कथा आहे एका भटक्या कुटुंबाची आणि त्यांच्या जित्रापाची!! वसंत ऋतूच्या सुरवातीला यांच्या जित्रापाचा विणीचा हंगाम.
कथा घडते मन्गोलिअन वाळवंटाच्या पार्श्वभूमीवर. दूर वर पसरलेले वाळवंट आणि खुरटी झुडुपे. जित्राप म्हणजे मेंढ्या, शेळ्या आणि उंट.
हे नोमाडीक कुटुंब त्यांच्या जित्रापावर पुरे पूर अवलंबून, पण म्हणून या नात्यात कुठे ही व्यवहार वां पिळवणूक अजिबात जाणवत नाही. हेच तर या चित्रपटाच मर्म. चित्रपटाचे डायरेक्टर Byambasuren Davaa आणि Luigi Falorni यांचे हेच मोट्ठे वैशिष्ट्य . पुरी कथा कुठेही interfere न करता एखाद्या डॉक्युमेंटरी सारखी आपल्या समोर उलगडत जाते.एक दोन प्रसंग जेथे थोड मंगोलियन संस्कृतीच दर्शन घडवण्याचा मोह त्यांना आवरला नसावा तिथच डायरेक्शन जाणवत. बाकी सार जसं च्या तस्स, नैसर्गिक !!
तर या कुटुंबाच्या काही उंटीणी प्रसवाच्या बेतात आहेत. त्याचं या हंगामाच पाहिलं पिलू अगदी व्यवस्थित जन्माला येत. कुटुंबातली आजी हे दुध गरम करून चारी दिशांना वाहते आणि मग सारे जण त्याचा आस्वाद घेतात. निसर्गाच्या प्रती असणारी त्यांची आस्था कुठे तरी आपल्या खेड्यातील श्रद्धेची आठवण देऊन जाते. तर रात्रीत सारया उंटीणी सुखरूप सुटतात, सारी रात्र कुटुंब प्रमुख आणि त्याची कारभारीण धावपळ करत राहतात. पण एक पहिलीटकरीण मात्र प्रसव वेदनांनी तळमळत राहते. कारभारीण पुन्हा पुन्हा मायेचा हात फिरवून तिला आधार द्यायचा प्रयत्न करते.
शेवटी मोठ असणार तो बछडा थोडासा जबरदस्तीन ओढून जन्माला येतो आणि या चित्रपटाच नाट्य सुरु होत. जे पूर नैसर्गिक.
त्या अत्यंत वेदनादायक प्रसवान घायाळ झालेली ती पहिलट करीन आपल्या पिल्लाला साफ नाकारते . आई च्या मागून नैसर्गिक ओढीन फिरणारा तो अजाण जीव आणि post natal depression मध्ये गेलेली मादी!! या दोन्ही ला जोडणारी ; त्या पिलाला वरून दुध पाजणारी ; आणि त्या आईला " किती सुंदर आहे बाळ तुझा घे ना जवळ" असं सांगणारी त्या कुटुंबाची सून.
ही स्वत: ही तीन मुलांची आई! घराची देखभाल , जीत्रापाच काम आणि ओटी मध्ये एक लहाण अजून रांगणार बाळ. हे सार ती सांभाळते.
सारा वेळ दिवसाच्या उन्हात आणि रात्रीच्या थंडीत ते उंटाच पिलू हुंकारून हुंकारून आई ला बोलावत राहत, पण ती माय त्याला धुडकावून लावत वाळवंटात सैरावैरा फिरत राहते . तोंडातून फेसाचे फुगे सोडत पिलाला धमकावत राहते. पार्श्वभूमीवरचा तो टाहो आपल्याला अस्वस्थ करून राहतो. मग शेवटी त्या उंटीणी साठी त्यांचा तंत्र मंत्र उपाय करायचं ठरवलं जात. त्या साठी परवडत नसणारा खर्च करून उंटा वरून दोन दिवस प्रवास करून शहर गाठल जात. एक वायोलिन वादक शिक्षक आणला जातो. हा शेवटचा प्रसंग पाहताना डोळ्याच पाणी ठरत नाही. खरच ही लोक अशिक्षित? असा प्रश्न पडतो. वायोलिन च्या धुनीला गाईड करत, त्या घाबरल्या मादीवरून प्रेमान हात फिरवत ही सून फक्त उच्च स्वरात "सां सां सां ! हे ! सां सां सां " हे गाण गाते. इतक सुंदर गीत मी आज पर्यंत नाही ऐकल. हळू हळू पिलाला आई कड आणलं जात. पहिला ती बिथरते पण मग त्या गाण्यान आणि त्या वायोलिन च्या व्याकूळ सुरांनी तिचे डोळे भरून येतात. मनाचा बांध फोडून दुख: झिरपायला लागत.आणि त्या अश्रून बरोबर तिला पान्हा फुटतो.पहिला घोट घेऊन पिलू आईचा एक भाग बनत.
