ड्रॅगनच्या देशात - १
--------------------------------------------------------------
लांबच्या प्रवासानंतर हे असलं स्नान म्हणजे स्वर्गसुखच असतं. शांघायमधला माझा पहिला दिवस सुरु झाला होता!!
-----------------------------------------------------
मी पोचलो ती रविवार दुपार होती. चिनी नववर्षाच्या आठवड्याच्या सुट्टीचा शेवटचा दिवस. दुसर्या दिवशी सकाळी ८.३० ला ऑफिस त्यामुळे ब्रेकफास्ट्चे ठिकाण बघून घेतले. जिम बघून ठेवला.
कुठल्याही नवीन गावात जाऊन हॉटेलात टेकलो की माझी नेहेमीची सवय म्हणजे लवकरात लवकर बाहेर जाऊन पायी हिंडून आसपासचा भाग बघून घेणे. त्यातून बर्याच गोष्टी समजतात.
रिसेप्शनपाशी जाऊन शांघायचा एक नकाशा घेतला. बाहेर पडलो.
सहा वाजले असावेत. संध्याकाळ हळूहळू पसरत होती. थंडीतला बोचरेपणा दुपारपेक्षा नक्कीच वाढला होता. हॉटेलापासून चालत थोडा बाहेर आलो. मुख्य रस्त्याला लागताना ह्या असल्या थंड बोचर्या हवेत मस्तपैकी वाफाळती कॉफी मिळाली तर किती बरं असा विचार मनात आला आणि उजवीकडे परिचित हिरवी पाटी दिसली - 'स्टारबक्स'! क्या केहेने!! 'काफे लाट्टे'चा एक मोठा कप घेऊन घुटके घेत बाहेर पडलो. साधारण अर्धा तास बाहेर भटकून जवळपासची दुकाने, बसस्टॉप्, एटीएम, रेस्टोराँज अशी जुजबी तोंडओळख झाली. सुट्टी सुरु असल्याने एकप्रकारचा सुस्तपणा सगळीकडे भरुन होता. बरीचशी तरुण पोरं पोरी गुटुर्गूं करत भटकत होते, मध्यमवयीन लोक आपापल्या मुला-मुलीला घेऊन निघालेले होते. तुलनेने वयस्क मंडळी तशी कमी दिसली. तरुण वर्गाच्या संपूर्ण पेहेरावावर पाश्चात्य छाप अगदी ठायीठायी भरुन राहिली होती. उंच टाचांचे बूट, फरच्या कॉलरचे कोट, चकचकीत हँडबॅग्ज, ग्लोव्ज्स, लेदर जॅकेट्स, वेगवेगळ्या 'कट'च्या जीन्स असलं अगदी सर्रास दिसत होतं. आजूबाजूला दोन मॉल्सही दिसले. थोडा पुढे गेलो तर 'शांघाय स्टेडिअम' अशी पाटी दिसली. भलेमोठे स्टेडिअम दिसत होते. उंच मनोर्यावरचे प्रचंड मोठे दिवे आणि जाहिरातीचे निऑन्स चमचमाट करत होते. बाहेर पदपथावर दुकानांची गर्दी. पादचारी आणि दुचाकीस्वारांची गर्दीतून वाट काढण्याची लगबग सुरु होती. थोड्या वेळाने पाय दुखायला लागले मग परत फिरलो आणि रुमवर येऊन पडी मारली. फारशी भूक नव्हती. जेटलॅगमुळे झोप कधी येईल हे माहीत नव्हते.
जेटलॅगचा त्रास कमी व्हावा म्हणून सर्वसाधारणपणे मी जिथे असेन तिथल्याप्रमाणे रुटीन सुरु करायचा प्रयत्न ठेवतो. त्यानुसार लवकर झोपायचे असे ठरवले. थोडावेळ टीवी चाळला मग त्या अगम्य चँवचँवचा कंटाळा आल्यावर वाचायला विश्वास पाटलांची 'महानायक' कादंबरी काढली. हे पुस्तक अफाट आहे! पन्नासएक पानं चावल्यावर कधीतरी एकदम डुलकी आली. खरंतर 'महानायक' सोडवंत नव्हतं पण सेकंदाचाही वेळ न लावता दिवा मालवून गपगार झोपी गेलो, म्हटलं पुस्तकाच्या नादानं ही झोप उडवली तर नंतरचं काही खरं नाही.
