आगे नारी - एक कोंकणी लोकगीत

धनंजय's picture
धनंजय in जनातलं, मनातलं
2 Nov 2009 - 12:48 am

गोव्यातली "ख्रिस्ती लोकगीते" गोव्याबाहेर फारशी परिचयाची नाहीत. त्यांच्यावर पाश्चिमात्य संगीताची छाप आहे, पण मूळ ती एतद्देशीय आहेत. गोव्यातील पाककलेसारखेच हे घरोघरच्या, गावोगावच्या कलाकारांना स्फुरलेले रम्य मिश्रण आहे.

हल्लीच काही महिन्यांपूर्वी गोव्याच्या ख्रिस्ती लोकगीतांचा एक खजिना मला आंतरजालावरती मिळाला. वेगवेगळ्या लोकांनी केलेली संकलने सुरावटीसकट स्कॅन करून या स्थळावर चढवलेली आहेत. एक सुखद आश्चर्य म्हणजे त्यातले एक संकलन (ख्रिस्तवासी) पाद्री लूर्दीन्य बार्रेतो यांनी केलेले होते - हे नाव माझ्या ओळखीचे होते. बार्रेतो मास्तर (माएस्त्रो) पूर्वी गोव्याच्या कला आकादमीच्या पाश्चिमात्य संगीत विभागाचे निदेशक होते. मी सराव केला असता तर त्यांच्याकडून खूप शिकू शकलो असतो, पण कर्मधर्मसंयोगाने, ते जमणे नव्हते. (हातात कौशल्य आणि सरावात चिकाटी नव्हती, असे म्हणा ना!)

संकलनातील एखादे गीत येथे द्यावे, गीताची लोककाव्य म्हणून थोडक्यात चर्चा करावी, आणि सुरावटीच्या खजिन्याकडे येथील संगीत-विशेषज्ञांचे लक्ष वेधावे, अशी या लेखाची उद्दिष्ट्ये आहेत.

गीत मुद्दामून तसे थोडे ओळखीचे निवडतो आहे. राज कपूरने बॉबी चित्रपटात प्रसिद्ध केलेले हे गीत आहे. "ना मांगू सोना चांदी" या हिंदी शब्दांच्या पूर्वी "आगे नारी..." ही कोंकणी गाण्याची लकेर ऐकू येते. पुढे "घे घे घे घे रे" असा कोरस ही हिंदी गाण्यात घेतला आहे. "ना मांगू" ही चाल सुद्धा एका कोंकणी कडव्याची आहे (कोंकणीमध्ये "हांव सायबा पलथडे वेता").

बार्रेतो मास्तरांचे (माएस्त्रोंचे) सुरावटीचे पान येथे देत आहे

मास्तरांनी "देखणी" या गीतप्रकाराची म्हणून ही रचना दिली आहे. (अन्य लोक हे गाणे "दुल्पोद=द्रुतपद" असेही गातात. दुल्पोदामध्ये गायक आणि लोक शिघ्रकाव्य करून कडवी जोडत जातात.)
शब्द असे आहेत :
आगे नारी, तुज्या नाकाचि नोत(ती), नाकासोरी (२ दा)
(आगे नारी! तुझ्या नाकाची नथ नाकावरी)
घे घे घे घे घे, घे गा सायबा
(घे घे घे घे घे, घे गा साहेबा)
म्हाका नाका गो, म्हाका नाका गो
(मला नको ग, मला नको ग)
ही म्होज्या नाकाचि नोत(ती), घे गा सायबा
(ही माझ्या नाकाची नथ, घे गा साहेबा)
म्हाका नाका गो, म्हाका नाका गो
(मला नको ग, मला नको ग)

सुरावटीकडे लक्ष दिल्यास एक आपल्या लगेच लक्षात येते की एकाच वेळी गाण्यासाठी दोन धुनी दिलेल्या आहेत. एक स्त्री गाईल, तर एक पुरुष गाईल. पैकी कुठलीही पट्टी माझ्या गळ्याला पेलणारी नाही - दोघे सफेत ६ मध्ये गातात म्हणून मी गाऊन दाखवत नाही. माझे किरकिरे वाद्यवादन भसाड्या गायनापेक्षा बरे - दगडापेक्षा वीट मऊ.

स्त्री-धुन अशी -
Get this widget | Track details | eSnips Social DNA
ही पुरुषाने गायची धुन :
Get this widget | Track details | eSnips Social DNA
दोन्ही धुनी एकत्र गायल्यामुळे एकमेकांना साथ मिळते -
Get this widget | Track details | eSnips Social DNA

स्त्रीसाठी पूर्ण सुरावट येणेप्रमाणे (ही बॉबी चित्रपटातल्यापेक्षा थोडी वेगळी असेल - लोकसंगीतात थोडेफार फरक असतातच) :
Get this widget | Track details | eSnips Social DNA

सुरावटीत गितार किंवा पियानोवर कुठली साथ द्यावी, त्याबद्दलही मार्गदर्शन आहे (E, E7, A, Am वगैरे). सांगायचा मुद्दा असा, की ज्यांना गायला जमते, गितार वाजवायला जमते, ते या संकलनाचा चांगला उपयोग करून घेऊ शकतील.

