माझं असं दणक्यात स्वागत झालेलं बघून मनातून खुश झालो होतोच, तो कार्यकर्ता इतक्या निरागस चेहेऱ्याने बघत होता की त्याला समजावून काय सांगणार कप्पाळ. तो मला हौसेने त्याच्या पिकअप वॅगन मध्ये बसवून युनिवर्सिटी मध्ये घेऊन आला.
पहिल्या नजरेतच गारद झालो. दीडशे एकराचा हिरवागार कॅम्पस, घनदाट झाडी, मधे मधे डोकावानार्या छोट्या इमारती, झाडीतून वळणं वळणं घेऊन जाणारे रस्ते. कॉलेज तरुण तरुणींचे हसतखिदळत आपल्याच धुंदीत जाणारे थवे. सगळं अगदी स्वप्नांतल्यासारखं. माझी राहण्याची सोय युनिवर्सिटीच्या रिसर्च फ्लॅट मधे केलीये अशी बातमी लागली. किल्लीने दार उघडून आत पाउल ठेवलं आणि स्वप्न मोडलं.
अगदी रानात असावं तसं एक कॉटेज, म्हणजे काय, रानातच होतं म्हणा ते, आजूबाजूला किर्र झाडी. खायचे प्यायचे वांदे. माझा चालक मला सोडून निघून गेलेला, स्थानिक मालकिणीला मी इंग्रजीशी थोडी झटापट करून माझे ‘छत्रपती’पण पटवायचा प्रयत्न केला, एकंदरीत संवाद येणेप्रमाणे.
मी – प्यायचं पाणी मिळेल का?
मालकीणबाई – हो, किचनच्या नळाला आहे ते प्यायचंच आहे. (ती जे इंग्रजी बोलली त्याचा असं अर्थ मी काढला, वेगळा अर्थ असल्यास कळायला मार्ग नाही )
मी – ठीकाय, पण काही त्रास नाही नं होणार?
मालकीणबाई – काय माहित, आम्ही पीत नाही ते. आम्ही बाटलीबंदच पितो.
मी – मग ते कुठे मिळेल?
मालकीणबाई – इथे काही अंतरावर युनिवर्सिटीच्या कॅटीनमधे मिळेल.
मी – ठीक आहे , चालू असेल नं ते आता?
मालकीणबाई – नाही, बंद झालं ते आता.
मी – आता हो !!
मालकीणबाई - उद्या मिळेल पण तुम्हाला नक्की.
मी – आणि ए. सी. चालू नाहीये..
मालकीणबाई – पंखा चालू आहे.
मी – संडासाचे दार लागत नाहीये.
मालकीणबाई – हो.
मी अधिकचा संवाद टाळला, प्रवास बराच झाला होता. परक्या देशात स्त्रीहत्येचं पातक कशाला डोक्यावर म्हणून सोडून दिलं. हताश चेहेर्यानं रूमवर येऊन. थोडसं फरसाण खाल्लं. विमानतळावर एक कोकची बाटली घेतली होती ती अगदी शेवटच्या थेंबापर्यंत चवीचवीने संपवली आणि झोपलो.
कितीतरी वेळ झोप लागत नव्हती, किर्र झाडी अंगावर येत होती, कितीतरी वर्षांनी मी जंगलाचा आवाज एवढ्या निवांतपणे ऐकत होतो. एवढ्या शांततेत स्वतःलाच सामोरं जाणही खूप अवघड असतं बुवा.
आयुष्यातल्या काही रात्री, तुमचा अहं, मानसन्मान, प्रतिष्ठा, अक्कडबाजपणा सगळं सगळं खेचून पार नागवं करून सोडतात. त्यापैकी ती एक.... असो.
दुसऱ्याच दिवशी प्रवचन होतं, लवकरच जाग आली, थोडा बाहेर आलो फेरफटका मारायला तर, सगळ्या आसमंतानं एकदम रूपच पालटलं होतं. की मलाच रात्रीच्या त्या खोल, खडसावानार्या स्वसंवादामुळे नवी उत्तरं मिळत होती. कोवळं उन पांघरून, सगळं रान बेटं मोठ्या साळसूदपणे उभं होतं.
मस्त ताजी पहाट, पक्ष्यांचा किलबिलाटात, एवढ्या वृक्षांच्या समवेत बघायची म्हणजे, त्याला आमचं निबर मन काय कामाचं, त्याला बालकवींची किंवा बोराकारांची हळूवार, तरल प्रतिभाच काहीतरी न्याय देऊ शकेल. मी कितीतरी वेळ शांतपणे एकटाच घोटाघोटाने ती अप्रतीम सोनपहाट पीत होतो.
