धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग १
धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग २
धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग ३
धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग ४
त्या जंगलात फिरण्यासाठी स्वतःची गाडी असणे आवश्यक होते.. तिथल्या गाड्या नाहीयेत.... झालं.. एवढ्या कष्टावर बोळा फिरणार असं वाटलं क्षणभर. थोडी आजुबाजूला चौकशी केल्यावर शेजारच्या गावात भाड्याने गाडी मिळू शकेल असा सुगावा लागला.
एकट्यासाठी एवढे पैसे द्यायला जिवावर येत होतं. पण माज करायचाच तर दात टोकरून कशाला असा अस्सल विचार करून, थेट टोयोटाची, उघड्या छताची, फोर व्हील ड्राइव्ह, स्टेशन वॅगन ठरवली दोन दिवसासाठी, तिथल्याच एका रेंजरला चालक म्हणुनही ठरवून टाकला.. आणि क्षणाचाही विलंब न करता जंगलात घुसलो...आत शिरल्यावर सर्वप्रथम काय झालं असेल, तर जंगल ह्या संकल्पनेला जोरदार धक्का बसला.
पण हा धक्का सुखद होता. हे काही सदाहरीत जंगल नव्हे. हा तर सॅव्हाना प्रदेश. चारही बाजुला क्षितीजापर्यंत पसरलेलं पिवळंधम्मक गवत, चार ते बारा-पंधरा फूट उंचीचं... अधुनमधुन 'जागते रहो' असं सांगत रामोशासारखे उभे असणारे वृक्ष... नजर जाइल तिथपर्यंत फक्त पिवळा सोनसळी प्रकाश... मावळत्या प्रकाशात नववधुसारखं सामोरं आलेलं हळदीच्या माखल्या अंगाचं रान... वाह.. काय बेहोषी पहिल्या भेटीतच...
मी भारावल्यासारखा तो पिवळा-तांबूस सोहळा पाहात होतो. ती मावळतीची छटा, पिवळ्या गालिचावरून अस्तंगत होणारा तो लाल गोळा.. रंग बघावेत.. की आकार.. की सावल्या पहाव्यात.. की नुसते आवाज ऐकावेत.. गवताच्या पात्याची ती तळपत्या तलवारीसारखी सारखी सळसळ्..त्या पात्यावरून प्रकाशाची तिरीप चमकुन होणारा भास्..कधि ते चकाकतं सळसळतं गवत पाण्यानं भिजुनंच चमकतय असं वाटतं..
आणि ह्या सगळ्यावर आपल्या आरस्पानी सौंदर्यानं मुक्त बागडणारे ते पशुपक्षी. कधी शेकडो हरणांचे, काळवीटांचे कळप तर कधी एखादाच हत्ती, तर कधी लगबगीनं जाणारा एखादा जिराफ किंवा झेब्रा.
एखादा निवांतपणे गवत खाण्यात गुंग झालेला शेकडो हरणांचा अथवा काळविटांचा कळप म्हणजे तर साक्षात काव्यच.. ती झोकदार, अवखळ चाल, जराशा आवाजानं टवकारणारे कान.. तुमच्याकडं पाहुनही न पाहिल्यासारखं करणारी ती मोहक नजर.. आणि अचानक, अगदी अनपेक्षीत उधळणारा तो संपुर्ण मुक्तछंद....पाण्यावर दगड मारल्यावर अचानक जशा लहरी चौफेर उसळाव्यात तशी चपळ, त्वरीत पण लयबद्ध हालचाल..
एक एक चित्र म्हणजे अक्षरशः एकेक कविताच...
आमच्या करंट्या प्रतिभेला सीमा आहे.. सौंदर्याला नाही. आपली गाडी दिसायला लागल्यापासून दिसेनाशी होइपर्यंत टक लावून मान किंचितही न झुकवता दोन-तीन नर सतत आपल्याकडे बघत असतात. त्या नजरेचं संमोहन जबरदस्त असतं.. खेचलेच जातो आपण.. यालाच रानगारूड म्हणत असावेत का..
