छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून "जीपीओ'कडील रस्त्याने बाहेर पडणारी गर्दी आज नेहमीसारखी "वाहत' नव्हती. या दिशेने बाहेर पडणाऱ्या आणि रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची पावले आज थबकत होती... आणि मूक होऊन पुढे सरकत होती. गेल्या वर्षी 26 नोव्हेंबरला याच रेल्वेस्थानकावर अतिरेक्यांनी अंदाधुंद गोळीबार करीत पहिला उच्छाद मांडला आणि नंतर अवघ्या मुंबईला वेठीस धरले. आज या स्थानकावर पाय ठेवणाऱ्या जवळपास प्रत्येकालाच "त्या' दिवसाच्या आठवणींचा वेढा पडलेला असतानाच, स्थानकाबाहेरच्या रस्त्यावरचे छायाचित्रांचे प्रदर्शन अंतर्मुख करीत होते. गर्दीच्या मनावरची ती जखम पुन्हा भळभळत होती आणि त्या वेदनाही जाग्या होत होत्या... त्या छायाचित्रांनी रेल्वेस्थानकाच्या त्या परिसराला पुन्हा एकदा त्या कडवट स्मृतींच्या खाईत लोटले होते...
...दुपारी मी या स्थानकावर उतरलो आणि हाच रस्ता पकडला. रस्त्याला लागण्याआधी बस डेपोच्या शेजारच्या फेरीवाल्यांचे आवाज नेहमीसारखेच घुमत होते; पण स्टेशनच्याच आवारात, मेन लाइन आणि लोकल लाइनच्या रस्त्याच्या दुभाजकावरील जाळीसमोरचे चित्र मात्र नेहमीपेक्षा काहीसे वेगळेच होते. तिथल्या प्रत्येक खांबावरच्या छायाचित्रांतून गेल्या वर्षीच्या हल्ल्याची जखम पुन्हा भळभळती झाली होती आणि अस्वस्थ, बेचैन गर्दी ती छायाचित्रे न्याहाळत स्तब्ध झाली होती... बाहेरच्या फेरीवाल्यांच्या कोलाहलाचा, गाड्यांच्या कर्णकर्कश भोंग्यांचा आणि अवघ्या मुंबईच्या गतीचा परिणाम तिथे जणू गोठून गेला होता... मीही त्या गर्दीत मिसळलो... त्याच अस्वस्थतेचा अनुभव घेत एकेक छायाचित्र न्याहाळत पुढे सरकू लागलो. मुंबईतील विविध वृत्तपत्रांच्या छायाचित्रकारांनी 26 नोव्हेंबरच्या "त्या' भयानक दिवशी जीव धोक्यात घालून केलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन तेथे मांडले होते... त्यामध्ये ओबेरॉयमधील थरार होता, ताजमधील आगीचे लोळ होते, भयाने गोठलेल्या वेदनांचा कल्लोळ होता, अतिरेक्यांशी सामना करण्याच्या तयारीतले हेमंत करकरेंचे छायाचित्र होते, जीव धोक्यात घालून छायाचित्रण करणाऱ्या छायाचित्रकारांच्या धाडसाचे पुरावे होते आणि अपुऱ्या शस्त्रांनिशी अतिरेक्यांशी लढण्यास सज्ज झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांचे "पोझिशन'मधले फोटोही होते. एखाद्या छायाचित्रातील रक्ताची थारोळी न्याहाळत थरकापल्या मनाने प्रवासी पुढे-पुढे सरकत होते; कुणी त्यातलीच काही छायाचित्रे मूकपणे आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात साठवून घेत होते आणि शेवटच्या छायाचित्राजवळ पोचताच सुन्नपणे बाहेर पडत होते...
अतिरेक्यांनी केलेल्या या "तबाही'मध्ये शहीद झालेल्यांना "अखेरचा सॅल्यूट' करताना दुःखावेग अनावर झालेल्या त्या मुंबईकराच्या छायाचित्रात जणू प्रत्येकाच्याच भावना ओतल्या गेल्या होत्या... गर्दी सुन्न होत होती.
