दलपतसिंग येता गावा

प्रकाश घाटपांडे's picture
प्रकाश घाटपांडे in जनातलं, मनातलं
26 Jan 2010 - 7:43 pm

२६ जानेवारी प्रजासत्त्ताक दिनी आम्ही एक राष्ट्रीय कर्तव्य केल ते म्हणजे दलपतसिंग येती गावा नावाचा शुभारंभाचा नाट्यप्रयोग भरत नाट्य मंदिरात पाहिला.पुण्यात लोकशाही उत्सव समिती च्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्र्मांतर्गत या शुभारंभाचा प्रयोग दणक्यात झाला. ५ जानेवारीला आपले मराठी ब्लॊगर मुक्त्त सुनीत पुण्यात होता. त्याच्या सोबत (खर म्हणजे त्याच्या ओळखीने ) मी, बिपीन कार्यकर्ते मंडळी अतुल पेठेंना भेटलो. तेव्हा गप्पांमधे त्यांच्याकडुन जांबसमर्थ नावाचे गाव प्रथमच ऐकले.
जालन्यापासून सुमारे १०० कि. मी. अंतरावर हे छोटे गाव आहे. तिथे लेखक राजकुमार तांगडे आणि दिग्दर्शक संभाजी तांगडे हे दोघे नाटकवेडे तरुण गेली काही र्वष अनेक अडीअडचणींशी सामना करत मोठय़ा निष्ठेने नाटकं करीत आहेत. त्यांची ग्रामीण भागातील वीजचोरीवरील 'आकडा' ही एकांकिका अतुल पेठेंनी पाहिली होती. या दोघांची कणकवलीला एन.एस.डी.च्या नाटय़प्रशिक्षण शिबिरात दिग्दर्शक अतुल पेठे यांच्याशी गाठ पडली होती. त्या गाठीभेटीतून दलपतसिंग येती गावा..’ या प्रयोगाचा जन्म झाली. मकरंद साठे या नाटककाराने यांनी विशेष अभ्यास करून लिहिलेल्या पटकथेचे हे नाटय़रूपांतर आहे. ते अतुल पेठे, मकरंद साठे आणि राजकुमार तांगडे यांनी केले आहे. संकल्पना व दिग्दर्शन अतुल पेठे यांचे आहे.पेठे यांनी जांबसमर्थ, लिंबी, पिंपळगाव, मूर्ती आणि जालना या गावांतील तरुणांना एकत्र करून जांबसमर्थ आणि जालना येथे एक कार्यशाळा घेतली. यांनी त्यात विविध विषयांवर चर्चा झाली. अभ्यासाचा एक भाग म्हणून प्रशिक्षणार्थी नर्मदा खोऱ्यात जाऊन आले. तिथे ते योगिनी खानोलकर या स्वयंसेवी कार्यकर्तीबरोबर हिंडले आणि रोजगार हमी योजनेबाबतची जनसुनवाई त्यांनी पाहिली. आर्थिक स्थिती नसूनही हे शेतकरी तरुण स्वखर्चाने फिरले. चार महिन्यांच्या या प्रशिक्षण शिबिरातून दलपतसिंग येती गावा..’ या नाटकाची निर्मिती झाली आहे. जगण्याचेच प्रश्न तीव्र असताना नाटकाद्वारे आपले आयुष्य मांडावे, असे या तरुणांना वाटते. दलपतसिंग येती गावा..’ हे नाटक त्यातलंच. हे नाटक अरुणा रॉय यांनी माहितीच्या अधिकारासाठी दिलेल्या लढय़ावर आधारीत आहे. आजचे गावपातळीवरील राजकीय व सामाजिक ताणतणाव त्यात पकडण्याचा प्रयत्न केला गेला आहे. साहाय्यक दिग्दर्शन संभाजी तांगडे यांनी केले असून, गाणी विनोद जैतमहाल आणि राजकुमार तांगडे यांनी लिहिली आहेत. यात राजकुमार तांगडे, संभाजी तांगडे, अशोक देवकर, विनोद जैतमहाल, अरुण घोडे, सचिन जैन, गजेंद्र तांगडे, सपना देशमुख, अश्विनी भालेकर आणि वीणा जामकर हे कलाकार आहेत.

