निवडणूका, फिल्डींग लावणे, लोकप्रिय (लेखक) बनणे इत्यादी

सहज's picture
सहज in जनातलं, मनातलं
30 Sep 2007 - 6:59 pm

(कृपया आपापल्या चवीनूसार शूध्दलेखन स्व:ता वाढून घ्यावे)

आपण कधीकाळी निवडून येऊ! असे कल्पनेत देखील विचार न केलेली मंडळी, आता मात्र जरा विचारमग्न होऊ लागली आहेत. कारण विचारताय? अहो ह्या गणपतीत, एक नवीन हॉटेल नाही का सूरू झालेय. आपल्या पंसदीचे खाणे पुरवणारे क्षुधाशांतीगृह, च्यामारी कूठेच नव्हते. आता रात्री २ वाजता जर का भूक लागली. काहीतरी चमचमीत खावेसे वाटले तर म्हणे "आत्ता बंद आहे, उघडल्यावर या". चक्क शटर डाऊन करून हो! साध पाणी पण नाही दिल. एकदम पुणेरी** पध्दतीने असे कटवले. तेव्हाच ठरवले, साला २४ तास चोचले पूरवले जातील असे हॉटेल काढतो की नाय बघा. अहो तुमच्याकडे नसतील कोणाला लागत पण बरेचजण आहेत ज्यांना रात्री - अपरात्री भूक लागते. यापूढे तुमच्या मर्जीवर आमची भूक नाय भागवणार आपण, हो!!!

ठीक आहे, हॉटेल तर काढलेय. कॉन्ट्रक्टरने छान बांधले हो. लोकांनी पण जरा फेंगशूई, वास्तूशास्त्राच्या गोष्टी देऊन सजवले हो. आचारी म्हणजे मित्रमंडळीच हो, आपणच बनवून खायचे, खिलवायचे. आहाहा!! राजेहो, काय मजा येतीय म्हणून सांगू! पण मालकाची दादागीरी चालू आहे असे कोणी म्हणू नये मग त्याकरता एक नि:पक्ष व्यवस्थापन बनवायला हवे. लोकशाहीचा कट्टर पुरस्कर्ता आहे ना. निवडणूका घेऊन कारभार चालवूया!

झाल़, लोक म्हणतात तो मुर्श्ररफपण असेच करतो पण सूत्र मात्र......अबे चूप, निवडणूक आयोग काम करतोय. जरा दम धराल की नाय..

इकडे रोज वर्तमानपत्र / निवडणूकवृत्त वाचून सामान्य लेखकांच्या मात्र स्वभावाप्रमाणे कल्पनेच्या भरार्‍या सूरू झाल्या. आपला नंबर लागेल का राव? लोकशाही, मतदान म्हणजे आता इतरांचे मत आपल्यालाच कसे मिळेल ह्यावर विचारमंथन सूरू झाले. आता लेखनाची कूवत काही का असेना जर संपादक मंडळात निवडून यायचे असेल तर लोकप्रियता तर नक्कीच लागणार. च्यायला इथे राज्यसभा असती तर काय मजा आली असती, फक्त अंगभूत हुशारीवर सन्माननीय सदस्य म्हणून वर्णी लागली असती पण जाउद्या तसे डायरेक्ट इकडून तिकडे बिनतारी लोकांनाच जमेल हो. आपल्याला मात्र जनतेत फिरून कनेक्ट होऊन मते मिळवावी लागणार.

कार्ल रोव्हलाच घ्यावे का? सध्या नाहीतरी मोकळाच आहे पठ्या. एकदा त्याच्या हातात हे प्रोजेक्ट दिले म्हणजे यश हमखास. असे अमेरिकास्थीत एका लेखकाला (ओय लगेच तर्क लावू नका हा हायटेक, श्रीमंत लेखक कोण? हे सगळे काल्पनीक आहे बर का) वाटायला लागले. चला एकदा कार्ल रोव्ह आपल्या कंपनीच्या कार्यक्रमाला आला होता त्याच्या लॅपटॉप वरून एक पॉवरप्वाईंट प्रेसेंन्टेशन कसे ढापले होते ( माझा फोन टॅप करतो म्हणजे काय लेकाचा? जा काही महीने बोलतच नाही कोणाशी. बघू बर काय ऐकतोय.) त्यातून काही मिळते का बघूया.

इकडे आम्हाला वाटले की चला ह्या निमीत्ताने आपण निवडणूका, फिल्डींग लावणे, लोकप्रियता मिळवणे म्हणजे कसे ते संभाव्य उमेदवारांना सांगावे.

