विनाशकाले विपरीत बुद्धी ही म्हण जर खरी असेल तर माझा विनाशकाल जवळ आला असावा कारण नुकतीच मला कशी कोण जाणे पण विपरीत बुद्धी झाली. त्याचे परिणाम इतके वाईट झाले आहेत की मी त्या विनाशकाळाची आतुरतेने वाट पाहातो आहे. त्याचं असं झालं की मी म्हटलं भारतातून काही पुस्तकं मागवण्याची सोय आहे - तर मिपाकरांनाच विचारू, कुठची पुस्तकं वाचण्याजोगी आहेत ते. साधासुधा विचार पण एक साधी चूक कशी भोवू शकते याचा हा उत्तम नमुना आहे. मी सरळ मागचापुढचा विचार न करता काथ्या कुटायला टाकला. नव्वदोत्तरीतील वाचनीय/संग्रहणीय साहित्य. हळुहळू एकेक प्रतिसाद यायला लागले. सुरूवातीचे प्रतिसाद काही वाईट नव्हते. पण जसजसे जास्त जास्त लोक बोलायला लागले तसतसं मला काहीतरी बरोबर नाही असं वाटताना एक पोटात डुचमळतं तसं व्हायला लागलं. किंवा पोटात डुचमळत असताना काहीतरी बरोबर नाही असं वाटतं ते. जे काय असेल ते. वीसच्या वर प्रतिसाद वाचल्यावर तर खात्रीच पटली. आपला विनाशकाळ जवळ आल्याची.
माझा मराठी संस्थळांवरच्या चर्चांचा अनुभव फार नाही, पण गेल्या काही आठवड्यांत वीसेक तरी घणाघाती चर्चा वाचलेल्या आहेत, त्यात भाग घेतलेला आहे. त्यावरून माझ्या हे लक्षात आलं की ही चर्चा पार फसली.
एकतर जवळपास सगळ्यांनी मूळ मुद्याला हात घातला व चर्चाचालकाच्या म्हणजे माझ्या प्रश्नाला उत्तर द्यायचा प्रयत्न केला! आता काय म्हणावं याला? आत्तापर्यंतच्या चर्चांच्या इतिहासात मी कधी हे बघितलेलं नाही. माझ्याच चर्चेला लोकांनी असा वैचारिक दृष्टीदोष का दाखवावा? एकट्या सन्जोप रावांनी बिचाऱ्यांनी पोर्नोग्राफी, फसलेलं गोल्डी वगैरे म्हणून चर्चा भरकटवून योग्य वळणांवर नेण्याचा प्रयत्न केला. त्याला बिकांनी आपला हातभार लावण्याचा आव आणला (पण काही शिव्या वगैरे नाहीत - नुसत्या 'त्यात'ही सारख्या सटल् पणाने कुठच्या चर्चेचं भलं झालंय का कधी? हे काय बिकांना माहीत नाही?) या चर्चेला लोकांनी प्रतिसादच दिला नसता तर एक वेळ ठीक होतं. त्यांनी उपेक्षेच्या शिव्या दिल्या असत्या तर निदान मीही ठेवणीतल्या काही शिव्या मनातल्या मनात लोकांना दिल्या असत्या. काही दिवसात विसरूनसुद्धा गेलो असतो. पण निदान ही शरमेची, फसलेली चर्चा मिपावर माझ्या नावावर कायम स्वरूपाचा पराभवाचा कलंक म्हणून टिकली तरी नसती. आता ती दररोज मला माझ्या लेखनाच्या टॅबमध्ये राहून खिजवणार.
