एक वाक्य-उत्क्रांतीचा प्रयोग -- रामोन ल्युलचे कविता-यंत्र - भाग २ - प्रास्ताविक

धनंजय's picture
धनंजय in जनातलं, मनातलं
23 Apr 2010 - 2:47 am

अनुक्रमणिका
लेखनसार
प्रास्ताविक
शब्दखेळाची चौकट
प्रयोगनिष्पत्ती आणि विश्लेषण
भाष्य
मूळ आधारसामग्री आणि प्रयोगाचे दुवे

- - - -
प्रास्ताविक

उत्क्रांतीचे (evolution) तत्त्व जीवशास्त्रज्ञ (biologist) वापरतात ही माहिती लोकप्रसिद्ध आहे. परंतु हे तत्त्व नेमके काय आहे, याबद्दल गैरसमज फार आढळतात. त्यातील प्राथमिक गैरसमज हा : उत्क्रांती म्हणजे भावी उपयुक्तता असलेली (teleology, purposeful design) अधिकाधिक गुंतागुंतीची शरीररचना करणारी एक शक्ती असते. थोडक्यात उत्क्रांती म्हणजे हेतुसाधक आणि प्रगतिशील असे मूलतत्त्व आहे.

उत्क्रांतीबद्दल उलटसुलट अशी टोकांची मते आपल्याला समाजात ऐकायला मिळतात, त्या दोहोंचे मूळ या एकाच गैरसमजात आहेत.
(१) काही लोकांनी असे ऐकलेले असते की ही उत्क्रांतीची शक्ती आंधळी असते. त्यातून निपजणारे एक टोकाचे मत म्हणजे गुंतागुंतीच्या शरीररचनेमध्ये अनेक अवयव एकमेकांच्या साथीनेच कार्यक्षम असतात (irreducible complexity). भावी पिढीमध्ये हा इतरेतर-आश्रित (necessarily interdependent) आवयवसमूह निर्माण करणे हे उत्क्रांतीचे कार्य होय. असे असले, तर कमी गुंतागुंतीच्या आद्यजंतूमध्ये ते वेगवेगळे अवयव आंधळ्या यदृच्छेने एका ठायी उत्पन्न होणे संभवनीय (probable) नव्हे. म्हणून गुंतागुंतीच्या शरीररचनेची उत्क्रांती एक कल्पनारम्य असत्य आहे - अशा निष्कर्षापाशी हे लोक येतात.

(२) काही लोकांनी असे ऐकलेले असते, की उत्क्रांती म्हणजे उच्च हेतूकडे प्रवास. हे एक अटळ मूलतत्त्व आहे, आणि त्यात उच्च ध्येयाकडे जाणारे जंतू नीच जंतूंचा नि:शेष करतात. त्यातून हे दुसर्‍या टोकाचे मत निघते - उत्क्रांतीमध्ये जे टिकते ते अंतिम परिपूर्ण (perfect) ध्येयाच्या अधिकाधिक निकट पोचत असते. त्यामुळे उत्क्रांतीच्या चळवळीतला टिकाऊपणा म्हणजेच भावी परिपूर्णता मिळण्याचे चिह्न आणि इतिकर्तव्य आहे. जर मनुष्याने अन्य प्राण्यांचा नि:शेष नायनाट केला, तर का? टिकून राहिलेला मनुष्य हा जवळजवळ भावी परिपूर्ण प्राणी होऊ लागला आहे, म्हणून. त्यापुढे जाऊन काही लोकांना असे वाटते - जर मनुष्यांच्या एका वंशाने मनुष्यांच्या अन्य जातींना नामशेष केले, तर विजयी वंश परिपूर्णतेच्या जवळ पोचतो आहे म्हणून ही घटना घडते. त्याही पुढची पायरी म्हणजे निकृष्ट जमातींना नष्ट करण्याचे उच्च वंशाचे कर्तव्य आहे (social eugenics)!

