निरोप - १ - http://www.misalpav.com/node/11221
निरोप - २ - http://www.misalpav.com/node/11236
नदीच्या किनार्यावरून वर चढू लागलो की, साधारण दोनशे फुटांवर शेताचा बांध. ते शेत ओलांडलं की गावातलं पहिलं घर. जिवा कारभार्याचं. एरवी त्याचं वर्णन झोपडी म्हणूनच होत आलं होतं. बातम्यांमध्ये आणि सरकारी दस्तावेजांमध्ये. पण या घराचं सरकारी कागदपत्रांतील, मोजणी न करताच नोंदलेलं, क्षेत्रफळ सहाशे चौरस फुटांचं. सागाचा वापर. म्हणजे मोल काही लाखांमध्ये जाणारं. नदीकडून वर चढून आलं की घरात प्रवेश करण्याची लाकडी चौकट. सहा फूट रुंदी, आठेक फूट उंची. आत डाव्या हाताला गुरांची जागा. तिच्या पाठच्या बाजूला बहुदा न्हाणीघरासदृष्य सोय असावी. कारण ओल दिसायची. उजव्या बाजूनं घराचा मुख्य भाग. पहिली मोठी खोली. बैठकीची खोली म्हणतो तशी. आत गेलं की कळायचं ही खोली काही स्वतंत्र नाही. सार्या घराचीच एक खोली आहे. बाकीच्या सोयी केवळ आडोसा उभा करून आखलेल्या.
रात्री बाराच्या सुमारासही या घराच्या नदीच्या बाजूच्या अंगणात किमान वीसेक डोकी होती. तिघं एका बाजूला होते आणि बाकी सारे त्यांच्यासमोर त्यांचं बोलणं ऐकत असल्यासारखं घोळ करून बसलेले. बाटलीतून काढलेल्या वातीच्या चार ज्योती गरजेपुरता प्रकाश देत होत्या. त्यापैकी दोन या तिघांच्यासमोर ठेवलेल्या. इतर दोन त्या घोळाच्या दोन्ही बाजूंना. हळू आवाजात तिघांचं काही बोलणं सुरू होतं. समोरचे गप्प होते. काही जण हातातील बिड्यांमध्ये गर्क होते. बसलेल्या प्रत्येकाच्या शेजारी त्याचं-त्याचं हत्यार होतं. बहुतेक शस्त्रं बहुदा पोलीसांवर केलेल्या हल्ल्यातून मिळवलेली. 'मसाला' नंतर मिळवलेला. शस्त्र आहे म्हणजे नदीच्या पल्याड 'वर्दीवाला' म्हणून आणि इकडच्या बाजूला 'दादा' म्हणून मिळतो तो मान. घोळक्यापासून सुमारे पन्नास फूट अंतरावर नदीच्या विरुद्ध दिशेला दाट झाडोरा होता हे त्यावेळच्या चांदणप्रकाशातही दिसून येत होतं. त्याच बाजूला आणखी दोन जण होते. गस्तीवर. हातात बंदुका.
पाच-सात मिनिटं कुजबुजीतच गेली आणि त्या तिघांपैकी एकानं तोंड उघडलं.
"रामराम," समोरच्या घोळक्यातील काही जण नव्यानं आले असावेत. "आत्ताच दिवा आणि रामदास आलेत. एवढ्या रात्री जंगलातला रस्ता कापत आले दोघंही. आपल्यासाठीच. आपलेच आहेत..." आवाज जरबेचा होता. समोर शांतता होती. बसलेल्यांमध्ये काहीही हालचाल नव्हती.
"उद्या, खरं म्हणजे आजच, रात्रीपासून अॅक्शन घ्यायचं पोलिसांचं ठरलं आहे. डामखेड्यात घुसून मोजणी करणार आहेत. परवा मोजणी पूर्ण करून रिपोर्ट जाईल. त्यानंतर दोनच दिवसांनी कोर्टात केस आहे. तिथं तो सादर केला जाईल..."
बोलता-बोलता तो उठून उभा राहिला. त्याचे हात फिरू लागले. आवाज तापू लागला.
"महिनाभर ठेवलेली शांतता स्वतःच मोडायचं सरकारनं ठरवलंय. आपल्याला उत्तर द्यावं लागेल. उद्याच्या सर्वेतून एका गावाची माहिती सरकार देऊ शकलं तर आपला मुद्दा संपला. काहीही करून उद्या गावात घुसायचं हे त्यांचं ठरलंय. मोजणीसाठी माणसं असतील. हजाराहून जादा पोलीसच आहेत. एसआरपी आहे त्यात. एक डेप्युटी कलेक्टर आहे. फायरिंगची ऑर्डर देण्यासाठी. रात्री घुसायचं आणि परवा सर्वे करून घ्यायचा. हा डाव हाणून पाडावा लागेल..."