उत्तरं सुद्धा कशी मऊ-सूत. अगदी सभ्यपणाने दिलेली. नुसता सभ्यपणाचा आव आणून नाही तर खरोखरच सभ्यपणाने. काय म्हणावं याला आता? पंधरावीस मराठी डोकी एकत्र येऊन एकमेकांशी सज्जनपणे बोलतात. आणि तीच पंधरा वीस डोकी मुकाट्याने कामाला जातात. त्यातलं एकही गारद अथवा घायाळ न होता. एकही टाळकं न फुटता. मिपाकर आपली अस्मिता विसरत चाललाय का? अरे निदान नव्वदोत्तरी या शब्दावर तरी थोडी हाणामारी व्हायची? पण छे. टाकला तो शब्द एवढ्या आशेने, पण 'नव्वदोत्तरी म्हणजे आपणांस नवीन अभिव्यक्ती असे म्हणायचे असेल तर...' वगैरे एकदम शांतरस परिप्लुत बोलणी. आणि किती तोकडी उत्तरं! काही ओळीत पुस्तकांची नावं, आणि मोजके शब्द ती पुस्तकं बरी का वाईट ते सांगण्यासाठी. चांगल्या चर्चेचा माझा तरी मानदंड म्हणजे जसजसं खाली जावं तसतसे प्रतिसाद आकाराने वाढत जातात. मग कोण कोणाच्या प्रश्नाला काय उत्तरं देतो यावरून खूप इतिहासाची कल्पना येते. हे सगळं झालं नाहीतर चर्चेत रस आहे हे कसं कळणार? त्यापेक्षा कविता बऱ्या. सगळेजण आपले वा: सुंदर, किंवा एखादं कडवं (कुठचंही का असेना, कवीला बरंच वाटतं) उद्धृत करून 'हे तर फारच भावलं' 'लिहीत जा' वगैरे प्रतिसाद देतात. पण तिकडे अपेक्षाच फार नसतात. मात्र चर्चेमध्ये चेव खाऊन प्रतिसाद द्यायचा असतो हे मलाही नवखा असून माहीत आहे. आणि स्तुती, चांगले शब्द सचिन तेंडुलकर आपल्या विकेटसाठी जितकी किंमत मागतो तितकी मिळाली तरच द्यायचे, हेही. असं असताना एखाद्याच नव्हे, तर बऱ्याच पुस्तकांबाबत चांगली मतं? चर्चा फसली म्हणावे, नाहीतर काय करावे?
एक वेळ हे सर्व घाव सहन केले असते. पण सगळ्यात कशाने खचलो ते म्हणजे या चर्चेला काहीतरी फलित आलं! फलित! प्रत्यक्ष एक यादी तयार झाली. आता त्यातली सगळीच मी घेईन असं नाही. पण तरी काय झालं? हे शोभतं का? यापेक्षा चर्चाप्रस्तावकाचा अपमान किती जास्त करता येईल?
माझं नक्की कुठे चुकलं? सांगा ना. कदाचित मी चर्चेत कुठे झुंडशाही, मुतालिक, हुसेन, भारतातल्या पददलित पुरुषांचे हक्क, गांधीवध, हिंदूत्व - धर्म की आचारसंहिता असे शब्द घातले नाहीत म्हणून का? सांगा ना. की की ही सगळी नव्या रंगरुटाची चेष्टा आहे? माझ्यासारख्या फ्रेशीला केलेलं रॅगिंग आहे? असलं काही असतं याची थोडी कल्पना होती पण इतकं क्रूर? इतकं हिंस्र? आता हे तोंड घेऊन मी कुठल्या संस्थळावर जाऊ? कुठेही गेलो तरी माझ्या पाठीमागे लोकं दबून कुजबूज करणार आणि छद्मी हसणार. हाय रे दैवा. आता मी काय करू? हा कलंक कसा धुवून काढू?
प्रतिक्रिया
26 Feb 2010 - 5:45 pm | विकास
आपल्या उद्वेगात मी सहभागी आहे.
हाय रे दैवा. आता मी काय करू? हा कलंक कसा धुवून काढू?
सोप्पे आहे! तुम्ही म्हणता तसेच, "झुंडशाही, मुतालिक, हुसेन, भारतातल्या पददलित पुरुषांचे हक्क, गांधीवध, हिंदूत्व - धर्म की आचारसंहिता" यातील कुठल्याही विषयावर चर्चा चालू करा! (आधीच्या सर्व चर्चांमधील कुणाच्याही प्रतिसादातील एकेक वाक्ये उचला आणि चालू करा चर्चा - जास्त विचारही करायला नको!).
बाकी विरंगुळा एकदम आवडला. तसे आम्ही मराठी म्हणजे यु नो आम्ही काही दॅट बॅड नाही आहोत. :)
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
26 Feb 2010 - 6:16 pm | श्रावण मोडक
खरंय.
स्वगत: अननुभवाचा दावा सारखा का करावा लागतोय यांना?
26 Feb 2010 - 6:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>स्वगत: अननुभवाचा दावा सारखा का करावा लागतोय यांना?
कृपया शंका व्यक्त करु नका. शंका घेतली की, मला उगाच 'विरजणाचा' वास यायला लागतो.