दोन्ही टोकांचा पाया एकच गैरसमज आहे, तो असा :
(१) प्रथम मतामधील तर्कदोष - वस्तुत: उत्क्रांतीच्या जैव तत्त्वात "हे सगळे अवयव भावी पिढीमध्ये एकत्र-आश्रयाने काम करतील" अशी भविष्यदृष्टी नसते. अन्न-प्रजननाच्या स्पर्धेत वर्तमान पिढीला पुरतील ते अवयव टिकतील, इतपतच जीवशास्त्रामधील उत्क्रांतीचे शरीररचनेशी देणेघेणे. म्हणूनच जीवजंतूंमध्ये जरी बहुतेक अवयव एकत्र कार्य करतात, तरी काही अवयव एकमेकांच्या कार्यात उदासीन असतात (उदाहरणार्थ : आतडी आणि आंत्रपुच्छ - appendix), अपवादात्मक अवयव एकमेकांचे नुकसानही करतात (उदाहरणार्थ : यकृतात तयार झालेले कोलेस्टेरॉल-बिंदू धमन्यांमध्ये साचून अडथळे बनतात). प्राण्यामध्ये अशा संवादी-विसंवादी अवयवांचा समाहार असतो.

काही अवयव एकमेकांचे साहाय्य करतील याची संभवनीयता पहिल्या गैरसमजात योग्य जोखली आहे का? यासाठी एक उपमा घेऊया : कुरणात सोडलेली बकरी विवक्षित गवताची पात खाईल का? याची संभवनीयता नगण्य असते. बकरी अमुकच गवताची पात खाईल अशी योजना "भूक-शक्ती"ची नसते. भावी पिढीमध्ये कुठले विवक्षित अवयव एकमेकांच्या आश्रयाने काम करतील त्याचा विवक्षित प्रगतीशील आराखडा - हासुद्धा तसाच असंभवनीय - अशी योजना आदल्या पिढीतल्या "उत्क्रांती-शक्तीची" नसते. मात्र कुरणात गवताच्या पाती खूप असतात, आणि बकरी कुठलीतरी गवताची पात खाईलच याची संभवनीयता खूपच असते. तद्वतच कुठले-कुठले अवयव बदलत असतात. वेगवेगळ्या बदलत्या अवयवांमध्ये कुठलातरी अवयव दुसर्‍या कुठल्या अवयवाला पूरक होईल, अशा शक्यता अनेक असतात. त्या अनेकानेक शक्यतांपैकी कुठलीतरी शक्यता भावी पिढीमध्ये फलद्रूप होते. अनेकानेक मार्गांपैकी एक प्रत्यक्षात दिसेल, याची संभवनीयता खूपच असते. अमुकच दोन-चार अवयवांचा समूह भावी पिढीत यदृच्छेने कार्यक्षम असेल, हे गणित नि:संदर्भ आहे. तर्कदुष्ट आहे. नाहीतर "बकरी अमुक पाते खाण्याची शक्यता असंभवनीय आहे, म्हणून बकरीला गवताची भूकच नाही" असा तर्क आपण ना करायला लागू?

चाचणीसाठी योग्य अशी संभवनीयता आपण प्रत्यक्षात जोखायची कशी? अनेकानेक प्राण्यांच्या तपशीलवार निरीक्षणातून. अशा निरीक्षणांची जंत्री संकलित करण्याचे महत्कार्य डार्विन, आणि त्यापुढच्या जीवशास्त्रज्ञांनी केलेले आहे. मात्र जीववैविध्याचा आवाका प्रचंड असल्यामुळे जीवशास्त्रज्ञ नसलेल्यांना त्या विस्तृत आधारसामग्रीचे परिशीलन करणे जड जाऊ शकते. म्हणूनच आपण येथे जीवजंतूंचे निरीक्षण करणार नाही. नपेक्षा एका मर्यादित आवाक्याच्या, सहज मनन करता येण्यासारख्या शब्दखेळाचे निरीक्षण करणार आहोत. यदृच्छेतून (randomness) सहायक अवयवांची वाक्ये तयार होऊ शकतात का? असा प्रयोग आपण करणार आहोत. मर्यादित आवाक्याच्या खेळातही जर सहायक अवयवांची एकके यदृच्छेनेनंतरच्या निवडीने (selection pressure) तयार होतील का? तसे झाल्यास उत्क्रांतीविरुद्धच्या वरील युक्तिवादाचे एक गृहीतक शंकनीय होते.