नाटकाच्या सुरवातीला अतुल पेठे यांनी निर्मितीत सहाय्य केलेल्या अनेकांचे आभार मानले
नाटय़प्रशिक्षण व निर्मितीत इंद्रजित खांबे, राजेंद्र बापट, कणकवलीचे वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान यांनी खर्चाचा काही भार उचलला आहे. अरुणा रॉय, नसिरुद्दीन शहा, डॉ. वाणी, मजदूर किसान शक्ती संघटन, स्क्विझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन, के. एस. वाणी मेमोरियल ट्रस्ट, जालना पत्रकार संघ आणि मॉटले ग्रुप, मुंबई यांनीही यास सहकार्य दिले आहे.

हे नाटक मनोरंजन म्हणुन कोणी पहायला आला तर तो अस्वस्थ होउन बाहेर पडेल. नाट्याविष्कार हा लोकनाट्य कलेच्या माध्यामातुन आहे. हे प्रबोधननाटय आहे, इंग्रजांच्या काळात झाले असते तर अतुल पेठे व त्त्यांच्या या टोळीला देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगवास झाला असता. आजही तो विद्रोहच आहे. पण लोकशाहीचे संरक्षक कवच असल्याने व अजुन तरी राज्यघटना कागदावर का होईना अस्तित्वात असल्याने ते घडत नाही.
सुरवात महारष्ट्रातील हरिभाउ या स्थानिक राजकारण्याच्या उदोउदो लोकगीतातुन करुन कागदावरच संडास बांधणार्‍या ग्रामीण विकासातुन केली आहे. बतावणीतुन झालेली संवादफेक थेट घडलय बिघडलय ची आठवण करुन देते. फ्लॆशबॆकमधे भुरासिंग हा राजस्थानातील जमीनदाराने गावच्या गायरानाचा कब्जा घेउन गावकर्‍यांवर सत्ता गाजवण्यातुन झालेल्या संघर्षाची कहाणी घेतली आहे. पुर्वी पोलिसात ऒर्डर्ली म्हणुन काम करीत असलेला दलपतसिंग हा एसीपीच्या बायकोने सांगितलेली खाजगी कामे ऐकत नाही. फक्त प्रशिक्षणात अंतर्भुत असलेली कायदेशीर कामेच करीन असा पवित्रा घेतो. त्याविरोधी आंदोलन करतो. या 'विद्रोहा' साठी नोकरीतुन शिस्तभंग, बेकायदा आंदोलनाचा कायदेशीर बडगा दाखवुन त्याला नोकरीतुन काढुन टाकतात. तो परत गावी येतो. पारंपारिक सुतारीचे काम येणार्‍या दलपतला काम शोधताना एका जनआंदोलनाचे काम करणार्‍या एका एनजीओ ची ओळख होते. तिथे सहभाग घेउन तो काम करतो. रोजगारहमी योजनेत काम करणारे असंघटीत गावकरी मजुर असहाय्यपणे भ्रष्टाचार सहन करीत असतात. त्यांना संघटीत करुन तो भुराविरुद्ध संघर्ष करतो. गोपनीयतेचे कायदे संघर्षात आड येतात. तेव्हा माहिती अधिकार नसतो. माहिती अधिकाराच्या निर्मितीचा हा भाग त्यात घेतला आहे
सतीश शेट्टीच्या खुन प्रक्ररणाची दखल व आदरांजली ही संहितेतील केलेला सुनियोजित बदल हा लक्षवेधी आहे.कुठलेही प्रथितयश कलाकार न घेता केलेल्या या नाटकाला बोजड प्रबोधन नाट्य होउ न देण्यात अतुल पेठे यशस्वी झाले आहेत. नाटकाला अनेक कला नाट्य साहित्य क्षेत्रातील दिग्गज मंडळी आली होती. श्रीराम लागु पण होते बरं का! नाटकातील ओ का ठो न कळणार्‍या मला हे नाटक जाम आवडल व अस्वस्थ करुन गेल. नाटक संपल्यावर पुणेरी पद्धतीने चपळाईने आत जाउन अतुल पेठे व टीमचे अभिनंदन केल.