-दिलीप बिरुटे
[अंदाजपंचे]
26 Feb 2010 - 6:32 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>हाय रे दैवा. आता मी काय करू? हा कलंक कसा धुवून काढू?
हा हा हा कलंक धुवून वगैरेच्या भानगडीत पडू नका. नव्या चर्चा टाकत राहा.
काही आनंदाचे पुष्पगुच्छ आणि काही जखमा [ विरजण ] असा दोन्हींचा संग्रह मराठी संकेतस्थळावर करायचा असतो. :)
-दिलीप बिरुटे
26 Feb 2010 - 7:06 pm | प्रकाश घाटपांडे
आम्ही बी हेच म्हण्तो
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
26 Feb 2010 - 6:39 pm | मेघना भुस्कुटे
=))
26 Feb 2010 - 7:01 pm | शुचि
खरच ही चर्चा फारच गुळमुळीत झाली.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
26 Feb 2010 - 8:16 pm | चतुरंग
आगे आगे देखो होता है क्या! धागे टाक्त चला, कौल पाडत चला!!
मिपाकरांना असे कच्च्या गुरुचे चेले समजू नका! ;)
(पक्का गुरु)चतुरंग
26 Feb 2010 - 8:39 pm | टारझन
काय जबरदस्त पाककृती आहे ... वृत्त वगैरे सगळे कसे परफेक्ट जमलीये !
अंमळ हळवा झालो पाककृती वाचुन :)
अजुन येउन दे वला !!
26 Feb 2010 - 9:22 pm | बिपिन कार्यकर्ते
&^$^*((#%#@
;)
खुलासा... तुम्ही एवढं माझं नाव घेतलंत, तर मी दुर्लक्ष करून तुमचा अजून हिरमोड करू इच्छित नाही. म्हणुन हा प्रतिसाद. ;)
बिपिन कार्यकर्ते
27 Feb 2010 - 12:25 am | राजेश घासकडवी
अजून साटल्य जात नाही!
मी त्यातली अक्षरं मोजून पाहिली. ती अकरा आहेत. अकरा अक्षरी फक्त एकच शब्द मला माहीत आहे - 'एकसमयावच्छेदेकरून' ...
आता मेंदूला ताणच दिला तर यातून काही चावट अर्थ काढता येईल, नाही असं नाही, पण शिवी म्हणण्यासारखं काही वाटत नाही. तेव्हा तुम्हीच ही शिवी कुठची यावर प्रकाश टाका. निदान मध्ये *** टाकून काही हिंट तरी द्या.
27 Feb 2010 - 3:48 am | धनंजय
हल्लीच्या दशकात "एकसमयावच्छेदेकरून" हा शब्द शिवीवेगळा वापरलेला मी ऐकलेला नाही. (**हल्लीच्या दशकात शिवी म्हणून वापरलेलाही ऐकलेला नाही, पण तरी आदले वाक्य सत्य आहे.**)
"एकसमयावच्छेदेकरून" हे एका गलिच्छ वाक्यातले एक-दोन शब्द गाळून तयार झालेली शिवी आहे. एकसमयावच्छेदेकरून दोघांनी किंवा अनेकांनी केलेल्या काही कृती "अश्लील"मध्ये जमा होतात. हे शब्द गाळणे म्हणजे काही अपवादात्मक नाही.
"च्याभैनीला" शिवीमध्ये फक्त एका प्रेमळ स्त्री-नातलगाचा उल्लेख आहे. वाक्यातला वर्णनात्मक अश्लील शब्द गाळलेला आहे. पण ऐकणार्याला तो स्वतःहून पुरवता येतो.
27 Feb 2010 - 4:15 am | राजेश घासकडवी
आयला म्हणजे माझ्या ताणाची दिशा बरोबर होती तर! फक्त पुरेसा लांब गेलो नाहीसं दिसतंय. ते गाळलेले शब्द जरा भरा की राव...
तुमच्या पांढऱ्यावरील पांढऱ्यात उत्साहाने डोकावून बघितलं आणि एकदम एकसमयावच्छेदेकरून तोंडातून निघून गेलं. लय वंगाळ बघा माझं त्वांड.
राजेश
27 Feb 2010 - 1:48 am | भडकमकर मास्तर
लेख अंमळ जमल्यासारखा वाटतो..