याच गर्दीसोबत मी पुढे सरकत होतो. नजर छायाचित्रांवर खिळली होती. अखेरचे ते छायाचित्र पाहून मीही पुढे आलो आणि थबकलो... ते प्रदर्शन पाहिले होते, तरीही मी पुन्हा मागे वळलो... ते प्रदर्शन पाहाणाऱ्या गर्दीच्या प्रतिक्रिया मला न्याहाळायच्या होत्या... मी मागे पहिल्या छायाचित्राजवळ आलो आणि सरकत्या गर्दीसोबत पुढे सरकू लागलो... अचानक माझी नजर बाजूनेच चालणाऱ्या एका तरुणीकडे गेली. भिजल्या आणि थिजल्या डोळ्यांनी ती एकेक छायाचित्र डोळ्यांत अक्षरशः साठवून घेत होती... तिच्या डोळ्यांतले थिजलेले भाव पाहताच मी गोठलो आणि तिला कळणार नाही, अशा बेताने तिच्याच गतीने पुढे सरकत राहिलो... प्रत्येक छायाचित्रासमोर तिचा व्याकूळपणा आणखीनच वाढत होता... एका हातानं तिनं तोंडावर रुमाल घट्ट धरला होता; पण तिच्या डोळ्यांतील वेदना मात्र लपली नव्हती. "ताज'मधून बाहेर पडणारे आगीचे लोळ एका छायाचित्रात दिसताच, ते डोळे आणखी व्याकूळ झाले... पुढच्याच छायाचित्रात, दोरखंडाच्या साह्याने अतिरेक्यांवर चढाईच्या तयारीतले जवान पाहताच तिचे डोळे चमकले... हेमंत करकरेंचे ते छायाचित्र पाहताच ती बहुधा पुन्हा कळवळली... तिनं तोंडावरचा रुमाल आणखी घट्ट धरला... एका टॅक्सीच्या आडोशाने अतिरेक्यांच्या कारवाया पाहणाऱ्या पोलिस शिपायांच्या छायाचित्रातील असहाय्यता पाहून ती बहुधा अस्वस्थ झाली... आपल्या कुणा नातेवाइकाच्या विरहाने आणि कदाचित अघटिताच्या बातमीने हंबरडा फोडणाऱ्या एका पाहुणीच्या छायाचित्राने तिला आणखी व्याकूळ केले... आता तिच्या गळ्यातून उमटणारे हुंदकेही मला जाणवत होते. त्यांना आवाज नव्हता; पण ती अक्षरशः हलली होती... ते स्पष्टपणे जाणवत होते... एका छायाचित्रासमोर येताच तिनं डोळेही गच्च मिटून घेतले... गेल्या वर्षीची ही छायाचित्रे पाहतानादेखील तिच्या मनावर असह्य ताण येतोय, हे जाणवून मलादेखील अस्वस्थ वाटू लागले होते... अखेर ती त्या शेवटच्या छायाचित्रासमोर येऊन उभी राहिली... पुढे सरकणाऱ्या अवघ्या गर्दीची पावले तिथे थबकलेलीच होती... सगळी गर्दी मूक झाली होती... एक विचित्र मानसिक दडपण तिथे दाटले होते...
...तीदेखील या गर्दीसोबत तिथे थबकली. तोंडावर पकडलेल्या रुमालाची पकड आणखी घट्ट झाली होती... डोळ्यांमधल्या वेदना आणखी ठळक झाल्या होत्या... आणि आतल्या आत उमटणारे ते हुंदके आता स्पष्ट झाले होते... अनावर दुःखाने शहीदांना अखेरचा, निरोपाचा "सॅल्यूट' करणाऱ्या "त्या मुंबईकरा'च्या छायाचित्रांसमोर येताच ती आणखीनच कोलमडली... आतापर्यंत दाबून ठेवलेला हुंदका तिला आवरत नव्हता... डोळ्यांच्या ओल्या कडांमधून अश्रूंची धार सुरू झाली होती... तिने ते अश्रू तिथेच वाहू दिले... बाहेर पडणारा हुंदकादेखील न रोखता ती क्षणभर तिथे उभी राहिली आणि झटक्यात तिनं मान फिरवली... मागे न पाहता ती वेगाने रस्त्यावर आली आणि टॅक्सीला हात दाखविला...
वाहत्या मुंबईत तीही नंतर सामील झाली होती,
शहीदांसाठी अश्रूंच्या दोन थेंबांची मूक आदरांजली अर्पण करून !!
(http://epaper.esakal.com/esakal/20091124/5252744312364196537.htm)
(http://zulelal.blogspot.com)
प्रतिक्रिया
25 Nov 2009 - 5:30 pm | सूहास (not verified)
कुठेतरी असच्या अस वाचले !!! आठवत नाही !!
असो !!
केवळ निशब्द..
सू हा स...
