का प्रतिष्ठापना झाली की घर एकदम प्रसन्न वाटू लागे. मग पुढचे १० दिवस घरात दर्शनासाठी अनेक लोक यायचे. रोज संध्याकाळी आरती अगदी धूम धडाक्यात व्हायची. आमच्या जवळपासच्या घरातली सगळी मंडळी, आम्हा तिघी बहिणीचे मित्र-मैत्रिणी आणि नातवाईक आवर्जून आरतीला यायचे. चढाओढ लावून रोज अनेक आरत्या आम्ही म्हणत असू. गणपतीची हिंदी आरती आणि व्यकटेशाची आरती फक्त मला आणि माझ्या आईला येत होती, त्यामुळे मी अगदी फुशारून जावून दर वेळेस ती आरती म्हणायचीच.
संध्याकाळी बाहेर दूरवर सार्वजनिक गणपतीच्या ठिकाणी लागली जाणारी गाणी ऐकू यायची. सुदैवाने आमच्या घराजवळच्या सार्वजनिक गणपतीच्या ठिकाणी फक्त भजने किंवा देवाची गाणी लावली जायची. हिंदी सिनेमाची गाणी लावली जात नसत.त्यामुळे संध्याकाळी दूरवर लताच्या आवाजातली 'सुखकर्ता दुखहर्ता' ऐकू आले की हातातली कामे टाकून गणपतीच्या मूर्ती समोर शांतपणे उभे राहावे असे वाटे. अश्या वातावरणात ती आरती अजूनच मंगलमय, प्रसन्न वाटायची. कधी भीमसेन जोशीची अभंगवाणी तर कधी संध्याकाळी प्रल्हाद शिंदे यांची 'बाप्पा मोरया रे' सारखी गाणी. ही गाणी खूप दुरून ऐकू यायची आणि शांत वाटायचे.
गणपतीची प्रतिष्ठापना झाली की लगेच वेध लागायचे गौरीच्या स्वागताचे. आई आणि एखादी काकू तुळशी बागेतून गौरी आणि तिच्या बाळाच्या शाडूच्या मुखवट्यांची खरेदी करून यायच्या. २ मुखवटे गौरी करता आणि २ तिच्या बाळाकरता. मग गौरी बसायच्या दिवशी आई आणि काकू गौरींना सजवायची. गणपतीच्या पुढ्यात गौरी बसवल्या जात. गौरीना साडी नेसवणे आणि दागिने घालणे मला खूप आवडायचे. आम्ही लहान असताना समोर बसून फक्त बघत असू. पण दहावी नंतर मलापण एक गौर सजवायला मिळू लागली. हा प्रकार खरेच खूप अवघड असतो. नवी कोरी साडी त्या गौरीच्या stand ला नेसवायची म्हणजे खूपच कौशल्याचे काम असते. माझी आई त्या करता दर वर्षी २ नव्या महागड्या साड्या विकत आणायची. अतिशय नाजूकपणे ,सुबकपणे ती साडी नेसवावी लागे. साडी, मंगळसूत्र आणि इतर दागिने असे सगळे करून झाले की मुखवटे म्हणजेच गौर वाजत गाजत घरी आणायचो.
गौरीच्या स्वागताकरता घरभर रांगोळीने गौरीची पावले काढली जात आणि त्यावर हळदी कुंकू वाहिले जाई. स्वयंपाक घरात, कपाटापाशी, घरातल्या लॉकरपाशी, देव्हार्यापाशी अश्या सगळ्या ठिकाणी ही पावले काढली जायची.
मग त्या मुखवट्यावर खण पांघरून आई आणि एखादी काकू डोक्यावर आणि दोन्ही खांद्यावर पदर घेवून बंगल्याच्या फाटका पासून गौर घेवून येत. त्यांच्या पाठोपाठ आम्ही सगळी लहान मोठी मुले, घरातल्या इतर बायका घंटा झांजा, वाटी-चमचा वाजवत येत असू. असे वाजत गाजत येताना आम्ही सगळे म्हणायचो " महालक्ष्मी आली" आणि मग जिच्या हातात गौरी आहेत त्या दोघी एकदम म्हणायच्या "सोन्याची पावले". दाराच्या उंबर्यात आल्यावर मुखवटे उबर्याला स्पर्श करून आणि तांदळाचे माप ओलांडून गौरी घरात प्रवेश करायच्या. घरात गौर आली की तिला सगळे घर दाखवायचो. प्रत्येक ठिकाणी आल्यावर गौरीला विचारायचे "गौरी गौरी, कुठे आलीस?" मग गौर म्हणे "स्वयंपाकघरात". गौर विचारी "इथे काय आहे?". मग आम्ही म्हणायचो "धान्य आहे". त्यावर गौर म्हणे "भरून वाहू दे". गौर येईल ओट्यापाशी. "इथे काय आहे?". आम्ही सांगायचो "रुचकर पदार्थ आहेत, गोडधोडाचे पक्वान्न आहे". मग गौर म्हणे "भरून वाहू दे".......
