रात्री अचानक झोप उडाली
होती प्रखर झोतात खोली
होते काय नाही समजले
शुभ्र किरणांनी घट्ट बांधले
सरसर नेले वरती ओढून
दिले एका कक्षात टाकून
बघतो अघटीत काय जाहले
सभोवती बहु लोकची दिसले
धावलो बाजुला माणूस पाहुन
विचारण्या कोठे आलो आपण
नव्ह्ती भींत तरी अडकलो
त्याच्यापाशी नाही पोहोचलो
विचारले ओरडून मी त्याला
कसला आहे विचीत्र मामला
बहुदा त्याने नाही एकले
म्हणून मी निरखूनी पाहिले
खुर्चीवरती होता बसला
प्रकाश रज्जुने बांधला
हात दोन्ही उंचावलेले
दंडामधुनी रक्त खेचले
घाबरून मी पाही सगळे
चारी दिशा मानव पसरले
कोणी धावत्या पट्ट्यावरती
कोणी होते उलट लटकती
बाब अचानक कळली सारी
प्रयोगशाळा होती न्यारी
जाणण्या संपूर्ण मानुष
होते प्रयोग सुरू अमानुष
माझे काय? घाम फुटला
प्रश्न लगेच तो ही सुटला
खेचून बसवले खुर्चीवरती
टोप आवळला डोक्यावरती
मी ओरडलो सोडा मजला
मस्तकात आवाज उमटला
नको घाबरू देऊ सोडून
प्रयोगास आधी संपवुन
काय प्रयोग, का धरले मजला?
विचारले अदॄष्य जेलरला
त्याच क्षणी माथ्यात सणक
आवाजे फटकारला चाबुक
हातपाय ते कसे चालती
तुझ्या मेंदुच्या आद्न्येवरती
जाणल्यावरी सोडू तुजला
उपयोगही नाही आम्हाला
अमानुषांनो सोडा मजला
मी आहे मानव एक भला
नाही बांधील ह्या प्रयोगाला
नाही हा अधीकार तुम्हाला
करता असले क्रोधित ताडन
मनात बोले कुणी अमानव
मार्ग मानवानेच दाखवले
उंदरावरचे प्रयोग पाहिले
विद्न्यानाच्या प्रगती साठी
इकाटीनीच्या सुयशासाठी
क्षुद्र मानव उंदीर आमुचे
वापरले संकेतच तुमचे
करू पूर्ण अमुच्या कार्याला
पिंपात बुडवून टाकू तुम्हाला
इकाटीनीच्या तळघरात ढेर
पिंपात मेले ओल्या उंदीर
तळटीप "इकाटीनी" हजारो प्रकाशवर्षे दूरवरून आलेली जमात.
प्रतिक्रिया
9 May 2008 - 5:15 pm | आनंदयात्री
विज्ञानकथे प्रमाणेच विज्ञानकविता !!
व्वा .. उत्तम प्रयत्न .. आवडली.
-आपलाच
ईकाटिनयात्री :)
9 May 2008 - 5:23 pm | अरुण मनोहर
प्रतिक्रिये साठी धन्यवाद.
पण अरे व्वा! तुम्ही सुध्दा सुटलात का?
............................................आपला पत्ता गुप्त ठेवा.
9 May 2008 - 5:21 pm | मन
अगदि झकास!!
आपलेच,
इकाटीनाचे मन
9 May 2008 - 5:23 pm | स्वाती दिनेश
विज्ञानकथे प्रमाणेच विज्ञानकविता !!
व्वा..आवडली,
असेच,
स्वाती
9 May 2008 - 5:28 pm | मनस्वी
अरुणकाका, विज्ञानकथा आवडली.
वेगळ्याच विश्वात नेलं.
9 May 2008 - 6:39 pm | शितल
कविता आवडली , छान वाटले वाचुन.
असेच लिहित जा. वाचायला आवडेल.
9 May 2008 - 8:19 pm | चतुरंग
वेगळा विषय हाताळण्याबद्दल अभिनंदन!
(अवांतर - बा.सी.मर्ढेकरांच्या 'पिपात मेले ओल्या उंदिर' ह्या ओळीचा असा वेगळा वापर करमणूक करुन गेला! :) )
(अवांतर मधे आधी नजरचुकीने मर्ढेकरांचा उल्लेख 'आरतीप्रभू' असा केला होता पण मिपा वरील अभ्यासू वाचकांनी चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. आरतीप्रभू म्हणजे चिं. त्र्यं. खानोलकर. चुकीबद्दल क्षमस्व.)
चतुरंग
13 May 2008 - 11:28 am | विसोबा खेचर
'विज्ञानकविता' छानच आहे..
आपला,
तात्या इकाटिनी.