परवाच एका परिचितांनी एक रन्गीत पाकीट दिले...भेट म्हणून. Mixed hot chilli peppers असे त्यावर लिहीले होते. ह्य पाकीटामधे रंगीबेरंगी , जरा जाडसर आणि लांबट आकाराच्या ३५-४० मिरच्या होत्या. लाल , केशरी, पिवळा, हिरवा, पोपटी असे विविध रंग बघून रंगवेड्या माझ्या छोटीला तर त्या लगेच खेळायला हव्या होत्या.
खरच; ह्या मिरच्या चवीने hot असल्या तरी त्यांना cool मिरची म्हणावे असेच सही रंग होते त्यांचे.
काही खाद्य पदार्थ बनवण्यापेक्षा टेबल वर सजवून नुसतेच त्यान्चे रंग न्याहळ्त बसावे असे वाटत होते. पण काहीतरी करायलाच हवे होते. नाहीतर फ्रीज मधे ठेवूनही काही दिवसांनी खराब झाल्या असत्या. परिचितांनी सान्गितले की ते ह्यान्ची भजी करतात आणि ती फारच छान लागतात. मी ही तेच करयचे ठरवले.
आख्ख्या मिरच्या उभी चिर पाडून आत किंचितसे मीठ भरुन भिजवलेल्या डाळीच्या पीठात बुडवून भजी केली. भजी दिसत छान होती आणि चवीला तर अहाहा ! मस्त च लागत होती. (अर्थात मला भजी च्या प्रत्येक घासाबरोबर पाणी प्यावे लागत होते. पण तरीही भजी enjoy केली. ) मला लाल मिरची सर्वात जास्त तिखट वाटली.. हिरवी तळल्यावर बरीच mild वाटली.
ज्याना तिखटजाळ पदार्थांन्ची आवड आहे त्यांना जरुर आवडतील ह्या मिरच्या.
अजून मिरच्या बर्याच शिल्लक आहेत. नवरॅने सुचवले की ग्रील वर भाजून मग लिंबू , मीठ घालून त्याची चटणी कर.
ईथल्या हौशी बल्ल्वाचार्यांना आणि पाककला निपूण सख्यांना अजून काही ह्या मिरच्यांचे पदार्थ सुचतायेत का? काही वेगळा चविष्ट पदार्थ बनवता येइल का?
-- ईश्वरी
प्रतिक्रिया
10 May 2008 - 2:54 am | वरदा
जर सुकवून तळली तर? आणि त्यात दहि मीठ घालून खायचं तळल्यावर तिखट्पणा थोडा कमी होईल आणि दही घातलं की अजुन कमी होईल्...बाकि एक्स्पर्ट्स सांगतीलच
स्वगतः ही का चिडवतेय मला..बाहेर बदाबदा पाऊस कोसळतोय माझं ऑफिसमधलं काम संपलं नाहीये आणि ही भज्यांचं चित्र टाकते... :(
10 May 2008 - 3:10 am | वेलदोडा
मिरच्यांची भजी !!!
व्वा ...झकास. पाणी सुटलय तोन्डाला =P~
भरली मिरची हा प्रकार करता येईल. पण सारण काय भरावे हे जाणकार सान्गू शकतील. सॅलड मध्ये पण वापरू शकता. पण त्या आधी व्हिनेगर मधे बुडवून ठेवाव्या लागतील्...म्हणजे तिखटपणा कमी होईल. आत बिया असतील तर त्याही काढून टाका कारण बियांमुळे तिखटपणा जास्त वाढतो.
-- वेलदोडा
10 May 2008 - 3:48 am | धनंजय
पण रंगांची गंमत दिसण्यासाठी हळद घालू नये - खूप कमी घालावी.
रंगीबेरंगी ठेचा :
लिंबाचा रस आणि मीठ घालून मिरच्यांचा ठेचा करावा - प्रत्येक रंगाच्या मिरच्या वेगवेगळ्या करून. वाढताना वेगवेगळे रंग सुशोभित दिसतील असे शेजारी-शेजारी वाढावेत.
(ठेचण्यापूर्वी मिरच्या चुलीच्या/गॅसच्या जाळाशेजारी शेजारी ठेवून भाजल्या, सालपटे काढली-न काढली तर ठेचा खमंग होतो. सालपटे नाही काढलीत तर तर भाजलेल्या सालाचा काळा रंग ठेच्याला येतो.) लिंबाने-मिठाने आणि भाजल्याने तिखटपणा थोडा कमी होतो.
तुमची भजीची कल्पना तर मस्तच आहे.
10 May 2008 - 4:07 am | गृहिणि
काचेच्या पारदर्शक बाटलित विनेगर मध्ये बुडवलेल्या मिरच्या वापरुन छानस शोपिस करता येइल. बाजारात असे शोपिस मिळतात त्यात मिरच्या, गाजराचे तुकडे, लसणाच्या पाकळ्या इत्यादि घालुन रंगसंगति साधलि असते.