[ अतुल पेठे व मकरंद साठे कलाकार चमुसमवेत]

मुंबईत १ फेब्रुवारीला वाशीच्या विष्णुदास भावे नाटय़गृहात, तर २ फेब्रुवारीला दादरच्या शिवाजी मंदिरात याचे प्रयोग होणार आहेत. नाटकाचा कालावधी सलग पावणेदोन तास आहे.

नाट्यशिफारसआस्वाद

प्रतिक्रिया

बंडू बावळट's picture

26 Jan 2010 - 7:50 pm | बंडू बावळट

मस्तच! :)

बंड्या.

आनंदयात्री's picture

26 Jan 2010 - 7:54 pm | आनंदयात्री

धन्यवाद पकाकाका !! अजुन असे पुण्यात आगामी काही असेल तर सांगा मालक.

अजय भागवत's picture

26 Jan 2010 - 7:56 pm | अजय भागवत

राजकुमार तांगडे आणि संभाजी तांगडे ह्यांच्या धाडसाचे, चिकाटीचे कौतुक व्हायला हवेच. तुम्ही त्यांची ओळख घडवून आणल्यामुळे ते माहिती तर झाले!- धन्यवाद.

नाटकाबद्दल उत्सुकता ताणली गेली आहे.

ह्यानिमित्ताने मालेगावच्या चित्रपट सृष्तीची आठवण झाली. त्यांच्याबद्दलही जेव्हा डिस्कव्हरीवर डॉक्युमेंटरी फिल्म पाहिल्यानंतर कळले होते. स्थानिक माध्यमे अशा प्रयत्नांना आपापल्या माध्यमातून प्रसिद्धी का देत नाहीत ते मात्र कळत नाही.

प्रमोद देव's picture

26 Jan 2010 - 8:36 pm | प्रमोद देव

वेगळ्याच पण ज्वलंत प्रश्नावरील प्रायोगिक नाटकाचा आपण अतिशय सुंदर आढावा घेऊन तो विषय आमच्यापर्यंत पोचवलात त्याबद्दल घाटपांडेसाहेब आपणास मन:पूर्वक धन्यवाद.

**********
भले तर देऊ कासेची लंगोटी ।
नाठाळाचे माथी हाणू काठी ॥

बिपिन कार्यकर्ते's picture

26 Jan 2010 - 8:40 pm | बिपिन कार्यकर्ते

अरे, सांगत जा रे.... असो. नाटकाची ओळख आवडली. अतुल पेठेंबरोबरची भेटही आठवणीत राहिल अशीच. योग कधी येतो ते बघायचे.

बिपिन कार्यकर्ते

सहज's picture

26 Jan 2010 - 9:06 pm | सहज

तांगडे द्वयी,पेठे, साठे यांच्या चांगल्या विषयावरच्या नाट्यप्रयोगाची ओळख आवडली.