_____________________________
माझ्या कारकीर्दीला परवा बारा वर्षं पूर्ण होतील.... कोणत्याही न्यूज चॅनलवर त्याबद्दल दाखवलं नाही....असूया वाटली.....पण तुम्हाला दोन हजार वर्षांनी कळेल की मीच बरोबर होतो
27 Feb 2010 - 3:35 am | Nile
अहो ठीकाय, प्रदार्पणात शुन्य (बर एक आकडी धावा म्हणा) म्हणजे काय नविन का? पण हो इथुन पुढे बॉल्स बरोबर निवडा, नविन आहात तोवर उगाच इनसाइड-आउट खेळायला जाउ नका. एकदा का कुठल्या चेंडुवर 'स्कोअर' निघतो हे कळले की मग अवघड नाही हो. (फिल्डींगला आम्ही आहोतच, काळजी नको!)
27 Feb 2010 - 4:16 am | अक्षय पुर्णपात्रे
प्रस्तुत चर्चाप्रस्तावकाने/ धागाप्रवर्तकाने (हे दोनही शब्द पुर्वी ऐकलेले आहेत) 'चर्चाचालक' हा शब्द वापरला आहे. परंतु 'त्या' पूर्ण चर्चेत त्यांनी चर्चा चालवण्याचा कुठेही प्रयत्न केलेला दिसत नाही. चर्चा सुरू करून प्रस्तुत धागाप्रवर्तक चर्चेचा समारोप करण्याकरता उगवले आणि येथे असा कांगावा करणारा धागा काढला. या कृतीबद्दल प्रस्तुत धागाप्रवर्तकांच्या प्रस्तुत चर्चाप्रस्तावाविषयी प्रस्तुत प्रतिसादलेखक आक्षेप नोंदवत आहे.
27 Feb 2010 - 4:11 am | प्रियाली
छद्मी हसते आहे, चालू द्या. :)
27 Feb 2010 - 1:18 pm | विजुभाऊ
अत्यंत स्युओग्य शब्दात भावना पोहोचवल्यात.
28 Feb 2010 - 8:14 am | पाषाणभेद
फसलेली चर्चा करून पुन्हा फसलेला घागा काढूनही पुन्हा आपले प्रतिसाद गोळा करण्याच्या व लेखनसंख्या ही लोकसंख्येप्रमाणे वाढविण्याच्या आपल्या कृतीचा जाहीर निषेध.
तुम्ही आमच्या कंपूत अजून आलेले नाहीत. म्हणून आम्ही दोन्ही ठिकाणी काहीच लिहीणार नव्हतो. (आवडले तरी) अन तुम्ही आमच्या एकाही धाग्यात प्रातिसाद दिलेला नसल्याने आम्ही तुमच्या एकाही धाग्यात प्रतिसाद देणार नव्हतो. (धागा आवडलेला तरी) असो.
तुम्ही नवखे आहात. अन तुम्ही लेखन संन्यास घेण्याच्या अन पुजेच्या मार्गाला लागलेले पाहून मन राहिले नाही अन प्रतिसादासाठी हात उचलले.
नव्वोदत्तरी धाग्यातली सगळी पुस्तके विकत घेवून आम्हाला वाचायला द्याल तरच आम्ही तुम्हाला आमच्या कंपूत घेवू. वाटले तर ही शिक्षा समजा. अन तो पर्यंत केवळ घाग्यांचे वाचन करा.
हघेहेवेसांनल.
:-)
डायबेटीस विरुद्ध लढा
महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्यांच्या कटी||
महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३
28 Feb 2010 - 11:12 am | राजेश घासकडवी
आपण माझ्याविषयी गैरसमज करून घेत आहात. माझे नाव वाचलेत का? ते युयुत्सु नाही...आणि आयच्यान सांगतो, त्यांच्या आयडीशी (किंवा बायडीशी) आमचा काही एक संबंध नाही.
कंपूंच्या गोष्टींवरून वसंतराव देशपांडे आठवले. त्यांना कोणी विचारले, तुम्ही कोणत्या घराण्याचे? त्यावर त्यानी ताड्कन उत्तर दिले आम्ही वसंतराव देशपांडे घराण्याचे. तेच तत्व आम्ही लागू करावे म्हणतोय. तेव्हा प्रश्न असा आहे, की तुम्ही आमच्या कंपूत (सध्या लोकसंख्या एक) येणार का?