11 May 2008 - 2:23 pm | ईश्वरी
वरदा , वेलदोडा, धनंजय, गृहिणि तुम्हा सर्वाना प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद.
रंगीबेरंगी ठेच्याची कल्पना मस्त आहे. करून बघायला हरकत नाही. शोपिस ची कल्पना ही छान आहे पण त्यासाठी बाटली हवाबंद करावी लागेल . ते थोडे अवघड काम वाटते.
--ईश्वरी
10 May 2008 - 8:25 am | मानस
कसं करायचं माहीत नाही पण अशा प्रकारच्या मिरच्यांचे "सालन" फारच छान लागतं. बर्यांच वेळेस खाल्लं आहे. पाक़-कृती मिळाल्यास येथे नक्की देइन.
10 May 2008 - 8:38 am | प्रभाकर पेठकर
मिरच्यांचा तिखटपणा कमी करण्यासाठी मिरचीला उभी चीर देऊन आतील बिया आणि प्लासेंटा काढून टाकावा.
१) भजी करायची असतील आणि अजून तिखटपणा कमी करायचा असेल तर उकळत्या पाण्यात वरील मिरच्या शिजवून नंतर कोरड्या करून हळद, मीठ घातलेल्या बेसनात (चण्याच्या पिठात) घोळवून तळायच्या. पण रंगांची मजा मिळत नाही.
२) मिरच्यांच्या बिया आणि प्लासेंटा काढून टाकून मिरच्या अगदी पातळ चिराव्यात आणि वेगवेगळ्या रंगाना मिसळून पांढर्या शुभ्र पुलावात वापराव्यात. पुलावात अगदी बारीक चिरलेला (किंवा किसलेला) कांदा, काजू, मनुका टाकाव्यात.
३) वरील प्रमाणेच पुलाव करून (पिवळ्या रंगाच्या मिरच्या वगळून) पुलावात किंचित हळद टाकून पुलाव पिवळा करावा आणि पनीरचे तुकडे (साधारणपणे १ सेंटी आकाराचे), गर काढून टाकलेल्या टोमॅटोचे चौकोनी तुकडे आणि हिरव्यागार कोथिंबीरीने सुशोभित करावा.
शुभेच्छा....!
10 May 2008 - 1:40 pm | ईश्वरी
वा काका, तुम्ही एखाद्या सुगरणीलाही लाजवाल अशा टीप्स दिल्या आहेत.
वर लिहिलेले प्रकाशित केल्यावर मी आवर्जून तुमच्या प्रतिक्रियेची वाट पहात होते. तुम्ही सागिंतलेल्या पुलावाची रेसिपी छान आहे.
धन्यवाद.
ईश्वरी
10 May 2008 - 12:50 pm | स्वाती दिनेश
मिरच्या मस्त दिसत आहेत.पेठकरांनी सांगितले आहेच तसे पुलावात वापर कर, तसेच चायनिज प्राईड राईस,न्यूडल्स मध्ये वापरता येतील.
पनिर चिली करता येईल. स्टफ्ड मिरच्या करता येतील.(स्टफ्ड सिमला मिर्च सारख्या बटाट्याचे सारण भरून)
बेसन, मीठ,डेसिकेटेड कोकोनट/सुके खोबरे/ओले खोबरे,धने जीरे पूड आणि थोडी साखर सगळे एकत्र करून थोड्या चिंचेच्या कोळात भिजव.दाटसर व्हायला हवे. हे स्टफिंग मिरच्यात भर आणि फोडणीला टाक,हळद अगदी कमी म्हणजे रंगांची मजा जाणार नाही.परतून भाजी कर..कोथिंबिरीने सजव्...मस्त्त्त्त्त्त भाजी होते.आमच्या इथे बर्याच तुर्की दुकानात अशा मिरच्या हमखास मिळतात मी त्यांची भजी आणि भाजी दोन्ही करते,:) तसेच न्यूडल्स,फ्राईड राईस,पुलाव इ. मध्येही वापरते.
10 May 2008 - 1:48 pm | ईश्वरी
मानस,
सालन करून बघायला आवडेल. मी कधी केलेले नाही. पाक़-कृती ची वाट पहात आहे.
स्वाती,
पनीर चिली, स्टफ्ड मिरच्या , भाजी छानच सुचवले आहे सर्व. आता अजुन मिरच्या आणून ठेवीन. एकेक हे सर्व पदार्थ करून बघण्यासाठी.
धन्यवाद.
ईश्वरी
10 May 2008 - 2:49 pm | पक्या
भजी मस्तच दिसतायेत.