आपण ह्याच केम्पस मधे राहणार असू तर रोज इथे असेपर्यंत ही पहाट पहायचीच असा तेव्हाच मनोमन निश्चय केला.
बाकी काही बघायला वेळच नाही मिळाला आज, सरळ प्रवचन चालू केलं. आमच्या शिष्यगणाचा एक फटू तेवढा काढलाय हा घ्या
क्रमशः
प्रतिक्रिया
9 Aug 2010 - 9:33 pm | प्रभो
हाही भाग मस्तच फक्त थोडे मोठे टाका भाग हो अर्धवटराव...
9 Aug 2010 - 10:52 pm | शिल्पा ब
सहमत....छानंच लिहिलंय.
9 Aug 2010 - 9:35 pm | सुनील
छान पण फारच कमी लिहिता राव.
9 Aug 2010 - 9:49 pm | प्रियाली
मोठे भाग,जास्त फोटो टाकाच.
सुरेख लिहिता.
9 Aug 2010 - 11:29 pm | अनिल हटेला
मोठे भाग आणी अधिक फोटोज असायलाच हवेत !!
:)
9 Aug 2010 - 9:43 pm | गणपा
त्ये मागल्या रांगेतलं एक इद्यार्थी कपाळाला हात लावुन बसलय नी फुडल्या रांगेतल मधल मारक्या रेड्यावानी बघतय तवाच वळिखल. ;)
और भी आंदो.
9 Aug 2010 - 9:45 pm | बिपिन कार्यकर्ते
दणदणीत!!! अर्धवटराव, दणदणीत!!! पुढचे वाचायला उत्सुक आहे. बादवे, टांझानियामधे आहेत आपले मिपाकर. :)
9 Aug 2010 - 10:04 pm | धमाल मुलगा
काय मज्जा आहे द्येवा तुमच्या लेखणीत! व्वा...मजा आली वाचायला. :)
>>परक्या देशात स्त्रीहत्येचं पातक कशाला डोक्यावर म्हणून सोडून दिलं.
हॅ हॅ हॅ!!!! खरं सांगा की राव, आफ्रिकेतली (आधुनिक काय अन पुरातन काय) स्त्री ती, आपल्यासारख्या भारतीय लोकांनी अशांच्या नखालाही धक्का लाऊ नये.. स्त्रीहत्येच्या पातकापेक्षा, "वार चुकला आणि ती उलटुन आली अंगावर धाऊन तर काय घ्या" ह्या विचारानं सोडुन दिलं की नाही? खर्रं खर्रं सांगा. :D
>>आयुष्यातल्या काही रात्री, तुमचा अहं, मानसन्मान, प्रतिष्ठा, अक्कडबाजपणा सगळं सगळं खेचून पार नागवं करून सोडतात.
क्या बात है! अगदी खरं! पण त्यासाठी असंच एकटंच असायला हवं.
>>मी कितीतरी वेळ शांतपणे एकटाच घोटाघोटाने ती अप्रतीम सोनपहाट पीत होतो.
ओहोहो...मस्त वाक्य!
बाकी,
आधी वाचताना तुम्ही 'प्रवचन' का म्हणताय ते काय कळेना बुवा...पण फोटु पाहुन आलं लक्षात, तुम्ही तं च्यायला प्रौढसाक्षरता वर्गाचे गुर्जी दिसता. ;) (ह.घ्या.)
- (बालसाक्षर) धम्या.
9 Aug 2010 - 10:42 pm | मस्त कलंदर
धम्या, मी सांगते... खर्रं खर्रं.... सांगू?
9 Aug 2010 - 10:45 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
धमू, मी पण प्लीज, प्लीज, प्लीज खर्र खर्र सांगते ना ... सांगू?
9 Aug 2010 - 11:14 pm | श्रावण मोडक
लेखनालाही आणि प्रतिसादालाही +१
9 Aug 2010 - 11:42 pm | रश्मि दाते
१ ल्मबर हो
9 Aug 2010 - 11:59 pm | राजेश घासकडवी
हलकाफुलका विनोद व मध्येच क्षणभर गंभीर होणं हे वाचून थ्री मेन इन अ बोट च्या शैलीची आठवण झाली.
येऊद्यात अजून.
10 Aug 2010 - 12:04 am | आमोद शिंदे
राघांशी सहमत आहे. ही लेखमाला रंगत चालली आहे.
10 Aug 2010 - 12:00 am | बेसनलाडू
पुढे वाचण्यास उत्सुक आहे.