ब्रह्माशी आत्म्याचे मीलन घडवण्याचा पूजा हा केवळ एक मार्ग आहे. आम्ही सर्वच मार्ग चोखाळून आमची अंडी वेगवेगळ्या परड्यांमध्ये ठेवत आहोत. तेव्हा तुमची भावना जरी हृदयस्पर्शी असली, तरी आमची काळजी करू नये ही विनंती. आम्हाप्रमाणे डायेबिटीस असणारे इतर अनेकही आहेत....
हा: हा: हा:- विकट हास्य करून आम्ही एवढेच म्हणतो की नव्वदोत्तरीतली सगळीच पुस्तके घेण्यालायक (आणि तुमच्यासारख्याला देण्यालायक) आहेत असा जर आपला भ्रम असेल तर तो तुमच्याच हातोड्याने फोडून टाकावा. या धाग्याचा आमचा खरा उद्देश कोणालाच कळला नाही, पण तुम्हांस सांगतो... ज्या अनाठायी चर्चा सध्या चालल्या आहेत त्यांविषयी लोकांत लज्जा उत्पन्न होऊन ते सन्मार्गाला (भगवत्चिंतन, पूजा इत्यादी) लागावेत, या हेतूने आम्ही मुद्दामच असा तिरकस काथ्याकूट निर्माण केला.
असो. आमच्या कंपूत यायचे ठरवाल तेव्हा कळवा. पहिल्या काही सदस्यांना कंपूच्या आय. पी. ओ. च्या आधीचे भाग मिळतील ही लालूच....
हे माझे लेखन जर तुम्ही हलक्यानेच घेतलेत तर तुमच्या मस्तकाची शंभर शकले होऊन ती तुमच्याच पायी लोळू लागतील...हा: हा: हा:- पुन्हा एकदा विकट हास्य...
राजेश
28 Feb 2010 - 3:28 pm | बिपिन कार्यकर्ते
भगवन् (खरं तर महर्षीच म्हणणार होतो पण तो शब्द आता बाद धरला जातोय ;) ).... कृपा करून एक सांगावे... आपण सारखे सारखे मार्ग चोखाळायला का सांगताय? मार्ग अनुसरता पण येईल ना?
माझ्याकडून काही चुकीची पृच्छा तर नाही ना झाली? झाली असल्यास, आधी क्षमा करून मग चार &^%#$@ घाला पण उत्तर न देता अनुल्लेखाने मारू नका, भगवन् .....
बिपिन कार्यकर्ते
28 Feb 2010 - 3:59 pm | राजेश घासकडवी
वत्सा,
पृच्छा चुकीची झाली नाही. किंबहुना कुठचीच पृच्छा चुकीची असू शकत नाही. ती फक्त चुकीच्या धाग्यावर झाली असे वाटले. शिवाय या बाबतीत मी एकदा सांगितले होते व एकदा मी काय केले ते सांगितले, म्हणून तांत्रिकदृष्ट्या तो प्रश्न बरोबर नाही. तेव्हा तुला क्षमा करून तुझ्या इच्छेप्रमाणे चार &^%#$@ देतो. कार्यकर्ते, कार्यकर्ते, कार्यकर्ते, कार्यकर्ते. ठेवणीतले हे शब्द लागले तर नाही ना? का त्यापेक्षा अनुल्लेख परवडला असता?
असो, आता उत्तराकडे. चोखाळण्यामध्ये जो हाताळण्याचा, जोखून बघण्याचा व चाखून बघण्याचा अर्थ आहे तो अनुसरण्यामध्ये येत नाही. अनुसरणे हे फारच आंधळे, महाजनो येन वगैरे होते. म्हणून मार्गाच्या बाबतीत मी ही प्रक्रिया पसंद करतो. आधी मी एका शिष्यास असाच अयोग्य प्रतिसादाबद्दल एकट्याचा मार्ग चोखाळायला सांगितला होता. तुजवर ही पाळी येऊ नये ही इच्छा.
तुझ्या &^%#$@ मधली अक्षरसंख्या घटलेली दिसते. याला प्रतिभा आटली म्हणावे का?
स्वामी राजेशानंद
28 Feb 2010 - 4:41 pm | बिपिन कार्यकर्ते
क्षमा भगवन् क्षमा !!! मी आपली आज्ञा पाळायचा कशोशीने प्रयत्न करेन. :)
&^%# &@& !!! (आता ठीक आहे ना भगवन्?)