ह्या मिरच्यांचे चिली मश्रूम हा पदार्थ करता येईल. गूगल केल्यास रेसिपी मिळेल.
बार्बेक्यूसाठी पण वापरता येतील.
-- पक्या
10 May 2008 - 5:11 pm | शितल
मिरच्याचा ठेचा, पेठकरकाका॑नी सुचवलेली भजी, पुलाव हे तर खुपच छान, ईश्वरी ताई कधी करताय हे सर्व आणि आम्हाला बोलवताय.
10 May 2008 - 5:56 pm | स्वाती दिनेश
१.बिया काढून मिरच्यांचे चौकोनी तुकडे करुन घेणे,कांदा चौकोनी चिरुन त्यात घालणे,चाट मसाला,मीठ घालणे एक सारखे करुन पावात भरणे आणि टोस्ट सँडविच करणे .टोमॅटो सॉस बरोबर गरम गरम मस्त लागतात..
२.ह्या सगळ्या रंगीत मिरच्या,कांदा,बटाटा,फ्लॉवर,मटार इ.घालून मिक्स रस्सा करता येईल.
३.किवा वरील सगळ्या भाज्या+ पनीर +गरम मसाला घालून मिक्स भाजी करता येईल.क्रीम+कोथिंबिरीने सजवून त्याला व्हेज कढाई,व्हेज कोल्हापूरी ..तत्सम काही नाव देऊन पंजाबी डिश म्हणून सर्व्ह करता येईल,:)
स्वाती
10 May 2008 - 10:42 pm | ईश्वरी
स्वाती,
छान आहेत तुझ्या रेसिपीज (तू चालेल ना म्हट्लेलं ?) मला टोस्ट सँडविच ची कल्पना फारच आवडली.
शीतल - you are most welcome.
ईश्वरी
11 May 2008 - 1:03 am | स्वाती राजेश
मिरचीमधे मसाला भरून त्या उन्हात चांगल्या वाळवल्यास तर तुला वर्षभर वापरता येतील,
ती फोडणीत वापरून किंवा नुसती तळुन तु दहीभात, दहीपोहे, खिचडीत वापरू शकतेस.
तसेच पापड तळताना नुसती तळून सुद्धा छान लागते.
भाकरी बरोबर दह्यात कुस्करून सुद्धा छान लागते.
मिरचीत भरायला मसाला काय घालायचा हे माहीत नसेल तर सांग मी सांगेन तुला....:)
ठेचा सुद्धा छान होतो, व्हिनेगर पेक्षा लिंबूरस वापर आणि हवाबंद बरणीत ठेव....
लोणचे सुद्धा होईल.
11 May 2008 - 4:09 am | पिवळा डांबिस
मस्त बार्बेक्यूचा बेत करावा.
ही भेट ज्यांनी दिली त्या परिचितांनाही बार्बेक्यूला बोलवावे.
सर्व मिरच्या नीट धुवून घ्याव्यात आणि कापडाने स्वच्छ पुसून कोरड्या कराव्यात.
बार्बेक्यूचे निखारे नीट पेटू द्यावेत.
निखारे रसरसून फुलले की त्यावर या मिरच्या टाकून त्याची त्या परिचितांना चांगली धुरी द्यावी!!!:))
....
च्यायला! काय पण परिचित आहेत!!
या उन्हाळ्यात चांगले आंबे, स्ट्रॉबेरी (जिथे असाल त्याप्रमाणे!), नाही तर नाही, गेला बाजार कलिंगडाची तरी भेट द्यायची सोडून मिरच्या कसल्या भेट म्हणून देतात!!!:))
रोखठोक,
पिवळा डांबिस
11 May 2008 - 5:09 am | वेलदोडा
निखारे रसरसून फुलले की त्यावर या मिरच्या टाकून त्याची त्या परिचितांना चांगली धुरी द्यावी!!!
-- हे लिहीण्यातील तुमचा उद्देश समजला नाही. फालतू काहि तरी आहे म्हणुन टर उडवणे, या साईट वर रेसिपी विचारू नये म्हणून, तुम्हाला वाचताना फार त्रासदायक वाट्ले म्हणून ते व्यक्त करण्यासाठी की सहज काहीतरी गमतीशीर लिहावे म्हणून तुम्ही ही प्रतिक्रिया दिली आहे ?
कोणी कोणाला काय भेटवस्तू द्यावी हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. तुमच्या रोखठोक पणा पेक्षा तुम्ही उगाच पिडताय असे वाटते.
11 May 2008 - 7:36 am | पिवळा डांबिस
जाऊद्या, उद्देश समजला नाही तर सोडून द्या. अहो जगात सगळ्यांना सगळं समजलंच पाहिजे असं थोडंच आहे?
आमच्या प्रतिक्रियेबद्द्ल म्हणाल तर खालील वाक्य वाचून.