(वाचनोत्सुक)बेसनलाडू
10 Aug 2010 - 12:13 am | क्रेमर
वाचत आहे.
10 Aug 2010 - 12:27 am | अरुंधती
पुढील भागाच्या प्रतीक्षेत! :-)
10 Aug 2010 - 12:52 am | पुष्करिणी
मस्तच .
पुढचा भाग पटकन टाका.
मास्तर काय शिकवताय हो तुम्ही ?
10 Aug 2010 - 10:46 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
आज पुढचा भाग येणार ना? तसं असेल तरच छोटे भाग टाकण्याचा गुन्हा माफ तुम्हाला! ;-)
मलाही प्रश्न पडला आहे, तुम्ही काय शिकवता?
10 Aug 2010 - 1:07 am | चित्रा
लेख आवडला.
10 Aug 2010 - 3:01 am | निस्का
वाचत आहे.
10 Aug 2010 - 3:47 am | धनंजय
छानच.
(@राजेश घासकडवी : "थ्री मेन" ची मस्त आठवण करून दिलीत)
10 Aug 2010 - 5:43 am | रेवती
छानच लिहिताय. जरा मोठे भाग नाही का लिहिता येणार?
10 Aug 2010 - 6:36 am | सहज
वाचतोय.
10 Aug 2010 - 2:53 pm | फुस्स
छत्रपती शिवाजींचे लेखन वाचायला मिळाले , अजुन काय हवे ?
- (आवाज आला क्का ?) फुस्स
10 Aug 2010 - 10:44 am | समंजस
हा भाग सुद्धा आवडला
[चला आणखी एका मास्तरांचे शिक्षणावरचे लेख वाचायला मिळतील तर :) ]
10 Aug 2010 - 10:55 am | स्वाती दिनेश
मस्त झाला आहे हा भाग सुध्दा, पुढच्या भागाची अर्थातच सगळ्यांप्रमाणेच वाट पाहत आहे.
स्वाती
10 Aug 2010 - 1:22 pm | भाऊ पाटील
येउ द्या पटापट पुढचे भाग.
10 Aug 2010 - 1:30 pm | ऋषिकेश
दे धमाल! एकदम मस्त!!
10 Aug 2010 - 2:42 pm | मृत्युन्जय
लेख सुंदर. फोटो तर त्याहुन सुंदर.
पुढच्या रांगेतला डावीकडुन दुसर्या माणसाच्या चेहेर्यावरील भाव तर केवळ अप्रतिम. "काय बोलतो आहे हा बाबा. काही कळत नाही आहे. मलाच फक्त कळत नाही आहे का? मला रडु येते आहे" या अर्थाचे काहीसे भाव वाटतात.
10 Aug 2010 - 9:43 pm | चतुरंग
रंजक लिखाण.
वरती अनेकांनी म्हटल्यापरमाणेच म्हणतो थोडे मोठे भाग (निदान आत्ता लिहिले आहेत त्याच्या दुप्पट तरी) टाका आणि जितकी चित्रे (त्याच्या माहितीसह) डकवता येतील तेवढी चांगली.
(वाचक आणि सूचक)चतुरंग
11 Aug 2010 - 12:47 am | अर्धवटराव
दोन्ही भाग प्रचंड आवडले.
कीर्तनाचा भंग होउ नये राव. जास्त वाट बघायला लाउ नका. लवकर येउ देत पुढील भाग !!
(अर्धवटांच्या वाचक वर्गातला) अर्धवटराव
11 Aug 2010 - 5:56 am | पाषाणभेद
जबरदस्त अनुभवलेखन. लवकर लिहीत चला.
11 Aug 2010 - 7:44 am | मदनबाण
अर्धवटराव तुम्ही फार सुंदर लिहीत आहात्...पुढचा भाग लवकर टंका. :)
11 Aug 2010 - 12:05 pm | निनाद
लेखन छान आहे.
लेखनातला 'निरागसपणा' भावला ;)
पुढच्या भागाची वाट पाहतो आहे.
-निनाद
31 Aug 2010 - 3:09 pm | गणेशा
खालील वाक्य जास्त आवडले.
आयुष्यातल्या काही रात्री, तुमचा अहं, मानसन्मान, प्रतिष्ठा, अक्कडबाजपणा सगळं सगळं खेचून पार नागवं करून सोडतात
रिप्लाय आणि लेख दोन्ही ही एकाच वेळेस वाचायला मिळत असल्याने मज्जा येत आहे वाचायला
- गणेशा