१) तर मंडळी सध्या माहीत नसलेल्या साइटसवरून जरा विनोदी लेख काढा. ट्रान्सलेशन करा. इथे चिकटवा. लोकांना रिलॅक्स करा. तुमच्या भोवतालचे संशयाचे वातावरण घालवा. म्हणजे चेहरा भयाण आहे तर मुखवटा चढवा हो.

२) इकडे हॉटेलात आवडतील अश्या सगळ्या पदार्थांची नावे असलेली खाती (वेगवेगळ्या ठीकाणाहून) उघडा. नावे सहज लक्षात रहातील कारण हॉटेलात आलेला हा भूकेलाच असणार.

३) वाटल्यास इतर लहान सहान उमेदवारांचे पॅनेल बनवा व म्युचूअल ऍडमीरेशन क्लब जोरात सूरू करा. ते मुशायरात जसे एक वाक्य पूर्ण होताय ना होताय तोवर शेवटचे दोन शब्द घेऊन वा वा उस्ताद! म्हणून सूरू व्हा. तसेच जे कोणी लिखाण करत असतील त्यांच्या खरडवहीत जाऊन मनसोक्त दाद द्या. जमल्यास भारी भारी व्यं. नि. पाठवून. लोक खरडवह्या अगदी चाटून पुसून साफ करतात म्हणून तेथे बरोबर खाद्य ठेवत जा. तुमचे नाव, निवडणूक चिन्ह ठेवा. पण स्पॅमींग मात्र टाळा. येथील मतदार चाणाक्ष आहेत. एकाची दाद दुसर्‍याला दिलीत तर हे लोक चटकन ओळखतात. पर्सनलाइज्ड दाद द्या.

४) बांगलादेशी घूसखोरांसारखे नवनवीन आयडी असलेले मतदार वर्ग तयार करा. शक्यतो सर्वांचे पासवर्ड एकच ठेवा कारण आयत्यावेळी निवडणूकीच्या दिवशी धपाधप मत मारायची म्हणजे गडबड नको. त्यासाठी आत्ताच रोमींग आय.पी., ब्लॉक ऑफ आय.पी. विकत घ्या. मतदानाला फक्त ५ का १० मिनिटे दिली तर मात्र बोंब आहे. पण आपली तयारी असली म्हणजे झाले.

५) भोकराचे लोणचे किंवा असेच विस्मरणात गेलेले पदार्थ ताबडतोब आपल्या आई, आज्जी यांना विचारून काढा व वरचेवर उल्लेख करत रहा. म्हणजे जी नॉस्टेलजीक मतदारपेठ आहे ती तुमचीच समजा.

६) आपल्याच खोट्या आय. डी. ला एखाद्या तसल्या दुर्मीळ पदार्थाचे पार्सल करा. आपणच तृप्त झाल्याची रिप्लाय ढेकर द्या. पूढेमागे आपला नंबर लागेल असे समजून आशाळभूत मतदार वर्ग तुमचाच. नंतर वेळ आली की कोणाच्या लक्षात रहातेय आपण बाटली प्रॉमीस केली होती. जनतेच्या गाडीतून जनतेचा पैसा खर्च करत चहापाणी घेत तर हिंडायचेय.

६) वेगवेगळ्या नट्यांचे सचित्र लेख द्या, गायकांचे गाण्याचे तुकडे चढवा, भेंड्या खेळा, पाककृतींचा अजीर्ण होइपर्यंत मारा करा, संगणकदुरूस्ती करा, लोकांची काशी, गंगासफर करवा, बाबाजींची प्रवचन करा. बहूसंख्य लोक त्यात गुंगली की कसले राजकारण, कोण वाईट, कोण चांगला ह्याकडे सगळे कानाडोळा करतात. (कान गायकाकडे, डोळे छायाचित्रांकडे असल्यावर तुमच्या "हालचालींवर" कोण नजर ठेवतो)

तर अश्या रितीने वेगवेगळ्या मतदाराला फिल्डींग लावली की झाले तुम्ही निवडून आलेच समजा. काय म्हणालात बुध्दीजीवी मतदारांचे काय? हा हा हा!!! अहो बुध्दीजीवी मतदारांचे नेहमीचे आहे. ते ना धड "इकडचे" ना "तिकडचे" ते तर "मधेच" अडकले. त्यांची काळजी करूच नका. त्यांच्यासाठी वाटलेच तर आपले गिर्यारोहण, अर्थकारण, कोडीताडण (म्हणजे कोडी सोडवणे, मराठीभाषा नवनवे शब्द घालून समृध्द करणे आम्हाला पण जमते राव!) असे मतदानाच्या दिवशी टाका. ते सगळे विसरतील. मतदानाला बाहेरच पडणार नाहीत.