बींऽऽऽप-बींऽऽऽप्..मोबाईलच्या गजरानं प्रामाणिकपणे माझी साखरझोप ढवळली होती! :( खोलीच्या पडद्याआडून बाहेरचं धुकंट आकाश डोक्यावरुन पांघरुन ओढून घ्यायला जणू खुणावत होतं, अंग जड होतं पण ते सगळं झटकून निश्चयानं उठलो आणि पुढल्या पंधरा मिनिटात मी जिममध्ये होतो! पाऊणतास फर्स्टक्लास घाम गाळल्यावर जाम तरतरी आली. :)
सर्व आटोपून ब्रेकफास्टसाठी गेलो. हॉलमध्ये जाताच "नी हांव", "शे शे" (थँक्स) असं सगळं झालं. आता खरी लढाई सुरु होती! मी फक्त वेजिटेरिअन आहे हे समजावून सांगणे भाग होते. एकदोन ललनांना सांगायच्या निष्फळ प्रयत्नानंतर आणि त्यांच्यातल्या लडिवाळ मंदारिन संवादानंतर तिथली एक व्यवस्थापक आली तिला किंचितसं इंग्लिश येत होतं. मला हवे होते तसे पदार्थ तिनं शोधून दिले आणि भुकेल्या पोटीचा तो शोध एकदाचा संपला!! आदल्या रात्री जेवलो नव्हतो आणि सकाळी व्यायाम झाला होता त्यामुळे मजबूत नाष्टा करुन मी निघालो (अर्थात तसाही मी नाष्टा भरपूरच करतो हॉटेलात, फक्त त्यादिवशी संयुक्तिक कारणही मिळाले! ;) ). सोमवार असूनही हॉटेल ते ऑफिस अशा फ्री शटलला सुट्टी असल्याची सुवार्ता रिसेप्शनला समजली!
बाहेर आलो , हात केला "टॅक्सी!"
आत बसलो. ऑफिसचा पत्ता दाखवला. त्याला समजल्याची मान डोलावली.
सकाळी ८.३०ची वेळ. काल संध्याकाळी बघितलेले रस्ते ते हेच का असा प्रश्न पडावा इतकी गर्दी होती! बंपर टू बंपर ड्रायविंग. पण पुष्कळच शिस्त होती. लेन कट करणे, इंडिकेटर न देता लेन्स बदलणे वगैरे प्रकार होते पण फारच कमी प्रमाणात (अजून किती मजल मारायची आहे ह्या लोकांना? ;) )
एक फार चांगली गोष्ट दिसली, मोठ्या रस्त्यांना दोन्ही बाजूला पदपाथाच्या कडेने दुचाकीस्वारांसाठी स्वतंत्र लेन होती. शिवाय ती लेन आणि मुख्य रस्ता ह्यामधे लोखंडी डिवायडर होता. त्यामुळे सगळेच लोक निर्धास्तपणे चालवू शकत होते. मला आवडलेली आणखी एक गोष्ट म्हणजे सायकलस्वारांसाठी स्वतंत्र सिग्नल्स. चौकात सर्वात आधी सायकलचे चिन्ह असलेले हिरवे दिवे सुरु होतात आणि त्यानंतर १५ सेकंदांनी बाकीच्या वाहनांचे सिग्नल्स सुरु होतात (आणि सगळे वाहनचालक त्याचे पालन करतात, हे महत्त्वाचे! ;) )त्यामुळे मोठे चौक ओलांडणे हे सायकलस्वारांसाठी दिव्य होत नाही!
बरीच गर्दी मुंबई किंवा न्यूयॉर्कसारखी होती म्हणजे लोकल्स/सबवेने मुख्य अंतर पार करायचे आणि शेवटी १०-१५ मिनिटे चालत ऑफिस गाठायचे.
बाहेरच्या गर्दीचे कुतुहल जरा शमल्यानंतर मी टॅक्सीत लक्ष घातले. चक्रधराचे आसन डावीकडे. त्याच्या सीटभोवती छतापर्यंत एक फायबरग्लासचे मजबूत कवर होते त्यातून आपण एकमेकांना बघू व बोलू शकतो पण आपण मागल्या सीटवरुन ड्रायवरपर्यंत पोहोचू शकत नाही. हा प्रकार ड्रायवरच्या सुरक्षिततेसाठी असावा असे वाटले. इलेक्ट्रॉनिक मीटर्स आणी छापील पावत्या देण्याची सोय तर होतीच. पण ड्रायवरशेजारच्या आसनामागे ट्चस्क्रीन जीपीएस सिस्टिम होती! मंदारिन आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषात संपूर्ण शहराचे नकाशे त्यात होते. प्रेक्षणीय स्थळे, हॉटेल्स, म्यूझियम, एअरपोर्ट, रेल्वेस्टेशन्स, बँक्स, मॉल्स अशी सर्व माहिती त्यात होती त्यामुळे तुम्ही कुठे आहात हे तुम्हाला समजू शकत होते, मला ही सोय फारच आवडली!