(२) दुसर्‍या टोकाचासुद्धा गैरसमज हाच की उत्क्रांती जे बदल निवडते, ते भावी परिपूर्ण पिढीच्या दिशेने वाटचाल करणारे असते. जे काही फार पुढच्या पिढीत टिकलेले दिसते, तेच टिकावे, हा उत्क्रांतीचा हेतू होता - ही पश्चाद्बुद्धी (hindsight 20-20) सिद्ध किंवा असिद्ध करता येत नाही. जीवशास्त्रात वापरले जाणारे उत्क्रांतीचे तत्त्व मात्र तसे नाही. प्राणिजातीच्या एका पिढीत एक कुठला अवयवप्रकार स्पर्धेत जिंकेल, तोच अवयवप्रकार पुढल्या कुठल्या पिढीत नेस्तनाबूत होऊ शकेल. भविष्यातील परिपूर्णतेकडे प्रत्येक पावलावर उत्कर्षाचेच बदल होतात, आणि क्रमिक बदल एकमेकांना सहाय्यकारक असतात, हे काही जीवशास्त्रातील उत्क्रांतीतत्त्वात अभिप्रेत नाही.

जीवशास्त्रातले उत्क्रांतीतत्त्व प्रयोगामधील शब्दखेळात आपण वापरणार आहोत. प्रयोगाचा फायदा हा, की प्रयोगातील उत्क्रांत होणारी वाक्ये जीवजंतूंसारखी क्लिष्ट नाहीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे उत्क्रांती करणारा रेटा हा मिसळपाव संकेतस्थळावरच्या वाचकांच्या कौलामधून आलेला आहे. प्रत्येक कौलाच्या प्रसंगामध्ये पुढे होणारे बदल खेळाडूंना माहीत नव्हते. पुढल्या पिढीमधील बदल काय व्हावा याबद्दल खेळाडूंच्या आशा-आकांक्षा काय होत्या, "परिपूर्ण" वाक्य काय असावे असा हेतू होता - हे खेळाडूंना आपण सहज विचारू शकतो - कौलामध्ये उत्तर दिलेलेच आहे. तोच हेतू पुढच्या पिढ्यांमध्ये फलद्रूप झाला का? याचे थेट उत्तर आपल्याला मिळू शकते.

या प्रयोगाचे एक दुय्यम प्रयोजनसुद्धा वाचकांना रोचक वाटावे. शब्दखेळामधील निवड वाचकांच्या कौलाने झालेली आहे. वाचक यादृच्छिक वाक्यबदलांमधले पर्याय निवडताना "रंजक पर्याय कुठला" यावरून कौल देत होते. म्हणून उत्क्रांतिशास्त्राव्यतिरिक्त या प्रयोगामधून आपल्याला आस्वाद मीमांसेचे काही निष्कर्ष काढता येतील.

(क्रमशः)

वाङ्मयविज्ञानअनुभवमाहिती

प्रतिक्रिया

राजेश घासकडवी's picture

23 Apr 2010 - 7:58 am | राजेश घासकडवी

यातला बकरीचा दृष्टांत कळायला वेळ लागला. त्यातली पाती हे विशिष्ट बदल-समूहांचं रूपक आहे का?तसं वाटलं, पण थोडं अधिक भाष्य आवडेल. बाकी अवयव एकत्र काम करण्याच्या आक्षेपाला, त्या अवयवांची आधीची रूपंदेखील कसे एकत्र कार्य करतात ही साखळी मागे मागे नेऊन जवळपास ते अवयव नाहीत या स्थितीपर्यंत नेणं हे उत्तर आहे.