चला, बघता बघता निवडणूका लवकर जाहीर होतील तर कामाला लागा आत्तापासून!

बर फू़कट एवढेच बर का. आधीक माहीतीसाठी सशुल्क भेटा अथवा लिहा.

** तुमचे लेखन यशस्वी व्हायचे असेल तर पूणे, पूणेरीवर एकतरी तोडायचाच, नाहीतर म्हणे फाऊल धरला जातो.

-------------------------------------------------------------------------------------------------

सहज कन्सलचंट. आमची अन्यत्र शाखा नाही.

निवडणूकीत, नेमणूकीत आम्हाला रस नाही. पण सल्ले रोज मिळतील (साठा असेपर्यंतच)

सामान्यजन म्हणून जगण्याचा आमचा हक्क आम्ही कोणाला हिरावू देणार नाही.

हे ठिकाणराजकारणसल्लाविरंगुळा

प्रतिक्रिया

स्वाती दिनेश's picture

30 Sep 2007 - 7:17 pm | स्वाती दिनेश

(कृपया आपापल्या चवीनूसार शूध्दलेखन स्व:ता वाढून घ्यावे)
हे मस्तच!
निवडणूकीचा धुरळा उडवायला सुरूवातच केलीत की! आता तात्याला लवकरच निवडणुका घ्याव्या लागणार? सल्ला मागायला हवा आता तुमच्या 'सहज कन्सलचंट'कडे..:)
स्वाती

विकास's picture

30 Sep 2007 - 8:12 pm | विकास

सहजराव,

हा ही लेख मस्त आहे. एक अजून कल्पना: इच्छूक उमेदवारांची "वादविवाद" स्पर्धा ठेवली पाहीजे. त्यात मधे डेमोक्रॅट्स ना जसे यूट्यूब वरून प्रश्न विचारले गेले तसे किंवा कसेतरी प्रश्न विचारले गेले पाहीजेत. त्यात परराष्ट्रीय धोरणचर्चेत इतर संकेत स्थळांशी कसे संबंध ठेवले जातील, कोण कोणाचा (शोधून पण न मिळणारा)बिन लॅडन, कोण कुणाचा मोहम्मद अहमदेनीजाद आहे - थोडक्यात घरातल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला बाहेर कोणाला झोडपणार आहे - ते पण कळणे महत्वाचे वाटते!

सर्किट's picture

1 Oct 2007 - 10:10 am | सर्किट (not verified)

उमेदवारांच्या वादविवादाविषयी सहमत आहे.

- सर्किट कृष्णमूर्ती

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Sep 2007 - 9:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहजराव !
तुम्हाला काय सुचेल त्याचा काय नेम राहिलेला नाही. एक तर निवडणूकीचा विषय काढून तुम्ही थेट मुद्यालाच हात घातला. लवकर म्हणजे आठ एक दिवसात निवडणूक आयोगाने अधिसुचना जाहिर केली पाहिजे,असे आम्हासही वाटू लागले आहे ! इच्छूक पॅनेलप्रमुखांनी आपले चार उमेदवार जाहिर करावे आणि आपला मिसळपावचा जाहिरनामा जाहिर करावा, बाकी मतदारराजांसाठी काय काय करावे तुम्ही सांगितले असल्यामुळे मतदारांकडे उमेदवार मोठ्या आशाळभूत नजरेने पाहात असेल.सहजराव, आपले लेखन आणि आपले लेखन कौशल्य संकेतस्थळावरील काही क्षण आनंदात घालवतात हे मात्र नक्की ! आपण असेच लिहित राहा, काही प्रसंग वाचून मात्र ह्सून हसून पुरेवाट झाली बॉ !
जसे ''लोक म्हणतात तो मुर्श्ररफपण असेच करतो पण सूत्र मात्र......अबे चूप, निवडणूक आयोग काम करतोय. जरा दम धराल की नाय..''