साधारण २५ मिनिटात एका उंच इमारतीच्या पुढल्या लॉबीत टॅक्सी शिरली. मला जायचे ते ठिकाण हेच का ते नक्की करण्यासाठी मी उतरुन गार्डला विचारले पुन्हा भाषेची अडचण. तेवढ्यात आमच्या ऑफिसचा बॅज असलेला एकजण आत शिरताना दिसला तेव्हा बरोबर पोचल्याची खात्री पटली. टॅक्सीचे बिल चुकते करुन पावती घेतली व फिरत्या स्वयंचलित दरवाज्यातून इमारतीमध्ये पाऊल टाकले. 'अर्बन डेवलपमेंट सेंटर, शांघाय' अशी छानशी पाटी झळकत होती!
अतिशय स्वच्छ कॉरीडॉरमधून चालत लोकांच्या गर्दीत मिसळून लिफ्टपाशी गेलो. पाच लिफ्ट होत्या आणि तिथे एक वेगळाच प्रकार बघायला मिळाला. सर्वसाधारणपणे लिफ्टच्या बाहेर कॉरिडॉरमध्ये 'खाली आणि/किंवा वर' अशी दोनच बटणे असतात आणि लिफ्टच्या आत मजल्यांची बटणे असतात. इथे प्रत्येक लिफ्टबाहेरच '० ते ९' असे कीपॅड होते. आपल्याला ज्या मजल्यावर जायचे आहे त्याचा क्रमांक आपण दाबायचा की वरचा डिस्प्ले आपल्याला A, B, C, D, E पैकी कोणत्या लिफ्टमध्ये जा ते बाणाने दर्शवतो! ऑफिस भरायची वेळ असूनही कोणत्याही लिफ्टपाशी लोकांची गर्दी तुंबलेली दिसत नव्हती! (नेहेमीच्या लिफ्टपेक्षा ह्या तंत्राचा अल्गोरिदम नक्कीच वेगळा काम करत असावा त्यामुळे ह्या लिफ्ट्स जास्त क्षमतेने काम करत असाव्यात का? असा प्रश्न मनात आला. मी त्यावर फार विचार केला नाही पण हा प्रकार गंमतीशीर वाटला.)
नवव्या मजल्यावरच्या ऑफिसमध्ये मी आल्याचं रिपोर्टिंग केलं. तिथला बॅज घेतला आणि मला दिलेल्या ऑफिसात जाऊन बसलो.
संपूर्ण खोलीच्या उंचीइतक्या काचेच्या तावदानातून खालच्या रस्त्याकडे नजर गेली. शेकडो लोक कुठेकुठे निघालेले होते, बसेस, गाड्या, दुचाकी, सायकली, पादचारी गर्दीने रस्ते फुलून गेले होते.
धुरकट आकाश दिसत होते. आजूबाजूच्या इमारतीत वसाहती विभागही दिसत होता त्यामुळे वाळत टाकलेले कपडे वार्यावर फडफडताना दिसत होते.
मी लॅपटॉप सुरु केला त्यातल्या घड्याळाकडे नजर गेली. १३ तासांचा फरक म्हणजे अमेरिकेत आदल्या रात्रीचे आठ वाजले होते. जगाच्या एका भागात दिवस संपत होता, दुसर्या भागात सुरु होत होता. ते घड्याळ शांघायच्या वेळेला जुळवून घेतले, आऊटलुक एक्सप्रेस उघडले आणि त्या नव्या जगातला माझा दुसरा दिवस सुरु झाला!
-चतुरंग
प्रतिक्रिया
24 Mar 2010 - 4:46 am | गोगोल
पण फोटो कुठे आहेत?
24 Mar 2010 - 4:54 am | मीनल
एक आठवलं.
चीनी लोकांत प्रत्येक आकडयाला काही स्थान आहे. उदा: आठ आकडा उत्तम आणि चार आकडा वाईट.
ब-याचश्या इमारतीच्या लिफ्ट मधे चार हा नंबर दिसत नाही. म्हणजे चवथ्या मजल्याला पाचवा म्हणायचे .
चार नंबर असलेले फोन कार्ड अतिशय स्वस्त आणि एक आठ असला तरी ब-यापैकी महाग .