असे सगळीकडे गौर फिरून आली की हे मुखवटे सजवलेल्या stand वर हलक्या हाताने बसवले जात. एकदा का गौर बसवली कि ती अजिबात हलवायची नसते. त्या गौरीच्या पुढ्यात त्यांची बाळे आणि ओटी ठेवायची. गौरी सोवळ्यातल्या असल्यामुळे तिथे इतर काही डेकोरेशन किंवा फराळाचे पदार्थ ठेवायचे नसतात. फक्त ५ फळे ठेवायची ज्या मध्ये कणीस असलेच पाहिजे. गौर बसवून झाली कि मग गौरीची आरती होत असे. पहिल्या दिवशी भाजी भाकरीचा नैवैद्य दाखवला जाई.
आमच्या घरात एक समजूत आहे. ती म्हणजे जी सून (माझ्या आजोबांची) गौर घेवून येते तिचा भास त्या गौरी मध्ये होतो. म्हणजे एक काकू जाड होती तर एक उंच होती. त्यानी गौरी आणल्या तर त्यांचे प्रतिबिंब गौरी मध्ये दिसे. गौरीच्या पोटात मिठाई ठेवायची प्रथा होती. आणि हळदी कुंकवाने भरलेली कोयरी. आमची समजूत अशी की जर गौरीचे सगळे काही नीट यथासांग केले कि त्या मध्ये दुसर्या दिवशी त्या कोयरी मध्ये चिमुकली बोटे उठलेली दिसत.
त्या दिवशी रात्री सगळ्या काकू ,चुलत भावंडे आणि कधी कधी काकादेखिल राहायला येत. रात्रीची घरातली जेवणे झाली कि सगळ्या काकू दुसऱ्या दिवशीची भाजी निवडणे, सवाष्णी करता गजरे बनवणे अशी तयारी करत जागायच्या. आम्ही तिघी बहिणी अश्या वेळेस लहान भावंडाची काळजी घे, कोणाला जेवायला भरव, लहान भावंडाना झोपव आणि मुख्य म्हणजे गच्चीत सगळ्याच्या गाद्या घाल अश्या कामात असू. कामाच्या जोडीलाच गप्पा आणि चेष्टा यांना उत येई. कामे संपली तरी गप्पा चालूच. एखादी काकू, जिचे मूल लहान आहे, ती आधीच खाली घरात एखादी जागा पटकावून ठेवायची. पण जेव्हा गच्ची मध्ये गप्पा रंगायच्या तेव्हा मग तिला गप्पा सोडून जाववत नसे. मग तिला आम्ही चिडवायचो. शेवटी रात्री १२.३०- १ वाजता आई सांगायची "आता सगळेजण झोपा, उद्या सवाष्ण जेवायची आहे". एकदम गंभीरतेने ,उद्या खरेच एक मोठा सण आहे ह्या भावनेने सगळे झोपी जायचो.
गौरी जेवणाच्या दिवशी सकाळी हसत खेळत पण घड्याळाकडे लक्ष ठेवत स्वयंपाक चालायचा. आत्या सगळ्याची लाडकी होती. ती माहेरवाशीण म्हणून आलेली असायची. 'व्हराड निघालय लंडनला' मधला एक संवाद आहे " वन्स..अहो वन्स, गेल्या न गे ssssssssssss ल्या ...अजिबात कामाला हात लावायला नको ". तो आत्याला ऐकवून एखादी काकू तिची चेष्टा करायची. असे झाले की माझी आई मात्र थांबवायची. "माहेरवाशिणीला चिडवू नका ग" म्हणायची.
या दिवशी जेवणात पंच-पक्वान्ने, पुरणपोळी, वरण-भात, मसाले-भात, कटाची आमटी, २ कोशिंबिरी, वाटली डाळ,पंचामृत, अळूवडी, पडवळ घालून कढी आणि २ भाज्या असा बेत असायचा. आम्ही ३ सवाष्णींना जेवायला बोलवायचे. सवाष्णी जेवायला आल्या कि मग गौरीची आरती होई. नैवैद्य दाखवला जाई आणि मग, सवाष्णी आणि घरातली लहान मुले यांची पंगत बसे. मला या पंगतीत बसून स्वतःला लहान म्हणवून घ्यायला अजिबात आवडत नसे. म्हणून मग मी आई आणि काकुंना लाडी-गोडी लावून "मी तुम्हाला वाढायला मदत करते" सांगत त्या पंगतीत बसायचे टाळायची. त्यामुळे पुढे पुढे प्रसादाचे ताट तयार करणे, ताटाभोवती रांगोळी काढणे ही माझीच कामे झाली. जेवल्यानंतर गौरीना गोविंद विडा द्यायचा.