अवांतर ;) सामान्यजन म्हणून जगण्याचा आमचा हक्क आम्ही कोणाला हिरावू देणार नाही ! क्या बात है !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर्किट's picture

1 Oct 2007 - 10:12 am | सर्किट (not verified)

निवडणुकीची अधिसूचना लवकरच जाहिर केली जाईल. तोवर पंचायत समितीला वेगवेगळे नियम करण्याचा हक्क असेल. त्यानंतर तो हक्क निवडणुकीपर्यंत रद्द करण्यात येईल.

- (टी. एन.) सर्किट शेषन

विसोबा खेचर's picture

1 Oct 2007 - 12:00 am | विसोबा खेचर

च्यायला इथे राज्यसभा असती तर काय मजा आली असती, फक्त अंगभूत हुशारीवर सन्माननीय सदस्य म्हणून वर्णी लागली असती

ह्म्म! चांगली कल्पना आहे. पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या तरी त्यानंतर पंचायतीला विश्वासात घेऊन एखाद दोन सन्माननीय सदस्यांची नेमणूक करायला हरकत नाही! :)

५) भोकराचे लोणचे किंवा असेच विस्मरणात गेलेले पदार्थ ताबडतोब आपल्या आई, आज्जी यांना विचारून काढा व वरचेवर उल्लेख करत रहा. म्हणजे जी नॉस्टेलजीक मतदारपेठ आहे ती तुमचीच समजा.

मिलिंदा, ऐकतो आहेस ना? :)

तात्या.

सर्किट's picture

1 Oct 2007 - 10:14 am | सर्किट (not verified)

मिलिंदा, ऐकतो आहेस ना? :)

ऐकतोय तात्या !
निवडणुक आयोगाला दिलेले टोमणे सहन करण्यात येणार नाहीत.

पण एनीवे, भोकराचे लोणचे काही छचोर लोकांना "विस्मरणात गेलेले पदार्थ" वाटत असतील. आम्ही ते रोजच खातो. विस्मरणात कसे जाईल ?

- (निवडणुक आयुक्त) सर्किट

राजे's picture

1 Oct 2007 - 1:17 am | राजे (not verified)

सहज राव काय सहज पणे लिहता हो....

" संगणकदुरूस्ती करा, लोकांची काशी, गंगासफर करवा, बाबाजींची प्रवचन करा"
;}

मस्त.
कधी जिवनामध्ये विचार केला नव्हता ही असे देखील कधी वाचावे लागेल ह्यांची . खरोखर कमाल केलीत तुम्ही आज. एकदम शतक ? क्या बात है ? खरोखर.

* जबरा... ह्यांचे अधिकार भोमेकाकांच्याकडे राखीव आहेत ह्यांची नोंद घ्यावी.

राजे
(*हेच राज जैन आहेत व ह्यांचा दुसरा कोणताही आई डी नाही आहे ह्याची खात्रीच आहे, खात्री नसेल तर नसेल तर साब को पुछो ..)

गुंडोपंत's picture

1 Oct 2007 - 4:37 am | गुंडोपंत

सहजराव फॉर्मात आहेत!
एकदम झकास!
सॉलीड टाकलाय!

गुंडोपंत
हेड प्युन
सहज कन्सलचंट

आभार आभार त्रिवार आभार!

स्वातीताई दिनेशराव - बाकी अस जॉइंट अकाऊंट मतदानाला उपयोगी नाही तुमचे "एकमत" असले तरी तरी तुम्ही २ मताधीकारी असून एक अकाऊंट एक मत होते. लवकरात लवकर दिनेश स्वाती असे अकाऊंट काढावे. जर का दिनेश असे खाते असेल तर ते रहीत करून दिनेश स्वाती करायलाच लावावे.
स्त्रीवाद ताजा आहे म्हणून थोडे ऍडीशनल स्वगत :- (प्लीज झेला जरा)
आपल्या नावापूढे नवर्‍याचेही (लग्न झाले नसल्यास तात्याच्या भाषेत "आवडते पुरूष"चे) नाव लावणार्‍या अनेक असतील पण आपल्या नावापूढे बायकोचीही नाव लावणारे पुरूष आहेत का? (टाळ्या)

विकासराव खरे आहे ह्या निवडणूकीच्या एकेका घटकावर असेच लेख लिहता येतील. तुम्ही पण बघा काय जमते का? पण तुम्ही सत्ताधारीतले घटकपक्ष आहात तेव्हा आचारसंहीता भंग होणार नाही त्याची काळजी घ्या.

प्रा.डॉ.सर तुमचे कौतुक असे चविष्ट आहे की केवळ त्याकरता लिहावे असे वाटते, जसे आज्जीने रेवडी, सुकामेवा, लेमनची गोळी द्यावी म्हणून तिला स्तोत्र, कवीता, ए,बी,सी, डी. म्हणून दाखवावे तसे आमचे होते आता.