25 Nov 2009 - 5:56 pm | jaypal
२६/११ या विषयी अधिक सचित्र माहीती इथे
**************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
25 Nov 2009 - 8:38 pm | सूहास (not verified)
जयपाल ने दिलेल्या दुव्यातील प्रतिक्रिया वाचनीय !!
धन्स !!
सू हा स...
25 Nov 2009 - 9:49 pm | संदीप चित्रे
.. :(
25 Nov 2009 - 10:03 pm | प्रभो
...
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
25 Nov 2009 - 5:59 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
हुतात्म्यांसाठी अश्रूंच्या दोन थेंबांची मूक आदरांजली माझ्याकडूनही!
अदिती
25 Nov 2009 - 6:16 pm | धमाल मुलगा
!
25 Nov 2009 - 6:27 pm | स्वाती२
माझीही आदरांजली.
25 Nov 2009 - 8:26 pm | रेवती
माझीही आदरांजली, सर्व शहिदांना!
तो कसाब अजून जिवंत कसा.....सर्व गुन्हे करून्.....आणि निरपराध कधीच गेलेत!
रेवती
25 Nov 2009 - 9:01 pm | गणपा
ते तर आहेच हो पण मोठ्या शहरात अश्या लहान-सहान घटना होतातच असे अकलेचे तारे तोडणारे तेव्हाचे गृहमंत्री परत बसलेच ना गादिवर..याची शरम वाटते.
25 Nov 2009 - 11:25 pm | अडाणि
हुतात्म्यांसाठी आदरांजली माझ्याकडूनही !
गणपाशेठ - तुम्हिपण मिडीया च्या भंवर मधे फसलात काय ? जमल्यास त्या मुलाखतीचे वर्ड टू वर्ड शब्दांकन बघा किंवा हा पुर्वीचा धागा बघा. मि मागे एका धाग्यावर शब्दांकन दिले होते पण ते मला आता सापडत नाहिये.
-
अफाट जगातील एक अडाणि.
25 Nov 2009 - 9:17 pm | यशोधरा
:(
26 Nov 2009 - 9:01 am | बिपिन कार्यकर्ते
:(
बिपिन कार्यकर्ते
25 Nov 2009 - 9:24 pm | प्रभो
माझीही आदरांजली.
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
25 Nov 2009 - 10:28 pm | मॅन्ड्रेक
at and post : Xanadu.
25 Nov 2009 - 11:47 pm | विसोबा खेचर
सुन्न!
26 Nov 2009 - 12:14 am | आशिष सुर्वे
लेख वाचतानाच सगळे धूसर दिसू लागले
डोळे कधी वाहू लागले कळालेच नाही
-
कोकणी फणस
26 Nov 2009 - 12:16 am | चित्रा
माझीही आदरांजली. झाले ते परत येत नाही, पण असे परत होऊ नये म्हणून काय करतो आहोत, हे पाहणे महत्त्वाचे.
मध्ये एक ब्लॉग वाचला - करण जोहर - http://www.mynameiskaran.com/
वरचेच पोस्ट २६ नोव्हेंबरबद्दल आहे.
In our every day lives where maybe we went to Tiffin for lunch or did some window-shopping at the Taj, we now feel unsafe in our cars with tinted windows and our buildings with multiple watchmen. We now feel what a section of the city’s lower-middle class felt on July 11th, 2006 when their security was threatened. Affluent members of society now prance around panels claiming Bombay is no longer safe. This city isn’t safe now, nor was it safe 2 years ago.
दूरदेशी राहून चाललेला संहार बघताना कसे वाटते याचे वर्णन वाचून त्यादिवशीच्या आठवणी आल्या.
26 Nov 2009 - 8:45 am | सखी
सर्व शहीदांना आदरांजली. आत्ताच टाईम्सच्या बातमीनुसार कसाबला जीवंत व सुरक्षित ठेवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आत्तापर्यंत ३१ करोड किंवा प्रतिदिनासाठी ८५ लाख खर्च केलेत!!
अशोक कामेटच्या बायकोने पुस्तक लिहले असल्याचे पण ऐकले, भारतात असणारे लोक कदाचित याबद्दल जास्त माहीती देऊ शकतील.
26 Nov 2009 - 9:19 am | प्राजु
काय बोलू? :(
- प्राजक्ता
http://www.praaju.com/
26 Nov 2009 - 12:56 pm | सुमीत भातखंडे
नाहीत.
सर्व शहिदांना विनम्र आदरांजली.