मीनल.
http://myurmee.blogspot.com/
24 Mar 2010 - 6:06 am | चतुरंग
रमाडा प्लाझा ह्या माझ्या हॉटेलात १६ मजल्यात ४ आणि १४ हे दोन्ही क्रमांक मजल्यांना दिलेले नव्हते! :<
चतुरंग
24 Mar 2010 - 6:50 am | संदीप चित्रे
तुझ्याबरोबर आमचाही तिथला दिवस सुरू झालाय.
24 Mar 2010 - 6:57 am | वैशाली हसमनीस
दोन्ही भाग आवडले.पुढील भागांच्या प्रतीक्षेत------
24 Mar 2010 - 7:22 am | मदनबाण
मस्त अनुभव कथन... :)
मदनबाण.....
अमेरिकेने नक्की काय "डील" केले आहे पाकड्यांबरोबर ? डील व्ह्यायचे आहे का आधीच झाले आहे ?
http://www.timesnow.tv/Now-US-to-reward-Pak-with-India-type-N-deal/artic...
24 Mar 2010 - 7:45 am | अक्षय पुर्णपात्रे
श्री चतुरंग, उत्सुकतेने वाचत आहे.
____________________________________
निसर्ग आटला तेव्हा शस्त्रे आली
स्वातंत्र्य जाचले तेव्हा धर्म आला
24 Mar 2010 - 11:24 am | बेसनलाडू
(सहमत)बेसनलाडू
24 Mar 2010 - 8:09 am | सुमीत भातखंडे
मस्त
24 Mar 2010 - 8:42 am | प्रभो
>>'काफे लाट्टे'चा एक मोठा कप
चला काहीतरी प्यायच्या बाबतीत आपली आवड सेम आहे तर....
पुढचा भाग??
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी
24 Mar 2010 - 9:02 am | इंटरनेटस्नेही
श्री. चतुरंग, छान लिहताय. दिवसाची सुरवात प्रसन्न झाली.
24 Mar 2010 - 10:15 am | नील_गंधार
सुरेख वर्णन.
पुढचा भाग नाही?
नील.
24 Mar 2010 - 10:34 am | अरुंधती
सुरेख वर्णन झाले आहे.... आता पुढचा भाग येऊ देत :)
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
24 Mar 2010 - 10:55 am | दिपक
ओघवतं लिहलयं... असं प्रवासवर्णन वाचायला छान वाटते.
पुढचा भाग येऊदे लवकर.
24 Mar 2010 - 11:12 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ओघवतं वर्णन..! आम्ही तुमच्याबरोबर फिरतोय.
पुढचा भाग लवकर लिहा..!
-दिलीप बिरुटे
24 Mar 2010 - 11:47 am | जे.पी.मॉर्गन
आम्ही तुमच्याबरोबर फिरतोय
झकास वाटतंय वाचायला.... पुढचा भाग लवकर येऊदे !
24 Mar 2010 - 11:59 am | टुकुल
अगदी हेच लिहिनार होतो.
--टुकुल
24 Mar 2010 - 11:34 am | बिपिन कार्यकर्ते
गुड मॉल्निंग मिस्तल चतुलंग... पुढे वाचतोय...
बिपिन कार्यकर्ते
24 Mar 2010 - 7:42 pm | स्वाती दिनेश
मस्तच.. पुढचेही येऊ दे भराभर...
स्वाती
24 Mar 2010 - 7:52 pm | अनिल हटेला
काय निरीक्षण आहे राव तुमचं .....
मानलं......:)
अगदी डीट्टेल मध्ये ......आवडेश...
पू .भा .प्र.....:)
बैलोबा (एक्स निंग्बो)नीजकर !!!
© Copyrights 2008-2010. All rights reserved.
24 Mar 2010 - 10:28 pm | शुचि
चतुरंग तुम्ही केवढे बारकावे छान टिपलेयत. पूर्वग्रह मधे न आणता मोकळ्या मनाने मस्त चित्रदर्शी लिखाण झालय.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जितनी दिल की गहराई हो उतना गहरा है प्याला, जितनी मन की मादकता हो उतनी मादक है हाला,
जितनी उर की भावुकता हो उतना सुन्दर साकी है,जितना ही जो रसिक, उसे है उतनी रसमय मधुशाला।।
25 Mar 2010 - 12:11 am | प्राजु
छान वर्णन.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/
25 Mar 2010 - 11:08 am | विसोबा खेचर
इंटरेस्टींग प्रवासवर्णन..
25 Mar 2010 - 11:43 am | मी_ओंकार
वाट पहायला लावणारे लेखन.
(अजून किती मजल मारायची आहे ह्या लोकांना? )
मग इथे भारतात काय म्हणायचे? :(