श्रावण मोडक's picture

26 Jan 2010 - 11:02 pm | श्रावण मोडक

प्रकाशराव, आपली भेट हुकली म्हणायची मग. मी होतो की...
नाटकाविषयी माझी मते थोडी वेगळी आहेत तुमच्यापेक्षा.
अभिनय (हे सारे कलाकार हौशी आहेत हे ध्यानी घेता) उत्तमच. विशेषतः अलकाच्या भूमिकेतील मुलीने अनेकदा (आजूबाजूला पहात असलेल्या) काही प्रख्यात स्त्री कार्यकर्त्यांची छाप जाणवून दिली (म्हणजे दिग्दर्शकाचेही त्यांच्याविषयीचे निरिक्षण बारीक असावे :) ).
गाणी/पदं चांगली. अर्थपूर्ण. मुख्यतः त्यांना दिलेला साज पोवाडा वगैरेचा असल्याने अगदी प्रभावी. संगीतही तसेच. पाऊल आपटतच होतो मी.
पण... नाटकातील भाषा... अस्सल गावरान मटणात गूळ घातला की जे होईल ते अनेक ठिकाणी होत होतं. शहरातून अशा भागांत जाणारी कार्यकर्ती किंवा कार्यकर्ता समजून घेण्यातही कमी पडले की काय मकरंद साठे? मला आठवतं, एकजूट हा शब्द ज्यांच्या अनुभवात नसतो तिथं तो वापरून उपयोग नसतो. तिथं ती, एक काटकी सहज मोडता येते आणि दहा एकत्र असतील तर मोडता येत नसतात ही, युक्ती कामी येते. अशा पद्धतीने तिथल्या पर्यावरणाशी कार्यकर्ते समरूप होत जातात. त्याऐवजी इथं ज्या पद्धतीनं हक्क, अधिकार यांची भाषा होते ती मटणात गूळ ठरते. ग्रामीण भागातील लोकांना आपण खूप काही शिकवत असतो हा आविर्भावही दिसतो. गावाकडच्या माणसाला सरकारी कामात कोण पैसे खातंय हे कळत नसतं असा एक समज आहे. तो खोटा असतो. ग्रामीण माणसाचं शहाणपण असं असतं की, तो त्याला हे ज्ञान आहे हे दाखवत नसतो, कारण त्याला कायमचं तिथं रहायचं असतं. समोरच्याची खात्री होईपर्यंत तो त्याचे पत्ते उघडत नसतो. हे व्यवहारज्ञान त्याच्याकडं असतं. त्याचं भान या स्क्रिप्टमध्ये दिसलं नाही. अलका शिकवते आणि ती मंडळी शिकत जातात. हे सारं कोणाच्या तोंडून ऐकायचं तर ज्यानं पोलिसांमध्ये ऑर्डर्ली असताना आपल्या प्रमुखाविरुद्ध धरणं आंदोलन केलं आहे आणि त्यापोटी नोकरी गमावली आहे, त्याच्याकडून. इतकी सोपी नसते ही प्रक्रिया.
नाटकांत अनेकदा अनेक प्रसंग लाऊड केले गेले. तुम्ही वर दिलेल्या दुसर्‍या छायाचित्रातील प्रसंग आठवा. कितीही सरंजामी असला तरी तो इतका हुशार असतो की, समोर आलेल्याचा थंड डोक्याने काटा काढणं त्याला ठाऊक असतं. ग्रामीण भागातील असा सरंजाम बाहेरून, तेही शहरातून आलेल्या कार्यकर्त्यांशी (इथं तर ही अलका आयएएस, माजी जिल्हाधिकारी आहे) या प्रसंगाप्रमाणे वागतात यावर माझा अनुभवान्ती विश्वास नाही. त्यांच्या वागण्यात एक सॉ़फिस्टिकेशन असतं. ते त्या पहिल्या भेटीतून भलताच मेसेज कधीही जाऊ देत नाहीत. कारण तिथं इतर कटकटी असतात. तसाच प्रकार ते जिल्हाधिकारी अलकाच्या घरी येतात तेव्हाचा. हे जिल्हाधिकारी एखाद्या हेड कॉन्स्टेबलनं वागावं तसं वागतात. ट्रंक किती आहेत किंवा माणसं किती आहेत याची चौकशी ते ज्या पद्धतीनं करतात ते पाहिलं तर हसू येतं. असं होत नसतं. जिल्हाधिकाऱ्याकडे असली माहिती काढण्याचे इतर सोर्सेस असतात. प्रांताशी होत असलेल्या चर्चेवेळीही तोच प्रकार. त्याचा सूर पाहिला तर गावगुंड वाटतो तो. त्याच चर्चेवेळी प्रांत सांगतो की 'कलेक्टर ऑर्डर काढेल' आणि त्याचे म्हणणे ऐकून मंडळी उठतात? अलका स्वतः कलेक्टर होती. गायरानाची ऑर्डर, कलेक्टरचा रोल, इतर खाती... कळत नाही!!! हे सगळं या विश्वाविषयीच्या अल्पसमजातून आलेलं आहे असं कसं म्हणायचं? साठे, पेठे चळवळींशी संबंधित आहेत.
नाटकाची कथा तितक्या पकडीची नाही, जितकी पकड अशा चळवळीत प्रत्यक्षात असते. अरूण रॉय यांनी राजस्थानात जे केलं, त्याविषयी एक एकरेखीय प्रतिमा नाटक निर्माण करून देतं. माहितीच्या अधिकाराची लढाई त्यापलीकडं आहे. ती न घेताही गावापुरतं बोलायचं होतं तरीही त्यात पेच आहेत. ते येत नाहीत. योगिनी आत्ता जे करते आहे त्यातील किंवा अरूण रॉय यांचा तो काटेदार संघर्ष नाटकाची एकूण लांबी ध्यानी घेता समाविष्ट करता आला नसता असे थोडेच आहे. म्हणजेच आहे या जीवात हे नाटक आणखी आटोपशीरही झाले असते.
अचानक आणलेला सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट व माहितीचा अधिकार हा संदर्भही फसवा. तेच सतीश शेट्टी संदर्भात. हे असे काही आणून प्रभाव वाढतो? मला शंका आहे.
कच्चे दुवे खूप राहिले असे. त्यातच नाटकासाठी निवडलेला फॉर्मही गोची करतो की काय असे वाटत राहिले. ना धड पथनाट्य, ना धड स्टेजचं नाटक असं काही तरी शेवटपर्यंत वाटत राहिलं. एकूण बरीचशी कसरत.
आठेक जण गातात तेव्हा माईकच्या ते फार जवळ येण्याची गरज नसते. ते आले आणि एकूण कल्लोळ झाल्यासारखे झाले. मला तर अनेकदा या कलाकारांना माईकची गरज नाही असेही (अत्यंत पॉझिटिव्हली) वाटत होते. अलका किंवा ती दुसरी मुलगी, शाहीर, ऑर्डर्ली झालेला, सरंजामदार यांचे आवाज पुरेसे बोलकेच होते.
पुन्हा एकदा, कलाकारांना मात्र दाद!
अवांतर: अरूण रॉय हीच व्यक्तिरेखा न घेता अलका ही व्यक्तिरेखा का घेतली असावी? पुन्हा बाकी संदर्भ तेच. आयएएस, माजी जिल्हाधिकारी, दिल्लीतील मैत्रीसंबंध वगैरे!