दुपारी माझी आई, सगळ्या काकू आणि आम्ही मुली कित्येकदा गौरीकडे एकटक बघत बसल्याचे आठवते. लेकुरवाळी गौर गौरी-जेवणाच्या दिवशी इतकी इतकी प्रसन्ना दिसते कि ती गोष्ट फक्त अनुभवण्याची आहे. आम्ही अक्षरश गौरी समोर बसून राहायचो. निस्तब्ध. निशब्द.
गौरी जेवणाच्या दिवशी संध्याकाळी हळदी कुंकू. आईच्या आणि काकूंच्या माहेरच्या बायका (बहिणी, वहिनी), त्यांच्या मैत्रिणी, जवळपासच्या बायका असे करत कमीत कमी ५० बायका तरी हळदी-कुंकवाला येत. माझ्या आईची एक छान पद्धत होती. जिच्या ओळखीच्या बायका आल्या असतील, तिने त्या बायकाशी बोलत बसायचे आणि त्यांना हळदी कुंकू द्यायचे. आणि बाकीच्या जावांनी किंवा आम्ही मुलींनी फराळाची ताटे देणे, पाणी देणे किंवा प्रसाद बांधून देणे ही कामे करायची. त्यामुळे जिच्या माहेरची माणसे येत, त्यांच्याशी बोलायला तिला उसंत मिळे.
मग गौरी विसर्जनाचा दिवस उजाडे. शेवटच्या दिवशी गौरी उतरवताना आई दहीभाताचा नैवैद्य दाखवायची आणि मुखवटे हलवून गणपती शेजारी ठेवी (हे मुखवटे अनंत चतुर्दशीला गणपतीबरोबर विसर्जित होत). नंतर बाकीची गौर आवरायची. गौरीची रिकामी जागा पाहून मनात कोठेतरी गलबल्या सारखे वाटे.
गौरीना निरोप दिल्यावर त्या दिवशी रात्री ११ वाजता घरचे सगळे पुण्यातले देखाव्याचे गणपती बघायला बाहेर पडत असू. आजूबाजूला राहणारे २-३ कुटुंबे, बाबांचे मित्र आणि त्यांची कुटुंबे असे बराच मोठा घोळका जमा होत असे. पुण्यातले देखाव्याचे गणपती पाहणे हा एक मोठा सोहळा असे. संपूर्ण पुण्यात जत्रा भरल्या सारखे उत्साहाचे वातावरण असे. रस्त्यावर जथेच्या जथे लोटलेले असायचे. उत्साहाला अगदी उधाण आलेले असायचे. रात्री १-२ वाजता देखील वाटायचे नाही की इतकी रात्र झाली आहे. ठिकठिकाणी खाण्याचे पदार्थे विकणाऱ्या गाड्या असत. आख्खे पुणे रस्त्यावर आले आहे की काय असे वाटे. शिवाय बाहेरगावाहून सुद्धा लोक हे देखाव्याचे गणपती पाहायला येत. दर २-३ चौकामध्ये सार्वजनिक गणपतीचा मांडव असे. आणि एखादा ऐतिहासिक किंवा पौराणिक देखावा किंवा विदूत रोषणाई .......सगळे बघायला खूप मजा येई. गप्पा मारत, आणि वाटेत दिसेल ते प्रत्येक गोष्ट - काकडी, उसाचा रस, ओल्या शेंगा, शेंगदाणे खात खात रात्रभर भटकून मानाचे ५ गणपती आणि इतर गणपती पाहून पहाटे ४ -५ ला घरी येत असू.
आणि मग वेळ यायची अनंत चतुर्दशीची.परत सगळे काका काकू, भावंडे ,मित्र मंडळी जमा होत. जोर जोरात आरत्या म्हण्याची परत एकदा चढाओढ लागे. जड अंत कारणाने गणरायाला निरोप दिला जायचा. पुन्हा पुढच्या वर्षी भेटण्या करता गणरायला आत्ताच आमंत्रण दिले जाई.
काळाच्या ओघात गाव बदलले, देश बदलला. आपली म्हणता येणारी माणसे फोन आणि इ-मेल मुळे हाकेच्या (क्लिकच्या) अंतरावर जरी असली तरी काही क्षण काही सण समारंभ तसेच साजरे करता येत नाहीत. मग अश्या वेळी मी मनाच्या कप्प्यात जपून ठेवलेले हे मोरपीस बाहेर काढते आणि मनाशीच म्हणते "गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या".