आम्हाला झेब्रा माहीती आहे तो, RTO च्या जाहिरातीतला, पण खरा झेब्रा जेव्हा रस्ता ओलांडतो तेव्हा जनजागृती मोहीम, शिट्टी, लाल दिवा कश्शाचीही आवश्यकता नसते. गाड्या आपोआप बंद होतात. नजर थबकते. जिराफ वगैरे भारदस्त मंडळींची तर काय ऐट विचारता, आपला घास खाता खाता मान तिरकी करून असं रोखुन बघतील की आपल्यालाच ओशाळल्यासारखं व्हावं, आणि आपण अनाहुतपणे बोलुन जावं 'चालुदे, चालुदे.. सावकाश'
पण हे सगळं, बघायला ओपन ४*४ असेल तरच खरी गंमत. छत उघडं टाकून, उभं राहुन, मोकळा, भणाणता वारा कान सुन्न होइपर्यंत तोंडावर घ्यायचा. चारीबाजुला नजर फिरवुन, त्या अथांग पिवळ्या कॅनव्हासवर एखादा फटकारा जिकडे दिसेल ती दिशा चक्रधराला ओरडुन सांगायची... की निघाले त्या दिशेने सुसाट.. चांगली गाडी, चांगला चालक आणि चांगली नजर असेल तर सफारीत मजा आहे.. नाहितर थोडं अडचणीचंच काम आहे ते... माझ्या बरोबर एक युरोपियन जोडपं बिचारं छोट्या कारमधुन आलं होतं.. प्रत्येक ठिकाणी हे पोहोचेपर्यंत प्राणी पसार व्हायचे.. प्रत्येक वेळेला हे त्यांच वरातीमागुन घोडं बघुन मलाच दया आली.
सॅव्हाना मधे पाहायचे ते 'बिग फाइव्ह' म्हणजे सींह, हत्ती, चित्ता, बफेलो, आणि गेंडा.. यापैकी हत्ती, बफेलो उदंड दिसले.. गेंड्यानं पण लांबुन दर्शन दिलं.. चित्त्याचा काही योग आला नाही.. आणि वनराजांच काय झालं हे पुढच्या लेखात..
काही प्रकाशचित्रे टाकतोय.. अगदी साधा कॅमेरा नेला होता, पॉइंट अँड शूट... काही फोटो चांगले आले असतील तर ती रानाची जादू, माझी कला नाही.. काही नसतील आले तर ते काव्य मला लक्षांशानेही टिपता आलं नाही हा साधा निष्कर्श.
इथल्या फोटोंचा एक वेगळा संग्रह कलादालनात प्रकाशीत करावा म्हणतो.. म्हणजे अजुन बरेच फोटो टाकता येतील..
प्रतिक्रिया
16 Aug 2010 - 8:20 pm | सुनील
अप्रतिम!!!
फोटोंचा वेगळा धागा काढाच!
16 Aug 2010 - 8:25 pm | वात्रट
<<आम्हाला झेब्रा माहीती आहे तो, RTO च्या जाहिरातीतला, >>
खरय
आणि ते डुंबनारे प्राणी म्हणजे गेंडा दिसतोय हो न?
.
16 Aug 2010 - 8:37 pm | अनाम
गेंडा न्हाय, पानघोडा हाय त्यो.
(पाणघोडा ??? काय साम्य आहे घोड्यात आणी याच्यात?
एक वेळ समुद्रीघोड्याच तोंड पटावरल्या घोड्याशी मिळत-जुळत असत म्हणुन ठीक आहे ;) )
16 Aug 2010 - 8:29 pm | अनाम
आधी विलासरावांची परदेशवारी आणि आता अर्धवटरावांची सफारी..
मज्जाच मज्जा :)
16 Aug 2010 - 8:29 pm | श्रावण मोडक
ठीक. म्हणजे लेखन नेहमीचेच. ठीक अशासाठी म्हटले की, "हे ठीक. पुढं काय?" थोडक्यात वाट पाहतो आहे. हे काही १+१ नव्हतं.