प्रकाश घाटपांडे's picture

27 Jan 2010 - 9:22 am | प्रकाश घाटपांडे

हे एक प्रायोगिक नाट्य आहे. हायब्रिड फॊर्म हा जाणीवपुर्वक घेतला असावा. ग्रामीण व शहरी प्रेक्षकांचा लघुत्त्तम साधारण विभाजक/विभाज्य घेतल्यास तोच व्यवहार्य ठरतो. सर्वसमावेशक करण्याच्या प्रयत्नात ते बोजड झाले असते. तरीही तुम्ही म्हणता तसे

योगिनी आत्ता जे करते आहे त्यातील किंवा अरूण रॉय यांचा तो काटेदार संघर्ष नाटकाची एकूण लांबी ध्यानी घेता समाविष्ट करता आला नसता असे थोडेच आहे. म्हणजेच आहे या जीवात हे नाटक आणखी आटोपशीरही झाले असते.

हे मात्र खरे. मॅच्युअर्ड प्रेक्षक जेव्हा प्रायोगिक नाटकांकडे पाहतो त्यावेळी त्या मर्यादा प्रायोगिकतेच्या असतात. एक वेगळा प्रयोग या दृष्टीने पाहिल्यास नाटक समाधान देते. ( अर्थात हे व्यक्तीसापेक्ष आहे)

पोलिसांमध्ये ऑर्डर्ली असताना आपल्या प्रमुखाविरुद्ध धरणं आंदोलन केलं आहे आणि त्यापोटी नोकरी गमावली आहे, त्याच्याकडून. इतकी सोपी नसते ही प्रक्रिया.

हे वास्तव च आहे. पण यातुन ऑर्डलीच्या मनातील विद्रोह व्यक्त होतो. भले तो आंदोलन करणार नाही पण घुसमट नक्की होते. बाईसाहेब काम सांगतात त्यावेळी नवीन पिढितील पोलिस शिपाई विद्रोह व्यक्त करतो अशा वेळी " गांडीला दात आलेत का? म्हाईतीये लई ब्यालिष्टर लागुन गेले." असे म्हणुन ऑर्डर्ली बदलला जातो. निमूटपणे काम करणार्‍याला सहकारी लोकांकडुन "ए पाठचोळ्या..." म्हणुन उपहास देखील सहन करावा लागतो. एस आर पीत हे जास्त घडत. महाराष्ट्रापेक्षा तुलनेने मागास राज्यात हे अधिक घडत असणार. सहसा हरकाम्या म्हणुनच काम करण्याची ज्याची लायकी आहे अशा लोकांनाच ऑर्डर्ली म्हणुन नेमतात.
नाटकात एनजीओ विषयी प्रतिमा डागाळु नये याची काळजी घेतली दिसते. ताजे उल्लेख हे व्हर्चुअली इंटरॅक्टीव्ह करण्याचा प्रयत्न असावा . हल्लि सिरिअल मधे पण असे उल्लेख असतात.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