या उन्हाळ्यात चांगले आंबे, स्ट्रॉबेरी (जिथे असाल त्याप्रमाणे!), नाही तर नाही, गेला बाजार कलिंगडाची तरी भेट द्यायची सोडून मिरच्या कसल्या भेट म्हणून देतात!!!
आणि दोन खदाखदा हसणार्या स्माईलीज पाहून या प्रतिक्रियेमागचा मिश्किल अप्रोच मिपाकरांच्या लक्षात येणार नाही असे आम्हांला वाटत नाही. आमचा मिपाकरांच्या आणि हा धागा सुरु करणार्या ईश्वरीताईंच्याही विनोदबुद्धीवर (सेन्स ऑफ ह्यूमर) पूर्ण विश्वास आहे.
तुमच्यासाठी म्हणाल तर तुम्हीच तीन-चार पर्याय सुचवले आहेत. तेंव्हा तुम्ही "अडम् तडम् तडतड बाजा" करून त्यातील एक पर्याय निवडण्यास आमची हरकत नाही.:)
12 May 2008 - 7:05 pm | विजुभाऊ
जाउ देत हो डाम्बिस काका
ज्याचे नावच वेलदोडा आहे त्याला मिरच्या कशा सोसायच्या?
तुम्ही एकतरी पाककृती पाहिली आहे का की जीत मिरच्यां बरोबर वेलदोडा टाकतात.
हैद्राबादी बिर्याणीत वेलदोडी असतात पण मिरच्या गायब असतात. त्या सालन सोबत येतात.
त्या गरिब वेलदोड्याला गोडाबरोबर राहुद्या ना.
केरळी वेलदोड्याची जोडी कोल्हापुरी मिरची बरोबर ..जोडा शोभुन दिसत नाय
डाम्बीस बाव खरे असा का नाय ता सांगा.
आच्च गोयकरां खरां ताच उलय.
तुझो गोयंकर मित्र इजुभऊ
11 May 2008 - 9:08 am | विसोबा खेचर
मिरच्या बेट्या काय सुरेख दिसताहेत!
मिरची भज्यांची पाकृ आणि फोटूही फार सुरेख! :)
ईश्वरी, अजूनही अश्याच उत्तमोत्तम पाकृ मिपावर येऊ देत ही विनंती...
तात्या.
11 May 2008 - 11:51 am | ईश्वरी
मिरची भज्यांची पाकृ आणि फोटूही फार सुरेख!
ईश्वरी, अजूनही अश्याच उत्तमोत्तम पाकृ मिपावर येऊ देत ही विनंती...
-- तात्यांची प्रतिक्रिया वाचून खूप छान वाटले.
अशा उत्तेजनात्मक प्रतिक्रियेबद्द्ल आणि वेगळा खास पाकक्रिया विभाग सुरू केल्याबद्द्ल तात्यांना मनापासून धन्यवाद.
डाम्बिसकाका,
तुमचा सेन्स ओफ ह्युमर मस्त च आहे. खरय, मिरच्यांची भेट जरा वेगळीच म्हणावी लागेल.
-- ईश्वरी
11 May 2008 - 7:05 pm | विजुभाऊ
मला या एका गोष्टीसाठी मि पा आवडते. मनमोकळे काहीही लिहिता येते. विद्वत्त्तेच्या झिरमिळ्या बाजुला करुन घरात बहीणीशी / काकुशी /काकाशी /वहीनीशी गप्पा मारतो तसे इथे सगळे बोलत असतात.
इथले सगळे मला माझ्या परिवारातले वाटतात. मिपा चे वैषिष्ठ्य काय हे आत्ता नक्की समजले.
मिपा परिवारातला सदस्य विजुभाऊ
11 May 2008 - 11:39 pm | विसोबा खेचर
विद्वत्त्तेच्या झिरमिळ्या बाजुला करुन घरात बहीणीशी / काकुशी /काकाशी /वहीनीशी गप्पा मारतो तसे इथे सगळे बोलत असतात.
क्य बात है विजूभाऊ! :)
11 May 2008 - 11:32 pm | चतुरंग
बघून एक क्षणभर पोपट असल्यासारखे वाटले!
आपल्या पायात एकेक मिरची उचलून, अलगद फोडून, त्यातली एकेक बी अणकुचिदार आकडेबाज चोचीने सोलून खाणारा मिठूमिया!
ईश्वरी, ह्या मिरच्यांचीही पा.कृ. होऊ शकते हे नव्याने समजले. धन्यवाद!
चतुरंग
12 May 2008 - 11:00 am | पल्लवी
त्या गुलाबी मिरच्या काय गोड दिसतायेत..
गुलाबी ड्रेसवर मिरच्यांची माळ भारी दिसेल ना..... B)