प्रतिक्रिया
14 Sep 2010 - 12:32 am | राजेश घासकडवी
तुमच्या घरच्या प्रथांचं खूपच छान, ओघवतं वर्णन केलेलं आहे.
आमच्या काकांच्या घरच्या गौरी गणपतींची आठवण झाली. काकांकडे दहा दिवसाचा गणपती असायचा. त्याच्या मखराच्या सजावटीचं काम आम्हा मुलांवर यायचं. माझ्या चुलत बहिणीच्या अंगात कला होती, व तिला हौसही होती. तिला मदत करणं हे माझं काम असायचं. पुढे तिचं लग्न झालं, मी मोठा झालो तेव्हा सगळी सजावट मीच करायचो.
गौरी देखील बसायच्या. गौरींचे चांगले जड पितळी मुखवटे असायचे. ते चिंचेने धुवून काढायचे, रांगोळीने घासूनपुसून लख्ख करायचे आणि केस, भुवया, डोळे, ओठ रंगवून सजावट करायची असायची. मी लहान असताना रांगोळीने घासायला खूप आवडायचं. मग ते मुखवटे तयार धडावर ठेवायचे, ती धडं बरण्यांमध्ये बसवायची आणि त्यांना साड्या नेसवायच्या हे सोपस्कार असायचे. मग गौरी बसवायच्या वेळी रांगोळीने काढलेल्या, कुंकू घातलेल्या पावलांवरून ते मुखवटे चालवत आणायचे आणि सजवलेल्या धडावर बसवायचे.
या सगळ्या लहानपणच्या आठवणी तुमचा लेख वाचून जाग्या झाल्या.
12 Sep 2010 - 9:05 am | विंजिनेर
फार छान लिहिलेय पारूबाई! स्मृतीरंजन सुखावणारे खचितच!
सण-वार तेच असतात पण आपापल्या घरातल्या किंचित वेगळ्या चालीरितींनी ते 'आपले' होतात.
12 Sep 2010 - 9:11 am | स्वाती दिनेश
जुने दिवस आठवून देणारा सुंदर लेख!
(स्मृतीरंजनात गर्क ) स्वाती
12 Sep 2010 - 9:17 am | अविनाशकुलकर्णी
मन भुतकाळात गेले व रम्य वाटले
12 Sep 2010 - 10:20 am | अरुंधती
मनात जपलेल्या सुंदर गौरी गणपतीच्या आठवणी ह्या लेखामुळे जागा झाल्या! छान लिहिले आहेस... सगळे चित्र डोळ्यासमोर उभे ठाकले! गणपतीबाप्पा मोरया!! :-)
12 Sep 2010 - 11:43 am | प्रमोद्_पुणे
पारूबाई छान लिहिले आहे..
12 Sep 2010 - 12:52 pm | बिपिन कार्यकर्ते
छान वाटले वाचताना. स्मरणरंजन कोणाला आवडत नाही? शिवाय थोड्या फार फरकाने हेच सगळ्यांनी अनुभवले असते, पण पारुबाईंनी बारकाव्यांसकट हे सगळे जिवंत केले आहे त्यामुळे दुधात साखर!!!
लिहित रहा हो.
12 Sep 2010 - 2:20 pm | विलासराव
+१
12 Sep 2010 - 3:30 pm | मितान
छान झालाय लेख !
>>>>काळाच्या ओघात गाव बदलले, देश बदलला. आपली म्हणता येणारी माणसे फोन आणि इ-मेल मुळे हाकेच्या (क्लिकच्या) अंतरावर जरी असली तरी काही क्षण काही सण समारंभ तसेच साजरे करता येत नाहीत. मग अश्या वेळी मी मनाच्या कप्प्यात जपून ठेवलेले हे मोरपीस बाहेर काढते
अगदी मनातलंच ! आवडले लेखन :)
12 Sep 2010 - 3:53 pm | दत्ता काळे
आमच्याकडे अजूनही गौरी गणपती अश्याच पध्दतीने साजरे केले जातात. हे सणवार सध्या सुरू असल्याने घराला "खटल्याचे घर" म्हणता येईल असे स्वरूप आले आहे.
12 Sep 2010 - 9:53 pm | रेवती
माझ्या माहेरीही अश्याच पद्धतीने समारंभ एकत्रितपणे साजरे केले जात असत.
मोठा परिवार असण्यातली मजा यावेळेस समजते.
मुलांची धमाल असते. आम्ही मुलीही यानिमित्ताने गौरींना साड्या नेसवणे, आज्जीच्या जरीच्या साडीची शिवलेली परकर पोलकी घालणे असे उद्योग करीत असू. फुले पत्री जमा करणे मला फार आवडत असे.
गौरी जायच्या दिवशी मला रडू येत असे. आज तुमचा लेख वाचून सगळे आठवले.