प्रभो's picture

26 Jan 2010 - 11:14 pm | प्रभो

एका चांगल्या नाटकाची ओळख करुन दिल्याबद्दल धन्स पकाकाका..

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी

भडकमकर मास्तर's picture

27 Jan 2010 - 12:45 am | भडकमकर मास्तर

नाटकाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद...

मदनबाण's picture

27 Jan 2010 - 4:46 am | मदनबाण

हेच म्हणतो...

मदनबाण.....

At the touch of love everyone becomes a poet.
Plato

अक्षय पुर्णपात्रे's picture

27 Jan 2010 - 7:44 am | अक्षय पुर्णपात्रे

श्री मास्तर यांच्याप्रमाणेच म्हणतो. श्री घाटपांडे, नाटकाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. श्री पेठे मी नाशिकला होतो तेव्हा नाशकात नाटकासंदर्भात विविध अभिनव प्रयोग 'प्रयोग परिवार' या संस्थेमधुन करत असत. स्थानिक कलाकरांबरोबर त्यांनी केलेली काही नाटके पाहिलेली आहेत. त्यांच्या प्रयोगांना अधिकाधिक यश मिळो ही सदिच्छा. श्री मोडक यांचा समिक्षणात्मक प्रतिसादही परिचयाप्रमाणेच उत्तम.

....................................
I was working on the proof of one of my poems all the morning, and took out a comma. In the afternoon I put it back again. --- Oscar Wilde.

स्वाती दिनेश's picture

27 Jan 2010 - 12:16 pm | स्वाती दिनेश

नाटकाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद...
मास्तरांसारखेच म्हणते,
स्वाती

पाषाणभेद's picture

27 Jan 2010 - 8:28 am | पाषाणभेद

कावं सायेब, आप्ल्या आन्नसायबावरच हाय ना ह्ये नाटकं? उगा राजस्तानी बाप्या दावला म्हंजी आमाला कळना व्हय?
------------------------
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या-(इंजन मेक्यॅनीक)
(वरची माझी स्वाक्षरी आहे, पदवी किंवा शिक्षण नाही.)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Jan 2010 - 5:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नाटकाची ओळख करुन दिल्याबद्दल आभारी...!

नाटय़प्रशिक्षण व निर्मितीत इंद्रजित खांबे, राजेंद्र बापट, कणकवलीचे वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान यांनी खर्चाचा काही भार उचलला आहे.

आभार मानलेच पाहिजे वरील मान्यवरांचे.

नाटकाची कथा माहितीच्या अधिकाराची असेल तर त्याची मांडणी कशी झाली आहे, हा मात्र माझ्या उत्सूकतेचा विषय आहे. कारण, मजदुर किसान शक्ती संघटना, परिवर्तन,एनसीपीआरआय,शासन,न्यायव्यवस्था यांच्या भुमिकां त्याचबरोबर जागतिक बँकेच्या दबावामुळे माहितीच्या अधिकाराच्या कायद्याला बळकटी मिळाली हे सर्वश्रुत आहे. आणि असा हा लढा 'मंचावर'कसा आला आहे, त्याची उत्सूकता आणि काहीएक संदेश 'दलपतसिंग येता गावा' मधून पाहता यावा अशी अपेक्षा मात्र आहे....!

-दिलीप बिरुटे

दिनेश५७'s picture

28 Jan 2010 - 9:43 am | दिनेश५७

एका चांगल्या प्रयत्नाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.
मालेगावच्या चित्रसृष्टीची- मॉलिवूड-ची ओळख इथे पाहा :
http://ajaybuwa.blogspot.com/2008/05/blog-post.html