गाण्याची अधिक कडवी त्याच संकेतस्थळावर जे. ए. ए. फर्नांडिस यांच्या पुस्तकांत (दुल्पोद म्हणून) दिसतात.

आगे नारी, तुज्या नाकांतु नोती, नाकसोरी (२दा)
(अगे नारी, तुझ्या नाकाची नथ तुझ्या नाकावरी)
आंउ सायबा पेलेतोडी वेत्तां
(साहेबा, मी पैलतिरी जाते)
दोमूल्या लोग्नांकु वेत्तां
(दोमूच्या/दामूच्या लग्नाला जाते)
माका सायबा वाटु कोळो नां
(साहेबा मला वाट माहीत नाही)

कडवे :
दोमूल्या काझराक कोलवोंतांचो केळू (२दा)
(दोमूच्या लग्नासाठी कलावंतिणींचा खेळ आहे)

अन्य नथी सारखीच गायची कडवी -
आगे नारी, तुज्या गोळातुं गोळसोरी, गोळिया सोरीं
(अगे नारी, तुझ्या गळ्यात गळसरी गळ्यावरी)
आगे नारी, तुज्या पायांतुं पांयजोणा, पायां सोरीं
(अगे नारी, तुझ्या पायात पैंजणे पायावरी)

आता सांगावे तर लोकगीताला - विशेषतः गातागाता शिघ्र कडवी जोडायची असली अशा गीताला - फार खोल अर्थ बघता येत नाही. पण मला वाटते, इथे बॉबी चित्रपटात अर्थ (अति-)स्पष्ट करून सांगितला आहे ("सोने चांदी माझ्या कामाची नाही, प्रेम दे"), तो पटण्यासारखा आहे.

नदीपलिकडे दामूचे लग्न आहे. स्त्री तिकडे नाच खेळायला चालली आहे. तिथे कसे पोचायचे तिला समजत नाही. तिचा नाविक/प्रेमिकाशी संवाद होतो. स्त्री वाट विचारते. वाट सांगण्याऐवजी प्रेमिक एक एक करून तिला तिच्या दागिन्यांची आणि अंगांची नावेच सांगतो. "कदाचित त्याला नावेतून नेण्यासाठी मोबदला हवा आहे का?" असे लटकेच वाटून स्त्री तो दागिना त्याला देऊ करते. प्रत्येक वेळी प्रेमिक-नाविक "मला दागिना नको" म्हणून सांगतो. प्रेमिक आणि प्रेयसी दोघेही "आपण प्रेमाबद्दल बोलतो आहोत" असा एक शब्द उच्चारत नाहीत. पण प्रेम सांगितले जाते! हे न-सांगता सांगणे, ही सूचकता, मला "बॉबी" चित्रपटातल्या गाण्याच्या उघड-वक्तेपणापेक्षा भावते.

ओळखीच्याच गाण्याची पुन्हा वेगळी ओळख वाचकांना गमतीदार वाटली असेल, अशी आशा करतो. माझ्यापेक्षा संगीताचे कौशल्य असणार्‍यांनी सुरावटींचा उपयोग केला, मिसळपावकरांना सांगितिक आनंदही दिला तर या ओळखीचा दुप्पट-चौपट उपयोग होईल.

- - -
ऐतिहासिक-सांस्कृतिक टिप्पणी :
गोव्यातील जुन्या कोन्क्विस्ती (बारदेश, तीसवाडी, सासष्टी आणि मुरगांव तालुके) येथे गोव्यातील ख्रिस्ती लोक मोठ्या प्रमाणात राहातात. यांच्यात आता ख्रिस्ती धर्माबद्दल कमालीची आत्मीयता आहे, पण जुलमी पोर्तुगीज सत्तेबाबत मात्र रोष आहे. बाटवाबाटवीच्या काळात गावी एखादाच भाऊ बाटून जुन्या गावात मालमत्ता सांभाळण्यासाठी राही. तर बाकी कुटुंब जुवारी किंवा मांडवी नदी ओलांडून आदिलशाहीत किंवा मराठेशाहीत जात. या आपल्या नातेवाइकांबद्दल बाटलेल्या गोवेकरांना फार प्रेम असे (आहे). पोर्तुगिजांविरुद्ध छुपे बंड या लोकगीतात कित्येकदा दिसते. पण प्रेम, "नोस्टॅल्जिया" वगैरे सामान्य भावनांबद्दल गाताना कित्येकदा गंगा-यमुनेजवळील आपली प्राचीन भूमी, नदीपलीकडचे नातेवाईक, वगैरे विषय सहज, हळवेपणाने येतात. पुढे पोर्तुगिजांनी गोव्याचे बाकीचे तालुकेही काबीज केले (यांना नव्या कोन्क्विस्ती म्हणतात), तेव्हा बाटवाबाटवीचा सरकारी कार्यक्रम थंड झाला होता. नव्या कोन्क्विस्तींमध्ये बहुसंख्य हिंदू आहेत.