खेचरजी - म्हणजे ज्याची खेचायला मजा येते असे जी, आमच्या बाललीला सहन करता म्हणून तुम्ही आमचे आवडते काका!

राजेसाब - आता कॉलनीत नाटक बसवले तर भूमीका करणारे कॉलनीतलेच ना म्हणून तुम्हीपण आलात. अफ्टरऑल हम पंछी एक डाल के खरे की नाही महाराज?)

पंत - फायलींचा निचरा काढल्यावरच सर्फींग करायचे बर का? :-) तुमच्या डोळ्याला त्रास होतो म्हणून आधीच कमी काम करू देत आहोत.

----------------------------------------------------------------------------------------
मी पक्षःपाती नाही. मी भेदभाव करत नाही. मी तुम्हा सर्वांचा समानतेने तिरस्कार करतो.

स्वाती दिनेश's picture

1 Oct 2007 - 12:22 pm | स्वाती दिनेश

सहजराव,दिनेश चा वेगळा अकाऊंट मि पा वर आहे हो, तेव्हा २ मतांची काळजी नको,त्या तिथे पलिकडे,मनोगतावर जेव्हा अकाऊंट उघडला तेव्हा दुसरी कोणी एक स्वाती असल्याने मला स्वाती पुढे दिनेश लावावे लागले,मग आता तेच नाव जालावर घेतले.(सारखे आय डी बदला बिदला नाही हो झेपत!:))
आणि आपल्या नावापुढे बायकोचे नाव लावणारे काही आय डी आहेत त्या तिथे पलिकडे,ती मंडळी मिपावर आली आहेत की नाही हे माहित नाही बॉ..
स्वाती

कोलबेर's picture

1 Oct 2007 - 9:16 am | कोलबेर

सहजराव, हा लेख म्हणजे तुमचेपण कँपेनींग समजायचे काय? 'कार्ल रोव्ह' आणि 'भोकराचे लोणचे' हे खासच!! :-)

सहज's picture

1 Oct 2007 - 9:18 am | सहज

वाचली नाही का?

निवडणूकीत, नेमणूकीत आम्हाला रस नाही.
सामान्यजन म्हणून जगण्याचा आमचा हक्क आम्ही कोणाला हिरावू देणार नाही.

यनावाला's picture

1 Oct 2007 - 2:26 pm | यनावाला

( ही प्रतिक्रिया केवळ एकाच वाक्याविषयी आहे. लेखातील आशयासंदर्भात नाही.)
...................................................................................
श्री.सहज लिहितात :(कृपया आपापल्या चवीनूसार शूध्दलेखन स्व:ता वाढून घ्यावे) .
...................................................................................
इथे असे लिहिणे म्हणजे "सार्वजनिक ठिकाणी मी उघडाबंब फिरणार. कुणाला ते बरे दिसत नसेल तर त्या व्यक्तीने मला कपडे घालावे." असे म्हणणे आहे. उत्तम प्रकारचे ,चांगल्या रंगसंगतीचे, अंगाला व्यवस्थित बसणारे, कडक इस्त्रीचे कपडे घालणे (म्ह.काटेकोर व्याकरणशुद्ध लिहिणे ) प्रत्येकालाच जमेल असे नाही हे खरे.पण चार लोकांकडे पाहून, कुणाला विचारून,,स्वच्छ धुऊन (म्ह. लिहिलेले तपासून ) बर्‍यापैकी नीट नेटके कपडे घालणे प्रत्येकाला शक्य असते. ते सोडून उघड्या अंगाने हिंडू लागले तर काही टारगट टाळ्या वाजवतील. पण ते शिष्टसंमत नव्हे. आपल्या घरी कांदापोहे खाताना अंगावर अर्धी चड्डी असणे ठीक .(म्ह. खाजगी बोलणे लिहिणे अशुद्ध चालेल ).पण चारचौघां परिचितांत बसून मिसळपाव खायला हॉटेलात यायचे तर अंगावर ठाकठीक कपडे असणे शिष्टाचाराला धरून होईल.

सहज's picture

1 Oct 2007 - 2:48 pm | सहज

चवीला मीठ चिमूटभर मागे पुढे एवढाच अर्थ आहे.

आचार्य, मला कृपया सांगा हा लेख उघडाबंब आहे की बर्‍यापैकी झाकला गेलेला, चालेल असा आहे?