भविष्यातील परिपूर्णतेकडे प्रत्येक पावलावर उत्कर्षाचेच बदल होतात, आणि क्रमिक बदल एकमेकांना सहाय्यकारक असतात, हे काही जीवशास्त्रातील उत्क्रांतीतत्त्वात अभिप्रेत नाही.

हे योग्यच आहे. मुळात उत्कर्ष ही कल्पनाच थोडी दिशाभूल करणारी आहे. तसंच 'प्रगती' हा शब्दही. उत्क्रांती या निर्हेतुक बदल दर्शवणाऱ्या शब्दापेक्षा मनाला अधिक भावणारे हे दोन शब्द वापरले जातात. पण तरीही प्रत्येक 'पावलावर' टिकून राहाणारे बदल हे 'वासराला लंगडी गाय बनवणारे' (शब्दश: नाही...) असतात. बदलांची साखळी मात्र तर्कसंगत नसते. म्हणजे जिराफाची उंच मान हे ध्येय नसून क्रमवार बदलांचा परिपाक आहे. यातला टिकलेला प्रत्येक बदल मान केवळ लांब करणाराच असेल असं नाही. काही काळापुरती मान लहान होत गेलेली दिसण्याचाही संभव आहे.

म्हणून उत्क्रांतिशास्त्राव्यतिरिक्त या प्रयोगामधून आपल्याला आस्वाद मीमांसेचे काही निष्कर्ष काढता येतील.

प्रयोगाच्या मर्यादा बघितल्या तर आत्ता तर नक्की किती मोठे निष्कर्ष काढता येतील याबद्दल साशंक, पण वाचायला उत्सुक आहे.

धनंजय's picture

23 Apr 2010 - 8:44 am | धनंजय

दिलेल्या तक्त्यामधून १०^८ वाक्ये तयार करता येतात. पैकी प्रत्येक वाक्यस्वरूप म्हणजे गवताचे एक विवक्षित पाते.
अमुक विवक्षित वाक्यरूप बनण्याची संभवनीयता १०^-८ इतकी कमी आहे. अमुक एक विवक्षित पाते बकरी खाईल याची संभवनीयता अशीच खूप कमी आहे.

पण शब्दास-शब्दाचा अर्थ रंजकपणे जुळणारी वाक्ये ही बरीच असावीत. त्यामुळे त्या सर्वांपैकी कुठलेतरी एक रंजक वाक्य बनेल, (अमुक विवक्षित वाक्य नव्हे), याची संभवनीयता बरीच जास्त आहे.

बाकी अवयव एकत्र काम करण्याच्या आक्षेपाला, त्या अवयवांची आधीची रूपंदेखील कसे एकत्र कार्य करतात ही साखळी मागे मागे नेऊन जवळपास ते अवयव नाहीत या स्थितीपर्यंत नेणं हे उत्तर आहे.

येथे आडचण अशी येते, की जीवशास्त्रातल्या इतिहासातली आधारसामग्री या आक्षेपकर्त्यांच्या दृष्टीने संशयास्पद असते. आधारसामग्रीबद्दल संशय असला, तर विवादात ती आणली जाऊ शकत नाही.
शिवाय अवयवांची आधीची रूपे पूर्वीच्या काळी हल्लीचे कार्य एकत्र करत नसल्याचेसुद्धा आपल्याला दिसते. हल्लीच्या पक्ष्यांना पिसे असतात, आणि पोकळ हाडे असतात, दोन्ही मिळून उडणे शक्य करतात. पुरातन काळातल्या काही डायनोसरांना पिसे होती पण पोकळ हाडे नव्हती. हाडे-पिसे मिळून उडण्यासही मदत करत नव्हती. त्या प्राण्याची हाडे वेगळ्या कुठल्या अवयवाची वेगळ्या कार्यासाठी साथ देत, आणि पिसे वेगळ्या कुठल्या अवयवाची वेगळ्या कार्यासाठी साथ देत.