खरच का ते तंत्र मंत्र होते? की संगीताच्या माध्यमातून केलेला depression वरचा तो उपाय ? मनाला भिडते ती त्या कुटुंबान दाखवलेलं आपलेपण एका आई च दुख: समजावून घेवून एकदाही जबरदस्ती न करता केलेले प्रयत्न. एकदा तरी पहावाच असा , एकदा तरी अनुभावावाच असा national geography न गौरवलेला हा "THE STORY OF WEEPING CAMEL"
http://video.google.com/videoplay?docid=6668096176688447819# इथे पहा!!
प्रतिक्रिया
10 May 2010 - 9:16 pm | स्पंदना
पिक्चर ची विन्डो चढवायचा प्रयत्न करुन करुन थकले.
कस चढवायच ?
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
10 May 2010 - 9:26 pm | मनिष
आता दिसतो. बॅन्डविड्थ मुळे (१ तास २७ मि) बघता येईल असे वाटत नाही, पण कोणी डाउनलोड केल्यास बघायला खूप आवडेल. उत्तम परिचय!
10 May 2010 - 9:33 pm | स्पंदना
थैन्क्स मनीष!! कस करायच?
राहुदे पण परत एकदा मनःपुर्वक आभार!!!
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
10 May 2010 - 11:36 pm | स्वाती२
छान ओळख! बर्याच वर्षांपूर्वी एका झूच्या नर्सरीत आयांनी नाकारलेली बाळं पाहिली होती त्याची आठवण झाली.
11 May 2010 - 1:39 am | शुचि
किती सुंदर आहे परीक्षण.
खरच आई आपल्या पिल्लाला का नाकारत असेल?
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
11 May 2010 - 2:03 am | प्राजु
सुंदर लिहिले आहेस.
खूप आवडले.
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/
11 May 2010 - 7:03 am | स्पंदना
खरच आई आपल्या पिल्लाला का नाकारत असेल?
याला post natal depression म्हणतात. काही स्त्रीया सुद्धा यातुन जातात पण आपण तिला आई च काळिजच नाही अस म्हणतो. या गोष्टीचा विचार केला तर हा चित्रपट आणखीच अन्तर्मुख करतो.
थॅन्क्स प्राजु!! कसा झाला प्रकाशनाचा कार्यक्रम?
तुझ्या लेखात तु जायला जमणार नाही म्हणुन हळ्हळत होतीस ना?
एक पद्धत आहे, आपल्यात ; आईन आपल्या मुलाच वा मुलिच अक्षता पडताना;त्या बोहोल्यावर न थाम्बण्याची. तस समज!!
नाही तरी कविता अपत्यच आहे ना?
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
11 May 2010 - 1:26 pm | अरुण मनोहर
कोठून शोधून काढलात हो ईतका सुंदर चित्रपट? धन्यवाद. फालतु हिंदी सिरीयल बघण्यापेक्षा असे चित्रपट खूप चांगले.
आधी मंगोलियन म्हतले की फक्त कृरकर्मा चेंगीजखान आठवायचा. आता तिथे रहाणारे हे संवेदनाशील लोकही आठवतील.
11 May 2010 - 5:30 pm | दत्ता काळे
कोठून शोधून काढलात हो ईतका सुंदर चित्रपट? . . असंच माझ्याही मनात आलं.
12 May 2010 - 7:05 am | शिल्पा ब
आधि लिन्क बघितलि आणि आता नेट्फ्लिक्स वर टाकला आहे...छान ओळख करून दिली.
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
12 May 2010 - 8:07 am | मदनबाण
अपर्णाजी खूप छान ओळख करुन दिलीत या सुंदर चित्रपटाची... :)
मनिष तुम्हाला धन्यवाद... त्या चित्रपटाची लिंक इथे दिल्या बद्धल.
मदनबाण.....
When you are in Love you can't fall asleep because reality is better than your dreams.
Dr Seuss
12 May 2010 - 8:51 am | धनंजय
मला चित्रपट आवडला होता. ओळख दिल्याबद्दल धन्यवाद.
12 May 2010 - 2:27 pm | फ्रॅक्चर बंड्या
मस्त लिहलय ...
बघितला पाहिजेच ह सिनेमा
binarybandya™
12 May 2010 - 2:28 pm | अरुंधती
संगीताची जादू आणि त्या परिवाराचे मायलेकराची भेट घडवण्याचे अथक प्रयत्न.... फारच सुरेख! :-)
मला यूट्यूबवर त्या गाण्याची लिंक सापडली! फार सहज आणि वेधक चित्रण!
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
12 May 2010 - 2:37 pm | रमताराम
चित्रपट. या वर्षी पुणे आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल मधे पाहण्यात आला होता. अतिशय तरल नि अंतर्मुख करणारा चित्रपट. मोठ्या स्क्रीनवर पाहताना विशाल वाळवंटाच्या पार्श्वभूमीवर त्या पाडसाचे आक्रंदन एक हादरवून टाकणारा अनुभव होता.