जमीन जाऊ द्यायची नाही हे गावकर्यांचं पक्कं होतंच. त्यामुळं त्याविषयी फारसं बोलण्याची गरज नव्हती. घर-घर उलथून माती खोदून त्यातून धातू काढण्याचा, म्हणजेच तिथं खाणी काढण्याचा सरकारचा डाव आहे खासगी कंपनीसाठी वगैरे त्यानं काही वाक्यांतच संपवलं. जिओरिसोर्सेस लिमिटेड हे कंपनीचं नाव घेऊन झालं. जिव घेणारी कंपनी असाही उल्लेख झाला. पण ते काही वाक्यांपुरतंच. समितीचं काम आता त्यापुढं आलं होतं याची त्याला जाण होती. नव्हे, परिस्थितीवर त्याचीच मांड पक्की होती. मग चर्चा सुरू झाली. चर्चा एकाच मुद्याची - एकूण किती माणसं डामखेड्यात न्यायची?
अरवलीतून डामखेड्याकडं येताना रस्ता सुटला की सहा मैलांची पायपीट. त्यातल्या मैलभर आधी उजवीकडं वळलं की नदीच्या दिशेनं माणूस जातो. नदीच्या काठावरून एक रस्ता आहे गावात येण्यासाठी. पण ही नदी मगरींची. त्यामुळं तो रस्ता बाद. अरवलीतून मुख्य रस्त्यानंच गावात येणं-जाणं. गाव पहाडात उंचावर आहे. गावात शिरायचं तर तीनेकशे फुटांची चढ आहे. तीनेकशे फूट म्हणजे उंची. अंतर मैलभराचं. ही चढ गाठण्याआधी सखल पठारी भाग. त्यातूनच वाटचाल करत यायचं. या पठारात जंगल नाही. चढ, म्हणजेच डोंगर सुरू होतो तिथं पुन्हा जंगल. त्यामुळं पोलिसांना गाठायचं तर त्या सखल पठारासारखी खिंड नाही. हा प्लॅन पक्का झाला.
डामखेड्यातील वीस जण पक्के होते. आणखी ऐंशी जणांची जुळणी करायची. आजूबाजूच्या गावांतून. शंभर जणांची फौज पुरेशी आहे असं सगळ्याच प्रमुखांना वाटत होतं. त्याच्याशी बाकी सहमत होते. कारण पोलिसांना परतून लावण्याचा फक्त मुद्दा होता आणि आजवरच्या अनुभवातून एक गोष्ट स्पष्ट होती. थोडी जोमाची चढाई केली तर ते ठिकाणच असं आहे की पोलिसांना माघार घ्यावीच लागणार. एकदा का पोलीस इकडं-तिकडं विखुरले गेले की मग विषय संपतो.
"भाई, गोळ्यांचं काय?" एकानं मुद्दा काढला. भाईनं त्याची नोंद केल्याची खूण केली.
बैठकीतूनच जाऊन काही जणांनी जंगलाच्या सीमेवर काही झाडं पाडून रस्ता अडवायचं काम सुरू केलं. जिल्हा कोर्टात जाऊन पोलीस अॅक्शनला मनाई मिळवण्याचा प्रयत्न करण्याचं ठरलं. हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टातही केस सुरू असताना सर्वे करण्याचा सरकारला अधिकार नाही, कारण त्या सर्वेचा अर्थ आमचा मालकी हक्कच नाकारण्याच्या प्रक्रियेची सुरवात वगैरे युक्तिवाद आहे खरा. तरीही मनाई मिळेलच असं नाही, पण कोर्टात गेल्याच्या निमित्तानं बोंबाबोंब करता येणार होती हे नक्की.
शेजारच्या सहा गावांत फौजफाट्यासाठी निरोप रवाना झाले. निरोपे चालतच गेले. चालतच ते थेट डामगावांत येतील.
दिवा व रामदासनं मोटरसायकलला किक मारली तेव्हा पहाटेचे अडीच वाजले होते. जिल्ह्याकडं जायचं होतं - सकाळीच कोर्टात मनाईसाठी अर्ज जावा हा निरोप घेऊन. सोबत काही चिठ्ठ्या होत्याच.
---
जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या समोरचा एसटीडी बूथ शंकरनं उघडला तेव्हा साडेनऊ झाले होते. दुकानाच्या दारात दिवा आणि रामदास थांबले होते. रामदासचा चेहरा ओळखू येत नव्हता. सरदारफेटा डोक्यावर. अंगात टीशर्ट. दिवाच्या डोक्यावर कॅप. त्या दोघांना घेऊन शंकर आतल्या खोलीत गेला. पाचेक मिनिटांतच तो बाहेर आला आणि त्यानं फोन फिरवण्यास सुरवात केली.