बाकीचे नंतर.

प्रकाश घाटपांडे's picture

1 Oct 2007 - 6:50 pm | प्रकाश घाटपांडे

"सार्वजनिक ठिकाणी मी उघडाबंब फिरणार. कुणाला ते बरे दिसत नसेल तर त्या व्यक्तीने मला कपडे घालावे."
आपन तर कापडं घाल्तो ती सोताच उन थंडी वारा पाउस या पासून संरक्शन व 'इतरांच' लज्जा रक्शन. आमच्या साळंत प्वॉर बिटान तुटल कि टाक 'टाका' मंग लईच फाटली किंवा ईरलि कि डायरेक सोमवार्च्या बाजारात जाऊन जिथं फाटलं आसनं तिथून च बंडी काढायची. मंग नवी बंडी चढवायची. मंग आंघुळ्या करुन घ्यायच्या.
प्रकाश घाटपांडे

आजानुकर्ण's picture

26 Oct 2007 - 2:41 pm | आजानुकर्ण

उदाहरण आवडले...

- (शुद्धलेखक) आजानुकर्ण

यनावाला's picture

2 Oct 2007 - 9:40 pm | यनावाला

श्री. सहज यांच्या लेखाच्या प्रारंभी असलेले वाक्य वाचल्यावर माझा समज झाला की व्याकरणाचे सर्व नियम झुगारून अनियंत्रित लेखनाचा पुरस्कार करण्याचा हा प्रयत्न असावा. कारण त्या वाक्यात श्री. सहज यांनी अनेक चुका हेतुतः केल्या होत्या. तेव्हा पुढचा लेख न वाचताच मी प्रथम प्रतिक्रिया लिहून निषेध नोंदविला. नंतर पूर्ण लेख वाचला तेव्हा लक्षात आले की लेखातील व्याकरण दोष अगदी नगण्य आहेत. लेख उत्तम जमला आहे. काळकर्ते शि. म. परांजपे यांच्या वक्रोक्तिपूर्ण लेखन शैलीची आठवण व्हावी इतका चांगला आहे. पूर्ण लेख वाचल्याविना प्रतिक्रिया लिहायला नको होती असे आता वाटते. पण "ही प्रतिक्रिया केवळ एका वाक्यापुरती आहे ." एवढे लिहिण्याची दक्षता घेतली आहे. कोणी व्याकरणनियम धुडकावले की मी जरा उद्विग्न होतो. तरी श्री. सहज यांनी राग मानू नये.
....... यनावाला

सखाराम_गटणे™'s picture

11 Jan 2009 - 2:51 pm | सखाराम_गटणे™

सल्ले चांगले आहेत.
पुन्हा निवडणुक केव्हा आहे?
----
सखाराम गटणे
© २००९,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

विनायक प्रभू's picture

11 Jan 2009 - 5:56 pm | विनायक प्रभू

क्या बात है. सुभान्या आला. माश्या आल्या. माश्या आल्या.

सुनील's picture

11 Jan 2009 - 6:12 pm | सुनील

मस्त लेख. नजरेतून निसटला होता. गटण्याच्या उत्खननामुळे वाचायला मिळाला.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Jan 2009 - 6:53 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

सहजराव, हल्ली लेखणी का हो गुंडाळून ठेवली आहेत?

पण जमाना बदल गया है।
एकाची दाद दुसर्‍याला दिलीत तर हे लोक चटकन ओळखतात. पर्सनलाइज्ड दाद द्या.
अजून काही दिवसांनी प्रतिक्रिया लिहिण्याचे 'काटे क्लासेस' नाही निघाले म्हणजे मिळवलं!

अदिती
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.

गोगोल's picture

12 Jan 2009 - 1:00 am | गोगोल

"त्यासाठी आत्ताच रोमींग आय.पी., ब्लॉक ऑफ आय.पी. विकत घ्या. "
गरज नाही...ऑनियन राउटिंग करा की राव :)

शंकरराव's picture

12 Jan 2009 - 5:09 am | शंकरराव

सहजराव कमाल केली
लेख लक्षात राहील. असा वाचून सोडून देता येणार नाही.

सहज कन्सलचंट. आमची अन्यत्र शाखा नाही.
हे आवडले. ईस्टेट ब्रोकर नाहीत तर :-)

शेवटी गटण्याच्या उत्खननामुळे वाचायला मिळाला. असेच म्हणतो

प्रेषक सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness

Freedom gives you happiness to do the things you like