बिपिन कार्यकर्ते
28 Feb 2010 - 11:29 am | II विकास II
>>पहिल्या काही सदस्यांना कंपूच्या आय. पी. ओ. च्या आधीचे भाग मिळतील ही लालूच....
बस्स आपण तुमचा आजपासुन फॅन
----
२०१२ मध्ये जग बुडणार आहे, मग कशाला लोक त्रास करुन घेत आहेत !!!
28 Feb 2010 - 2:47 pm | सन्जोप राव
कमलेश वालावलकरांची 'बाकी शून्य' ही कादंबरी मराठी लेखनाला फुटलेल्या नव्या धुमार्यांचे द्योतक आहे. योनिशुचितेसारख्या बुरसट खांडेकरी ध्येयवादाला सरळ प्रकाशात आणून हस्तमैथुन करायला लावण्याचे धाडस या कादंबरीने केले आहे. सांगलीसारख्या अनवट ठिकाणी राहून मुंबई-पुणे- नाशिक या मराठीतल्या तथाकथित संस्कृतीत्रिकोणाला फाट्यावर टांगण्याचे धैर्य दाखवल्याबद्दल वालावलकरांचे कौतुक करावे तितके थोडेच. मिलिंद बोकीलही त्यांच्यावरील अवचटी प्रभावातून बाहेर पडून आता नव्याने उठत चाललेल्या तारुण्यपिटिकांप्रमाणे स्वयंभू झाले आहेत, हेच त्यांच्या शाळा या कादंबरीतून दिसून येते. एरवी या लेखात म्हटल्याप्रमाणे त्यांचे लेखनही साकळलेलेच राहिले असते.अवचटांनी तर आता आपली मोलकरीण, आपली गाडी, आपले छंद, आपली कसलीकसली ऑपरेशने यांसारख्या सामान्य विषयांतून केवढा मोठा आशय उभा केला आहे. अवचटांचे चिवडेवाले, शिक्षक, बासरीवाले तर आता कायमचे आत्म्यावर कोरले गेले आहेतच.
आता राहिली गोष्ट 'एक होता गोल्डी'ची. विजयानंदच्या दिग्दर्शनकौशल्याला, त्यांने लिहिलेल्या भन्नाट कथांना आणि अफलातून संवादांना आणि त्याच्या चित्रपटातील गाण्यांच्या बेमिसाल चित्रीकरणाला हातही न लावता गोल्डीचे चरित्र कसे लिहिता येते याचा हे पुस्तक म्हणजे वस्तुपाठ आहे, असे वाटते.
लोकाग्रहास्तव प्रतिसादात केलेल्या या सुधारणा मूळ लेखकाला संन्यास घेण्यापासून परावृत्त करतील अशी आता आशा आहे.
सन्जोप राव
मजरुह लिख रहे है वो, अहले वफा का नाम
हम भी खडे हुए हैं गुनहगार की तरह
1 Mar 2010 - 9:57 am | भोचक
कानफडीत मारणारा प्रतिसाद. संजोपकाका दंडवत.
(भोचक)
हा आहे आमचा स्वभाव
28 Feb 2010 - 3:21 pm | सुधीर काळे
राजेश-जी,
<<माझ्या नावावर कायम स्वरूपाचा पराभवाचा कलंक>>
आपण "भृगुलांछना"बद्दल वाचलंय का? हा कलंक दिमाखात छातीवर मेडलप्रमाणे लावून चक्क मिरवा.
(भृगुलांछन म्हणजे काय हे माहीत नसल्यास सांगा. 'व्यनि'वर कळवेन.)
------------------------
सुधीर काळे (कृपया वाचा: http://tinyurl.com/ybwvk7j)
28 Feb 2010 - 5:06 pm | विनायक प्रभू
एकसमयावच्छेदकरुन मंजे काय?
1 Mar 2010 - 7:46 am | सुधीर काळे
या लेखात हा शब्द कुठे दिसला नाहीं, पण मी कधी-कधी वापरतो व त्याचा अर्थ आहे "एकाच वेळी", simultaneously.
------------------------
सुधीर काळे (कृपया वाचा: http://tinyurl.com/ybwvk7j)
28 Feb 2010 - 6:50 pm | अविनाशकुलकर्णी
होइल सवय हळुहळु..पण या निमित्ताने कंपुशाहिचा जयजय कार