सव्वा अकराच्या सुमारास शंकरनं आत जाऊन दिवा आणि रामदासला जागं केलं. कोर्टातली सुनावणी दुपारी होती. त्या दोघांसाठी शंकरनं जेवण मागवलं. जेवून दोघांनीही पुन्हा अंग टाकलं. आधीचा दीड तास आणि आता आणखी अडीचेक तासांची झोप निश्चित होती आणि गरजेचीही होती.
दुकान नोकरावर सोपवून शंकर बाहेर पडला. आज त्याची पायपीट नव्हती. रामदासकडून मोटरसायकलची चावी त्याच्या हाती आली होती. परतताना टाकी फुल्ल करून आणायची होती इतकीच प्रेमाची 'अट'.
शंकरनं आधी मुख्यालयातच फेरी मारली. एका खोलीत तो शिरला आणि अर्ध्या तासानं बाहेर आला. मग त्यानं गाडीला किक मारली आणि त्यानं नवागावचा रस्ता पकडला. खडबडाटी रस्त्यांवरून आरामात गाडी हाकत तो पोलीस लायनीत एका घरात शिरला. तासाभरानं तेथून तो बाहेर पडला तेव्हा संध्याकाळी पाचनंतर त्याच्या बूथवर येण्याचं त्याच्या मित्राचं आश्वासन त्याच्या हाती होतं.
शंकरनं मग टाकी फुल्ल केली. बूथवर येऊन त्यानं एक फोन आतल्या खोलीत घेतला आणि आतल्या कपाटातून एक डायरी काढली. प्रमुख वृत्तपत्रांतील प्रतिनिधींना निरोप देण्याचं काम त्यानं सुरू केलं.
---
सकाळी सहा वाजता किशोरचा गावात फेरफटका झाला होता तेव्हा एकही व्हॅन त्याला दिसली नाही. याचा अर्थ फौजफाटा अरवलीला गेला होता.
नदीच्या किनारी किशोर भेटला तेव्हा देवरामनं बरोबर दहा मिनिटं पवारनं आदल्या रात्री जे काही सांगितलं होतं त्याची उजळणी केली. त्यानुसार डामखेड्यानंतर राळखेड्याचा नंबर होता. डामखेड्याच्या पश्चिमेला. रेस्टहाऊसवर किशोरनं बारा वाजता चक्कर मारावी असं ठरलं आणि देवराम निघाला तेव्हा साडेसात झाले होते, रेस्ट हाऊसवर एसआरपीचे अधिकारी चहाच्या प्रतीक्षेत होते.
दुपारी बाराच्या सुमारास डीवायएसपींना जिल्हा कोर्टातील अर्जफाट्याची माहिती मिळाली. त्यांनी तातडीनं तिकडं धाव घेतली. सुनावणी साडेतीनला होती. त्याच निमित्तानं त्यांनी चौकशी केली तेव्हा समितीनं कोर्ट आणि समर्थकांकडून आवाज उठवणे यावर सारा भर ठेवला असल्याचं त्यांना कळलं. अर्थात, त्यावर त्यांनीही विश्वास ठेवला नाही. तयारी पूर्ण करायचीच होती.
प्रांताधिकार्यांनी डेप्युटी कलेक्टरच्या कार्यालयात तीस जणांचं मोजणी पथक हजर केलं तेव्हा अडीच वाजले होते. निघण्यास केवळ दीड तासांचा अवधी होता आणि तेवढाच वेळ कलेक्टरांकडून आलेल्या सूचना अधिक डेप्युटींच्या सूचना यासाठी होता.
रुपसिंग आणि धनजीसेठच्या मागं जिल्ह्यातून आलेल्या पत्रकारांचं पथक रातंब्रीच्या दिशेनं चालू लागलं तेव्हा साडेतीन झाले होते. रातंब्रीमार्गे त्यांना डामखेडा गाठायचं होतं. रातंब्रीच्या पुढं बारा मैलांचं अंतर होतं. काही अंतरावर जीप होती, तिथून ती रातंब्रीच्या थोडं पुढं वेगळ्या वाटेवर नेऊन सोडणार होती. त्यानंतर पायपाटी. ती सारी अंधारात करावयाची होती. काहींच्या पोटात आत्ताच गोळा आला होता. रातंब्रीपासून धनजी आणि रुपसिंग मागं येणार होते, तिथून पुढं समितीच्या हत्यारींच्या ताब्यात पत्रकार जाणार होते.