कलासंगीतसंस्कृतीप्रकटन

प्रतिक्रिया

अजय भागवत's picture

2 Nov 2009 - 2:59 am | अजय भागवत

ऐतिहासिक-सांस्कृतिक टिप्पणी वाचून एक फार महत्वाचा माहितीचा दुवा हाती आला. वरील सगळे विवेचन आवडले.

यन्ना _रास्कला's picture

2 Nov 2009 - 4:30 am | यन्ना _रास्कला

आयकुन मजा आली.

गो माजे बाय ह्या गान्याबदल पन लिव्हाल काय.

पुर्न गानच लिहुन दिल तर ब्येस्ट्च व्हईल. माझ फेवरीट्ट गान आहे त्ये.

*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
न येसा रावन आनी येसा हनम्या. हनम्या रावनाला बघुन क बोल्तो माहितीयेका. का र ए बायकाचोर, दुस्र्याच्या बाय्का पलवतस. देउ का तुला पोकल बाम्बुचे फट्के देउ का. सोर्तोस कि नाय वैनीला सोर्तोस कि नाइ.

प्राजु's picture

2 Nov 2009 - 5:24 am | प्राजु

खास आहे लेख!!
अतिशय सुंदर माहिती आणि काही प्रमाणात इतिहास.. उत्तम!
आपले आभार दुवा उपलब्ध करून दिल्याबद्दल.
- प्राजक्ता
http://praaju.blogspot.com/

सहज's picture

2 Nov 2009 - 6:50 am | सहज

विवेचन आवडले.

खासच!!

लहानपणापासून ऐकलेल्या ह्या गाण्याची सुरेख ओळख करून दिली आहे. गोव्यातील ह्या ख्रिस्ती लोकगीतांतील ठेका मला खूप आवडतो. तसे पाहू गेले तर, हिंदी चित्रसृष्टीतील अनेक संगीतकारांना त्याचा मोह पडला होता, असे दिसेल.

असेच आणखी एक गीत, पूर्वीदेखिल एकदा डकवले होते, पण वेगळ्या संदर्भात.

" alt="" />
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

मस्त कलंदर's picture

2 Nov 2009 - 8:24 am | मस्त कलंदर

कोंकणी गाणी खूप कळत नसतील तरी कानाला मधुर वाटतात... नि त्यात असं सहजसुंदर विवेचन...! खरंच दिवसाची सुरूवात छान झाली!!!!!

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

अवांतरः:महानंदामधलं 'माझे राणी माझे मोगा' बरचसं मराठी ढंगाने जात असले तरी त्यातल्या कोंकणी शब्दांमुळे तेही ऐकायला छान वाटते

रामदास's picture

2 Nov 2009 - 9:06 am | रामदास

हा लेख सुंदर आहे ,विद्वत्तापूर्ण आहे ,असे मी म्हणणे जातीवंत कलाकारानी केलेल्या सुंदर सजावटीवर सिगरेटच्या पाकीटतल्या चांदीचा तुकडा चिपकवण्यासारखे आहे.
धनंजय ,आमचे स्नातकोत्तर शिक्षण तुमच्या विद्यापिठात होत आहे.
अवांतर :एक सणसणीत लेख. क्रमशःची डझनभर अंडी घालणर्‍या लेखकांनी यावरून काही बोध घ्यावा का ?

श्रावण मोडक's picture

2 Nov 2009 - 10:07 am | श्रावण मोडक

वरील सर्वांशी सहमत.

समंजस's picture

2 Nov 2009 - 11:23 am | समंजस

लेख आवडला!!!!!

विसुनाना's picture

2 Nov 2009 - 12:34 pm | विसुनाना

चहुअंगांनी परीपूर्ण आंतरजालीय लेख.
खूपच आवडला.

स्वाती२'s picture

2 Nov 2009 - 5:24 pm | स्वाती२

छान माहिती मिळाली. माझ्या मुलालाही ऐकायला मजा वाटली.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Nov 2009 - 5:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सांस्कृतिक टीपेबरोबर विवेचनही आवडले. आणि अधिक उत्सुकता आहे ती 'ख्रिस्ती लोकगीतांवर' एखादा स्वतंत्र लेख येण्याची.

-दिलीप बिरुटे

चित्रा's picture

3 Nov 2009 - 9:58 am | चित्रा

वाद्य येत नसलेल्यांनाही शिकावे असे वाटेल अशी गोव्याच्या सांस्कृतिक ठेव्याची ओळख.

यशोधरा's picture

3 Nov 2009 - 6:36 pm | यशोधरा

मस्त :)

ऋषिकेश's picture

4 Nov 2009 - 10:00 am | ऋषिकेश

वा!.. अतिशय माहितीपूर्ण त्याचबरोबर रोचक लेख... सोदाहरण स्पष्टीकरणे आवडली.. :)
अजून वादन ऐकायला आवडेल

(धनंजय यांच्या अष्टपैलुत्वाने चकीत) ऋषिकेश
------------------

धनंजय's picture

8 Nov 2009 - 5:00 pm | धनंजय

सर्व वाचकांचे आभार.

(आणि कुठल्याही टोचणीने रामदासांचे क्रमशः पुढे जात असतील तर हा अनपेक्षित पण उत्तम परिणाम!)