म्हणजे जिराफाची उंच मान हे ध्येय नसून क्रमवार बदलांचा परिपाक आहे. यातला टिकलेला प्रत्येक बदल मान केवळ लांब करणाराच असेल असं नाही. काही काळापुरती मान लहान होत गेलेली दिसण्याचाही संभव आहे.

काही काळापुरती नव्हे तर दीर्घकाळासाठी मान लहान झाली तरी उत्क्रांतीमध्ये काही फरक पडत नाही.

उदाहरणार्थ अजगराचे पाठीमागचे पाय. (ही छोटी हाडे सापळ्यामध्ये दिसतात, स्पर्शालाही जाणवतात.) त्याच्या आदल्या कुठल्या पूर्वजाचे पाय बरेच लांब असावेत (पालीसारखे). आणि त्याच्याही पाठीमागच्या पूर्वजाचे पाय बरेच आखूड - किंवा नगण्य लांबीचे - असावेत (माशासारखे).
अजगराचे पाय या लांबलचक वंशावळीत "केवळ काही काळापुरते" लहान झालेले आहेत, आणि पुढे अजगराच्या वंशजाचे पुन्हा लांब होणार आहेत/नाहीत, याबद्दल आपल्याला काहीही सांगता येत नाही. त्या-त्या पिढीला उपयुक्त जे काय तेच टिकेल. पुढच्या पिढीसाठी काय उपयुक्त आहे, ते क्रमाने अधिक लांब पाय, की अधिक आखूड पाय, की नेमके आहेत तसे पाय... काहीही असू शकेल.
पाय असलेली पाल ही "वासरापेक्षा लंगडी गाय" आहे, की पाय नाहिसे होणारा अजगर "वासरापेक्षा लंगडी गाय" आहे, हे दीर्घ काळासाठी आपल्याला सांगता येत नाही.
त्या पिढीतल्या संततीत जे टिकले, ते टिकले. पुढच्या पिढीचे पुढच्या पिढीतील निवड-दबाव बघून घेतील.

अक्षय पुर्णपात्रे's picture

23 Apr 2010 - 6:43 pm | अक्षय पुर्णपात्रे

प्रयोगातील पिढ्या सुट्या होत्या. परंतु वास्तवातील पिढ्या ओवरलॅपिंग असतात. एकाचवेळी दोन-तीन वेगवेगळ्या पिढ्या नांदत असतात. तुलनेने तरुण पिढीतील सजीव काही प्रमाणात तुलनेने जुन्या पिढीच्या सजीवांचे निरीक्षण करू शकतात. ही निरीक्षणे आणि उत्क्रांती यांची काही आंतरक्रिया होत असावी काय?

पिढ्या पूर्णपणे सुट्या नाहीत.
प्रत्येक पिढीमध्ये एक अपत्यवाक्य मातृवाक्याशी समसमान आहे.
हे वाक्य "समसमान पिलू" आणि "मातृवाक्य" दोहोंचे प्रातिनिधित्व करते.
(वाटल्यास "यशस्वी मातृवाक्य दोन पिढ्यांच्या कालावधीइतके दीर्घायुष्य जगते" असा अर्थ लावता येतो.)
अशा प्रकारे तरुण पिढी आणि एक आदली पिढी - या दोघांत स्पर्धा शक्य आहे. इतपत आंतरक्रिया प्रयोगाच्या चौकटीत शक्य आहे.

अक्षय पुर्णपात्रे's picture

23 Apr 2010 - 6:43 pm | अक्षय पुर्णपात्रे

प्रयोगातील पिढ्या सुट्या होत्या. परंतु वास्तवातील पिढ्या ओवरलॅपिंग असतात. एकाचवेळी दोन-तीन वेगवेगळ्या पिढ्या नांदत असतात. तुलनेने तरुण पिढीतील सजीव काही प्रमाणात तुलनेने जुन्या पिढीच्या सजीवांचे निरीक्षण करू शकतात. ही निरीक्षणे आणि उत्क्रांती यांची काही आंतरक्रिया होत असावी काय?