एक वाक्य-उत्क्रांतीचा प्रयोग -- रामोन ल्युलचे कविता-यंत्र - भाग १ - लेखनसार

धनंजय's picture
धनंजय in जनातलं, मनातलं
23 Apr 2010 - 2:42 am

(हा लेख वैज्ञानिक मासिकात लिहावा तसा लिहिलेला आहे. लेखनसारामध्ये तांत्रिक बोजडपणा कमीतकमी ठेवला आहे. पुढील भाग मात्र काहीसे तांत्रिक आहेत, तपशीलवार आहेत.)

लेखनसार
प्रस्तावना : उत्क्रांतीचे (evolution) तत्त्व जीवशास्त्रज्ञ (biologist) वापरतात ही माहिती लोकप्रसिद्ध आहे. मात्र "उत्क्रांती म्हणजे हेतुसाधक आणि प्रगतिशील असे मूलतत्त्व आहे" या गैरसमजामुळे लोकांत उत्क्रांतीबद्दल काही अग्राह्य मते पसरलेली आहेत. जैव उत्क्रांतीच्या अभ्यासाचा आवाका अतिविस्तृत आहे. त्यामुळे येथे शब्दांच्या उत्क्रांतीचा एक प्रायोगिक खेळ खेळला. मिसळपावावरील वाचकांनी कौल देऊन त्यास तडीस नेले.
प्रयोगचौकट : खेळाच्या चौकटीमध्ये यादृच्छिक (random) शब्दयोजनेने वाक्ये बनवली गेली. खेळाडूंच्या निवडीने ती वाक्ये १० पिढ्यांपर्यंत उत्क्रांत झाली. चौकट पूर्णपणे मुक्तस्रोत आहे.
प्रयोग निष्पत्ती : (१) पहिल्या पिढीनंतर कौलातली पर्यायी वाक्ये एखाद्या-एखाद्या शब्दाच्याच फरकाची होती. असे असूनही निवड झालेली बहुतेक वाक्ये मोठ्या बहुमताने निवडून आली. यावरून असे दिसते की अर्थ आणि आस्वादाच्या बाबतीत खेळाडूंचे काहीतरी सूक्ष्म मत जुळत असावे. (२) खेळाडूंनी अनेक पर्यायांना अनेक पिढ्यांपर्यंत जसेच्या तसे निवडले, पण बहुतेक पर्यायांना (२६/३४) लगेच छाटले. (३) काही पर्यायांमध्ये अनेक फरक व्हायला खेळाडूंनी वाव दिला, तर अन्य पर्यायांच्या बाबतीत फरक न झालेले वाक्यच निवडले. (४) जे वाक्य दहाव्या पिढीत नि:शेष नाश पावले झाले, ते आदल्या काही पिढींमध्ये सर्वाधिक लोकप्रिय होते. (५) जिंकलेल्या वाक्याचे वाक्यार्ध परस्पर-आश्रित अलंकारिक होते.
भाष्य : या प्रयोगात यादृच्छिक शब्दयोजनेस अदूरदर्शी हेतूची जोड मिळाली. गुंतागुंतीचा अर्थ असलेले परस्पर-सहायक शब्दांचे वाक्य निर्माण झाले. काही मूलभूत तार्किक गैरसमजांचे या प्रयोगाने निरसन होते. जैव उत्क्रांतीच्या पुढील अभ्यासासाठी मात्र जीवशास्त्रातले प्रयोग आणि आधारसामग्री वापरणे आवश्यक आहे.

अनुक्रमणिका
लेखनसार
प्रास्ताविक
शब्दखेळाची चौकट
प्रयोगनिष्पत्ती आणि विश्लेषण
भाष्य
मूळ आधारसामग्री आणि प्रयोगाचे दुवे

वाङ्मयविज्ञानअनुभवमाहिती

प्रतिक्रिया

अक्षय पुर्णपात्रे's picture

23 Apr 2010 - 6:04 am | अक्षय पुर्णपात्रे

धनंजय, सर्वप्रथम या प्रयोगाचे तपशीलवार विश्लेषण करून हा निबंध सादर केल्याबद्दल धन्यवाद. आधी राजेशने केलेल्या प्रयोगामुळे व त्याच्या लेखमालेमुळे या प्रयोगाविषयी आधीपासूनच कुतूहल होते. या प्रयोगाच्या निमित्ताने अनेक मिपांकरांप्रमाणे मीही परिस्थितीकीचा एक घटक बनून मते दिली. प्रयोगाच्या वाटचालीत आम्ही सर्व (मत टाकणारे) काहीतरी बदल करून मते टाकली असतील, जे वास्तवाशी सुसंगतच असावे. सकृद्दर्शनी निष्पत्ती मला पटत आहेत पण काळजीपूर्वक वाचूनच प्रत्येक भागास प्रतिसाद देईन.

राजेश घासकडवी's picture

23 Apr 2010 - 7:16 am | राजेश घासकडवी

उत्तम मांडणी. विश्लेषणाबाबत वाचायला उत्सुक आहे. बरेच दिवस वाट बघत होतो. जसजसा वाचत जातो तसतशा प्रतिक्रिया देत आहे. तेव्हा कदाचित काही निरुपयोगी ठरतील, काही प्रश्नांना नंतर उत्तरं मिळतील. पण हरकत नाही.

गुंतागुंतीचा अर्थ असलेले परस्पर-सहायक शब्दांचे वाक्य निर्माण झाले.

परस्पर-सहायक हे सर्वसाधारणपणे पटतं आहे, पण नक्की निकष काय आहेत हे जाणण्याची उत्सुकता आहे. (पुन्हा ती लेखनसारात अपेक्षित आहे असं नाही...आत्ता मनात काय उमटलं ते लिहितोय)