"पोलिसांचा कोणताही वावगा इरादा नाही, महसूल यंत्रणेचं संरक्षण यासाठीच आम्ही तिथं जाऊ," पोलिसांचं प्रतिज्ञापत्र मान्य करून, आणि समितीकडून काहीही ठोस पुरावा नसल्यानं, न्यायालयानं सर्वेच्या कारवाईला मनाई हुकूम देण्यास नकार दिला आणि दिवा व रामदास यांनी जिल्ह्याच्या ठिकाणाहून मोटरसायकलला किक मारली. तालुक्यापर्यंत दीड तास आणि त्यानंतर पुढचा वेळ. काहीही झालं तरी मावळतीला अरवली ओलांडलेलं असलं पाहिजे. रामदासनं गाडी सुसाट सोडली तेव्हा सव्वाचार झाले होते.
डेप्युटी आणि प्रांतांच्या पथकासोबत पोलिसांच्या व्हॅन अरवलीच्या दिशेनं निघाल्या तेव्हा पाच वाजले होते.
साडेपाचला किशोरला अड्ड्यावर फोन आला तेव्हा तो नुकताच तिथं पोचला होता. पोचेपर्यंत फोन कट झाला, पण लगेचच पुन्हा रिंग झाली. किशोरनंच फोन उचलला. शंकरचा आवाज. माहिती तीच, 'डामखेड्यानंतर पश्चिमेकडं. नदीकाठच्या रस्त्यानं; सोबत रस्ता दाखवण्यासाठी फुटके मोती आहेत. फुटके मोती म्हणजे अरवलीचा माजी सरपंच आणि पाटील. समितीतून फुटलेल्यांपैकी दोघं. पश्चिमेकडं म्हणजे राळखेडा हे कन्फर्म.
रेस्टहाऊसच्या मागं नदीच्या किनारी झाडोर्यात दिवा आणि रामदास पोचले तेव्हा पावणेसहा झाले होते. सहापर्यंत त्यांनी तिथं थांबायचं होतं. त्यानंतर ते अरवलीच्या दिशेनं जाणार होते.
अस्वस्थ दिवा सारखा घड्याळाकडं पहात होता. सहाला पाच मिनिटं कमी होती. किशोरच्या भेटीशिवाय निघायचं म्हणजे काही घोळ तर नाही? त्याच्या डोक्यात गुंता होऊ लागला होता, पण फार काळ नाही. रेस्ट हाऊसच्या मागून भराभरा चालत येणारी किशोरची मूर्ती दिसली तसा तो स्वस्थ झाला. डामखेड्यानंतर पश्चिमेकडं, हा निरोप सकाळीच गावांत गेला होता. पण अपुरा. आता सविस्तर. पश्चिमेकडंही मोर्चेबांधणी करावी लागणार होती.
नवं आव्हान होतं. पोलिसांनी अरवलीहून कूच करण्याच्या वेळेसच डामखेड्याला पोचण्याचं. कारण तसं झालं तरच पोलिसांच्या 'स्वागता'ची पश्चिमेच्या गावांतील मोर्चेबांधणी करता येणार होती. अंदाज असा होता की, पहाटे अडीचच्या सुमारास पोलिसांची पहिली तुकडी आली असेल. गाव वाचवायचं असेल तर दहाच्या आधी गावकर्यांची हालचाल सुरू झालेली असली पाहिजे. अशी स्थिती आली की दिवाच्या अंगात यायचं. आत्ताही तेच झालं. गावात निरोप पोचवायचा म्हणजे पोचवायचाच. दहाच्या आतच. त्यानं मोटरसायकलला किक मारली आणि पाहता-पाहता ते तिठ्याच्या पलीकडं दिसेनासे झाले.
क्रमशः
प्रतिक्रिया
4 Mar 2010 - 9:21 pm | अक्षय पुर्णपात्रे
तपशील आणि उत्कंठा दोन्ही प्रत्येक भागासरशी वाढत आहेत. रोज एक भाग असा नियमितपणाही कौतुकास्पद.
4 Mar 2010 - 10:11 pm | मदनबाण
पोलिसांचे स्वागत कसे होते याची उत्कंठा लागुल राहीली आहे...
मदनबाण.....
मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.
5 Mar 2010 - 10:02 am | राजेश घासकडवी
तुम्ही अंत पाहाताय राव. मी तर आता माझ्या आधीच्या सर्व प्रतिक्रियांची कापी करून पेष्ट करायला तयार ठेवणार आहे.
सुंदर तपशील, उत्कंठा वाढतेय, वगैरे आणि आणखीन थोडं वगैरे...
राजेश
5 Mar 2010 - 10:13 am | सुनील
वाचतोय...
पुढचा भाग लवकरच टाका.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.