16 Aug 2010 - 8:40 pm | प्रियाली
जिराफाच्या अंगावर चौकोनी, गोलाकार, पंचकोनी वगैरे आकारांचे ठिपके पाहिले होते परंतु दातेरी ठिपक्यांचा जिराफ पहिल्यांदाच पाहिला. अधिक शोध घेता त्याला मसाई जिराफ म्हणतात असे कळले. नवी माहिती समजली.
फोटो आवडले पण शेवटच्या चित्रातला प्राणी समजला नाही. ;)
यावेळेस लेखातून विशेष काही हाती लागले नाही पण फोटो आवडले.
17 Aug 2010 - 12:32 am | चिंतामणी
प्रियाली
लै भारि.
(हसुन हसुन पडल्याने खुर्ची मोडली. तिच्या भरपाई बद्दल नंतर लिहीन.)
17 Aug 2010 - 9:34 pm | मी-सौरभ
:) तुम्ही भलत्याच विनोदी बगा :)
16 Aug 2010 - 8:59 pm | शाहरुख
सगळे भाग वाचले..लेखन अलंकारिक असूनही नाटकी अजिबात वाटले नाही :-)
16 Aug 2010 - 9:27 pm | रेवती
मस्त फोटू!
वर्णनही आवडलं. जिराफाच्या अंगावर वाळलेली पानं चिकटवल्यासारखी वाटताहेत.
झेब्र्याचं वर्णन जास्त आवडलं.
16 Aug 2010 - 9:33 pm | बिपिन कार्यकर्ते
बा अर्धवटा!!! लेख आणि फोटो बघून तुझा लै लै हेवा वाटला रे...
16 Aug 2010 - 9:35 pm | चतुरंग
(चतकोर)चतुरंग
17 Aug 2010 - 3:39 am | नंदन
सहमत! वर्णन आणि फोटो - दोन्ही झकास.
16 Aug 2010 - 10:08 pm | शिल्पा ब
मस्त...लहानपणापासूनच discovery वर आफ्रिका पहिल्यापासून तिथे जायची इच्छा आहे....तुमचे लेख म्हणजे जवळच्या माणसाने recommend करावे तसे आहेत...छान...आणि सगळ्या गोष्टी जरा डिटेल मध्ये लिहित चला हि विनंती.
16 Aug 2010 - 11:11 pm | विलासराव
मज्जा आहे बुवा तुमची. आणी आमचीपण........कारण बसल्या जागेवर आफ्रिकन सफारीचा योग आमच्या कुंडलीत दिसतोय. चालु द्या.
16 Aug 2010 - 11:30 pm | ऋषिकेश
हैच! लय मस्त लिहिलंय,, काहि वेळा तुमचे वर्णन इतके छान फुलले आहे की फोटोची गरज भासु नये
मात्र अजून मोठे लिहा राव! हे लांबीला ठीक ठीकच आहे
17 Aug 2010 - 12:36 am | चिंतामणी
फोटोची संख्या वाढली अन मजकूर कमी झाला.
तुम्ही TRP(तुमचा भाव)वाढवायच्या मागे आहात का????
17 Aug 2010 - 3:34 am | धनंजय
मस्तच
17 Aug 2010 - 8:04 am | नगरीनिरंजन
झकास फोटो आहेत पण तपशीलवार माहिती असेल तर आणखी चांगलं होईल.
17 Aug 2010 - 8:54 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
सुंदर लेखन; फोटो जास्त सुंदर आहेत का ललितलेखन हे ठरवता येत नाहीये.
फोटोंचा वेगळा धागा काढण्याच्या सूचनेला अनुमोदन.
17 Aug 2010 - 10:25 am | समंजस
सुंदर! अप्रतिम!! सर्वच छायाचित्रे.
वेगळ्या धाग्यात इतरही छायाचित्रे येउदेत :)
31 Aug 2010 - 6:34 pm | गणेशा
निसर्गाचे वर्णन खुप सुंदर काव्यात्मक पधतीने केले आहे.
मस्त एकदम,
निसर्गाचा अप्रतिम देखावापाहिला की मन ही अगदी हरवुन जात असेल नाही ?
- शब्दमेघ